आसूनस्यॉन : दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वाय देशाची राजधानी. लोकसंख्या ४,३७,१३६ (१९७० अंदाजे). पॅराग्वाय नदी व पील्कोमायो नदी यांच्या संगमावरील एका निसर्गरम्य भूशिरावर हे १५ ऑगस्ट, (ख्रिश्चनांमधील ॲझम्शन डे) १५३७ रोजी वसविले गेले. पॅराग्वायमधील हे एकमेव मोठे शहर असून देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक घडामोडींचे केंद्रस्थान आहे. दक्षिण अमेरिका खंडात मध्यवर्ती मोक्याच्या ठिकाणी असल्याने हे दळणवळणाचे प्रमुख केंद्र आहे. आसमंतातील समृद्ध शेतांवरील मालाची ही प्रमुख बाजारपेठ असून पॅराग्वाय नदीवरील महत्त्वाची उतारपेठ आहे. तीन शतके वाढत आलेली जुनाट वस्ती त्यातील एकमजली, कौलारू, रंगीबेरंगी घरे शहरभर पसरलेली विविधरंगी झाडे दगडांनी बांधलेले अरुंद रस्ते ह्यांमुळे जुने आसूनस्यॉन आगळेच भासते. शहरात अनेक उद्याने असून वनस्पतिसंग्रहालय महत्त्वाचे आहे. राजभवन, विधिभवन, उच्च न्यायालय आणि शासकीय कार्यालये येथे असून लष्करी अकादमी, विद्यापीठे व विविध शैक्षणिक संस्था आहेत. औद्योगिक वाढ बेताचीच असून येथे कापड गिरण्या तसेच मांससंवेष्टन, आटा, औषधे, सिगारेट, पादत्राणे, फर्निचर इत्यादींचे कारखाने आहेत.
शाह, र. रू.