आमली (विलायती) : (हिं. विलायती इमली, हिला क. धरंबे, उपगीमर इं. गँबोज ट्री लॅ. गार्सीनिया कँबोजिया कुल-गटिफेरी). हा सदापर्णी व मध्यम आकाराचा वृक्ष प्रथम थायलंड व कंबोडियातून श्रीलंकेमार्गे भारतात आला असून सध्या पश्चिम द्वीपकल्पात कोकण ते त्रावणकोरपर्यंत दाट जंगलात पसरलेला आढळतो. शिवाय ब्रह्मदेश, पेनांग, अंदमान बेटे इ. ठिकाणी व भारतात इतरत्र (तमिळनाडू, बंगाल व पू. हिमालय) सापडतो तो लागवडीतही आहे. खोड सरळ व फांद्या थोड्या लवलेल्या असतात. साल करडी, जाड, गुळगुळीत, ð वल्करंध्रयुक्त असते. पाने साधी, गर्द हिरवी, वरील बाजूस चकचकीत, लंबगोल किंवा भाल्यासारखी व समोरासमोर असतात. सामान्य शारीरिक लक्षणे ðगटिफेरी  कुलात वर्णिल्याप्रमाणे. फुले बहुयुतिक, पिवळी, कोकमापेक्षा थोडी लहान, एकाकी किंवा पानांच्या बगलेत व फांद्यांच्या टोकास झुबक्यावर फेब्रुवारी ते मार्चमध्ये येतात. प्रदले संदलापेक्षा मोठी केसरदले अनेक व आखूड दांड्यावर चिकटलेली स्त्री-पुष्पात अनेक वंध्य केसरदले [→ फूल]. फुलाची संरचना एकंदरीत ð कोकमाप्रमाणे किंजपुट ६-१० कप्प्यांचा. मृदुफळ रसाळ, कोकमापेक्षा लहान, पिवळसर किंवा लालसर, ६-१० उभ्या खोलगट रेषा असलेले बिया ६-८, मांसल व अध्यावरणयुक्त (बिजाच्या देठापासून किंवा त्यावरील सूक्ष्मछिद्राच्या जवळील भागापासून तयार झालेली बिजावरील वाढ) असतात. सालीतून पिवळट व अर्धपारदर्शक डिंक पाझरतो त्याला व्यापारी ‘गँबोज’ म्हणतात. स्थानिक नाव ‘रेवचिन्नी’ आहे. ‘सयाम-गँबोज’ व ‘ सीलोन-गँबोज’ असे दोन प्रकार आहेत. सीलोनी प्रकारात गोलसर खडे किंवा सपाट वड्या व सयामी प्रकारात भरीव किंवा पोकळ नळ्या असतात. हा पाणी, अल्कोहॉल व तेल यांमध्ये विरघळतो व सुंदर पिवळा रंग बनतो. चित्रकारांना तो फार उपयुक्त असतो. रोगणात घातल्याने त्याला सोनेरी छटा येते. बौद्ध भिक्षू आपले रेशमी कपडे रंगविण्यास गँबोज वापरतात. त्रावणकोरी गँबोज वरील दोन्ही प्रकारांपेक्षा सरस असतो. सयामी व त्रावणकोरी गँबोज देणाऱ्या जाती भिन्न आहेत (गा. त्रावणकोरिया  गा. हॅनबुर्गी). गँबोज रेचक, कृमिनाशक व मूत्रल आहे. या झाडाची फळे आंबूस व खाद्य आहेत फळांची साल चिंचेप्रमाणे आमटीत घालतात. लाकूड कठीण व गुळगुळीत असून किरकोळ वस्तू बनविण्यास उपयुक्त असते.

महाजन, मु. का.