ऑर्थोक्लेज : खनिज. स्फटिकएकनताक्ष, प्राचिनकार [→ स्फटिक विज्ञान] किंवा वडीसारखे. सामान्यत: साधे संस्पर्शी (चिकटलेले) किंवा अन्योन्यवेशी (एकमेकांत घुसलेले) जुळे स्फटिक [→ फेल्स्पार गट]. कणमय किंवा पत्रित (पापुद्र्यांनी युक्त) राशीही आढळतात. पाटन : (001) उत्कृष्ट, (010) स्पष्ट [→ पाटन]. या पाटनांतील कोन ९०० चा असतो. म्हणून पाटन व काटकोन या अर्थांच्या ग्रीक शब्दांवरून ऑर्थोक्लेज हे नाव दिले गेले. भंजन शंखाभ. ठिसूळ. कठिनता ६. वि.गु. २·५६. चमक काचेसारखी, (001) पाटनपृष्ठाची मोत्यासारखी [→ खनिजविज्ञान]. रंग पांढरा, गुलाबी, करडा. रा. सं. KAlSi3O8. ग्रॅनाइटात, सायेनाइटात, कित्येक, अर्कोजांत व पट्टिताश्मांत मुख्य घटक म्हणून आढळते.
ठाकूर, अ. ना.