आयबेरिया: (१) नैऋत्य यूरोपमधील स्पेन व पोर्तुगाल देशांनी व्यापलेल द्वीपकल्प. ईशान्येकडील पिरेनीज पर्वतामुळे हे बाकीच्या यूरोप खंडापासून तुटक झाले आहे. त्याच्यामुळे दोन्हीकडील भागांत दळणवळणही दुर्घट आहे. दक्षिणेस जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीमुळे हे द्वीपकल्प आफ्रिका खंडापासून अलग झाले आहे. याच्या पूर्वेस भूमध्य समुद्र असून पश्चिमेस व उत्तरेस अटलांटिक महासागर आहे. पोर्तुगालमधील केप रोका व केप सेंट व्हिन्सेंट ही याची अनुक्रमे पश्चिम व नैऋत्य टोके होत. आयबेरस म्हणजे – आजची एब्रो – या नदीच्या परिसरातील मुलुखाला प्राचीन ग्रीक व रोमन लोक हिस्पेनिया म्हणत. आयबेरसवरून पुढे आयबेरिया हे नाव रूढ झाले [→ स्पेन पोर्तुगाल].
(२) कॉकेशस पर्वताच्या दक्षिणेकडील हल्लीच्या जॉर्जियाला प्राचीन काळी आयबेरिया असे नाव होते.
ओक, द. ह.