आरक्त चर्मक्षय : (त्वचाक्षय).त्वचेतील संयोजी ऊतकाला (समान रचना व कार्य असलेल्या शरीराच्या सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहाला) शोथ (दाहयुक्त सूज) येऊन जी विकृती होते तिला आरक्त चर्मक्षय किंवा त्वचाक्षय असे म्हणतात. हा ðकोलॅजन विकारांपैकी एक आहे. शरीरातील सर्वच संयोजी ऊतकांना या विकारात शोथ येतो. चर्मक्षय हा त्याचा एक भाग आहे. श्लेष्मकला (नाजूक अस्तरासारखा ऊतकांचा थर), लसीकला (शरीरातील गुहांचे अस्तर म्हणून असलेला संयोजी ऊतकांचा पातळ व नाजूक थर), हृदय, वृक्क (मूत्रपिंड), मस्तिष्क (मेंदू), फुप्फुसे आणि सांधे या सर्व ठिकाणच्या संश्लेषीजन द्रव्याला (एक प्रकारच्या प्रथिन द्रव्याला) शोथ आल्यामुळे या रोगात सार्वदेहिक लक्षणे दिसतात. हा रोग चिरकारी (दीर्घकालीक) स्वरूपाचा असून त्याने वारंवार शरीर ग्रस्त होते. मध्यंतरीच्या काळात रोगी सापेक्षतया बरा असतो. क्वचित प्रसंगी रोग अतितीव्र स्वरूप घेतो.
पुरुषांपेक्षा स्त्रियांत या रोगाचे प्रमाण जास्त असते. आनुवंशिक प्रवृत्ती आणि अधिहर्षता (ॲलर्जी) यांमुळे हा रोग होत असावा अशी कल्पना आहे. रक्तात गॅमा-ग्लोब्यूलिनांचे (एक प्रकारच्या प्रथिनद्रव्याचे) प्रमाण जास्त दिसते. सर्व ऊतकांना आधारभूत असे जे संश्लेषीजन द्रव्य, ते फुगून त्याचे तंत्वात्मक परिवर्तन होते. संधिवात, संधिवाताभ संधिशोथ (संधिवातासारखी सांध्यांची दाहयुक्त सूज) वगैरे इतर संश्लेषीजन शोथामुळे होणाऱ्या रोगांच्या जातीचाच हा रोग आहे. रोगाच्या संप्राप्तीचा संपूर्ण बोध अजून झालेला नाही.
लक्षणे: ज्वर, अरुची, अशक्तपणा वगैरे सर्वसामान्य लक्षणे दिसतात त्याशिवाय विशिष्ट ऊतकांतील विकृतीमुळे खालील लक्षणेही दिसतात :
त्वचा: चेहऱ्यावर विशिष्ट तऱ्हेचा उत्स्फोट (फोड) दिसतो. मध्यभागी नाकाला व त्याच्या दोन्ही बाजूंच्या गालांना लाली येते. तेथे लाल, पिवळट अथवा पांढरट असे निरनिराळ्या रंगाचे व आकाराचे फोड येतात. त्याच्या स्वरूपामुळे या उत्स्फोटाचे वर्णन ‘फुलपाखरा-सारखा उत्स्फोट’ असे करतात.
नखे व बोटांची टोके या ठिकाणी लाली व सूज येऊन त्या ठिकाणची त्वचा काही काळाने पातळ होऊन पांढुरकी दिसू लागते. त्वचेवर पाण्याने भरलेले लहान मोठे फोड येतात. ते फोड फुटले म्हणजे त्या जागी व्रण होतात.
सर्वांगास खाज सुटून पित्तासारखे फोड येतात. त्वचेचा रंग बदलतो व केसाळ भागांतील केस गळू लागतात. त्वचा व श्लेष्मकला यांच्याखाली रक्तस्राव होतो.
हृदय : परिहृदयाला (हृदयाच्या भोवतालच्या आवरणाला) शोथ येऊन त्याच्या दोन्ही थरांमध्ये पाणी साठते. हृदयाच्या स्नायूंना फारसा अपाय नसतो परंतु हृदयाच्या अंतःस्तराला शोथ येऊन हृद्कपाटांच्या झडपांवर तंतूंचे थरावर थर बसून खपलीसारखे जाड आवरण बनते. त्या आवरणात रक्तातील कोशिका अडकून बसल्यामुळे सर्व हृद्कपाटच जाड होते. त्यातल्यात्यात द्विदल आणि महारोहिणी कपाटांत ही विकृती जास्त दिसते. संधिवातातही अशीच विकृती होते परंतु तेथे झडपांच्या कडा एकमेकीस चिकटल्यामुळे रक्तप्रवाहाला रोध उत्पन्न होतो तसे आरक्त चर्मक्षयात होत नाही.
रोहिण्यांच्या सर्व स्तरांना शोथ आल्यामुळे विशेषतः लहान आकाराच्या रोहिण्या जाड होऊन त्यांच्यामधून वाहणाऱ्या रक्तप्रवाहाला रोध उत्पन्न होतो.
वृक्क : वृक्कातील केशिकागुच्छांस (अतिलहान रक्तवाहिन्यांच्या पुंजक्यास) शोथ आल्यामुळे वृक्कक्रिया विकृत होऊन मूत्रात प्रथिन व रक्त जाऊ लागते. क्वचित पूही होतो. वृक्कशोथ पुनःपुन्हा होत असल्यामुळे त्याची क्रिया मंदावून पुढे केव्हातरी वृक्कवैफल्य होऊन (वृक्काच्या क्रिया बंद पडून) अकस्मात मृत्यू येतो.
लसीकाग्रंथी व प्लीहा : मानेतील व काखेतील लसीकाग्रंथी [→ लसीका तंत्र] आणि प्लीहा सुजून मोठ्या होतात.
फुप्फुस : परिफुप्फुसशोथ (द्रवाने युक्त अशा फुप्फुसाच्या आवरणाचा शोथ) आणि फुप्फुसशोथ [→ न्यूमोनिया] होऊन ज्वर, खोकला वगैरे लक्षणे दिसतात. क्षयरोगापासून व्यवच्छेदक निदान करणे कठीण होते.
तंत्रिका तंत्र : झटके येणे, अस्थायी पक्षाघात, मनोविकार वगैरे लक्षणे दिसून येतात. तसेच परिमस्तिष्काच्या (मज्जारज्जू व मेंदू यांभोवतालच्या आवरणाच्या) शोथामुळे डोके दुखणे, ज्वर वगैरे लक्षणेही दिसतात.
निदान : वर वर्णन केल्याप्रमाणे रोगाची अनेक लक्षणे असल्यामुळे निदान करणे फार कठीण होते. ज्या अंतस्त्यावर (शरीरातील अंतर्गत इंद्रियावर) जास्त परिणाम होतो त्याची लक्षणे जास्त दिसत असल्यामुळे त्याचा अंतस्त्याचा रोग असावा असे वाटते पण रोगाचे पूर्ववृत्त विशेष काळजीने मिळविल्यास अनेक अंतस्त्यांसंबंधीची लक्षणे वेळोवेळी झालेली आढळतात, त्यावरून निदानाला मदत होते.
उपदंशात वासरमान प्रतिक्रिया रक्तावर करून निदान होऊ शकते [→ उपदंश], आरक्त चर्मक्षयामध्ये रक्तातील श्वेतकोशिकांमध्ये विशिष्ट फरक दिसतो.
आरक्त चर्मक्षयाचा रोगी कित्येक महिने नजरेखाली असल्याशिवाय निश्चित निदान होणे कठीण आहे. रोग असाध्य असला तरी रोगी कित्येक वर्षे जगू शकतो.
चिकित्सा : सॅलिसिलेटे आणि कॉर्टिसोन या औषधांचा चांगला उपयोग होतो. कॉर्टिसोन नेहमीच घेत राहिल्यास या रोगापासून त्रास कमी होतोमात्र ते शक्य तितक्या कमी प्रमाणात घ्यावे लागते कारण त्याचा विपरीत परिणाम संभवतो.
संदर्भ : Hunter, D. Ed.Price’s Textbook of the Practice of Medicine, London, 1959.
ढमढेरे, वा. रा.