आयसॉएटेलीझ : (इं. क्विलवर्ट्स).वाहिनीवंत (पाणी अथवा अन्नरस यांची ने-आण करणारे शरीरघटक असणाऱ्या) अबीजी वनस्पतींपैकी हा एक गण असून आयसॉएटेसी व प्ल्यूरोमिएसी या दोन कुलांचा यात समावेश होतो. प्ल्यूरोमिया हा जीवाश्म (अवशेशरूपी) वंश ð आयसॉएटिस व ð लेपिडोडेंड्रेलीझ (जीवाश्मगण) यांना सांधणारा दुवा मानतात, कारण खालील लक्षणांत त्याचे आयसॉएटिसशी साम्य आढळते :(१) खोडाची संरचना, (२) जिव्हिकावंत पर्ण, (३) मुळाची संरचना, (४) बीजुककोश (लाक्षणिक प्रजोत्पादक अंग म्हणजे बीजुक धारण करणारा पिशवीसारखा भाग). प्ल्यूरोमिया हा विलुप्त वंश मध्य ट्रायासिक कल्पातील असून युरोपात व पूर्व आशियात त्यांचे जीवाश्म आढळले आहेत. आयसॉएटाइट्स या नावाचा जीवाश्म वंश पूर्व क्रिटेशस कल्पातील असून त्याचा विद्यमान आयसॉएटिस वंशाशी निकटचा संबंध आहे व या दोन्हींचा आयसॉएटेसी कुलात अंतर्भाव केला आहे. प्ल्यूरोमिएसी कुलातील प्ल्यूरोमिया हा एकच वंश पूर्णपणे माहीत झाला आहे. या गणातील वनस्पती ओषधीय [→ ओषधि] किंवा क्वचित लहान वृक्षासारख्या परंतु असमबीजुक असतात. खोडाच्या तळाशी मूलदंड (मुळे धारण करणारा दंड) पाने लहान वा जिव्हिकावंतबीजुकपर्णे (बीजुके धारण करणारी रूपांतरित पाने) शंकूसारख्या इंद्रियामध्ये एकत्र किंवा विरळपणे मांडलेली बीजुककोशांत प्रपट्टिका (आडवे पडदे) व बीजुककोश यूस्पोरँजिएट पद्धतीने [→ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी] बनलेलेविद्यमान वंशात रेतुके (चल पुं-जनन कोशिका) बहुकेसली (केसासारखी अनेक उपांगे असलेली) व खोडात द्वितीयक वाढ आढळते. ट्रायासिक काळापासून (साडे अठरा कोटी वर्षांपूर्वीपासून) ते आजपावेतो या गणातील प्रतिनिधींची परंपरा चालू आहे.
पहा : पुरावनस्पतिविज्ञान.
वैद्य, प्र. भ.
“