आप्प्या, आडॉल्फ : (१८६२ – १९२८). प्रसिद्ध स्विस नेपथ्यसंयोजक व लेखक. जन्म जिनिव्हा येथे. प्रतीकात्मक व सूचक नेपथ्याच्या सुरुवातीच्या पुरस्कर्त्यात त्याला अग्रक्रम देण्यात येतो.

त्याने लिहिलेले Die Musik und die Inscenierung (१८९९) हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे गणले जाते. रंगमंचावरील प्रत्यक्ष दृश्यश्राव्य घटकांपेक्षा परिणामकारक वातावरणनिर्मितीला अधिक महत्त्व आहे, असा त्याचा दावा होता. त्यामुळे वस्तुनिष्ठ व प्रत्यक्षानुसारी रूपाविष्कारापेक्षा सूचक व प्रतीकात्मक प्रकटनाला तो अधिक महत्त्व देतो. या दृष्टीने नाट्यप्रयोगातील नटाचे महत्त्व कमी करून रंगमंचावरील अन्य अवकाशमूलक घटकांशी त्याला अंगभूत बनविणे आणि प्रयोगाच्या गतिप्रवण अंगांची लयबद्धता वृद्धिंगत करणे, हे त्याच्या नाट्यनिर्मितीच्या उपपत्तीचे प्रधान प्रमेय होय. नाट्यांगांतील संगीत या घटकावर त्याचे लक्ष प्रामुख्याने केंद्रित झालेले होते. रिखार्ट व्हागनरच्या (१८१३–१८८३) संगीतिकांच्या प्रयोगांतून आपली उपपत्ती त्यास अधिक विशद करता आली.

रंगभूमीवरील प्रकाशयोजनेची शास्त्रशुद्ध पायावर उभारणी करण्याचे श्रेय आप्प्याकडेच जाते. प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक व लेखक एडवर्ड गॉर्डन क्रेगप्रमाणे (१८७२–१९६६) आप्प्याने वास्तव नाट्यकृतीची अतिवास्तव पद्धतीने निर्मिती करण्याचा अट्टाहास केल्याचे उदाहरण आढळत नाही. शेक्सपिअरची नाटके आणि संगीतिका यांच्याच संदर्भात प्रायः तो आपल्या कल्पनांची योजना करीत असे.

काळे, के. ना.