आस्ब्यर्नसेन, पेटर क्रिस्टेन: (१५ जानेवारी १८१२–५ जानेवारी १८८५). नॉर्वेजियन लोककथासंग्राहक आणि साहित्यिक.जन्म ऑस्लो येथे. ⇨यर्जन मो (१८१३–१८८२)या आपल्या मित्राच्या सहकार्याने त्याने नॉर्वेजियन लोककथा जमवून त्या Norske Folkeeventyr (१८४१, इं. भां. पॉप्युलर टेल्स फ्रॉम द नॉर्स, १८५९) या नावाने प्रसिद्ध केल्या.ह्या लोककथांतील बोलभाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमुळे नॉर्वेजियन भाषेच्या विकासास मदत झाली. त्याने स्वतंत्रपणे लिहिलेल्या परीकथा Norske huldreeventyr og folkesagn (२ खंड, १८४५, १८४८, इं. शी. नॉर्वेजियन फेअरी टेल्स अँड फोकलोअर) या नावाने ग्रंथबद्ध झाल्या आहेत.याकोप ग्रिम याने यांतील काही परीकथांची गणना जगातील सर्वोत्कृष्ट परीकथांत केली आहे. तो निसर्गवैज्ञानिकही होता. डार्विन याच्या उत्क्रांतिवादाचा परिचय त्याने नॉर्वेजियन वाचकांस करून दिला. ऑस्लो येथे तो मरण पावला.
राघवन्, वीणा (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)
“