आर्यसमाज : हा एक अर्वाचीन धर्मपंथ असून या पंथाची स्थापना स्वामी ð दयानंद सरस्वती यांनी चैत्र शु. प्रतिपदा, संवत १९३२ म्हणजे १० एप्रिल १८७५ रोजी मुंबईस केली. हाच दिवस स्थापनादिन म्हणून आर्यसमाजी लोक प्रतिवर्षी साजरा करतात. स्वामी दयानंद हे काठेवाडातील टंकारा नामक खेडेगावी १८२४ साली जन्मले. त्यांचे नाव मूलशंकर अंबाशंकर.
या पंथाची मुख्य दहा तत्त्वे असून त्यांतील पहिली तीन तत्त्वे धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत. ती अशी : (१) सर्व यथार्थ ज्ञानाचा उगम व सर्व वस्तूंचे आदिकारण परमेश्वर आहे. (२) ईश्वर हा सच्चिदानंदस्वरूप असून तो अनादी, अनंत, निराकार, निष्कलंक, सर्वशक्तिमान, सर्वसाक्षी, परमन्यायी, कनवाळू सर्व जगाचा निर्माता, शास्ता व पालक आहे. त्याचे भजनपूजन करावे. (३) वेद हे त्या ईश्वराचीची निःश्वसिते होत. सर्व यथार्थ ज्ञानांचा उगम वेदांतच असल्यामुळे वेदांचे अध्ययन करणे व करविणे, हे प्रत्येक आर्याचे पवित्र कर्तव्य आहे. वेद प्रमाण मानतो तो आर्य.
बाकीच्या सात तत्त्वाचा सारांश असा : प्रत्येकाने सत्याचा स्वीकार करून धर्मानुसार वागावे मानवाची आधिभौतिक, सामाजिक, आध्यात्मिक इ. प्रत्येक बाबतीत उन्नती करून मनुष्यजातीचे सर्वांगणी कल्याण साधावे प्रेमाने व न्यायाने वागावे ज्ञानाचा प्रसार करावा दुसर्यांच्या उत्कर्षातच आपला उत्कर्ष आहे असे मानावे प्रत्येकाला स्वतःच्या मताप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य असले, तरी सामाजिक कल्याणासाठी प्रत्येकाने आपसातील मतभेद व हेवेदावे विसरून वागावे.
स्वामी दयानंदांनी वेद शब्दाचा अर्थ ज्ञान असा केला. ईश्वरप्रणीत अशा या ग्रंथात सर्व शास्त्रांची मूलतत्वे ग्रथिक आहेत. ते स्वयंसिद्ध सत्यस्वरूप आहेत. मानवजातीच्या वैज्ञानिक व पारमार्थिक विचारांचा उगम वेदांत आहे. म्हणून त्यांनी चार वेदांच्या मंत्रसंहिताच प्रमाण मानल्या ब्राह्मणग्रंथ नव्हे. सहा शास्त्रे, स्मृती वा अठरा पुराणे त्यांनी प्रमाण म्हणून मान्य केली नाहीत.
भारताला पुन्हा वैदिक मार्गावर नेणे व सर्व जगाला वैदिक धर्म शिकविणे ही आर्यसमाजाने आपली परमश्रेष्ठ कर्तव्ये ठरविली व वेदांच्या उद्धाराचे व प्रचाराचे कार्य हिरिरीने चालू केले. समाजाच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येकाने पंचमहायज्ञ रोज केले पाहिजेत. ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, अतिथियज्ञ व बलियज्ञ हे पंचमहायज्ञ होत.
स्वामी दयानंदांनी स्वमतप्रसाराकरिता सत्यार्थप्रकाश ग्रंथ लिहिला. आर्यसमाजात हा ग्रंथ प्रमाण मानला जातो. आर्यसमाज जन्मसिद्ध जातिभेद मानीत नाही परंतु गुणकर्मानी बनलेले चातुर्वर्ण्य मानतो. उदा., तप, विद्या, शांती हे गुण असलेला ब्राह्मण वीरवृत्ती व नेतृत्व असलेला क्षत्रिय धनसंग्रहचतुर वैश्य व शरीरश्रमावर भर देणारा शूद्र.
मूळ वेदांत मूर्तिपूजा, अवतारवाद, तीर्थे, व्रते, पौराणिक अनुष्ठाने इत्यादींचा पुरस्कार नाही. त्यामुळे आर्यसमाजी प्रवर्तकांनी या सर्व गोष्टी त्याज्य ठरविल्या, श्राद्धे बंद केली व पुरोहितांनाही रजा दिली राम-कृष्ण हे ईश्वरी अवतार नसून श्रेष्ठ मानव होते, असे ते लोकांना समजावून सांगू लागले.
जातिभेद वा अस्पृश्यता आर्यसमाज मानीत नाही वेदाध्ययनाचा अधिकार तो सर्वांना मानतो. सुरुवातीस समाजाच्या प्रवर्तकांनी आपली ही तत्त्वे लोकांच्या गळी उतरवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. विरोधी मतांचे खंडन केले. त्यांनी विधायक कार्ये हाती घेतली. उत्तर भारतात प्रमुख ठिकाणी त्यांनी गुरुकुले, महाविद्यालये, हरद्वारजवळील कांगडी येथील गुरुकुल विश्वविद्यालय, माध्यमिक शाळा, अनाथालये, विधवाश्रम वगैरे संस्था स्थापन केल्या आणि सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतही परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या मतानुसार मोक्ष मिळविणे, हे प्रत्येक व्यक्तीचे ध्येय असले पाहिजे व ते प्रत्येकाने स्वप्रयत्नाने साध्य केले पाहिजे. त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. काही आपत्तींपुरती नियोगपद्धतीही त्यांना मान्य आहे. हिंदूंचे सोळा संस्कार त्यांना मान्य असून त्यांचे वेदकालीन साधे स्वरूप तेवढेच स्वीकारले आहे.
स्वामी दयानंदांच्या निधनानंतर १८८३ मध्ये आर्यसमाजात फूट पडून त्याच्या दोन भिन्न भिन्न शाखा झाल्या. एका शाखेने मांसाहार व आधुनिक पाश्चात्य उच्च शिक्षणाचा पुरस्कार केला तर दुसऱ्या शाखेने मांसाहार व पाश्चात्य उच्च शिक्षण निषिद्ध मानले. म्हणून महाविद्यालय पक्ष व पुराणमतवादी पक्ष अशी त्यांना दोन नावे पडली.
आर्यसमाजाच्या स्थानिक, प्रांतीय व अखिल भारतीय स्वरूपाच्या एकूण तीन सभा आहेत. आर्यसमाजी धार्मिक उपासना आठवड्यातून एकदा दर रविवारी सकाळी करतात. उपासनेच्या प्रारंभी व्यासपीठाजवळील अग्नीत समंत्रक आहुती देऊन मग उपासनेस प्रारंभ होतो. ही उपासना तीन चार तास चालते. समाजाची दीक्षा व मागासलेल्या जातींना शिक्षण देऊन त्यांचा उद्धार करणे, ही आर्यसमाजाची सर्वांत मोठी कार्ये मानली जातात.
मलबारात १९२१ मध्ये मोपला मुसलमानांनी मोठे बंड करून असंख्य हिंदूंना जबरदस्तीने बाटवून मुसलमान केले. या संकटकाळी आर्यसमाजी लोक धैर्याने मलबारात गेले व सु. अडीच हजार भ्रष्ट हिंदू कुटुंबांना त्यांनी पुनश्च हिंदुधर्मात आणले. १९३७ साली हैदराबाद संस्थानात आर्यसमाजावर निजामसरकारने बंदी घातली त्या बंदीविरुद्ध आर्यसमाजी अनुयायांनी सत्याग्रहाचे शस्त्र उपसले. त्यावेळी बारा हजार आर्यसमाजी लोकांनी बंदीवास पत्करला.
आर्यसमाजाची स्थापना मुंबईस झाली, तरी त्याचा प्रसार महाराष्ट्रात फारसा झाला नाही. समाजाचे कार्यक्षेत्र मुख्यतः उत्तर भारत हेच ठरले. पंजाबात व उत्तर प्रदेशात समाजाच्या तीनशेच्या वर शाखा आहेत.
प्रार्थनासमाज व ब्राह्मोसमाज ह्यांच्यापेक्षा जनमनावर आर्यसमाजाचा पगडा विशेष आहे. आर्यसमाजाला केवळ वेदप्रामाण्यच मान्य असल्याने तसेच त्याच्या सामाजिक व धार्मिक पुरोगामी मतांमुळे सुरुवातीस आर्यसमाजाला सनातन हिंदुधर्मीयांचा कसून विरोध झाला पण त्या विरोधास न जुमानता समाजाच्या कार्यकर्त्यांनी धडाडीने प्रचार करून वेदप्रणीत धर्माच्या पुनरुत्थाचे महान कार्य केले. प्रौढविवाह, पुनर्विवाह, जातिनाश, अस्पृश्योद्धार, गुणकर्मविभागशः वर्णरचना इ. आर्यसमाजाची तत्त्वे अखिल हिंदूंना आज अधिकाधिक मान्य होऊ लागली आहेत.
उदयपूरचे महाराज, लाला मूलराज, लाला रामशरणदास रईस, मोहनलालजी विष्णुलालजी, लाला जगन्नाथ, गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी), पंडित श्यामजी कृष्णवर्मा इ. आर्यसमाजाचे पदाधिकारी होते. ब्रह्मीभूत स्वामी श्रद्धानंद हे आर्यसमाजाचे थोर हुतात्मे झाले. महाराष्ट्रात आर्यसमाजाच्या तत्त्वांचा प्रचार करून त्याची स्थापना करण्याचे कार्य लोकहितवादी व न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केले.
आजमितीस आर्यसमाज हा स्वतंत्र पंथ म्हणून उत्तर भारतात प्रचलित असला, तरी तो हिंदुधर्माहून वेगळा मानला जात नाही. आर्यसमाजाने एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत मोठी कामगिरी केली असल्याने, भारताच्या अर्वाचीन पुनरुत्थानाच्या कार्यात आर्यसमाजाचा वाटा फार मोठा आहे.
पहा: धर्मसुधारणेच्या चळवळी.
संदर्भ: 1. Rai, Lala Lajpat, The Arya Samaj, Bombay, 1915.
२. फडके, स.कृ. नवा वैदिक धर्म श्रीमद्दयानंद अथवा आर्यसमाजाचा विवेचक इतिहास, पनवेल, १९२८.
जोशी, लक्ष्मणशास्त्री