आयर्लंड: अटलांटिक महासागरात इंग्लंडच्या पश्चिमेस असलेले बेट. क्षेत्रफळ ८३,७६७ चौ. किमी. हा देश ५१०३०’ उ. ते ५५०३०’ उ. व ५०३०’ प. ते १००३०’ प. यांदरम्यान आहे. याच्या ईशान्येस नॉर्थ चॅनल, पूर्वेस व आग्नेयीस सेंट जॉर्जेस चॅनल व आयरिश समुद्र आणि उत्तरेस, दक्षिणेस व पश्चिमेस अटलांटिक महासागर आहे. आयर किंवा आयर्लंड प्रजासत्ताक व उत्तर आयर्लंड हे या देशाचे दोन स्वतंत्र राजकीय विभाग असून, त्यांचे क्षेत्रफळ अनुक्रमे ७०,२८३ व १३,४८४ चौ. किमी. व लोकसंख्या अनुक्रमे २९,७१,२३० (१९७१) व १५,२५,२०० (१९७१) आहे. या देशाची एरिन, इनिसफेल, हायबर्निया, आयबर्निया, आयरन, इव्हर्निया इ. नावेही पूर्वी प्रचलित होती. आयरिश प्रजासत्ताकाची राजधानी डब्लिन व उत्तर आयर्लंडची बेलफास्ट असून उत्तर आयर्लंडचा अंतर्भाव ग्रेट ब्रिटनमध्ये होतो.
भूवर्णन : आयर्लंडची भूमी विविध प्रकारच्या खडकांची झालेली असून त्यांत चुनखडीचे खडक, सुभाज किंवा शिस्ट, वालुकाश्म, ग्रॅनाइट इत्यादींचा अंतर्भाव होतो. देशाच्या ईशान्य भागात त्रायासिककालीन मार्ल, तृतीय कल्पातील बेसाल्ट व द्वितीय महाकल्पातील चुनखडीचे खडक सापडतात. आयर्लंडातील पर्वतही विविध प्रकारच्या खडकांचे झालेले आहेत. चतुर्थ युगातील हिमनद्यांच्या उगमांशी हिमगव्हेरेही देशातील निरनिराळ्या भागांत दृष्टोत्पत्तीस येतात. हिमामुळे आलेल्या गाळाच्या कमीजास्त उंचीची व विभिन्न आकाराची टेकाडेही सर्वत्र दिसतात. आयर्लंडचा किनारा उंच असून सर्व देश म्हणजे चुनखडीचे पठारच होय. देशाचा मध्यभाग मैदानी असून त्यात सरोवरे, दलदली व पाणथळी सर्वत्र आहेत. सामान्यत: सर्व भूप्रदेश हिरव्यागार वनस्पतींनी झाकलेला असल्याने नयनरम्य वाटतो. त्यामुळेच पाचूचे बेट असे आयर्लंडचे वर्णन यथार्थ आहे. ईशान्य भागातील मोर्न पर्वत, पूर्वेकडील विक्लो पर्वत व आग्नेयीकडील मागिलिकडी हे आयर्लंडचे मुख्य पर्वत फारसे उंच नाहीत. किलार्नीजवळील कॅरान्टुवाहिल (१०३५·५ मी.) व डब्लिनच्या दक्षिणेस ६४ किमी. लग्नाकल्या (९२४ मी.) ही या देशातील प्रमुख शिखरे होत.
आयर्लंडचे हवामान सागरी असून ते समशीतोष्ण आहे. ईशान्येकडील थंड ध्रुवीय वाऱ्यांवरील व पश्चिमेकडून वाहणाऱ्या समशीतोष्ण कटिबंधीय दमट, उबदार वाऱ्यांवरील गल्फ प्रवाहाच्या प्रभावामुळे आयर्लंडातील तपमान सरासरी १०० सें. च्या वर सहसा जात नाही. उन्हाळ्यात ते सरासरी १५०·५ – १६० से. व हिवाळ्यांत ५० – ५०·५ से. असते म्हणजे याच अक्षांशांतील अन्य यूरोपीय देशांपेक्षा येथील उन्हाळा व हिवाळा कमी कडक व म्हणून सुसह्य असतो. पश्चिमी वाऱ्यांमुळे आयर्लंडमध्ये वर्षाकाठी सु. २०० – २२५ दिवस थोडा थोडा पाउस पडतो देशाच्या पूर्व व उत्तर भागात वर्षाकाठी सु. ७० – ७५ सेंमी. व नैऋत्य भागात १२० – १२५ सेंमी. पाऊस पडतो.
शेवटच्या हिमयुगात सबंध आयर्लंड बर्फाच्छादित असल्याने आज देशात वावरणारे प्राणी व वाढणाऱ्या वनस्पती यांची आवक इंग्लंड किंवा उत्तर यूरोपातून झाली हे उघड आहे. मात्र इंग्लंडमध्ये सापडणारे मोल, पाणथळ उंदीर, टोड, व्हायपर सर्प आयर्लंडात सापडत नाही. तसेच इंग्लंडमधील कित्येक वनस्पतीही येथे दिसत नाहीत. प्राचीन काळी मध्य आयर्लंडमधील मैदानात दाट वन होते. ते आता नाहीसे झाले असले तरी ओक, पाईन, बर्च, बीच हे वृक्ष आजही सापडतात. समशीतोष्ण दमट हवामानामुळे विविध प्रकारची गवते तसेच क्लीक, प्रनड व नेचे येथे वाढतात.
आयरिश घोडा, कुत्रा, गाय व अन्य पाळीव पशूंच्या काही जाती प्रसिद्ध असून, त्यांत कॉनेमारा शिंगरू, वूल्फ्हाउंड हा शिकारी कुत्रा व ब्ल्यू टेरिअर हे उल्लेखनीय आहेत. खोकड, बॅजर, ऑटर, स्टोट, ससा इ. प्राणीही आयर्लंडात सर्वत्र आहेत. पेरिग्रिन पक्ष्यांत ससाणा, सोनेरी गरूड, नीलकंठ, सरपटणाऱ्या प्राण्यांत करडा सरडा, बेडूक, न्युटची एक जात, गोगलगाय व पिकळी हे सर्वत्र पाहण्यात येतात.
इतिहास : नवाश्मयुगात आयर्लंडात मानववस्ती असल्याचे स्पष्टपणे दिसते. केल्ट लोकांची वस्ती झाल्यानंतरही आयर्लंडमध्ये नवाश्मयुगीन जमाती होत्या. ह्या जमातींशी केल्टांचे रोटीबेटी व्यवहारही झाले. गोयडेल, ब्रायथोन इ. सोळा केल्टिक टोळ्यांची नावे टॉलेमीने दिली आहेत. अल्स्टर, मन्स्टर, लिन्स्टर, कॉनॉट हे प्रांत केल्टिक जमातीच्या वेळीच अस्तित्वात आले. ख्रिस्ती शकाच्या प्रारंभी स्कॉटलंडमधून पिक्ट लोक येथे आले. वेल्सच्या पश्चिम भागात आयरिश लोकांच्या वसाहती स्थापन झाल्या. त्या काळातील राजे प्रबळ असले तरी कोणालाही आयर्लंडवर एकछत्री अंमल ठेवता आला नाही. कॉनॉटच्या वंशातील राजांना ‘ऑर्डरि’ म्हणजे श्रेष्ठ राजे असे म्हणण्यात येई. या कालखंडात आयर्लंडमधील लोक मूर्तिपूजक होते. त्यांच्यात ड्रुइड या पुरोहित वर्गाचे बरेच प्राबल्य होते.
पाचव्या शतकात अनेक ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी आयर्लंडात ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला. त्यांपैकी सेंट पॅट्रिक हा आयर्लंडचा धर्मगुरू बनला. त्याने पूर्वीच्या ओगॅमऐवजी रोमन लिपी रूढ केली. त्याच्या प्रयत्नाने ड्रुइडांचे वर्चस्व कमी होऊन सर्वत्र ख्रिस्ती धर्ममंडळे स्थापन झाली. विद्याकलादींचा प्रसार होऊन देश सुसंस्कृत झाला. या वेळेपासून देशात रोमन कॅथलिक पंथाचे वर्चस्व स्थापन झाले ते ट्यूडर, स्ट्यूअर्ट काळात उत्तर भागात प्रॉटेस्टंट वसाहती झाल्या तरी फारसे कमी झाले नाही. आजही उत्तर आयर्लंडमध्ये ६६% व अन्यत्र ९०% पेक्षा अधिक कॅथलिक आहेत.
आठव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तर यूरोपातील व्हायकिंग टोळ्या आयर्लंडमध्ये उतरल्या. लुटालूट व जाळपोळ करून त्यांनी कित्येक खेडी उध्वस्त केली. डब्लिन, वॉटरफर्ड व लिमरिक ही गावे त्यांनी वसविली. वारंवार होणाऱ्या व्हायकिंग स्वाऱ्यांमुळे त्रस्त होऊन आयरिश लोक कधीकधी संघटित होत. परंतु परकीयांचा जाच कमी होताच यादवीस फिरून सुरुवात होई. १००१ मध्ये ब्रिअन बोरू याला आयर्लंडचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. व्हायकिंगांच्या प्रतिकारार्थ त्याने आयरिश राजेरजवाड्याना व प्रजेला संघटित केले. १०१४ मध्ये लढाईत आयरिश सैन्याने व्हायकिंगांची दाणादाण उडविली तेव्हा व्हायकिंगांना आयर्लंडमधून काढता पाय घ्यावा लागला. पण या लढाईत ब्रिअन बोरू मारला गेला. नंतर आयर्लंडमध्ये यादवीला ऊत आला व देशाची सर्वच क्षेत्रांत पीछेहाट झाली.
बाराव्या शतकात आयर्लंडात अल्स्टर, लिन्स्टर, मन्स्टर व कॉनॉट ही राज्ये महत्त्वाची होती. त्यांपैकी अल्स्टर प्रमुख होते. या राज्यांत नेहमी भांडण असल्याने देशात शांतता क्वचितच असे. अशा अशांत स्थितीत पोप चौथा एड्रियन याने इंग्लंडचा दुसरा हेन्री यास आयर्लंडचे प्रभुत्व बहाल केले. दुसऱ्या हेन्रीच्या आवाहनानुसार अनेक नॉर्मन सरदार ससैन्य आयर्लंडात उतरले (११७०). ११३२ मध्ये दुसरा हेन्री आयर्लंडमध्ये गेला, तेव्हा त्याने आयर्लंडचा राजा हा किताब धारण केला. यानंतर इंग्लिश सरदारांनी आयर्लंडमधील बऱ्याच मुलुखावर आपला अंमल बसविला. ही स्थिती सुमारे तीन शतके टिकली. या अवधीत आयर्लंडमध्ये जमिनी मिळविलेले सरंजामदार इंग्लंडमध्ये राहून मुनीमांमार्फत आपल्या जहागिरीचा कारभार पहात असल्याने आयर्लंडमधील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे वळला. खुद्द आयर्लंडमध्ये राहणाऱ्या सरंजामदारांनी आयरिशांशी फटकून वागावे अशी अपेक्षा असे व इंग्लिश वसाहतवाल्यांनी आयरिश स्त्रीशी विवाह करणे, आयरिश चालीरीती अंगीकारणे वगैरे गुन्ह्यांना फाशीची शिक्षा दिली जाई. आयरिशांवर अनेक जाचक व अपमानास्पद निर्बंध लादलेले होते. साहजिकच अवघ्या आयर्लंडात दु:ख, दारिद्र्य व दुष्काळ यांचे साम्राज्य पसरले होते.
आठव्या हेन्रीने बहुतेक आयर्लंडवर आपला ताबा बसविला. आयर्लंडही इंग्लिश चर्चच्या अंमलाखाली आणून १५४१ मध्ये त्याने कॅथलिक मठ जप्त केले. त्याने स्वपक्षीय सरदारांना आयर्लंडातील जमीनजुमले मुक्तहस्ते बहाल केलेमेरी ट्यूडरने इंग्रजांच्या मोठमोठ्या वसाहती आयर्लंडमध्ये वसवून इंग्रजी अंमलाची पकड घट्ट करण्याचा प्रयत्न केला. आयरिशांनी याला कसून विरोध केल्याने उभयपक्षी अपार मनुष्यहानी झाली. पहिल्या एलिझाबेथने आयर्लंडातील रोमन कॅथलिक प्रार्थना-पूजाअर्चा बंद करून स्वत: नियुक्त केलेल्या बिशपांमार्फत इंग्लिश चर्चचा अंमल सर्वत्र बसविला. धर्मनिष्ठ आयरिश कॅथलिकांनी गुप्तपणे आपल्या प्रार्थना-पूजाअर्चा चालू ठेवल्या व शक्य त्या प्रकारे आयर्लंडच्या इंग्रजीकरणास कसून विरोध केला. शेन ओनीस ह्यू ओनील, डेस्मंडचा अर्ल इ. आयरिश देशभक्तांनी इंग्रजी अंमलाविरुद्ध अनेकदा बंड करून शासकांना त्रस्त केले.
स्ट्यूअर्ट राजवटीत आयर्लंडची स्थिती शोचनीय झाली. पहिल्या जेम्सने अल्स्टरमध्ये स्कॉटिश प्रॉटेस्टंटांच्या वसाहती स्थापन केल्या, तर पहिल्या चार्ल्सने कॉनॉट प्रांतात स्वपक्षीयांना जमिनी मिळवून दिल्या, तेव्हा आयरिश लोकांनी फेलिम ओनीलच्या नेतृत्वाखाली बंड केले व नव्या वसाहतवाल्यांस पिटाळून लावून फिरून आपल्या जमिनी ताब्यात घेतल्या.
पहिला चार्ल्स कॅथलिकांस काहीसा अनुकूल असल्याने इंग्लिश यादवी युद्धात त्याला आयरिश लोकांनी काही साहाय्य केले. परंतु इंग्लंडमधील यादवी युद्ध समाप्त होताच क्रॉमवेलने आयर्लंडवर स्वारी केलीड्रॉएडा, वेक्सफर्ड इ. ठिकाणी आयरिशांच्या अमानुष कत्तली केल्या, कित्येकांची गुलाम म्हणून विक्री केली, हजारोंना देशत्याग करावा लागला. आयर्लंडमधील जमिनी प्रॉटेस्टंटांना वाटण्यात आल्या, व कॅथलिकांना आयर्लंडात जमिनी घेण्यास कायद्याने मनाई झाली.
इंग्रजांच्या धार्मिक छळाने, अन्याय्य कायद्यांनी व आर्थिक शोषणाने आयर्लंडची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक शोचनीय होत गेली. दारिद्र्य, दुष्काळ, रोगराई इत्यादींच्या थैमानाने गावेच्या गावे उजाड झाली. अशा स्थितीत डीन, स्विफ्ट, बर्कली, कवी पार्नेल, शेरिडन, पत्रकार हेन्री ब्रुक वगैरे लेखकांनी व तत्त्ववेत्त्यांनी आयरिश लोकांत राष्ट्रीयत्वाची ज्योत तेवत ठेवली. अमेरिकेसारख्या देशात स्थायिक झालेल्या आयरिशांचे आर्थिक साहाय्य राष्ट्रीय पक्षाला मिळू लागले. आयरिश स्वयंसेवकांची पथके उभारण्यात आली. आयरिश पार्लमेंटने केलेले कायदे व न्यायालयांनी दिलेले निर्णय ब्रिटिश शासनाने बदलू नयेत, रोमन कॅथलिकांना जमिनी घेता याव्या व त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागता यावे इ. ठरावांस १७८२ मध्ये ब्रिटिशांची मान्यता मिळाली. कॅथलिकांना मताधिकार किंवा राजकीय पद मिळविण्याचा अधिकार मात्र देण्यात आला नाही. मात्र शासनप्रमुख ब्रिटिश, मुलकी अंमलदार ब्रिटिश व सैन्यही ब्रिटिश असल्याने वरील ठरावाने आयर्लंडच्या स्थितीत फारसा फरक पडला नाही. फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रभावाने आयर्लंडातही अशांतता पसरली. वूल्फ टोन ह्या ख्यातनाम देशभक्ताने ‘युनायटेड आयरिशमन’ नावाची संस्था काढून १७९८ मध्ये फ्रेंचांच्या साहाय्याने प्रत्यक्ष बंडच केले.या बंडाचा निर्घृणपणे बीमोड करण्यात येऊन टोनला फाशी देण्यात आले. ब्रिटनचा महामंत्री विल्यम पिट याने आयरिशांस अनेक प्रलोभने दाखवून आयरिश पार्लमेंट कायमचे बरखास्त करून १८०० मध्ये इंग्लंड-आयर्लंडच्या ऐक्याच्या कायद्यास त्यांची मान्यता मिळविली. या कायद्याने आयर्लंडचे प्रतिनिधी इंग्लिश पार्लमेंटात बसणार होते. अशा रीतीने आयर्लंडच्या दिखाऊ स्वातंत्र्याचाही अंत झाला व इंग्लंड-आयर्लंड संबंधाच्या एका नव्या पर्वास प्रारंभ झाला.
तथापि ऐक्याच्या कायद्याच्या वेळी दिलेली आश्वासने ब्रिटिशांनी पाळली नाहीत आणि असंतोष व अशांतता हा आयरिश जीवनाचा स्थायीभाव झाला. देशापुढील राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक प्रश्न सोडविण्यासाठी घटनात्मक चळवळींपासून उघड बंडापर्यंत सर्व मार्ग चोखाळण्यात आले. १८२९ मध्ये डॅन्येल ओकॉनलच्या (१७७५ – १८४७) प्रयत्नाने कॅथलिक मुक्तीचा कायदा होऊन त्यांना मताधिकार मिळाला. मात्र इंग्लंड-आयर्लंडच्या एकीकरणाचा कायदा रद्द करवून घेण्याच्या त्याच्या प्रयत्नांस यश आले नाही. १८४५ – ४७ मध्ये बटाट्याच्या पिकावर रोग पडल्याने आयर्लंडात दुष्काळ पडला. सुमारे दहा लक्ष लोक उपासमारीने मेले व लाखो देशोधडीला लागले. दुष्काळाने निर्माण झालेला असंतोष धुमसत असतानाच १८४८ मध्ये यूरोपातील अनेक देशांत झालेल्या क्रांतिकारक चळवळींनी प्रभावित होऊन यंग आयर्लंड पक्षाचा नेता जॉन मायकेल याने बंडाची तयारी केली. त्याचा सुगावा लागून मायकेलला हद्दपार करण्यात आले व विल्यम ओब्रायेन आदी पुढाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली.
आयर्लंडमधील अशांतता ही ब्रिटिश मंत्रिमंडळाची कायमची डोकेदुखी होऊन बसली असता, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पार्नेलसारखे खंदे पुढारी पार्लमेंटात गेले व तेथे आयरिश स्वातंत्र्यासाठी त्यांनी अडवणूकीच्या धोरणाचा कौशल्याने व सातत्याने उपयोग करून मंत्रिमंडळाला क्षणाचीही उसंत मिळू दिली नाही. पार्नेलच्या प्रयत्नाने आयरिश होमरूलचा म्हणजे स्वराज्याचा प्रश्न सतत ब्रिटिश राष्ट्रापुढे राहिला. ग्लॅडस्टनने १८८६ व १८९३ मध्ये होमरूल विधेयके सादर केलीपरंतु पहिले कॉमन्समध्ये व दुसरे लॉर्डाच्या सभेत फेटाळले गेले.
उदारमतवादी पक्षाला १९०३ मध्ये ब्रिटिश कॉमन्समध्ये बहुमत मिळाल्याने आयरिश स्वातंत्र्याचा प्रश्न सुलभतेने सुटेल असे वाटलेपण प्रत्यक्षात काहीच न झाल्याने स्वराज्य केवळ स्वप्रयत्नानेच मिळेल असे मानून आर्थर ग्रिफिथने सीन फीन (स्वावलंबी) चळवळ चालू केली. १९१२ मध्ये तिसरे होमरूल विधेयक मांडण्यात आले, तेव्हा अल्स्टरमधील प्रॉटेस्टंटांनी सर एडवर्ड कार्सनच्या नेतृत्वाखाली या बिलाला कसून विरोध केल्याने उत्तर व दक्षिण आयर्लंडात यादवी युद्ध सुरू झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. अशा स्थितीत १९१४ मध्ये होमरूल विधेयक पास झाले. इतक्यात पहिले महायुद्ध सुरू झाल्याने महामंत्री ॲस्क्विथने आयरिश स्वातंत्र्याचा प्रश्न तहकूब केला. रेडमंडसारख्या आयरिश पुढाऱ्यांनी यास मान्यता देऊन युद्धात इंग्लंडशी सहकार्य करण्याचे धोरण अवंलबिले परंतु इंग्लंडच्या अडचणींचा फायदा घेऊन प्रत्यक्ष बंड करून स्वराज्य मिळवावे असे सीन फीन पक्षाने ठरविले. १९१६च्या ईस्टरच्या सणाच्या दिवशी पॅट्रिक पीअर्स, जेम्स कॉनली, एमन डी व्हॅलेरा यांच्या नेतृत्वाखाली डब्लिनला बंड झाले. बंडखोरांनी आयरिश लोकसत्ताक स्थापन झाल्याची घोषणाही केली. परंतु सुसज्ज ब्रिटिश सेनेपुढे बंडखोरांचे काही चालले नाही. प्रमुख बंडखोरांना फाशीच्या शिक्षा सुनवण्यात आल्या व हजारो अनुयायांना हद्दपार करण्यात आले. तथापि सर्व निवडणुकांत सीन फीन पक्षाचे उमेदवारच विजयी होत राहिले. १९१६ – १७ मध्ये ब्रिटिश पंतप्रधान लॉईड जॉर्जने आयरिश प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले पण अल्स्टरवासियांच्या कडव्या विरोधामुळे ते फसले. १९१८च्या निवडणुकीत सीन फीन पक्षाचे ७३ प्रतिनिधी कॉमन्स सभेत निवडून गेले. पण पार्लमेंटच्या अधिवेशनाला लंडनला न जाता त्यांनी डब्लिनलाच स्वतंत्र बैठक घेऊन २१-१-१९१९ रोजी आयर्लंड स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. हे बंड चिरडून टाकण्यासाठी लॉइड जॉर्जने ब्रिटिश सैन्य आयर्लंडात उतरविले. या सैन्याच्या अत्याचारांस न जुमानता आयरिश देशभक्तांनी गनिमी काव्याने ब्रिटिशांना सतावून सोडले. अल्स्टरमधील प्रॉटेस्टंटांची दाक्षिणात्यांसमवेत अभंग आयर्लंडात राहण्याची तयारी नसल्याने, १९२०च्या होमरूल कायद्याने अल्स्टरच्या पूर्व भागातील सहा परगण्यांचे उत्तर आयर्लंड राज्य व आयर्लंडमधील बाकीच्या २६ परगण्यांचे आयरिश फ्री स्टेट अशी साम्राज्यांतर्गत दोन राज्ये स्थापन करण्याचे ठरले. पैकी उत्तर आयर्लंडच्या विधिमंडळाची बेलफास्टला बैठक भरून १९२१ मध्ये त्याचे रीतसर शासन सुरू झाले. दक्षिणेकडील लोकांना वरील योजना मान्य नव्हती. तथापि आयरिश प्रतिनिधींनी राजनिष्ठेची शपथ घ्यावी व आयरिश फ्री स्टेटला डोमिनियनचा (कॅनडासारखा) दर्जा मिळावा याला आयरिश पार्लमेंटने अल्प बहुमताने मान्यता दिली व १५ जानेवारी १९२२ रोजी आयरिश फ्री स्टेटची रीतसर स्थापना झाली. मात्र पार्लमेंटचा निर्णय डी व्हॅलेराने मान्य केला नाही व आयर्लंडमध्ये यादवी युद्धास सुरुवात झाली. वरील तहास मान्यता देणाऱ्या पुढाऱ्यांपैकी ग्रिफिथ मृत्यू पावल्याने व कॉलिंझचा खून झाल्याने आयरिश फ्री स्टेटचे नेतृत्व टी. कॉझग्रेव्हकडे गेले. मे १९२३ पर्यंत यादवी युद्ध प्रत्यक्ष चालूच होते. त्या वर्षाच्या निवडणूकांत डी व्हॅलेराच्या पक्षाची पुष्कळच पीछेहाट झालेली दिसली. तरीही त्याच्या पक्षाच्या सभासदांनी राजनिष्ठेची शपथ न घेता पार्लमेंटवर बहिष्कार घातला. शेवटी १९२७ मध्ये औपचारिक शपथेस मान्यता देऊन डी व्हॅलेरा डेलमध्ये (पार्लमेंट) बसू लागला. हळूहळू त्याच्या पक्षाची सरशी होऊन १९३२ मध्ये त्यास बहुमत मिळून डी व्हॅलेरा कार्यकारी प्रमुख व परराष्ट्रमंत्री झाला. १९३३ मध्ये राजनिष्ठेची शपथ अनावश्यक असल्याचा ठराव झाला व १९३६ मध्ये ब्रिटिश गव्हर्नर जनरलची जागा रद्द झाली. पुढे १९३७ च्या संविधानानुसार आयरिश फ्री स्टेटचे रूपांतर आयरमध्ये होऊन राष्ट्रपती हा राज्यप्रमुख राहील असे ठरले. तदनुसार १९३८ मध्ये डग्लस हाइडची राष्ट्रपतिपदी व डी व्हॅलेराची महामंत्रीपदी नियुक्ती झाली. दुसऱ्या महायुद्धात आयर्लंड तटस्थ राहिला. १९४८ मध्ये युनायटेड आयर्लंड पक्षाचा नेता जॉन ए कॉस्टेलोला महामंत्रीपद मिळाले. १८ एप्रिल १९४९ रोजी डी कॉस्टेलोने आयर स्वतंत्र प्रजासत्ताक असल्याचा ठराव डेलमध्ये मान्य करून घेतला व त्याच वर्षी या नव्या प्रजासत्ताकाला इंग्लंडची मान्यताही मिळाली. १९२० पासूनच उत्तर आयर्लंड व आयर यांचे एकीकरण व्हावे असे प्रयत्न सुरू झाले होते. हे उद्दिष्ट साधण्यासाठी अनेक चळवळी झाल्या, अनेकदा बंडेही – विशेषत: १९४६ – ५७ मध्ये झाली. अजूनही कॅथलिक व प्रॉटेस्टंट यांधील म्हणजेच आयर व उत्तर आयर्लंड यांमधील मतभेद तीव्र आहेत. १९५७ साली कॉस्टेलोचे बहुमत जाऊन डी व्हॅलेरा महामंत्री झाला. दोन वर्षानंतर त्याने महामंत्रीपदाचा राजीनामा दिला व आयरिश प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदी प्रचंड बहुमताने त्याची निवड झाली. तेव्हापासून जून १९७३ पर्यंत तो याच पदावर होता. त्याचे जागी आता अर्स्किन चिल्डर्झ याची निवड झालेली आहे.
पहा : आयर्लंड, प्रजासत्ताक उत्तर आयर्लंड.
ओक, द. ह.
“