आधारतल : नदी आपल्या पात्राचा तळ ज्या निम्नतम पातळीपर्यंत झिजवू शकते, त्या पातळीस आधारतल म्हणतात. सामान्यतः ही पातळी समुद्रसपाटीइतकी असते. आधारतल गाठण्यासाठी लागणारा कालावधी नदीच्या क्षरणक्रियेच्या प्रमाणावर व तिच्या तळभागाच्या खडकांच्या प्रकारावर अवलंबून असतो. नदी मोठी आणि/किंवा वेगवती असल्यास तिच्या तळाची झीज लवकर होते. त्याचप्रमाणे जर तिचा प्रवाह ठिसूळ व मऊ खडकांवरून गेला असेल, तर तिचा तळ लवकर झिजून ती आधारतल लवकर गाठते. नदी वाहण्यासाठी थोडातरी उतार आवश्यक असल्यामुळे फक्त अगदी मुखाजवळ ती आधारतल प्रत्यक्ष गाठू शकते. नदीचा प्रवाह कठीण आणि मऊ खडकांच्या फळ्यांवरून वाहात असेल, तर कठीण खडकांची फळीच तिचे स्थानीय व तात्पुरते आधारतल बनते. याचा परिणाम तिच्या वरच्या टप्प्यातील ऊर्ध्वगामी क्षरणावर होतो. कालांतराने कठीण खडकांची फळीही झिजते आणि अधिक खालच्या आधारतलाकडे क्षरणकार्य चालू होते. सरोवरेही त्यांना येऊन मिळणाऱ्या नद्यांची तात्पुरत्या स्वरूपाची आधारतले बनतात.
वाघ, दि. मु.