आयडर बदक :सोमॅटेरिया आणि आर्क्टोनेटा या वंशांतील कोणत्याही मोठ्या समुद्री बदकाला आयडर बदक म्हणतात. हे पक्षी उत्तरध्रुवीय आणि उप-उत्तरध्रुवीय विभागांत अटलांटिक व पॅसिफिक महासागरांच्या किनाऱ्यावर आणि त्यातील बेटांवर आढळतात. लॅब्रॅडॉर, न्यू फाउंडलंड, ग्रीनलंड व नॉर्वे येथे हे विपुल आहेत. उत्तर यूरोपातील आयडरचे शास्त्रीय नाव सोमॅटेरिया मॉलिस्सिया आणि अमेरिकी आयडरचे सोमॅटेरिया ड्रेसराय असे आहे.
आयडरची लांबी सुमारे ७० सेंमी. असते. नर देखणा असून त्याची खालची बाजू मखमली काळी आणि वरची पांढरी शुभ्र असते. मादी तपकिरी रंगाची असून अंगावर आडवे पट्टे असतात. यांच्या अंगावर मऊ पिसांचा ५-८ सेंमी. जाडीचा थर असतो.
आयडर संघचारी असून त्यांच्या घरट्यांचे मोठाले निवह (वसाहती) असतात. समुद्रकाठच्या खडकाळ जागी हे घरटी बांधतात. घरटे गवत व वाळलेल्या समुद्री वनस्पतींचे केलेले असून मादी त्यात पाच अंडी घालते आणि आपल्या छातीवरील मऊ पिसे काढून त्यांनी ती झाकते. पाळत ठेवून माणसे ही अंडी व पिसे काढून घेतात. मादी पुन्हा अंडी घालते व माणसे ती पुन्हा लांबवितात. असे विणीच्या हंगामभर चालू असते. पण हंगामाच्या अखेरीस मादीने घातलेली अंडी तशीच राहू देतात व त्यांच्यापासून पिल्ले तयार होतात. पिसे मऊ, उबदार व वजनात हलकी असल्यामुळे त्यांच्या गाद्या व रजया करतात. बऱ्याच ठिकाणी हे पक्षी मारण्यास कायद्याने बंदी केलेली आहे.
जोशी, मीनाक्षी