इटावा : उत्तर प्रदेश राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण. लोकसंख्या ८५,९०० (१९७१). हे आग्र्याच्या आग्नेयीस ११२ किमी यमुनेच्या पूर्व तीरावर वसले असून उत्तर रेल्वेचे आग्रा-कानपूर मार्गावरील मोठे स्थानक आहे. आग्रा-अलाहाबाद मार्ग व फरूखाबादग्वाल्हेर मार्ग येथे एकत्र येतात. हिंदू साम्राज्यात हे एक वैभवशाली व भरभराटलेले नगर होते, परंतु महमद गझनी व शहाबुद्दीन घोरी यांनी ते लुटून उद्ध्वस्त केले. यानंतर पुन्हा मल्हारराव होळकरांनी १७५० मध्ये हे लुटले किराणामाल आणि तुपाची ही बाजारपेठ असून येथील सतरंज्या व मिठाई प्रसिद्ध आहे. येथील जुनी मंदिरे व घाट, चौहान वंशीयांच्या प्राचीन किल्ल्यांचे अवशेष तसेच मूळच्या हिंदू मंदिरावर बांधलेली जामा मशीद प्रसिद्ध आहे.
ओक, शा. नि.