च्यवनप्राश एक वयस्थापन म्हणजे तारुण्यकारक कल्प. सर्व धातुघटक उत्तम प्रतीचे बनविणारा हा एक प्राश आहे. यात मुख्य द्रव्य आवळा आहे. दशमुळे, अष्टवर्ग इतर काही औषधे, तेल, तूप, मध, साखर यात आहेत. हा प्राश कुटीत राहून घ्यावा. एरवीही विशेषतः हिवाळ्यात हा घेण्याची पद्धती रूढ आहे. नेहमी घेण्यासही प्रत्यवाय नाही. बालके, वृद्ध, कुश, उरःक्षताने क्षीण असलेल्यांचे शरीर तो पुष्ट करतो. मूत्रशुक्रदोष, खोकला, श्वास, ज्वर, क्षय, हृद्रोग, वातरक्त, स्वरभेद नष्ट करतो. संभोगसामर्थ्य, इंद्रिये व जठराग्नीचे बल, आयुष्य, बुद्धी, स्मृती, कांती, आरोग्य यांची वाढ विधियुक्त सेवनाने होते. आवृत्त वात या वातजन्य विकारात हा प्राश फार उपयुक्त आहे.

जोशी, वेणीमाधवशास्त्री