इग्वाना : सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गाच्या लॅसर्टीलिया गणातील इग्वानिडी कुलातला हा सरड्यासारखा, पण त्याच्यापेक्षा मोठा प्राणी आहे. या कुलातील इग्वाना वंशाचे प्राणी हे खरे इग्वाना होत. इग्वानिडी कुलातील इतर काही वंशांच्या सरड्यांनासुद्धा इग्वाना म्हणतात.
इग्वाना दक्षिण अमेरिकेच्या सगळ्या उष्णकटिबंधीय प्रदेशात आणि वेस्ट इंडीज बेटांत आढळतात. दोन जाती गॅलापेगॉस बेटांवर आणि एक फिजी व फ्रेंडली बेटांत आढळते. दक्षिण अमेरिकेतील सामान्य इग्वानाचे शास्त्रीय नाव इग्वाना इग्वाना हे आहे. याची इग्वाना डेलिकेटिसिमा ही आणखी एक जाती असून ती कॅरिबियन बेटांवर आढळते.
सामान्य इग्वना वृक्षवासी असून नेहमी पाण्याच्या जवळ असणाऱ्या झाडांवर राहतो. झाडांच्या आडव्या आणि पुढे आलेल्या फांद्यांवर तो उन्ह खात पडलेला असतो. संकटाच्या वेळी झाडावरून पाण्यात सूर मारून तो पाण्याखालून पोहत दूर जातो किंवा काही वेळ पाण्याखालीच राहतो.
शेपटीसकट याच्या शरीराची लांबी १·८ मी. असते यांपैकी शेपटीची २/३ असते. शेपटी चपटी असून टोकाकडे निमुळती होत जाते. शरीर आणि शेपटी लहान खवल्यांनी पूर्णपणे झाकलेली असते. पाठीवर मानेपासून शेपटीच्या बुडापर्यंत भाल्यासारख्या पण मऊ व चिवट कंटकांची (काट्यांची) ओळ असते. मादीचे कंटक नरापेक्षा लहान असतात. गळ्याच्या पृष्ठावरून एक पिशवी लोंबत असते. इग्वाना इग्वाना या जातीत कर्ण पटहाखाली (कानातील पडद्याखाली) एक वाटोळी चकती (वर्म) असते;डेलिकेटिसिमा या जातीत ती नसते. रंग फिकट हिरवट-करडा बाजूंवर ठळक काळे पट्टे आणि शेपटीवर रुंद काळी वलये असतात. नराचे कंटक फिकट गुलाबी असतात. मादी सामान्यत: तपकिरी असते. पिल्लांचा रंग चकचकीत हिरवा असतो.
सामान्य इग्वाना शाकाहारी आहे. बाळगलेले प्राणी सेलरी, लेट्यूस (सालीट), केळी वगैरे आवडीने खातात. खाऊ घातल्यास ते लहान पक्षी, उंदीर, अळ्या वगैरे खातात. इग्वानाचे मांस स्वादिष्ट आणि रुचकर असल्यामुळे पुष्कळ लोक ते खातात.
फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत केव्हातरी इग्वानाची मादी १२–२४ अंडी घालते व ती वाळूत पुरून ठेवते.
गॅलापेगॉस बेटांच्या किनाऱ्यावर सागरी इग्वाना राहतो. याचे शास्त्रीय नाव अँब्लिऱ्हिंकस क्रिस्टेटस आहे. हा १·५ मी. लांब असून उत्तम पोहणारा आहे. हा समुद्रातील वनस्पती खातो. पुष्कळदा समुद्र किनाऱ्यावरील खडकांवर यांचे प्रचंड थवे बसलेले असतात.
जामदाडे, ज. वि.