इंग्लंड: युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दर्न आयर्लंड या देशाचा एक घटक. भौगोलिक दृष्ट्या ग्रेट ब्रिटनचे इंग्लंड, वेल्स व स्कॉटलंड असे तीन विभाग पडतात. इंग्लंड हा दक्षिणेकडील सर्वांत मोठा विभाग. क्षेत्रफळ १,३०,३६० चौ. किमी. लोकसंख्या ४,५८,७०,०६२ (१९७१) विस्तार ५०० उ. ते ५५०४८’ उ. व १० ४५’ पू. ते ६० १८’ प. जास्तीत जास्त दक्षिणोत्तर अंतर ५१८ किमी. व पूर्वपश्चिम अंतर ३२५ किमी. इंग्लंडच्या पश्चिमेस वेल्स आणि आयरिश समुद्र, उत्तरेस स्कॉटलंड, पूर्वेस उत्तर समुद्र आणि दक्षिणेस अटलांटिक महासागर व इंग्लिश खाडी आहेत. यूरोपखंडापासून इंग्लंड इंग्लिश खाडीने विभक्त झालेले आहे. इंग्लंडमधील डोव्हर व फ्रान्समधील कॅले यामधील अंतर फक्त ३४ किमी. आहे.
भूवर्णन: इंग्लंडचे क्षेत्र लहान असूनही त्यात बहुतेक सर्व भूवैज्ञानिक कालखंडांतील प्रस्तर आढळतात. त्यांची रचना जटिल स्वरूपाची आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात आर्कियन व पुराजीवकालीन खडक असून दऱ्यांखोऱ्यांतून कार्बोनिफेरस खडक आहेत. तसेच आग्नेयीकडील सखल भागाच्या उत्तरेकडे कार्बोनिफेरस खडक आढळतात. कार्बोनिफेरस खडकांत कोळशाचे मोठे साठे आहेत. सखल प्रदेशातील अर्वाचीन खडक कमजोर आहेत. त्यांत खडूच्या आणि चुनखडकाच्या टेकड्या आहेत. त्यांची उंची ३०० मी. पेक्षा अधिक नाही. हिमयुगात इंग्लंडचा सर्व भाग हिमाच्छादित होता. हिमयुगातील घडामोडींचा मोठा परिणाम ब्रिस्टलची खाडी व टेम्स नदी यांना जोडणाऱ्या रेषेच्या उत्तरेकडील भागात दिसून येतो. तेथे वायव्येकडील डोंगराळ भागात या घडामोडींमुळे सरोवरे तयार झाली आहेत. त्या भागालाच लेक डिस्ट्रिक्ट नाव पडले आहे. हिमयुगाच्या अखेरीस बर्फ वितळून तळखडक उघडे पडले आणि प्रवाहाबरोबर वाहून गेलेली माती (बोल्डर क्ले) व वाळू सखल प्रदेशात पसरली गेली व तो भाग सुपीक झाला तसेच पूर्वीच्या जलोत्सारणात व्यत्यय येऊन निर्माण झालेल्या सरोवरांपैकी बरीच सरोवरे आता कोरडी पडून तेथे सुपीक प्रदेश तयार झाला आहे.
स्वाभाविक दृष्ट्या इंग्लंडचे दोन भाग पडतात: ईशान्येकडील टाईन नदीच्या मुखापासून नैर्ऋत्येस एक्स नदीच्या मुखापर्यंत कल्पिलेल्या रेषेच्या पूर्वेकडील सखल प्रदेश व बाकीचा सर्व डोंगराळ प्रदेश. सखल प्रदेशातून वाहणाऱ्या टाईन, टीझ, ऊझ, ट्रेंट, हंबर व टेम्स या नद्यांची खोरी सुपीक असून त्यांच्या मुखांशी खाड्या व प्रसिद्ध बंदरे आहेत. इंग्लंडच्या सखल प्रदेशाभोवती विविध भूस्वरूपे आढळतात. या भागांत काही ठिकाणी (उदा., डोव्हर येथे) चुनखडकांचे तुटलेले कडे आढळतात, तर काही ठिकाणी (उदा., वाइट बेटात) पांढुरक्या चुनखडकांचे सुळके दिसून येतात. इंग्लंडच्या दक्षिण व आग्नेय समुद्रिकनाऱ्यांवर वाळूच्या पुळणी तयार झाल्या आहेत हंबर नदी व टेम्स नदीची खाडी यांदरम्यानच्या इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्याचा प्रदेश फारच सखल आहे.
डोंगराळ भागात उत्तरेकडे पेनाइनचे डोंगर दक्षिणोत्तर पसरले आहेत. त्यांचा पृष्ठभाग झिजून आतील कोळशाचे थर पृष्ठभागाजवळ सापडल्यामुळे तेथे औद्योगिक वाढ झपाट्याने झाली. नैर्ऋत्येकडील द्वीपकल्पाचा समावेश डोंगराळ भागातच होतो. या डोंगराळ प्रदेशाची उंची साधारणत: ३०० मी. हून अधिक आहे. मर्झी, सेव्हर्न, एक्स इ. नद्या या भागात आहेत. डोंगराळ भागाच्या प्राचीन खडकांचा विस्तार अनेक ठिकाणी समुद्रकाठापर्यंत झाला असल्याने त्या ठिकाणी उभे कडे तयार झाले आहेत. इतर ठिकाणी नद्यांच्या मुखांशी खाड्या बनल्या आहेत व त्यांलगत भूशिरे आहेत. इंग्लंडच्या सभोवतालचे समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी खाड्यांतून आत शिरते व ओहोटीच्या वेळी नद्यांनी वाहून आणलेला गाळ दूर समुद्रात नेऊन टाकते. यांमुळे नद्यांच्या खाड्यांवर नैसर्गिक बंदरे तयार झाली आहेत.
इंग्लंडभोवतालचा समुद्र उथळ आहे. सर्वसाधारणपणे त्याची खोली ९० मी. पेक्षाही कमी भरते. समुद्रकिनारा दंतुर असून त्याच्याजवळ सिली, लंडी, फाउलनेस, वाइट इ. अनेक बेटे आहेत. अथळ समुद्राचा उपयोग मत्स्योउत्पादनासाठी केला जातो. मासेमारीचे क्षेत्र या दृष्टीनेही त्यास महत्त्व प्राप्त झालेले आहे. पश्चिमेकडून वाहत येणाऱ्या गल्फ प्रवाहाचे उबदार पाणी या उथळ समुद्रात चहूबाजूंस खूप पसरते व त्यामुळे लगतच्या भूप्रदेशाचे हवामानही उबदार होते. समुद्राच्या उथळपणामुळे भरतीच्या पाण्याच्या हालचालींचा परिणाम इंग्लंडच्या अंतर्भागात बराच आतपर्यंत जाणवतो.
हवामान : इंग्लंडचे हवामान सौम्य आणि समशीतोष्ण आहे. पश्चिमेकडून येणारे वारे व त्यांबरोबर येणारे आवर्त आणि पूर्वेकडील वाऱ्यांबरोबर येणारे प्रत्यावर्त यांमुळे येथील हवा सतत बदलत असते मात्र येथील तपमानात फार मोठे बदल होत नाहीत. अटलांटिक महासागर व गल्फ प्रवाह यांचा परिणाम या प्रदेशाच्या हवामानावर प्रामुख्याने होतो. हवा थोडी उबदार असते. हिवाळ्यात मात्र पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ही हवा कधीकधी थंड व कोरडी असते. इंग्लंडच्या वायव्य भागी वार्षिक सरासरी तपमान ११० से. असते. त्याच अक्षवृत्तावर पूर्वेस ते कमी भरते दक्षिणेस इंग्लिश खाडीतील जर्सी बेटात तपमान हिवाळ्यात (डिसेंबर ते फेब्रुवारी ) ६० से. व उन्हाळ्यात १७० से. एवढे भरते. वार्षिक सरासरी तपमान कक्षा ७० ते १२० से. एवढे असते. पूर्वेकडील प्रदेशात हे प्रमाण वाढते. दक्षिण भागात उन्हाळ्यात तपमान २७० से. पेक्षा वर क्वचितच जाते आणि ३२० से. वर ते सहसा चढत नाही. वर्षातील किमान तपमान स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असते. हिवाळ्यात रात्री आकाश निरभ्र व हवा शांत असल्यास ते -७० से. एवढे खाली जाते, -१२० से. पर्यंत ते क्वचितच खाली उतरते. मात्र आतापावेतो अपवादात्मक म्हणून -१८० से. इतक्या किमान तपमानाची नोंद केली गेलेली आहे.
इंग्लंडमधील वार्षिक पर्जन्यमान सु. ८५ सेंमी. आहे. इंग्लंडच्या पश्चिम व उत्तर भागांतील डोंगराळ प्रदेशात जास्त पाऊस पडतो. याउलट दक्षिण व पूर्व भागांतील सखल प्रदेशांत तो कमी पडतो. पाऊस जवळजवळ वर्षभर पडतो पण सर्वसाधारणपणे मार्च ते जून या काळात त्याचे प्रमाण बरेच कमी आणि ऑक्टोबर ते जानेवारी या काळात ते सगळ्यात जास्त असते. सलग तीन आठवड्यांत पाऊस पडलाच नाही, असे क्वचितच घडते आणि तेही लहानशा क्षेत्रात अपवादात्मक घडते.
या देशात मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत्या अक्षांशांनुसार कमी होत जाते. मे ते जुलै या तीन महिन्यांच्या काळात दिनमान बरेच मोठे असते. नोव्हेंबर ते जानेवारी या तीन हिवाळी महिन्यांत दिनमान फारच लहान असते.
इंग्लंडमध्ये हवा चांगली व आकाश निरभ्र असल्यास उन्हाळ्यात विरळ धुके व हिवाळ्यात दाट धुके पडते. लंडन व इतर औद्योगिक शहरांत या दाट धुक्याबरोबर कोळशाचा धूर व इतर वायू हवेत मिसळतात. अलीकडील काळात जळणाचे स्वरूप बदलत चालल्याने या त्रासदायक धुक्याचे प्रमाण कमी होत आहे.
मृदा: इंग्लंडच्या डोंगराळ प्रदेशाची मृदा पातळ व नापीक आहे म्हणून पेनाइन, लेक डिस्ट्रिक्ट व इंग्लंडच्या ईशान्य व नैर्ऋत्येकडील डोंगराळ प्रदेशांत अनेक ठिकाणी पाणथळीच्या जागा आढळतात. त्यामुळे या प्रदेशातील फक्त मैदानी व खोऱ्याचा सखल भाग शेतीखाली आहे. खोऱ्यातील मृदा जाड व सुपीक आहे. थोडा अपवाद सोडल्यास इंग्लंडचा सखल प्रदेश सुपीक आहे, दलदलीची क्षेत्रेही शेतीसाठी वापरात आणलेली आहेत.
खनिज संपत्ती: इंग्लंडमध्ये गेल्या २५० वर्षांत उद्योगधंद्यांची जी वाढ झाली, त्याचे एक कारण म्हणजे तेथील खनिजसंपत्ती होय. येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत. या खाणी प्रामुख्याने यॉर्क, डर्बी, नॉटिंगम या परगण्यांत आहेत. दगडी कोळशाच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी ४८% उत्पादन या क्षेत्रांतून होते. याशिवाय डरॅम, नॉर्थम्बरलँड, लँकाशर, स्टॅफर्डशर आणि वॉरिकशर क्षेत्रांतही कोळशाच्या खाणी आहेत. देशाच्या मध्यभागातील दगडी कोळशाच्या खाणींजवळच लोखंडाच्या खाणी आहेत. पूर्वीच्या काळात मोठाले उद्योगधंदे दगडी कोळशाच्या खाणींजवळच उभारले गेले. आजही एकूण शक्तीपैकी १/३ शक्ती दगडी कोळशापासून तयार केली जाते. इंग्लंडमध्ये जलविद्युत्शक्तीची साधने फारच थोडी आहेत. खनिज वायू बऱ्याच प्रमाणात द्रव स्थितीत आयात करण्यात येतो. १९६५ साली उत्तर समुद्राच्या तळभागाखालील खनिज वायूच्या व नंतर तेलाच्याही फार मोठ्या क्षेत्राचा शोध लागला आहे. अलीकडे तेथे कोळसाही मिळण्याची शक्यता दिसून आली आहे. स्टॅफर्ड, डेव्हन व कॉर्नवॉल या भागंत चिनी माती सापडते.
वनस्पती : येथील नैसर्गिक वनस्पती विविध प्रकारची आहे. पूर्वी इंग्लंडच्या सखल भागात मनुष्यवस्ती होण्यापूर्वी ओक वृक्षांची दाट जंगले होती. तसेच बऱ्याच ठिकाणी दलदल होती. उंच डोंगराळ भागात पाइन वृक्ष व पाणथळीच्या जागा होत्या. काळाच्या ओघात वृक्ष पाडले जाऊन जंगलक्षेत्र कमी होत गेले. आज देशाच्या फक्त ७% भागातच जंगल आढळते. ते इंग्लंडच्या आग्नेय भागात तसेच वेल्स, सरहद्दीवरील मॉनमथ परगण्यात अधिक मोठ्या प्रमाणात आहे. मिडलँडमध्येही अरण्ये आहेत. या सर्व जंगलांत सर्वसाधारणपणे ओक, बीच, ॲश, एल्म ही झाडे आढळतात.
प्राणी: वायव्य यूरोपात आढळणारे प्राणी इंग्लंडमध्ये आढळतात. त्यांपैकी सस्तन प्राण्यांच्या वर्गात मोडणारे काही मोठे प्राणी (उदा., लांडगा, अस्वल, रानडुक्कर, रेनडिअर) आता नामशेष झाले आहेत. डेव्हन आणि समरसेट भागांत तांबडे हरिण व इंग्लंडच्या वनप्रदेशात रो जातीचे लहान हरिण आढळते. ग्रामीण भागात ससे दिसतात. लहान सस्तन प्राण्यांत उंदीर, घूस, चिचुंद्री, साळू, खार, ससे, वीझल, कॉयूट, स्टोट यांचा समावेश होतो. गुरे, मेंढ्या, डुकरे, कोंबड्या, घोडे, कुत्री, मांजरे इ. येथील पाळीव प्राणी होत. इंग्लंडमध्ये सु. ४३० जातींचे पक्षी आढळतात. त्यांपैकी सु. २३० जातींचे पक्षी स्थानिक आहेत. समुद्रकिनाऱ्यावर गल पक्षी व जलाशयात बदक, हंस इ. पक्षी दिसतात. नद्या, सरोवरे व समुद्रकाठच्या पाण्यात सॅमन, ट्राऊट, पर्च, रोच, हेरिंग, डेस, ग्रेलिंग, पाईक इ. मासे आढळतात.
पहा : ग्रेट ब्रिटन.
वाघ, दि. मु.
“