ऑम्डरमन : सूदानमधील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या २,५२,४३० (१९७०). हे श्वेत नाईलच्या पश्चिम तीरावर असून येथून जवळच श्वेत नाईल व नील नाईल यांचा संगम होतो. हे खार्टुमच्या ८ किमी. वायव्येस असून कृषिउत्पादने, विशेषतः कापूस  धान्य, फळे तसेच पशुधन, हाडे, डिंक, कातडी यांची ही मोठी बाजारपेठ आहे. येथे लाकूडकाम, धातुकाम, चर्मकाम, हस्तिदंत, कापड, फर्निचर व चिनी मातीची भांडी यांचे कारखाने आहेत. १८८५ पर्यंत खेडे असलेले ऑम्डरमन खार्टुमचा पाडाव झाल्यानंतर राजधानीचे शहर बनले होते. लॉर्ड किचनेरने १८९८ मध्ये ऑम्डरमनजवळील लढाईत येथील खलीफाचा पराभव केला. येथील कॉप्ट व इतर ख्रिश्चन चर्च व मशिदी आकर्षक असून प्रमुख मशिदीत इस्लाम धर्म व कायदा यांच्या शिक्षणाचे केंद्र आहे. नभोवाणी केंद्र, नाट्यगृह, महदी पाशाची कबर, खलीफाच्या वाड्यातील संग्रहालय या येथील विशेष वास्तू होत.

जोशी, चंद्रहास