न्यू जर्सी : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी मध्य अटलांटिक विभागातील एक औद्योगिक व दाट वस्तीचे राज्य. इंग्लिश खाडीतील जर्सी बेटावरून न्यू जर्सी हे नाव यास पडले आहे. ३८° ५५ उ. ४१° २१ उ. व ७३° ५३ प. ते ७५° ३५ प. यांदरम्यानच्या वनश्रीने नटलेल्या न्यू जर्सी राज्यास ‘गार्डन स्टेट’, ‘कॉकपिट ऑफ रेव्होलूशन’ असेही म्हणतात. याच्या दक्षिणेस अटलांटिक महासागर व डेलावेअर उपसागर, पश्चिमेस पेनसिल्व्हेनिया आणि उत्तरेस व वायव्येस न्यूयॉर्क ही राज्ये, पूर्वेस अटलांटिक महासागर आणि हडसन नदी आहे. क्षेत्रफळ २०,३७४ चौ. किमी. पैकी पाण्याखाली ८१६ चौ. किमी. लोकसंख्या ७१,७०,००० (१९७०). ट्रेंटन ही राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन : भूरचनेच्या दृष्टीने या राज्याचे ॲपालॅचिअन कडा व दरी, न्यू इंग्लंडचा डोंगराळ भाग, पीडमाँट प्रदेश आणि अटलांटिकचे किनारी मैदान असे चार विभाग पडतात. दोन बाजूंना समुद्राने व दोन बाजूंना नद्यांनी वेढलेल्या या राज्याला जमिनीची सीमा फक्त उत्तरेस न्यूयॉर्क राज्याजवळ ८० किमी. एवढी आहे. राज्याचा दक्षिणेकडील ३/५ भाग अटलांटिक किनारी मैदानाचा असून तो स. स. पासून हळूहळू ९० मी. उंचीपर्यंत चढत जातो. अनेक प्रवाहांनी तोडून उंचसखल केलेल्या या भागाच्या मध्याला एक विस्तीर्ण खोलगट प्रदेश आहे. उत्तरेकडील २/५ भागात नैर्ऋत्येकडून वायव्येकडे जाणाऱ्या डोंगराळ प्रदेशात ॲपालॅचिअन व किटाटिनी खोरी आणि पीडमाँट पठाराचे पॅलिसेड व वाचंग डोंगर येतात. राज्यात ८०० हून जास्त तळी असून त्यांपैकी राउंड व्हॅली, वॉनकी, होपॅटकाँग, ग्रीनवुड, स्प्रूस रन आणि मोहॉक ही प्रमुख सरोवरे आहेत. डेलावेअर, ग्रेट एग हार्बर, हडसन, मॉरीस, हॅकिनसॅक, मस्‌कनेटकाँग इ. नद्या, शंभरांवर लहानमोठे नदी-नाले, खाड्या व प्रवाह आणि १९२ किमी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. भूमीत पाच प्रकारच्या मृदांचे पट्टे नैर्ऋत्येकडून वायव्येकडे गेलेले असून, त्यांपैकी पर्वतभागांतील वेगवेगळ्या खडकांपासून आणि मैदानी भागांतील चिकणमाती, गाळ व रेती यांमुळे बनलेले आहेत. जस्त आणि लोह ही खनिजे अल्प प्रमाणात सापडतात. खडीस योग्य असा खडक, वाळू, रेती, शाडू यांचेच उत्पादन अधिक असून हवामान सामान्यतः समशीतोष्ण आहे. परंतु उत्तरेकडील पर्वतभागात थंडीचे प्रमाण जास्त असून, क्वचित हिमवर्षाव होतो. तपमान किमान २·२° से., कमाल २२·८° से. असून राज्याच्या दक्षिण भागात हिवाळ्यात ०° से. खाली आढळते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०४ सेंमी. असते. राज्यातील वनसंपत्ती अर्थदायी असून ४५% वनाच्छादित भूमीवर पाइन, ट्यूलिप, सीडार, ॲश, बासवुड, बर्च, ओक, एल्म, मॅपल या जातींचे वृक्ष गोल्डनरॉड, अझेलिया, लॉरेल, डेझी, हनिसकल, जेन्शिय, विविध नेचे अशी इतर झुडपे असून उत्तरेस अस्वल, रानमांजर, दक्षिणेत कोल्हा, हरिण, स्कंक, चिपमंक, ससा, खार व अनेक जातींचे पक्षी आहेत. न्यू जर्सीत काहीकाही वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या जाती अद्वितीय असल्यामुळे त्या जीवशास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : गोरे लोक या प्रदेशात येण्यापूर्वी अल्गाँक्वियन जमातीचे रेड इंडियन आदिवासी होते. यूरोपीय त्यांनाच डेलावेअर इंडियन म्हणतात. या राज्याची सर्व भूमी आदिवासींकडून त्यांच्या खुशीने गोऱ्यांनी वितक घेतली. १६०९ साली डच ईस्ट इंडियन कंपनीचा नोकर हेन्‍री हडसन प्रथम न्यूअर्क उपसागरात आला. पहिले व्यापारी ठाणे बर्गेन येथे डचांनीच उघडले. १६२३ मध्ये याकॉपसनने फोर्ट नॅसॉ ही गढी डेलावेअर नदीकाठी सध्याच्या ग्लॉस्टर शहराच्या जागी बांधली. तिच्यासमोर नदीपलीकडे स्वीडिश लोकांनी केलेली वसाहत १६५५ मध्ये न्यू नेदर्लंड्सचा गव्हर्नर पीटर स्टाइव्हेसंट याने काबीज केली. १६६४ साली इंग्रजांनी डचांचा पराभव केल्यावर हा प्रदेश दुसऱ्या चार्ल्‌सने ड्यूक ऑफ यॉर्क या आपल्या भावास बहाल केलेल्या विस्तीर्ण भूमीचा भाग झाला. त्या ड्यूकने हडसन व डेलावेअर नद्यांमधील प्रदेश लॉर्ड जॉन बर्कली आणि सर जॉर्ज कार्टरेट यांना मालकी हक्काने देऊन, न्यू जर्सी प्रांत निर्माण केला. नंतर याचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग होऊन मोठ्या जमीन मालकांनी लहान-लहान हिस्से अनेकांना विकले. त्यातून अनेक झगडे उत्पन्न झाले. तेव्हा १७०२ मध्ये ॲन राणीने पूर्व-पश्चिम जर्सी प्रांत एक करून तो शाही मुलूख ठरवून दिला. न्यूयॉर्क वसाहतीचा गव्हर्नर याही प्रांताचा गव्हर्नर झाला पण इकडील लोकप्रतिनिधींची सभा मात्र वेगळी राहिली. १७३८ पासून या प्रांताला वेगळा गव्हर्नर मिळाला. पण जमीन मालकीहक्कांच्या गुंतगुंतीवरून नव्या-जुन्या वसाहतवाल्यांचे तंटे, दावे, दंगे चालूच राहिले आणि १७४५ मध्ये राज्ययंत्र जवळजवळ बंद पडण्याची वेळ आली. १७५० च्या फ्रेंच व इंडियन युद्धामुळे मात्र लोक भांडणे विसरून एक झाले. अशांतता चालू असूनही प्रांताची भरभराट होत होती. स्वातंत्र्ययुद्धात न्यूयॉर्क व फिलाडेल्फिया यांच्या दरम्यान सापडल्यामुळे न्यू जर्सीला खूप झळ लागली. या भूमीवर सु. १०० लढाया झाल्या, इंग्रजांच्या भाडोत्री हेस शिपायांनी लुटालूट केली, तथापि येथील लोकांनी नेटाने लढा दिला. जॉर्ज वॉशिंग्टनचा हिवाळी तळ याच राज्यात होता. १७७६ मध्ये न्यू जर्सीच्या प्रांतिक सभेने नवी घटना स्वीकारली. ती १८४४ पर्यंत चालू होती. १७८७ साली नव्या राष्ट्राच्या घटना परिषदेत ‘न्यू जर्सी प्लॅन’ म्हणून या वसाहतीने सादर केलेली ‘देशाला एकच विधानसभा व एका राज्याला एकच प्रतिनिधी’ ही योजना जरी स्वीकृत झाली नाही, तरी तिच्यातून लोकसंख्येच्या प्रमाणात निवडलेल्या प्रतिनिधिगृहाशी समतोल ठेवण्यासाठी राज्यवार निवडलेल्या सीनेट या वरिष्ठ सभागृहाची निर्मिती मात्र निश्चित झाली. १७८७ मध्ये राष्ट्रीय घटनेला मंजुरी देणारे न्यू जर्सी हे तिसरे राज्य असून, १७९० पासून ट्रेंटन ही त्याची राजधानी आहे. १७९१ मध्ये पसेइक नदीच्या धबधब्यावर सध्याच्या पॅटरसन शहराच्या जागी हॅमिल्टनने कारखानदारीची सुरुवात केली. १८१२ पर्यंत अंतर्गत वाहतूक वगैरे सुधारणांत राज्याने लक्ष घातले. यादवी युद्धापर्यंत राज्याची औद्योगिक प्रगती बरीच झाली. जर्सी सिटी, न्यूअर्क, कॅमडेन ही शहरे वाढली. ८४६ मध्ये गुलामगिरी बंद करण्यात आली. यादवी युद्धाला स्वयंसेवक, लढवय्ये व युद्धसाहित्य देऊनही राज्याने आपली आर्थिक स्थिती समतोल ठेवली. नंतर आलेल्या तेजी-मंदीच्या अनुभवाने राज्याची प्रवृत्ती कृषिव्यवसायाकडून कारखानदारीकडे अधिकाधिक झुकत गेली. पहिल्या महायुद्धाच्या निमित्ताने लोहमार्ग व रस्ते यांत संपूर्ण सुसूत्रता आणण्यात आली आणि लोकांचा नागरीकरणाकडे अधिक ओढा होऊ लागला. दुसऱ्या महायुद्धात राज्याची उत्पादनशक्ती, दळवळणाची साधने व सैनिकी प्रशिक्षणाच्या सोयी यांच्या राष्ट्राला फार उपयोग झाला. त्या युद्धानंतर राज्याची शंभर वर्षांहून जुनी, सदोष राज्यघटना सुधारून ती जास्त कार्यक्षम करण्याचे अवघड काम १९४७ साली पुरे करण्यात आले. कारखानदारीस वीज, पाणी, जागा, निष्णात मजूरवर्ग यांसारख्या सर्व प्रकारच्या सोयी, करांबाबत सवलती, न्यूयॉर्क, फिलाडेल्फियासारख्या प्रचंड बाजारपेठांचे सान्निध्य या कारणांनी न्यू जर्सीचा विकास झपाट्याने होत आहे. जनरल ग्रँट व जॉर्ज वॉशिंग्टन यांचे वास्तव्य अनेक ठिकाणी झाल्यामुळे राज्यातील ॲझबरी पार्क, बर्लिंग्टन, मॉरीसटाउन या शहरांना महत्त्व प्राप्त झाले आहे.


अमेरिकेच्या पहिल्या तेरा वसाहतींपैकी हे एक राज्य असल्यामुळे, न्यू जर्सीची राज्यव्यवस्था अमेरिकन स्वातंत्र्यघोषणेच्या आधीच दोन दिवस १७७६ मध्ये तयार केलेल्या आणि नंतर १८४४ व १९४७ साली सुधारित झालेल्या संविधानानुसार ४ वर्षांसाठी निवडलेला राज्यपाल पाहातो. दोन महत्त्वाच्या व २० गौण खातेप्रमुखांची नेमणूक तोच करतो. आणखी एकाच खातेप्रमुखाची नेमणूक विधिमंडळाकडे असते. सीनेटच्या २१ सभासदांपैकी सु. निम्मे सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतात व नवे चार वर्षांसाठी निवडले जातात. १९६६ च्या संविधानीय संकेतानुसार सर्वसाधारण सभेचे ८० सदस्य असून सीनेटचे ४० सदस्य असावेत असे ठरले. या राज्यातून काँग्रेसवर दोन सीनेटर आणि १५ प्रतिनिधी जातात. ट्रेंटन ही राजधानी असून दरवर्षी तेथे अधिवेशने भरतात. प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याचे २१ काउंटीमध्ये व ५६७ नगरपालिकांत विभाजन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख व ६ सहकारी न्यायमूर्ती, वरिष्ठ न्यायालयाचे, तसेच परगणे व इतर न्यायसभा या सर्वांचे न्यायाधीश प्रथम ७ वर्षांसाठी सीनेटच्या सल्ल्याने राज्यपाल नियुक्त करतो. त्यांची नेमणूक पुन्हा झाल्यास ७० वर्षे वयापर्यंत ते त्या स्थानावर राहतात.

आर्थिक व सामाजिक स्थिती : राज्यातील शेती प्रकर्षित स्वरूपाची असून, न्यूयॉर्क व फिलाडेल्फिया या शहरांच्या सान्निध्यामुळे व्यापारदृष्ट्या भाजीपाले व विशेषतः टॉमॅटो, बटाटे, सफरचंद यांचे उत्पादन घेतले जाते. राज्यातील चराऊ कुरणेही महत्त्वाची आहेत.

नजीकच्या न्यूयॉर्क व फिलाडेल्फिया अशा मोठ्या शहरांना रोजचा पुरवठा करण्यासाठी दूध, अंडी, भाज्या, फळफळावळ इ. खाद्यपदार्थांचे उत्पादन राज्यात मोठ्या प्रमाणात होते पण कृषिउद्योगापेक्षा कितीतरी पटींनी राज्यातील महत्त्वाचा व्यवसाय कारखानदारी आहे. रासायनिक वस्तूंच्या उत्पादनात न्यू जर्सी राज्य देशात अग्रेसर असून, उपकरणे, कातडी वस्तू, अन्नधान्ये, कपडे यांचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. रसायने, अनुषंगिक द्रव्ये, प्रकिया केलेले अन्नपदार्थ, वीज, मोटारी, बोटी व विमाने यांची यंत्रसामग्री, धातूंचे यंत्रमाग, पत्र्याचे डबे, यांत्रिक हत्यारे, बांधकामाची व कारखान्यांची अवजारे अशा विविध मालांच्या निर्मितीत राज्य आघाडीवर आहे. न्यूअर्क, कॅमडेन व अटलांटिक सिटी ही प्रमुख उद्योगनगरे आहेत. १९६३च्या मार्च महिन्यात झालेल्या वादळामुळे किनाऱ्यावर अतोनात नुकसान झाले. औद्योगिक संशोधनासाठी देशातील अत्यंत महत्त्वाच्या प्रयोगशाळा या राज्यात आहेत. अशा ६०० संस्थांतून मूलभूत शास्त्रीय संशोधन व नव्यानव्या पदार्थांची, वस्तूंची व मालाची चाचणी चालू असते. १९७१ मध्ये पॅटरसन या उद्योगनगराची उभारणी झाल्यानंतर राज्याच्या औद्योगिकीकरणास वेग आला. पर्यटन हाही राज्याचा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. किनाऱ्यावरील मासेमारी मुख्यतः कवचीच्या जलचरांसाठी आणि अन्न व खत यांना उपयुक्त अशा सागरी माशांसाठी चालते. येथे प्रामुख्याने मेनहेडन, क्लॅम्स, बांगडे व खुबे इ. जलचरप्राणी आढळतात. शेजारच्या राज्यातील मोठ्या व्यापारी केंद्रांमधील रहदारीचे क्षेत्र व दळणवळणासाठी मोक्याचे ठिकाण म्हणून न्यू जर्सीला फार महत्त्व आहे. न्यू जर्सी व गार्डन स्टेट (टर्नपाईक) हे राजमार्ग किंवा हमरस्ते या राज्यातून जातात. राज्यातून गेलेले अनेक हमरस्ते बोगद्यांनी व पुलांनी न्यूयॉर्कला जोडलेले आहेत. त्यांपैकी हॉलंड व लिंकन बोगदे व जॉर्ज वॉशिंग्टन पूल हे वास्तुशास्त्रातील अजब नमुने येथे दिसतात. एकूण लोहमार्ग ३,०६२ किमी., रस्ते सु. ५०,००० किमी. पैकी ९०% पक्के आहेत. न्यूयॉर्कच्या बाजूची बंदरे व राज्यातील दोन प्रमुख विमानतळ न्यूयॉर्क बंदराच्या नियंत्रणाखाली आहेत. केप मे, अटलांटिक सिटी, इतिहासप्रसिद्ध बर्लिंगटन, मॉरीसटाउन, समरव्हिल, फ्रीहोल्ड ही पर्यटनकेंद्रे प्रसिद्ध आहेत. राज्यात ३६ नभोवाणी केंद्रे व १ दूरचित्रवाणी केंद्र असून मोठ्या शहरांतून दैनिके व अनेक साप्ताहिके प्रसिद्ध होतात. न्यूयॉर्क व फिलाडेल्फिया या शहरांच्या वृत्तकक्षेत राज्याचा प्रदेश येत असल्याने, तेथील वृत्तपत्रांचा खप या राज्यात अधिक होतो. न्यूअर्क स्टारलेजर हे दैनिक अत्यंत लोकप्रिय व मोठ्या खपाचे असून, न्यूअर्क ईव्हनिंग न्यूज, न्यूअर्क संडे न्यूज ही वृत्तपत्रे प्रसिद्ध आहेत. इतर वृत्तपत्रांत रेकॉर्ड, ट्रेंटन टाइम्स, कुरिअर-पोस्ट महत्त्वाची होत. येथे बॅप्टिस्ट, ल्यूथरन, मेथडिस्ट, एपिस्कोपल, प्रेसबिटेरिन व कॅथलिक हे ख्रिस्ती धर्माचे मुख्य पंथ असून शिवाय यहुदी धर्मसंघ आहे. विशेषतः अटलांटिक सिटी आणि राज्याच्या वायव्य भागातील न्यूयॉर्क परिसरात रोज कामावर जाणाऱ्या रहिवाशांत ६% लोक या राज्यात आहेत. इंग्रजी ही भाषा असून शिक्षण ६ ते १६ वर्षापर्यंत सक्तीचे व ५ ते २० वयापर्यंत मोफत आहे. सर्व विद्यालयांत मिळून १४,८२,१४४ (१९७३) विद्यार्थी होते. उच्च माध्यमिक शाळांत २,४०,८९१ विद्यार्थी होते (१९७४). राज्यात चार विद्यापीठे असून प्रिन्स्टन हे जुने विद्यापीठ आहे. १२ महाविद्यालयांपैकी २ विशेष तांत्रिक शिक्षणाची असून राज्यात ४ वस्तुसंग्रहालये आहेत. अटलांटिक सिटी हे किनाऱ्यावरील शहर क्रीडास्थानांप्रमाणेच अनेकविध संस्थांच्या अधिवेशनांचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे.

ओक, शा. नि. देशपांडे, सु. र.