आधुनिक कला : आधुनिक (मॉडर्न) या सदरात येणारे कलापंथ आणि उपपंथ इतके विविध व विभिन्न प्रकृतीचे आहेत, की त्यांची एकच एक व्याख्या करणे अशक्य ठरते. आज जे नवे वाटते, ते उद्या परंपरेमध्ये पडते, प्राचीन ठरते. कलागुणांमधील परिवर्तनांच्या दृष्टीने पाहिले, तरी यूरोपीय प्रबोधन काळातील कलाप्रवर्तन आणि ð बरोक कलेनंतरचा नवअभिजाततावाद हे त्या त्या काळात अभिनवच होते. कलेचा खरा गुणदृष्ट्या विचार करताना नवता आणि प्राचीनता अशी वर्गवारी बाजूला ठेवावी लागते. तथापि ऐतिहासिक दृष्ट्या स्पष्टपणे आधुनिक ठरलेला व भूतकाळाशी नाते तोडू पाहणारा एक कालखंड म्हणून त्याचा स्वतंत्र विचार अपरिहार्य ठरतो.
पाश्चात्त्य वास्तववादी कलेमध्ये वस्तूचे दिसते तसे चित्रण केले जाई. तथापि वास्तवतेच्या पार जाऊन एल ग्रेको, रेम्ब्रँट यांसारख्या कलावंतांनी चिरस्थायी गुणवत्ता संपादन केली होती. बरोकचा उतरतीचा काळ आणि त्यानंतरचा हळवा, भावविवश ð स्वच्छंदतावाद यांचा एक शिथिल कालखंड मध्ये गेला. कूर्बे आणि दलाक्रवा हे दोन चित्रकार याला अपवाद. यंत्रयुगाबरोबर अवतरलेल्या गतिमान नव्या जीवनाने आणि नवीन तत्त्वज्ञानाने भारावलेल्या कलावंताला, वस्तूची दिसते तशी यांत्रिक नक्कल करण्यात स्वारस्य वाटेनासे झाले. कलाप्रक्रियेमधील स्वतःचा वाटा काय याचा विचार तो करू लागला. विशेषतः भावनाभिव्यक्तीचा घटक आणि कलामाध्यमाची वैशिष्ट्ये यांची त्याला प्रखरतेने जाणीव झाली. छायाचित्रणामुळे कलाविषयक जाणिवेत हा बदल होत गेल्याने, प्राचीन कलापरंपरांची पुन्हा नव्याने चिकित्सा झाली. एल ग्रेको, रेम्ब्रँट यांसारख्यांची थोरवी पुन्हा नव्याने सिद्ध झाली.
वस्तूची गोलाई टाळून लांबी आणि रुंदी या दोनच परिमाणांतून चिरस्थायी कलागुण निर्माण करणाऱ्या पौर्वात्य कलेकडे यूरोपीय कलावंतांचे लक्ष वेधले. ð आदिम कला आणि आफ्रिकी ðनिग्रो कला यांतील राकट ओजस्विता आणि सरलता यांचाही प्रभाव त्यांना जाणवला. शास्त्रीय शोधांमुळे कलेच्या माध्यमसाधनांत भर पडली. सिमेंटच्या शोधामुळे वास्तुकलेत क्रांती घडून आली. पूर्वी अशक्य वाटणारे आकार घडविणे शक्य झाले. वास्तू, चित्र आणि शिल्प या कलांमध्ये नवनवी तंत्रे प्रयुक्त करण्यात आली आणि आकृती साधण्याच्या नव्या लकबी निर्माण झाल्या. कलेचे बाह्य स्वरूप यामुळे पार बदलून गेले.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील उत्तर-दृकप्रत्ययवाद्यांच्या चित्रांना आधुनिक हे विशेषण प्रथमच लावण्यात आले. तत्पूर्वीच्या ð दृकप्रत्ययवादामध्ये वस्तुचित्रणामधील वस्तूवरील लक्ष उडून, त्याऐवजी प्रकाशाची प्रखर जाणीव आणि तिचा चित्रणातून येणारा प्रत्यय यांना सर्वंकष महत्त्व आले. ð वास्तववादाचा हा शेवट होता आणि आधुनिक कलाविचारांची ही पहिली पायरी होती. यानंतर ð घनवाद, ð अभिव्यक्तिवाद, ð रंगभारवाद, ð नवकालवाद, ð दादावाद, ð अतिवास्तववाद इ. अनेकविध पंथ आले. यंत्रयुगातील वाढत्या गतीबरोबर, गती हेच सर्वस्व, यंत्र हीच वास्तवता, बदल हाच स्थायीभाव, अशा भिन्न भिन्न विचारांचे, प्रसंगी एकेकट्या कलावंतांचे पंथ सुरू झाले. त्यातच पहिले महायुद्ध पेटले. त्यात घडलेल्या मानवी संहारामुळे परंपरागत मूल्यकल्पनांवरील विश्वास उडाला. जुन्या मूल्यांना ठोकरून उडविण्याची लाट उसळली. यात दादावादाने पुढाकार घेतला. या चळवळीने चित्र, शिल्प, वास्तू, साहित्य, नाट्य या सर्व कलाप्रकारांना बंडखोरीचे तत्त्वज्ञान दिले. स्वप्नसृष्टी व दृश्यविश्व यांचा मिलाफ करू पाहणाऱ्या अतिवास्तववादाचा जनक आंद्रे ब्रताँ हा तर कवी व मानसशास्त्राचा अभ्यासक होता. चित्रकार पॉल क्ले हाही कवी आणि संगीतकार होता.
या सुमारास जर्मनीमध्ये ð बौहाउस ही कलाशिक्षणसंस्था वास्तुशास्त्रज्ञ वॉल्टर ग्रोपिअस, चित्रकार पॉल क्ले, कँडिन्स्की वगैरेंच्या सहकार्याने निघाली. कलाविषयक जाणिवांचा नव्याने शोध घेऊन त्यांचे सुसूत्र विश्लेषण त्यांनी केले. वास्तू, चित्र, शिल्प, कारागिरी यांमधील सीमा नाहीशा करून त्यांच्या संकलित प्रभावाने मानवी जीवन उत्कट व समृद्ध करण्याचे त्यांचे ध्येय होते. बौहाउसमधील कलावंतांच्या कार्यामुळे सर्व यूरोपभर व नंतर जगभर कलाविषयक जाणिवांमध्ये सर्वंकष परिवर्तन झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस हिटलरच्या विरोधाने ही संस्था बंद पडली. त्यामुळे आधुनिक कलेची सुसूत्र परंपरा विस्कळित झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर तत्त्वज्ञान व साहित्य यांमधील बीटनिक, संगीतातील बीटल्स्, नाट्यातील नवनाट्य, मृषानाट्य, प्रतिनाट्य, निषेधनाट्य, कलेतील ð क्रियाचित्रण, ð दृकभ्रमकला, ð जनकला, शुद्धगतिकी कला यांसारखे अनेक कलासंप्रदाय निर्माण झाले. त्यांतील अनेक संप्रदाय भारतातही आले. काही भारतीय प्रकृतीमध्ये एकजीव झाले, काही स्वतंत्रपणे टिकले व काही अस्तंगत झाले.
आधुनिक कलांच्या सुरुवातीला विशुद्ध माध्यमनिष्ठा सर्व पंथांना समान होती. आता विशुद्धतेची ही कल्पना मागे पडत आहे. वास्तवतेपासून दूर गेलेल्या कलेमध्ये अतिवास्तवता किंवा नवी वास्तवता यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला कलेतील भावनात्मक घटक महत्त्वाचा मानला गेला. आता मानवी संस्कार पुसून कलेचे अवमानवीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. आधुनिक वास्तुकला मात्र मानवी जीवनाशी अधिकाधिक समरस होऊन कलात्मकता व उपयुक्तता यांचा सुरेख मेळ साधण्याचा प्रयत्न करीत आहे. कलेतील आधुनिकतेची परिणती काय आणि तिची चिरस्थायी मूल्ये कोणती, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. पण आधुनिक कलेमुळे कलाविश्वात नवे चैतन्य येऊन जुन्याची नव्याने पारख करणे शक्य झाले आहे.
संदर्भ : 1. Archer, W. G. India and Modern Art, London, 1959.
2. Arnason, H. H. A History of Modern Art, London, 1969.
3. Copplestone, Trewin, Modern Art Movements, London, 1967.
4. Langui, Emile, Trans. Sainsburg, Geoffrey & Oliver, James, 50 Years of Modern, Art, London,
1959.
5. Read, Herbert, Art Now, London, 1960.
6. Read, Herbert, The Philosophy of Modern Art, London, 1951.
7. Weston, Neville, Kaleidoscope of Modern Art, London, 1968.
कदम, संभाजी