आल्तॉ, ह्युगो हेन्रिक आल्व्हार : (३ फेब्रुवारी १८९८– ). फिनी वास्तुशिल्पज्ञ. फिनलंडमधील कूऑर्ताने येथे जन्म. हेलसिंकीच्या तंत्रनिकेतनातून वास्तुकलाविषयक पदवी घेऊन (१९२१) पुढील दोन वर्ष त्यांनी यूरोपातील वास्तूंचा अभ्यास केला. पुढे हेलसिंकी येथे वास्तुव्यवसाय सुरू केला. ‘मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथे १९४० मध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांची पहिली पत्नी अनिओ मार्सिओ व द्वितीय पत्नी एलिझा मॅकिनिएमी या दोघीही वास्तुविशारद होत्या. कार्यवादी वास्तुकलेचे ते एक आधुनिक प्रणेते मानले जातात. केवळ भौमितिक रचनाबंधांपेक्षा वास्तूमध्ये वास्तव्यानुकूल वातावरण निर्माण करण्यावर त्यांचा भर आहे. त्यांच्या वास्तूंमध्ये त्यांनी नवनव्या रचनापद्धतींचा व त्याचबरोबर पांरपरिक नैसर्गिक साधनांचा (उदा., इमारती लाकूड) कल्पकतेने वापर केला आहे. दुसऱ्या महायुद्धात नामशेष झालेल्या काही शहरांचे पुनर्वसन त्यांनी केले. स्तरकाष्ठापासून उपयुक्त व दर्जेदार फर्निचर करण्यासाठी आकर्षक रचनाबंध कल्पिण्यात आल्तॉ अग्रेसर आहेत. रशियामधील व्हीपुरी (व्हीबॉर्ग) येथे त्यांनी उभारलेल्या ग्रंथालय-वास्तूस (१९२७–१९३५ १९४४ ते नामशेष) स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले. पायमीओ (फिनलंड) येथील रुग्णालय (१९२९–१९३३), तुर्कू (फिनलंड) येथील ‘तुरून सॅनोमॅट’ वृत्तपत्र कचेरी (१९२९). पॅरिस प्रदर्शनातील (१९३७) व न्यूयॉर्कच्या जागतिक मेळाव्यातील (१९२९) फिनी दालने, हेल्सिंकी येथील ‘हाऊस ऑफ कल्चर’ (१९५६), मॅसॅचूसेट्स येथील केब्रिंज विद्यार्थीगृह (१९४७) व बगदादची कलावीथी यांसारख्या त्यांच्या वास्तू अनन्यसाधारण आहेत. त्यांचे एक भव्य वास्तुयोजन म्हणून ‘द सुनिला’ या फिनलंडमधील कॉटकाजवळील औद्योगिक वसाहतीचा उल्लेख करता येईल. १९५७ मध्ये त्यांना ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स’ या संस्थेचे सुवर्णपदक मिळाले. त्यांनी वास्तुविषयक बरेचसे लेखनही केले आहे.

संदर्भ: Gutheim, F. A. Alvar Aalto, New York, 1960.

पेठे, प्रकाश