इंग्रजी साहित्य : इंग्रजी ही इंडो-यूरोपियन भाषाकुलाच्या जर्मानिक गटाची भाषा. सु. सातव्या शतकापासूनचे इंग्रजी साहित्य उपलब्ध आहे. अँम्लो-सॅक्सन किंवा ‘ओल्ड इंग्लिश’ ह्या नावाने ते ओळखले जाते. पैकी ओल्ड इंग्लिश हे नाव अधिक मान्य आणि रूढ आहे. त्याचा कालखंड सातव्या शतकापासून ११०० पर्यंतचा आहे. व्याकरण आणि शब्दसंपत्ती ह्या दोन्ही दृष्टींनी ह्या ओल्ड इंग्लिश साहित्याची भाषा, नंतरच्या इंग्रजी भाषेपेक्षा इतकी वेगळी आहे, की ती भाषा प्रयत्नपूर्वक शिकल्याखेरीज तिच्यातील साहित्य आजच्या वाचकाला कळत नाही.
१०६६च्या नॉर्मन विजयानंतर इंग्लंडमध्ये राज्यकारभारात, न्यायसंस्थांत, शिक्षणसंस्थांत फ्रेंच भाषाच सर्रास वापरली जाऊ लागली. ती प्रतिष्ठितांची भाषा झाली व ओल्ड इंग्लिश भाषा मागे पडली. त्या भाषेत साहित्यनिर्मिती जवळजवळ होईनाशी झाली. ती फ्रेंच आणि लॅटिन भाषांत होऊ लागली. इंग्रजी भाषेला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त होण्याला जवळजवळ तीनशे वर्षे जावी लागली. १३६२ मध्ये ती न्यायालयाची भाषा झाली. १३९९ मध्ये चौथ्या हेन्रीने पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा इंग्रजीत भाषण केले. नॉर्मन विजयानंतर इंग्रजी मातृभाषा असणारा तोच इंग्लंडचा पहिला राजा.
अकराव्या शतकाच्या मध्यापासून चौदाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत ओल्ड इंग्लिशमध्ये पुष्कळच फरक पडला. जेते फ्रेंच असल्यामुळे तिचा राजाश्रय नाहीसा झाला होता पण खेड्यापाड्यातील आणि खालच्या थरांतील लोक इंग्रजीच बोलत. हळूहळू शब्दांच्या रूपांत व वाक्यरचनेत बदल झाला. बरेच जुने शब्द वापरातून गेले आणि काहींच्या जोडीला फ्रेंच भाषेतील आणि फ्रेंचमार्फत लॅटिन आणि ग्रीक भाषांतील शब्द आले. इंग्लंडच्या वेगवेगळ्या भागांतल्या भाषांत साहित्य निर्माण होतच होते. ह्या कालखंडातले साहित्य मध्यकालीन इंग्लिश साहित्य (मिड्ल इंग्लिश) म्हणून ओळखले जाते. वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांपैकी ईस्ट मिडलँडमध्ये म्हणजे लंडनच्या आसपासच्या भागांत बोलल्या जाणाऱ्या भाषेत निर्माण झालेल्या साहित्याला अधिक प्रतिष्ठा लाभली. आपण ज्याला इंग्रजी साहित्य म्हणून ओळखतो, ते ह्या कालखंडातील साहित्याचा पुढला विकास आहे.
इंग्रजी साहित्याचे मूळ क्षेत्र म्हणजे ब्रिटिश बेटांतील इंग्लंडचा प्रदेश. पण वेल्श, आयरिश आणि स्कॉटिश लेखकांनीही इंग्रजी भाषेत साहित्य निर्माण केले आहे. ब्रिटिशांच्या व्यापाराचा व्याप जसजसा वाढत चालला, तसतसे त्यांच्या राजकीय सत्तेचे क्षेत्र विस्तृत होत गेले. ब्रिटिशांनी पृथ्वीवरच्या इतर खंडांत वसाहती केल्या आणि साम्राज्य स्थापन केले. त्या त्या वसाहतीत स्थायिक झालेल्या ब्रिटिशांनी आणि त्यांच्या वंशजांनी, त्याचप्रमाणे तेथील स्थानिक लोकांपैकी ज्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात केली, त्यांनीही इंग्रजी भाषेत साहित्य निर्माण केले. ह्याची उदाहरणे म्हणजे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान आणि मध्य पूर्वेतले काही देश. परंतु ह्या लेखात ह्या इतर देशांत निर्माण झालेल्या इंग्रजी साहित्याचा अंतर्भाव केलेला नाही. ह्या लेखातील साहित्यविचाराचा काळ ओल्ड इंग्लिश साहित्याच्या काळापासून (सु. सातवे शतक) साधारणपणे १९५० पर्यंतचा आहे.
आदियुग (आरंभापासून १०६६ पर्यंत) : इंग्लंडचे पहिले रहिवासी आयबेरियन व केल्टिक. त्यांचा रोमन लोकांनी पाडाव केला. ४१० मध्ये ब्रिटनमधील रोमन साम्राज्य संपुष्टात आले व मध्य यूरोपातील जर्मेनीयामधील अँगल, ज्यूट व सॅक्सन जमातींच्या टोळ्या इंग्लंडमध्ये येण्यास सुरुवात झाली. त्यांनी ब्रिटनमधील मूळ रहिवाशांना मागे रेटून आपले वर्चस्व प्रस्थापित केले व इंग्रजी संस्कृतीचा पाया घातला. ह्या लोकांचे वाङ्मय अँग्लो-सॅक्सन वाङ्मय म्हणून ओळखले जाई. त्यांच्या भाषेला ओल्ड इंग्लिश असे संबोधिले जाते. अर्थात ओल्ड इंग्लिश हे इंग्रजी भाषेचेच आद्यरूप होय. आजच्या इंग्रजी वाङ्मयाच्या अनेक प्रवृत्ती बीजरूपाने ह्या काळातील वाङ्मयात दिसतात.
पाचव्या शतकापासून राजदरबारातील भाटांनी रचलेली काव्ये अलिखित असल्याने आज उपलब्ध नाहीत. ओल्ड इंग्लिश साहित्याच्या सु. तीस हजार ओळी उपलब्ध आहेत. पेगन महाकाव्यसदृश रचना, शोकरसात्मक भावकाव्याच्या जवळपास येणारे काव्य व ख्रिस्ती धर्मप्रेरित काव्य असे त्याचे तीन भाग आहेत. पेगन वाङ्मय ख्रिस्ती धर्मप्रभावापासून अलिप्त असून वीरवृत्तीची जोपासना करणारे आहे [→ पेगन]. ते भटक्या शाहिरांनी रचलेले असून कधी श्रीमंतांच्या पुढे, तर कधी बाजारात जनसामान्यांसाठी गाइलेले आहे. त्या वाङ्मयातून यूरोपातील जर्मन, नॉर्वेजियन इ. जर्मानिक गटातील भाषा बोलणाऱ्या लोकांची संस्कृती कशी होती, ह्याची अल्पशी कल्पना येते. विडसिथ ह्या अशा प्रकारच्या एका काव्यात राजदरबारातील एका भाटाचे आत्मवृत्त आढळते. ह्या काळातील सर्वोत्कृष्ट काव्य वेवूल्फ (सु. ३,२०० ओळी) हे इंग्रजीतील पहिले महाकाव्य. दक्षिण स्वीडनमधील गीट जमातीच्या हायगेलॅक राजाचा पुतण्या बेवूल्फ याने ग्रेंडेल हा राक्षस व त्याची आई यांचा वध कसा केला, याची हकीकत याच्या पहिल्या भागात आहे. दुसऱ्या भागात ५० वर्षांनंतर एका पंखधारी नरभक्षक सर्पाला मारताना बेवूल्फ स्वतः मरतो, असे दाखविले आहे. हा कथाभाग पेगन लोकगीतांतून आला असला, तरी त्यात ख्रिस्ती धर्मकल्पनांचे मिश्रण झालेले दिसते. या महाकाव्यातील आवेश, पराक्रम, स्वाभिमान, सौजन्य, शिष्टाचार ह्या गोष्टी पेगन वाङ्मयातील व लोककथांतील आहेत तर सृष्टीची उत्पत्ती व पापपुण्य ह्यांसंबंधीच्या कल्पना ख्रिस्ती दिसतात.द बॅटल ऑफ फिन्सबर्ग व वाल्डेर ही अपुरी महाकाव्ये बेवूल्फच्या परंपरेतीलच आहेत. द बॅटल ऑफ ब्रनॅनबर्ग व द बॅटल ऑफ माल्डन या काव्यांत वीर व करुण या रसांचा आविष्कार दिसतो. द वाँडरर या काव्यात राजाश्रय सुटल्यावर रानोमाळ भटकणाऱ्या एका चाकराचा विलाप दिसतो तर द सीफेअरर मध्ये एका वृद्ध खलाशाची कहाणी सांगितलेली आहे. डिओर ह्या काव्यात एका भटक्या कवीचे आत्मकथन आढळते व ह्या दृष्टीने ते काव्य महत्त्वाचे ठरते.
सातव्या शतकात अँग्लो-सॅक्सनांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर त्यांच्या काव्यात धार्मिक विषय येऊ लागले. जुन्या वीर व करुण रसांतील काव्यांना आता धार्मिक डूब मिळाली. शिवाय ख्रिस्तपुराणातील कथा जुन्या वीरकाव्यशैलीत सांगितल्या गेल्या. कॅडमन (सु. ६७०) हा इंग्रजीचा आद्य कवी. निश्चितपणे कॅडमनचे म्हणता येईल असे नऊ ओळींचे एक ईशस्तोत्रच आज उपलब्ध आहे. त्याच्या नावावर मोडणारी जेनेसिस, एक्झोडस, डॅन्यल, ख्राइस्ट व सेटन ही दीर्घकाव्ये त्याची नसून त्याच्या परंपरेतील असावीत, असा तर्क आहे. आठव्या शतकाच्या उत्तरार्धात किनेवुल्फ हा कवी होऊन गेला. आपल्या काव्यावर आपली सही अँग्लो-सॅक्सन रूनिक लिपीत करणारा हा पहिला इंग्रजी कवी. ख्राइस्ट, जूलिआना, एलेन व द फेट्स ऑफ ॲपॉसल्स ही त्याची काव्ये. उत्कट भक्ती व रचनासौष्ठव हे त्याच्या काव्याचे मुख्य विशेष. अँड्रिअस, द फीनिक्स वगैरे काव्ये त्याच्याच संप्रदायातील. नवी धार्मिक भावना व जुनी वीरकाव्यशैली यांचा सुंदर मेळ जूडिथमध्ये दिसतो. द ड्रीम ऑफ द रूडमध्ये उत्कट भक्तिभावना आहे. कल्पनाशक्तीचा फुलोरा द रिडल्स या काव्यात सापडतो. अनुप्रासयुक्त छंदोरचना व रूपकात्मक भाषा हे प्राचीन इंग्रजी काव्यशैलीचे विशेष.
प्राचीन इंग्रजी गद्याचा उदय ॲल्फ्रेड (८४९–९०१) राजाच्या काळात झाला. हा स्वतः उत्कृष्ट लेखक होता. त्याने विद्वानांच्या मदतीने लॅटीन ग्रंथांची इंग्रजी भाषांतरे केली व यूरोपीय संस्कृतीचे लोण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविले. उदा., पोप ग्रेगरीचा क्यूरा पास्तोरालिस हा धार्मिक ग्रंथ, पॉलस ओरोझिअसचा हिस्टोरिया ॲडव्हरसुम पागोनास हा इतिहास व बोईथिअसचा दे कॉन्सोलासिओने फिलॉसफी हा तात्त्विक ग्रंथ. बीड (६७३-७३५) ह्या इतिहासकाराच्या हिस्टोरिया इक्लिझिॲस्तिकाचे भाषांतर ॲल्फ्रेडच्या प्रेरणेनेच झाले. त्याची सर्वांत महत्त्वाची वाङ्मयीन कामगिरी म्हणजे द अँग्लो-सॅक्सन क्रॉनिकल हा इतिहास. सीझरच्या इंग्लड विजयापासूनचा इंग्लंडचा इतिहास सांगणारे हे इतिवृत्तलेखन पुढे ११५४ पर्यंत चालू राहिले. इतिहास व साहित्य या दोन्ही दृष्टींनी हा ग्रंथ महत्त्वाचा ठरतो. ॲल्फ्रेडची मातृभाषा वेसेक्स असल्यामुळे तिला साहित्यात प्रतिष्ठा प्राप्त झाली. ॲल्फ्रिक (मृ. सु. १०२०) या धर्मोपदेशकाने ॲल्फ्रेडचेच कार्य पुढे चालू ठेवले. सु. ऐंशी नीतिबोध, एक संतचरित्रमाला, कॉलक्वी हा लॅटिन शिकविण्याच्या हेतूने लिहिलेला संभाषणग्रंथ व बायबलच्या जुन्या कराराचे भाषांतर (पहिले ७ भाग) हे त्याचे मुख्य ग्रंथ. ॲल्फ्रिकची वक्तृत्वपूर्ण व नागर भाषाशैली ॲल्फ्रेडच्या खडबडीत शैलीच्या तुलनेने उठून दिसते. त्याचा समकालीन वुल्फ्स्टन (मृ. १०२३) या धर्मगुरूच्या प्रवचनांपैकी सर्मन टू द इंग्लिश हे डॅनिश आक्रमणाने हतबल झालेल्या इंग्रजांना केलेले आवाहन बरेच गाजले. तीव्र भावना, ओज व आलंकारिक भाषा ही त्याच्या शैलीची वैशिष्ट्ये. गद्यापेक्षा पद्यातच ओल्ड इंग्लिश साहित्याची वैशिष्ट्ये अधिक ठसठशीतपणे दिसून येतात.
फ्रान्समधील नॉर्मंडीचा ड्यूक विल्यम ह्याने १०६६ मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा हॅरल्ड ह्याच्यावर हेस्टिंग्जच्या लढाईत विजय मिळविला आणि तो इंग्लंडचा राजा झाला. हा नॉर्मन विजय ही इंग्लंडच्या आणि इंग्रजी साहित्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना आहे. हॅरल्ड हा इंग्लंडचा शेवटचा सॅक्सन राजा. तोपर्यंत इंग्लंड हे यूरोपच्या उत्तर भागातल्या स्कँडिनेव्हियन देशांशी निगडित होते. तो संबंध ह्या विजयानंतर तुटला आणि ते दक्षिणेकडील फ्रान्सशी जखडले गेले. ह्या घटनेमुळे इंग्लंडच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात फार मोठा फरक पडला.
नॉर्मन लोकांच्या विजयानंतर लॅटिन व फ्रेंच भाषांचा पगडा वरिष्ठ वर्गावर व दरबारी लोकांवर पडला परंतु कथाकथन व काव्य इंग्रजीतील निरनिराळ्या बोलीभाषांतून होत होते. ह्या वेगवेगळ्या बोलीभाषांपैकी तेराव्या शतकाच्या अखेरीस ईस्ट मिडलँड परगण्यातील बोलीभाषा प्रमाण ठरली आणि तिची प्रतिष्ठा पुढे चौदाव्या शतकात ⇨चॉसरने कायम राखली. या बोलीभाषेला ‘किंग्ज इंग्लिश’ (प्रमाणभूत इंग्रजी भाषा) हे नाव मिळाले.
मध्ययुग (१०६६–१४८५) : १०६६च्या नॉर्मन विजयामुळे विजेत्यांची फ्रेंच भाषा राजदरबारी आली व अँग्लो-सॅक्सन भाषा बहुतांशी समाजातील खालच्या वर्गांपुरती मर्यादित राहिली. तिच्यातील ग्रंथरचना थांबली व शंभराहून अधिक वर्षे ती केवळ बोलभाषा होऊन बसली. कालांतराने नॉर्मन व सॅक्सन ह्यांच्यातील अंतर कमी होऊन प्राचीन इंग्रजी भाषेचे पुनरुज्जीवन होत गेले. तेराव्या शतकात तिला पुन्हा ग्रांथिक भाषा म्हणून प्रतिष्ठा मिळाली मात्र दरम्यानच्या काळात तिचा कायाकल्प झाला. तिचे व्याकरण अधिक सोपे झाले व फ्रेंच भाषेतील हजारो शब्द तिने स्वीकारले. फ्रान्सकडून तिने नव्या वाङ्मयीन प्रेरणा घेतल्या. उदा., ⇨रोमान्स. अनुप्रासयुक्त छंदोरचनेऐवजी नवा यमकबद्ध छंद तिने स्वीकारला. नव्या राजवटीत प्राचीन इंग्रजी बोलीभाषांतून आलेल्या उत्तर, दक्षिण, केंटिश व मिडलँड इंग्रजी या साऱ्याच ‘मिड्ल इंग्लिश’ बोलभाषांतून साहित्य निर्माण होऊ लागले.
मिड्ल इंग्लिश साहित्यात धार्मिक व उपदेशपर पद्य विपुल आहे. उदा., ऑरम्युलम, करसोर मुंडी आणि हॅडलिंग स्युन. मध्ययुगातील आणखी एक लोकप्रिय पद्यप्रकार म्हणजे रूपककाव्य. द औल अँड द नाइटिंगेल (सु. १२००) हे त्याचे उत्तम उदाहरण. हे काव्य तत्कालीन लॅटिन व फ्रेंच साहित्यात लोकप्रिय झालेल्या वादकाव्याचेही (डिबेट व्हर्स) प्रतिनिधी ठरते. फ्रेंच वीरकाव्यावर आधारलेल्या रोमान्सचाही बराच प्रसार झाला. शूर, दिलदार नायक आणि सद्गुणी, सौंदर्यसंपन्न नायिका त्यांत रंगविलेल्या असत. जादू व चमत्कार यांनी भरलेल्या या काव्यांची कथानके ग्रीक, रोमन, फ्रेंच व पौर्वात्य कथा, तसेच वेल्समधील आर्थर राजाच्या आख्यायिका यांतून घेतलेली दिसतात. रोलँड अँड व्हर्नग्यु, सर ऑर्फिओ, मॉर्ट आर्थर व बारलाम अँड जोसाफट (बुद्धकथेचे ख्रिस्ती रूपांतर) ही यांची उदाहरणे. तत्कालीन इतिहासलेखनही पद्यातच असून इतिहासलेखन व रोमान्स यांतील सीमारेषा धूसर असल्याचे जाणवते. उदा., लायामन या इंग्रज कवीने फ्रेंचमधून अनुवादिलेला ब्रूट हा इंग्लंडचा इतिहास. इंग्रजी काव्याने फ्रेंच काव्याकडून नवा यमकबद्ध छंद स्वीकारल्यानंतर सु. सव्वाशे वर्षांनी चौदाव्या शतकाच्या मध्यास ओल्ड इंग्लिशमधील अनुप्रासयुक्त छंदोरचनेचे पुनरुज्जीवन झाले. उदा., सर गावेन अँड द ग्रीन नाइट हे वीरकाव्य, पर्ल हे रूपकात्मक शोककाव्य आणि पेशन्स व प्युरिटी ही भक्तिपर काव्ये.
ह्या युगात निर्माण झालेल्या ⇨ बॅलड ह्या दुसऱ्या नव्या काव्यप्रकारात शौर्यापासून शोकापर्यंत व भुतांपासून भक्तीपर्यंत अनेक विषय हाताळलेले दिसतात. काव्य, कथा व नाट्य यांचा मिलाफ बॅलडमध्ये दिसतो. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात ⇨ विल्यम लँग्लंड (१३३० ?–१४०० ?), ⇨ जॉन गॉवर (१३३० ?–१४०८) आणि जेफ्री चॉसर (१३४०?–१४००) हे महत्त्वाचे कवी होऊन गेले. धार्मिक सत्ताधाऱ्यांविरुद्ध असलेल्या सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया लँग्लंडने पद्यामध्ये व जॉन विक्लिफने (सु. १३२०–१३८४) गद्यामध्ये अत्यंत परखडपणे व्यक्त केल्या. ज्या ख्रिस्ती संन्याशांनी (फ्रायर) यूरोपियन संस्कृतीशी इंग्लंडची ओळख करून दिली होती, ते आता कर्तव्यच्युत झाले होते. त्यांच्यावर सडेतोड टीका लँग्लंडने पिअर्स प्लाउमन ह्या काव्यात केली. विक्लिफने सामान्य लोकांना समजेल, असे बायबलचे भाषांतर करण्यास सुरुवात केली. चर्चमधील अधिकाऱ्यांच्या सर्व पापांचा पाढा विक्लिफने मोठ्या आवेशयुक्त, वक्रोक्तिपूर्ण व विनोदी शैलीत वाचला.
चॉसर हा मध्ययुगातील सर्वश्रेष्ठ इंग्रज कवी. त्याच्या कँटरबरी टेल्समधील कथांनी इंग्रजी वाङ्मयाला नवे वळण दिले. नर्मविनोद, सूक्ष्म, मार्मिक, मिस्कील निरीक्षण आणि शालीन, संयमित कलादृष्टी हे त्याचे प्रधान गुण. चॉसरने काव्यशैलीला सफाई आणली, शब्दसंगीताचे नवे सामर्थ्य दाखविले आणि ह्या सर्वांतून मानवी स्वभावाचे सखोल, मार्मिक दर्शन घडविले. चॉसरचे अनुकरण करणाऱ्यांत जॉन लिडगेट (१३७० ?–१४५१ ?) व टॉमस हॉक्लीव्ह (१३७० ?–१४५०?) हे इंग्रज कवी आणि स्कॉटलंडचा राजा पहिला जेम्स (१३९४–१४३७) व ⇨ रॉबर्ट हेन्रिसन (१४३० ?–१५०६) हे स्कॉटिश कवी यांचा समावेश होतो. लिडगेटचे द फॉल ऑफ प्रिन्सेस व हॉक्लीव्हचे द रेजिमेंट ऑफ प्रिन्सेस ही उपदेशपर काव्ये आहेत. पहिल्या जेम्सने द किंगिज क्वेअर हे उपदेशपर काव्य लिहिले. हेन्रिसन हा चॉसरमुळे प्रभावित झालेला सर्वांत कर्तबगार कवी. त्याचे टेस्टमेंट ऑफ क्रिसेड हे काव्य विशेष उल्लेखनीय आहे.
इतर यूरोपीय भाषांतील गद्यापेक्षा प्राचीन इंग्रजी गद्याचा अधिक विकास झाला होता. नॉर्मन विजयानंतरचे इंग्रजी गद्य मात्र सुरुवातीस खुरटले त्यामुळे मध्यकालीन इंग्रजीत नवी गद्यपरंपरा उभी होण्यास उशीर लागला. काव्याप्रमाणे या गद्याचाही भक्तिबोध हाच स्थायीभाव दिसतो. या प्रकारच्या गद्यलेखनात अँक्रेने रिव्ले (लेखक अज्ञात) हा तीन जोगिणींना केलेला उपदेश अग्रेसर ठरतो. बाह्य यमनियमांपेक्षा आंतरिक संयम श्रेष्ठ आहे, असे उपदेशक सांगतो. त्याची शैली म्हणी व घरगुती दृष्टांत यांनी युक्त आहे. उत्तम गद्याचे हे लक्षणीय उदाहरण. चौदाव्या शतकातील इंग्रजी संतांच्या ईशप्रेमाचा साक्षात्कार त्यांच्या गद्यलेखनात आढळतो. उदा., रिचर्ड रोल (सु. १३००–१३४९) याचाफॉर्म ऑफ लिव्हिंग, वॉल्टर हिल्टनचा (मृ. १३९६) द स्केल ऑफ पर्फेक्शन, मार्जरी केंपचा (सु. १३७३—?) द बुक ऑफ मार्जरी केंप हे ग्रंथ. द ट्रॅव्हल्स ऑफ सर जॉन मँडेव्हिल हे फ्रेंचवरून अनुवादिलेले लोकप्रिय प्रवासवर्णन याच काळातले. जॉन ट्रेव्हीसाने (१३२६–१४१२) पॉलिक्रॉनिकॉनसारखे लॅटिन ग्रंथ अनुवादिले (पॉलिक्रॉनिकॉनचा अनुवाद १३८७). तत्कालीन भाषेचा जिवंत परिचय पॅस्टन लेटर्स (१४२२–१५०९) या नॉर्फकमधील एक सुखवस्तू कुटुंबातील मंडळींनी परस्परांना लिहिलेल्या पत्रांच्या संग्रहात दिसतो. पंधराव्या शतकातील सर्वांत बहुप्रसू गद्यकार रेजिनल्ड पीकॉक (१३९५ ?–१४६० ?) याने आपल्या रिप्रेसर ऑफ ओव्हरमच ब्लेंमिंग ऑफ द क्लर्जी (१४५५) यासारख्या ग्रंथांत विक्लिफचे विचार खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मॉर्ट द आर्थर (१४८५) या सुप्रसिद्ध ग्रंथाचा लेखक ⇨ टॉमस मॅलरी (मृ. १४७१) हा या शतकातील गाजलेला गद्यलेखक. या ग्रंथाचा मुद्रक व प्रकाशक ⇨ विल्यम कॅक्स्टन (१४२२ ?–१४९१) हा इंग्लंडमधील पहिला मुद्रक असून तो भाषांतरकारही होता.
इंग्लंडमध्ये नाटक हा साहित्यप्रकार प्रथम मध्यकालीन इंग्रजीत हाताळला गेला. चर्चमधील प्रार्थनांनी संभाषणरूप घेतल्यावर त्यांतून ख्रिस्तचरित्रावर व संतचरित्रांवर आधारित नाट्य निर्माण झाले. शिवाय प्राचीन इंग्रजीत नाटक नसले, तरी भाटांचे नाट्यमय वीरकाव्य व नाट्याची बीजे असलेले खड्गनृत्य, सोंगाड्यांचे खेळ, वसंतोत्सवातील खेळ इ. अनेक खेळ प्रचलित होते. नाट्यविकासाला त्यांचाही हातभार लागला. अद्भुत नाटकांची (मिरॅकल प्ले) सुरुवात तेराव्या शतकाच्या अखेरीस झाली. मे महिन्याच्या शेवटी येणारा ‘कॉर्पस क्रिस्टी’ हा सण साजरा होऊ लागल्यावर त्यात अनेक व्यवसायांचे लोक ख्रिस्तचरित्र व संतचरित्रे यांवर आधारलेले छोटे छोटे नाट्यप्रयोग करू लागले. हीच अद्भुत नाटके. ह्या नाटकांतील नाट्यविषय त्या त्या व्यवसायाशी निगडित असे. उदा., नोआ व त्याची नाव हा सुतारांच्या नाटकाचा विषय. शहरांतील चौकांत फिरत्या गाड्यांवर हे नाट्यप्रयोग केले जात. कालांतराने या नाटकांच्या माला गुंफिल्या गेल्या. त्यांत यॉर्क (४८ उपलब्ध नाटके), वेकफील्ड किंवा टौनली (३२ नाटके), चेस्टर (२५ नाटके) व ‘लुड्झ कॉव्हेंट्री’ म्हणून प्रसिद्ध असलेली ईस्ट अँग्लियात रचिली गेलेली नाट्यमाला (४२ नाटके) या प्रमुख होत. साहित्यगुणांच्या दृष्टीने वेकफील्डची नाट्यमाला सर्वश्रेष्ठ गणली जाते. या मालेत ग्रामीण जीवनाचे सार्थ चित्रण, उपरोध व विनोद, नाट्यमूल्यांची समज व काव्यमय शैली हे गुण दिसतात. उदा., सेकंड शेपर्ड्स प्ले या नाटकात ख्रिस्तजन्माच्या वेळी मॅक नावाचा गुराखी चोरलेली शेळी पाळण्यात घालून ती नवजात अर्भक आहे, हे दाखविण्याची युक्ती करतो. ह्या प्रसंगात इंग्रजीतील वास्तववादी सुखात्मिकेचे आद्यरूप जाणवते. पंधराव्या शतकाच्या मध्यावर सदाचार नाटकांचा (मोरॅलिटी प्ले) उदय झाला. यात मानवी स्वभावातील सुष्टदुष्ट प्रवृत्ती मनुष्यरूप घेऊन रंगमंचावर अवतरतात. सदाचार नाटकांचा उगम अद्भुत नाटकांतील बोधवादात असावा. मध्ययुगात विषय, वाङ्मयप्रकार व तंत्र या सर्व दृष्टींनी इंग्रजी साहित्य समृद्ध झाले. परंतु त्या मानाने चॉसर, लँग्लंड इत्यादींसारखे पहिल्या दर्जाचे साहित्यिक त्यांत थोडेच आढळतात.
प्रबोधनपूर्व युग (१४८५–१५५७) : ‘वॉर्स ऑफ द रोझेस’ (१४५५–१४८५) ह्या नावाने संबोधिलेल्या, यॉर्क व लँकेस्टर या दोन घराण्यांमध्ये झालेल्या यादवी युद्धानंतर ट्यूडर घराणे गादीवर आले. थोड्याच काळात यूरोपीय प्रबोधनाचे वारे वाहू लागले व त्यांनी अनेक नव्या प्रेरणा आणल्या. सातव्या हेन्रीच्या (१४५७–१५०९) दरबारात व इंग्रजी विद्यापीठांत ग्रोसिन, लिनाकर, कॉलिट, मोर, इरॅस्मस इ. मानवतावादी विद्वानांचे स्वागत झाले. मध्ययुगीन निवृत्तिवादी तत्त्वज्ञानाऐवजी नवे प्रवृत्तिवादी तत्त्वज्ञान प्रसृत होऊ लागले. १४५३ मध्ये तुर्कांनी कान्स्टँटिनोपल जिंकल्यावर तेथील विद्वान यूरोपात पांगले. त्यामुळे जुन्या ग्रीक व रोमन वाङ्मयाचा पुन्हा परिचय झाला. कोलंबसादी दर्यावर्दी वीरांनी लावलेले नव्या देशांचे शोध, पोपप्रणीत धर्मव्यवस्थेविरुद्ध ल्यूथर, कॅल्व्हिन इत्यादींनी उभारलेले बंड, कोपर्निकसचे नवे खगोलविषयक सिद्धांत, यूरोपीय देशांत राष्ट्रभावनेची झालेली वाढ, व्यक्तिवादाचा उदय अशा अनेक घटनांमुळे मध्ययुगीन यूरोपीय जीवनाची बैठक विस्कटली आणि नव्या मनूचा पाया घातला गेला.
नव्या व्यापारी व उदीमी लोकांचा शहरांतून होत असलेला उदय व त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुद्रणकलेचा शोध, या दोन्ही गोष्टी गद्याला पोषक ठरल्या. इंग्लंडमध्ये पहिले मुद्रणयंत्र विल्यम कॅक्स्टनने १४७६ मध्ये आणले व त्यावर आर्थर राजासंबंधीच्या गद्यकथा छापल्या. टॉमस मॅलरीचे मॉर्ट द आर्थर, स्वत कॅक्स्टनने केलेली भाषांतरे, रेजिनल्ड पीकॉक याने केलेली लॅटिन ग्रंथांची भाषांतरे यांनी इंग्रजी गद्याचा पाया घातला व लोकांत वाचनाची आवड उत्पन्न केली.
पद्य : सोळाव्या शतकाच्या प्रथमार्धातील इंग्रजी काव्यात मात्र जुन्या परंपराच चालू होत्या. स्कॉच कवी विल्यम डनबारच्या (१४६५ ?–१५३० ?) द गोल्डन टार्ज (सु. १५०८) व गॅव्हिन डग्लसच्या (१४७४ ?–१५२२) द पॅलेस ऑफ ऑनर (१५५३ ?) या काव्यांत व इंग्रज कवी स्टीव्हेन हॉझच्या (मृ. १५२३ ?) द पास्टाइम ऑफ प्लेझर (१५०९) यांत चॉसरादी कवींचेच वळण गिरविलेले दिसते. फक्त डेव्हिड लिंझीच्या (१४९०–१५५५) काही उपहासात्मक काव्यांवर जॉन नॉक्स ह्या स्कॉटिश धर्मसुधारकाच्या नव्या बंडखोर विचारांची छाप दिसते. ⇨ जॉन स्केल्टन (१४६० ?–१५२९) हा या काळातील सर्वांत प्रभावी उपरोधकार. अलेक्झांडर बार्क्लीचे (१४७५ ?–१५५२) द शिप ऑफ फूल्स (१५०९) हे भाषांतरित उपरोधकाव्य पारंपरिक थाटाचे आहे पण आपल्या द एक्लॉग्ज(१५१५–१५२१) या ग्रामीण काव्यात त्याने पुढे स्पेन्सरादींनी विकसित केलेला जानपद गीताचा एक्लॉग हा प्रकार प्रथम हाताळला. ⇨ जॉन हेवुडची (१४९७ ?–१५८० ?) उपरोधकाव्ये व गीते लक्षणीय आहेत. या युगात नवे विषय व छंद आणले ते ⇨ टॉमस वायट (१५०३ ?–१५४२) व ⇨ हेन्री हॉवर्ड सरी (१५१७ ?–१५४७) यांनीच. १५५७ मध्ये ⇨ टॉटल (मृ. १५९४) या प्रकाशकाने टॉटल्स मिसेलनी हा गीतसंग्रह प्रसिद्ध केल्यावर इंग्लंडमध्ये गीतरचनेती लाट उसळली. ती पुढील पन्नास वर्षे टिकली. या युगातील मुख्य गीतकार म्हणजे बार्नाबी गूज (१५०४–१५९४), जॉर्ज टर्बरव्हिल (१५४० ?–१६१० ?), जॉर्ज गॅस्कॉइन (१५२५?–१५७७ ?), व टॉमस टसर (१५२५ ?–१५८०). फेरर्झ व बॉल्डविन यांनी संपादिलेला द मिरर फॉर मॅजिस्ट्रेट्स हा लोकप्रिय कथाकाव्यसंग्रह १५५९ मध्ये प्रकाशित झाला व १६१० पर्यंत त्याच्या अनेक सुधारित आवृत्त्या निघाल्या. या काव्यातील महत्त्वाचा भाग उपोद्घात. तो ⇨ सॅक्व्हिलने (१५३६–१६०८) लिहिला.
या ग्रंथरूपाने उपलब्ध असलेल्या काव्यापेक्षा या काळातील बॅलड हे लोककाव्य जोमदार व चैतन्यपूर्ण दिसते. बॅलडमध्ये मानवाच्या मूलभूत प्रेरणा व निसर्गप्रेम निर्व्याज, साध्या जोमदार पद्धतीने व्यक्त झाले. बॅलड ऑफ नट्ब्राउन मेड (सु. १५०२), क्लार्क साँडर्स, फेअर ॲन किंवा बिनोरी ह्या बॅलडरचना महत्त्वाच्या आहेत. बॅलडने पुढील भावकवितेचा पाया घातला.
गद्य : गद्याच्या क्षेत्रात प्रथम नजरेत भरते ती मानवतावादी विद्वानांची कामगिरी. टॉमस एलियटचे (१४९९ ?–१५४६) द गव्हर्नर (१५३१) व रॉजर ॲस्कमचे (१५१५–१५६८) द स्कूलमास्टर (१५७०) हे शिक्षणविषयक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. एडवर्ड हॉल (मृ. १५४७) व ⇨ रॅफेएल हॉलिनशेड (मृ. १५८० ?) यांची इतिवृत्ते तसेच ⇨ टॉमस मोर (१४७८—१५३५) याचे हिस्टरी ऑफ रिचर्ड द थर्ड (१५५७) हे प्रमुख इतिहासग्रंथ होत. धार्मिक गद्यात विल्यम टिन्डल (मृ. १५३६) व माइल्स कव्हरडेल (१४८८–१५६८) यांची बायबलची भाषांतरे सोप्या व प्रासादिक शैलीत आहेत. द बुक ऑफ कॉमन प्रेअरचा (१५४९) निर्माता टॉमस क्रॅन्मर (१४८९ –१५५६) याच्या गद्यशैलीत प्रगल्भता दिसतेतर ह्यू लॅटिमरच्या (१४८५ ?–१५५५) प्रवचनांत घरगुती पण वक्रोक्तिपूर्ण भाषा आढळते. सोळाव्या शतकातील भाषांतरकारांची कामगिरी मोलाची आहे. त्यांपैकी लॉर्ड बर्नर्झने (१४६७–१५३३) फ्रेंच लेखक फ्र्वासार याच्या इतिहासाचे केलेले भाषांतर, विल्यम पेंटरचे (१५४० ?–१५९४) द पॅलेस ऑफ प्लेझर (१५६६ –१५६७) हे काही इटालियन कथांचे भाषांतर व ऑव्हिडच्या मेटॅमॉर्फसिस या लॅटिन ग्रंथाचे आर्थर गोल्डिंगकृत (१५३६ ?–१६०५ ?) पद्य भाषांतर (१५६५–१५६७) हे ग्रंथ या कालखंडात येतात. जॉर्ज गॅस्कॉइनची द ॲडव्हेंचर्स ऑफ मास्टर एफ्. जे. ही दीर्घकथा स्वतंत्र वास्तववादी लेखनाची चुणूक दाखविते.
या युगात ‘इंटरल्यूड’ किंवा लघुनाट्य हा नाट्यप्रकार उदयास आला. त्यात सदाचार नाटकातील रूपकात्मक पात्रचित्रणाची वास्तववादी पार्श्वभूमी आणि विनोद व उपरोध यांची सांगड घालण्यात आली. अद्भुत नाटकांचे लेखक अज्ञात होते परंतु लघुनाट्यांचे बरेचसे लेखक ज्ञात आहेत. हेन्री मेडवॉल (सु. १४८६) हा पहिला इंग्रज ज्ञात नाटककार. त्याचे फल्गेन्स अँड ल्यूक्रीझ हे प्रीतिनाट्य लघुनाट्याचा उत्तम नमुना आहे. जॉन हेवुडने हा नाट्यप्रकार कळसाला पोहोचविला. जॉन बेल (१४९५–१५६३) हा त्याच्या खालोखाल महत्त्वाचा लघुनाट्यकार. त्याचे किंग जॉन व डेव्हिड लिंझीचे सटायर ऑफ थ्री एस्टेट्स हे नीतिबोधपर नाटक ही दोन्ही १५४० च्या आसपासची. सोळाव्या शतकाच्या मध्यावर लघुनाट्याचे लॅटिन धर्तीच्या पाच अंकी सुखात्मिकेत रूपांतर झाले. उदा., निकोलस यूडलचे (१५०५–१५५६) राल्फ रॉयस्टर डॉयस्टर (सु. १५६७) व विल्यम स्टीव्हन्सनचे गमर गर्टन्स नीड्ल (१५७५). दोहोंतले तंत्र लॅटिन वळणाचे असले, तरी पहिल्यात मध्यमवर्गीय शहरी जीवन व दुसऱ्यात ग्रामीण स्वभावाचे नमुने यांचे जिवंत चित्रण आहे. जॉर्ज गॅस्कॉइनच्या द सपोझेस (१५६६) या आरिऑस्तोच्या I suppositi नामक इटालियन सुखात्मिकेच्या भाषांतराने इंग्रजी नाट्यलेखनात आणखी एक प्रवाह आणून सोडला. याच सुमारास सेनीकाच्या लॅटिन शोकात्मिकांची भाषांतरे होऊन या नव्या नाट्यप्रकाराबद्दलच्या कुतूहलाची परिणती टॉमस नॉर्टन (१५३२–१५८४) व टॉमस सॅक्व्हिल यांनी रचिलेल्या पहिल्या इंग्रजी शोकात्मिकेत – द ट्रॅजेडी ऑफ गॉरबडक (१५६१) – झाली. इंग्रजी नाट्यक्षेत्रातील पहिले महत्त्वाचे सुखात्मिकाकार व शोकात्मिकाकार अनुक्रमे ⇨ लिली (१५५४ ?–१६०६) व ⇨ किड (१५५८–१५९४) यांचा उदय त्यानंतर काही वर्षांतच झाला. अशा तऱ्हेने या कालखंडातील वाङ्मयीन प्रबोधनास सुरुवात झाली.
नाईक, म. कृ.
१५७८–१७०० : इंग्रजी वाङ्मयेतिहासात हा काळ अत्यंत वैभवशाली असून त्याचे तीन प्रमुख कालखंड पडतात. पहिला ‘रेनेसान्स’ अथवा प्रबोधनाचा कालखंड (१५७८—१६२५). ह्या काळात ⇨ शेक्सपिअर (१५६४—१६१६) व ⇨ एडमंड स्पेन्सर (१५५२ ?–१५९९) यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. दुसरा कालखंड (१६२५–१६६०) ⇨ जॉन मिल्टन (१६०८–१६७४) या कवीचा. तिसरा कालखंड (१६६०–१७००) ‘रेस्टोरेशन’चा अथवा राजसत्तेचा पुन:स्थापनेचा. ⇨ जॉन ड्रायडन (१६३१–१७००) हा ह्या कालखंडातील प्रमुख साहित्यिक.
ह्यांपैकी पहिले दोन कालखंड समान प्रवृत्ती व प्रेरणा घेऊन आलेले असून त्यांतील मिल्टनचा काळ ही प्रबोधनाच्या आंदोलनाची परिणती म्हणता येईल. तिसऱ्या कालखंडात मात्र स्वच्छंदतावादापेक्षा नव-अभिजाततावाद बळावलेला दिसतो आणि कल्पनेपेक्षा बौद्धिकतेकडे, पद्यापेक्षा गद्याकडे, अनिर्बंधतेपेक्षा नियंत्रणाकडे साहित्याने लक्ष पुरविलेले दिसते.
प्रबोधनाच्या प्रेरणा शोधण्यासाठी सु. १५० वर्षे मागे जावे लागेल व त्यात पुढील गोष्टींचा प्रामुख्याने निर्देश करावा लागेल: यूरोपियन पंडितांनी मानवतावादी भूमिकेवरून केलेला शिक्षणाचा प्रसार, ख्रिस्ती– ग्रीक संस्कृतिसंगम, त्यात मिसळलेला प्रांतिक, प्रादेशिक लोकवाङ्मयाचा प्रवाह, बायबलचे देशी भाषांतील अनुवाद, पोपच्या वर्चस्वाविरुद्ध झालेले बंड व त्यातून घडून आलेली धर्मसुधारणा विज्ञानाला, प्रयोगनिष्ठेला, ऐहिकतेला आलेले महत्त्व इंद्रियगोचर अनुभूती व त्यांवर आधारलेल्या शिल्प, चित्रकला यांसारख्या कलांना प्राधान्य देण्याची प्रवृत्ती व्यापारी व साहसी लोकांचे समाजातील वर्चस्व व व्यक्तिवादाचा उदय.
प्रबोधनाचे आंदोलन यूरोपव्यापी होते व त्याने यूरोपीय जीवनाची सर्व अंगे व्यापून टाकली. त्याचा प्रादुर्भाव फ्रान्स, इटली, जर्मनी यांपेक्षा इंग्लंडमध्ये उशिरा व हळूहळू झाला व तो रूपण कलांपेक्षा काव्य-नाटक ह्या वाङ्मयप्रकारांत प्रामुख्याने झाला. नव्या युगाला पोषक अशा घटना जवळजवळ दोन शतकांपासून घडत होत्या परंतु त्यांचा विस्मयचकित करणारा उद्रेक पहिल्या एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत (१५५८–१६०३) झाला. आठवा हेन्री (१५०९–१५४७) व एलिझाबेथ ह्या राज्यकर्त्यांच्या कारकीर्दींत राजाकडून व त्याच्या भोवतालच्या सरदारवर्गाकडून कलेला व कलावंतांना उत्तेजन आणि आश्रय मिळू लागला. पोपच्या धार्मिक अधिसत्तेचा राजसत्तेकडून पाडाव झाला व व्यक्तीच्या आत्मिक शक्तीवर आधारलेली धर्मसुधारणा घडून आली. युद्धक्षेत्रात स्पॅनिश आरमाराचा इंग्लंडकडून निःपात झाला (१५८८). ह्या साऱ्याचा परिणाम म्हणजे राष्ट्रीय अस्मितेची व त्याबरोबरच व्यक्तीच्या प्रतिष्ठेची जाणीव. एक नवा जोम, नवी अशा, चैतन्य व्यक्तिमनात संचारले व त्यामुळे कवी, कथाकार, नाटककार व निबंधलेखक यांच्या साहित्यनिर्मितीला बहर आला.
मानवी मनाच्या, विचारभावनांच्या, कल्पनांच्या कक्षा रुंदावण्यास फ्रान्सिस ड्रेक, फ्रॉबिशर, रॅली, हॅक्लूट यांच्या सागरी साहसांची व नव्या भूभागांच्या शोधांची मदत झाली. मानवी जिज्ञासेला पुरेसे खाद्य मिळू लागले. स्वसामर्थ्याने व नव्या ज्ञानाने मानव विस्मयचकित झाला. त्याची प्रयोगशीलता आणि उपक्रमशीलता वाढली. वैचारिक क्षेत्रात विज्ञानाची कास ⇨ फ्रान्सिस बेकनसारख्यांनी (१५६१–१६२६) धरली. कोपर्निकस, गॅलिलीओ यांच्या ज्योतिषशास्त्रातील शोधांनी विश्वासंबंधीच्या जुन्या समजुतींना धक्का दिला. राजकारणात राजसत्तेला आणि धर्मकारणात कॅथलिक धर्मसत्तेला हादरे बसले व अखेर प्यूरिटन काळात लोकसत्ता स्थापन करण्याचा प्रयोग करण्यात आला. ह्या सर्व घडामोडींना साहित्याची फार मोठ्या प्रमाणात मदत झाली. साहित्याने समाजपरिवर्तनास मदत केली व समाजिक परिवर्तनामुळे साहित्यासही नवनवी दालने उघडता आली.
ह्या काळातील विपुल व विविध साहित्यनिर्मितीला पांडित्यपरंपरा व लोककला ह्यांचे मनोहर मिश्रण कारणीभूत झालेले दिसते. पंडितांनी ग्रीक व लॅटिन ग्रंथांच्या केलेल्या भाषांतरांनी कवी व लेखक यांनी स्फूर्ती मिळाली. ह्यात फिलीमन हॉलंडने (१५५२–१६३७) केलेली लिव्ही, प्लिनी व प्लूटार्क या ग्रंथकारांच्या ग्रंथांची व सर टॉमस नॉर्थने केलेली प्लूटार्कच्या ग्रंथांची भाषांतरे प्रमुख आहेत. ॲरिस्टॉटलच्या पॉलिटिक्सचेही भाषांतर झाले. फ्रेंच व इटालियनमधून बानदेल्लो, मॅकिआव्हेली व माँतेन यांच्या साहित्याचे अनुवाद केले गेले. ⇨ जॉर्ज चॅपमनने (१५५९ ?–१६३४ ?) होमरच्या महाकाव्यांचे भाषांतर केले. ह्या भाषांतरांतून गद्य-पद्य शैलींना नवे वळण मिळाले.
प्रबोधनाच्या पहिल्या कालखंडात राजाच्या आश्रयाने त्याच्या अवतीभोवती वावरणारा नवा खानदानी उमराव वर्ग महत्त्वाचा ठरला. त्याची सभ्यता आणि सुसंस्कृतता मोलाची ठरली. ह्या ‘जंटलमन’ची समाजमनातील प्रतिमा सुस्पष्ट झाली. हा धीरोदात्त, सुसंस्कृत, शालीन, कृतिशील नायक जसा विद्याभ्यासात व कलांत पारंगत तसाच तो युद्धक्षेत्रातही प्रवीण. प्रियाराधनात तो जसा निष्णात तसाच तो अमोघ वक्तृत्वाने जनमानस जिंकून घेणारा. एका बाजूने राजाशी व राजदरबाराशी त्याचे सख्य, तर दुसऱ्या बाजूने सामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी त्याचे जिव्हाळ्याचे नाते. लोकजीवनाशी निगडित असल्याने ह्या काळातील वाङ्मयाचे नाते परंपरागत लोककलेशी अतूट राहिले. लोकांसाठी असलेल्या नाटकासारख्या साहित्यप्रकाराला भिन्नरुचींच्या प्रेक्षकांचे एकाच वेळी समाराधन करणे सहज शक्य झाले. नाटकांतून व्यक्तिगत संघर्ष व सामाजिक दर्जाची जाणीव ह्यांवर आधारलेल्या विषयांना महत्त्व आले. शहरी व दरबारी नागरिकतेला प्रतिष्ठा आली. तिचा सामान्यांच्या प्रबळ, दुर्दमनीय, बेबंद आशाआकांक्षांशी आलेला संघर्ष समाजात व साहित्यात महत्त्वाचा ठरला. जनसंमर्द व त्याचा नायकाशी संघर्ष अथवा सहकार्य यांवर श्रेष्ठ नाट्यकृती आधारल्या गेल्या. ह्या सर्व प्रेरणा स्वच्छंदतावादाला पोषक असल्या, तरी त्या बेबंद होऊ नयेत म्हणून त्यांना विवेकाचे नियंत्रण असावे, अशी जाणीवही दिसू लागली म्हणून ह्या काळातील वाङ्मयात उत्स्फूर्ततेच्या जोडीला शिस्त व संयम असावा, असे प्रयत्न दिसतात व त्यांतून काही अंतर्विरोधही निर्माण झालेले दिसतात. मानवी बुद्धी ही निसर्गाची एक विकसित अवस्था. तिने परमेश्वरी सूत्राची परिपूर्ती करायची पण ह्याबरोबरच निसर्गावर ताबा मिळविण्याची ईर्ष्याही धरायची, असा परस्परविरोध विचारक्षेत्रात व कलेत दिसू लागला. उदा., ⇨ क्रिस्टोफर मार्लोची (१५६४–१५९३) नाटके.
ह्या काळात काव्याला मोठी प्रतिष्ठा लाभली. कवीसंबंधी परमादराची भावना निर्माण झाली. नवनव्या आशा व उर्मी प्रफुल्लित झाल्या. सर्वच क्षेत्रांत प्रयोगशीलता दिसत असल्याने ती भाषेच्या बाबतीतही दिसू लागली. तिचा आवेशपूर्ण आलंकारिक वक्तृत्वासाठी उपयोग झाला तसेच तिची विविध अलंकृत-अनलंकृत, कृत्रिम वा अकृत्रिम, सरळ, सोपी अथवा अत्यंत क्लिष्ट अशी नाना रूपे गद्य-पद्यात दिसू लागली. भाषेचे स्वरूप निश्चित होऊ लागले तिला नवनवे शब्द मिळाले. ह्या कालखंडातील साहित्यिक शब्दांच्या विलक्षण मोहिनीने भारावलेले दिसून येतात.
एलिझाबेथकालीन गद्य : एलिझाबेथकालीन गद्याची सुरुवात झाली ती जॉन लिली व ⇨ फिलिप सिडनी (१५५४–१५८६) यांच्या स्वच्छंदतावादी, अद्भुतरम्य ग्रंथांतून व अत्यंत आलंकारिक व कृत्रिम भाषेची आतषबाजी करणाऱ्या गद्यशैलीतून. हे गद्य पांडित्यप्रदर्शन करणारे, एका विशिष्ट दर्जाच्या ‘सभ्य’ नागरिकांची-विशेषत: उच्चवर्गीय, स्त्रियांची-करमणूक करण्यासाठी अवतीर्ण झाले. सिडनीच्या द आर्केडिया (१५९०) व लिलीच्या युफूस (२ भाग, १५७८, १५८०) ह्या स्वच्छंदतावादी, सुरस व चमत्कारिक कथांतून हे नादमय, तालबद्ध, चमत्कृतिपूर्ण गद्य वापरण्यात आले. युफूसमध्ये मायभूमीचे गोडवे अत्यंत आलंकारिक भाषेत गायले गेले असून त्यातील गद्यशैलीमुळे ‘यूफिझम'( अतिरंजितशैली ) ही संज्ञा रूढ झाली. सिडनीच्या द आर्केडियामध्ये गोपकाव्याचा प्रभाव दिसतो. ह्यात अत्यंत गुंतागुंतीचे काव्यमय कथानक आहे. ह्या ग्रंथातील गद्यात भाषेचा मुक्त विलास आढळतो. तीत कृत्रिमता असली, तरी त्यामुळे भाषेचे सामर्थ्य अजमावता आले हे निश्चित.
सिडनी व लिली यांच्याप्रमाणेच ⇨ टॉमस लॉज (१५५८ ?–१६२५), ⇨ रॉबर्ट ग्रीन (१५६० ?–१५९२), ⇨ टॉमस नॅश (१५६७–१६०१) ह्या नाटककारांनीही कथात्मक वाङ्मय लिहिले. त्यांचे आज महत्त्व ऐवढेच, की त्यांच्या कथांनी शेक्सपिअरला नाट्यविषय व कथानके पुरविली. नॅशने एक तऱ्हेचा सरळसोट वास्तववाद वाङ्मयता आणला व ठकसेनी पद्धतीची ‘पिकरेस्क’ कादंबरी स्पॅनिश वाङ्मयाच्या अनुकरणाने आणली.
प्रबोधनाच्या चळवळीतील विचारसंपदेत बेकनच्या ॲडव्हान्समेंट ऑफ लर्निंग (१६०५) व नोव्हम ऑर्गनम (१६२०) ह्या ग्रंथांनी भर घातली. ह्या ग्रंथांतून त्याने निसर्गाचा अभ्यास करण्याची नवी विगमनपद्धती संशोधिली व आधुनिक विगमनदृष्टीचा पाया घातला. गद्यवाङ्मयप्रकारात त्याने एसेज (१६२५) लिहून नव्या स्फुट गद्यलेखनप्रकाराची भर घातली. बेकनचे हे निबंध व्यवहारात उपयोगी पडणारे उपदेश आहेत. त्यांना सुभाषितांचे स्वरूप असून व्यवहारकौशल्य व धूर्तता यांचा तो पाठपुरावा करतात. ह्या बाबतीत बेकनवर मॅकिआव्हेलीच्या कुटिल नातीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. बेकनच्या नीती व मूल्य यांविषयीच्या कल्पना व्यवहारवादी आहेत. त्याला अलंकारांची, प्रासांची व तालबद्धतेची हौस असली, तरी त्यांतून त्याची अर्थवाही सघनता लोपलेली नाही. बेकनच्या निबंधांमुळे इंग्रजी गद्यशैलीने एक मोठा पल्ला गाठला.
बेकनप्रमाणेच वॉल्टर रॅलीचा (१५५२ ?–१६१८) हिस्टरी ऑफ द वर्ल्ड (१६१४), ⇨ रिचर्ड हॅक्लूटचे(१५५२ ?–१६१६) प्रिन्सिपल नॅव्हिगेशन्स (१५८९) ह्या ग्रंथांनी विविध स्वरूपाच्या अर्थवाही गद्यशैली रूढ केल्या. त्यांतून प्रबोधनातील इतिहासाभिमान, साहसप्रियता हे गुण वाढीला लागले. ⇨ रिचर्ड हूकरच्या (१५५४ ?–१६००) द लॉज ऑफ इक्लीझिॲस्टिकल पॉलिटी (५ खंड, १५९४–१५९७) ह्या ग्रंथात धार्मिक विषयांवरील प्रवचनवजा भाष्य आढळते. हे गद्य अधिक सोपे व सरल आहे. १६११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बायबलच्या नव्या कराराच्या अधिकृत भाषांतरामध्ये हेच गुणविशेष आढळतात. ह्या भाषांतराचा व विशेषत: त्यातील काव्यमय, परंतु अकृत्रिम, अर्थवाही, रसपूर्ण शैलीचा इंग्रजी गद्यशैलीवर दीर्घकाळापर्यंत प्रभाव पडला.
ह्याशिवाय टीकावाङ्मयात सिडनीच्या द अपॉलजी फॉर पोएट्री (१५९५), विल्यम वेबच्या डिस्कोर्स ऑफ इंग्लिश पोएट्री (१५८६), जॉर्ज पटनॲमच्याआर्ट ऑफ इंग्लिश पोएझी (१५८९) ह्या ग्रंथांनी मोलाची भर घातली व टीकाशास्त्रातील परिभाषा रूढ करण्यास मदत केली. ऑर्ट ऑफ इंग्लिश पोएझी हा ग्रंथ काहींच्या मते जॉर्जचा भाऊ रिचर्ड पटनॲम ह्याने रचिला.
एलिझाबेथकालीन काव्य: एलिझाबेथकालीन काव्य व नाटक ह्या इंग्रजी वाङ्मयाला लाभलेल्या अजोड देणग्या आहेत. दोन्हींची विविधता, विपुलता, सूक्ष्मता, प्रयोगनिष्ठा व निर्भेळ कलागुण विस्मयकारी आहेत. जगातील बहुतेक सर्व प्रमुख भाषांवर व साहित्यावर त्यांचा प्रभाव पडला आहे. अगदी आधुनिक काळातही त्यांतील कोठली तरी प्रवृत्ती, प्रवाह वा कलाप्रकार अनुकरणीय वाटत आहेत.
टॉमस वायट आणि हेन्री हॉवर्ड सरी यांनी इटलीमधून प्रबोधनपूर्व काळातच आणलेला सुनीत हा काव्यप्रकार फिलिप सिडनी याने समर्थपणे अस्ट्रोफेल अँड स्टेला (१५९१) ह्या सुनीतमालेत वापरला. सिडनी हा भाषेचे व काव्यरचनेचे नवनवे प्रयोग करणारा ह्या काळातील पहिला प्रभावी कवी. त्याला भाषेच्या आतषबाजीची फार हौस. स्पेन्सरप्रमाणेच इटलीतील चित्रकला, मूर्तिकला व वास्तुशिल्प यांतील सौंदर्यकल्पनांचा त्याच्या काव्यावर परिणाम झालेला दिसून येतो. त्यामुळे त्याला एक तऱ्हेची सर्वसमावेशक सौंदर्यदृष्टी आलेली दिसते. पारंपरिक रूपकपद्धती व नीतिकल्पना, बोधवादी वृत्ती, उच्च महत्त्वाकांक्षा, लोकरंजनप्रकारांपासून घेतलेली स्फूर्ती आणि अभिजात परंपरेतील तंत्र व काव्यपद्धती ह्या गोष्टी सॅम्युएल डॅन्यल (१५६२–१६१९) व मायकेल ड्रेटन (१५६३–१६३१) ह्या कवींप्रमाणेच एडमंड स्पेन्सर ह्या प्रातिनिधिक कवीमध्ये अधिक प्रकर्षाने दिसतात.
स्पेन्सरने साध्या गोपकाव्यापासून (शेपर्ड्स कॅलेंडर, १५७९) रूपकात्मक महाकाव्यसदृश रचनेपर्यंत (फेअरी क्वीन, ६ खंड-१५९० १५९६) अनेक काव्यप्रकार हाताळले. त्याने भाषेला समर्थ व अर्थवाही केले. सौंदर्योपासना, इंद्रियगोचर अनुभूतींचे यथार्थ वा प्रतीकात्मक वर्णन, नैतिक भूमिकेवरून हाताळलेले काव्यविषय ह्यांमुळे स्पेन्सरला मोठी मान्यता मिळाली व कवींचा कवी म्हणून त्याची कीर्ती झाली. त्याने वापरलेली ९ ओळींची छंदोरचना, तीतील शब्दसंगीतामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरली असून तिला ‘स्पेन्सरियन स्टँझा’ हे नाव प्राप्त झाले आहे. फेअरी क्वीनमधील मध्ययुगीन नैतिक भूमिका (१२ नैतिक गुणांची प्रतीके असलेली १२ सरदारांची पात्रे इ.) व विषय आज रुचण्यासारखे नसले, तरी सौंदर्यदृष्टी व शब्दसंगीत हे स्पेन्सरचे गुण लक्षणीय आहेत.
एलिझाबेथकालीन काव्यात उत्तान प्रणयाला महत्त्व देणारे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यात क्रिस्टोफर मार्लोचा हीरो अँड लिअँडर (१५९३) व शेक्सपिअरचे व्हीनस अँड अडोनिस (१५९३) आणि रेप ऑफ ल्यूक्रीझ (१५९४) हे महत्त्वाचे आहेत. ह्या काव्यविषयांना इटलीमध्ये प्रतिष्ठा मिळाली होती. तथापि मार्लो व शेक्सपिअर यांनी त्यात सुगम रचना, नादमाधुर्य व विशुद्ध सौंदर्यभावना यांची भर टाकली.
ह्या कालखंडातील उत्कृष्ट प्रेमकाव्यात शेक्सपिअरची सुनीते प्रामुख्याने उल्लेखनीय आहेत. त्यांतील आत्मचरित्रात्मक ध्वनी आणि आशयाभिव्यक्तीची एकात्मता वैशिष्ट्यपूर्ण आहे.
ह्या काळातील गीतेही उल्लेखनीय आहेत. ती प्रामुख्याने प्रणयभावनेवर आधारलेली असून ह्या भावनेच्या अनेकविध छटा त्यांत आढळतात. भावनेची उत्कटता व नादमाधुर्य ह्यांमुळे ह्या गीतांची अवीट गोडी व ताजेपणा आजही टिकून आहे. शेक्सपिअर, ⇨ बेन जॉन्सन (१५७२–१६३७) ह्यांच्याबरोबर अनेक लहानमोठ्या कवींनी व नाटककारांनी ती नाटकात वा स्वतंत्रपणे रचली व ‘गाणाऱ्या पक्ष्यांचे घरटे’ हा इंग्लंडचा लौकिक सार्थ केला.
स्पेन्सरच्या संप्रदायातील काव्यात आढळून येणारा नादमाधुर्याचा सोस, काव्यरचनेत व कल्पनांत आलेला तोचतोपणा ह्यांविरुद्ध ⇨ जॉन डन (१५७२–१६३१) ह्या कवीने केलेले बंड उल्लेखनीय आहे. डन हा प्रखर बुद्धिवादी. भावनांच्या हळुवारपणापेक्षा त्यांतील चमत्कृती त्याला अधिक मोहित करते. एका बेडर वृत्तीने तो परस्परविरोधी आणि विस्मयजनक चमत्कृती निर्माण करतो. भौतिक वर्णनांपासून अतिभौतिक सूक्ष्मतेकडे ह्या कवीने टाकलेली झेप मोठी आहे. ह्या काव्याला ‘मेटॅफिजिकल’ (मीमांसक काव्य) हे नाव प्राप्त झाले. त्यातील वक्रोक्ती परस्परविरोधी भावना, कल्पना आणि रूपके एकत्र आणण्याची पद्धती व एक तऱ्हेची अर्थवाही चमत्कृती टी. एस्. एलियटसारख्या आधुनिक कवींनाही प्रभावित करू शकली. अत्यंत वेगळ्या, अनन्यसाधारण अनुभूती हा कवी संक्रमित करू पाहतो. त्यामुळे त्याची कविता काही वेळेस क्लिष्ट, अनाकलनीय ठरत असली, तरीही तीत एक आगळे माधुर्य जाणवते.
एलिझाबेथकालीन नाट्यवाङ्मय : एलिझाबेथकालीन नाट्यवाङ्मय वैपुल्य, विविधता, प्रयोगशीलता व निखळ कलागुण ह्यांनी समृद्ध आहे. ह्या काळातील काव्य वैभवशाली असले आणि गद्यशैली वैविध्यपूर्ण व तत्त्वचिंतनपर असली, तरी ह्या सर्वांचा मुक्त विलास नाट्यात आढळतो. नाट्य हेच ह्या काळाचे माध्यम होते, असे म्हणावे लागेल. नाट्याची सुरुवात रोमन नाटककार सेनीका याच्या अभिजात, रक्तपाताला व भीषणतेला महत्त्व देणाऱ्या, वक्तृत्व आणि ओज हे गुण प्रामुख्याने असणाऱ्या नाटकांनी प्रभावित झाली असली, तरी अखेर शेक्सपिअरच्या स्वच्छंदतावादी नाट्याने वैभवाचे शिखर गाठले. नव-अभिजाततावादी नाटककारांत बेन जॉन्सन ह्या प्रभावी नाटककाराचा समावेश करावा लागेल.
नाट्यकृतींचा पाया विद्यापीठातील अभिजातविद्याविभूषित अशा तरुण नाटककारांच्या एका समूहाने घातला. ‘युनिव्हर्सिटी विट्स’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ह्या नाटककारांमध्ये टॉमस किड, ⇨ जॉर्ज पील (१५५८ ?–१५९७ ?), टॉमस लॉज, रॉबर्ट ग्रीन, क्रिस्टोफर मार्लो आणि टॉमस नॅश हे नाटककार आहेत. १५८० पासून १६६२ पर्यंत अनेक नाटके निर्माण झाली. त्यांची विपुलता व विविधता विस्मयकारक आहे. ⇨ टॉमस हेवुडसारख्या (मृ. १६५० ?) नाटककाराने २२० नाटके लिहिली. ह्यांपैकी फारच थोडी आज उपलब्ध आहेत. नाट्यकलेचा पाया धंदेवाईक नाटकमंडळ्या स्थापन झाल्यावर अधिक मजबूत झाला. १५७६ मध्ये लंडनमध्ये पहिले नाट्यगृह स्थापन झाले व १६०० पर्यंत एकूण आठ नाट्यगृहे निर्माण झाली. ही आकाराने लहान असून ह्यांत नेपथ्य फारसे नसे व त्याची जागा प्रतीकात्मक वर्णनाने व अभिनयाने भरून काढली जाई. स्त्रियांची कामे पुरुष करीत.
अत्यंत साध्या रंगमंचावर इतर कोठलीही रंगसाधने नसल्याने नटाचा अभिनय व त्याची भाषणे यांना महत्त्व आले. अनेक भाषणे स्वगतपर व्याख्यानांच्या स्वरूपाची असत. नट लोकप्रिय असले, तरी समाजात प्रतिष्ठित मानले जात नसत. आरंभी त्यांना राजदरबारचा, सरदारांचा आश्रय होता परंतु पुढे त्यांनी स्वत: आपल्या व्यावसायिक नाटकमंडळ्या स्थापन केल्या, स्वत: नाटके लिहिली व उत्तरकाळात नाट्यव्यवसायाला मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.
नाटकांचा प्रेक्षकवर्ग अत्यंत संमिश्र व विविध थरांतील होता. नाटक हे त्याच्या बुद्धीला, विचाराला, भावनेला व कल्पनेला खाद्य पुरविणारे एकमेव साधन होते. त्यामुळे त्यात एका बाजूला कमालीची सूक्ष्मता, भावनाभिव्यक्तीचे बारकावे, विचारांची भव्य झेप असे तर दुसऱ्या बाजूला अत्यंत भडकपणा, ओबडधोबडपणा, ढोबळपणा आणि ग्राम्यता असे. ह्या दोन्ही टोकांचा तोल साधण्यात शेक्सपिअरसारख्या श्रेष्ठ नाटककारांनी यश मिळविले, ही गोष्ट उल्लेखनीय आहे.
‘युनिव्हर्सिटी विट्स’ ह्या समूहातील नाटककारांची नाटके आज केवळ इतिहासजमा झाली असली, तरी त्यांपैकी प्रत्येकाकडून शेक्सपिअरने नाट्य-भाषा-काव्य-कलागुण ह्यांपैकी काहीना काही स्वीकारले आहे. क्रिस्टोफर मार्लोच्या नाटकांतून प्रबोधनाच्या काळात मानवाला झालेली स्वसामर्थ्याची जाणीव व्यक्त होते. धर्मकल्पना, रूढ नीतिनियम, बंधने ह्यांना त्याने आपल्या नाट्यकृतींच्या द्वारे दिलेली आव्हाने त्याच्या टॅम्बरलेन, ज्यू ऑफ माल्टा, एडवर्ड द सेकंड, डॉ. फॉस्टस ह्या प्रभावी पात्रांच्या द्वारा प्रकट होतात. त्याच्या नाटकांत कल्पनांच्या भरारीबरोबरच भावनेची सूक्ष्मताही आढळते. मार्लोच्या नाट्यकृतींचा शेक्सपिअरवर मोठा प्रभाव होता.
एलिझाबेथकालीन नाट्यक्षेत्रातील एक वैभवशाली घटना म्हणजे विल्यम शेक्सपिअरची नाटके. जगात अशी एकही प्रगत भाषा नाही, की ज्या भाषेच्या नाट्यसृष्टीवर शेक्सपिअरच्या नाटकांचा प्रभाव पडलेला नाही. शेक्सपिअरच्या नाट्यलेखनाचे १५९२ ते १६०१, १६०१ ते १६०८ आणि १६०८ ते १६१६ असे तीन कालखंड पडतात. ह्या तीन कालखंडांत त्याच्या मनोवस्थेची काही वैशिष्ट्ये दिसून येतात. स्थूलमानाने पाहता पहिल्या कालखंडात त्याची वृत्ती आनंदी आणि खेळकर दिसते, तर दुसऱ्या कालखंडात ती गंभीर झाल्याचे जाणवते आणि जीवनातल्या दुःखाची आणि अपेक्षाभंगाची त्याला तीव्र जाणीव झालेली दिसते. त्याच्या चारही श्रेष्ठ शोकात्मिका ह्याच कालखडातील आहेत. तिसऱ्या कालखंडात चिंतनशीलता आणि गूढ अद्भुतरम्यता ह्यांचा प्रभाव दिसतो. ह्या तीन कालखंडांतील नाटकांत काही सुखात्मिका आणि काही शोकात्मिका असून काही शोक-सुखात्मिका आहेत. त्या नाटकांत भावनांचा, भावावस्थांचा, तात्त्विक विचारांचा व चिंतनाचा परिपाक आहे. शेक्सपिअरने प्रचलित नाट्यप्रकारात वापरले व रूढ कथानके हाताळली. तथापि प्रचलिताला आणि अल्पजीवी व आकस्मिक घटिताला चिरस्थायी, मनोज्ञ कलारूप देण्यात यश मिळविले. त्याच्या नाटकांत मानवी जीवनातील सौंदर्य, गूढता, रम्य-भीषणता आणि त्यातील अतर्क्य कोडी मांडण्याचे सामर्थ्य दिसते तसेच विनोद, काव्यात्मता व कारुण्य ह्यांचा आविष्कारही तो आपल्या नाटकांतून प्रभावीपणे करतो. समकालीनांच्या दोषांपासून, आलंकारिक भाषेच्या हव्यासापासून ही नाटके अलिप्त नाहीत परंतु त्याच्या काही नाटकांत – विशेषत: हॅम्लेट, मॅक्बेथ, किंग लीअर, ऑथेल्लो ह्या शोकात्मिकांत – इतके श्रेष्ठ वाङ्मयीन गुण एकवटलेले आहेत, की त्यांना जोड नाही.
शेक्सपिअरच्या समकालीनांपैकी बेन जॉन्सनने नव-अभिजाततावादी, तंत्रबद्ध, रेखीव रचना असणारी नाटके लिहिली. त्याची एव्हरी मॅन इन हिज ह्यूमर (१५९८), व्हॉलोपन ऑर द फॉक्स (१६०७), एपिसीन किंवा द सायलेंट वूमन (१६०९), बार्थॉलोम्यू फेअर (१६१४), द अल्केमिस्ट (१६१२) ही नाटके मुख्यतः स्वभावातील तऱ्हेवाईकपणावर आणि एकांगीपणावर भर देणारी आहेत. ‘कॉमेडी ऑफ मॅनर्स’ किंवा आचारविनोदिनी ह्या नाट्यप्रकाराचा प्रणेता म्हणून जॉन्सनला नाट्येतिहासात अढळ स्थान आहे.
बेन जॉन्सननंतर जॉन वेब्स्टरसारख्या (१५८० ?–१६२५ ?) नाटककाराने द व्हाइट डेव्हिल (१६१२), द डचेस ऑफ माल्फी (१६२३) ही नाट्यगुणांनी श्रेष्ठ, परंतु खून व रक्तपात यांनी रंगलेली नाटके लिहिली, तर ⇨ फ्रान्सिस बोमंट (१५८४–१६१६), ⇨ जॉन फ्लेचर (१५७९–१६२५), ⇨ फिलिप मॅसिंजर (१५८३–१६४०), ⇨ जॉन फोर्ड (१५८६–१६४० ?), ⇨ जेम्स शर्ली (१५९६–१६६६) यांच्या नाटकांतही काही कलागुण आढळतात. तथापि ह्या पुढल्या काळात एकंदरीने नाट्यनिर्मितीचा बहर ओसरून नाट्यकलेला उतरती कळा लागलेली दिसते.
मिल्टनचे युग (१६२५–१६६०) : शेक्सपिअर काळातून मिल्टनच्या काळाकडे येताना इंग्लंडच्या समाजजीवनात व विचारप्रणालीत अनेक बदल घडून आलेले दिसून येतात. हे बदल मुख्यतः धार्मिक व राजकीय असून काही प्रमाणात सामाजिक स्वरूपाचे आहेत मात्र त्यांना सामाजिक क्रांतीचे स्वरूप नाही. पहिला जेम्स व पहिला चार्ल्स यांच्या कडव्या, अनुदार व असहिष्णू धोरणामूळे राजसत्तेविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया निर्माण झाली. आर्चबिशप लॉर्डसारख्या अधिकाऱ्यांच्या संकुचित वृत्तीमुळे धार्मिक क्षेत्रात विरोधी वृत्ती बळावली. ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे प्रस्थापिताला विरोध करण्याची एक तऱ्हेची कडवी प्रवृत्ती. ह्या प्रवृत्तीमुळे धर्माचे विशुद्ध स्वरूप शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. ही प्रक्रिया ‘धर्मसुधारणे’पासूनचे (रेफॉर्मेशन) चालू झालेली होती. बायबलच्या इंग्रजी भाषांतराने ते लोण आता सामान्यांपर्यंत जाऊन पोचवले होते. सामान्यांना आपल्या धार्मिक व ऐहिक आशा-आकांक्षांचे आणि नीतिमूल्यांचे प्रत्यंतर बायबलच्या साध्या, सोप्या परंतु प्रवाही व आवेशपूर्ण भाषेत, प्रतिपादनात व मूल्यकल्पनांत येत होते. ह्यांतून धर्माच्या विशुद्धीकरणाचा पाठपुरावा करणारा ‘प्यूरिटन पंथ’ निर्माण झाला. त्याने एलिझाबेथनंतरच्या काळातील नीतिमूल्यांबद्दलची शिथिलता, लैंगिक बाबतीतील स्वातंत्र्य आणि धार्मिक बाबींतील औदासिन्य यांवर कडाडून हल्ला चढविला. सामाजिक व आर्थिक परिवर्तनांनुळे सामान्य मध्यम वर्ग, व्यापारी यांना महत्त्व आले होते. जुनी प्रतिष्ठित घराणी व व्यक्ती यांची जागा ह्या नव्याने श्रीमंत होणाऱ्या शहरी मंडळींनी व ग्रामीण भागातील नव्या सधन वर्गाने (जेंट्री) घेतली. पृथ्वीवरील राजांच्या जुलमी अधिसत्तेपेक्षा सर्वशक्तिमान परमेश्वराची स्वर्गीय अधिसत्ता अधिक महत्त्वाची व तिचे प्रतिबिंब व्यक्तीच्या सदसद्विवेकबुद्धीमध्ये दिसले पाहिजे, अशा विचारांचा व्यक्तिवाद धार्मिक क्षेत्रात प्रभावी ठरला. त्यामुळे प्यूरिटन क्रांती घडून आली. लोकसत्ताकाचा प्रयोग झाला. पूर्वीच्या शिथिलतेविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून इंग्लंडमधील नाट्यगृहे अनीतिप्रवर्तक मानून बंद करण्यात आली (१६४२). नटांना हद्दपार करण्यात आले.
प्यूरिटनांच्या ह्या कडवेपणामुळे ते सर्व बाबतींत असहिष्णू असून त्यांना कोणत्याही प्रकारच्या कलांचे व करमणुकींचे वावडे आहे अशी समजूत पसरली परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती. इंग्लंडच्या लोकसत्ताकाचा सर्वाधिकारी क्रॉमवेल हा संगीतप्रेमी होता आणि मिल्टनसारख्या श्रेष्ठ प्यूरिटन कवीमध्ये प्रबोधनातील सौंदर्यपूजा आणि प्यूरिटनांचा शुद्धतेचा आग्रह ह्यांचे मिश्रण आढळते.
ह्या काळातील सर्व प्रवृत्तींचा परिपाक म्हणजे जॉन मिल्टनची कविता. ह्या काव्याने प्रबोधनातील काव्यगुणांवर व संस्कृतीवर कळस चढविला. मिल्टन हा पंडित कवींमध्ये अग्रगण्य मानावा लागेल. पांडित्यावर त्याने आपल्या सौंदर्यासक्तीचे अलंकार चढविले व श्रेष्ठ काव्यगुणांनी काव्याला एक वेगळे तेज आणले. प्यूरिटनांची विशुद्धीकरणाची तळमळ, व्यक्तिगत सदसद्विवेकबुद्धीवर मदार, तीवर आधारलेली स्वातंत्र्यलालसा, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा, राष्ट्रगौरव ह्यांसारख्या गुणांचा समुच्चय त्याच्या पॅरडाइस लॉस्ट (१६६७) ह्या महाकाव्यात दिसून येतो. पूर्ववयात मिल्टनने लॅटिन व इटालियन भाषांत रचना केली. नंतरच्या काळातील धर्मपर काव्यात भक्ती व नादमाधुर्य यांचे मिश्रण (‘ऑन द मॉर्निंग ऑफ ख्राइस्ट्स नेटिव्हिटी’, १६२९) आढळते. कोमस (१६३४), लिसिडास (१६३७), ल’ओलेग्रो (१६३२), आणि इल् पेन्सरोझो (१६३२) ह्यांसारख्या काव्यरचनांत सौंदर्यपूजा, मानवता, धर्मनिष्ठा व निसर्गप्रेम यांचे मिश्रण दिसते. तात्कालिक विषयांवर लिहिलेल्या त्याच्या गद्य पुस्तिकांमध्ये व प्रचारकी निबंधांमध्ये स्वातंत्र्याबद्दलची तळमळ दिसते. परमेश्वरी आज्ञेचे उल्लंघन करण्याच्या मानवाच्या आद्य पतनावर आधारलेले पॅरडाइस लॉस्ट हे महाकाव्य त्याने लिहिले. आदाम आणि ईव्ह सैतानाच्या मोहाला बळी पडले (पॅरडाइस लॉस्ट ) तथापि त्याच सैतानाच्या मोहाचा प्रतिकार करून ईश्वराच्या पुत्राने परमेश्वराची कृपा मानवासाठी परत संपादन केल्याचे कथानक पॅरडाइस रीगेन्ड (१६७१) ह्या काव्यात आहे. ते अधिक सरळ व साध्या शैलीत आहे. त्याने उत्तरकाळात लिहिलेली सॅमसन ॲगनिस्टीस (१६७१) ही ग्रीक नाट्यतंत्रावर आधारलेली शोकात्मिका कवीच्या व्यक्तिगत विकलावस्थेवर प्रकाश टाकते. महाकाव्य अथवा नाटक ह्या वस्तुनिष्ठ वाङ्मयप्रकारांत मिल्टनने गुंफलेला आत्मचरित्राचा व आत्माविष्काराचा धागा अत्यंत आकर्षक वाटतो.
मिल्टनच्या काळात व नंतरही ‘कॅव्हलिअर कवी’ म्हणून संबोधिलेले दरबारी कवी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण काव्याने महत्त्वाचे ठरतात. ⇨ रॉबर्ट हेरिक (१५९१–१६७४), ⇨ टॉमस कारू (१५९५ ?–१६४० ?), ⇨ जॉन सक्लिंग (१६०९–१६४२), ⇨ रिचर्ड लव्हलेस (१६१८–१६५८) ह्यांच्या काव्यात एक तर्हेची मृदुता, सरलता व तरल सौंदर्यदृष्टी आढळते. चिंतनशीलतेने त्याला वेगळे परिमाण लाभले आहे.
जॉर्ज हर्बर्ट (१५९३–१६३३), रिचर्ड क्रॅशॉ (१६१२ ?–१६४९), हेन्री व्हॉन (१६२२–१६९५) ह्या कॅव्हलिअर कवींच्या काव्यात धार्मिक चिंतनाचा धागा बेमालूम मिसळला आहे. त्यांच्या काव्यात भावकाव्याच्या उत्कटतेबरोबरच धर्मभावनेचा कडवेपणा जाणवतो. ह्यांशिवाय जॉन डनच्या मीमांसक काव्यसंप्रदायातील ⇨ अब्राहम काउली (१६१८–१६६७), टॉमस ट्राहर्न (१६३७ ?–१६७४) ह्या कवींची चिंतनपर कविता, डनच्या सर्व गुणदोषांसह प्रकट झालेली दिसते. ट्राहर्नच्या काव्यात सौंदर्य, ओज ह्यांबरोबर उत्कटता आणि चिंतनशीलता साधलेली दिसते.
मिल्टनच्या काळापर्यंत गद्यशैलीने फार मोठा प्रगतीचा पल्ला गाठला होता. भाषेचे स्वरूप आता अधिक स्थिर झाले होते. बेकनसारख्यांनी गद्यशैलीत नव्या जाणिवा, नवा अर्थवाहीपणा निर्माण केला होता. बायबलच्या भाषांतरांच्या द्वारा मूळ हिब्रू भाषेतील प्रवाह, ओज व काव्यात्मकता ह्यांचा प्रभाव इंग्रजी भाषेवर पडलेला दिसतो. प्यूरिटन धर्मप्रचारकांनी आपल्या प्रवचनांतून ह्या शैलीला व्यवहाराची जोड दिली व सामान्यांच्या दैनंदिन व्यवहाराला व विचारभावनांना वाट देणारे सामर्थ्य तीत आणले.
रॉबर्ट बर्टन (१५७७–१६४०) व ⇨ टॉमस ब्राउन (१६०५–१६८२), आयझाक वॉल्टन (१५९३–१६८३), टॉमस फुलर (१६०८–१६६१) ह्या लेखकांनी गद्यशैली मुक्त स्वरूपात वापरली. बर्टनच्या अनॅटमी ऑफ मेलँकलीमध्ये (१६२१) किंवा ब्राउनच्या रिलीजिओमेडिसीमध्ये (१६४२) सामान्य व्यवहारातील भाषा व पांडित्यपूर्ण लॅटिन शैली ह्यांचे मिश्रण दिसते. विज्ञाननिष्ठा व पारंपरिक कल्पना ह्यांचाही संगम दिसतो. एकोणिसाव्या शतकातील चार्ल्स लँबसारख्या (१७७५–१८३४) निबंधकारांनी ह्यांतील शैलीच्या वैशिष्ट्यांचे अनुकरण केलेले दिसते. चरित्रे व आत्मचरित्रे लिहिण्यासाठीही गद्याचा उपयोग आता केला जाऊ लागला. फुल्क ग्रेव्हिलचे (१५५४–१६२८) फिलिप सिडनीचे चरित्र, आयझाक वॉल्टनची जॉर्ज हर्बर्ट व जॉन डन यांची चरित्रे, लॉर्ड हर्बर्ट ऑफ चेरबरी (१५८३–१६४८) व मार्गारेट डचेस ऑफ न्यूकॅसल यांची हृद्य आत्मचरित्रे पुढील रेस्टोरेशन काळातील गद्याची पूर्वसूचक आहेत.
रेस्टोरेशन काळ (१६६०-१७००) : १६६० च्या सुमारास इंग्लंडच्या राजकीय व सामाजिक जीवनामध्ये क्रांतिकारक बदल घडून आले. ह्या बदलांमुळे वाङ्मयाच्या प्रेरणा व स्वरूप यांतही स्थित्यंतर घडून आले. एलिझाबेथकालीन काव्य व नाटक ह्यांत जो भडकपणा व अतिरेकी उत्साह दिसत होता तो मिल्टन काळात ओसरला होता पण त्याची जागा नैतिक व धार्मिक पुनरुत्थानाच्या ध्येयवेडाने घेतली होती. समाजजीवन नियंत्रित असावे, नाट्यादी करमणुकीसुद्धा त्याज्य ठरवाव्या, ह्या प्यूरिटनकाळातील अतिरेकी आग्रहाने व समाजात वरचेवर झालेल्या बदलांमुळे एक नवी स्थिर घडी असावी, अशी विचारप्रक्रिया सुरू झाली. प्यूरिटन लोकसत्ताकाचा शेवट घडून आला व फ्रान्समध्ये परागंदा जीवन कंठणारा दुसरा चार्ल्स परत इंग्लंडच्या राजसत्तेवर आला (१६६०). त्याच्याबरोबर सर्व निर्बंध झुगारून देण्याची व केवळ प्यूरिटनांच्या सोवळेपणाचीच नव्हे, तर सर्वच नीतिनियमांची चेष्टा करण्याची प्रवृत्ती बळावली. ह्यांचे प्रत्यंतर ह्या काळातील नाट्यवाङ्मयात विशेषतः दिसून येते.
राजसत्तेबरोबरच राजदरबाराचे व लंडन शहराचे महत्त्व वाढले. व्यक्तिगत भावनांची जागा सामाजिक प्रेरणा, सभ्यता, नागरिकत्वाची जाणीव यांनी घेतली. नागरी रीतीरिवाज व त्यांतून येणारी अभिजातता ह्यांना महत्त्व आले. कल्पनेची जागा बुद्धीने घेतली आणि वैचारिक चिकित्सेची आणि विश्लेषणाची प्रवृत्ती वाढीला लागली. ही प्रवृत्ती गद्याला पोषक होती म्हणून हा काळ मुख्यत: गद्याचा आहे. स्फुट सुभाषितवजा अशी गद्याभिव्यक्ती ह्या काळात रूढ होऊ लागली. स्वच्छंदतेची जागा अभिजातता घेऊ लागली. रोजच्या व्यवहारातील प्रसंग, विचार व भावना यांच्या अभिव्यक्तीचे भाषा एक समर्थ साधन बनली.
समाजजीवनात मध्यमवर्गीयांचा प्रभाव अधिकाधिक प्रमाणात दिसू लागला. लेखकवर्ग हा अजून आश्रयदात्यांवर व राजदरबारावर अवलंबून असला, तरी वाङ्मयात सामान्यांच्या विचारभावनांचे आणि आशाआकांक्षांचे प्रतिबिंब अधिकांशाने पडू लागले. कॉफी हाऊसमध्ये बसणाऱ्या लेखकमंडळींत राजकीय, वाङ्मयीन, धार्मिक इ. विषयांवर चर्चा होऊ लागल्या. वृत्तपत्रांच्या प्रसाराने त्यांना वाङ्मयरूप मिळाले. पंडितांना व विद्वानांनादेखील साध्या व सोप्या भाषेत आपला आशय व्यक्त करावा, असे तीव्रतेने वाटू लागले.
१६६५ मधील प्लेगच्या साथीनंतर व १६६६ साली लागलेल्या मोठ्या आगीनंतर लंडन शहराची पुनर्रचना झाली. राजसत्ता परत आली असली, तरी तिच्यावर नियंत्रण ठेवण्यात मध्यम वर्ग यशस्वी ठरला.
आधुनिक गद्यशैलीची निश्चिती ही ह्या युगाची इंग्रजी वाङ्मयाला प्रमुख देणगी. जॉन ड्रायडनच्या गद्यलेखनावरून हे स्पष्टपणे दिसून येते. त्याच्या गद्यलेखनात समकालीन वाङ्मयीन अभिरुची नियमबद्ध करण्याचा व अभिजात प्रवृत्तींना प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न दिसतो. त्याच्या एसे ऑन ड्रॅमॅटिक पोएझीत (१६६८) त्याने अभिजात नाट्यकृतींतील नियमबद्धता पुरस्कारिलेली दिसते. ह्या त्याच्या निबंधाने आणि त्याने लिहिलेल्या प्रस्तावनांनी इंग्रजीमधील पद्धतशीर साहित्यसमीक्षेचा पाया घातला, असे मानले जाते. ⇨ जॉन बन्यन (१६२८–१६८८) हा ह्या काळचा श्रेष्ठ गद्यलेखक. ह्याच्या गद्य-लेखनात बायबलच्या गद्यपद्यशैलीचे सुपरिणाम दिसतात. ग्रेस अबाउंडिंग…(१६६६), द होली वॉर (१६८२), द लाइफ अँड डेथ ऑफ मिस्टर बॅडमन (१६८०) ह्या बन्यनच्या कथात्मक ग्रंथांत मानवी स्वभावाचा परिणामकारक आविष्कार घडवून आणणारी वर्णनशैली, विनोद व काहीसा विस्मयजनक विक्षिप्तपणा ह्या गुणांचा प्रत्यय येतो. ह्या सर्व गुणांचा प्रकर्ष त्याच्या द पिलग्रिम्स प्रोग्रेस (१६७८) ह्या रूपकात्मक कथेत दिसतो. बायबलवरील परमश्रद्धेने प्रेरित होऊन ख्रिस्ती धर्ममूल्यांचा गौरव करण्यासाठी बन्यनने ही कथा लिहिली परंतु तिच्यातील धर्मतत्त्वे कोरडी नाहीत. ती सामान्यांच्या भाषेत त्यांच्या विचारभावनांशी एकरूप होऊन ललित स्वरूपात प्रकट झाली आहेत. ही रूपककथा अत्यंत जिवंत, वास्तववादी आणि नाट्यमय झाली आहे. या ग्रंथाने सामान्यांच्या जीवनाशी जवळचे नाते जोडले. वरील गुणांमुळे ही रूपककथा एक प्रकारे अठराव्या शतकात बहराला आलेल्या कादंबरीची पूर्वसूचक ठरते. बन्यनची वृत्ती प्यूरिटन काळाला जवळची असली, तरी त्याचे लेखन रेस्टोरेशन काळात झाले. त्याच्या लेखनात सत्यान्वेषी ऋजुता, नीतिमूल्यांबाबत पराकाष्ठेची तळमळ इ. ह्या काळात उठून दिसणारे गुण दिसतात.
गद्याचा उपयोग रोजनिशा लिहिण्यासाठीही करण्यात आला ⇨सॅम्युएल पेपिस (१६३३–१७०३) व जॉन ईव्हलिन (१६२०–१७०६) ह्यांच्या रोजनिशांचा उपयोग गद्यशैलीला स्थिर, सुगम, सरळ रूप देण्यासाठी झाला.
गद्यशैलीत जे गुण ठरले, त्यांचाच उपयोग काव्यात करण्यात आला. परंतु त्यामुळे काव्याला एख प्रकारची मर्यादा पडली. ठराविक काव्यात्म शब्दयोजनेला महत्त्व आले. टीकात्मक, विडंबनपर व उपहासपर काव्याला ह्या काळात उधाण आले. व्यक्तिगत दोषांवर, शारीरिक व्यंगांवर अथवा खाजगी कुलंगड्यांवर काव्यमाध्यमाच्या द्वारा प्रच्छन्न वा उघड टीका करण्याची वृत्ती बळावली. तरल, सूक्ष्म भावनाविष्कारापेक्षा रोखठोकपणा व व्यवहारवाद काव्यात येऊ लागला. गद्याप्रमाणे काव्यशैली सफाईदार होऊन अभिजात स्वरूपात प्रकट होऊ लागली. तीत सूक्ष्मतेचा अभाव असला, तरी बुद्धीची चमक आहे. काव्यार्थ स्पष्टपणे मांडण्याची प्रवृत्ती आहे. ड्रायडनच्या रिलिजिओ लेसी (१६८२), द मेडल (१६८२), द हाइंड अँड द पँथर (१६८७) आणि विशेषत: अँब्सलम अँड ॲचिटोफेल (१६८१) ह्या रूपकात्मक राजकीय विडंबनकाव्यांत हे सर्व गुण प्रामुख्याने दिसतात. ⇨ सॅम्युएल बटलरच्या (१६१२–१६८०) ह्यूडिब्रॅस (३ भाग १६६३, १६६४, १६७८) ह्या काव्यात प्यूरिटन काळातील सोवळेपणा व कर्मठपणा ह्यांचे विदारक विडंबन दिसते. कवीची विनोदबुद्धी अत्यंत तीव्र असून त्याची शैली धारदार व मर्मभेदी आहे. ह्या काळात भावकाव्याला ओहोटी लागली व उपहास विडंबनपर बौद्धिक काव्याला महत्त्व आले, ते प्रामुख्याने ह्या दोन प्रमुख कवींच्या उपहास विडंबनपर काव्यामुळे.
रेस्टोरेशन काळातील नाट्यवाङ्मयात तीन प्रकार आढळतात. धीरोदात्त नायक आणि त्यांची वीरवृत्ती यांवर आधरलेली ‘हिरोइक’ नाटके हा एक, स्वभावातील तर्हेवाईकपणावरील नाटके (कॉमेडी ऑफ मॅनर्स किंवा आचारविनोदिनी ) हा दुसरा आणि सामाजिक रीतिरिवाजांवर अधिष्ठित असलेली नाटके हा तिसरा. जो संयम गद्यपद्यात दिसतो, तो हिरोइक नाटकांत दिसून येत नाही. उलट अत्यंत भडक, अतिरेकी अशा प्रसंगांची रेलचेल दिसते. भावना आत्यंतिक टोकाला नेऊन भिडवण्याचा प्रयत्न दिसतो. संवादामध्ये दर्पोक्ती व अतिशयोक्ती यांचा सुकाळ आढळतो. ह्यांतील ‘हिरोइक कप्लेट’ ही यमकबद्ध रचना ड्रायडनने टिरॅनिक लव्ह (१६६९), काँक्वेस्ट ऑफ ग्रानाडा (१६७०) व औरंगजेब (१६७६) ह्या नाटकांतून रूढ केली. ही शैली पुढे अँटनी आणि क्लीओपात्रा ह्यांच्या कथेवर आधारेलल्या ऑल फॉर लव्ह (१६७८) ह्या नाटकात ड्रायडनने सोडली व पुन्हा निर्यमक छंदाचा आश्रय घेतला.
आचारविनोदिनी म्हणजे सामाजिक चालीरीतींवर व आचारांवर आधारलेली विनोदप्रधान नाटके. ह्या काळातील हा एक वैशिष्ट्यपूर्ण नाट्यप्रकार होय. प्यूरिटनांनी बंद केलेली नाट्यगृहे ह्या काळात पुन्हा उघडण्यात आली. तसेच स्त्रियांचा रंगभूमीवर प्रवेश झाला. परिणामतः नाट्य निर्बंधमुक्त स्वरूपात अवतरू लागले. आचारविनोदिनीचे प्रगत स्वरूप दर्शविणारी नाटके पुढीलप्रमाणे होत: ⇨ जॉर्ज एथारिजची (१६३५ ?–१६९२ ? ) द कॉमिकल रिव्हेंज किंवा लव्ह इन अ टब (१६६४), शी वुड इफ शी कुड (१६६८), सर फॉप्लिंग फ्लटर किंवा द मॅन ऑफ मोड (१६७६). टॉमस शॅडवेलची (१६४२ ?–१६९२) एप्सम वेल्स (१६७३), द स्क्वायर ऑफ ॲल्सेशिया (१६८८) आणि बेरी फेअर (१६८९). ⇨ विल्यम विचर्लीची (१६४०–१७१६) लव्ह इन अ वुड (१६७२), द जंटलमन डान्सिंग मास्टर (१६७३), द कंट्री वाइफ (१६७५),द प्लेन डीलर (१६७७). ⇨ विल्यम काँग्रीव्हची (१६७०–१७२९) द ओल्ड बॅचलर (१६९३), लव्ह फॉर लव्ह (१६९५) आणि द वे ऑफ द वर्ल्ड (१७००). आचारविनोदिनीच्या संदर्भात विचर्ली आणि काँग्रीव्ह ह्यांची कामगिरी विशेष मोलाची आहे.
वरील नाटकांतून स्त्रीपुरुषसंबंधांबाबत मोकळेपणा आढळतो. खटकेबाज संवादांना, बुद्धिगम्य विनोदाला, कोटिबाजपणाला महत्त्व आलेले आढळते. ह्यांतील काही नाटकांतील हीन अभिरुची जमेस धरूनही सुखात्मिकेला त्यांनी प्राप्त करून दिलेली लोकप्रियता व प्रतिष्ठा महत्त्वाची मानावी लागेल.
भागवत, अ. के.
अठरावे शतक : ह्या शतकातील इंग्रजी वाङ्मयेतिहासाचे स्थूलमानाने तीन कालखंड पडतात. १७०० ते १७४० हा ⇨अलेक्झांडर पोप (१६८८–१७४४) ह्या कवीचा कालखंड, १७४० ते १७७० हा साहित्यिक आणि टीकाकार ⇨सॅम्युएल जॉन्सन (१७०९–१७८४) ह्याच्या प्रभावाचा कालखंड आणि तिसरा १७७० ते १७९८ हा संक्रमणाचा कालखंड. ह्या शेवटल्या कालखंडातील इंग्रजी वाङ्मयात आगामी काळातील स्वच्छंदतावादी प्रवृत्तींचे दर्शन होऊ लागते.
पोपच्या कालखंडाला ‘ऑगस्टन युग’असेही म्हणतात. ऑगस्टस ह्या रोमन बादशाहाच्या कारकीर्दीचा काळ (इ. स. पू. २७–इ. स. १४) हा लॅटिन वाङ्मयाचा सुवर्णकाळ मानला जातो. ह्या काळातील व्हर्जिल ( ७०–१९ इ. स. पू.), हॉरिस (६५–८ इ. स. पू.), ऑव्हिड (इ. स. पू. ४३–इ. स. १८) इ. व त्या अगोदरच्या होमर, सिसेरो (१०६–४३ इ. स. पू.) ह्यांसारख्या प्राचीन साहित्यिकांचा आदर्श पोपच्या कालखंडातील साहित्यिकांपुढे होता. त्या कालखंडातील साहित्यिक दृष्टिकोण, परंपरा व व्यवहार ह्यांना जॉन्सनच्या कालखंडात बळकटी आणि स्थैर्य प्राप्त झाले. प्राचीन अभिजात वाङ्मयातील संयम, रचनेचा रेखीवपणा, शब्दांचा नेटका उपयोग, शब्दालंकार आणि अर्थालंकार ह्यांचा उपयोग नियमबद्धता आणि सांकेतिकता तसेच उपरोध, उपहास आणि विडंबन ह्यांचा खंडनमंडनासाठी उपयोग ह्यांचा प्रभाव पडून त्याच नमुन्यावर वाङ्मय निर्माण होऊ लागले. ह्या प्रवृत्तीला नव-अभिजाततावाद असे नाव पडले.
इंग्लंडात १६८८ साली जी राज्यक्रांती झाली ती केवळ राजकीय क्रांती नव्हती, तर तो एका सामाजिक आणि वैचारिक क्रांतीचा आरंभ होता. सतराव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात ज्या साहित्यिक आणि वैचारिक प्रवृत्तींचा उगम झालेला होता, त्यांनाच पुढल्या शतकात अधिक गती अली आणि त्या निरनिराळ्या रूपांनी प्रकट झाल्या म्हणून ह्या शतकातील सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक आणि वैचारिक घडामोडी समजून घेणे वाङ्मयीन प्रवृत्तींच्या आकलनाला उपकारक ठरेल.
स्ट्यूअर्ट राजा दुसरा जेम्स ह्याला १६८८ साली इंग्लंडच्या सिंहासनावरून काढून विल्यम ऑफ ऑरेंजला तिथे बसविण्याची जी राज्यक्रांती झाली, ती जुना सरंजामदार-जमीनदार वर्ग (टोरी) आणि व्यापार-उद्योग ह्यांमुळे संपन्न झालेला नवा धनिक वर्ग (व्हिग) ह्या दोन वर्गांच्या सहकार्याने झाली. ह्या राज्यक्रांतीमुळे राजसत्ता ईश्वरदत्त असते, ह्या कल्पनेला तडा गेला. पार्लमेंट सार्वभौम झाले. इंग्लंड हे लोकशाहीनिष्ठ राष्ट्र झाले. राजकारणात द्विपक्षीय पद्धतीला महत्त्व आले. ह्या नव्या धनिक वर्गाने राज्यक्रांतीत जुन्या सरंजामदार वर्गाशी सहकार्य केले असले, तरी सत्तेच्या राजकारणात तो जुन्या सरंजामदार-जमीनदार वर्गाचा प्रतिस्पर्धी होता. हा वर्ग मुख्यतः शहरी आणि व्यापारी होता, पण आपल्या संपत्तीच्या बळावर तो जमीनदारही होऊ लागला होता. समाजव्यवस्थेत त्याला मानाचे आणि अधिकाराचे स्थान मिळू लागले होते. त्यामुळे खानदानी चालीरीती शिकण्याची आणि आपली अभिरुची सूक्ष्म व सुसंस्कृत करण्याची गरज त्याला वाटू लागली होती. हा वर्ग धार्मिक बाबतीत प्यूरिटन होता, बंडखोर होता, स्वातंत्र्यवादी होता. आपल्या विचारांचा प्रसार करण्याची त्याला आवश्यकता वाटत होती. त्यासाठी शिक्षणाचा प्रसार, सामाजिक तसेच आर्थिक संघर्ष करण्याची व वाङ्मय निर्माण करण्याची आवश्यकता होती. ह्या साऱ्या आकांक्षा पुऱ्या करण्याचा प्रयत्न ह्या शतकाच्या वाङ्मयात दिसतो. नव्याजुन्या राजकीय, सामाजिक, धार्मिक विचारांचा संघर्ष, ग्रामीण भागातील जमीनदारीनिष्ठ आर्थिक हितसंबंध आणि शहरी भागातील व्यापार उद्योगनिष्ठ आर्थिक हितसंबंध ह्यांतील संघर्ष, व्यक्तिव्यक्तींत सभ्यता आणण्याचे प्रयत्न इ. विशेष ह्या काळातील साहित्यात दिसतात.
ग्रामीण भागातील जमीनदार वर्ग नवीन शास्त्रीय शोधांच्या साहाय्याने आपली शेती सुधारू लागला. खुल्या शेताऐवजी त्यात कुंपण घालून नव्या पद्धतीने तो शेती करू लागल्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढले. वरकस जमीन लागवडीखाली आली आणि पिढीजाद जमीनदार वर्ग अधिक संपन्न झाला. त्याबरोबरच नवीन व्यापारी भांडवलदार वर्गही जमीन खरेदी करून जमीनदार होऊ लागला. मात्र अशा रीतीने जुना सरंजामी जमीनदार आणि नवा भांडवलदार जमीनदार हे वर्ग एकमेकांत मिसळले आणि एक प्रकारच्या संयमाची, सामंजस्याची सामाजिक गरज निर्माण झाली. ह्या शतकातील वाङ्मयात ह्या बाबींवरही भर दिलेला दिसून येतो.
शेतीच्या नव्या पद्धतीमुळे अनेक शेतमजूर जमिनीवरून हाकलले गेले. खेड्यातील परंपरागत जीवन उद्ध्वस्त झाले. हजारो भूमिहीन मजुरांची शहराकडे रीघ लागली. शहरात नवे कारखाने निघत होते. त्यांना कामगारांची मोठ्या प्रमाणात गरज होती. त्यांना हे भूमिहीन लोक कामगार म्हणून मिळाले पण ह्या कामगारांना अत्यंत निर्घृणपणे वागवले जात असे. त्यांना चरितार्थाचे साधन मिळाले पण जीवनातला रस गेला. शिवाय सगळ्यांनाच कामे मिळाली नाहीत. ज्यांना मिळाली नाहीत, त्यांपैकी कोणी भटक्याचे जीवन जगू लागले, कोणी चोरी, दरोडेखोरी करू लागले. ह्या सामाजिक उलथापालथीचे प्रतिबिंबही ह्या शतकातील वाङ्मयात पडले आहे.
अमेरिकेतील वसाहतीतून आणि हिंदुस्थानातून संपत्तीचे ओघ इंग्लंडकडे वाहत होते. इंग्लंडच्या इतिहासात हे शतक समृद्धीचे व उत्कर्षाचे होते. ह्याचाच परिणाम म्हणून ज्यांना रिकामपण आहे, असा एक वर्ग समाजात अस्तित्वात आला होता. विशेषतः संपन्न स्थितीतील स्त्रिया त्यात होत्या. शिवाय शिक्षणाच्या प्रसारामुळे सामान्यजनातही वाचकवर्गाची वाढ होत होती. ह्या वाचकांत विविध थरांतील लोक होते आणि त्यांना विविध प्रकारचा वाचनीय मजकूर हवा होता. कोणाला करमणूक हवी होती, कोणाला माहिती, कोणाला धर्मपरनीतिपर उपदेश, कोणाला धार्मिक, राजकीय, सामाजिक मतांची चर्चा, कोणाला कौटुंबिक जिव्हाळ्याच्या भावनाप्रधान गोष्टी, तर कोणाला धाडसाच्या. थोडक्यात, नाना प्रकारच्या गद्यलेखनाला अनुकूल अशी परिस्थिती ह्या शतकात निर्माण झाली होती. एक नाटक सोडले, तर इतर बहुतेक सर्व गद्य साहित्यप्रकारांना ह्या शतकात बहर आला. कादंबरी आणि ललित तसेच सामान्य विषयांवरील चर्चात्मक निबंधाचा पाया ह्या शतकात घातला गेला. साहित्यसमीक्षा अधिक पद्धतशीरपणे आणि काही महत्त्वांच्या अनुरोधाने होऊ लागली. रेस्टोरेशन काळात ड्रायडनने तिचा पाया घातला होताच. ह्या शतकात डॉ. जॉन्सनच्या विद्वत्तापूर्ण टीकालेखनाने समीक्षेला विशेष प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. प्राचीन ग्रीक आणि लॅटिन साहित्यकृतींची भाषांतरे झाली. शेक्सपिअरच्या नाटकांच्या आवृत्त्या निघाल्या. त्यांचे नव्याने मूल्यमापन होऊ लागले. असे सर्वांगांनी साहित्य बहरले.
लेखकांना इतरही मार्गांनी प्रोत्साहन मिळाले. टोरी आणि व्हिग अशा दोन्ही पक्षांच्या संपन्न पुढाऱ्यांना आपापल्या मतांचा आणि विचारसरणींचा प्रसार करण्यासाठी समर्थ लेखकांची आवश्यकता जाणवू लागली. ते आपापल्या मतांच्या आणि विचारसरणीच्या लेखकांना आश्रय देऊन त्यांच्याकडून वाङ्मयनिर्मिती करून घेऊ लागले. अठराव्या शतकाच्या प्रथमार्धात अनेक प्रमुख लेखकांनी अशा आश्रयाखाली लेखन केले.
जसजशी वाचकवर्गाच्या संख्येत वाढ होत गेली, तसतसा पुस्तक प्रकाशनाचा धंदा फायदेशीर होऊ लागला. त्यांच्याकडून प्रतिष्ठित, प्रभावी आणि लोकप्रिय लेखकांना पैसा मिळू लागला आणि एखाद्या धनिकाचा आश्रय घेण्याची लेखकांना गरज उरली नाही. लेखनाचा व्यवसाय भरभराटीला आला, तशी लेखकांच्या संख्येत वाढ झाली आणि परिणामी कधीकधी चांगल्या लेखकांनादेखील पैसा मिळेनासा झाला. डॉ. जॉन्सन आणि ऑलिव्हर गोल्डस्मिथ ह्यांच्यासारख्या लेखकांनासुद्धा कर्जबाजारी आणि अकिंचन स्थितीत दिवस काढावे लागले.
उद्योगधंदे आणि व्यापार ह्यांच्या भरभराटीमुळे शहरांची वाढ झाली. लंडन हे नुसते राजकीय उलाढालींचेच केंद्र राहिले नाही, तर ते साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळींचे केंद्र बनले. लंडनमधल्या कॉफीगृहांना लंडनच्या बौद्धिक जीवनात महत्त्वाचे स्थान मिळाले. सुशिक्षित, सुखवस्तू लोक, मोठमोठे साहित्यिक आणि कलावंत कॉफीगृहांत जमून गंभीर विषयांवर चर्चा करीत. लेखक-कलावंतांचा आणि सामान्य जनतेचा साक्षात संबंध येत असे. त्यामुळे ह्या शतकातील वाङ्मयात तात्त्विक चर्चेप्रमाणे सामान्य माणसाच्या गरजा, त्याच्या आशाआकांक्षा आणि त्याचे जीवन ह्यांचेही चित्रण झालेले दिसते.
सतराव्या शतकात फ्रान्सिस बेकनने विगमनवादी तर्कपद्धतीचा अवलंब करून शास्त्रशुद्ध विचारसरणीचा पाया घातला. पुढील काळात शास्त्रीय शोधांमुळे आणि सिद्धांतांमुळे भौतिक विश्वासंबंधी नवा दृष्टिकोण प्राप्त झाला होता. सबंध सृष्टीचा व्यवहार काही निश्चित नियमांनुसार चालला आहे ह्या नियमांचे अधिष्ठान नैतिक स्वरूपाचे आहे हे नियम ओळखून आपले वैयक्तिक आणि सामाजिक जीवन त्यांनुसार आखणे हे मानवी बुद्धीचे कार्य आहे ही विचारसरणी प्रभावी झाली. त्यामुळे ईश्वरा-वरील श्रद्धा आणि शास्त्रीय बुद्धिवादी विचारसरणी ह्यांची सांगड घातली गेली. श्रद्धा आणि बुद्धी ह्यांच्या सरहद्दी कुठे मिळतात आणि त्यांच्यात विरोध कुठे येतो, ह्यांचा शोध तत्त्वज्ञानात्मक वाङ्मयात घेतला गेला.
नवा मध्यम वर्ग कडक धर्मनिष्ठ होता पण धार्मिक बाबतींत वैयक्तिक स्वातंत्र्यवादी होता. १६८८ च्या राज्यक्रांतीला साहाय्य करण्यात त्याचा उद्देश इंग्लंडच्या राजकारणात कॅथलिक पंथाचे आणि पर्यायाने पोपचे वर्चस्व पुन्हा येण्याची शक्यताच नाहीशी करावी, हा होता. म्हणूनच इंग्लंडच्या सिंहासनावर येणारी व्यक्ती प्रॉटेस्टंटच असावी, असा कायदाच करण्यात आला. हा नवा मध्यम वर्ग व्यापार-उद्योगात गुंतलेला होता. व्यापारउद्योग यशस्वीपणे करण्यासाठी एक प्रकारची व्यावहारिक नीतिमत्ता, परस्परविश्वास, प्रामाणिकपणा, सभ्यता असावी लागते. ती नीतिमत्ता ज्यामुळे अंगी बाणेल असे व्यवहारवादी शिक्षण आणि वाङ्मय ह्या समाजाला हवे होते व तसे ते निर्माण होत होते.
परंतु ही व्यापारी-व्यवहारवादी नीती, सज्जनता, सभ्यता पुष्कळदा ढोंगाला कारण होते आणि तसे तेथेही होत होते. सभ्यता, सुसंस्कृतता ह्यांना महत्त्व देणारा हा वर्ग आपल्या कारखान्यांत, उद्योगधंद्यांत कामगारांना फार वाईट रीतीने वागवी. त्यांच्याशी वागताना नीतीची चाड बाळगीत नसे. हा दुटप्पीपणाही ह्या शतकातील साहित्यात व्यक्त झाला आणि हे ढोंग उघडे केले गेले.
बुद्धिवादी शास्त्रशुद्ध दृष्टिकोणाला कितीही महत्त्व असले, तरी मानवी संबंध आणि सामाजिक व्यवहार निव्वळ बुद्धिवादावर चालत नाहीत. अंत:प्रेरणा, जिव्हाळा, सहानुभूती, माणुसकीचा ओलावा ह्यांमुळेही मानवाचे कौटुंबिक आणि सामाजिक जीवन प्रेरित होते. सामान्य वाचकाला बुद्धिवादी विचारप्रधान वाङ्मयाप्रमाणेच, किंबहुना अधिकच, उत्कट भावनांचे दर्शन घडविणारे वाङ्मय हवे असते. साहजिकच भावनाप्रधान साहित्यही लिहिले गेले. अर्थात भावनोत्कटतेचे पर्यवसान पुष्कळदा भावाकुलतेत, भावनाविवशतेत आणि खोट्या भावनाप्रदर्शनात होते, तसेही झाले.
एकीकडे निर्जीव, संकेतबद्ध नव-अभिजाततावाद आणि दुसरीकडे भावनातिरेक ह्यांमुळे जीवनातील साध्या साध्या घटनांकडे मुक्तपणे पाहणे, कल्पनाशक्तीने त्यांचे अंतरंग जाणणे अशक्य होते. पण लेडी विंचिल्सी (१६६१–१७२०) हिच्या काही कवितांत ही मुक्त, सहज प्रवृत्ती दिसते. तसेच ⇨ राबर्ट बर्न्सच्या (१७५९–१७९६) कवितेत आत्माभिमुखता, संवेदनक्षमता, निसर्गप्रेम आणि उत्कट कल्पनाशक्ती ही स्वच्छंदतावादाची वैशिष्ट्ये दिसून येतात आणि विल्यम ब्लेकच्या काव्यात तर ती अधिक प्रकर्षाने दिसून येतात.
ह्या शतकाच्या शेवटच्या तीस वर्षांत पूर्वोक्त वाङ्मयीन प्रवृत्ती मागे पडून स्वच्छंदतावादाकडे जाणाऱ्या नवीन प्रवृत्ती दिसून येऊ लागल्या. ह्या सबंध शतकातील वाङ्मयीन प्रवृत्तीच्या आतापर्यंत केलेल्या स्थूल विवेचनाच्या आधारे आता अठराव्या शतकातील नियतकालिके, पुस्तपत्रे, इतिहासलेखन, पत्रलेखन, चरित्र, काव्य, नाटक, कादंबरी, समीक्षा इत्यादींचा परामर्श घेता येईल.
नियतकालिके : १६९५ साली ‘लायसेन्सिंग ॲक्ट’ नावाचा वृत्तपत्रे व इतर लेखन ह्यांवर जाचक निर्बंध घालणारा कायदा रद्द झाला व इंग्लंडमध्ये मुद्रणस्वातंत्र्याची व लेखनस्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. जीवनाच्या विविध पैलूंवर निर्भयपणे व चिकित्सकपणे भाष्य करण्याचा मार्ग खुला झाला. १७०९ साली लेखाधिकाराचा कायदा किंवा ‘कॉपी राइट ॲक्ट’ मंजूर झाला. त्यामुळे लेखकाचे त्याच्या लेखनावरचे हक्क प्रस्थापित झाले. ग्रंथलेखन आणि ग्रंथप्रकाशन ह्यांना उत्तेजन मिळाले. ह्या शतकात नवनवीन नियतकालिके निघत गेली. डीफोचे द रिव्ह्यू (१७०४), स्टीलचे द टॅटलर (१७०९), स्टील आणि ॲडिसन ह्यांनी चालविलेले द स्पेक्टेटर (१७११), जॉन्सनचे द रँब्लर (१७५०-१७५२), गोल्डस्मिथचे द बी (१७५९) इत्यादींनी सामान्य वाचकांपर्यंत विविध विचार नेऊन पोचविण्याचे कार्य चोखपण केले. केवळ वाङ्मयीन समीक्षेला वाहिलेली द मंथली रिव्ह्यू (१७४९–१८४५) व द क्रिटिकल रिव्ह्यू (१७५६–१८१७) ह्यांसारखीही नियतकालिके होती. नियतकालिकांनी जोपासलेला महत्त्वाचा वाङ्मयप्रकार म्हणजे ‘पिरिऑडिकल एसे’ किंवा नियतकालिक निबंध. ⇨जोसेफ ॲडिसन (१६७२–१७१९) आणि ⇨ रिचर्ड स्टील (१६७२–१७२९) हे ह्या शतकाच्या सुरुवातीचे प्रमुख निबंधकार.
इंग्लंडमधला सरदार-जमीनदार वर्ग हा सुसंस्कृत, अभिरुचिसंपन्न आणि नौतिक दृष्ट्या शिक्षित झालेला होता. सत्ता आणि संपत्ती ह्या दोन्ही बाबतींत ग्रामीण भागातील गर्भश्रीमंत जमीनदारांच्या बरोबरीला येत चाललेला नवा व्यापारी मध्यम वर्ग नैतिक दृष्ट्या कठोर होता पण खानदानी चालीरीती, वागण्याबोलण्याची सभ्यता, कला, साहित्य इत्यादींची अभिरुची ह्यांचा त्याच्यामध्ये अभाव होता. ह्या दोन वर्गांत समन्वय घडवून आणणे हा ॲडिसन आणि स्टील ह्या दोघांचाही उद्देश होता तसेच झपाट्याने वाढत चाललेल्या सामान्य वाचकवर्गाला बहुश्रुत करणे आणि त्यांच्या अभिरुचीला वळण लावणेही आवश्यक होते. ॲडिसन आणि स्टील ह्या दोघांच्या मन:प्रवृत्ती भिन्न, पण परस्परांना पूरक होत्या. स्टीलच्या लेखनात अधिक उत्स्फूर्तता, कल्पकता, संवेदनशीलता असे. कौटुंबिक जिव्हाळा, भावनात्मकता आणि सहानुभूती ह्यांवर त्याचा भर असे पण त्याच्या लेखनात त्यामुळेच शैथिल्य येत असे आणि भावनात्मक अतिरेक होत असे. ह्याच्या उलट ॲडिसनमध्ये शिस्त, संयम, समतोलपणा, रेखीवपणा आणि गांभीर्य असे. प्राचीन अभिजात साहित्यात तो मुरलेला होता. सूक्ष्म अवलोकन, विश्लेषण, समजूतदारपणातून आलेली सहानुभूती त्याच्या निबंधांत दिसते. पण ह्या दोघांच्याही लेखनाने इंग्रजी गद्यलेखनशैलीचा पाया तर घातलाच, पण ‘सभ्य गृहस्था’चा आदर्श निर्माण करून मध्यमवर्गीय इंग्रजांच्या अभिरुचीला जवळजवळ कायमचे वळण लावले. सत्प्रवृत्त, सधन, जमीनदार वर्गाचा प्रतिनिधी सर रॉजर डी. कॉवुर्ली आणि धनिक व्यापारी वर्गाचा प्रतिनिधी सर अँड्रू फ्रीपोर्ट हे स्पेक्टेटरमधले दोन सद्गृहस्थ इंग्रजी साहित्यात चिरंजीव झाले आहेत.
ऑलिव्हर गोल्डस्मिथच्या (१७३०–१७७४) शैलीत प्रसन्नता व टवटवीतपणा आहे. त्याची विनोदबुद्धी अव्वल दर्जाची व सूक्ष्म आहे. द सिटिझन ऑफ द वर्ल्डमध्ये ⇨गोल्डस्मिथने इंग्लंडच्या जीवनावर एका चिनी प्रवाशाच्या दृष्टिकोणातून भाष्य केले आहे (१७६२). गोल्डस्मिथने व ह्या शतकाच्या उत्तरार्धातील इतर निबंधकारांनी नियतकालिक निबंधाला ललित स्वरूप प्राप्त करून दिले. त्याच प्रवृत्तीतून पुढे स्वच्छंदतावादी युगात आजच्या ललित निबंधाचा अवतार झाला.
पुस्तपत्रे: नियतकालिकांत प्रसिद्ध होणाऱ्या विविध लेखांखेरीज पुस्तपत्रांतून (पँफ्लेट्स) काही तात्कालिक महत्त्वाच्या विषयांवर प्रसंगोपात्त लिखाणही मोठ्या प्रमाणावर झाले. राजकारणात सबंध शतकभर व्हिग व टोरी या दोन प्रमुख राजकीय पक्षांचा अविरत झगडा चालू होता. व्हिग पक्ष हा पार्लमेंटचा व नियंत्रत राजसत्तेचा पुरस्कर्ता, तर टोरी पक्ष हा जुन्या स्ट्यूअर्ट घराण्याचा पक्षपाती. धार्मिक व सामाजिक क्षेत्रांतही निरनिराळे वाद अटीतटीने व हिरिरीने खेळले गेले. त्यांत उपहास, उपरोध, विडंबन वगैरे सर्व अस्त्रे कौशल्याने वापरण्यात येत. राजद्रोहाच्या आरोपाचे किंवा अन्य रोषाचे बळी व्हावे लागू नये म्हणून प्रतीककथा, रूपके, कृत्रिम परंतु स्वभावदर्शक व आचारनिदर्शक नावे प्रतिस्पर्ध्यांना देणे यांसारखे उपाय उपयोगात आणले गेले. हे वाद पुस्तपत्रांच्या रूपात प्रसिद्ध होत. त्यांचे लेखक पुष्कळदा टोपणनावे घेत.
या संदर्भात ⇨ जॉनाथन स्विफ्टचे (१६६७–१७४५) नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. त्याने आलटून पालटून दोन्ही राजकीय पक्षांच्या वतीने लेखणी चालविली.
काव्य : अठराव्या शतकाची प्रमुख प्रवृत्ती बुद्धिवादी होती. प्राचीन अभिजात वाङ्मय हा साहित्याचा आदर्श होता. ही गोष्ट काव्याच्या क्षेत्रातही दिसून येते. कवीच्या स्वत:च्या भावभावनांना त्यात महत्त्व नव्हते, तर सर्वसामान्यपणे माणूस आणि त्याचे व्यवहार ह्यांना होते. सर्जनशील भावना, कल्पनाशक्ती किंवा उन्मेषशालिनी प्रतिभा ही ह्या शतकातील काव्याची प्रेरणा नसून एखाद्या विचाराची वा कल्पनेची रेखीव मांडणी करणे, ही होती. ह्या शतकातले काव्य म्हणजे प्रामुख्याने अभिजात साहित्यातल्या आदर्शांनुसार किंवा अभिजात साहित्यातील संकेतांनुसार शब्द, अलंकार, वृत्ते ह्यांची योजना करून केलेली पद्यरचना आहे. गद्याप्रमाणेच पद्याचाही उपयोग राजकीय आणि धार्मिक मतांच्या खंडनमंडनासाठी तसेच नैतिक, सामाजिक किंवा वैश्विक विचारांच्या प्रतिपादनासाठी केला गेला. गद्याप्रमाणेच काव्यातही उपहास, उपरोध, विडंबन इ. शस्त्रांचा उपयोग करण्यात आला. साहजिकच भावनांचा विलास किंवा काव्यप्रतिभेची झेप त्यात क्वचितच दिसते आणि कृत्रिमपणा अधिक जाणवतो पण विचारविलास, शब्दयोजनेचे चातुर्य, रचनेची सफाई, घाटाचा बांधेसूदपणा आणि सुभाषितवजा वचने इ. गुणांमुळे उच्च दर्जाचा काव्यगुण नसूनही हे काव्य मनावर छाप पाडते. नवअभिजाततावादाच्या प्रभावामुळे ह्या शतकात प्राचीन ग्रीकलॅटिन महाकाव्यांची भाषांतरे झाली. त्या काव्यांच्या धर्तीवर काही स्फुट काव्ये व दीर्घकाव्ये रचिली गेली. १७६० पर्यंतच्या काळात प्राचीन श्रेष्ठ वाङ्मयीन कृतींची बरीच भाषांतरे झाली. त्यांना लोकप्रियता लाभली आणि भाषांतरकारांना प्रतिष्ठा आणि पैसा मिळाला.
ह्या शतकाच्या पूर्वार्धातील सर्वांत मोठा आणि प्रभावी कवी अलेक्झांडर पोप हा होय. हे युग पोपचे युग म्हणूनच ओळखले जाते. स्फुट काव्य, दीर्घकाव्य, खंडकाव्य, विडंबनकाव्य, तत्त्वचिंतनपर काव्य अशी अनेक प्रकारची काव्यरचना त्याने केली. होमरच्या महाकाव्यांची भाषांतरे केली आणि हॉरिसच्या धर्तीवर उपरोधपर काव्य लिहिले. श्रुतयोजन, रचनेची सफाई, सूक्ष्म आणि टोकदार उपरोध, सुभाषितवजा वचने, प्रवचनकाराची आणि निर्णयकाराची भूमिका ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. पास्टोरल्समध्ये (१७०९) त्याने मेंढपाळांचे जीवन चित्रित करण्याच्या निमित्ताने तत्कालीन जीवनावर भाष्य केले आहे. व्हर्जिलच्या धर्तीवर रचिलेल्या ह्या कवितांत सहजता आणि कृत्रिमता ह्यांचा परिणामकारक मिलाफ झाला आहे. एसे ऑन क्रिटिसिझममध्ये (१७११) त्याने काव्यरचना आणि काव्यसमीक्षा ह्यांसंबंधींचे अभिजात आदर्श आणि संकेत ह्यांवर आधारलेले विचार मांडले आहेत. विंडसर फॉरेस्टमध्ये (१७१३) वातावरणाचा ताजेपणा आणि निसर्गाविषयी प्रेम दिसून येते. रेप ऑफ द लॉकमध्ये (१७१४) महाकाव्याच्या तंत्राचे विडंबन केलेले आहे. एसे ऑन मॅनमध्ये (१७३३–३४) त्याने आपले ईश्वरविषयक विचार मांडले. खरेखुरे तत्त्वचिंतनपर काव्य कसे असू शकेल, ह्याचे हे काव्य नमुना आहे. त्या काळातील धार्मिकराजकीय वाद आणि पोपचा स्वभाव ह्यांमुळे त्याचे अनेकांशी वाङ्मयीन खटके उडाले. अनेकांशी शत्रुत्व आले. त्याच्या डन्सियड (४ खंड, १७२८–१७४३) ह्या काव्यात अनेक समकालीनांवर हल्ले आहेत.
ह्या काळात छोट्याछोट्या भावकविताही लिहिल्या गेल्या पण त्यांचे स्वरूप एकंदरीने गद्यच आहे. त्यांत भावनांची उत्कटता बेताचीच आहे पण त्या वाचनीय वाटाव्यात इतपत भाषासौष्ठव आणि रचनागुण त्यांत आहेत.
अनेक फुटकळ वाङ्मयप्रकारही ह्या काळात लोकप्रिय होते. उदा., ⇨ जॉन गेची (१६८५–१७३२) बेगर्स ऑपेरा (१७२८) ही संगीतिका, जेम्स टॉमसनच्या (१७००–१७४८) ‘रूल ब्रिटानिया’सारखी देशभक्तिपर गीते, गोल्डस्मिथचे विनोदी ‘एलेजी ऑन ए मॅड डॉग’ इत्यादी.
टीकात्मक व उपरोधपूर्ण काव्यही विपुल लिहिले गेले. पोपच्या द रेप ऑफ द लॉकचा उल्लेख वर आलेलाच आहे. काँग्रीव्ह, पोप, स्विफ्ट, गे वगैरेंनी ‘स्क्राय्ब्लेरस क्लब’ नावाचे मंडळ स्थापन केले होते (सु. १७१३). ह्या मंडळाच्या सभासदांनी विद्वत्तेच्या बडेजावावर उपरोधपूर्ण काव्ये व गद्य लिहिले. ‘स्क्राय्ब्लेरस’ ही काल्पनिक व्यक्ती त्यासाठी निर्माण केली गेली व वरीलपैकी काहींनी त्या नावाने लिहिले. मिसेलेनी (३ भाग) हे ह्या टीकात्मक कवितांच्या संग्रहाचे नाव. स्विफ्टच्या ‘ऑन द डेथ ऑफ डॉ. स्विफ्ट’ (१७३१) व ‘मिसेस हॅरिएट्स पिटिशन’ ह्या दोन कवितांत उपहास, कडवटपणा, संताप, जीवनाचे सूक्ष्म ज्ञान इत्यादींचे एक चमत्कारिक मिश्रण झाले आहे.
पोप-जॉन्सन युगातील आणखी एक लोकप्रिय काव्यप्रकार चिंतनपर व चर्चात्मक काव्याचा. यात कवी स्वताची मते, विचार, अनुभव, निरीक्षण इत्यादींवर भाष्य करतो. तसेच उपरोधपर काव्यापेक्षा हा प्रकार वेगळा आहे. त्याचप्रमाणे आत्मलक्षी असूनही तो भावकवितेपासून अलग पडतो. ह्या प्रकाराचा जनक प्राचीन कवी हॉरिस. त्याच्या काव्यातील सुवर्णमध्यवादी दृष्टिकोण, जीवनासंबंधीचा परिपक्व नैतिक दृष्टिकोण स्नेहभावाचे महत्त्व, सुसंस्कृत व सभ्य माणसाच्या जीवनातील निर्व्याज सुखाची भलावण इ. विशेषांमुळे त्याला ह्या शतकात अनेक अनुयायी व भाषांतरकार मिळाले : ⇨ विल्यम कूपर (१७३१–१८००, द टास्क १७८५), जॉन डायर (१६९९–१७५८, ग्रोंजर हिल १७२६ व द फ्लीस १७५७), गोल्डस्मिथ (द ट्रॅव्हलर १७६४ व द डेझर्टेड व्हिलेज १७७०), ⇨ जेम्स टॉमसन (१७००–१७४८, द सीझन्स १७२६–१७३०), ⇨ विल्यम ब्लेक (१७५७–१८२७, साँग्ज ऑफ एक्स्पिरिअन्स १७९४ व साँग्ज ऑफ इनोसन्स १७८९), ⇨ टॉमस ग्रे (१७१६–१७७१, एलिजी इन अ कंट्री चर्चयार्ड १७५०), सॅम्युएल जॉन्सन (लंडन १७३८ व द व्हॅनिटी ऑफ ह्यूमन विशेस १७४९).
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात वाङ्मयात नवीन जाणिवा व्यक्त होऊ लागल्या. सांकेतिकतेकडून स्वाभाविकतेकडे होणारे संक्रमण ह्यात सूचित आहे. नव-अभिजाततावादी काव्यातील सांकेतिककेमुळे कवितांना साचेबंदपणा येत चालला होता. नकलेची नक्कल होऊन निर्जीवपणा आला होता. ह्या सांकेतिकतेमुळे जीवनाच्या फार मोठ्या भागाच्या आकलनाला आणि अनुभवाला आपण मुकत आहो, हे जाणवू लागले. सामान्य जीवनात आणि सामान्यांच्या जीवनातील नित्याच्या अनुभवांतदेखील नावीन्य, अद्भुतता ह्यांचा प्रत्यय येऊ शकतो, ह्याची जाणीव होऊ लागली. एका नव्या प्रवृत्तीची ही चाहूल होती. निसर्गवर्णनांतून नीतिमूल्ये जोपासणारे व निसर्गात निर्भेळ आनंद अनुभवणारे टॉमसनचे ‘द सीझन्स’ हे काव्य ह्या शतकाच्या पूर्वार्धातच लिहिले गेले होते. निसर्ग व मानव ह्यांचे घनिष्ठ संबंध आहेत, ही जाणीव त्यातून दिसते.
कवितांच्या वृत्तांमध्ये व विषयांमध्ये आता विविधता येऊ लागली. ⇨ जेम्स मॅक्फर्सनने (१७३६–१७९६) ओसियन ह्या मध्ययुगीन कवीच्या एका महाकाव्याचे इंग्रजी भाषांतर म्हणून ८ खंड प्रसिद्ध केले (१७६३). त्यात मॅक्फर्सनचे स्वत:चेच कवित्व जास्त होते आणि मूळ कवीच्या कवितांचा भाग थोडा होता. मात्र ह्या कविता लोकप्रिय झाल्या. ⇨ टॉमस चॅटरटननेही (१७५२–१७७०) स्वत:च्याच काव्याला मध्ययुगीन डूब देऊन ते अस्सल भासविण्याचा प्रयत्न केला.
पण ह्या कालखंडातील सर्वांत प्रभावी कवी म्हणजे रॉबर्ट बर्न्स आणि विल्यम ब्लेक. बर्न्स हा स्कॉटिश कवी होता. त्याची पुष्कळशी कविता स्कॉटिश भाषेत आहे. त्याच्या इंग्रजी कवितांत शब्दांचा नेमकेपणा, रचनेचा रेखीवपणा आणि संयम ह्यांबरोबरच साध्या साध्या घटनांसंबंधी एक उत्कट भावनाशील जाणीव दिसते. त्यातून दृष्टिकोणाचे, अनुभूतीचे, नाजूक सहानुभूतीचे नावीन्य प्रत्ययाला येते. त्याची काही कविता गेयही आहे.
ब्लेकच्या प्रतिभेची आणि कल्पनाशक्तीची झेप विलक्षण उंच आहे. जीवनाकडे आणि जगाकडे बालकाच्या सहज-सरल दृष्टीने पाहणे, त्याच वृत्तीने त्याचा अनुभव घेणे आणि त्याला प्रतिसाद देणे हे त्याच्या कवितेचे एक अंग आहे. त्याचबरोबर गूढ, आध्यात्मिक तत्त्वांचेही त्यात प्रतिबिंब आहे. प्रभावी प्रतिमा, अंत:करणाची पकड घेणारी भाषा, यथायोग्य वृत्तांची योजना आणि विलक्षण आत्मनिष्ठ वृत्ती ह्यांमुळे त्याचे काव्य खोल जाऊन मनाचा ठाव घेते. म्हणूनच बर्न्स आणि ब्लेक हे पुढे येणाऱ्या स्वच्छंदतावादी युगाचे अग्रदूत ठरतात. ह्या शतकातील एक महत्त्वाचा काव्यप्रकार म्हणजे ⇨ ओड किंवा उद्देशिका. पिंडर आणि हॉरिस ह्यांसारख्या प्राचीन ग्रीक-रोमन कवींनी पूर्णत्वास नेलेला हा काव्यप्रकार इंग्रज कवींनी हाताळला. टॉमस ग्रे (ऑन स्प्रिंग, ईटन कॉलेज, द बार्ड, प्रोग्रेस ऑफ पोएझी) आणि ⇨ विल्यम कॉलिंझ (१७२१–१७५९) हे प्रमुख उद्देशिकाकार. त्याच्या उद्देशिका रचना, अर्थ, विचारांचे गांभीर्य, समर्पक शब्दयोजना ह्या गुणांनी नटल्या आहेत. कॉलिंझची प्रतिभा फार तरल आहे. तो वर्ण्यविषयाच्या अंतरंगात फार खोलवर पाहू शकतो. उदा., ओड टू सिंप्लिसिटी, ओड टू ईव्हनिंग इत्यादी.
एकंदरीने अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात प्राचीन अभिजात वाङ्मयातील संकेतांच्या चौकटीत राहून काव्यनिर्मिती झाली, तर शेवटच्या चाळीस वर्षांत ही चौकट मोडून इंग्रजी काव्य स्वच्छंदतावादी युगाकडे वाटचाल करू लागले.
नाटक: सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी नाट्यवाङ्मयात ‘कॉमेडी ऑफ मॅनर्स’ किंवा आचारविनोदिनी व हिरोइक ट्रॅजेडी ह्या दोन प्रकारांचे वर्चस्व होते. पहिला नाट्यप्रकार सुखान्त असून त्यात मध्यमवर्गीय लोक आणि ग्रामीण चालीरीती व संस्कृती यांची भरपूर थट्टा करून प्रेक्षकांना हसविण्यात येई. हिरोईक ट्रॅजेडी हा दु:खान्त नाट्यप्रकार. ह्यात एक भव्य कथावस्तू घेऊन प्रेम व प्रतिष्ठा ह्याची प्रमाणाबाहेर महती गायलेली असे. ह्या प्रकारातील काव्य व भाषा ओढून ताणून ओजस्वी केलेली असे व तिच्यात कृत्रिम व भडक शब्दालंकारांची रेलचेल असे.
परंतु सतराव्या शतकाच्या शेवटी मध्यम वर्ग व्यापार-उदीम करून आर्थिक दृष्ट्या संपन्न झाला व त्याच्याकडे इंग्रजी समाजाचे नेतृत्व आले. हा समाज जीवनाकडे अत्यंत गंभीरपणे पाहणाऱ्या प्यूरिटन पंथाचा अनुयायी होता. ह्यामुळे वर उल्लेखिलेल्या दोन नाट्यप्रकारांविरुद्ध ह्या वर्गातून जोराची प्रतिक्रिया उमटली. तिचे प्रत्यंतर जेरेमी कॉलिअर (१६५०–१७२६) ह्या प्यूरिटन धर्मोपदेशकाच्या १६९८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या शॉर्ट व्ह्यू ऑफ द इम्मोरॅलिटी अँड प्रोफेननेस ऑफ द इंग्लिश स्टेज ह्या पुस्तिकेत मिळते. यात त्याने वरील दोन नाट्यप्रकारांविरुद्ध कडाडून टीका केली. त्याचा विशेष रोष काँग्रीव्ह आणि व्हॅनब्रू (१६६४–१७२६) ह्या नाटककारांवर होता. ह्या नाटकांतील अनैतिकतेला उत्तेजन देणाऱ्या कथावस्तू व पात्रचित्रण या दोषांवर त्याने बोट ठेवले. मध्यम वर्गाची जीवनदृष्टी या पुस्तिकेत उत्तम तऱ्हेने स्पष्ट झाली आहे. ही टीका खूप गाजली. अशा तऱ्हेची टीका व त्या टीकेतल्यासारखीच मते बाळगणारा, झपाट्याने बदलणारा इंग्रजी समाज नाटकाच्या उत्कर्षाला बाधक ठरला. या सामाजिक स्थित्यंतराशी नाटककारांनाही जुळवून घेता आले नाही. जुन्या नाटकांतली नव्या मध्यमवर्गीय नागरी समाजाची थट्टा आता खपण्यासारखी नव्हती. तद्वतच त्यांतील अवास्तवतेलाही आता वाव राहिला नव्हता.
ह्यामुळे जवळजवळ शतकभर चांगल्या नाट्यकृतींचे दुर्भिक्ष्यच जाणविले. मात्र रंगभूमी ओस पडली असे नाही. नाट्यव्यवसाय चालू होता. ह्या शतकात फार विख्यात नट आणि नट्या होऊन गेल्या. कॉली सिबर, जेम्स क्विन, चार्ल्स मॅक्लिन, डेव्हिड गॅरिक, ॲन ओल्डफील्ड, सेअरा सिडन्झ ही काही प्रख्यात नावे. ह्या नटनट्यांनी नव्या, त्याचप्रमाणे जुन्याही नाटकांत भूमिका केल्या. त्यांच्या अभिनयकौशल्यामुळे अत्यंत सामान्य नाटकांनीही या वेळची रंगभूमी गाजविली. शेक्सपिअरच्या नाटकांची लोकप्रियता या नटांमुळे वाढली.
ह्या कालखंडातील नाटकांना नटांच्या अभिनयकौशल्याला वाव देण्यापुरतेच महत्त्व आहे. काही ओजस्वी भाषणे व सनसनाटी प्रसंग रंगभूमीवर दाखवायला ह्या नाटकांनी संधी दिली. वाङ्मयीन मूल्यांच्या दृष्टीने ही नाटके टाकाऊच ठरली. त्यांत ओढूनताणून केलेल्या शाब्दिक कसरती व कृत्रिम संवाद आहेत. त्यांतील मनुष्यस्वभावाचे दिग्दर्शन बेताचेच असून रचना उगाचच गुंतागुंतीची केल्यासारखी वाटते. ह्या काळात करण्यात अलेल्या शेक्सपिअरच्या नाटकांवरही प्रथम ह्या वेळेच्या अभिरुचीला साजेसे संस्कार करण्यात आले. उदा., त्याच्या शोकात्मिकांना सुखात्मिकांची कलाटणी देण्याचे प्रयोग झाले.
मध्यम वर्गाने रंगभूमीवर बहिष्कार टाकल्यामुळे नाटकाला फक्त खालच्या वर्गातील प्रेक्षकांकडूनच आश्रय मिळाला. हे प्रेक्षक व नाटककंपनीचा व्यवस्थापक यांच्या कात्रीत ह्या वेळची रंगभूमी सापडली होती. व्यवस्थापकास प्रेक्षकांवर अवलंबून राहावे लागले. चटकन रिझविणारी हलकीफुलकी नाटके लिहिणारे नाटककार लोकप्रिय झाले व खरे प्रतिभावान लेखक नाट्यक्षेत्र सोडून कांदबरीकडे वळले.
मध्यम वर्गाच्या वर्चस्वामुळे त्याला रुचतील अशी नाटके लिहिण्याचा प्रयत्नही अनेकांनी केला. पण ह्याही तऱ्हेच्या नाटकांच्या रचनेचा एक साचा निर्माण झाला. उदा., ही नाटके बहुतांशी सुखान्त असत. पहिल्या चार अंकांत त्यांतील पात्रे सर्व तऱ्हेचा अनाचार व स्वैर वर्तन करताहेत, असे दाखवून शेवटच्या अंकात त्यांचे हृदयपरिवर्तन झाल्याचे दाखविण्यात येत असे. परंपरागत नीतिनियम व त्यांचे व्यावहारिक फायदे ह्यांवर अवास्तव भर देण्यात येत असे. अनीतिमान, दुष्ट माणसाचे पारिपत्य व सद्गुणी माणसाचा विजय हे नैतिक सूत्र पुष्कळ नाटकांत अनुस्यूत होते. ह्या नैतिक दृष्टिकोणाचा अतिरेक ह्या नाटकांना कलेच्या दृष्टीने मारकच ठरला.
अशा ह्या परिस्थितीत फारच थोडे नाटककार आपल्या वैशिष्ट्याने चमकले. अर्थात त्यांची प्रसिद्धीही केवळ त्यांच्या कारकीर्दीपुरतीच टिकली. स्टीलने द टेंडर हस्बंड (१७०५) व द कॉन्शस लव्हर्स (१७२२) ही दोन नाटके लिहिली. त्यांत त्याने माणसाची प्रवृत्ती निसर्गत:च नैतिक असते, हे फारसे अवडंबर न माजविता मांडले आहे. नाटकांतल्या कृत्रिम भावविवशतेला आवर घालायचा एक स्तुत्य प्रयत्न म्हणून ही नाटके त्यावेळी प्रसिद्धीस आली. ⇨ हेन्री फील्डिंग (१७०७–१७५४) या सुप्रसिद्ध कादंबरीकाराने टॉम थंब (१७३०) हे नाटक लिहिले. त्यात त्याने हिरोइक ट्रॅजेडीची भरपूर थट्टा केली आहे.
प्राचीन ग्रीक व लॅटिन नाटकांतील विचारांचे व त्यांच्या रचनेचे अनुकरण करणारी नाटकेही लिहिली गेली. त्यांत जोसेफ ॲडिसनचे केटो (१७१३) व डॉ. जॉन्सनचे आयरीन (१७४९) ही दोन प्रसिद्ध आहेत.
जॉर्ज लिलोच्या (१६९३–१७३९) द लंडन मर्चंट (१७३१) ह्या नाटकात एक प्रबळ खलनायक व दुर्बळ सत्प्रवृत्त नायक ह्यांच्यातील तीव्र संघर्ष दाखविण्यात आला आहे. ह्यात भडक शोकात्मकतेचे वातावरण निर्माण करून प्रेक्षकांना हेलावून सोडण्याचा प्रयत्न केला आहे. जॉन गे ह्या लेखकाची बेगर्स ऑपेरा ही संगीतिका हे ह्या शतकातील आणखी एका लोकप्रिय नाट्यप्रकाराचे उदाहरण. ह्या शतकाच्या उत्तरार्धातील दोन महत्त्वाचे नाटककार म्हणजे ऑलिव्हर गोल्डस्मिथ व ⇨ रिचर्ड शेरिडन (१७५१–१८१६). गोल्डस्मिथच्या शी स्टूप्स टू काँकर (१७७३) ह्या नाटकाला अफाट लोकप्रियता लाभली. ह्या नाटकाच्या रचनेतली सहजता व नैसर्गिकपणा ह्यांचे तत्कालीन प्रेक्षकांना एकदम आकर्षण वाटले कारण त्या आधीच्या साठ वर्षांत इंग्रजी रंगभूमीवर असे काही पहावयास मिळाले नव्हते. शेरिडनची द रायव्हल्स (१७७५) व द स्कूल फॉर स्कँडल (१७७७) ही ह्या शतकातील अत्यंत विनोदी प्रहसने. शेरिडनचे संवाद विनोदाने बहरलेले असतात व त्याच्या भाषेवर एक अपूर्व झळाळी असते. द रायव्हल्समधील मिसेस मॅलप्रॉप हे पात्र तर अमरच झाले आहे. बोलताना भलभलते शब्द वापरून विनोदनिर्मिती करणे, हे ह्या पात्राचे वैशिष्ट्य. तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून एक शब्दच (मॅलप्रॉपिझम) इंग्रजी शब्दकोशात दाखल झाला आहे.
कादंबरी : १६७८ साली प्रसिद्ध झालेल्या बन्यनच्या पिल्ग्रिम्स प्रोग्रेसमध्ये कादंबरीचे काही गुण आहेत पण ती मुख्यत: एक रूपक कथा आहे, रूढ अर्थाने कादंबरी नाही म्हणून इंग्रजी कादंबरीचा पाया खऱ्या अर्थाने अठराव्या शतकात घातला गेला आणि तो ⇨ डॅन्यल डीफोच्या (१६६० ?–१७३१) कादंबऱ्यांनी घातला, असे म्हणता येईल, एका प्रत्यक्ष प्रसंगावर आधारलेल्या रॉबिन्सन क्रूसो (१७१९) ह्या त्याच्या कादंबरीत सत्य आणि कल्पित ह्यांचे इतके प्रभावी आणि मनोवेधक मिश्रण आहे, की प्रसिद्ध होताच ती लोकप्रिय झाली आणि आजही तिची लोकप्रियता कायम आहे. जगातील सर्व प्रमुख भाषांत तिची भाषांतरे झाली आहेत. त्यानंतर त्याने सत्य आणि कल्पित ह्यांवर आधारलेल्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्याच्या लेखनात भाषासौष्ठवाचे किंवा कलात्मक शैलीचे गुण नाहीत पण सत्य घटनांना कल्पिताचा आधार देऊन त्या मनोवेधक रीतीने उभ्या करण्यात तो यशस्वी झाला आहे आणि त्याच्या लेखनात एक जोमदारपणा आणि वास्तवाचे जिवंत चित्र उभे करण्याचे सामर्थ्य आहे. पुढे ह्या शतकात कादंबरीवाङ्मयाने वास्तववादी, सूक्ष्म मनोविश्लेषणात्मक अथवा मुक्त चिंतनपर असे वळण घेतले आणि मध्यमवर्गीयांच्या मनोभावनांचे चित्रण करणारा हा निवेदनप्रकार गद्यमहाकाव्याच्या पंक्तीला नेऊन बसविला. १७४० मध्ये ⇨ सॅम्युएल रिचर्ड्सन (१६८९–१७६१) ह्या छपाईचा धंदा करणाऱ्या अल्पशिक्षित लेखकाने पॅमेला ऑर व्हर्च्यू रिवॉर्डेड ह्या नावाची पत्रात्मक कादंबरी प्रसिद्ध केली. ह्या कादंबरीचा दुसरा भाग १७४१ मध्ये प्रसिद्ध झाला. व्यक्तिरेखेच्या भोवती जाणीवपूर्वक गुंफलेले एकसंध गतिमान कथानक व त्यातून फुलणारा मानवी स्वभाव दीर्घ गद्यकथानकात प्रथमच निर्माण झाला. म्हणून रिचर्ड्सनला कादंबरीच्या जनकत्वाचा मान अनेक वेळा दिला जातो. पॅमेला, क्लॅरिसा हार्लो (२ भाग, १७४७–४८) द हिस्टरी ऑफ सर चार्ल्स ग्रँडिसन (७ खंड, १७५३–५४), ह्या कादंबऱ्यांतून रिचर्ड्सनने मध्यमवर्गीय जीवनाचे चित्रण करून मध्यमवर्गीय नीतिमूल्यांचा गौरव केला. हळुवार, सूक्ष्म भावच्छटा निर्माण करणे, हे त्याचे वैशिष्ट्य. ह्या भावच्छटा नीत्युपदेशाच्या आवरणाखाली कित्येक वेळा झाकून जातात. क्लॅरिसा ही शोकात्म कादंबरी तिच्यातील कुंटणखान्यांच्या आणि शहरी भपकेबाज जीवनाच्या वास्तववादी चित्रणामुळे संस्मरणीय झाली आहे. चार्ल्स ग्रँडिसन मधील धनिकाचे चित्रण त्याच्या सर्वगुणसंपन्नतेमुळे फिके वाटते. रिचर्ड्सनच्या भावविवश चित्रणाचा आणि बारकाव्याचा फार मोठा प्रभाव सर्व समकालीन यूरोपीय कथावाङ्मयावर पडला. हेन्री फील्डिंग हा अठराव्या शतकातील आणखी एक महत्त्वाचा कादंबरीकार. फील्डिंगच्या जोसेफ अँड्रूज (१७४२) ह्या कादंबरीचा उदय रिचर्ड्सनच्या संकुचित, मर्यादित व पुस्तकी नीतिकल्पनांचे आणि सांकेतिक भावविवशतेचे विडंबन करण्यासाठी झाला परंतु केवळ विडंबनाने वा उपहासाने फील्डिंगच्या खऱ्या सर्जनशक्तीला वाव मिळण्यासारखा नव्हता. जोसेफ अँड्रूज ह्या कादंबरीत भोळ्या, सालस, ध्येयवादी पार्सन ॲडम्सचे फील्डिंगने केलेले चित्रण श्रेष्ठ दर्जाचे ठरले व त्यातूनच पुढील प्रगत स्वभाव-चित्रणाची पूर्वसूचना मिळाली. ए जर्नी फ्रॉम धिस वर्ल्ड टू द नेक्स्ट (१७४३), मि. जॉनाथन वाइल्ड द ग्रेट (१७४३) ह्या अनुक्रमे अद्भुतरम्य व विडंबनात्मक कथांनंतर फील्डिंगच्या टॉम जोम्स, अ फाउंडलिंग (१७४९) आणि अमीलिया (१७५१) ह्या श्रेष्ठ कादंबऱ्या प्रकटल्या. रिचर्ड्सनच्या संकुचित नीतिमूल्यांपेक्षा हृदयांच्या श्रीमंतीवर, मनाच्या व संस्कृतीच्या प्रगल्भतेवर नीती अवलंबून आहे, हे फील्डिंगने दाखविले. उदार मनाचा आणि साधेपणाचा वारसा ज्याला लाभला, तो टॉम जोन्स त्याची रूढ नैतिक स्खलनशीलता जमेस धरूनही प्रशंसनीय आदर्श ठरतो. त्याने रहस्यपूर्ण उत्कंठेला ताण देईल अशा कल्पक कथानकाचा आदर्श ह्या कादंबरीत उभा केला. आपल्या कादंबऱ्यांतून अनेकविध व्यक्तिरेखांचे वास्तववादी चित्रण त्याने केले व विविध जीवनानुभवांना कलारूप देण्याचे आपले कौशल्य प्रकट केले. ⇨ टोबायस स्मॉलिट (१७२१–१७७१) ह्याच्या रॉडरिक रँडम (१७४८) व पेरीग्रीन पिकल (१७५१) ह्या कादंबऱ्यांत जीवनातील भीषण अनुभवांचे हृद्य चित्रण दिसते. हंफ्री क्लिंकर (१७७१) ही त्याची अधिक प्रगल्भ कलाकृती ब्रँबल कुटुंबातील विचित्र, विक्षिप्त स्वभावाच्या व्यक्ती साकार करते. अशाच प्रकारच्या तऱ्हेवाईक परंतु मानवतेने ओथंबलेल्या व्यक्तिरेखांवर भर देऊन ⇨ लॉरेन्स स्टर्न (१७१३–१७६८) ह्याने ट्रिस्ट्रम शँडी (९ खंड, १७६०–१७६७) ही कादंबरी प्रसिद्ध केली. कोठल्याही रूढ निवेदनपद्धतीत न बसणाऱ्या ह्या कथेत अंकल टोबी, कॉर्पोरल टिम, पार्सन योरीक ह्यांसारख्या श्रेष्ठ व्यक्तिरेखा निर्माण झाल्या. मनोव्यापारांचे दर्शन घडवीत लिहिलेल्या ह्या कादंबरीत एक प्रकारचा आधुनिकपणा आहे. व्यक्तींच्या मनोव्यापारांचे चित्रण करीत असताना काही बोध करणे, काही प्रवृत्ती दडपणे, नाट्यपूर्ण परिणाम घडवून आणणे ही बंधने स्टर्नने टाळली. भावनेला, संवेदनक्षमतेला त्याने स्थान दिले आहे पण नीतिनिष्ठेच्या दडपणातून ही कादंबरी मुक्त झाली आहे. व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविण्याचे सर्वोत्कृष्ट साधन या दृष्टीने पुढल्या काळात कादंबरी ह्या वाङ्मयप्रकाराला जे महत्त्व प्राप्त झाले, त्याचा हा प्रारंभ म्हणता येईल. तसेच एक प्रकारे ही कादंबरी स्वच्छंदतावादाचीही पूर्वसूचक आहे. सेंटिमेंटल जर्नी (१७६८) हे त्याच्या फ्रान्सच्या प्रवासाचे वर्णनही त्यातील सूक्ष्म आणि अचूक निरीक्षण, सौम्य विनोद, आत्मनिष्ठा आणि सहज केलेले जीवनचिंतन ह्यांमुळे आधुनिक झाले आहे. ⇨ हॉरिस वॉल्पोल (१७१७–१७९७) ह्याने जुनाट पडके वाडे, गढ्या, अंधारी तळघरे, भुयारे इत्यादींची वर्णने असलेल्या आणि गूढ, भयानक वातावरण निर्माण करणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या (उदा., कॅसल ऑफ ऑट्रँटो, १७६४). त्यांचा परिणाम काही अंशी पुढे वॉल्टर स्कॉटवरही झाला.
अठराव्या शतकाच्या अखेरीस सामाजिक चालीरीतींमध्ये विशेषत: स्त्रीपुरुष-संबंधांत-हळुवारपणा, नागरी सभ्यता हे गुण आले. त्यामुळे काही स्त्री कादंबरीकारांनी स्त्रीपुरुषसंबंधांवर आधारलेल्या कादंबऱ्या लिहिल्या. हॅना मोर (१७४५–१८३३) हिने लिहिलेली एकच कादंबरी (सीलेब्ज इन सर्च ऑफ अ वाइफ, १८०९) अतिशय लोकप्रिय ठरली. फॅनी बर्नी (१७५२–१८४०) हिच्या कादंबऱ्यांत तत्कालीन समाजाचे चित्र दिसते, तर मराया एजवर्थ (१७६७–१८४९) हिच्या कॅसल रॅकरेंट (१८००) व बेलिंडा (१८०१) ह्यां आयरिश जीवनावरील कादंबऱ्या अधिक वास्तववादी आहेत. त्यांचे महत्त्व म्हणजे त्यांनी स्कॉटसारख्या श्रेष्ठ एतिहासिक कांदबरीकाराला स्कॉटिश आयुष्याबद्दल लिहिण्याची स्फूर्ती दिली.
वाङ्मयसमीक्षा : वाङ्मयसमीक्षेला आरंभ सतराव्या शतकात ड्रायडनच्या लेखनापासून झाला असला, तरी तिला अधिक भरीवपणा अठराव्या शतकात आला. ह्या शतकातील वाङ्मयसमीक्षा वाङ्मयाचा नित्य व अविभाज्य भाग बनून गेली. ह्या साहित्यविचारांवर ॲरिस्टॉटल, सिसेरो, हॉरिस यांसारख्या प्राचीन ग्रीक व लॅटिन आणि आधुनिक ब्वालो (१६३६–१७११) व रापँ (१६२१–१६८७) या फ्रेंच समीक्षकांचा खोल परिणाम झाला. प्राचीनांच्या साहित्यकृती व साहित्यविचार यांचे अनुकरण केल्यानेच इंग्रजी वाङ्मय आधीच्या काळातील अराजकातून बाहेर पडेल, अशी विचारधारा होती उदा., पोपचे एसे ऑन क्रिटिसिझम (१७११). परंतु ॲडिसन, पोप व डॉ. जॉन्सन यांनी साहित्यसमीक्षेचा प्रसंगानुसार स्वतंत्रपणे व निर्भीडपणे विचार केला.
‘निसर्गाला अनुसरा’ या संदेशाला अठराव्या शतकातील वाङ्मयात एक विशिष्ट अर्थ होता. मानवी जीवनाचे निरीक्षण करणे, त्याचा अर्थ समजावून घेणे व तो प्रभावी भाषेत मांडणे हा तो अर्थ. ही जीवनाकडे बुद्धिवादी चिकित्सकपणे पहाण्याची भूमिका. यातून जीवनावर चिकित्सक व टीकात्मक भाष्य करणारे वाङ्मय निर्माण झाले.
वरील संदेशाचा दुसरा अर्थ : निसर्गात सर्व गोष्टी एक सुसूत्र पद्धतीने रचिल्या आहेत. ह्याचे वाङ्मयात प्रतिबिंब दिसले पाहिजे, म्हणजेच कलाकृती रेखीव असली पाहिजे. योग्य शब्द योग्य ठिकाणीच वापरले पाहिजेत. अभिव्यक्तीत स्वच्छपणा, ओज व भारदस्त साधेपणा हवा. शैलीत खटाटोप दिसू नये पण काही खास अलौकिक वेगळेपणा जाणवावा. वाङ्मयाच्या भाषेत सभ्यता पाहिजे. त्या भाषेचा सूर सुसंस्कृत मनाला पटला पाहिजे.
ललित लेखनामागील प्रतिभेचे स्वरूप व वाङ्मयाभिरुचीचे स्वरूप यांचा फारच तपशीलवार विचार झाला. प्रतिभा ही एक दिव्य शक्ती आहे तिच्या योगाने लेखकाला जीवनातील अनुभवांमधला आगळेपणा उमगतो त्यांतील सौंदर्य उमगते जीवनातील दिव्यत्वाचा साक्षात्कार होतो असे ॲडिसनने व जॉन डेनिसने (१६५७–१७३४) म्हटले आहे. ॲडिसनने पॅरडाइस लॉस्ट या मिल्टनच्या महाकाव्याचे समीक्षण नि:पक्षपातीपणे केले आहे.
शाफ्ट्स्बरीने (१६७१–१७१३) वाङ्मयाभिरुचीविषयी मौलिक विचार व्यक्त केले. तो म्हणतो: जे चांगले व सुंदर आहे त्याकडे मनाची असलेली स्वाभाविक ओढ ही मनुष्यस्वभावातल्या नैतिकतेचीच साक्ष देते. साहित्य समीक्षकाने जाणीवपूर्वक या नैतिकतेची जोपासना केली पाहिजे. तो पूर्वग्रहदूषित व पक्षपाती समीक्षेचा निषेध करतो.
वाङ्मयाचे विषय कोणते, तर प्रातिनिधिक, नित्य परिचयाची, परंपरेने माहीत असलेली जीवनविषयक सत्ये कारण मानवी स्वभाव व मन ह्या न बदलणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ही सत्ये सर्वसाधारण मनुष्यांच्या जीवनात आढळतातच. नेमके या गोष्टीत डॉ. जॉन्सनने शेक्सपिअरचे मोठेपण हेरले. तऱ्हेवाईक, एकांगी किंवा एकरंगी व्यक्तिमत्त्व रंगविणे म्हणूनच कालापव्यय मानला गेला. त्याचप्रमाणे समाजाच्या वरच्या थरातच जीवनाची अंगे फुलतात व जोपासली जातात म्हणून ह्या समाजाचेच चित्रण वाङ्मयात आवश्यक ठरते, अशी डॉ. जॉन्सनसारख्यांची भूमिका होती.
प्रतिभेच्या योगानेच प्रातिनिधिक सत्यांचा जिवंत साक्षात्कार होतो. जे आहे त्यालाच नव्याने गवसलेल्या गोष्टींची नवलाई आणणे किंवा आहे त्याचे वास्तविक स्वरूप विशद करणे म्हणजेच प्रतिभेची नवनिर्मिती. यामुळेच शेक्सपिअरच्या काळातला प्रतिभेचा बेबंद व मुक्त संचार या शतकात नीट आकलन झाला नाही. प्रातिनिधिक सत्याच्याच अभिनव मांडणीवर पुन्हापुन्हा भर देण्यात आला. तथापि शेक्सपिअरप्रभृती जुन्या कवींचे वास्तविक वाङ्मयीन महत्त्व याच शतकातल्या समीक्षेने प्रथम पटवून दिले. टॉमस हॅन्मर, थीओबॉल्ड (१६८८–१७४४), पोप व जॉन्सन यांनी शेक्सपिअरच्या नाटकांचे अधिकृत पाठ निश्चित करण्यात खूपच मेहनत घेतली. अशा प्रयत्नांतूनच एखाद्या साहित्यकृतीतील मूळ पाठ चिकित्सकपणे ठरविण्याची तत्त्वे उदयास आली. ह्या संदर्भात डॉ. जॉन्सनने शेक्सपिअरकृत नाटकांच्या खंडांसाठी लिहिलेली विस्तृत प्रस्तावना फारच मोलाची आहे.
डॉ. जॉन्सन हा ह्या शतकातील समीक्षकांचा मुकुटमणी. त्याचे समीक्षाविषयक सिद्धांत फारच मोलाचे आहेत. समीक्षा केवळ सिद्धांत व पूर्वीची उदाहरणे यांवर अवलंबून ठेवू नये. साहित्यकृतीचे डोळस परीक्षण हाच तिचा खरा आधार असला पाहिजे. समीक्षा प्रत्यक्ष जीवनानुभवाशी निगडित झाली पाहिजे. लेखकाचे मनोगत लक्षात घेऊन समीक्षा केली पाहिजे, या मतांचे समर्थनच जणू त्याने द लाइव्ह्ज ऑफ द पोएट्स (१७७९–१७८१) ह्या ग्रंथाच केले. लेखकाच्या जीवनाचे त्याच्या साहित्यकृतींच्या समीक्षेमध्ये केवढे महत्त्वाचे स्थान आहे, हे त्याने दाखवून दिले. त्याच्या मते वाङ्मयाचा हेतू जीवनातील अनुभवांचे स्वरूप स्पष्ट करणे हा आहे. सर्वसामान्यांचे अनुभव म्हणजेच खरे नैसर्गिक अनुभव असतात. त्यांचेच चित्रण वाङ्मयात झाले पाहिजे. हा सर्वसाधारणपणे नैतिक दृष्टिकोण आहे, असे म्हणावे लागते. ह्यामुळे जॉन्सनने मिल्टन व डन या कवींवर त्यांचे काव्य नीट समजावून न घेता टीकास्त्र सोडले.
साहित्यकृतींवरील परामर्शात्मक लेखनामुळे टीकाकारांना वाङ्मयीन जगतामध्ये एक आदरयुक्त भीतीचे स्थान प्राप्त झाले. वाङ्मयव्यापार ही महत्त्वाची गोष्ट आहे, ती नीट पायावर उभी राहिली पाहिजे, निकोप राहिली पाहिजे, दर्जेदार पाहिजे, असे सांगणाऱ्या समीक्षकांना एक उच्च दर्जा प्राप्त झाला.
अठराव्या शतकातील इंग्रजी भाषेची घडण : १६६० पासूनच इंग्रजी भाषेच्या सुधारणेचा विचार सुरू झाला कारण इंग्रजीत प्रचंड संख्येने इतर भाषांतून शब्द व वाक्प्रचार येऊन दाखल झाले होते. परंतु इंग्रजीतील सर्वच शब्दांच्या अर्थांची आणि शब्दांतील अक्षरांची व त्यांच्या उच्चारांची निश्चिती व्हायची होती. इंग्रजी व्याकरणाबाबतही गोंधळाचीच परिस्थिती होती. ह्या सर्व गोष्टी लक्षात येऊ लागल्यावर भाषासुधारणेचे युग सुरू झाले. फ्रेंचांप्रमाणे एक संस्था (अकॅडमी) स्थापून हे कार्य करावे असे विचार ड्रायडन, डीफो, स्विफ्टप्रभृती अनेकांनी व्यक्त केले पण संस्था स्थापून असले काम होत नाही, असे डॉ. जॉन्सनचे मत होते. प्रत्यक्षात अशी संस्था स्थापन झाली नाहीच. शेवटी अठराव्या शतकातील वाचकवर्गाच्या अपेक्षा व त्या पुऱ्या करण्यासाठी लेखकांनी केलेले प्रयत्न ह्यांमुळेच इंग्रजी भाषेत व अभिव्यक्तीत इष्ट ती सुधारणा घडून आली. एक सहजसुगम, वैयक्तिक व तऱ्हेवाईक वैशिष्ट्यांपासून मुक्त अशी इंग्रजी शैली निर्माण झाली. सबंध सुशिक्षित समाजाने एकसंधपणे अशा रीतीने भाषा वापरण्याचा इंग्लंडच्या जीवनातील हा पहिला व शेवटचाच कालखंड.
ह्या संदर्भात ‘रॉयल सोसायटी’ने केलेल्या प्रयत्नांचा अवश्य निर्देश हवा. या संस्थेने जाणीवपूर्वक सोप्या, स्वच्छ, ओजस्वी व थोड्या शब्दांत पूर्णपणे अर्थ व्यक्त करणाऱ्या लेखनशैलीचा व भाषणशैलीचा सातत्याने पुरस्कार केला. त्याचप्रमाणे ॲडिसन, स्विफ्ट, स्टीलप्रभृती लेखकांनी इंग्रजी शैलीत आमूलाग्र बदल घडवून आणले. स्विफ्टने योग्य ठिकाणी योग्य शब्द, अशी शैलीची व्याख्या केली आहे. जॉन ह्यूज ह्या विशेष प्रसिद्ध नसलेल्या लेखकाने शैलीवर निबंध लिहिला. त्या त्या लेखनप्रकाराला आणि विषयाला अनुरूप अशी शैली असावी, याचाही जाणीवपूर्वक विचार झाला.
शब्दकोश रचण्याचेही अनेक प्रयत्न झाले. सर्वांनीच शब्दांचे अर्थ, वर्णलेखन (स्पेलिंग), उच्चार व व्युत्पत्ती देण्याचा हेतू बाळगला. त्यात डॉ. जॉन्सनचा प्रयत्न भव्य व मूलगामी आहे. त्याने शब्दांचे सोदाहरण अर्थ दिले पण शब्दोच्चार मात्र दिले नाहीत.
इंग्रजीची व्याकरणेही अनेक झाली. इंग्रजी भाषेचा प्रचलित वापर लक्षात घेऊन व्याकरण रचायचे, का तर्ककर्कश नियमांत भाषा बसवावयाची, ह्या वादात दुसरी विचारसारणी प्रबळ ठरली. शतकाच्या शेवटीशेवटी शब्दांचे वर्णलेखन व उच्चार ह्यांना सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.
काव्याची भाषा मात्र कृत्रिम ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला कारण प्रचलित भाषा काव्यास अनुकूल नसते, असे मत रूढ होते. यासाठी होमर, व्हर्जिल, स्पेन्सर, मिल्टन इत्यादींच्या शैलींचा अभ्यास झाला. साध्या भाषेत लिहिलेल्या काव्याचे विडंबन होण्याची भीती वाटल्यामुळेही काव्याच्या शैलीत कृत्रिमता जोपासण्यात आली. त्यामुळे ठराविक विशेषणे, वाक्प्रचार, वर्णानांचा तोचतोपणा या काव्यात आला.
एकंदर समाज सर्वच बाबतींत सुशिक्षित आणि सुसंस्कृत करण्यासाठी ह्या शतकात जो प्रयत्न झाला, त्याचाच एक भाग म्हणजे भाषेला वळण लावणे हा होता. त्यातूनच एकसंध, सहजसुलभ, लोकशिक्षणाला अनुकूल अशी इंग्रजी भाषा निर्माण झाली.
शैलीसाठी विशेष नावाजलेल्या लेखकांचा स्वतंत्र निर्देश करणे आवश्यक आहे. ॲडिसनने नियतकालिक निबंधास योग्य अशा शैलीची जोपासना केली. स्विफ्टने अत्यंत धारदार व ओजस्वी भाषा निर्माण केली. डॉ. जॉन्सनने अभिव्यक्तीमध्ये विद्वत्तेला साजेसे गांभीर्य आणले. त्याच्या लेखनाने इंग्रजी भाषा प्रगल्भ बनली. गोल्डस्मिथच्या भाषेतील प्रसन्न खेळकरपणा जॉन्सनच्या शैलीच्या तुलनेने अधिकच विलोभनीय वाटतो. गोल्डस्मिथच्या निबंधांमध्ये जे लालित्य दिसते ते आजच्या ललितनिबंधाचे पूर्वरूपच म्हणता येईल. गिबनची शैली डौलदार आहे. त्याची पल्लेदार वाक्ये त्याच्या गंभीर आशयाला साजेशीच आहेत. ह्या सर्व व्यक्तिगत वैशिष्ट्यांशिवाय सर्वांच्याच शैलींमध्ये अठराव्या शतकातील इंग्रजीच्या प्रातिनिधिक खुणा दिसतातच. सर्वांत ठळक खूण म्हणजे आपले लिखाण लोकांच्या नित्याच्या भाषेत करण्याची प्रत्येकाची धडपड कारण ह्या शतकातील सर्वच लेखनाचे उद्दिष्ट प्रामुख्याने लोकशिक्षण हेच होते.
जोशी, रा. भि.; भागवत, अ. के.; देवभर, वा. चिं.
एकोणिसावे शतक (१७९८–१८३७) : हा इंग्रजी वाङ्मयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा कालखंड. त्याची सुरुवात ⇨विल्यम वर्ड्स्वर्थ (१७७०–१८५०) व ⇨ सॅम्युएल टेलर कोलरिज (१७७२–१८३४) यांच्या लिरिकल बॅलड्स ह्या १७९८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहाने झाली आणि १८३७ मध्ये राणी व्हिक्टोरिया इंग्लंडच्या गादीवर आली तेव्हा हे युग संपले, असे मानण्यात येते. सर्व ललित कलांच्या विकासात दोन ठळक व बऱ्याचशा परस्परविरोधी अशा प्रवृत्ती दिसून आल्या आहेत. ⇨ स्वच्छंदतावाद व ⇨ अभिजाततावाद या नावाने ह्या दोन प्रवृत्तीं ओळखल्या जातात. या प्रवृत्तींमधील फरक साहित्याच्या संदर्भात स्थूल मानाने असा सांगता येईल, की अभिजाततावादाच्या दृष्टीने साहित्यिक हा समाजाचा प्रतिनिधी असतो आणि एका विशिष्ट अशा सुसंस्कृत, एकजिनसी वाचकवर्गासाठी लिहीत असतो. सर्वसामान्यतेवर भर, संयम, आदर्शानुसारी नियमबद्धता ही त्याची वैशिष्ट्ये. उलटपक्षी स्वच्छंदतावादाच्या दृष्टीने साहित्यिक हा कोणाचाही प्रतिनिधी नसतो आणि तो विशिष्ट वाचकवर्गासाठी लिहीत नसतो. तो स्वत:चाच प्रतिनिधी असतो आणि त्याच्या अंत:करणातल्या घडामोडी, जीवनासंबंधीच्या आणि जगासंबंधीच्या त्याच्या स्वत:च्या प्रतिक्रिया ह्याच त्याच्या काव्याचा विषय असतात. भावनांची उत्कटता, संवेदनेची तीव्रता, वैशिष्ट्यदर्शक घटकांवर आणि वेगळेपणावर भर ही स्वच्छंदतावादाची वैशिष्ट्ये.
इंग्रजी वाङ्मयात स्वच्छंदतावादी प्रवृत्तीचा ठळक आविष्कार दोनदा झाला. सोळाव्या शतकातील प्रबोधनाच्या युगात व एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस. म्हणूनच या दुसऱ्या आविष्कारास स्वच्छंदतेचे पुनरुज्जीवन असे म्हणतात. या युगाने नवअभिजात युगातील सांकेतिक सौंदर्यकल्पनांविरुद्ध बंड केले.
इंग्लंडमधील स्वच्छंदतावादाच्या खाणाखुणा अठराव्या शतकातच दिसू लागल्या होत्या. अठराव्या शतकातील टॉमसनसारख्या कवीचे निसर्गकाव्य, हॉरिस वॉल्पोलच्या गूढ व भीतिदायक वातावरण निर्मिणाऱ्या कादंबऱ्या, बर्न्स, ब्लेक, चॅटरटन इत्यादींचे काव्य, बर्कने अंत:प्रेरणांना दिलेले महत्त्व या अशा काही खुणा होत.
अठराव्या शतकाच्या शेवटीशेवटी इंग्लंडमध्ये स्वच्छंदतावादाचा उदय झाला, ह्याला नवअभिजाततावादातील साचेबंदपणा, सांकेतिकता, तोच-तोपणा हे जसे कारण, तशी आणखीही कारणे होती. अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींनी आपण स्वतंत्र झाल्याचे घोषित केले आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने अस्तित्वात आली. ह्या घटनेमुळे इंग्लंडमधल्या व्यापारी कारखानदारांची एक हुकमी बाजारपेठ तर गेलीच पण त्याहून महत्त्वाची गोष्ट अशी, की इंग्लंडमधल्या राजसत्तेला आणि सरंजामदारी वर्चस्वाला मोठा धक्का बसला. १७८९ मध्ये फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली आणि परिणामत: यूरोपमधील एक बलाढ्य राजसत्ता कोसळली. ह्या क्रांतीमागे राजकीय आणि आर्थिक कारणे होती, तशीच समतेच्या आणि स्वातंत्र्याच्या विचारांची प्रेरणाही होती. हादेखील परंपरागत समाजव्यवस्थेला मोठा धक्का होता. इंग्लंडच्या कारखान्यात वाफेची एंजिने बसविण्यात आली तेव्हा उत्पादनाचा वेग वाढला, कारखाने वाढले, शहरांची लोकसंख्या वाढली, कामगारांची संख्या वाढली आणि औद्योगिक कामागारांचा नवा मोठा शोषित वर्ग अस्तित्वात आला. ह्या सर्व घटनांचा संकलित परिणाम म्हणजे सर्वच क्षेत्रांतील अभिजात आदर्शांना आणि व्यवहारवादी विचारप्रणालींना हादरा बसला. राजा आणि प्रजा, शास्ते आणि शासित, व्यक्ती आणि समाज, स्त्री आणि पुरुष ह्यांचे परस्परसंबंध आणि अधिकार तसेच कला-साहित्याची प्रेरणा आणि हेतू ह्या सर्वच प्रश्नांसंबंधी नव्याने विचार सुरू झाला.
मानवी जीवन घडविण्यात निसर्गाचे महत्त्वाचे स्थान आहे. गूढ, अनाकलनीय अनुभवांना व विविध मानसिक अवस्थांना कलादृष्ट्याही महत्त्व आहे. मानवी मनाचे स्वातंत्र्य मुळातच अनिर्बंध आहे व असले पाहिजे, अशा तऱ्हेच्या नव्या जाणिवा इंग्लंडमधील स्वच्छंदतावादाचे स्वरूप स्पष्ट करतात.
बालकाच्या निष्पाप व निरागस भावनेतून पाहिल्यास नित्य परिचयाच्या गोष्टी व अनुभव काही वेगळेच दिसतात व त्यांचे अलौकिक स्वरूप कळते, असे वर्ड्स्वर्थने म्हटले. निरागस बाल्यावस्थेच्या तुलनेने प्रौढावस्थेचे आणि चारित्र्य व मन घडविणाऱ्या गोष्टींचे महत्त्व कमी झाले.
वेगळेपण हे स्वच्छंदतावादाचे एक लक्षण असल्यामुळे पुष्कळदा स्वच्छंदतावादी कवी किंवा लेखक नित्याच्या परिचयाचे समकालीन जीवन, वातावरण किंवा अनुभवविश्व ह्यांविषयी लिहिण्याऐवजी स्थलदृष्ट्या किंवा कालदृष्ट्या दूरस्थ जीवनाविषयी लिहितात. इंग्लंडमधील काही स्वच्छंदतावाद्यांना प्राचीन व मध्ययुगीन जीवनातील अनुभवांचे विशेष आकर्षण वाटले. उदा., ⇨ वॉल्टर स्कॉटच्या (१७७१–१८३२) ऐतिहासिक कादंबऱ्या, ⇨ जॉन कीट्सचे (१७९५–१८२१) ग्रीक संस्कृतीबद्दलचे प्रेम.
या काळातील सर्वच साहित्यिक निखळ स्वच्छंदतावादी होते, असे नाही, उदा., ⇨ लॉर्ड वायरन (१७८८–१८२४) व ⇨ जेन ऑस्टेन (१७७५—१८१७) ह्या कालखंडातील असूनही त्यांच्या लेखनाचे स्वरूप अभिजाततावादाला अधिक जवळचे आहे.
काव्य : स्वच्छंदतावादी कवींच्या दोन पिढ्या आहेत : वर्ड्स्वर्थ, कोलरिज व ⇨ रॉबर्ट साउदी (१७७४–१८४३) हे पहिल्या पिढीतील. बायरन, ⇨ पर्सी बिश शेली (१७९२–१८२२) व जॉन कीट्स हे दुसऱ्या पिढीतील.
पहिल्या पिढीतील कवी इंग्लंडच्या लेक डिस्ट्रिक्ट ह्या विभागात राहिलेले. फ्रेंच राज्यक्रांतीने तिघेही सुरुवातीस प्रभावित झाले होते पण क्रांतीनंतर अत्याचारादी ज्या घडामोडी झाल्या त्यामुळे तिघांचाही भ्रमनिरास झाला तथापि स्वातंत्र्य, समतादी तत्त्वांसंबंधीची त्यांची निष्ठा ढळली नाही आणि त्यांच्यात समाजाविरुद्ध बंडखोरीही आली नाही. नेहमीचेच जीवन चिंतनाने आणि सहानुभूतीने अधिक शुद्ध आणि गहिरे करावे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या काव्याचे विषय मानव व निसर्ग यांचे संबंध, शैशवावस्थेचे जीवनातील स्थान व सामान्य माणसांच्या जीवनातील अनुभव हे होते. साध्या विषयातील अद्भुतता दाखविण्याचे त्यांचे कौशल्य अपूर्वच होते. त्यांच्या काव्यात चिंतनशील वृत्तीचा परिपोष झाला आहे. ह्या कवींनी काव्याची भाषा व वृत्तरचना ह्यांत परिवर्तन घडवून आणले. अतिशय प्रभावी प्रतीके त्यांच्या काव्यात आढळतात.
निसर्गासंबंधी अत्यंत उत्कटतेची आणि तादात्म्याची भावना, निसर्गवर्णनांतून वेगवेगळ्या मनोवस्थांची निर्मिती, संवेदनक्षमतेबरोबरच चिंतनशीलता ह्या सर्वांच्या द्वारा नित्याच्या अनुभवांतून आणि सामान्य व्यक्तींच्या जीवनातून व्यक्तिमानसाचे उन्नयन करणे, त्याला एक विशाल अनुभूती देणे, त्याच्या ठिकाणी एक गूढ आध्यात्मिक भाव निर्माण करणे, ही वर्ड्स्वर्थच्या काव्याची वैशिष्ट्ये सांगता येतील.
वर्ड्स्वर्थशी तुलना करता कोलरिजचे मन अधिक विश्लेषणपर, तत्त्वचिंतनपर आणि मूलग्राही होते. त्याच्याही काव्यात भावनांची उत्कटता आणि संवेदनशीलता आहे, तोही निसर्गदृश्यांतून विविध मनोवस्था निर्माण करतो, एक अलौकिक सृष्टी निर्माण करून वाचकाला तो एका वेगळ्या विश्वात नेतो. कुशाग्र बौद्धिकता आणि उत्कट भावनात्मकता ही कोलरिजच्या काव्यात एकवटली आहेत.
साउदी हा वर्ड्स्वर्थ आणि कोलरिज यांच्या सहवासात राहिला तो राजकवीही झाला. पण त्याच्या काव्यात प्रतिभेचा जोम किंवा जिवंतपणा नाही. त्याच्या काही छोट्याछोट्या कविता मात्र चांगल्या आहेत.
कवी म्हणून वॉल्टर स्कॉटचीही ह्याच पिढीत गणना करावी लागले कारण त्याच्या कविता बहुतेक १८१४ पर्यंत लिहिल्या गेल्या होत्या. तात्त्विकदृष्ट्या त्याचा कोलरिज किंवा वर्ड्स्वर्थशी संबंध नसला, तरी भावनात्मकता, कल्पनाविलास, भूतकालीन जीवनाविषयी आकर्षण, निसर्गाविषयी प्रेम इ. स्वच्छंदतावादी काव्याची वैशिष्ट्ये त्याच्या कवितांत आहेत.
बायरन, शेली व कीट्स फ्रेंच राज्यक्रांतीच्या हत्याकांडाच्या वेळी शैशवावस्थेत होते. त्यामुळे वर्ड्स्वर्थ, कोलरिज वगैरे कवींसारखा त्यांचा भम्रनिरास झाला नाही. नव-अभिजात वाङ्मयीन परंपरेचाही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. त्यामुळे त्यांच्या काव्यात-विशेषत: शेली व कीट्सच्या-स्वच्छंदतावादी प्रवृत्तींचा मुक्त विकास झाला पण त्यांचा स्वच्छंदतावाद वेगळा आहे आणि त्यांचे व त्यांच्यापैकी प्रत्येकाचे वेगळेपण विशेष नजरेत भरण्यासारखे आहे. आणखी योगायोग म्हणजे तिघांनाही वेगवेगळ्या कारणांनी इंग्लंडबाहेर जावे लागले व तिघांनाही इंग्लंडबाहेर आयुष्याच्या ऐन उमेदीतच मृत्यू आला.
१८१५ पर्यंत बऱ्याच घडामोडी होऊन गेल्या होत्या. फ्रान्समधील राज्यक्रांती संपलीच होती पण नंतर फ्रान्समध्ये सर्वसत्ताधीश होऊन सबंध यूरोप पादाक्रांत करणाऱ्या नेपोलियनचाही इंग्लंडने पराभव केला होता आणि त्याला हद्दपार केले होते. इंग्लंडमध्ये आणि यूरोपमध्ये एक प्रकारची शांतता प्रस्थापित झाली होती. इंग्लंडचा प्रभाव सर्वत्र वाढला होता आणि त्याच्या वैभवाचा मार्ग निर्विघ्न झाला होता पण खुद्द इंग्लंडात अंतर्गत असंतोष धुमसू लागला होता. फ्रान्सशी झालेल्या युद्धामुळे व्यापारी आणि जमीनदार गबर झाले होते. गरीब जनतेची आणि कामगारांची अवस्था मात्र फारच वाईट झाली होती. बकाल आणि घाणेरड्या वस्त्या वाढल्या होत्या. अन्न महागले होते. कामगारांची निर्घृण पिळवणूक चालली होती. धार्मिक मतभेद तीव्र होत चालले होते. सामान्य जनता मताधिकाराची मागणी करीत होती. सगळी प्रचलित व्यवस्था मोडून काढल्याखेरीज माणूस सुखी होणार नाही, असे विचारी आणि संवेदनशील लोकांना वाटू लागले होते. ह्या पार्श्वभूमीवर बायरन, शेली आणि कीट्स ह्यांची प्रस्थापित समाजाविरुद्ध बंडखोरीची कविता निर्माण झाली.
बायरनच्या वृत्तीतील सामाजिक, राजकीय आणि नैतिक बंडखोरी स्वच्छंदतावादाला जवळ आहे पण त्याची काव्यरचना, वृत्तांची निवड, काव्यप्रकार हे नवअभिजाततावादाला अधिक जवळ आहेत. वर्ड्स्वर्थ वगैरे कवींचा त्याने उपहास केलेला आहे. पोपला तो सर्वश्रेष्ठ इंग्रज कवी मानतो. शेलीच्या काव्यात उत्तुंग कल्पनाविलास, प्रतिभेची भरारी, विलक्षण तरलता, सर्व प्रकारच्या बंधनांविरुद्ध बंडखोरी, तसेच विशाल सहानुभूती आणि व्यापक मानवतावादाची भावना आहे.
संवेदनानुभवाचा आनंद उपभोगणे, मध्ययुगीन आणि प्राचीन ग्रीक वस्तू आणि विषय ह्यांबद्दल ओढ, इंद्रियसंवेद्य अनुभवांतून निर्माण होणाऱ्या भावना आणि भावावस्था व त्यांच्या साहाय्याने सौंदर्याचा आणि सौंदर्याच्या द्वारा चिरंतन सत्याचा साक्षात्कार घडविणे, ही कीट्सच्या काव्याची वैशिष्ट्ये म्हणता येतील. त्याचीही विचारसरणी स्वातंत्र्यवादी आणि सुधारणावादी आहे.
दोन्ही पिढ्यांतील कवींनी विविध वृत्तांत दीर्घकाव्ये रचिली. उदा., वर्ड्स्वर्थचे (द प्रिल्यूड १८०५, प्रकाशित, १८५०), कोलरिजचे द एन्शंट मरिनर, (लिरिकल बॅलड्समध्ये १७९८ मध्ये प्रसिद्ध), बायरनची चाइल्ड हॅरल्ड्स पिल्ग्रिमेज (४ सर्ग, १८१२–१८१८) व डॉन जूअन (१६ सर्ग, १८१९–१८२४) ही काव्ये आणि जॉन कीट्सची ईव्ह ऑफ सेंट ॲग्नेस (१८१९) आणि एंडिमीयन (१८१८) ही काव्ये तसेच शेलीचे ॲडोनिस (१८२१). यांखेरीज ह्या सर्व कवींनी स्फुट भावकविता, सुनीते व उद्देशिका लिहिल्या. स्वच्छंदतावादी काव्याने अठराव्या शतकातील नवअभिजात काव्याची नावनिशाणी जवळजवळ पुसून टाकली.
गद्य : नव-अभिजात युगातील गद्य साधे, सोपे, सुटसुटीत व अर्थवाही होते. त्यात बेबंद कल्पनाशक्तीला स्थान नव्हते. या युगात मात्र गद्याची धाटणी काव्यात्म झाली. प्रत्येकाने स्वत:ची गद्यशैली निर्माण केली. गद्यात प्रतिभाविलासाला अवसर मिळाला. असे असूनही हे गद्य अर्थवाहीच राहील ह्याची शक्य तेवढी काळजी घेतली गेली. त्यामुळे काव्यमय भाषेत असावी तेवढी सहजता या गद्यात आली.
निबंध, कादंबरी व समीक्षा हे या युगातले भरघोस विस्तारलेले गद्यप्रकार. निबंधलेखनाला इंग्रजीमध्ये बेकनपासूनच सुरुवात झाली होती पण त्याचे निबंध गंभीर, विषयविवेचनपर, उपदेशपर असत. ॲडिसन, स्टील, जॉन्सन, गोल्डस्मिथ ह्यांच्या निबंधांतील सौम्य उपहास, खेळकर विनोद, काही प्रमाणातील आत्मनिष्ठ दृष्टिकोण ह्यांमुळे अठराव्या शतकातच इंग्रजी निबंधाचे स्वरूप बदलू लागले होते. त्यातूनच एकोणिसाव्या शतकाच्या स्वच्छंदतावादी वातावरणात निबंधाचा एक स्वतंत्र प्रकार अस्तित्वात आला. हाच ललित निबंध.
या युगातील श्रेष्ठ ललित निबंधकार ⇨ चार्ल्स लँब (१७७५–१८३४) हा होय. त्याच्या निबंधांतील कलात्मकता, उत्स्फूर्त आत्मनिवेदन आणि अनौपचारिकतेचा आभास हे गुण लक्षणीय आहेत. ⇨ टॉमस डे क्विन्सी (१७८५–१८५९), ⇨ विल्यम हॅझ्लिट (१७७८–१८३०), ⇨ ली हंट (१७८४–१८५९) व ⇨ वॉल्टर सॅव्हिज लँडॉर (१७७५–१८६४) हे आणखी काही प्रसिद्ध निबंधकार.
स्वच्छंदतावादी युगात कादंबरीच्या विकासाचे दुसरे पर्व सुरू झाले. नव-अभिजात युगात कादंबरी हा स्वतंत्र वाङ्मयप्रकार म्हणून विकसित झाला. तिचे एक तंत्र निर्माण झाले. व्यक्तिरेखाटन, रचना, कथनपद्धती वगैरे तिच्या अंगोपांगांमध्ये विविधता आली. ही कादंबरी वास्तवादी व बोधपर होती. अठराव्या शतकात हॉरिस वॉल्पोलने कादंबरीला स्वच्छंदतेची दिशा दाखविली होती.
या युगातील कादंबरीकारांनी कादंबरीला जास्त कलात्मक स्वरूप प्राप्त करून दिले. यात प्रमुख वाटा वॉल्टर स्कॉटचा. त्याने ऐतिहासिक कादंबरी हा कादंबरीचा एक प्रकार निर्माण केला. त्याच्या कादंबऱ्या सर्वच ठिकाणी ऐतिहासिक सत्याला धरून लिहिलेल्या नसल्या आणि त्यांत इतरही काही दोष असले, तरी पात्रे, प्रसंग आणि स्थळे ह्यांच्या चित्रणात जिवंतपणा आहे आणि त्यांत स्वच्छंदतावादाची सर्व प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भूतकाळाची कल्पनेच्या साहाय्याने केलेली जिवंत पुननिर्मिती, वाचकाला वर्तमानातून भूतकाळात नेण्याची शक्ती, निसर्गदृश्यांचे जिवंत चित्रण, सुखदु:खात्मक अनुभवांशी निगडित असलेल्या भावनांचे दर्शन, अलौकिक आणि गूढ वातावरणाची निर्मिती ह्या गुणांमुळे आजदेखील त्याच्या कादंबऱ्या आपले स्थान टिकवून आहेत. ह्या काळातील आणखी एक श्रेष्ठ कादंबरीलेखिका जेन ऑस्टेन ही होय. मात्र हिच्या कादंबऱ्या ह्या कालखंडात लिहिल्या गेल्या असल्या, तरी प्रकृतीने त्या अभिजात आहेत. नव-अभिजाततावादाचा काटेकोरपणा, सूक्ष्मता, अलिप्तता आणि संयम ही तिच्या कादंबऱ्यांची वैशिष्ट्ये आहेत. प्राइड अँड प्रेज्युडिससारख्या (१८१३) कादंबऱ्यांत आपल्या मर्यादित अशा सुखवस्तू मध्यमवर्गीय विश्वाच्या लक्ष्मणरेषेबाहेर लेखिका कधीही जात नाही परंतु ह्या विश्वाबद्दलच्या अत्यंत सूक्ष्म ज्ञानाने त्यातील व्यक्तिव्यक्तींच्या संबंधांचे नाट्य ती मोठ्या कौशल्याने दाखविते. ह्या चित्रणात भावविवशता अजिबात नाही, तर कमालीचा संयम आहे. ह्या कादंबऱ्या अनन्यसाधारण विनोदबुद्धिने आणि आगळ्या संवेदनाक्षम व्याजोक्तीने नटल्या आहेत. कथाशिल्पाच्या दृष्टीने त्यांत मोठे रचनाचातुर्य आहे, अनुरूप स्वभावदर्शन आहे. लहानशा हस्तिंदती तुकड्यावर केलेली कलाकुसर, हे ह्या कादंबऱ्यांचे केलेले वर्णन त्यामुळे सार्थ वाटते.
साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रातही नव-अभिजाततावादी समीक्षा आणि स्वच्छंदतावादी समीक्षा ह्यांतील फरक दिसून येतो. साहित्यविषयक दृष्टिकोणांतील फरकांवर तो आधारलेला आहे. कलेचा हेतू उपदेश हा नाही उच्च तऱ्हेचे मनोरंजन करणे, जीवनातील सौंदर्याचे दर्शन घडविणे व त्यांतून उद्बोधन करणे हे कलाकृतीचे उद्दिष्ट आहे व ते समीक्षेने ओळखावे, अशी अपेक्षा निर्माण झाली.
यावेळचे प्रसिद्ध समीक्षक म्हणजे, कोलरिज, हॅझ्लिट, वर्ड्स्वर्थ, शेली आणि कीट्स. ह्यांनी काव्याचे प्रयोजन आणि स्वरूप ह्यांविषयी लिहिले आहे. यावेळच्या समीक्षेचे विषय काव्याचे स्वरूप, भाषा, विषय व कार्य, सर्जनशक्तीचे स्वरूप, काव्याचा हेतू, शेक्सपिअरची व त्याच्या समकालीन नाटककारांची नाटके वगैरे होते. या सर्वांवर प्रत्येकाने स्वतंत्र मते मांडली. या समीक्षेने साहित्य ही स्वतंत्र ललित कला असून तिचे माध्यम शब्द आहे, ही गोष्ट प्रस्थापित केली व साहित्येतर दृष्टिकोणातून साहित्याचे परीक्षण करणे गैर आहे, असे दाखवून दिले. त्याचप्रमाणे एडिंबरो रिव्ह्यू (१८०२), क्वार्टर्ली रिव्ह्यू (१८०९) आणि ब्लॅकवुड्ज एडिंबरो मॅगझीन (१८१७) ह्या नियतकालिकांत वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या परीक्षणलेखांनी साहित्यसमीक्षेत चैतन्य आणले. ह्यांतील लेख काही वेळा राजकीय पक्षदृष्टीने लिहिलेले किंवा पूर्वग्रहदूषित असले, तरी त्यांचे महत्त्व कमी होत नाही.
याही युगात डॉ. जॉन्सनच्या नव-अभिजात परंपरेचे अनुयायी होतेच. एडिंबरो रिव्ह्यूचा फ्रान्सिस जेफ्री हा अशा समीक्षकांमध्ये अग्रगण्य होता. त्याने स्वच्छंदतावाद्यांवर नेहमी कडाडून टीका केली.
स्वच्छंदतावादी व नव–अभिजाततावादी प्रवृत्तींचे परस्परविरोधी स्वरूप या युगाच्या शेवटी स्पष्ट झाले, तसेच दोहोंपैकी केवळ एकाच वृत्तीचा ऐकांतिक परिपोष करणारी कलाकृती असू शकत नाही, याची जाणीव झाली. यानंतरच्या म्हणजे व्हिक्टोरिया राणीच्या युगात या दोन्ही प्रवृत्तींचा शक्य तो मिलाफ व्हावा,अशी इच्छा निर्माण झाली व तसे प्रयत्न इंग्रजी साहित्यात झाले.
जोशी, रा. भि.; देवधर, वा. चिं.
व्हिक्टोरियन कालखंड (१८३७–१९०१) : व्हिक्टोरिया राणीच्या प्रदीर्घ कारकीर्दीतील वाङ्मयाचे तीन कालखंड पडतात : पहिला १८३७ ते १८४८, दुसरा १८४८ ते १८७० व तिसरा १८७० ते १९०१. ह्यांतील पहिला कालखंड अत्यंत अवस्थतेचा व अनिश्चिततेचा होता, दुसरा वैज्ञानिक शोधांमुळे व विज्ञानप्रणीत यंत्रसंस्कृतीमुळे विश्वविषयक दृष्टिकोणात घडून आलेल्या बदलाचा आणि तिसरा आत्मसामर्थ्याच्या जाणीवेमुळे आणि स्थैर्यामुळे आलेल्या आत्मतुष्टीचा. ऐकोणिसाव्या शतकाचे शेवटचे दशक आधीच्या उत्साहाला उतरती कळा लागल्यासारखे काहीसे क्षीण प्रवृत्तींचे होते.
पहिल्या कालखंडाची सुरुवातीची वर्षे अस्वस्थतेची व अनिश्चिततेची होती कारण सामाजिक व आर्थिक विषमतेची देशात पराकाष्ठा झालेली होती. कनिष्ठ मध्यम वर्ग व गरीब जनता ह्यांच्या हालाखीला पारावार नव्हता. इंग्लंड अद्याप प्रामुख्याने कृषिप्रधान देश होता. दळणवळणाची साधने अत्यल्प व अप्रगत होती परंतु ह्या काळातच विल्यम कॉबेट (१७६३–१८३५), रॉबर्ट ओएन (१७७१–१८५८), एलिझाबेथ फ्राय (१७८०–१८४५) व फ्रान्सिस प्लेस (१७७१–१८५४) ह्या समाजसुधारकांनी सुधारणांचा पाया घातला. १८३२ च्या पहिल्या सुधारणा कायद्याने कनिष्ठ मध्यम वर्गाला राजकीय मताचा हक्क मिळाला. १८६७, १८८४, १८८५ मधील कायद्यांनी हे हक्क अधिक व्यापक व दृढ केले. मध्यम वर्गाचे समाजातील स्थान निश्चित झाले. सरंजामदार वर्गाची अधिसत्ता नष्ट होत चालली. व्यक्तिस्वातंत्र्यवादी विचारसरणी अर्थक्षेत्रात, सामाजिक जीवनात आणि तत्त्वज्ञानात प्रभावी ठरू लागली.
ह्याच सुमारास विज्ञानातील शोधांनी अत्यंत महत्त्वाचा पल्ला गाठला व त्यामुळे अवलोकनाची क्षेत्रे विस्तारली व पर्यायाने विचारांना नवी क्षेत्रे व नव्या दिशा मिळाल्या. रेलगाड्या, वाफेवर चालणारी जहाजे विद्युत् संदेशयंत्रे, समुद्रातून घातलेल्या दूरध्वनिवाहक तारा ह्या शोधांनी दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. नव्या यंत्रयुगाचा व उद्योगप्रधानतेचा पाया घातला गेला. एका नव्या सामर्थ्याच्या जाणिवेने आणि विजिगीषू वृत्तीने मध्यम वर्ग भारावला. ह्याच कालखंडात इंग्रजी साम्राज्याच्या कक्षा विस्तृत व पक्या झाल्या. विचारांत आणि देशाच्या अंतर्गत व्यवस्थेत उदारमतवाद व स्वातंत्र्य, तर वसाहतीत अत्यंत निर्घृण व्यवस्थेत असा स्वातंत्र्याचा संकोच व पिळवणूक असा परस्परविरोधही दिसू लागला पण त्याचबरोबर उदारमतवाद सर्वत्र लागू करावा, असे म्हणणारेही इंग्रज विचारवंत होते.
विचारक्षेत्रात, तसेच भौतिकी व जीवविज्ञान ह्या क्षेत्रांत चार्ल्स लायेल (१७९७–१८७५) आणि ⇨ चार्ल्स डार्विन (१८०९–१८८२) यांसारख्यांच्या शोधांमुळे नवी दालने उघडली गेली. मानव हा ईश्वरनिर्मित, ईश्वराची प्रतिकृती म्हणून पूर्णावस्थेत अवतरला नसून त्याचे जीवसृष्टीशी अविभाज्य नाते आहे, हे प्रस्थापित झाले. काल व अवकाश ह्या दोन्ही दृष्टींनी त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. ह्यामुळे धर्मश्रद्धेला फार मोठा तडा गेला व एक तऱ्हेचा संशयवाद, अश्रद्धा. अज्ञेयवाद यांचा प्रभाव वाढू लागला. बारीकसारीक तपशीलांत मानवी प्रज्ञा रमू लागली व ह्या तपशीलांचे वैज्ञानिक पद्धतीने पृथक्करण, विश्लेषण करण्याची प्रवृत्ती वाढीला लागली. हे विशेष सर्व वाङ्मयप्रकारांत व कलाप्रकारांत आढळून येतात. ह्याच्या पाठीमागे एक तऱ्हेचा समन्वय साधण्याचा, स्थिरता आणण्याचा प्रयत्न दिसतो.
मध्य व्हिक्टोरियन काळात ह्या स्थिरतेच्या प्रयत्नांना सामाजिक व आर्थिक क्षेत्रांत यश आलेले दिसते. मध्यम वर्गाला स्थैर्य येऊन त्याची सुबत्तेची स्वप्ने प्रत्यक्षात आली. राणी व्हिक्टोरिया व तिचे कौटुंबिक जीवन हे मध्यमवर्गीय संसाराचे आदर्श बनले. स्थिरतेबरोबरच संकुचितता आणि आत्मसंतुष्टपणा ह्या वृत्ती बळावल्या. १८५१ मध्ये लंडनमध्ये जे मोठे प्रदर्शन भरले, त्यामुळे इंग्रजी तंत्रविज्ञानाची प्रतिष्ठा जगजाहीर झाली. ह्या सुमारास टेनिसनसारख्या कवींनी अथवा मेकॉलेसारख्यांनी इंग्रजी सामर्थ्याचे पोवाडे गद्यपद्यात गायिले. उपयुक्ततवादासारख्या विचारसारणीने विज्ञानाला सामाजिक व्यवहारात आणण्यास मदत केली परंतु खऱ्याखुऱ्या अर्थाने विज्ञाननिष्ठेचा जीवनाच्या अंगोपांगांत सखोल प्रवेश झाला, असे दिसत नाही. औद्योगिक क्रांतीनंतर नव्याने उदयाला आलेल्या मध्यम वर्गाने बुद्धिवादाऐवजी व्यवहारवाद स्वीकारला, क्रांतिकारक बदलांऐवजी तडजोडीचा आश्रय केला, मूल्यांना एक तऱ्हेची सवंग क्षुद्रता आणली. नीतिक्षेत्रात सोवळेपणा, सामाजिक क्षेत्रात सभ्यताधिष्ठित अहंता, वर्गनिष्ठा व संकुचितता बळावली. ह्या तडजोडीपासून ह्या काळातील श्रेष्ठ लेखकही अलिप्त नाहीत. ह्यामुळे ‘व्हिक्टोरियन’ ही संज्ञा संकुचितता, स्वार्थ, ढोंगी वृत्ती, आत्मसंतुष्टपणा ह्यांना लागू पडू लागली व ह्या वृत्तींचा अत्यंत कडवट उपहास विसाव्या शतकात होऊ लागला.
वास्तविक व्हिक्टोरियन जीवनाची ही एक बाजू आहे. ह्याबरोबरच संशोधनवृत्ती, चिकित्सा, सूक्ष्मता हे गुण ह्या काळात दिसतात. व्यवहारवादी तडजोडवृत्तीवर ध्येयवादाच्या व सांस्कृतिक मूल्यकल्पनांच्या आधारे हल्ले चढवलेले दिसतात. ⇨ लॉर्ड ॲल्फ्रेड टेनिसन (१८०९–१८९२), ⇨ रॉबर्ट ब्राउनिंग (१८१२–१८८९), ⇨ मॅथ्यू आर्नल्ड (१८२२–१८८८) यांसारख्या कवींनी अथवा ⇨ चार्ल्स डिकिन्झ (१८१२–१८७०), ⇨ विल्यम मेकपीस थॅकरी (१८११–१८६३), ⇨ जॉर्ज एलियट (१८१९–१८८०), ⇨ शार्लट ब्राँटी (१८१६–१८५५), ⇨ एमिली ब्राँटी (१८१८–१८४८) यांसारख्या कादंबरीकारांनी किंवा ⇨ कार्लाइल (१७९५–१८८१), ⇨ रस्किन (१८१९–१९००), ⇨ जॉन स्ट्यूअर्ट मिल (१८०६–१८७३) यांसारख्या विचारवंतांनी नव्या मूल्यांचा पुरस्कार केलेला दिसतो. ह्या प्रयत्नांमागे स्वच्छंदतावादातील सहानुभूतीचे सातत्य दिसते व म्हणून हा काळ स्वच्छंदतावादाचे एक परिणत स्वरूप मानला जातो. फरक एवढाच, की स्वच्छंदतावादी कवी मानवाला निसर्गाचा एक घटक मानीत, तर आता मानव व निसर्ग यांचे नाते अधिक मूलभूत आणि अविभाज्य एकतेचे वाटू लागले. सहानुभूतीने मानवामानवांतील संबंध नव्या पायावर आधारावे, अशी जाणीव कधी बुद्धिवादी दृष्टिकोणातून तर कधी भावनेने ओथंबलेल्या ललित पद्धतीने प्रकट होऊ लागली. आरंभीच्या आत्यंतिक व्यक्तिवादावर तोडगा म्हणून समूहवादी, समाजवादी विचारप्रणालीही निर्माण झाल्या.
ह्या युगातील तिसऱ्या कालखंडात आधीच्या अस्वस्थतेला विरोधी असे प्रशांत वातावरण दिसते. एक प्रकारच्या कार्यतत्परतेने, नवे निर्माण करण्याच्या ईर्ष्येने मध्यम वर्ग भारावलेला दिसतो. नव्या सुधारणा अंमलात येऊन गुलामगिरीसारख्या प्रथा नष्ट झालेल्या दिसतात. सामाजिक व नैतिक प्रश्नांकडे पाहण्यात गांभीर्य दिसते. नव्या प्रेषिताच्या आवेशाने रस्किन, कार्लाइल, आर्नल्ड यांचे लिखाण प्रकट होताना आढळते. आपणाला मार्गदर्शन करावे, अशी वाचकवर्गाची अपेक्षा पुरी करण्यात यश आलेले दिसते. हा वाचकवर्ग नवशिक्षित असून त्याची वाचनाची भूक फार मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. वृत्तपत्रांच्या आणि नियतकालिकांच्या प्रसारामुळे ही भूक शमण्यास मदत होत होती. कनिष्ठ मध्यम वर्गाला व काही प्रमाणात श्रमिकांना मिळालेल्या मतदानाच्या हक्कामुळे केवळ भूतदयेपेक्षा हक्कांवर आधारलेली समतेची मागणी पुढे आली व राजकारणात श्रमिकांच्या मजूरपक्षाचा (लेबर पार्टी) उदय झाला. विविधता, वैचित्र्य व वैपुल्य ह्या तिन्ही लक्षणांनी युक्त अशा साहित्याची निपज हा ह्या सर्व काळाचा विशेष ह्या कालखंडात अधिक प्रकर्षाने दिसतो.
गद्य : विज्ञानक्षेत्रातील कल्पना, संशोधनाचे फलित व निष्कर्ष यांचा दैनंदिन सामान्य समाजजीवनाशी अतूट संबंध व्हिक्टोरियन काळात जोडला गेला. बुद्धिवादी प्रवृत्तींना व्यवहारात उपयुक्ततावादी तत्त्वज्ञानाचा आश्रय घेऊन अधिकांचे अधिक सुख, ह्या तत्त्वावर समाज, शासन व कायदा यांची पुनर्रचना करण्याचे प्रयत्न केले. प्रत्येक सामाजिक संस्था ह्या दृष्टीने उपयुक्त आहे किंवा नाही हे तपासून तिची योग्यायोग्यता निश्चित केली गेली. उपयुक्ततावादावर आधारलेले व्यक्तिस्वातंत्र्य व उदारमतवाद यांचा मध्यम वर्गाने स्वीकार केला व अनेक सामाजिक संस्थांमध्ये आणि सरकारी कायद्यांमध्ये इष्ट परिवर्तन घडवून आणले.
विचारांच्या क्षेत्रात जीवनाचा, विश्वसंसाराचा अर्थ उलगडून त्यातून काहीतरी सोपे, सरळ तत्त्व शोधून काढण्याची वृत्ती ह्यातूनच निर्माण झाली. डार्विनच्या उत्क्रांतितत्त्वाने केवळ विज्ञानातच क्रांती केली असे नव्हे, तर विचाराची सर्व दिशाच बदलून टाकली. जीवविज्ञानात डार्विनने जे केले, ते आखिल विश्वाला व सर्व मानवी व्यवहारांना लागू करण्याचा विशाल यत्न ⇨ हर्बर्ट स्पेन्सरने (१८२०–१९०३) केला. डार्विन, स्पेन्सर, जॉन स्ट्यूअर्ट मिल यांनी ज्ञानाची एकात्मता प्रस्थापित करण्याचे यत्न केले. हे कार्य क्लिष्ट, गुंतागुंतीचे आणि अतिश्रमाचे आहे, ते काळजीपूर्वक विगमनपद्धतीच्या तर्कशास्त्राचा अवलंब करून केले पाहिजे, हे मिलने प्रस्थापित करण्याचा यत्न केला.
ह्या सर्व नवविचारांचे मूळ म्हणजे चार्ल्स डार्विन याचा ओरिजन ऑफ स्पिशीज (१८५९) हा ग्रंथ होय. परिस्थितिभिन्नता आणि समर्थपणे जगण्याची गरज ह्यांतून प्राणिमात्राची उत्क्रांती होत गेली. ही उपपत्ती क्रांतिकारक होती. सृष्टीतील उत्पत्ती, धर्म नीती ह्यांसंबंधीच्या परंपरागत श्रद्धांना धक्का देणारी होती. ह्या सिद्धांताच्या कसोटीवर सर्वच राजकीय-सामाजिक संस्था, सामाजिक व्यवहार आणि त्यांतील भिन्नता पारखून घेणे शक्य झाले आणि त्यानंतरच्या काळात तसे पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले.
ज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये समन्वय घडवून आणण्याचा, त्यांमागील एक तत्त्व शोधून काढण्याचा सर्वांत मोठा प्रयत्न हर्बर्ट स्पेन्सरने केला. बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर ज्ञात विश्व पादाक्रांत करता करता ज्ञाताच्या पलीकडे एक अज्ञेयाचा प्रांत लागतो व तो तसा मानणे अपरिहार्य ठरते, हा त्याचा निष्कर्ष आहे. बुद्धिनिष्ठ आणि व्यवहारी उपयुक्ततावादाला माणसामधल्या उपजत कर्तव्यबुद्धीची जोड देऊन आणि माणसाच्या जबाबदारीच्या क्षेत्राचा विस्तार करून त्याने एका व्यापक आणि आदर्श नीतितत्त्वाचा पाया घातला. त्याची सगळी विचारसरणी किंवा सिद्धांत जरी आज स्वीकारले जात नसले, तरी विज्ञान आणि तत्त्वज्ञान ह्यांचा समन्वय घडवून आणण्याचा त्याचा प्रयत्न मान्य झाला.
बुद्धिवाद व उपयुक्ततावाद यांचा कुलगुरू, असे ज्याचे सार्थ वर्णन केले जाते तो जॉन स्ट्यूअर्ट मिल याचे विचारवंत व तत्त्वज्ञ म्हणून असाधारण महत्त्व आहे. वडील ⇨ जेम्स मिल (१७७३–१८३६) तसेच जेरेम बेंथॅम (१७४८–१८३२) यांजकडून त्याला उपयुक्ततावादाचा वारसा मिळाला होता. व्यक्तिवादावर त्याची दृढ श्रद्धा होती. बुद्धिनिष्ठा आणि व्यावहारिक गरज ह्यांतच सर्व मानवी जीवन सामावलेले नाही. कल्पनाशक्ती, अंत:प्रेरणा, सहानुभूती, भावनांचा जिव्हाळा, सौंदर्यदर्शनापासून होणारा आनंद, व्यवहाराच्या बंधनापासून दूर जाण्याची इच्छा अशा मानवी मनाच्या अनेक इतर शक्ती आणि प्रवृत्ती असतात, हे त्याने ओळखले. सुखाचे मोजमाप करता येत नाही. सुखकल्पनेत गुणवत्तेला महत्त्व आहे, हे त्याने जाणले आणि उपयुक्ततावादाला आवश्यक ते वळण दिले. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याला महत्त्व असले, तरी व्यक्ती समाजाशी संबद्ध असते. ह्या संबंधामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्याला पडणाऱ्या मर्यादा लक्षात घेण्याची आवश्यकता त्याने ओळखली. पूर्वग्रह, परंपरा, संस्थात्मक जीवन हे मानवी स्वातंत्र्याचे शत्रू ठरतात व ह्या निर्बंधांतून पार पडण्यासाठी व्यक्तिगत सदसद्विवेकबुद्धीवर आधारलेला सविनय कायदेभंग तो मान्य करतो. हे त्याचे विचार ऑन लिबर्टी (१८५९) ह्या त्याच्या ग्रंथात आले असून ह्या ग्रंथाचे महत्त्व आजपर्यंत टिकून राहिले आहे व भिन्नभिन्न देशांतील विचारवंतांना तो स्फूर्तिप्रद ठरला आहे.
बुद्धिवाद आणि उपयुक्ततावाद हे व्यापार कारखानदारीत संपत्ती मिळविणाऱ्यांना फायद्याचे होते. बुद्धिवादातील तर्ककर्कशता, उपयुक्ततावादातील व्यावहारिकता, डार्विनच्या उत्क्रांतिवादातील जीवनार्थ कलहाचे तत्त्व आणि लायक असेल तो टिकेल हा सिद्धांत, हे सर्व त्यांना इष्ट असेच होते कारण अर्थसंपादन ही त्यांची प्रेरणा होती आणि स्पर्धा हे त्यांच्या व्यवहाराचे मूलतत्त्व होते. पण ह्या वादांचे किंवा त्यांना मिळालेल्या वळणाचे समाजावर आणि व्यक्तिमनावर जे परिणाम होत होते, त्यांनी ह्या शतकातील विचारी मनांना अस्वस्थ केले होते.
सामाजिक व्यवहारात रुक्षता आणि सहानुभूतिशून्यता येत चालली होती. धनिकांची भरभराट होत होती; पण गरीब कामगारांचे हाल होत होते. यंत्रनिर्मित वस्तूंत सौंदर्याचा अभाव होता. कला आणि साहित्य ह्यांचा आस्वाद उपयुक्ततावादाच्या चौकटीत बसत नव्हता. अंत:प्रेरणा, उदात्त भावना, कल्पनाशक्ती ह्यांना त्यात स्थान नव्हते. नीतिमत्ता हा एक आध्यात्मिक गुण असण्याऐवजी ती एक व्यवहाराची रीत झाली होती. त्यामुळे ढोंगाला उत्तेजन मिळत होते. १८३० पासून पुढची तीसचाळीस वर्षे ह्या घातक आणि कोंदट परिस्थितीविरुद्ध अनेक विचारवंतांनी अनेक प्रकारांनी प्रचार केला.
ह्या विचारवंतांत टॉमस कार्लाइल, ⇨ जॉन हेन्री न्यूमन (१८०१–१८९०), जॉन रस्किन आणि मॅथ्यू आर्नल्ड ह्यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. ह्यांच्या लेखनात विचारांचा जोमदारपणा, आवेश आणि वाङ्मयीन गुणही आहेत. प्रचलित विचारसरणीचा आणि प्रवृत्तींचा पाठपुरावा करणारा म्हणून ⇨ टॉमस बॅबिंग्टन मेकॉले (१८००–१८५९) ह्याचाही उल्लेख केला पाहिजे. मेकॉले मुख्यत: शैलीसाठी प्रसिद्ध असून त्याच्या बॉरन हेस्टिंग्ज, जॉन्सन अथवा मिल्टन यांवरील निबंधांतून व हिस्टरी ऑफ इंग्लंड (४ खंड, १८४८–१८५५) ह्या इतिहासग्रंथातून त्याचा मध्यमवर्गीय आशावाद व इंग्रजी उदारमतावरचा गाढा विश्वास सुगम, सुश्लिष्ट, नागर अशा शैलीत स्पष्ट झाला आहे. त्यामध्ये साम्राज्यवादाचे गोडवे गायलेले दिसतात व आत्मसंतुष्टतेने आलेल्या संकुचिततेची भावनाही दिसते.
कार्लाइलवर जर्मन चिद्वादी तत्त्वज्ञान व कोलरिजची परंपरा यांचा प्रभाव दिसतो. त्याच्या Sartor Resartus (१८३६, इं. शी. द टेलर रीपॅच्ड) ह्या ग्रंथातील विचारांना बायबलमधील प्रेषिताच्या उद्गारांचे स्वरूप आले आहे. ह्या आत्मकथनपर ग्रंथात नास्तिवाची भूमिकेपासून अस्तिवाची श्रद्धेपर्यंत झालेला लेखकाचा वैचारिक प्रवास भावनाविष्काराने ओथंबलेल्या लालित्य-पूर्ण शैलीत वर्णिलेला दिसतो. ह्यात एक आकर्षक गूढवादी वृत्ती दिसते. ह्या गूढवादातून इतिहासाकडे पाहताना मानवाच्या सर्व इष्ट, आदर्श सत्प्रवृत्तींचा परिपाक कार्लाइलला धीरोदात्त नायकांत व विभूतींमध्ये दिसून आला. इतिहास म्हणजे ह्या विभूतींची चरित्रे, असे त्याचे प्रतिपादन ऑन हीरोज, हीरो वर्शिप अँड हिरोइक इन हिस्टरी (१८४१) ह्या ग्रंथात दिसते. स्वत:चा आत्मा गमावलेल्या समाजाचे अध:पतन, द फ्रेंच रेव्होल्यूशन (१८३७) ह्या ग्रंथात भावपूर्ण, व्यक्तिवादी, विक्षिप्त शैलीत केलेले आढळते. तत्कालीन परिस्थितीसंबंधीचे असमाधान आणि चीड त्याच्या साहित्यात दिसते. आवेश, काव्यात्मकता, कल्पनासामर्थ्य आणि आदर्शवाद ह्या कार्लाइलच्या गुणांनी त्याच्या वाङ्मयाला वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप दिले आहे.
जॉन हेन्री न्यूमनचे कार्य मुख्यत: धार्मिक क्षेत्रात असले, तरी परंपरानिष्ठ कॅथलिक पंथाचा त्याने घेतलेला आश्रय व ऑक्सफर्ड मूव्हमेंट ह्या धार्मिक आंदोलनात त्याने घेतलेला भाग उपयुक्ततावादाच्या विरुद्ध प्रतिक्रिया दर्शवितो. द आयडिया ऑफ अ युनिव्हर्सिटी (१८५२) ह्या त्याच्या विश्वविद्यालयीन शिक्षणासंबंधीच्या व्याख्यानात शुद्ध ज्ञानसाधना आणि बुद्धी व भावना यांचा समतोल साधलेला सभ्य गृहस्थ घडविणे ही विश्वविद्यालयीन शिक्षणाची उद्दिष्टे आहेत, असे त्याने प्रतिपादन केले. ह्या कल्पना उच्च शिक्षणाला पायाभूत ठरतील, इतक्या महत्त्वाच्या आहेत.
जॉन रस्किनवर कार्लाइलच्या विचारसरणीचा काही अंशी परिणाम झालेला होता. औद्योगिक क्रांतीच्या आरंभाच्या काळातील स्वार्थी, सहानुभूतिशून्य प्रवृत्तींवर कलाहीन, असुंदर वातावरणावर आणि बाजारी मूल्यांवर त्याने अन्टू धिस लास्ट (१८६०–१८६२) व सेसमी अँड लिलीज (१८६५) यांमधून टीका केली. हस्तव्यवसायावर आणि शरीरश्रमावर आधारलेल्या सहकारी समाजवादाचा त्याने पुरस्कार केला. कार्यतत्परतेवर त्याचा विश्वास कार्लाइलइतकाच दृढ होता परंतु हे काम सुंदर, सर्जनशील व फलदायी असावे, असा त्याचा आग्रह होता. यांत्रिक जडतेमुळे हरपलेली जीवन जगण्याची कला पुन्हा जोपासण्याची त्याला तळमळ होती. ह्या दृष्टीने चित्रकला, मूर्तिकला, वास्तुकला इ. कलांचे महत्त्व त्याने जाणले. द सेव्हन लँप्स ऑफ आर्किटेक्चर (१८४९), द स्टोन्स ऑफ व्हेनिस (३ खंड, १८५१–१८५३), मॉडर्न पेंटर्स (५ खंड, १८४३–१८६०) हे ग्रंथ लिहून त्याने चित्रकला व मूर्तिकला ह्यांच्या रसग्रहणाला नवे वळण लावले.
मॅथ्यू आर्नल्डची कवी म्हणून कामगिरी महत्त्वाची असली, तरी वाङ्मयसमीक्षक व संस्कृतिमूल्यांचा भाष्यकार म्हणून त्याचे अधिक महत्त्व आहे. असंस्कृतपणा, रासवटपणा, बाजारी मूल्यांची सवंग लोकप्रियता यांनी समाज कसा अवनतीपर्यंत जाऊन पोचतो, ह्याचे चित्रण त्याने कल्चर अँड ॲनर्की (१८६९) या ग्रंथात केले व सौंदर्य आणि ज्ञान (स्वीटनेस अँड लाइट) ह्यांचा पुरस्कार केला.
काव्य : व्हिक्टोरियन काळातील प्रत्येक नामवंत कवीचा स्वच्छंदतावादाशी आणि स्वच्छंदतावादी कवींशी संबंध आहे. टेनिसनच्या काव्यातील इंद्रियगोचर अनुभूतींच्या कलात्मक, सौंदर्यपूर्ण गौरवाचे स्फूर्तिस्थान कीट्स आहे, तर रॉबर्ट ब्राउनिंगच्या प्रणयकाव्यातील बारकाव्यांचा आणि त्याच्या कलाध्येयाचा शैलीशी संबंध पोचतो. मॅथ्यू आर्नल्डने गटे व बायरन यांच्याकडून स्फूर्ती घेतली, तर ⇨ डँटी गेब्रिएल रोसेटी (१८२८–१८८२) व त्याच्या समूहातील ‘प्री-रॅफेएलाइट’ कवी ह्यांना कीट्सचा सौंदर्यवाद आकर्षक वाटला.
तत्कालीन तत्त्वविचार, वैज्ञानिक संशोधन व निष्कर्ष ह्यांचा व्हिक्टोरियन काळातील काव्यात आकर्षक समावेश झाला आहे. ॲल्फ्रेड टेनिसन हा ह्या युगातील प्रातिनिधिक कवी. त्याची लोकप्रियता आज ओसरलेली असली, तरी विज्ञानामुळे मानवी जीवनात आलेली विफलता, उत्क्रांतितत्त्वामुळे धर्मश्रद्धेला गेलेले तडे, जीवनातील दु:खांचा तसेच सुखासीनतेचा उबग आल्यावर स्वत:च्या कल्पनाविश्वात दंग होण्याची चिंतनशील अथवा पलायनवादी प्रवृत्ती यांचे अंत्यत कलात्मक चित्रण त्याच्या प्रमुख काव्यांत दिसते (उदा., इन मेमोरिअम ए. एच्. एच्, आयडिल्स ऑफ द किंग, लोटस इटर्स, लेडी ऑफ शॅलट). त्याच्या कवितांतील निसर्गचित्रे व त्यांत कोंदणासारख्या बसविलेल्या मानवी भावावस्था आजही आकर्षक वाटतात. मॉड आणि यूलिसिझ ह्या भावकाव्यांत नादमाधुर्य, शब्दसंगीत, चिंतनशीलता या टेनिसनच्या गुणांना मनोज्ञ स्वरूप आलेले दिसते.
रॉबर्ट ब्राउनिंगने केलेल्या मानवी भावानस्थांच्या चित्रणात व्यापक सहानुभूती व कल्पनाशक्ती ह्यांचा प्रत्यय येतो. त्याने काव्यात चित्रत केलेली भावावस्थांची आणि मानसिक प्रवृत्तींची अभिव्यक्ती स्वगताचे नाट्यमय रूप येऊन अवतरली. त्या दृष्टीने त्याची नाट्यत्मक एकभाषिते संस्मरणीय आहेत. संशयाशी, निराशेशी, विफलतेशी मुकाबला देत देत आस्तिक्यबुद्धी आणि आशावाद टिकविला पाहिजे, ह्या मनोभूमिकेतून ब्राउनिंगची दीर्घकविता अवतरली. त्याच्या काव्यात मूर्तिकला, संगीत, चित्रकला ह्या ललित कलांचा निकटचा संबंध दिसतो. ह्या कलाक्षेत्रांतील कलावंतांनी त्याला विषय पुरविले व एक व्यापक चिंतनशीलता दिली (मेन अँड विमेन, १८५५ आणि पिपा पासेस). ब्राउनिंगप्रमाणेच त्याची पत्नी ⇨ एलिझाबेथ बाउनिंग (१८०६–१८६१) हिची भावपूर्ण प्रणयकविता सॉनेट्स फ्रॉम द पोर्तुगीजमध्ये (१८५०) आहे. ऑरोरा लीमध्ये (१८५६) तिने सामाजिक प्रश्न हाताळले. तिच्या काव्यात स्त्रीचा वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोण दिसतो.
ब्राउनिंगपेक्षाही अधिक प्रकर्षाने यूरोपमधील चित्रकलेची स्फूर्ती घेऊन प्री-रॅफेएलाइट कवींची कविता प्रकटली. ⇨ ॲल्जर्नन चार्ल्स स्विन्बर्न (१८३७–१९०९), डँटी गेब्रिएल रोसेटी, विल्यम होलमन हंट (१८२७–१९१०), जॉन मिले, ⇨ विल्यम मॉरिस (१८३४–१८९६) हे कवी व चित्रकार ह्या कविसमूहातील प्रमुख. उत्कट निसर्गप्रेम व सहजसुंदरता हे रॅफेएल ह्या इटालियन चित्रकारापूर्वी चित्रकलेत असलेले गुण काव्यात आणण्याचा ह्यांचा प्रयत्न. त्याचे मनोहर रूप तपशीलाने, सूक्ष्म बारकाव्याने आणि सौंदर्यवृत्तीने नटलेल्या ‘ब्लेस्ड डॅम्सेल’ सारख्या रोसेटीच्या काव्यात दिसते. क्रिस्टीना रोसेटी (१८३०–१८९४) व विल्यम मॉरिस यांच्या काव्यात दलितांबद्दलचा कळवळा व सहानुभूती दिसते. हे काव्य टॉमस हूडसारख्या (१७९९–१८४५) कवीच्या उघड प्रचारकी काव्यापेक्षा अधिक कलात्मक व स्फूर्तिप्रद आहे.
मॅथ्यू आर्नल्ड व आर्थर ह्यू क्लफ (१८१९–१८६१) ह्यांनी विज्ञानाच्या प्रगतीने जो संशयवाद बळावला, त्याचे मनोज्ञ चित्रण केले. बौद्धिक कल्पना, निराशेची छटा, जीवनाची क्षणभंगुरता आणि अस्थिरता ह्यांना आर्नल्डने दिलेले काव्यरूप मोठे आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण वाटते. क्लफच्या काव्यात ह्या सर्व छटांबरोबरच शेवटी आशावादी निष्कर्ष काढलेले दिसतात.
जीवनातील विफलता, क्षणभंगुरता, मानवी मूल्यांची अस्थिरता ह्यांचा उबग येऊन क्षणाक्षणातील जीवनानंद लुटण्याची सुखवादी वृत्ती ⇨ एडवर्ड फिट्सजेरल्डने (१८०९–१८८३) अनुवादिलेल्या उमर खय्यामच्या रूबायात मोठे सौंदर्यपूर्ण आणि लयबद्ध काव्यरूप घेऊन अवतरलेली दिसते. ⇨ टॉमस हार्डी (१८४०–१९२८) व ⇨ जेरार्ड मॅन्ली हॉपकिन्झ (१८४४–१८८९) हे कवी व्हिक्टोरियन काळातले परंतु वृत्तीने विसाव्या शतकातील प्रवृत्तींशी अधिक जवळचे. हार्डीचे काव्य दैनंदिन जीवनातील साध्या प्रसंगांशी निगडित आहे. त्याचे निसर्गप्रेम अत्यंत विशुद्ध व खरेखुरे भासते. हॉपकिन्झ ह्या रोमन कॅथलिक भिक्षूचे काव्य तत्कालीन प्रवृत्तीपेक्षा अत्यंत भिन्न प्रवृत्तीचे असून त्यातील कल्पनांची भरारी आणि अध्यात्मवादी किंवा मेटॅफिजिकल वातावरण ह्यांचे डनसारख्या कवींशी साधर्म्य आहे. वृत्तरचनेत व नादमाधुर्यात त्याचे काव्य एलिझाबेथकालीन स्वच्छंदतावादी काव्याच्या परंपरेशी अधिक जुळते. आत्यंतिक धर्मभावनेला इंद्रियगोचर अनुभूतींची जोड देऊन भावपूर्ण, आवेशमय काव्यरचना करण्यात ह्या कवीला मोठे यश प्राप्त झालेले दिसते. टेनिसन, आर्नल्ड व रोसेटी ह्यांच्यापासून स्फूर्ती घेतलेले अनेक लहानमोठे कवी ह्या सबंध काळात दिसतात.
एडवर्ड लीअरने (१८१२–१८८८) लिहिलेल्या बुक ऑफ नॉन्सेन्स (१८४६), नॉन्सेन्स साँग्ज… (१८७१), मोअर नॉन्सेन्स साँग्ज (१८७२) इत्यादींमधील वैचित्र्यपूर्ण आणि विक्षिप्त काव्यरचनेने निरर्थिका आणि वात्रटिका ह्यांसारखे काव्यप्रकार लोकप्रिय केले. लीअर हा चित्रकारही होता.
कादंबरी : कादंबरीवाङ्मयाला अठराव्या शतकात चांगला बहर आला होता. त्याने विविध रूपे धारण केली होती पण शतकाच्या अखेरीअखेरीला त्याचा भर ओसरू लागला होता आणि एकोणिसाव्या शतकाच्या आरंभकाळात तर नाव घेण्यासारखे एकदोनच कांदबरीकार दिसतात. व्हिक्टोरियन युगात कादंबरीवाङ्मयाला पुन्हा बहर आला. विविधता, विपुलता, वैचित्र्य व कलागुण ह्या सर्व दृष्टींनी व्हिक्टोरियन युगातील कादंबरी संपन्न आहे. लोकशाही स्थिरावल्यावर व मध्यम वर्गाला निश्चित स्थान मिळाल्यावर कादंबरीने गद्यमहाकाव्याचे रूप घ्यावे, हे साहजिकच होते. ह्या काळातील भूतदयावाद, उत्क्रांतितत्त्वासारखे विज्ञानप्रणीत प्रवाह, नीतिपर अथवा धर्मपर भूमिकेवरून केलेले तत्त्वचिंतन, समाजसुधारणेच्या प्रवृत्ती, ढोंग, संकुचितता, स्वार्थ ह्यांचा उपहास, विडंबन व नवी मूल्ये प्रस्थापित करण्याचा ध्येयवाद ह्या सर्व प्रेरणा व प्रवृत्ती ह्या काळातील कादंबरीत दिसतात. आरंभी आरंभी नियतकालिकांतून कादंबऱ्या प्रसिद्ध होत. त्यामुळे त्यांना मोठा वाचकवर्ग लाभला परंतु हप्तेबंदीने लिहिण्याच्या पद्धतीमुळे विस्कळीतपणा, रचनाशैथिल्य हे दोषही कादंबरीत शिरले. चार्ल्स डिकिन्झ, विल्यम मेकपीस थॅकरी, शार्लट ब्राँटी व एमिली ब्राँटी, ⇨ एलिझाबेथ गॅस्केल (१८१०–१८६५), जॉर्ज एलियट ऊर्फ मेरी ॲन एव्हान्स, ⇨ जॉर्ज मेरेडिथ (१८२८–१९०९), टॉमस हार्डी हे ह्या काळातील प्रमुख कादंबरीकार, यांशिवाय ⇨ रॉबर्ट लूई स्टीव्हन्सन (१८५०–१८९४), ⇨ चार्ल्स रीड (१८१४–१८८४), ⇨ विल्यम विल्की कॉलिंझ (१८२४–१८८९), ⇨ अँटोनी ट्रॉलप (१८१५–१८८२), जॉर्ज गिसिंग (१८५७–१९०३), ⇨ सॅम्युएल टॉमस बटलर (१८३५–१९०२) आणि विल्यम मॉरिस ह्यांनीही कादंबरीवाङ्मयात वैशिष्ट्यपूर्ण भर घातली. विशेषत: ह्या काळात नौकानयन, प्रवास, प्रादेशिकता व व्यवसाय ह्यांवर आधारलेल्या भिन्न थरांतील लोकांचे रंजन करणाऱ्या कादंबऱ्या विपुल प्रमाणात निर्माण झाल्या. अत्यंत प्रगल्भ जीवनदर्शनापासून सामान्य, सवंग जनरंजनापर्यंत अनेकविध नमुने कादंबरीक्षेत्रात बघण्यास मिळू लागले.
डिकिन्झच्या द पिक्विक पेपर्स (१८३७), ऑलिव्हर ट्विस्ट (१८३८), डेव्हिड कॉपरफील्डसारख्या (१८५०) कादंबऱ्यांनी आपली लोकप्रियता अद्यापि टिकविली आहे, ती त्यांतील चमकदार विनोदाने, मानवतेने ओथंबलेल्या भावपूर्ण व अत्यंत विदारक अशा समाजदर्शनाने. जीवनातील वैचित्र्य आणि विविधता व सामान्यांचे असामान्य जग कलात्मकतेने चित्रित करण्यात डिकिन्झला मोठे यश मिळाले व त्यामुळे त्याच्या रचनाकौशल्याच्या अभावाचा दोष झाकून गेला. थॅकरीने व्हॅनिटी फेअर (क्रमश: प्रसिद्ध १८४७–४८), हेन्री एझ्मंड (१८५२) ह्यांसारख्या कादंबऱ्यांतून उच्च मध्यमवर्गीयांच्या अहंमन्यतेचा उपहास केला व बुद्धिवादी दृष्टिकोणातून त्या वर्गाचे सांस्कृतिक वातावरण चित्रित केले. त्याच्या चित्रणात डिकिन्झचा जिव्हाळा नसला, तरी त्याची सामाजिक टीका प्रखर व प्रभावी आहे.
ब्राँटी भगिनींपैकी शार्लटची जेन एअर (१८४७), एमिलीची वदरिंग हाइट्स (१८४८), एलिझाबेथ गॅस्केलच्या मेरी बार्टन (१८४८) आणि क्रॅनफर्ड (१८५३) ह्या कादंबऱ्या स्त्रीच्या प्रबळ परंतु अस्फुट आशाआकांक्षांचे आणि भावनांचे वेधक चित्रण करतात. अस्वस्थ, बंडखोर, चिंतनशील, कमालीची आत्मकेंद्रित अशी नवी स्त्री कादंबऱ्यात दिसते. जॉर्ज एलियट ही बहुश्रुत, तत्त्वचिंतक कादंबरीकर्ती नैतिक वा धार्मिक मूल्यांना मानवी रूप देण्यात यशस्वी झाली आहे. सत्यान्वेषी ऋजुता, काव्यमयता, सूक्ष्म मनोव्यापारदर्शन आणि प्रभावी स्वभावचित्रण इ. विशेष ॲडम बीड (१८५९), द मिल ऑन द फ्लॉस (१८६०), सायलस मार्नर (१८६१), मिड्लमार्च (१८७१–७२) ह्या तिच्या कादंबऱ्यांत प्रकट होते.
जॉर्ज मेरेडिथ हा ह्या कालखंडातील लोकप्रिय न झालेला, पण महत्त्वाचा कांदबरीकार, ढोंगी आणि पोकळ अंहकारी व्यक्ती, तत्कालीन समाजात येत चाललेला यांत्रिकपणा ह्यांवर त्याने टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समाजात स्थान असावे, ह्यावर भर दिला. अत्यंत बुद्धिनिष्ठ भूमिका, पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे व मनोव्यापारांचे सूक्ष्म विश्लेषण आणि उपहास ही त्याच्या कादंबरीलेखनाची वैशिष्ट्ये आहेत पण अत्यंत सूत्रमय भाषा, अलंकारांचा-विशेषत: रूपकांचा-अतिरिक्त उपयोग आणि बांधेसूद रचनेचा अभाव ह्यांमुळे त्याच्या कादंबऱ्यांना लोकप्रियता किंवा उच्च कलात्मक पातळी लाभली नाही. टॉमस हार्डीची कादंबरी अधिक अर्थघन आहे. उत्क्रांतिवादामुळे आणि नवीन शास्त्रीय शोधांमुळे ईश्वर आणि सृष्टी ह्यांच्या परस्परसंबंधांविषयीच्या परंपरागत कल्पनांना धक्का बसला होता. ईश्वर असलाच तर माणासाच्या सुखदु:खांविषयी उदासीन असला पाहिजे, अशी विचारसारणी हार्डीच्या कादंबऱ्यांत दिसते. निसर्ग, नागर सभ्यता आणि मानव स्वभाव ह्यांचे परस्परसंबंध, त्यांतून निर्माण होणारे ताण व संघर्ष आणि माणसाची असहायता हा त्याच्या बहुतेक कादंबऱ्यांचा गाभा आहे. निसर्ग हा त्याच्या कादंबऱ्यांतील एक जिवंत पात्र बनतो. हार्डीच्या कादंबऱ्यांची रचनाही वास्तुशिल्पांसारखी बांधेसूद आहे.ज्यूड द ऑब्स्क्युअरसारख्या (१८९६) आपल्या कादंबऱ्यांत त्याने सामान्य, परंतु प्रबळ भावनांच्या आहारी गेलेली माणसे आणि त्यांचे शोकमय जीवन यांचे अत्यंत मनोज्ञ चित्रण केले. हार्डीच्या दृष्टिकोणाचे गांभीर्य व मानवी जीवनाच्या अंतिम विफलतेबरोबरच त्यातील उदात्ततेला त्याने दिलेले महत्त्व ह्यांमुळे त्याच्या महत्त्वाच्या कलाकृतींना श्रेष्ठ शोकात्मिकेची भव्यता आणि खोली प्राप्त झाली आहे. रॉबर्ट लूई स्टीव्हन्सन याच्या डॉ. जेकिल अँड मिस्टर हाइडसारख्या (१८८६) रोमांचकारी कादंबऱ्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. त्यांतील साहसमय, रहस्यपूर्ण कथानकांची मोहिनी सर्व दर्जाच्या व सर्व काळातील वाचकांवर पडली आहे. विल्यम मॉरिससारखे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व फारच थोड्यांचे असेल. आपल्या विचारांच्या प्रचारासाठी त्याने कथा, कविता, कादंबऱ्या आणि प्रबंध लिहिले. आरंभी त्याच्यावर धार्मिक पुनरुत्थानाच्या चळवळीचा प्रभाव पडला होता नंतर कार्लाइलचा आणि मुख्यत: रस्किनचा, यंत्रयुगाने जीवनात जी अमानुषता, असुंदरता, घाणेरडेपणा, बकालपणा आणला होता, त्याबद्दल त्याला रस्किनप्रमाणेच चीड होती आणि कलेच्या साहाय्याने जीवन अधिक सुंदर व सामाजिक संबंध अधिक जिव्हाळ्याचे करता येतील असे वाटल्यामुळे तशा प्रयत्नाला तो लागला. पुस्तकांची छपाई सुधारावी म्हणून त्याने मुद्रणाचे खिळे तयार केले, छापखाना काढला, घरे सुशोभित व्हावी म्हणून नवनवीन नमुन्यांचे फर्निचर बनविले, पडद्यांच्या, गाद्यागिरद्यांच्या कापडावर नव्या नमुन्यांचे छापांचे काम केले. मध्ययुगात जीवन अधिक साधे, सुखाचे, सरळ होते, असे वाटून मध्ययुगीन कथांतून आणि काव्यातून आख्याने घेऊन रचना केली. त्याच्याही मागे जाऊन प्राचीन स्कँडिनेव्हियन, ग्रीक आणि लॅटिन वीरगाथांची, महाकाव्यांची भाषांतरे केली. शेवटी त्याला वाटले, की सर्वांना समान संधी देणारा समाजवाद अस्तित्वात आल्याखेरीज समाज खरोखर सुखी होणार नाही, म्हणून त्याने समाजादी चळवळ चालू केली. जॉर्ज बर्नार्ड शॉ याच्यावरही त्याचा परिणाम झाला. असा हा कर्मयोगी कलावंत आणि साहित्यिक होता.
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात व्हिक्टोरियन युगातील स्थिर मूल्यांबद्दल, बाजारी वृत्तीबद्दल आणि सामान्यतेला मिळालेल्या महत्त्वाबद्दल साशंकता निर्माण होऊन समाजाऐवजी व्यक्तीवर व तत्त्वज्ञान अथवा सामाजिक सुधारणा ह्यांऐवजी कलामूल्यांवर काही प्रतिभाशाली लेखकांनी शक्ती केंद्रित केलेली दिसते. हा काळ मूल्यविषयक अवनतीचा मानला जातो परंतु त्यात पुढील प्रवृत्तींची चाहूल लागते. फ्रान्समधील विमुक्त वातावरण, सुखासीनता व शुद्ध कलावादी संप्रदाय यांचा प्रभाव अधिक प्रमाणात दिसतो तर सामान्य, अभिरुचिशून्य वाचक व कलावंत ह्यांच्यामधील दरी रुंदावताना दिसते. कलावंत स्वत:च्या कलेची जपणूक करण्याचा प्रयत्न करतो. यात ⇨ वॉल्टर पेटरचे (१८३९–१८९४) वैचारिक व टीकात्मक लेखन व ⇨ ऑस्कर वाईल्ड (१८५४–१९००) ह्याची नाटके, टीका, काव्य, कथा आदी लेखन वादग्रस्त पण महत्त्वाचे ठरले. व्हिक्टोरियन काळातील मूल्यांच्या विरुद्ध बंडखोरी करून मूल्यकल्पनांपासून मुक्त अशा दृष्टिकोणाचा वाईल्डने स्वीकार केला. निखळ कलामूल्यांचा पाठपुरावा करणारी काही मोलाची समीक्षणे लिहिली. हलक्याफुलक्या, विनोदी, उपहासगर्भ नाटकांनी त्याने नाट्यक्षेत्रात महत्त्वाची भर घातली. ह्या बाबतीत त्याची तुलना रेस्टोरेशन काळातील नाटककार काँग्रीव्ह ह्याच्याशी केली जाते. काव्य, कथा, निबंध ह्यांत त्याने प्रयोगशील, कलात्मक दृष्टी ठेवली परंतु एक प्रकारच्या रोगट, आत्मकेंद्रित वृत्तीचे व विकृतींचे समर्थन करण्याची प्रवृत्तीही जोपासली.
नियतकालिकांचे कार्य: एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी जशी नियतकालिकांनी वाङ्मयीन कामगिरी बजावली, तशीच ती पुढेही बजावत राहिली. इतकेच नाही, तर त्यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार झाला. पुस्तकपरीक्षणे, गंभीर चर्चात्मक निबंध ह्यांबरोबरच कादंबऱ्याही नियतकालिकांतून क्रमश: प्रसिद्ध होऊ लागल्या. डिकिन्झच्या कादंबऱ्या नियतकालिकांतूनच प्रथम प्रसिद्ध झाल्या. १८५९ मध्ये स्थापन झालेल्या मॅक्मिलन्स मॅगझिनमध्ये टेनिसन, आर्नल्ड, हार्डी आणि हेन्री जेम्स ह्यांसारख्या लेखकांचे लेखन प्रसिद्ध होत असे. १८६० साली निघालेल्या कॉर्नहिल मॅगझिनमध्ये थॅकरी, ट्रॉलप, जॉर्ज एलियट, एलिझाबेथ गॅस्केल, हार्डी, हेन्री जेम्स ह्यांच्याप्रमाणेच विल्की कॉलिंझ आणि चार्ल्स रीड ह्यांच्या कादंबऱ्या क्रमश: प्रसिद्ध झाल्या. कॉर्नहिलमध्ये गंभीर स्वरूपाचे लेखन करणाऱ्यांत आर्नल्ड, रस्किन, जार्ज मेरेडिथ हे होते. १८६५ मध्ये स्थापन झालेल्या फोर्टनाइटली रिव्ह्यूमध्ये गंभीर समीक्षालेख प्रसिद्ध होत. त्यात लिहिणाऱ्यांमध्ये टी. एच्. हक्सली, लेस्ली स्टीव्हन, वॉल्टर पेटर, विल्यम मॉरिस, स्विन्बर्न व मेरिडिथ हे होते. ह्या नियतकालिकांपैकी काहींचा खप लाखाच्याही वर होता. ह्यावरून त्यांचे महत्त्व व त्यांचा प्रसार ह्याची कल्पना येऊ शकेल.
एकंदरीने पाहता एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीअखेरीचे इंग्लंडमधील दृश्य संकीर्ण स्वरूपाचे दिसते. पूर्वीच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळाली नव्हती आणि नवीन प्रश्न उपस्थित झाले होते. १८७१ मध्ये जर्मनीकडून फ्रान्सचा पराभव झाला. जर्मनीचे सामर्थ्य आणि महत्त्वाकांक्षा वाढत चालल्या आणि यूरोपमधील सत्तासमतोल ढळला. दक्षिण आफ्रिकेतील बोअर युद्धात इंग्लंडला धक्का बसला. हिंदुस्थानात काँग्रेसची (राष्ट्रसभेची) स्थापना होऊन राजकीय हक्क मागण्यात येऊ लागले. आयर्लंडमध्ये स्वराज्याच्या मागणीचा जोर वाढत चालला आणि इंग्लंडात टोरी आणि व्हिग ह्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान देणारा तिसरा एक पक्ष-मजूर पक्ष-अस्तित्वात आला. समाजवादाच्या प्रचारासाठी ‘फेबियन सोसायटी’ स्थापन करण्यात आली.
वॉल्टर पेटर, ऑस्कर वाईल्ड ह्यांचा सौंदर्यवाद हा ह्या परिस्थितीच्या संदर्भात वागण्याचा एक मार्ग होता. किपलिंग, हेन्ली ह्यांचा ब्रिटिश साम्राज्यवाद हा दुसरा मार्ग होता आणि बदलत्या परिस्थितीची, वास्तवाची आणि विज्ञानाची दखल घेणारा वेल्स, शॉ ह्यांचा तिसरा मार्ग होता, विसावे शतक उजाडले, तेव्हा अशी परिस्थिती होती.
विसावे शतक : या शतकातील इंग्रजी साहित्यनिर्मितीचा विचार दोन टप्प्यांनी करता येऊल : पहिला कालखंड १९०१ ते १९३९ म्हणजे व्हिक्टोरिया राणीच्या मृत्यूपासून दुसऱ्या महायुद्धाच्या आरंभापर्यंतचा. दुसरा कालखंड १९३९ नंतरचा. प्रस्तुत लेखात सामान्यत: १९५० पर्यंतच्या इंग्रजी साहित्याचा आढावा घेण्यात आला आहे.
पहिला कालखंड: विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासून काही नवीन प्रवृत्ती दिसू लागला.
⇨ आर्नल्ड बेनेट (१८६७–१९३१), ⇨ जॉन गॉल्झवर्दी (१८६७–१९३३), ⇨ एच्. जी. वेल्स (१८६६–१९४६) ह्या कादंबरीकारांनी व्यापक सामाजिक पार्श्वभूमीवर व्यक्तींच्या भावनांचे नाट्य चित्रित केले. बेनेटने प्रादेशिक परिसर साकार केला, तर गॉल्झवर्दीने मध्यम वर्गीयांच्या सत्ता-संपत्तिपूजनाच्या प्रवृत्तीवर फॉरसाइट सागा ह्या कादंबरीमालिकेत टीका केली. वेल्सने आपल्या दीर्घ वाङ्मयीन जीवनात बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा आणि समाजवादी दृष्टिकोण ह्यांच्या आधारावर विद्यमान आणि संभाव्य अशा समाजजीवनाचे चित्रण केले. मानवी स्वभावात सुधारणा घडवून आणणे शक्य आहे, ही श्रद्धा त्यामागे होती. त्याच संदर्भात ⇨ जोसेफ कॉनरॅड (१८५७–१९२४) ह्याचाही उल्लेख केला पाहिजे. सागरावरील साहसाच्या त्याच्या कादंबऱ्या स्टीव्हन्सन आणि किपलिंगची परंपरा पुढे चालवतात. मूळच्या पोलिश मातृभाषी कॉनरॅडने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून इंग्रजी कादंबरीवाङ्मयाचे क्षेत्र अधिक विस्तृत केले आहे. त्याची पात्रे आणि घटना वास्तवातून घेतलेल्या असतात पण कादंबऱ्यांत अवतरताना त्यांना स्वच्छंदतावादी छटा लाभलेली असते.
परंतु पहिल्या दशकाच्या शेवटीच ह्याविरुद्ध प्रवृत्तीही दिसू लागल्या. परंपरावादी जॉर्जियन काव्याने १९१० पासून पुढे काव्यमाध्यमाला विशुद्ध रूप देण्याचे प्रयोग केले. अनुभूतींची शुद्धता जोपासण्याचे यत्न केले. निसर्गवस्तू व दृश्ये ह्यांचा गौरव केला. सर्जमूर, ⇨ डब्ल्यू. बी. येट्स (१८६५–१९३९), ॲबरक्राँबी (१८८१–१९३८), ⇨ जेम्स एल्रॉय फ्लेकर (१८८४–१९१५), ⇨ वॉल्टर द ला मेअर (१८७३–१९५६), विल्फ्रिड विल्सन गिब्सन (१८७८–१९६२), ⇨ जॉन मेस्फील्ड (१८७८–१९६७), हॅरल्ड मन्रो (१८७९–१९३२) ह्यांसारख्या कवींनी परंपरावादी व काही प्रमाणात वैशिष्ट्यपूर्ण काव्य लिहिले.
साम्राज्य वाद व त्याचे गोडवे गाण्याची प्रवृत्ती ⇨ रड्यर्ड किपलिंग (१८६५–१९३६) आणि ⇨ विल्यम अर्नेस्ट हेन्ली (१८४९–१९०३) ह्यांसारख्या कवींमध्ये दिसली, तरी अन्य परिसर, संस्कृती समजावून घेऊन त्यांना कलेत सामावण्याची प्रवृत्ती, व्यक्तीबद्दल एक प्रकारची सहानुभूती व जिव्हाळा इ. गुण किपलिंगच्या वाङ्मयात दिसून येतात. संकुचित राष्ट्रीय सीमा ओलांडण्याच्या दृष्टीने अशा गुणांची इंग्रजी साहित्याला मदत झाली. अमेरिकन संस्कृती, तसेच भारताची आणि इतर पौर्वात्य देशांची संस्कृती ह्यांचा प्रभाव वाङ्मयावर पडू लागला. कवितेविषयी वाचकांच्या मनात आस्था निर्माण व्हावी ह्या उद्देशाने काही कवींनी मिळूनजॉर्जिअन पोएट्री ह्या नावाचा एक संग्रह १९१२ च्या अखेरीस प्रसिद्ध केला. १९२२ पर्यंत असे एकंदर पाच संग्रह प्रसिद्ध झाले. त्यांत चाळीस कवींच्या कविता समाविष्ट होत्या. त्यांपैकी बहुतेक पुढे चांगले प्रसिद्धीला आले.
लॉरेन्ससारख्या कवींनी एलिझाबेथकालीन कवींप्रमाणेच भावोत्कट कविता लिहिली व रचनेत हॉपकिन्झप्रमाणेच नादमाधुर्य आणले.
ह्याबरोबरच फ्रॉइड व युंग यांच्या मानसशास्त्रीय संशोधनाने व्यक्तीबद्दलच्या पूर्वकल्पनांना तडे गेले. ⇨ डी. एच्. लॉरेन्स (१८८५–१९३०), ⇨ इ. एम्.फॉर्स्टर (१८७९–१९७०), ⇨ जेम्स जॉइस (१८८२–१९४१), ⇨ व्हर्जिनिया वुल्फ (१८८२–१९४१) ह्या कादंबरीकारांनी दुभंगलेली व्यक्तिमत्त्वे चित्रित करण्याचा प्रयत्न केला. व्यक्तीचे मन हे एकसंध नसून भिन्नभिन्न प्रवृत्ती, वासना व प्रेरणा यांनी गतिमान, प्रवाही आणि चैतन्यशील बनले आहे त्याच्या पाठीमागे कोठलीही राजकीय, सामाजिक व मूल्यविषयक स्थिर बैठक असू शकत नाही, अशा गृहीतावर आधारलेली नवी कादंबरी निर्माण झाली. लॉरेन्स किंवा फॉर्स्टर हे जुन्याच तंत्राचा वापर करतात व जुन्याच पद्धतीने कथानक सांगतात परंतु जॉइस व वुल्फ मानवी मनाच्या अंत:प्रवाहांवर भर देतात संज्ञाप्रवाहाचे नवे तंत्र अवलंबतात. जॉइसने तर भाषेची रूढ रचना मोडून विचारांची अस्फुट वा अर्धस्फुट मूस घडविण्याचा प्रयत्न केला. फॉर्स्टर आपल्या व्याजोक्तिपूर्ण काव्यमय शैलीने व्यक्तींच्या परस्परसंबंधांवर भर देऊन आकर्षक रचना करतो.
ह्या कालखंडात कथेने नवे रूप घेतले आणि तिला लघुकथा ह्या स्वतंत्र वाङ्मयप्रकाराची प्रतिष्ठा प्राप्त झाली. टोकदारपणा हे तिचे वैशिष्ट्य होते. थोड्याशा विस्तारात एखादी घटना, एखादे जीवनविषयक सत्य, एखादा भावानुभव चित्रित करणे हे तिचे प्रयोजन होते. किपलिंग, वेल्स, गॉल्झवर्दी, ⇨ समरसेट मॉम (१८७४–१९६५), लॉरेन्स, फॉर्स्टर वगैरे प्रमुख कादंबरीकारांनी लघुकथेला प्रतिष्ठा मिळवून दिली. ह्यांखेरीज ⇨ कॅथरिन मॅन्सफील्ड (१८८८–१९२३), ⇨ एच. ई. वेट्स (१९०५–१९७४) वगैरेंचा लौकिक मुख्यत: कथालेखक म्हणून आहे. घटनाप्रधान आणि भावप्रधान अशा दोन्ही प्रकारच्या कथा लिहिल्या गेल्या. एकीकडे मोपासां आणि दुसरीकडे चेकॉव्ह ह्या दोघांशीही ह्या कथांचे नाते आहे.
लँब, हॅझ्लिट वगैरेंच्या नंतर एकोणिसाव्या शतकाच्या मधल्या काही दशकांत लुप्तप्राय झालेल्या ललितनिबंधाचे शतकाच्या अखेरीअखेरीस पुनरुज्जीवन झाले. रॉबर्ट लूई स्टीव्हन्सनने ललितनिबंध लिहिण्याला आरंभ केल्यानंतर जवळजवळ अर्धशतकापर्यंत अनेक लेखकांनी ह्या वाङ्मयप्रकारात मोलाची भर घातली. त्यांत ⇨ मॅक्स बीअरबोम (१८७२–१९५६), ⇨ रॉबर्ट लिंड (१८७९–१९४९), ⇨ इ. व्ही. ल्यूकस (१८६८–१९३८), ⇨ जी. के चेस्टर्टन (१८७४–१९३६), ⇨ हिलरी बेलॉक (१८७०–१९५३), ⇨ ए. जी. गार्डनर (१८६५–१९४६) ह्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. एखादा सामन्य विषय किंवा अनुभव घेऊन त्याच्याभोवती कल्पना आणि विचार ह्यांचा विलास करीत त्याचे लालित्यपूर्ण दर्शन घडविणारे हे निबंध लँब, हॅझ्लिटच्या काळातील ललितनिबंधांपेक्षा अधिक खेळकर आणि हलकेफुलके होते.
विसाव्या शतकाच्या आरंभी नाट्यलेखनाला नवे वळण मिळाले ते ⇨ हेन्रिक इब्सेन (१८२८–१९०६) ह्या नॉर्वेजियन नाटककाराच्या समस्याप्रधान, वास्तववादी नाटकांनी. ⇨ जॉर्ज बर्नार्ड शॉने (१८५६–१९५०) त्यातील आधुनिकता पकडली व बुद्धिवादाच्या पायावर व्हिक्टोरियन कल्पनांचा उपहास करणारी समस्याप्रधान नाटके लिहिली. बौद्धिक कल्पनांना व विवाद्य विषयांना नाट्यरूप देण्यात तो यशस्वी ठरला. ध्येय व मूल्ये यांबद्दलची त्याची तळमळ, त्याचे आवेशी सत्यान्वेषण, मर्मभेदी विनोद यांनी रंगभूमीला व नाट्यभिरुचीला एक वेगळे वळण दिले. परंतु अनेक वेळा त्याच्या नाटकांतील ही बौद्धिकता लादलेली वाटते व पात्रे स्वत:चे जीवन न जगता नाटककाराची मते बोलून दाखविण्यासाठी निर्माण झाल्यासारखी वाटतात. शॉच्या समकालीन प्रभावी नाटककारांत जॉन गॉल्झवर्दी यानेही सामाजिक नाटके लिहून सामाजिक संघर्षाना वाचा फोडली. समरसेट मॉम ह्याने तत्कालीन उच्च वर्गीय समाजाच्या चालीरीतींचा उपहास करणाऱ्या सुखात्मिका लिहिल्या. त्यांतील चमकदार संवाद, रेखीव रचना आणि सूक्ष्म उपरोधउपहास ह्यांमुळे त्याची नाटके रेस्टोरेशनकालीन काँग्रीव्हच्या परंपरेत बसतात. हलकीफुलकी कल्पनाप्रधान अद्भुतरम्य नाटके ⇨ जेम्स बॅरीसारख्यांनी (१८६०–१९३७) लिहिली, तर आयर्लंडमधील ⇨ जॉन मिलिंग्टन सिंगसारख्या (१८७१–१९०९) नाटककाराने आयरिश लोककथा व परंपरा ह्यांच्या आधारे मानवाच्या मूलभूत भावना व प्रेरणा यांवर कधी विनोदी, तर कधी करुणरम्य श्रेष्ठ शोकात्मिकांच्या पातळीला पोहोचणारी नाट्यरचना केली. रायडर्स टू द सी (१९०४), प्लेबॉय ऑफ द वेस्टर्न वर्ल्ड (१९०७), दियर्द्री ऑफ द सॉरोज (१९१०) यांसारख्या त्याच्या नाट्यकृती श्रेष्ठ आहेत.
ह्या काळातील गद्य अत्यंत अर्थवाही, सुगम आणि लवचिक आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉसारख्या नाटककारांनी त्याला प्रवाही बनविले तर बर्ट्रंड रसेल, विन्स्टन चर्चिल, चेस्टर्टन, वेल्स ह्यांसारख्यांनी त्याचा उपयोग कधी तत्त्वविचार, सामान्यांपर्यंत आणण्यास, कधी देशभक्तिपर भावना उठावदारपणे मांडण्यासाठी, तर कधी सामाजिक कल्पना लोकप्रिय करण्यासाठी यशस्वीपणे केला. विसाव्या शतकातील ⇨ एडमंड गॉस (१८४९–१९२८), ⇨ लिटन स्ट्रेची (१८८०–१९३२) आणि फिलिप ग्विडॅला यांसारख्या चरित्रकारांनी उपहास, व्याजोक्ती यांचा वापर चरित्रलेखनासाठी केला. विसाव्या शतकातील समीक्षावाङ्मयाने कलाक्षेत्रातील संज्ञांना निश्चिती दिली व पारंपरिक संज्ञा अधिक सखोल केल्या. ⇨ टी. एस्. एलियट (१८८८–१९६५), ⇨ आय्. ए. रिचर्ड्स (१८९३– ), ⇨ जॉन मिड्लटन मरी (१८८९–१९५७), ⇨ विल्यम एम्प्सन (१९०६– ) यांसारख्यांनी समीक्षेचे नवे संप्रदाय निर्माण केले. ⇨ आर्. जी. कॉलिंगवुड (१८८९–१९४३), ⇨ हर्बर्ट रीड(१८९३– ), ⇨ रॉजर फ्राय (१८६६–१९३४) यांनी कलासमीक्षेत नवी भर घातली तर सर्जन, जी. बी. हॅरिसन, विल्सन नाइट, डोव्हर विल्सन यांनी शेक्सपिअरसमीक्षेचे दालन समृद्ध केले.
जोशी, रा. भि.; भागवत, अ. के.
दुसरा कालखंड : विसाव्या शतकाच्या तिसऱ्या व चौथ्या दशकांत साहित्यात विविध नव्या प्रवाहांची जी खळबळ निर्माण झाली होती ती या काळात क्षीण झाली. सामान्यत: तिसरे दशक हे अश्रद्ध आणि प्रयोगवादी, चौथे अस्वस्थ पण प्रामाणिक आणि पाचवे उद्योगी पण संत्रस्त असे मानले, तर १९५० नंतरचे म्हणजे सहावे दशक हे सुरक्षिततेच्या ध्यासाने पछाडलेले दिसते. दुसऱ्या महायुद्धानंतर एका नव्या दृष्टिकोणाचा उदय झाला पण तो पहिल्या महायुद्धानंतर घडलेल्या परिवर्तनाच्या तुलनेने लक्षणीय ठरला नाही. या काळात आविष्कारतंत्राचे महत्त्व ओसरले, कलावंताची एकाकी अवस्था व स्वच्छंदी भटकेगिरी या भूमिकेचे आकर्षण कमी झाले. कलावंत म्हणून त्याचे स्थान व निष्ठा यांवर लक्ष केंद्रित झाले. तंत्रविषयक नवनवे प्रयोग ज्या काळात सुरू होते (१९१४–१९३५), त्या काळात वाङ्मयीन मासिकांनी जी कामगिरी बजावली, तशी कामगिरी करण्याची गरज या काळातील वाङ्मयीन मासिकांना उरली नाही. विशिष्ट लेखकवाचकांच्या मर्यादित संख्येसाठीच ही मासिके अस्तित्वात राहिली. अभिरुचीचे विभक्तीकरण झाले. निरनिराळ्या प्रकारच्या साहित्याची आवड असणारा वेगवेगळा वाचकवर्ग तयार झाला.
नव्या समाजकल्याणकारी व्यवस्थेत, जुन्या सांस्कृतिक व आर्थिक परंपरांवर आधारलेले हक्क हळूहळू लोप पावले व सामाजिक वर्गविग्रहाचा एक मोठा विषय साहित्यातून हरपला. १९४० च्या सुमारास बुद्धिजीवी वर्गाचे साम्यवादाबद्दलचे आकर्षण जवळजवळ इतिहासजमा झाले. त्यांची दृष्टी वैयक्तिक, नैतिक अथवा धार्मिक प्रश्नांकडे वळली. एका संदिग्ध स्वरूपात धार्मिक ऊर्मीचा उगम साहित्यात दिसू लागला. ईश्वराची आज्ञा उल्लंघिण्याचे मानवाचे (आदमचे) पहिले पाप व नंतरचा त्याचा अध:पात या कल्पना पुढे आल्या. १९४५ साली टाकला गेलेला अणुबाँब ही विशाल, धक्का देणारी घटना पण तिचे विध्वंसक सामर्थ्य इतके अवाढव्य होते, की तिची तीव्रता वैयक्तिक जीवनात जूण भासलीच नाही. शास्त्रज्ञांची नीतिमूल्ये हा गंभीर वाङ्मयाचा विषय बनला पण त्यातून श्रेष्ठ कलाकृती निर्माण होऊ शकली नाही. कोणत्याही संघटित व्यवस्थेवरचा भरवसा उडाल्याने, व्यक्तिमनाचेच अधिक कसोशीने अवगाहन व मंथन होऊ लागले. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडने पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात अलिप्ततेचे धोरण स्वीकारले व त्यामुळे साहित्यक्षेत्रातही परंपरेचे मोल वाढले. या काळातील इंग्लंडमधील बुद्धिजीवी वर्ग पूर्वीइतका बंडखोर उरला नाही.
टी. एस्. एलियट हा १९२०–१९४० या कालखंडातील काव्याचा श्रेष्ठ प्रवर्तक व प्रतिनिधी. आपल्या अभिनव रचनाकौशल्याने त्याने काव्यशैलीत क्रांती घडवून आणली. या शैलीचे कमीजास्त अनुकरण नंतरच्या कवींनी केले. आधिभौतिक व्यवहारात कष्टी व लुप्त झालेल्या आत्म्याचे भेदक व अनेकविध चित्रण हा या काव्याचा प्रमुख विषय बनला. एलियटच्या द वेस्ट लँड (१९२२) या प्रातिनिधिक काव्यकृतीचा सार्वत्रिक प्रभाव दिसू लागला. विश्वास, करुणा व प्रेम यांचा अभाव ही या काव्याची मर्यादा. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काव्यात एलियट, हॉपकिन्झ यांच्या काव्यातील वैराणतेच्या छटा उमटत असल्या व ते त्यांचे वारसदार असले, तरी त्यात एका सामाजिक साफल्याकडे धावण्याचा यत्न होता आणि हे साफल्य व्यक्तिसंबंधांवर आधारभूत असले, अशी धारणा होती. ⇨ विस्टन ह्यू ऑडन (१९०७–१९७३) हा या काळातील प्रमुख कवी. त्याच्या काव्यात केवळ वैराणपणाचा प्रतीकात्मक आशय नाही, तर एक ठसठशीत वास्तवता आहे. विविध अनुभवक्षेत्रांतील प्रतिमांच्या संकराने त्याने एक नवी अर्थपूर्ण शैली निर्माण केली. ⇨ स्टीव्हन स्पेंडर (१९०९– ) याचे नाव ऑडनच्या बरोबरीने घेतले जाते पण स्पेंडरची काव्यप्रतिभा तुलनेने अधिक सौम्य व भावपूर्ण तसेच काहीशी निष्पाप व बाळबोध आहे. ⇨ सेसिल डे ल्यूइस (१९०४– ) व लूइस मॅक्नीस यांनीही याच काळात लक्षणीय काव्यनिर्मिती केली.
पहिल्या महायुद्धानंतर कडवट उपहासाने भरलेले काव्य निर्माण झाले, तसे दुसऱ्या महायुद्धानंतर झाले नाही. अविरत आत्मसंशोधन करणारे काव्यच लिहिले गेले. ही नव्या सौंदर्यवादाची सुरुवात तर नव्हे, अशी शंका येऊ लागली. ⇨ डिलन टॉमस (१९१४–१९५३) व जॉर्ज बार्कर (१९१३– ) हे अगदी अलीकडच्या काळातील प्रातिनिधिक कवी. जीवनाच्या अखंड प्रवाहाचे व सर्जक शक्तीचे महोत्सवी सूक्त, असे टॉमसच्या काव्याचे स्वरूप आहे. त्याच्या काव्याचा अन्वयार्थ नेहमी लागतो असे नाही पण त्यातील आशयाचे स्पंदन मात्र जाणवते. बार्करचे काव्य नव्या पिढीच्या जीवनावस्थेचा प्रत्यक्ष आकार शोधणारे आहे.
डिलन टॉमस, जॉर्ज बार्कर, इडिथ सिटवेल (१८८७–१९६४), जॉन बेट्यमन, रिचर्ड चर्च (१८९३– ), कॅथलिन रेन, डेव्हिड गॅस्कॉइन यांच्या काव्यामुळे एलियटचा प्रभाव ओसरला नाही. त्याच्या काव्यातील बौद्धिक धिटाई आणि शिस्त नवीन कवींच्या भावनावेगाने ढिसूळ झाली नाही. हे कवी परत शेली व टेनिसन यांच्या कडे वळले नाहीत. मात्र काव्यक्षेत्रातले चैतन्य ओसरून, चिंतन व आत्मनिरीक्षण यांच्या ओझ्याखाली ते दबले आहेत, असे दिसू लागले.
समाजसुधारणेचे साधन, ही कादंबरीची भूमिका या काळात नष्ट होत होती. वैयक्तिक जीवनातील एकाकीपणा व वासनांचा खेळ हाच नव्या कादंबरीचा स्थूल विषय बनू पाहत होता. या विषयाला एक नैतिक व दुसरी मानसशास्त्रीय अशा दोन बाजू आहेत. नैतिकदृष्ट्या जीवनातील अनुभवाचे मोल अजमावण्याचे निकष काय, याचा शोध व मानसशास्त्रीयदृष्ट्या जाणीवेचे स्वरूप काय व तिचे कालप्रवाहाशी नाते कोणते याचा शोध अशा या दोन बाजू होत. या शोधांसाठी निर्माण झालेले संज्ञाप्रवाहाचे तंत्र जेव्हा काव्यमय झाले तेव्हा कादंबरीलेखनाचे ते एक स्वतंत्र मूल्यच ठरू लागले. सर्व घटनांचे व प्रेरणांचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण देण्याच्या प्रयत्नात आधुनिक कादंबरीकाराजवळ कोणतीच नैतिक भूमिका शिल्लक उरली नाही. त्यामुळे त्याच्या कलाकृतींना आशयपूर्ण मानवी प्रयत्नांची प्रतिष्ठा अथवा अस्सल शोकात्मिकेची सखोलता प्राप्त होत नाही. व्यक्तिजीवनाचे मूल्यमापन त्यात होऊ शकत नाही. जगत असताना संवेदनांचा क्षण तेवढा खरा भासू लागतो. या संवेदनक्षणांचे अनंतत्व भाषेच्या असंख्य क्लृप्त्या, लयी व प्रतिमा यांच्या साहाय्याने कवटाळू पाहणे, हीच साहित्याची सार्थकता ठरू लागते. ही प्रवृत्ती इंग्रजी कादंबरीतच नव्हे, तर ह्या काळातील अमेरिकन आणि यूरोपीय कादंबरीतही दिसते.
जीवनमूल्यांची विस्मृती झाली, की शरीरप्रक्रियांची जाणीव तेवढी बाकी उरते. हा दृष्टिकोण ⇨ ऑल्डस हक्सलीच्या (१८९४–१९६३) कादंबऱ्यांत दिसतो. बदलत्या परिस्थितीशी एकसारखी तडजोडच करीत राहिले, की जीवनातील नाट्य व सामर्थ्य हरपते. आजच्या कादंबऱ्यांतील नायक हा अँटीहीरो किंवा प्रतिनायक ठरला, तो यामुळेच. या नायकांच्या संबंधी अनुकंपा न वाटता तुच्छताच वाटते. एव्हेलिन वॉ (१९०३– ) या कादंबरीकाराचे नायक याच साच्यातील आहेत. मानसशास्त्रीय समर्थनामुळे खलपुरुषाचे खलत्वदेखील निष्प्रभ होते आणि उरतो तो हतबल व विदूषकी जीव. अँगस विल्सन (१९१३– ) याच्या कादंबऱ्यांतून याचा प्रत्यय येतो. ग्रेअम ग्रीन (१९०४– ) हा ह्या काळातील आणखी एक कादंबरीकार. ह्याच्या लेखनात कॅथलिक दृष्टिकोणाचा प्रभाव दिसतो. व्हर्जिनिया वुल्फ या लेखिकेने कादंबरीला एक नवी संवेदनाक्षमता दिली. ⇨ एलिझाबेथ बोएन (१८९९– ), आयरिस मर्डॉक (१९१९– ), रोझमंड लेमन (१९०३– ) या लेखिकांनी ती समर्थपणे पेलली, तर आयव्ही कॉम्टन बर्नेट (१८९२— ) या लेखिकेने मानवी क्रौर्य व स्वार्थ यांचे भयवाह दर्शन घडविणाऱ्या कथानकांची एक वेगळी जात निर्माण केली. तंत्रदृष्ट्या सराईत व कुशल अशा लेखकांच्या हाती सापडलेली या काळातील कादंबरी काही आवर्तांतच घोटाळताना दिसली, तरी एक साहित्यप्रकार म्हणून कादंबरीचा प्रवास संपला, असे मानणे सयुक्तिक वाटत नाही.
अगोदरच्या दशकात ज्यांनी कथालेखनास सुरुवात केली होती अशा रीस डेव्हिस, टी. एफ्. पोइस (१८७५–१९५३), जेम्स हॅन्ली (१९०१– ), केट रॉबर्ट्स या कथाकारांनी या कालखंडात आपले स्थान अधिक निश्चित केले. नवीन कथाकारांत डेंटन वेल्स याचे नाव घ्यावे लागते. व्यक्तीच्या अंतर्यामीचे ताण व आर्तता आणि बाह्य जगाचे तरल, संवेदनाशील चित्रण हे त्याच्या कथालेखनाचे विशेष होत. या काळातील कथालेखकांसमोर नामवंत अमेरिकन लेखक ⇨ अर्नेस्ट हेमिंग्वे (१८९९–१९६१) याचा आदर्श होता.
या काळातील इंग्रजी रंगभूमीवर विल्यम बटलर येट्स, टी. एस्. एलियट, ऑडन, ⇨ क्रिस्टोफर इशरवुड (१९०४– ), ⇨ क्रिस्टोफर फ्राय (१९०७– ) या नाटककारांच्या काव्यमय नाटकांनी महत्त्वाचा बदल घडवून आणला. जपानी ‘नो’ नाट्याचा प्रभाव येट्सच्या नाटकांवर होता. नृत्य, शिल्पमुद्रा, वास्तववाद, काव्यात्म प्रतिमा आणि लोकभाषा यांच्या साहाय्याने त्याने एक संमिश्र नाट्यप्रकार साकार करण्याचा प्रयत्न केला. एलियटने आपल्या मर्डर इन द कॅथीड्रल (१९३५) या नाटकासाठी धार्मिक व्रतोत्सवाचा आधार घेतला. प्रार्थनासदृश सांघिक भाषणे व गद्याची संथ लय यांतून परिणामकारक गंभीर वातावरण त्याने उभे केले. त्यानंतरचे त्याचे नाट्यविषय धार्मिक नसल्याने या तंत्राचा तितका यशस्वी उपयोग त्याच्या इतर नाटकांतून झाला नाही. ऑडनने दोन नाटके स्वतंत्रपणे व तीन इशरवुडच्या समवेत लिहिली. फ्रॉइड आणि मार्क्स यांचे तत्त्वज्ञान व लोकप्रिय संगीतिका यांचे मिश्रण या नाटकांत दिसते. द डान्स ऑफ डेथ (१९३३) या त्याच्या नाटकाने खळबळ उडविली पण द असेंट ऑफ एफ् ६ (१९३६) हे प्रतीकात्मक नाटक त्या मानाने अधिक महत्त्वाचे आहे. फ्रायच्या नाटकांनी विषयाच्या व रचनेच्या नावीन्याने काव्यमयतेचे वेगळे स्वरूप दाखविले. एलियटप्रमाणे त्याची पहिली नाटके धार्मिक स्वरूपाची होती पण त्यानंतर ए फीनिक्स टू फ्रीक्वंट (१९४६) व द लेडी इज नॉट फॉर बर्निंग (१९४९) या गाजलेल्या नाट्यकृतींतून प्रसन्न कल्पकतेचा व शब्दकळेचा अभिनव आविष्कार त्याने दाखविला.
आर्थर मिलर, टेनेसी विल्यम्स, एडवर्ड अल्बी यांसारखे अमेरिकन नाटककार, यानेस्को, ब्रेंडन वेहन, बेर्टोल्ट ब्रेक्ट, बेकेट यांसारखे यूरोपीय नाटककार व ⇨ जॉन ऑस्बर्न (१९२९– ) व आर्नल्ड वेस्कर (१९३२– ) यांसारखे इंग्रजी नाटककार यांनी अलीकडच्या इंग्रजी रंगभूमीची लक्षणीय सेवा केली.
ऑस्बर्नचे लुक बॅक इन अँगर (१९५६), आर्नल्ड वेस्करचेरूट्स (१९५९), शेलाह डेलोने (१९३८– ) हिचे ए टेस्ट ऑफ हनी ही नाटके महत्त्वाची आहेत. या तरुण नाटकाकारांनी अनीती, ढोंग आणि भ्रष्टाचार यांच्यावर स्थिर झालेल्या सद्य:स्थितीवर कडाडून हल्ला केला. या नाटककारांनी रंगभूमीच्या परंपरागत रसिकांना व टिकाकारांना गोंधळात टाकले, तरी एका वेगळ्या सामर्थ्याचा प्रत्यय त्यांनी आणून दिला यात शंका नाही.
मानसशास्त्रीय संशोधन व सिद्धांत यांचा मोठा प्रभाव आधुनिक टीकेवर झाला. साहित्यभाषा व शास्त्रीय भाषा यांचे वेगळे अर्थ असून शकतात, याची कल्पना आल्याने आय्. ए. रिचर्ड्ससारख्या टीकाकारांनी वाङ्मयीन मूल्यांची फेरमांडणी करण्याचा प्रयत्न केला. संस्कारवादी (इंप्रेशनिस्टिक) व मानवतावादी टीका मागे पडली. काटेकोर विश्लेषणात्मक पद्धतीचा अवलंब करणारे गंभीर टीकावाङ्मय व सर्वसामान्य लोकाभिमुख टीकावाङ्मय अशी स्पष्ट विभागणी दिसू लागली. पांडित्यप्रदर्शन व टीकालेखन हे दोन वेगळे लेखनप्रकार आहेत, याची जाणीव झाली. आकृतिबंध व कलेचे अमूर्त स्वरूप या विचाराला टीकेत अधिक महत्त्व आले. कलावंताच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा कलेच्या माध्यमावर लक्ष केंद्रित झाले व कलाप्रक्रिया अधिक मोलाची ठरली. काव्यातील अनुभव व भावना या व्यक्तिनिरपेक्ष असतात, या एलियटच्या अभिप्रायाचा व भाषेच्या सुप्त सामर्थ्याचे चिंतन व आर्जव हेच कलेचे खरे स्वरूप, या ऑडनच्या अभिप्रायाचा रोख हाच आहे. या भूमिकेमुळे कलेतील सूक्ष्म तंत्रस्वरूपाची महती वाढली व टीकालेखन हे प्रशिक्षित तज्ञांचे कार्यक्षेत्र बनले. कलेची प्रक्रिया हेच श्रेष्ठ कलामूल्य होऊ लागले.स्क्रूटिनी (१९३२–१९५३) हे या काळातील समीक्षेला वाहिलेले महत्त्वाचे नियतकालिक होते.
सारांश, आधुनिक टीका ही अधिकाधिक शब्दार्थवेधी व विश्लेषणात्मक झाली. तसेच ती चरित्रात्मक न राहता जननवेधी झाली. ज्या वृत्तीतून कलाकृतीचे बीजारोपण झाले, त्या वृत्तीचे जननरहस्य समजावून घेणे अगत्याचे ठरू लागले. त्याचप्रमाणे जनमानसात रुजलेल्या पुरातन प्रतिमा व दंतकथा यांच्या संदर्भांची उकल करणेही अगत्याचे वाटू लागले. टीका ही विविधरूपी झाली व प्रत्येक रूपाचे स्वतंत्र प्रामाण्य मान्य करण्याची वृत्ती बळावली.
सामान्यपणे असे दिसते, की या काळातील साहित्यात जरी अनेक दोष दाखविता आले, तरी या साहित्याचा जिवंतपणा नाकबूल करता येत नाही. हे साहित्य स्वच्छंदी, आत्मरत, बंडखोर, भावसंकुल व संत्रस्त, सांकेतिक तंत्रनियमांबद्दल बेफिकीर, दुर्बोध वाटले तरी या साहित्याची धिटाई व रसरशीतपणा मान्य करावा लागतो. हे साहित्य भीती व भ्रामक कल्पना यांना बांधले गेले नाही व कोणत्याही मर्यादा ते ओळखीत नाही. ते सर्वस्वी नव्या पिढीचे साहित्य आहे.
हातकणंगलेकर, म. द.
उपसंहार : सातव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंतच्या सु. तेराशे वर्षांच्या दीर्घ कालावधीत इंग्रजी साहित्याने खूपच मजल मारली आहे. मुळात जर्मानिक स्फूर्तिस्रोत घेऊन आलेल्या ह्या साहित्यात कालांतराने लॅटिन, ग्रीक, फ्रेंच, इटालियन इ. यूरोपीय भाषांतील साहित्यांचाही प्रभाव पडला. काहींपासून त्याने स्फूर्ती घेतली, काहींपासून वाङ्मयप्रकार घेतले, काहींपासून विचारधन घेतले व ते यूरोपीय साहित्याचा एक महत्त्वाचा भाग झाले. जसजसा इंग्रज समाज राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक घडामोडींना, क्रांत्यांना तोंड देत बळकट होत गेला, समृद्ध होत गेला, त्याच्या व्यापाराचा, उद्योगधंद्यांचा, राजकीय सत्तेचा विस्तार होत गेला तसतसा इंग्रजी साहित्याचा जोम आणि भरदारपणाही वाढत गेला. इंग्रजी भाषा आणि इंग्रजी साहित्य ह्यांचा जगाच्या मोठ्या भागावर प्रभाव पडला. अनेक राष्ट्रांतील भाषांच्या आणि साहित्याच्या अभिवृद्धीला, त्यांच्यातील नवीन प्रवृत्तींना ते प्रेरक आणि सहायक झाले.
इंग्रजी साहित्याच्या काही साहित्यप्रकारांना कधी अधिक अनुकूल दिवस आले, तर कधी थोडे प्रतिकूल पण त्यांचा प्रवाह पुढे जात राहिला आणि सर्वच स्थित्यंतरांतून त्यांची काही वैशिष्ट्ये कायम राहिली. त्यांपैकी चिंतनशीलता, निसर्गाविषयी तसेच घर आणि देश ह्यांविषयी प्रेम, रचनेच्या बाह्यरूपाविषयी काहीशी बेफिकिरी अशा काहीचा उल्लेख करता येईल.
जोशी, रा. भि.
संदर्भ : सर्वसाधारण :
1. Baugh, A. C. A Literary History of England, London, 1948.
2. Compton-Rickett, A. A History of English Literature, London, 1963.
3. Daiches, D. A Critical History of English Literature, 2 Vols, London, 1961.
4. Ford, B. The Pelican Guide to English Literature, 7 Vols. 1961-1963.
5. Legouis, E. Cazamian, L. A. History of English Literature, London, 1961.
6. Ward, A. W. Waller, A. R. The Cambridge History of English Literature, 15 Vols. Cambridge, 1961-1963.
सातवे शतक ते सु. सोळावे शतक :
1. Anderson, G. K. The Literature of the Anglo-Saxons, 1949.
2. Bateson, F. W. Ed. The Cambridge Bibliography of English Literature, Vol.1, New York, 1941.
3. Bennett, H. S. Chaucer and the Fifteenth Century, Oxford, 1947.
4. Chambers, E. K.The Medieval Stage, Oxford, 1903.
5. Craig. H. Religious Drama in the Middle Ages, London, 1955.
6. Kane, G. Middle English Literature, London, 1951.
7. Loomis, R. S. Introduction to Mediaval Literature, New York, 1948.
8. Schalauch, M. English Mediaval Literature and its Social Foundations, Warsaw, 1956.
9. Schofield, W. H. English Literature From the Norman Conquest to Chaucer, London, 1906.
10. Speirs, J. Mediaeval English Poetry, The Non-Chaucerian Tradition, London, 1957.
11. Wells, J. E. A Manual of the Writings in Middle Ages, 1050-1400, New Haven, 1916-1952.
12. Wilson, R. N. Early Middle English Literature, London, 1939.
सोळावे-सतरावे शतक :
1. Atkins. J. W. H. English Literary Criticism, the Renascence, London, 1947.
2. Bradbrook, M. C. Elizabethan Stage Conditions, Cambrigde, 1932
3. Bradbrook, M. C. Shakespeare and Elizabethan Poetry, London, 1951
4. Bradbrook, M. C. The Growth and Structure of Elizabethan Comedy, London, 1955.
5. Bradbrook, M. C. Themes and Conventions of Elizabethan Tragedy, Cambridge, 1935.
6. Bush, D. English Literature in the Earlier Seventeenth Century, 1600-1660, Oxford, 1945.
7. Chambers, E. K. Elizabethan Stage, 4 vols., Oxford, 1924.
8. Craig, H. The Enchanted Glass the Elizabethan Mind in Literature, New York, 1936.
9. Morris, H. Elizabethan Literature, London, 1958.
10. Nicoll, A. A History of Restoration Drama 1660-1700, Cambridge, 1928.
11. Palmer, J. The Comedy of Manners, London, 1913.
12. Spingarn, J. E. History of Literary Criticism in the Renaissance, New York, 1899.
13. Walton, G. Metaphysical to Augustan, Cambridge, 1955.
14. Wedgewood, C. V. Seventeenth Century Literature, London, 1950.
15. White, H. C. The Metaphysical Poets, New York, 1936.
अठरावे शतक :
1. Atkins, J. W. H. English Literary Criticism 17th and 18th Centuries, London, 1951.
2. Baker, E. A. The History of the English Novel. Vols. 3-5, London, 1934-1937.
3. Bosker, A. Literary Criticism in the Age of Johnson, Groningen, 1930.
4. Bourne, H. R. F. English Newspapers, 2 Vols., London, 1889.
5. Courthope, W. J. A History of English Poetry, III-IV, London, 1903-1905.
6. Deane, C. V. Aspects of Eighteenth Century Natural Poetry, Oxford, 1935.
7. Dobree, Bonamy, English Literature in the Early Eighteenth Century 1700-1740, Oxford, 1959.
8. Graham, W. English Literary Periodicals, New York, 1930.
9. Jack, I. R. J. Augustan Satire, London, 1952.
10. McKillop, A. D. English Literature from Dryden to Burns, New York, 1948.
11. Morison, Stanley, The English Newspaper, Cambridge, 1932.
12. Nicoll, A. A History of Early Eighteenth Century Drama 1700-1750, Cambridge, 1925.
13. Nicoll, A. A History if Late Eighteenth Century Drama 1750-1800,Cambridge, 1927.
14. Smith, D. N. Some Observations on Eighteenth Century Poetry, London, 1937.
15. Starnes, W. T. de; Noyes, G. E. The English Dictionary from Cawdrey to Johnson 1604-1755 Chapel Hill, 1946.
16. Walker, Hugh, The English Essays and Essayists, London, 1915.
17. Watt, I. The Rise of the Novel, Studies in Defoe, Richardson and Fielding, London, 1957.
एकोणिसावे शतक :
1. Allen, W. The English Novel, London, 1954.
2. Baker, E. A. The History of the English Novel, Vols. V-VI, London, 1929-1935.
3. Chesterton, G. K. The Victorian Age in Literature, New York, 1913.
4. Grierson, Sir H. J. C. The Background of English Literature: Classical and Romantic, Lonon, 1934.
5. Herford, C. H. The Age of Wordsworth, London, 1897.
6. Hough, R. The Romantic Poets, London, 1953.
7. Houtchens, C. W.; Houtchens, L. H. Ed. The English Romantic Poets and Essayists. New York, 1958.
8. Kettle, A. An Introduction to the English Novel I, London, 1951.
9. Lucas, F. L. The Decline and Fall of the Romantic Ideal, Cambridge, 1936.
10. Omond, T. S. The Romantic Triumph, Edingburgh, 1900.
11. Read, H. The True Voice of Feeling : Studies in English Romantic Poetry, London, 1953.
12. Saintsbury, G. E. A History of Nineteenth Century Literature 1780-1895, London, 1896.
13. Saintsbury, G. E. Essays in English Literature, 1780-1860, London, 1890-1895.
14. Wellek, R. A History of Modern Criticism, 2. The Romantic Age, New Haven, 1955.
15. Willey, B. Nineteenth Century Studies, London, 1949.
विसावे शतक :
1. Bathos, E.; Dobree, Bonamy, The Victorians and After 1830-1914. London, 1938.
2. Beach, J. W. The Twentieth Century Novel, Now York, 1932.
3. Brooks, C. Modern Poetry and the Tradition, Chapel Hill, 1939.
4. Daiches, D. Poetry and the Modern World, Chicago, 1940.
5. Daiches, D. The Novel and the Modern World, Cambridge, 1960.
6. Daiches, D. The Present Age after 1920, London, 1938.
7. Edel, L. Psychological Novel 190-1950, London, 1955.
8. Fraser, G. S. The Modern Writer and His World, London, 1953.
9. Frierson, W. C. The English Novel in Transition, 1885-1940, Norman, Oklahama, 1942.
10. Humphrey, R. The Stream of Consciousness in Modern Novel, London, 1954.
11. Isacs, J. An Assessment of Twentieth Century Literature, London, 1951.
12. Leavis, F. R. New Bearings in English Poetry, London, 1950.
13. Lumley, F. Trends in Twentieth Century Dramas, London, 1956.
14. MacNeice, Louis, Modern Poetry, Oxford, 1938.
15. Manly, J. M.; Rickert, E. Contemporary British Literature, London, 1935.
16. Muir, Edwin, The Present Age from 1914, London, 1939.
17. Reynolds, D. Modern English Drama, London, 1949.
18. Scarfe, F. Auden and After : The Liberation of Poetry 1930-1941, London. 1942.
19. Shorer, Mark, Ed. Modern British Fiction : Essays in Criticism, London, 1962.
20. Tinall, W. Y. Forces in Modern British Literature 1885-1946, New York, 1947.
21. Vines, S. A. A Hundred Years of English Literature, 1830-1940, London, 1950.