आफ्रो-आशियाई परिषद : इंडोनेशियातील बांडुंग येथे दि. १८ ते २४ एप्रिल १९५५ दरम्यान भरलेली आफ्रिका आणि आशिया खंडांतील स्वतंत्र राष्ट्रांची पहिली औपचारिक परिषद. हीच बांडुंग परिषद म्हणून ओळखण्यात येते. भारतासह २९ राष्ट्रांनी ह्या परिषदेत भाग घेतला. दक्षिण आफ्रिका, इझ्राएल, राष्ट्रीय चीन, दक्षिण व उत्तर कोरिया ह्या देशांना आमंत्रण नव्हते. पश्चिमी राष्ट्रांव्यतिरिक्त इतर राष्ट्रांची ही मोठ्यात मोठी परिषद होती. 

आशियाई व आफ्रिकी राष्ट्रांच्या मताची दखल न घेता त्यांच्या बाबतीत धोरण ठरविण्याच्या पश्चिमी राष्ट्रांच्या पद्धतीबद्दल नापसंती व्यक्त करण्यात आली. सर्व प्रकारच्या वसाहतवादाचा निषेध करण्यात आला. जागतिक शांतता व सहकार्यासाठी दहा कलमी कार्यक्रम मान्य करण्यात आला. स्वसंरक्षणार्थ करण्यात येणारे करार मान्य करण्यात आले, पण ज्या करारांनी बड्या राष्ट्रांचा हेतू सफल होणार असेल ते निषेधार्ह ठरविण्यात आले. चीनला ह्या परिषदेमुळे प्रतिष्ठा मिळाली. भारताने पुरस्कारलेल्या पंचशील त्याचप्रमाणे सहजीवन व निःशस्त्रीकरण या तत्त्वांचा स्वीकार करण्यात आला. परिषदेने अरबांचा पॅलेस्टाइनवरचा अधिकार मान्य केला. ð अलिप्तता आणि ðपंचशील ह्या दोन धोरणांतील फरक स्पष्ट न झाल्यामुळे जरी वादंग झाले, तरी सारे प्रतिनिधी नव्या आशा घेऊन परतले.

परंतु ईजिप्तवरच्या आक्रमणाचा धिक्कार करणारी आफ्रो-आशियाई राष्ट्रे हंगेरीच्या उठावाच्या बाबतीत उदासीन राहिली. समन्वयापेक्षा राष्ट्रीय हितसंबंधाची जपणूक करण्याकडे सर्वच राष्ट्रांचा कल असतो आणि म्हणून जागतिक राजकारणात बांडुंग परिषदेने व्यक्त केलेला आशावाद प्रत्यक्षात उतरला असे म्हणता येत नाही.

जगताप, दिलीप