आर्डवुल्फ : हा मांसाहारी सस्तन प्राणी तरसाचा नातेवाईक असून साधारणपणे खोकडाएवढा असतो. शास्त्रीय नाव प्रोटिलीस क्रिस्टेटस. आफ्रिकेत सोमालीलँडपासून केप प्रदेशापर्यंत हा आढळतो. करडा रंग, शरीरावरील पट्टे आणि अंगावरील लांब केसांचे आवरण या बाबतीत त्याचे पट्टेरी तरसाशी साम्य आहे. पण तरस आणि आर्डवुल्फ यांत काही ठळक फरकही आहेत : आर्डवुल्फचे मुस्कट जास्त निमुळते असते, दाढा लहान आणि साध्या असतात आणि पुढच्या पायांवर पाच बोटे असतात. शेपटी झुपकेदार असते. दिवसा तो बिळात राहातो पण रात्री भक्ष्य मिळविण्याकरिता बाहेर पडतो. आर्डवुल्फ वेगाने धावू शकतो पण स्वभावाने भित्रा आणि रात्रिंचर असल्यामुळे संकटकाळी पळून जाण्यापेक्षा बिळात लपून बसणे तो पसंत करतो.
वाळवी, सुरवंट, विविध प्रकारचे कीटक व प्राण्यांचे कुजके मांस हे त्याचे भक्ष्य होय. इतर प्राण्यांची तो शिकार करीत नाही.
कर्वे, ज. नी.