ऑरेटोरिओ : ऑरेटोरिओची काटेकोर व्याख्या करणे अवघड आहे कारण वेगवेगळ्या देशांत, वेगवेगळ्या काळी ह्या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावण्यात आलेला आहे. तथापि ऑरेटोरिओच्या प्रचलित स्वरूपावरून त्याची सर्वसाधारण वैशिष्ट्ये जाणवतात. ती अशी : प्रथमतः त्यात संगीतबद्ध करण्याच्या स्पष्ट हेतूने केलेली रचना असते. ह्या रचनेत वाद्यवृंद, वृंदगायन आणि एकगायन (सोलो) ह्यांस वाव मिळेल अशी दृष्टी ठेवलेली असते. ह्या विवक्षित रचनेस ‘लिब्रेत्तो’  असे म्हणतात. लिब्रेत्तो हे ऑरेटोरिओप्रमाणेच संगीतिकांसाठीही लिहिले जातात. लिब्रेत्तोचा विषय सामान्यतः धार्मिक असून त्याची मांडणी नाट्यात्म कथाकाव्यासारखी असते. ऑरेटोरिओसाठी लिहिलेल्या लिब्रेत्तोचा विषय बहुधा धार्मिक असला, तरी लौकिक आशयाचे लिब्रेत्तोही ऑरेटोरिओसाठी लिहिले जातात. ऑरेटोरिओसाठी लिहिलेल्या लिब्रेत्तोमधील पात्रे आपापले निवेदन गाऊन दाखवीत असतात मात्र संबंधित गायकांनी त्या त्या पात्रानुरूप रंगभूषा वा वेषभूषा केलेली नसते. नेपथ्य तसेच अभिनयही ऑरेटोरिओला त्याज्य आहे.

 अगदी प्रारंभीच्या ऑरेटोरिओंमध्ये मात्र रंगभूषा, वेषभूषा, देखावे इ. रंगसाधनांचा आणि अभिनयाचा उपयोग करून घेतला जाई. त्यावेळी ऑरेटोरिओचे नाते संगीतिकेशी विशेष निकटचे होते. अद्यापही काही ऑरेटोरिओ कधीकधी रंगभूमीवर संगीतिकेच्या स्वरूपात सादर केले जातात.

अठराव्या शतकाच्या अखेरीस लंडनमधील लेंट येथे सादर केले जाणारे संकीर्ण स्वरूपाचे काही सांगीतिक कार्यक्रमही ऑरेटोरिओ म्हणून ओळखले जात असत. ऑरेटोरिओ आणि संगीतिका ह्यांतील फरक दर्शविणारी वैशिष्ट्ये सामान्यतः पुढीलप्रमाणे आहेत : (१) ऑरेटोरिओतील संगीतयोजनेत वृंदगायनावर विशेष भर दिलेला असतो. (२) त्यातील संवाद शीघ्रगतीने पुढे जात नाहीत. (३) ऑरेटोरिओत अनेकदा ‘टेस्टो’ म्हणून ओळखला जाणारा एक निवेदक आणण्यात येतो. ऑरेटोरिओमधील विविध पात्रांचा तो परिचय करून देतो.

इटली हे ऑरेटोरिओचे जन्मस्थान. सेंट फिलिप नेरी (१५१५–१५९५) ह्याने रोममध्ये रंजकाच्या द्वारे तेथील युवकांवर धार्मिक-नैतिक संस्कार घडविण्याचे कार्य चालविले होते. त्यासाठी अद्भुत आणि सदाचार नाटकांच्या धर्तीवरील संगीतप्रधान बोधवादी नाटके सादर केली जात. त्यांत ईश्वर आणि आत्मा, स्वर्ग आणि नरक अशांसारख्या जोड्यांतील पद्यमय संवाद गायिले जात. बोधवादी रंजनाच्या ह्या प्रकारांतूनच ऑरेटोरिओ उत्क्रांत झाला. ही नाटके एका चर्चच्या ऑरेटरीत होत असल्यामुळे त्याला ‘ऑरेटोरिओ’  असे नाव प्राप्त झाले. Rappresentazione di anima e di corpo (१६००, इं. शी. द रिप्रेझेंटेशन ऑफ सोल अँड बॉडी) हा पहिला ऑरेटोरिओ मानला जातो.

इटलीनंतर जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, ब्रिटन, अमेरिका इ. अनेक देशांत ऑरेटोरिओ सादर होऊ लागले. आधुनिक ऑरेटोरिओचे गुणधर्म बाक आणि हँडल ह्या दोघांनी निश्चित केले. विसाव्या शतकात एडवर्ड एल्गारने ह्या प्रकारासाठी आपली गुणवत्ता व्यतीत केली. तसेच बेंजामिन ब्रिटननेही त्याच्या विकासास हातभार लावला. हँडलकृत मिसाया, मेंडेल्सझोनकृत इलायजा, बाककृत सेंट मॅथ्यूज पॅशनआणि एल्गारकृत ड्रीम ऑफ जेरोंटिअस हे विशेष प्रसिद्ध ऑरेटोरिओ होत.

मोदी, सोराब (इं.) रानडे, अशोक (म.)