आरोग्यशिक्षण : निकोप शरीरसंवर्धनासाठी विद्यार्थांना जे शिक्षण दिले जाते, त्यास आरोग्यशिक्षण म्हणतात. शारीरिक स्वास्थ्य राखणे, शरीर सुदृढ करणे, तसेच ते स्वच्छ ठेवणे ही आरोग्यशिक्षणाची काही प्रमुख उद्दिष्टे होत. शिक्षणसंस्थांतील आरोग्यानुकुल परिस्थिती, वैद्यकीय तपासणी व उपचार, आरोग्यसाधक तरतुदी व त्यांचे शास्त्रशुद्ध शिक्षण ह्या त्रिविध उपायांनी आरोग्यशिक्षण साधले जाते. वैयक्तिक व सामुदायिक आरोग्याचे परिपोषण करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना योग्य सवयी जडविणे व त्यासाठी त्यांचे सम्यक ज्ञान करून देणे आवश्यक असते. यासाठी पालक, शिक्षक व समाज यांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सरकार व इतर संबंधित संस्था आणि सार्वजनिक आरोग्यखाते ह्यांचेही साहाय्य आवश्यक आहे.
आरोग्यशिक्षणाच्या अभ्यासक्रमात शारीरक्रियाविज्ञानाची तोंडओळख हा प्रमुख भाग असून त्याशिवाय शरीराची निगा, व्यायामाची गरज, आहारातील जीवनसत्त्वांचे महत्त्व, नाक, कान, डोळे, आदी इंद्रियांची स्वच्छता इत्यादींसंबंधींची माहिती अंतर्भूत केलेली असते. रोगप्रतिबंधक उपाय व रोगनिर्मूलन हे विषयही त्यात समाविष्ट केलेले असतात. ह्याशिवाय आहारविद्या, भौतिकी, जीवविज्ञान, वनस्पतिविज्ञान यांतील काही आवश्यक भाग निवडून अभ्यासक्रम तयार केलेला असतो. विशेषतः मुलींसाठी असलेल्या गृहविज्ञान या विषयाकडे विशेष लक्ष पुरविले जाते. अलीकडे लैंगिक शिक्षणाचाही सदर अभ्यासक्रमात समावेश केला असून व्यसनांपासून होणाऱ्या अपायांचीही माहिती ह्या अभ्यासक्रमाद्वारे दिली जाते. वैयक्तिक व सामुदायिक आरोग्याबाबत आपली जबाबदारी काय आहे, ह्याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यास असणे आवश्यक असते. आरोग्यशिक्षण कृतिपर व अनुभवाधिष्टित असावे, असे तज्ञांचे सर्वसाधारण मत आहे. त्यायोगे विद्यार्थ्यांना बरेचसे ज्ञान सुलभपणे होते. शिवाय विद्यार्थ्यांस कृतिपर अनुभवातून एक वेगळा आनंद मिळतो व वातावरणही प्रसन्न राहते. घराची, शाळेची व शाळेच्या आवाराची सफाई त्यांच्याकडून करून घेऊन तिचे महत्त्व त्यांस पटवून दिले जाते. सर्वांत स्वच्छ वर्गास उत्तेजनपर बक्षीस दिल्यास विद्यार्थ्यांत उत्साह वाढून स्वच्छतेची चुरस वाढते. गावातील रस्ते व गटारे यांच्या निरीक्षणातून व तत्संबंधी चर्चेतून विद्यार्थांना आरोग्यविषयक माहिती देता येते. आरोग्यशिक्षण हे निषेधस्वरूप नसावे, ते विधायक असावे. प्राथमिक शाळेत दररोज सकाळी शिक्षकाने मुलांची नखे, डोळे, कान यांचे निरीक्षण केल्यास त्याचा चांगला परिणाम होतो. माध्यमिक शाळेत आरोग्यशिक्षण चर्चेद्वाराही दिले जाते. प्राथमिक शाळांतील सामुदायिक जीवन या विषयात आता आरोग्यशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचा समावेश झाला आहे. तसेच आरोग्यशिक्षण शारीरीक शिक्षणाशीही निगडित करण्यात आले आहे. दृक्श्राव्य साधनांचा उपयोगही ह्यासाठी अलीकडे करण्यात येतो.
संदर्भ : 1. Bibby, Cyril, Health Education–A Guide to Principles and Prictice, London, 1951.
2. Holmes, A. C. Health Education in Developing Countries,London, 1966.
३. अकोलकर, ग. वि. पाटणकर, ना. वि. शालेय व्यवस्था, पुणे, १९६४. ४. डांगे ,चंद्रकुमार, शालेय
नियोजन, मुंबई, १९६२.
मराठे , रा. म.