आर्क्टिक प्रदेश : पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडील, आर्क्टिक महासागराच्या किनाऱ्याकडील प्रदेश. ध्रुवतारा ज्या पुंजात आहे त्याला पाश्चात्त्य खगोलशास्त्रात ‘छोटे अस्वल’ या अर्थाचे नाव आहे. ग्रीक भाषेत आर्कटॉस म्हणजे अस्वल त्यावरून उत्तर ध्रुवाभोवतीच्या प्रदेशाला ‘आर्क्टिक’ हे नाव पडले. काही लोक उत्तर ध्रुववृत्त, ६६० ३०’ उ. अक्षवृत्त, ही या प्रदेशाची मर्यादा मानतात. परंतु हवामान व जीवन या दृष्टींनी उत्तरेकडील तरुरेषा ही यापेक्षा अधिक समर्पक मर्यादा आहे. तिच्या आत ग्रीनलंड, स्पिट्स्बर्गेन व इतर ध्रुवीय बेटे, अलास्का, कॅनडा व सायबीरियाचा उत्तर भाग, लॅब्रॅडॉरचा किनारा आणि आईसलँड, नॉर्व, स्वीडन, फिनलंड व यूरोपीय रशिया यांचे उत्तर भाग हे प्रदेश येतात. यूरोपच्या उत्तर प्रदेशाचा अंतर्भाव काही लोकांच्या मते उपआर्क्टिकमध्ये होतो. ही तरुरेषा सामान्यतः उन्हाळ्यातील १०० सें. समतापरेषेला धरून आहे. आर्क्टिकच्या दक्षिणेस जेथे वर्षातून चार महिने तपमान १०० से. पेक्षा जास्त नसते, अशा प्रदेशाला उपआर्क्टिक म्हणतात. आर्थिक व लष्करी दृष्ट्या हा भाग आर्क्टिक प्रदेशाचाच होय असे पुष्कळ भूगोलशास्त्रज्ञ मानतात. आर्क्टिक प्रदेशाची व्यवच्छेदक लक्षणे म्हणजे उन्हाळा व हिवाळा यांच्या तपमानातील फार मोठा फरक, उंच प्रदेश सतत बर्फाच्छादित असणे आणि सखल भागात गवत, लव्हाळे, बुटकी झुडपे आणि कायम गोठलेली जमीन ही होत. या जमिनीचा वरचा थर उन्हाळ्यात वितळतो, तेव्हा ती काळी आणि दलदलीची दिसते. आर्क्टिक भूप्रदेशाचा ६०% भाग कायम हिमाच्छादनाच्या बाहेर आहे. विसाव्या शतकात व विशेषत: दुसऱ्या महायुद्धानंतर आर्क्टिक व उपआर्क्टिक प्रदेशांचे आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढत आहे आणि वातावरणाच्या जागतिक अभ्यासाच्या दृष्टीने या प्रदेशाला विशेष महत्त्व येऊ लागले आहे. १९५७-५८ मधील आंतरराष्ट्रीय भूभौतिक पर्वाचा एक प्रमुख उपक्रम आर्क्टिक संशोधन हा होता. त्या काळात ३०० प्रायोगिक केंद्रांनी या प्रदेशाविषयीची महत्त्वाची माहिती मिळविली. १९५८ मध्ये नॉटिलस व स्केट या अमेरिकन पाणबुड्यांनी बर्फाखालून प्रवास करून उत्तर ध्रुव गाठून पलीकडे बाहेर येण्यात यश मिळविले. त्यानंतरही आंतरराष्ट्रीय सहकार्यांने या प्रदेशाचा अभ्यास चालू आहे. आर्क्टिक संशोधनाचा व विकासाचा सर्वात सधन कार्यक्रम रशियाचा आहे. आपापले सीमाप्रदेश व मार्ग यांच्या संरक्षणासाठी कॅनडा, अमेरिका व रशिया यांनी या प्रदेशात लष्करी तळ व प्रचंड रडारयंत्रणा उभारली आहे. त्यासाठी तेथील जमीन, वनस्पती व प्राणी यांचा शास्त्रज्ञांना विशेष बारकाईने अभ्यास करावा लागला आहे.
शोध : पृथ्वीच्या आकृतीबद्दल चुकीच्या समजुती व नौकानयनाच्या प्राथमिक पद्धती यांमुळे आर्क्टिक प्रदेशाविषयी चुकीच्या समजुती रूढ होत्या. पिथियस हा ग्रीक इ. स. पू. चौथ्या शतकात आइसलँडपर्यंत पोचला असावा. त्याला त्याने थूल म्हटले. आज थूल हे ग्रीनलंडच्या पश्चिम किनाऱ्यावरील ठिकाण आहे. आठव्या-नवव्या शतकात आयरिश भिक्षू आर्क्टिकपर्यंत गेले होते. नवव्या शतकात नॉर्वेतील व्हायकिंगांनी तेथे वस्ती केली ९८२च्या सुमारास ग्रीनलंडच्या दक्षिण किनाऱ्यावर त्यांनी वसाहती स्थापिल्या, ते स्पिट्स्बर्गेन व नॉव्हाया झीमल्यापर्यंतही पोचले असावे. सोळाव्या शतकात डचांनी व इंग्रजांनी पूर्वेकडील देशांशी व्यापार वाढविण्यासाठी ‘नॉर्थ ईस्ट पॅसेज’ (ईशान्यमार्ग)शोधण्यास सुरुवात केली. आफ्रिकेला किंवा दक्षिण अमेरिकेला वळसा घालून जाण्याचे मार्ग लांबचे, त्रासदायक व पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकांच्या हाती होते. खुष्कीचे त्याहूनही बिकट होते. १५५३ मध्ये सर ह्यू विलोबीचेपथक कोला द्वीपकल्पाजवळ नष्ट झाले. त्यापैकी रिचर्ड चॅन्सेलर आर्केंजलहून मॉस्कोपर्यंत आला. रशियन लोक पंधराव्या शतकातच नॉर्थ केपला वळसा घालून पश्चिम यूरोपला जात असत. १५५६ व १५८० तील अपयशानंतर इंग्रजांचेईशान्यमार्गाबद्दलचे स्वारस्य संपले. १५६५ मध्ये आर्केंजलला व्यापारी ठाणे स्थापिलेला ब्रुनेल हा डच १५८४ मध्ये युगोर्स्की सामुद्रधुनीपर्यंतच पोचला. १५९४ मध्ये विल्लेम बॅरेंट्सने नॉव्हाया झीमल्या संशोधिले. त्याने वेअर बेट व स्पिट्स्बर्गेनही शोधिले. आर्क्टिक प्रदेशात हिवाळा काढून परतताना बॅरेंट्स मरण पावला. रशियन कोसॅक सायबीरिया जिंकीत पॅसिफिकपर्यंत गेले होते. त्यांपैकी सायमन डेझनेव्ह १६४८ मध्ये बेरिंग सामुद्रधुनीतून गेला असावा. पीटर द ग्रेट याने संशोधनास प्रोत्साहन दिले. १७२५ ते ४२च्या मोहिमेत सायबीरियाचा बराच किनारा नकाशिला गेला. या मोहिमेत बेरिंग हा डच संशोधक बेरिंग सामुद्रधुनीतून गेला. १७४१ मध्ये ले. चेल्युस्किन हा सायबीरियाच्या अतिउत्तर टोकापर्यंत गेला. लॅपटेव्ह बंधूंनी तैमीर द्वीपकल्प ते कोलीमा नदीपर्यंतचा किनारा नकाशिला. १७७८ मध्ये कॅ. जेम्स कुकने बेरिंग सामुद्रधुनीचे अस्तित्व प्रत्यक्ष पाहून ठरविले. रँगेल याने १८२० ते २४ मध्ये उत्तर किनाऱ्याचा नकाशा पुरा केला. १७७० मध्ये ल्याखोव्ह या व्यापाऱ्याने न्यू सायबीरियन बेटे शोधिली. त्याने तेथपर्यंत कॅरिबू आलेले पाहिले. या बेटावर मोठमोठे हस्तिदंत सापडले. १८७२-७४ मध्ये फ्रान्झ जोझेफ बेटांचा शोध लागला. ईशान्यमार्गाने पहिले यशस्वी नौकानयन स्वीडिश वॅरन नॉर्डेन्स्कोल्ड याने केले. रशियन विल्किटस्की याने पूर्वेकडून पश्चिमेकडे हा मार्ग पार केला. १९१३ मध्ये त्याला सेव्हर्नाया झीमल्याचा शोध लागला. १९३२ मध्ये ‘सायबिर्याकोव्ह’ बर्फफोड्या नौकेने हा मार्ग एकाच ऋतूत पार केला. अमेरिकेच्या शोधामुळे ‘नॉर्थ वेस्ट पॅसेज’ (वायव्यमार्ग) च्या शोधास सुरुवात झाली. १५७६ मध्ये फ्रॉबिशर आर्क्टिकमध्ये गेला. जॉन डेव्हिस १५८५-८७ मध्ये ग्रीनलंडला व तेथून डिस्को बेटापर्यंत (७२० उ. अक्षांश) गेला. १६१० मध्ये हेन्री हडसन, हडसन व जेम्स उपसागरांपर्यंत गेला. १६१६ मध्ये बॅफिनने बॅफिन उपसागर संशोधिला. अठराव्या शतकात भूमीवरून अंतर्भागात जाण्याला महत्त्व आले व वायव्यमार्ग संशोधन मागे पडले. एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश सरकारच्या मोहिमा सुरू झाल्या. त्यात कॅनडाचे द्वीपसमूह व किनारा नकाशून झाला होता. १८४५ मध्ये निघालेली सर जॉन फ्रँक्लिनची मोहीम अपयशी ठरली. व्हिक्टोरिया सामुद्रधुनीपर्यंत गेल्यावर तो आपल्या लोकांसह बेपत्ता झाला. त्याला शोधून काढण्याचा प्रयत्न १२ वर्षे चालला होतात्यात पुष्कळ भौगोलिक माहिती मिळाली. कमांडर रॉवर्ट माक्लुर हा अनेक जहाजांतून व क्वचित पायीसुद्धा १८५० ते १८५४ मध्ये वायव्यमार्ग पार करणारा पहिला नाविक ठरला. १९०३ ते १९०६ मध्ये सुप्रसिद्ध नॉर्वेजियन संशोधक रोआल आमुनसेन याने आपल्या ‘गोया’ या छोट्याशा नौकेतून हा मार्ग पार केला. हा मार्ग एकाच नौकेतून पार करणारा तो पहिला नाविक होय. १९४०-४२ मध्ये व १९४४ मध्ये लार्सन यानेही तो पश्चिमपूर्व व पूर्वपश्चिम दिशांनी पार केला. १९५४ मध्ये कॅनडाची बर्फफोडी नौका लॅब्रॅडॉर हिने तो खोल पाण्यातून ओलांडला. सप्टेंबर, १९६९ मध्ये अमेरिकेची व्यापारी बर्फफोडी नौका ‘मॅनहॅटन’ हिने हा मार्ग ओलांडला तेव्हा अलास्कामध्ये भरपूर तेल आहे व ते या मार्गाने शुद्ध करण्यासाठी आणता येईल, असे दिसून आले. आर्क्टिक प्रदेशाच्या संशोधनात व त्याच्या काही भागांचे नकाशे तयार करण्यात व्हेलमाशांचे शिकारी व केसाळ कातड्यांचे व्यापारी यांनी महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. रशियन व ब्रिटिश व्यापाऱ्यांमधील तेढ अमेरिकेने १८६७ मध्ये रशियाकडून अलास्का विकत घेतला तेव्हा संपली.
उत्तरध्रुवसंशोधन हे वरील मोहिमांचे ध्येय नव्हते. स्कोर्झ्बीने सुचविल्याप्रमाणे घसरगाडीचे तंत्र वापरून पॅरी १८२७ मध्ये ८२०४५’ उ. पर्यंत पोचला. १८७१ मध्ये अमेरिकन चार्लस फ्रॅन्सिस हॉल ८२०११’ उ. पर्यंत गेला. तो मरण पावला व एका एस्किमो मायलेकीसह त्याचे उरलेल लोक हिमखंडावरून वहात गेले. त्यांना १८७३ मध्ये एका व्हेल शिकाऱ्याने लॅब्रॅडॉरजवळ वाचविले. १८७५-७६ मध्ये नेअर्झच्या नेतृत्वाखालील मोहिमेत एल्झमीअर बेट व ग्रीनलंड यांच्या किनाऱ्याने घसरगाडीने मार्कॅम (८३० २०’ उ.) पर्यंत पोचला. १८९३ मध्ये फ्रित्यॉफ नान्सेन ऑट्टो स्व्हॅर्ड्रुपसह खास बोटीने निघाला. १८९५ मध्ये बोट सोडून तो घसरगाडीने फ्रान्झ जोझेफलँडपासून निघाला व ८३०१३’ उ. पर्यंत जाऊन परत आला. मग उत्तर ध्रुवावर पोचण्याची जणू शर्यतच लागली. १९०० मध्ये इटालियन कॅ. कॉग्नी ८६०३४’ उ. पर्यंत गेला. रॉबर्ट पेअरी १८९३-९५ पासून ध्रुव संशोधनामागे होता. १८९८ – १९०२ मध्ये तो ८४०१७’ उ. व १९०५ मध्ये ८७०६’ उ. पर्यंत गेला. १९०९ मध्ये घसरगाडीने तो आपला निग्रो कुत्रेहाक्या मॅथ्यू हेन्सन व तीन एस्किमो यांसह उत्तर ध्रुवावर जाऊन पोचला. तो परतण्यापूर्वीच फ्रेडरिक कुक या अमेरिकनाने आपण दोन एस्किमोंसह आधल्याच वर्षी ध्रुवावर पोचलो होतो असा दावा केला. कोपनहेगन विद्यापीठापुढे त्याने दाखल केलेल्या पुराव्याची खात्री पटली नाही. त्यानेही आग्रह धरला नाही. तथापि ध्रुवावर कोण आधी पोचला, दोघेही पोचले की नाही इ. प्रश्न गूढ आहेत. तूर्त पेअरीच पोचला असे मानले जाते. ९ मे १९२६ला उत्तरध्रुवावर विमानातून रिचर्ड बर्ड पोचला व परत आला. त्यानंतर दोन दिवसांनी आमुनसेन व ऊंवेर्तो नॉबीले हे हवाई जहाजातून ध्रुवावरून पलीकडे अलास्काला गेले.
शास्त्रीय माहितीसाठी १८७५ मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याची योजना कार्ल वे प्रेक्ट याने केली व १८८२-८३ हे पहिले आंतरराष्ट्रीय ध्रुवीय वर्ष झाले. त्यात १० राष्ट्रांनी ११ निरीक्षण केंद्रे उभारली होती. १९३२-३३ मध्ये पुन्हा असा आंतरराष्ट्रीय प्रयत्न झाला. त्यानंतर १९५७-५८च्या आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक पर्वात अधिक राष्ट्रेसामील होऊन पुष्कळ माहिती जमा केली गेली. आता नवीन भूभाग किंवा समुद्र सापडण्याजोगा नाही. छायाचित्रपाहणीने चांगले नकाशे तयार झालेले आहेत. विमाने व विमानतळ यांच्या सोयींमुळे आर्क्टिक प्रदेशात जाऊन पोचणे सुलभ झाले आहे. व्यापारी विमानवाहतूक सुरू झाली आहे. मात्र सापडलेले भूभाग व समुद्र यांचे अधिक तपशीलवार संशोधन व्हावयाचे आहे.
भूवर्णन : आर्क्टिक प्रदेशात कॅनेडियन, बाल्टिक, अंगारा व कोलीमा ढालप्रदेश समाविष्ट असून अंशत: त्यांवर व आजूबाजूला दीर्घकालपर्यंत गाळ साठत आलेला आहे. येथील पर्वत पुराजीव, मध्यजीव व नूतनजीव काळात तयार झाले. पुराजीव ते चतुर्थक कालखंडातील खडक रशियात व सायबीरियात आढळतात. तृतीयक युगातील अग्निजन्य हालचालींमुळे पॅसिफिकभोवतीचे पर्वत तयार झाले. कॅमचॅटका, अल्यूशन बेटे, अलास्का, आइसलँड येथील ज्वालामुखी व ग्रीनलंड आणि यान मायेन बेटांवरील उष्णोदकाचे झरे त्या हालचालींचे निदर्शक आहेत. आर्क्टिक प्रदेशातील पर्वतांची उंची २,००० ते ५,००० मी. पर्यंत आढळते. सु. ७,५०,००० वर्षांपूर्वी येथील हवामान बदलून प्लेइस्टोसीन हिमप्रदेश बनले. हिमानीक्रियेमुळे कॅनेडियन, यूरोपीय व रशियन आर्क्टिक प्रदेश हिमाच्छादित झाले. ईशान्य सायबीरिया मात्र बचावला. बर्फ वितळल्यावर यू आकाराच्या दऱ्या, फियोर्ड वगैरे भूमिस्वरूपे दिसून आली. जलवहन विस्कळित होऊन असंख्य सरोवरे तयार झाली. प्लेइस्टोसीन बर्फ वितळल्यावर जमीन खचलेलीच राहिली. ती नंतर उत्थान पावली व त्यामुळे काही भागांत १०० ते ५०० मी. उंचीवर उत्थित पुळणी व सामुद्री निक्षेप दिसून येतात. ढालप्रदेशांच्या पलीकडे गाळखडकांवर विस्तृत मैदाने तयार झालेली आहेत. त्यांवरून वाहणाऱ्या नद्यांनी (विशेषत: सायबीरियात) पुष्कळ जाडीचे जलोढनिक्षेप टाकलेले आहेत. येथे जमीन तयार होण्याची क्रिया फार सावकाश होते. येथील जमीन नित्य गोठलेली असते. उन्हाळ्यात वरचा थोडासा थर वितळतो. अमेरिकेत कायम गोठलेली जमीन २५० ते ५०० मी. खोल असते. सायबीरियात ७५० मी. खोलीपर्यंतही ती आढळते. काही ठिकाणी जमिनीखाली बर्फाचे थर गाडलेले आढळतात. हे भूहिम वितळले तर तेथे खड्डे पडून ते पाण्याने भरून येऊन डबकी व सरोवरे बनतात. त्याचप्रमाणे गोठलेल्या जमिनीतून पाणी वाहून जाणे शक्य नसल्यामुळेही पृष्ठावर सरोवर बनतात. आर्क्टिकचा फक्त ४०% भागच कायम हिमाच्छादित असतो. ग्रीनलंडचा ८५% भाग हिमाच्छादित आहे. बर्फाचा तळ काही ठिकाणी समुद्रसपाटीपेक्षाही खोल आहे. यावरून ग्रीनलंड हा मूळचा एक द्वीपसमूह असावा असे काही लोकांचे मत आहे. ग्रीनलंडमधील हिमनद्या समुद्रापर्यंत वाहात येतात व त्यांतून मोठमोठे हिमगिरी समुद्रात पडतात. कॅनडातील हिमनद्या समुद्रापर्यंत क्वचित येतात. एल्झमीअर बेटाच्या उत्तरेस तरंगत्या बर्फाचे मोठमोठे खंड आहेत. यातूनच आर्क्टिकची बर्फबेटे तयार झाली आहेत. रशियाच्या उत्तरेस बराच प्रदेश बर्फमुक्त आहे. ग्रीनलंडचा अंतर्भाग सोडून आर्क्टिकमधील इतर सर्व भागातील हिमनद्या उत्तरेकडे हटत चालल्या आहेत.
हवामान : हिमाच्छादित प्रदेशात कोणत्याही महिन्याचे सरासरी तपमान ०० से. पेक्षा अधिक नसते. वर्षातून निदान एक महिना सरासरी तपमान ०० से. ते १०० से. पर्यंत असेल, तर ते टंड्रा प्रकारचे हवामान होय. अटलांटिक व पॅसिफिकभोवती हिवाळा फार कडक नसतो आणि हिमवृष्टी पुष्कळ होते. अंतर्गत प्रदेशात हिमवृष्टी कमी असते व हिवाळा फार कडक असतो. आर्क्टिकपेक्षा उपआर्क्टिकमध्ये खंडांतर्गत भागात हिवाळ्याचे तपमान कमी असते. उत्तर गोलार्धातील सर्वांत कमी नोंदलेले सरासरी तपमान ईशान्य सायबीरियातील ऑयम्याकन भागात व्हर्कोयान्स्क येथे -५०० से. आहे. प्रत्यक्ष ते -७०० सें. पर्यंतही गेलेले आहे. हडसन उपसागराच्या उत्तरेस, अल्यूशन बेटे, नैर्ऋत्यकिनारी ग्रीनलंड, आइसलँड व युरोपीय आर्क्टिक येथे हिवाळ्यात वादळी हवा, भरपूर वृष्टी व -६० से. पर्यंत तपमान असते. आर्क्टिक प्रदेशात हिवाळ्याच्या मानाने उन्हाळ्यात तपमानातील चढउतार कमी असतो. दक्षिण सीमेवर १०० से. पर्यंत तपमान जाते. अंतर्भागात हवा शांत, सूर्यप्रकाश टिकाऊ व तपमान २६० ते २७० सें. पर्यंत असे थोडा थोडा वेळ असते. त्यापाठोपाठ बहुधा गडगडाटी वादळ होते. जास्त वृष्टीच्या प्रदेशात दृश्यता कमी होते. आर्क्टिकच्या बऱ्याच भागात हिमाच्या किंवा पावसाच्या रूपाने १५-२५ सेंमी. पर्यंत वृष्टी होते. आर्क्टिक प्रदेशातील हवामान निरीक्षणावरून यूरोपमध्ये हवामानाचे, विशेषत: वादळांचे अंदाज करता येतात. हिवाळ्यात पुष्कळदा ‘ध्रुवप्रकाश’ हा सृष्टिचमत्कार दिसतो. तसेच मृगजळही अनेकदा फसविते. येथील विशिष्ट वातावरणामुळे आवाज खूप दूरवर जातो. विसाव्या शतकात ध्रुवीय हवामानात लक्षात येण्याइतका बदल झालेला आहे. हिमनद्या मागे हटत चालल्या आहेत. आइसलँड, नैर्ऋत्य ग्रीनलंड, स्वालबार येथील सागरी बर्फाचा विस्तार कमी झालेला आहे. हिमखंडांची जाडी कमी झालेली आहे. पक्षी, प्राणी व मासे अधिक उत्तरेला आढळून येऊ लागलेले आहेत. लोकांचे आर्थिक जीवन बदलू लागले आहे. ग्रीनलंडमध्ये सीलपेक्षा आता इतर माशांवर जीवन अधिक अवलंबून आहे. ७०० अक्षवृत्तापलीकडे ‘अटलांटिक कॉड’ मासे अधिक संख्येने दिसू लागलेले आहेत. सीलप्रमाणे कॉडपासून जळण व वस्त्र मिळत नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार व रोखीचे व्यवहार यांस महत्त्व येत चालले आहे. ग्रीनलंडच्या दक्षिण भागात तर मेंढपाळी सुरू झाली आहे.
वनस्पती : उपआर्क्टिकमधील परिध्रुवीय उत्तरी अरण्ये व आर्क्टिक मधील टंड्रा हे तरुरेषेने विभागलेले आहेत. टंड्रामधील वनस्पती लहान, खुरट्या, बुटक्या असतात. तरुरेषेत स्प्रूस, लार्च, पाईन, फर ही झाडे आहेत. कमी तपमान, उन्हाळ्यात सतत सूर्यप्रकाश, निकृष्ट जमीन, कायम गोठलेली जमीन, कोरडे जोराचे वारे, हिमवादळे या कठीण परिस्थितीत थोड्या व खुरट्या वनस्पतीच राहू शकतात. झुडपे दाटीवाटीने उगवतात व त्यांची जाळी तयार होते. यामुळे त्यांचे हवेपासून संरक्षण होते. झुडपांचा उपयोग जळण, चटया यांसाठी होतो. वाढीचा काळ इतका थोडा असतो की प्रतिवर्षीय वनस्पती क्वचितच उगवतात. बहुवर्षीय वनस्पतींचे पुनरुत्पादन बीजधारणेने न होता कोंबापासून किंवा धावऱ्या खोडापासून होते. आर्क्टिक वनस्पतींचे जीवनचक्र हंगामी व वेगाचे असते. फुलांचा व बीजांचा हंगाम जेमतेम दीड महिन्याचा असतो. लुपाइन, रानटी क्रॉकस, डोंगरी ॲव्हन, आर्क्टिक पॉपी व पाषाणभेदी या प्रमुख जाती आहेत. प्रथमदर्शनी खडकाळ, वनस्पतींरहित वाटणारे प्रदेश खरोखर शेवाळे, दगडफूल यांसारख्या वनस्पतींनी आच्छादलेले असतात. दगडफुलाचे काही प्रकार संशोधकांना खाद्य म्हणून उपयोगी पडलेले आहेत. खडकांच्या भेगांतही वनस्पती उगवतात. मधूनमधून फुलझाडेही असतात. करड्या व पिवळसर रंगाच्या खालच्या थरावर तपकिरी रंगाचा थर असलेल्या जमिनीवर गवत उगवते. तेथे जमिनीचा वरचा कार्यकारी थर अधिक खोल असतो. अधिक आर्द्रतेच्या प्रदेशात गवत व लव्हाळे यांचे झुपके आढळतात. सुरक्षित दक्षिण उतारांवर व किंचित कमी थंड भागात विलो, बर्च, आल्डर, ज्यूनिपर यांची बने असतात. तरुरेषेजवळ त्यांची उंची तीन मीटरइतकीही होते. परंतु सामान्यत:आर्क्टिकमधील वनस्पती एक मीटरपेक्षा कमीच उंचीच्या असतात. क्रोबेरी, क्लाउडबेरी, बिलबेरी, क्रॅनबेरी ही फळे खाद्य असतात. नद्यांच्या सुरक्षित खोऱ्यात व त्यांच्या काठाकाठाने सलग अरण्य वाढते. त्याला गॅलेरिया अरण्य म्हणतात. अळंबी सर्वत्र असतात व त्यांचा अन्न म्हणून उपयोग होतो. आर्क्टिक व उपआर्क्टिक मिळून वनस्पतींच्या सुमारे १,७०० जाती आहेत व फुलांच्या सुमारे ९०० जाती आहेत. रेनडियरशेवाळे ही दगडफुलाची एक जात असून त्यावर बर्फ साठले, तरी खुरांनी उकरून रेनडियर ते खातात.
प्राणिजीवन :रेनडियर, कॅरिबू, हिमअस्वल, हिमलांडगा, हिमकोल्हा, हिमससा, घुशीसारखे लेमिंग व व्होल, वीझल हे प्राणी व टार्मिगन, गायरफाल्कन, हिमघुबड हे पक्षी जमिनीवर आढळतात. हे प्राणी व लेमिंग, टार्मिगन, कॅरिबू यांचे अन्न असलेल्या वनस्पती हे एक परस्परावलंबी चक्र आहे. लेमिंग व व्होल हे कॅरिबू व रेनडियर यांना उपयोगी असणारे गवत व वनस्पती खाऊन टाकतात. त्यांची संख्या वेगाने वाढते. दर तीनचार वर्षांनी ती शिखरास पोचते. हिमघुबड, इतर पक्षी व कोल्हे या छोट्या प्राण्यांस फस्त करतात. या खाद्यासाठी पक्षी उत्तरेस स्थलांतर करतात. भरपूर खावयास मिळून कोल्ह्यांची संख्या खूप वाढली म्हणजे एस्किमो त्यांची शिकार करून त्यांची कातडी विकतात. लेमिंग व व्होल यांमुळे गवत कमी होते व कॅरिबूंना चरण्यास दूरदूर जावे लागते. कॅरिबू कमी झाले की एस्किमोंची उपासमार होते. गवत कमी झाले की लेमिंग व व्होल सामुदायिक स्थलांतर करताता. वाटेत नदी किंवा समुद्राचा भाग आला, तरी ते सरळ त्यात शिरून पलीकडे जाऊ पाहतात. यात ते मोठ्या संख्येने बुडून मरतातही. यावरून हे प्राणी सामुदायिक आत्महत्या करतात असा चुकीचा समजरूढ झाला आहे. यांची संख्या कमी झाली की पुन्हा गवत वाढते व हे चक्र चालू राहते. उन्हाळ्यात संयुक्त संस्थाने, ब्राझील, अंटार्क्टिका यांसारख्या दूरदूरच्या प्रदेशांतून पक्षी स्थलांतर करून येथे येतात व हिवाळ्यात परत जातात. कस्तुरीवृषभ (मस्क ऑक्स) हा हल्ली उत्तर ग्रीनलंड व उत्तर अमेरिकन आर्क्टिकमध्ये आढळतो. वुडफ्रॉग हा बेडूक उन्हाळ्यात डबक्यातून राहतो व हिवाळ्यात चिखलात पुरून घेतो. आर्क्टिकमध्ये रेडपोल, लॅपलँड लाँगस्पर, स्नोबर्ड, व्हीटइयर, पिपिट हे जमिनीवरील व प्लोव्हर, सँडपायपर, लून, रॉकटार्मिगन, बदक व हंस हे गोड्या पाण्याजवळील पक्षी आहेत. व्हाइट फिश, ट्राउट, ग्रेलिंग, स्टिकल्बॅक, ब्लॅकफिश, आर्क्टिक चार, बुरबॉट, नॉर्दर्नपाइक, अटलांटिक सॅमन हे मासेही सापडतात. आर्क्टिकमध्ये डास व माशा भरपूर असून त्यांचा माणसांना व इतर प्राण्यांनाही फार त्रास होतो. कोळी, काही कवचधारी व इतर लहान जीवही पुष्कळ आहेत. आर्क्टिक प्रदेशात सागरी जीवोत्पत्ती भरपूर होते. यामुळेच एस्किमो लोकांचे जीवन मुख्यत: समुद्रावर अवलंबून असते. स्पर्म, बेलुगा, नार, किलर, ग्रीनलंड हे व्हेल माशाचे प्रकार वालरस हेअर, दाढीवाला, वलये किंवा पट्टे असलेला, हार्प व हूडेड इ. सीलचे प्रकार हे प्रमुख सागरी प्राणी आहेत. ओल्डस्क्वा, आयडर, ससाणा, रॅव्हन, पेट्रेल, पफिन, टर्न ऑक, सागरी बदक, गल, जेगर, वेडर हे सागरी पक्षी आहेत. फुलमार हा पेट्रेल गटातील पक्षी व गल, डोव्हकी, मुर्र व सागरी कबुतर हे कडेकपाऱ्यांवर वाढतात. हे सर्व पक्षी हिवाळ्याच्या सुरुवातीस दक्षिणेकडे स्थलांतर करतात. आर्क्टिकच्या पाण्यात माशांच्या जाती फार थोड्या आहेत. सस्तन प्राणी अधिक आहेत. उपआर्क्टिकमध्ये मासे पुष्कळ जातीचे आहेत. कवचधारी व अपृष्ठवंशीय प्राणीही विपुल आहेत. प्लँक्टन हे माशांचे खाद्य आर्क्टिकमध्ये कमी आहे.
लोक: अलास्का ते ग्रीनलंड व लॅब्रॅडॉरपर्यंतच्या सुमारे १०,००० किमी. च्या किनारपट्टीवर सुमारे ५०,००० एस्किमो राहतात. त्यांचे जीवन भटकेगिरीचे असते. त्यांची शारीरिक ठेवण, भाषा व संस्कृती सारखीच आहे. मुख्यत:सील व कॅरिबू यांचे मांस व व्हेलची चरबी हे त्यांचे अन्न असते. उन्हाळ्यात पक्षी व त्यांची अंडी यांची जोड मिळते. कोल्हे, ससे वगैरे प्राण्यांची मऊ केसांची कातडी विकणे, हा व्यवसाय काही लोक करतात. त्यांचे कपडे कॅरिबूच्या कातड्याचे असतात. आतील कपड्यांची केसांची बाजू आत व बाहेरच्या कपड्यांची केसांची बाजू बाहेर करतात. यामुळे थंडीपासून चांगले रक्षण होते. हिवाळ्यात ते बर्फाच्या इग्लू नावाच्या, घुमटाकार घरात किंवा कधीकधी दगड व माती यांच्या घरात राहतात. उन्हाळ्यात बहुधा कातडी तंबूत राहतात. शिकार हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. हिवाळ्यात कुत्र्यांनी ओढावयाच्या घसरगाडीतून ते शिकारीला जातात. उन्हाळ्यात कातड्यांनी मढविलेल्या कयाक किंवा ऊम्याक नावाच्या होडीतून जातात. सीलचे कातडे, चरबी व तेल यांस चांगली किंमत येते. यांशिवाय वालरसपासून त्याचे हस्तिदंतासारखे सुळे मिळतात. देवमाशाची चरबी, कातडे, मांस व हाडे सर्व उपयोगी पडतात. हाडांची हत्यारे होत असत. आता बंदुका वापरल्या जातात. प्राण्यांच्या हाडांची पुडही कोंबड्याबदकांच्या खाद्यात मिसळण्यासाठी रवाना होते. एस्किमोंच्या प्रदेशाच्या दक्षिणेस अलास्का व कॅनडामधील ‘इंडियन’ जमातींची वस्ती आहे.
यूरेशियातील लोक एस्किमोंप्रमाणेच मंगोलियन वंशाचे आहेत. बेरिंग सामुद्रधुनीपासून स्कँडिनेव्हियापर्यंत त्यांच्या एस्किमो, पॅलिओसायबीरियन, अल्ताइक, केट, उरालिक व इंडोयुरोपीय या सहा प्रमुख भाषा आढळतात. सायबीरियन एस्किमो किंवा युइट हे चुकची द्वीपकल्पावर कायम स्वरूपाच्या खेड्यांतून राहतात. ते अलास्कामधील एस्किमोंचे पूर्वज असावेत असे आता दिसून आले आहे. ते समुद्रातील सस्तन प्राण्यांची शिकार करून राहतात. पॅलिओसायबीरियनांचे गिल्याक, चुकची, युकाधिर व येनिसियन असे चार प्रमुख गट आहेत. त्यांना अमेरिकनॉइड्स असेही म्हणतात. ते अमुरचे खोरे, सकालिन बेटे, चुकची व कॅमचॅटका द्वीपकल्पे येथे राहतात. केसाळ कातड्याच्या प्राण्यांची व सीलची शिकार, मासेमारी, रेनडिअरचे कळप बाळगणे हे व्यवसाय ते करतात. गिल्याक हे अलीकडे शेती व गुरे पाळणे हे व्यवसायही करू लागले आहेत. ते व चुकची गटातील काही लोक स्थिरवस्ती करून राहतात. परंतु बहुतेक लोकांचे जीवन भटकेगिरीचेच आहे. तुंगू हे लोक आर्क्टिक समुद्र ते मंगोलिया व ओखोट्स्क समुद्र ते येनिसे नदी या भागात राहतात. उत्तरेकडे त्यांचा व्यवसाय शिकार व रेनडिअर बाळगणे आणि दक्षिणेकडे गुरे पाळणे व शेती असा आहे. त्यांची भाषा अल्ताइक भाषांचा एक प्रमुख घटक आहे. येकूत्स्क हे सायबीरियातील मूळच्या लोकांपैकी सर्वांत अधिक सुसंस्कृत आहेत. त्यांची तुर्किक भाषा अल्ताइक भाषांच्या तीन प्रमुख विभागांपैकी एक आहे. यांचे येकूत्स्क हे स्वायत्त सोव्हिएट लोकसत्ताक लीना व तिच्या उपनद्या तसेच अनबर, अल्यिनोक, याना इंडिगिर्का व कोलीमा या नद्यांच्या प्रदेशात आहे. तेही दक्षिणेकडे घोडे, गुरे पाळतात, शेती करतात व उत्तरेकडे शिकार व रेनडिअर पाळणे हे व्यवसाय करतात. सॅमॉयिड लोक तैमीर द्वीपकल्प ते श्वेतसमुद्र या विस्तृत प्रदेशात राहतात. शिकार, रेनडिअर पाळणे, मासेमारी यांवर ते राहतात. त्यांची भाषा उरालिक गटाची आहे. लॅप लोक हे नॉर्वे, स्वीडन, फिनलंड यांच्या उत्तरभागात राहतात. एक हजार वर्षांहून अधिक काळ ते रेनडिअर पाळीत आले आहेत. आता त्यांच्यापैकी पुष्कळ लोक मासेमारी व लहान प्रमाणात शेतीही करतात. त्यांची भाषा फिनिश भाषेसारखी आहे. फिन्, झिरियन, ओस्ट्याक, व्होगुल इ. युरोपीय आर्क्टिकमधील लोक रशियन किंवा स्कँडिनेव्हियन या इंडोयूरोपीय किंवा फिनोउग्रियन भाषा बोलतात. यांचेही जीवन वरीलप्रमाणे भटकेगिरीचे आहे.
अलीकडे येथील लोकांचा संबंध व्यापारी मासेमारी, खाणकाम, मेंढपाळी, छोट्या बोटी बांधणे, विमानतळ बांधणे, संरक्षण यंत्रणा उभारणे, वाहतूक या व्यवसायांशी येऊ लागला आहे व त्यांबाबत त्यांना उत्तेजनही दिले जात आहे. पश्चिम ग्रीनलंड, बॅरेंट्स समुद्र, आइसलँड, श्वेतसमुद्र, ईशान्य सायबीरिया व अलास्का येथील मासेमारीची क्षेत्रे महत्त्वाची आहेत. मॅकेंझी खोरे, नॉर्वेचे फियोर्ड, फिनलंड इ. भागात लाकूडतोडीचाही व्यवसाय चालतो. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, डेन्मार्क, रशिया इ. देश आर्क्टिक प्रदेशातील लोकांचा तेथील नवनवीन कामांसाठी उपयोग करून घेऊ लागले आहेत. या संपर्कामुळे त्यांच्या जीवनपद्धतीतही फरक पडू लागला आहे. रेडिओ, धान्यपदार्थ यांचा उपयोग काही लोकांत दिसू लागला आहे.
खनिजे:येथील खाणी अलीकडच्या काळातील आहेत. १९२० नंतरची नैर्ऋत्य ग्रीनलंडमधील इव्हिगुट येथील क्रियोलाइटची खाण ही पहिली यशस्वी खाण होय. डिस्को उपसागराजवळ व स्वालबारमध्ये कोळसा मिळतो. पूर्व ग्रीनलंडमध्ये मेस्टेस्विर्ग येथे शिसे व जस्त यांची खाण आहे. नैर्ऋत्य ग्रीनलंडमध्ये यूरेनियमसाठी मोठा शोध झाला. ग्रेट बेअर सरोवराजवळ रेडियम व यूरेनियम यांच्या खाणी निघाल्या. ग्रेट स्लेव्ह सरोवराजवळ यलो नाइफ येथे सोने, हडसन उपसागरावरील रँकिन आखाताजवळ निकेल, यूकॉनमध्ये मेयो येथे शिसे व जस्त सापडले. इतरत्रही सोने सापडत होतेच. आर्क्टिककडील उतारावर विशेषेकरून तेल सापडले आहे. अंगावा उपसागराजवळ लोखंड आहे. पहिल्या महायुद्धानंतर रशियात कोला द्वीपकल्पात पेचोरा व येनिसे खोर्यांत खाणींची वाढ झाली. पूर्व सायबीरियात सोने व हिरे, आर्क्टिक किनाऱ्यावर मीठ, बऱ्याच भागात तेल व नद्यांच्या खोर्यांत कोळसा सापडतो. आर्क्टिक प्रदेशातून अमेरिका व यूरेशिया यांमधील सागरी व हवाई मार्ग जवळचे पडत असल्यामुळे हल्ली तेथे नौकानयन व हवाई वाहतूक यांत पुष्कळच प्रगती झाली आहे. बर्फफोड्या बोटी, सागरी पाहणी, हवामानाचा चांगला अभ्यास, विमानांची मदत, अचूक नकाशे यांमुळे तेथे वाहतूक वाढली आहे. आर्क्टिकमधील खनिजे, तेथे प्राणिज अन्न भरपूर मिळण्याची शक्यता व तेथून जाणारे जवळचे मार्ग यांमुळे या प्रदेशाला आर्थिक व लष्करी महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे आर्क्टिक प्रदेशावर सत्ता कोणाची हा महत्त्वाचा प्रश्न उत्पन्न झाला. प्रथम कोणी शोध केला किंवा वस्ती केली यापेक्षा आर्क्टिक महासागराच्या किनाऱ्यावरील राष्ट्रांनी आपापल्या पूर्वपश्चिम सीमेवरील रेखावृतांमधील ध्रुवापर्यंतचा आर्क्टिक प्रदेश तो आपला असे मानण्यास सुरुवात केली. यातून बेटे व खंडाचा किनारा यांमधील पाणी, बेटांबेटांमधील पाणी, बेटे नसलेला आर्क्टिक महासागराचा भाग, तरंगते हिमखंड व हिमबेटे यांखालील पाणी, संबंधित प्रदेशावरील आकाशाचा भाग यांच्यावरील स्वामित्वाच्या समस्या उत्पन्न झालेल्या आहेत. समुद्रतळावरील संपत्तीच्या उपयोगासाठी किनाऱ्यापासून ३२० किमी. पर्यंतच्या समुद्रबूडजमिनीवरील स्वामित्वाचे तत्त्व १९५८च्या जिनिव्हा परिषदेने मान्य केले आहेमात्र त्यामुळे किनाऱ्यापासूनच्या सागरी सीमेवर परिणाम होता कामा नये. हिमखंड व हिमबेटे ध्रुवाभोवती घड्याळकाटेविरुद्ध दिशेने फिरत असल्यामुळे दुसऱ्याच्या सीमेत वाहात जाणे शक्य असते. स्वामित्वाच्या प्रश्नाचा अद्याप निश्चित निर्णय झालेला नसला, तरी हवामान निरीक्षण, हवाई वाहतूक इ. गोष्टींसाठी सध्या मोठमोठे प्रदेश उपलब्ध आहेत. अणुसंचलित पाणबुड्यांमुळे आधुनिक शस्त्रास्त्रे व व्यापारी माल यांची बर्फाखालून वाहतूक करणे शक्य झाले आहे. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमुळे लष्करी प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत. अमेरिकेने कॅनडाच्या मदतीने आर्क्टिक प्रदेशात मोठी रडारयंत्रणा उभारली आहे. नाटोकरारातील राष्ट्रे व वॉर्साकरारराष्ट्रे यांमधील ताणलेल्या संबंधामुळे आर्क्टिक प्रदेशातून जाणाऱ्या मार्गांचे संरक्षण हाही महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. (चित्रपत्र ६२).
संदर्भ : 1. Baird, Patrick D. The Polar World, London, 1946.
कुमठेकर, ज. ब.
आर्क्टिक प्रदेश
“