संबळपूर विदयापीठ : भारताच्या ओरिसा राज्यातील एक विदयापीठ. ते संबळपूर या जिल्ह्याच्या ठिकाणी बर्लानामक भागात आहे. पश्र्चिम ओरिसा राज्यातील मागास आदिवासी भागात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १ जानेवारी १९६७ रोजी या विदयापीठाची स्थापना झाली. विदयापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक असून त्याच्या क्षेत्रात संबळपूर, सुंदरगड, बोलानगीर, कलहंडी हे जिल्हे आणि धेनकानाल व फुलबानी या दोन जिल्ह्यांतील अनुकमे अथमलिक व बौध हे उपविभाग अंतर्भूत होतात. अध्यापनाचे माध्यम मुख्यत्वे इंग्रजी असून अलीकडे ओडिया या प्रादेशिक भाषेतही शिक्षण दिले जाते. विदयापीठात मानव्यविदया, सामाजिक शास्त्रे आणि तंत्र व विज्ञान याविषयांतर्गत स्वतंत्र विदयाशाखा असून अलीकडे संगणकशास्त्र, परिस्थितिविज्ञान, पृथ्वी-विज्ञान या विषयांतील विदयाशाखा सुरू करण्यात आल्या आहेत. विदयापीठक्षेत्रात लजपतराय विधी महाविदयालय व अभियांत्रिकी महाविदयालय आहे. १०२ महाविदयालये विदयापीठाशी संलग्न आहेत. त्यांपैकी चार महाविदयालये सायंकालीन असून, केवळ महिलांसाठी आठ महाविदयालये होती (१९९८). १९९८ साली ४४,०२६ विदयार्थी शिकत होते. विदयापीठाच्या गंथालयात सु. ६०,००० गंथ होते. सप्तर्षि हे मासिक, सायन्स जर्नल (वार्षिक) आणि ह्यूमॅनिटीज जर्नल (वार्षिक) ही नियतकालिके विदयापीठामार्फत प्रसिद्घ केली जातात. विदयापीठात पदव्युत्तर अध्यापनासाठी छात्रवृत्त्या दिल्या जातात. बहिःस्थ विदयार्थ्यांसाठी, विशेषतः महिलांसाठी, सोय आहे. विदयापीठाचे संविधान इतर विदयापीठांप्रमाणेच असून कुलगुरू व कुलसचिव प्रशासकीय व्यवस्थापन पाहतात. विदयापीठाच्या आरोग्यकेंद्रातर्फे वसतिगृहातील विदयार्थि-विदयार्थिनींना विनामूल्य आरोग्यसेवा उपलब्ध आहे.

देशपांडे, सु. र.