आदिमाता : ईश्वर स्त्रीरूपाने किंवा पुरुषरूपाने निरनिराळ्या समाजांत व धर्मांत कल्पिलेला आहे. स्त्रीरूपाचा ईश्वर म्हणजे आदिमाता होय व पुरुषरूपाचा ईश्वर म्हणजे आदिपिता होय. जगातील अनेक ख्रि. पू. धर्मांमध्ये व समाजांमध्ये आदिमातेची पूजा प्रचलित होती. ॲसिरियामध्ये ⇨ इश्तार ही सर्व देवांची जननी म्हणजे आदिमाता मानलेली होती.

इसिस ही ईजिप्तमधील मुख्य देवतात्रयीपैकी देवी होय. ॲस्टोरेथ (ॲस्टार्ट) ही फिनिशियातील स्त्रीरूप देवता अथीना, ⇨ ॲफ्रोडाइटी, डिमीटर इ. ग्रीक स्त्रीरूप देवता तसेच सिबिल, ⇨ मिनर्व्हा⇨ व्हीनस इ. रोमन स्त्रीरूप देवताही प्रसिद्ध आहेत. अमेरिकेत मेक्सिकोतील ॲझटेक व माया संस्कृतींतही आदिमातेची पूजा प्रचलित होती. ख्रिस्ताची माता मेरी ख्रि. पू. संस्कृतीतील सर्व देवांच्या मातेचेच एक रूपांतर आहे. प्रॉटेस्टंट पंथाशिवाय अन्य प्राचीन ख्रिस्ती पंथांत तिच्या पूजेस अत्यंत महती प्राप्त झालेली दिसते. ख्रिस्तपिता जोसेफ याच्या संबंधावाचून ख्रिस्ताचा मेरीपासून जन्म झाला, ही कथा तिच्या ख्रि. पू. आदिमातास्वरूपाची सूचक ठरते.

भारतात आदिमातेची म्हणजे देवीची पूजा वेदपूर्व काळापासून चालत आलेली असावी. मोहें-जो-दडो व हडप्पा येथील उत्खननांत मातृदेवतेची प्रतीके सापडलेली आहेत. ऋग्वेद हा सर्वांत प्राचीन धर्मग्रंथ होय. त्यात पुरुषरूप देवाचीच स्तोत्रे प्राधान्याने दिसतात हे जरी खरे असले, तरी सर्व देवांची माता म्हणून ⇨ अदितीचा वारंवार निर्देश आढळतो. वेदोत्तरकालीन हिंदू धर्मात ⇨ काली⇨ लक्ष्मी⇨ सरस्वती,  दुर्गा, महादेवी, पार्वती, अंबाभवानी, जगदंबा  इ. नामाभिधानांनी देवीची आदिमाता म्हणून पूजा भारतातील आसेतुहिमाचल प्रदेशांमध्ये हजारो वर्षे प्रचलित असलेली दिसते.

पुरुषरूप ईश्वरापेक्षा स्त्रीरूप ईश्वराची कल्पना माणसांमध्ये अगोदर आलेली असण्याचा फार संभव आहे. कारण मानवजन्मास पुरुष कारण आहे की नाही, याबाबत आदिमानवांमध्ये अज्ञान किंवा शंका होती. त्या काळी स्त्री हीच जननी हे निश्चित माहीत असल्यामुळे, तिच्याबद्दलच्या आदर व ममता या भावना, विश्वाच्या किंवा जगातील जीवनोपयुक्त पदार्थांच्या उत्पत्तीस कारण म्हणून मानलेल्या किंवा कल्पिलेल्या शक्तीवर स्थानांतरित होणे, अत्यंत स्वाभाविक आहे. मातृभक्तीचे उन्नयन आदिमातेच्या भक्तीत होण्याची प्रक्रिया पित्याबाबतच्या अज्ञानाच्या काळात मातृसत्ताक समाजसंस्थेत झाली.

सर्वच आदिम, अर्धसंस्कृत व पूर्णसंस्कृत जागतिक धर्मांमध्ये प्रजा, पशू व धान्य यांच्या समृद्धीकरता आवश्यक असलेले ⇨ सुफलताविधी  सापडतात. योनी, स्तन व लिंग ही सुफलताविधींतील पूज्य प्रतीके होती, असे प्राचीन व आदिम संस्कृतींच्या अध्ययनाने सिद्ध झालेले आहे. जननशक्तीचे प्रतीक म्हणजेच आदिमाता होय. किंबहुना शिवाची अर्धांगी पार्वती किंवा देवी हिचा निर्देश केवळ ‘शक्ती’ या पदानेच धर्मशास्त्रात केलेला दिसतो. देवीपूजेच्या संप्रदायाला म्हणूनच ⇨ शाक्तपंथ म्हणतात. पुरुषरूप ईश्वराच्या भक्तीला, विशेषतः वारंवार युद्धाची गरज असलेल्या, युयुत्सू समाजातच महती प्राप्त झाली असावी. वैदिक आर्यांचा समाज हा युद्धरत व युद्धप्रिय समाज होता, ही गोष्ट ⇨ इंद्र  या युद्धरत, सशस्त्र व शूर देवाच्या प्राधान्यावरून लक्षात येते. प्राचीन ग्रीक समाजातही ⇨ झूस  हा पराक्रमी देव, सर्व देवाधिदेव म्हणून मानला गेला, याचे हेच कारण होय. युद्धात विजय प्राप्त करून देणारा देव, असे इंद्राचे व इतर वैदिक देवांचे वर्णन शेकडो वेळा वेदांत केलेले आहे. त्यामुळे वैदिक वाङ्‍मयात आदिमाता किंवा देवी हिचा महिमा ग्रथित केलेला दिसत नाही परंतु हिंदूंच्या धार्मिक विधींमध्ये आणि देवतोत्सवांमध्ये देवीचे माहात्म्य सर्वत्र आढळते. ज्या प्रदेशांत युद्ध्यमानतेची आवश्यकता वर्षानुवर्षे तेथील स्थानिक समाजांना भासली नाही, तेथे देवीपूजा स्थिरावली. ही स्थिरावलेली देवी पुरूषदेवाला मागे सारून कालांतराने युद्धसंस्था आवश्यक झाल्यावर, स्वतःच युद्धाची देवता बनली. मार्कंडेयपुराणातील ‘सप्तशती’ हे प्रकरण दुर्गा ही युद्धदेवता कशी आहे, याचे सुस्पष्ट दर्शन घडविते. महाराष्ट्रातील लढाऊ व सत्ताधारी जमातींची दुर्गा किंवा भवानी ही कुलदेवता युद्धसंस्थेमुळे युद्धदेवताही बनली. (चित्रपत्र २).

संदर्भ : 1. Ehrenfels, B. O. R. Mother-right in India, Oxford, 1941.

2. Showerman, G. The Great Mother of the Gods, 1910.

३. प्रभुदेसाई, प्र. कृ. देवीकोश, खंड १, २, ३  पुणे, १९६७-१९६८.

जोशी, लक्ष्मणशास्त्री

 

१ ते ४ सिंधुसंस्कृतीतील आदिमातेच्या पक्वमृदामूर्ती, इ.स.पू.सु. ३ रे सहस्रक. ५ गृहदेवतेच्या रूपातील सर्पधारी आदिमाता. ६ सुमेरियातील मारी येथे सापडलेली आदिमातेची मातीचा मूर्ती, इ.स.पू.सु. २०००. ७ सुमेरियातील मारी येथील राजवाड्यात सापडलेली सुफलता देवतेची मूर्ती : तिच्या हातातील पात्रातून प्राणद्रव्य स्रवते, अशी कल्पना. ८ यूगोस्लाव्हियातील स्ट्रेलिस (मोरेव्हिया) येथे सापडलेली आदिमातेची नवाश्मयुगीन मूर्ती. ९ आयोनियातील एफेसस येथे सापडलेला ‘आर्टेमिस’ या निसर्गदेवतेचा रोमन काळातील पुतळा. १० वरदहस्ता आदिमातेची एक सांप्रदायिक मूर्ती : तिच्या मस्तकावर पावित्र्यनिदर्शक अशी कबुतराची आकृती. ११ इडा पर्वतावर बालरूपातील ‘झ्यूस’ देवाला प्रतिपाळणाऱ्या ग्रीक पुराणकथेतील देवता. १२ आदिमातेची तुर्कस्तानातील हॅसिलर येथे सापडलेली नवाश्मयुगीन बैठी मूर्ती.