आरागाँ, ल्वी :(३ ऑक्टोवर १८९७ – ). अर्वाचीन फ्रेंच कवी व कादंबरीकार. जन्म पॅरिस येथे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर तो आंद्रे ब्रताँच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे अतिवास्तववादाकडे आकर्षिला गेला व लवकरच या कला-साहित्य संप्रदायाचा संस्थापक सदस्य झाला. Feu de joie (१९२०) व Mouvement perpetuel (१९२५) हे दोन काव्यसंग्रह अतिवास्तववादाच्या कलातत्त्वांना अनुसरून लिहिले गेले. यापुढे केवळ साहित्यक्षेत्रातील बंडाचे अपुरेपण आरागाँला जाणवले व फ्रान्समध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या कम्युनिस्ट पक्षाचा तो सदस्य झाला. Le Paysan de Paris(१९२६) या कादंबरीतसुद्धा अतिवास्तववादी कलातत्त्वांचा प्रभाव दिसून येतो. तीत पॅरिस शहराच्या परिचित रूपापलीकडील अनोख्या, रम्य व अद्‌भुत रूपाचे दर्शन त्याने घडवलेले आहे. Les Voyageurs del’Imperiale(१९४३) व Aurelien (१९४४) या आत्मनिवेदनपर कादंबऱ्या आहेत. Les Cloches de Bale(१९३४, इं. भा. द बेल्स ऑफ बाझेल, १९४१) व Les Beaux Quartiers (१९३६, इं. भा. रेसिडेन्शल क्वार्टर, १९३८) या कादंबऱ्यांतून आरागाँने नीतिभ्रष्ट, कोत्या मनोवृत्तीच्या बूर्झ्वा समाजाचे चित्रण केले आहे. त्यांत कम्युनिस्ट विचारप्रणालीची छाप दिसते. LeCreve-Coeur (१९४०, इ. शी. हार्टब्रेक) हा महायुद्धकालीन अनुभवांतून स्फुरलेल्या कवितांचा संग्रह अतिशय लोकप्रिय झाला. Les Yeuxd’ Elsa (१९४२, इं. शी. एल्साज आइज) या संग्रहातील कवितांमागे देशभक्ती व प्रीती यांची प्रेरणा आहे. यानंतर Les communistesचे पाच खंड १९४९ ते १९५१ च्या दरम्यान लिहिले गेले. बांधील कवीच्या भूमिकेला अनुसरून आरागाँने हिटलरशाहीविरुद्ध पुकारलेल्या प्रतिकारात भाग घेतलेला होता.

आरागाँने जुन्या कवनांच्या धर्तीवर नव्या काव्यरचना रूढ केल्या. शिवाय रँबोच्या शब्दकिमयेचे त्याला विशेष आकर्षण होते. Traite du style (१९२८) या त्याच्या ग्रंथात त्याने अतिवास्तववादी कलातत्त्वांचे विवेचन केले आहे.

संदर्भ : Roy, Claude, Aragon, Paris, 1945.

टोणगावकर, विजया