आयन : एखाद्या अणूतील किंवा अणुसमूहातील एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन निघून गेले किंवा त्यांच्यात एक किंवा अधिक इलेक्टॉनांची भर पडली म्हणजे तो अणू वा अणुसमूह विद्युत् भारित होतो व त्याला आयन म्हणतात. आयनांचे गुणधर्म व ज्या अणूंपासून ते तयार झाले त्यांचे गुणधर्म, अगदी भिन्न असतात. हायड्रोजनाच्या किंवा धातूच्या एखाद्या अणूपासून तयार झालेला आयन सामान्यत: धन विद्युत् भारित असतो व अधातूच्या एखाद्या अणूपासून किंवा अणुसमूहापासून तयार झालेला आयन ऋण विद्युत् भारित असतो. आयनांच्या विद्युत् भारांच्या संख्येला विद्युत् संयुजा म्हणतात व आयनाच्या चिन्हाच्या माथ्यालगत भाराचे मूल्य व तो धन किंवा ऋण आहे, हे अंक व चिन्ह लिहून दाखविले जाते. उदा., पोटॅशियम आयनाचा भार धन व एक असतो आणि तो K+1 असा लिहितात सल्फेट आयनाचा भार ऋण व दोन असतो, त्याचे भारासहित चिन्ह SO4-2 असे लिहितात.

घनस्वरूपी लवणातील आयन नियमित रीतीने रचलेले असतात त्यामुळे त्यांची हालचाल सहज होऊ शकत नाही. घन अवस्थेत ते हालू शकत नाहीत पण लवणे पाण्यात विरघळली किंवा वितळली म्हणजे आयन मुक्त होतात व ते हालू शकतात. एखाद्या लवणाच्या विद्रावातून विद्युत् प्रवाह जाऊ दिला म्हणजे ऋण भारित आयन धनाग्राकडे व धनभारित आयन ऋणाग्राकडे जातात व विद्युत् अग्राशी आपापले धन व ऋण विद्युत् भार गमावून निर्भारित होतात. धनाग्राकडे जाणाऱ्या आयनांना धनायन व ऋणाग्राकडे जाणाऱ्या आयनांना ऋणायन म्हणतात.

आयन वायुस्थितीतही आढळतात. वेगवान विद्युत् भारित कण वायूतून गेले, तर वायुरेणूतील एखादा इलेक्ट्रॉन, वेगवान कणातील ऊर्जा स्वीकारून उच्च ऊर्जा पातळीवर चढतो. त्यामुळे असा इलेक्ट्रॉन रेणूमधूनच बाहेर पडतो आणि त्याचा आयन बनतो.

कारेकर, न. वि.