आयुर्वेद : ज्या शास्त्रात आयुष्याबद्दलचे ज्ञान आहे किंवा ज्या शास्त्राच्या उपयोगाने आयुष्य प्राप्त करून घेता येते ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद. प्राथमिक स्वरूपाचा आयुर्वेद लिखित स्वरूपात अथर्ववेदात प्रथम दिसतो. चरकसंहिता, सुश्रुतसंहिता व काश्यपसंहिता यांच्यामध्ये त्याला शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालेले दिसते. नंतर रसतंत्राची त्यात महत्त्वाची भर पडली. मानवी शरीराचा व सृष्टीचा संपूर्ण अभ्यास करून आयुर्वेद हा शास्त्रपदवीस अतिप्राचीन काळी पोचला. त्यात मानवी जीवन व सृष्टी यांच्या क्रियाप्रतिक्रियांचे मौलिक तत्त्वचिंतन ग्रथित केलेले आहे. तत्त्वज्ञान हा त्याचा पाया आहे व उच्च सुसंस्कृत मानवी जीवन त्याचा आदर्श आहे. सांख्य, योग, न्याय व वैशेषिक ही दर्शने त्यातून विकास पावली. आयुर्वेद हा धर्म, अर्थ, काम व मोक्ष या पुरुषार्थांचे अधिष्ठान आहे, असे आयुर्वेदात म्हटले आहे.
हेतू, लिंग व औषध म्हणजे उपाय हे आयुर्वेदाचे तीन मुख्य विषय. आरोग्याची म्हणजे हितकर आयुष्याची व रोगाची कारणे म्हणजे हेतू आरोग्याची व रोगाची लक्षणे वा चिन्हे म्हणजे लिंग आणि आरोग्याची व रोगनाश करण्याची साधने म्हणजे औषध वा उपाय. निरोगी व हितकर आयुष्याच्या अध्ययनात तर सर्व सृष्टीचे अध्ययन अंतर्भूत होते. कारण पांचभौतिक सृष्टीतून मनुष्यशरीर उत्पन्न होते, त्यातच राहते व त्यातच मरते त्याचा जन्म, स्थिती व मरणरूप संसार विश्वाचाच भाग आहे हेतुविषयक विचारात जिवंत मानवशरीर व ते शरीर ज्या सृष्टीचे कार्य आहे त्या सृष्टीचा विचार अंतर्भूत होतो. कारण मानवी जीवनाची परिपोषक व रोगप्रतिकारक साधने व प्रतिकूल कारणे सृष्टीतच असतात व मानवी जीवनाच्या क्रियाप्रतिक्रिया त्यावर अवलंबून असतात. या संदर्भातच करून घ्यावयाचे हितकर व रोगप्रतिकारक आयुष्य व दुर्बल आणि रोगी आयुष्य यांचे विज्ञान म्हणजे आयुर्वेद इसवी सनापूर्वी हा वेद निर्माण झाला.
हितकर आयुष्य : जो शारीरिक व मानसिक रोगांपासून मुक्त, विशेषतः तारुण्य चिरकाल असणारा, यश, बल, वीर्य व पराक्रम यांनी युक्त असा, इंद्रियांचे अर्थ, उपभोग संभार ज्याला उपलब्ध होऊ शकतात, ज्याची इंद्रिये विषयांचा उपभोग घेण्यास समर्थ आहेत, ज्याला अनेक विषयांचे पुष्कळ ज्ञान आहे, जो एक महान विद्वान वा कलाकार आहे, सामर्थ्यशाली व मोठे व्यक्तित्त्व ज्यास लाभले आहे व समाजात तसा जो मानला जातो, ज्याला श्रेष्ठ दर्जाचे वैभवप्राप्त झालेले आहे, कोणतेही कार्य करण्याच्या प्रारंभीच त्या कार्याच्या सिद्धीची सामग्रीही ज्याला संपादन करता येते व जो इच्छेप्रमाणे वागू शकतो त्याचे आयुष्य हितकर व सुखी होय. याच्या विरुद्ध ज्या प्रमाणात ज्याची परिस्थिती असते त्या प्रमाणात त्याचे आयुष्य दुःखी असते.
सर्व प्राणिमात्रांचे हित करणारा, दुसर्याचे न घेणारा, सत्य बोलणारा, मनोजयी, करावयाचे ते विचारपूर्वक करणारा, गाफिल किंवा बेफिकीर न राहणारा, धर्म, अर्थ, काम यांचे संपादन व सेवन हे परस्परांना अविरोधीपणाने करणारा, पूज्यांची पूजा करणारा, शांत स्वभावाचा, वृद्धांना मान देणारा, प्रेम, क्रोध, मत्सर, गर्व, गौरव व गती यांवर व्यवस्थित नियंत्रण करणारा, नेहमी नाना प्रकारे दान करणारा, लोकांना नाना प्रकारची मदत करणारा, तपाचरणाने ज्ञान संपादनाचा व इंद्रियजयाचा नेहमी प्रयत्न करणारा, अध्यात्म जाणणारा व त्यात रत होणारा, स्मृती व बुद्धी चांगली असणारा, इह व परलोक यांचा विचार करणारा, याचे आयुष्य हितकर होय.
आयुर्मान: साधारणपणे माणसाचे १०० वर्षे हे आयुर्मान होय. शरीरावयाच्या लांबी रुंदी, हालचालीने दिसणारे दृश्य, गूढता, उन्नतता, अवयवरचना, शरीरवाढीचा क्रम, अंगुलींचे प्रमाण, सारासारत्व, प्रकृतिदोष इ. अनेक गोष्टींवरून आयुष्याच्या दीर्घादीर्घत्वाचे प्रमाण आयुर्वेदात सांगितले आहे. हात, पाय, पाठ, दात इ. मोठी असणे, हाताची बोटे व उच्छ्वास लांब असणे, उरःस्थल विस्तृत व स्तनांतील अंतर विस्तीर्ण असणे, जांघ, मान व शिस्न लहान असणे, लांब, दाट व मऊ केस असणे, पुष्ट व मोठे कान असणे, सांधे मांसादिकांनी झाकलेले असणे इ. अनेक गोष्टींवरून दीर्घायुष्य समजता येते. याच्या उलट लक्षणे असणे म्हणजे लहान बोटे, लहान पेरी, दीर्घ शिस्न, छाती आकुंचित असणे इ. अल्पायुष्याची दर्शक होत. हसताना, बोलताना हिरड्या अगदी उघड्या दिसणे, स्वाभाविक जागेपेक्षा वर कान असणे इ. लक्षणे अल्पायुष्याची होत. मध्यम आयुष्याची लक्षणेही सांगितली आहेत. जो निरोगी असतो आणि गर्भावस्थेपासून हळूहळू वाढतो तो दीर्घायू असतो. शरीरघटकांच्या वाढीवरूनही आयुष्याचे प्रमाण सांगितले आहे. शरीरघटक जर एकदम वाढले, तर ते अल्पायुष्याचे दर्शक होत. ज्या त्या व्यक्तीच्या स्वतःच्या अंगुलांनी अवयवाची मापे शास्त्रकारांनी सांगितली आहेत, त्या प्रमाणाची ती अंगप्रत्यंगे असली की, ते दीर्घायुत्वाचे लक्षण समजले जाते. धातूंच्या उत्तम सारत्वामुळे दीर्घायुष्य, मध्यम सारत्वामुळे मध्यायुष्य आणि असारत्वामुळे अल्पायुष्य समजावे. शरीराची दोष प्रकृती आयुष्याचे प्रमाण ठरविण्याला उपयुक्त होते. कफ प्रकृती चांगल्या आयुष्याची, पित्त प्रकृती मध्य आयुष्याची, वात प्रकृती अल्पायुष्याची असते व सम प्रकृती दीर्घायुष्याची. अशा तर्हेने आयुष्याचे ज्ञान आयुर्वेदात आहे.
आयुष्यवर्धक, स्वास्थ्याला हितकर, दोषशामक, दोषवर्धक, विविध रस, वीर्य, विपाक असणाऱ्या, धात्वदींवर कार्य करणाऱ्या वनस्पती व इतर सृष्ट द्रव्यांचे सूक्ष्म व आयुष्याला उपयुक्त असे ज्ञान आयुर्वेदात त्याकरिता सांगितले आहे.
अर्थ, इंद्रिय, मन, बुद्धी, चेष्टा इत्यादींच्या अकारण विकृतीवरून आयुष्याचे प्रमाण समजते. अर्थविकृती : ज्याच्या शरीराला अनेक फुलांसारखा सुगंध, अकारण रात्रंदिवस येतो तो मनुष्य लवकर मरतो. इंद्रियविकृती : अदृश्य वस्तू ज्याला दिसते किंवा दृश्य वस्तू कारण नसताना दिसत नाही तो लवकर मरणार असे समजावे. मनोविकृती : क्षीण होत जाणाऱ्या माणसाला पूर्वी ज्या गोष्टीत आनंद वाटत होता यातच जर अकारण दुःख वाटत असेल, तर तो निश्चित इहलोक सोडणार असे समजावे. बुद्धिविकृती : ज्याच्या नित्याच्या बुद्धीच्या कुवतीपेक्षा ती अकारण एकदम वाढल्याचे दिसून आले, तर तो मरणार हे निश्चित. चेष्टाविकृती : धावताना ज्याचे पाय अकारण घसटतात व खांदा स्थानच्युत होतो, तो लौकरच मरणार हे समजावे. अशा तर्हेच्या लक्षणांनी युक्त मनुष्य किती काळाने मरणार हेही त्या त्या लक्षणांबरोबर सांगितलेले असते. अंथरुणावरून डोके वर करताच ज्याला सारखी चक्कर वा मूर्च्छा येते तो अधिक दिवस जगणार नाही.
आयुष्य : शरीर, इंद्रिये, मन, आत्मा ह्यांचा संयोग म्हणजे आयुष्य. ह्या संयोगामुळे योग्य वेळी ज्ञानक्रिया चालू राहते. व्यवस्थित चालणारी ज्ञानक्रिया आयुष्यलक्षण होय. आयुर्वेदात आयुष्याला हितकर द्रव्ये व अहितकर द्रव्ये सांगितली आहेत.
आयुर्वेदाचे प्रयोजन : आरोग्यसंपन्न व्यक्तीचे आरोग्य राखणे व रोगी व्यक्तीच्या रोगांचे निर्मूलन करणे हे आयुर्वेदाचे ध्येय आहे. रोग दुःखस्वरूप आहे. दुःख संयोग म्हणजेच रोग होय. आत्यंतिक दुःखनाश योगावस्थेत व मोक्षात होतो. योग हा मोक्षदायक आहे. आत्यंतिक दुःखनाश करणे म्हणजे योग प्राप्त करणे हे आयुर्वेदाप्रमाणे मनुष्याचे सर्वोत्तम ध्येय आहे. रोगनाशानी चिकित्सेपासून नैष्ठिकी चिकित्सेपर्यंत चारही चिकित्सा करून आत्यंतिक दुःखनाश करणे हे आयुर्वेदीयांचे उद्दिष्ट आहे. रोगनाशनी आणि प्रकृतिस्थापनी या दोन चिकित्सा सामान्य आरोग्य देणाऱ्या आहेत. रासायनी चिकित्सा बल व आरोग्य देणारी आहे व नैष्ठिकी चिकित्सा ही आत्यंतिक दुःखनाश करणारी आहे.
प्रत्येक व्यक्तीने आपल्या शारीर, मानस इ. भावांचे भिषगाकडून परीक्षण करून उत्तम, मध्यम, अल्प यांपैकी आपण ज्या आयुष्य गटात असू त्यापेक्षा दीर्घ आयुष्य लाभावे, मानवाचे जे शंभर वर्षांचे आयुर्मान दिसून येते त्यापेक्षाही अधिक आयुष्य लाभावे, याकरिता सतत प्रयत्न करणे मानवी कर्तव्य होय.
दररोजच्या शारीरिक कर्मांनी शरीराची जितकी झीज होते तितकी झीज भरून आणणारे अन्नपान कमीत कमी आवश्यक असते. हे शारीरकर्म काही मर्यादेपर्यंत अधिक वाढविले तर शरीर थकत नाही. शरीर थकणार नाही इतके श्रम मानवाने नियमितपणे केलेच पाहिजेत. ह्या श्रमांनाच ‘व्यायाम’ असे म्हणतात. दररोज आयुर्वेदोक्त पद्धतीने वाढता व्यायाम घेतल्याने शरीराची मागणी वाढते [→ स्वस्थवृत्तदिनचर्या]. व्यायामाने शरीर निर्दोष, निर्मल होऊन शरीराचे धातू म्हणजे घटक उच्च प्रतीचे बनतात. व्यायामाने अग्नी प्रदीप्त होतो शरीरातील अग्नी अनेक असतात शरीरातील प्रत्येक घटक शरीरातून निघून जाईपर्यंत सतत त्या त्या अग्नीने पचत असतो. ह्या पुनः पुनः पचनाने तो अधिकाधिक निर्मल होऊन वरवरच्या दर्जाचा होत राहतो. आहारघटक शरीरघटक बनतात. उत्तम प्रतीचे शरीरघटक बनविण्यास योग्य अशा घटकांचाच आहार घेतला तर पुढचे कार्य व्यवस्थित रीतीने चालते. शास्त्रकारांनी एकांत हितकर आहारद्रव्ये सांगितली आहेत. त्यांचाच आहार नित्य करणे अत्यावश्यक आहे. औषधे आहाराच्या कार्याला मदत करतात. औषधांनी शरीर निर्देश निर्मल करून आहारापासून उत्तरोत्तर उत्तमोत्तम घटक बनावेत म्हणून वयःस्थापनकर अशा औषधांचे नित्य सेवन करावे.
आपल्या दोष प्रकृतीप्रमाणे आपल्या शरीराचे जे गुणकर्म असतील त्या गुणकर्माच्या विपरीत गुणकर्मांचा आहार व औषधे नेहमी सेवन करावीत. आपण ज्या देशात व कालात आहोत त्या देशाच्या व कालाच्या विपरीत गुणांच्या आहारांचे व औषधींचे सेवन केले पाहिजे.
शास्त्राने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे. काल, सेवनीय द्रव्ये आणि शरीर कर्मे ही शरीराला इष्ट अशा प्रकारची व मित प्रमाणतच सेवन करावीत, म्हणजे दीर्घायुष्य प्राप्त होईल व उत्तम आरोग्याचा सुखाने उपभोग घेता येईल.
व्यक्तीचे रोग नाहीसे करणे: मनुष्य ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणाचा, त्या देशाचा, त्याच्या आहारविहाराचा, त्याच्या शारीरक्रियांचा, मानसिक विचारांचा ज्या सृष्ट पदार्थांशी संबंध येईल त्या सृष्ट पदार्थांचे मानवी शरीरावर इष्टानिष्ट परिणाम नित्य होत असतात. व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने वरीलपैकी कोणतेही कारण सुटू नये म्हणून सर्वस्पर्शी विचार आयुर्वेदाने व्यक्त केले आहेत. आहार्य पदार्थांचेही वर्गीकरण करून इष्टानिष्ट वर्ग सांगितले आहेत. प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म स्पष्ट सांगितले आहेत. त्यामुळे रोगकारणांचा विचार करताना सहसा चूक होत नाही व त्यामुळे उपचारही अचूक होऊ शकतात.
रोग ज्या शरीरात झालेला आहे त्या शरीराची प्रकृती, रोगाचे स्थान, धातू, उपधातू, मल, शरीराचे व रोगाचे बल, ज्या ऋतूत रोग झालेला आहे तो ऋतू, ज्या देशात झाला आहे तो देश, शरीराचा अग्नी, वय, रोगांच्या सूक्ष्म सूक्ष्म अवस्था, ह्या सर्वांचा विचार रोग उत्पादक दोषांचे परीक्षण करताना करावयास सांगितले आहे. औषध निवडतानाही ह्या सर्व मुद्यांचा विचार करून ते औषध निवडण्यास सांगितले आहे. एखादी रोगनाशक वनस्पती निवडताना ती कोणत्या देशात, कोणत्या जमिनीत, कोणत्या ऋतूत बलवान असते इ. सर्व मुद्यांचा विचार करून योग्य ती वनस्पती व इतर द्रव्ये त्या त्या विकारांवर योजावयास सांगितली आहेत.
शरीरामध्ये शुद्ध, विशुद्ध, विशुद्धतर (सार), विशुद्धतम घटक असतात. शरीरातील प्रत्येक धातू, उपधातू व अवयव विशुद्धतम असेल तर ती व्यक्ती इतरांपेक्षा दीर्घायुषी असते. सर्व धातू, उपधातू व मानसभाव विशुद्धतम असणारी व्यक्ती मात्र क्वचितच असते.
अष्टांग आयुर्वेद : (१) कायचिकित्सा म्हणजे साधारण रोगचिकित्सा. (२) बालरोग आणि स्त्रीरोग यांची चिकित्सा. जरी सर्व सारखे असले तरी मुले आणि स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा काही भिन्न विकार असतात. (३) शल्यचिकित्सा. शल्य म्हणजे शस्त्रोपकरणे. सर्व विकारांमध्ये औषधांचा उपयोग होत असला तरी काहींमध्ये यंत्र वा शस्त्र यांचा उपयोग रोग काढण्याकरिता करावा लागतो. (४) शालाक्यचिकित्सा. शलाका म्हणजे सळी. काहींमध्ये सळ्यांचा उपयोग करावा लागतो. सर्व रोग अनिष्ट आहार, विहार, आचार केले तर त्यामुळे उत्पन्न होत असतात. (५) दंष्ट्रचिकित्सा. दंष्ट्र म्हणजे डसून इजा करणारे प्राणी. बाह्य जीवसृष्टीतील प्राण्यांचे आक्रमण होऊनच ते होतात. त्यात सर्प, व्याघ्र इ. विषारी हिंसक अशा प्राण्यांचा समावेश होतो. (६) ग्रहचिकित्सा. ग्रह म्हणजे पकडणारा . भोवतालच्या सृष्टीतल्या वातावरणात संचार करणाऱ्या सूक्ष्म सूक्ष्म जीवांचे (ग्रहांचे, भूतांचे, जंतूंचे) आक्रमण होत असते. हे वरचे ६ चिकित्सा प्रकार, झालेला रोग नाहीसा करण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. (७) मानव व त्याची संतती संपन्न व बलवान व दीर्घजीवी होण्याचे दृष्टीने जरेची चिकित्सा वय:स्थापनाने करावयाची असते. वय:स्थापन म्हणजे तारुण्य टिकविणे. त्याकरिता औषधे असतात व त्याकरिता विशिष्ट जीवनपद्धती स्वीकारावी लागते. (८) वाजीकरण. म्हणजे शुक्रधातू वाढवून वाजी म्हणजे बलवान करण्याकरिता चिकित्सा करावयाची असते. अशी ही आयुर्वेदाची आठ अंगे आहेत.
अमके दोष किंवा अमके रोग औषध नाहीसे करते असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा एकट्या औषधाचेच रोगहरण सामर्थ्य आहे, त्या रोगहरणात शरीराचा काही वाटा नाही, असा भ्रम उत्पन्न होतो. वास्तविक रोगहरणाचा उपाय शरीर (पुरुष) सुचविते. त्यास लिंग किंवा चिन्ह म्हणतात. उम्हासे येणे, तोंडाला पाणी सुटणे, ओकारी येईल असे वाटणे, घशात येणे ह्या चिन्हांनी शरीराला आमाशयातील दोष तोंडावाटे बाहेर फेकून द्यावयाचे आहेत असे जीवात्मा (पुरुष) दाखवितो. या ठिकाणी ओकारीचे औषध देऊन ते दोष बाहेर काढणे एवढेच चिकित्सकाचे काम आहे. काही काल जर ओकारीचे औषध दिले गेले नाही, तर ओकारी आपोआप होऊन ते आमाशयातील मल बाहेर घालविले जातील. याचा अर्थ ओकारी रुग्ण म्हणजे चिकित्स्य पुरुषच करणार. वरील अवस्थेत वामक औषधाची त्याला मदत हवी होती वामक औषध ऊर्ध्वगामी आहे म्हणून त्याची मदत होते. इतरही औषधे शरीरात पचवून घेऊन त्यांच्या साहाय्याने रोगहरणाचे कार्य होत असते. शरीर हे चिकित्स्य पुरुषाचे अधिष्ठान आहे औषधे ही त्याची उपकरणे आहेत. तेव्हा रोगहरण कार्य चिकित्स्य पुरुषच करतो.
पहा : आतुरचिकित्सा; आतुरनिदान; आयुर्वेदाचे तत्त्वज्ञान व पदार्थविज्ञान; द्रव्यगुणविज्ञान; स्वस्थवृत्त.
संदर्भ : १. चरक, चरकसंहिता, निर्णयसागर प्रेस, मुंबई, १९४१.
२. वाग्भट, अष्टांगसंग्रह, चौखम्बा संस्कृत सीरिज, बनारस, १९५४.
३. वाग्भट, अष्टांगहृदय, द सरस्वती प्रेस, कलकत्ता, १८८२.
४. सुश्रुत, सुश्रुतसंहिता, निर्णयसागर प्रेस, मुंबई, १९४५.
जोशी, वेणीमाधवशास्त्री