हुसेन, झाकिर : (९ मार्च १९५१). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय तबलावादक. जन्म मुंबई येथे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेंट मिशेल हायस्कूल, माहीम येथे झाले. पुढे सेंट झेव्हिअर्स महाविद्यालय, मुंबई येथून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. संगीताचा वारसा त्यांना घरातूनच लाभला होता. त्यांचे वडील विख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखाँ( रख कुरेशी) यांच्या मार्गदर्शना-खाली त्यांनी संगीताचे धडे घेतले. बालपणापासून त्यांनी तबला-वादनातील विविध बारकावे आणि शैली आत्मसात केल्या. त्यांनी पहिला व्यावसायिक तबलावादनाचा कार्यक्रम वयाच्या बाराव्या वर्षी केला (१९६३).
झाकिर हुसेन यांनी आपल्या तबलावादनातील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस १९७० मध्ये प्रारंभ केला. त्या एका वर्षात सु. १५० तबलावादनाचे कार्यक्रम त्यांनी भारतासह विविध देशांत सादर केले. त्यांनी सामूहिक तबलावादनासाठी विख्यात सरोदवादक आशीष खान यांसोबत ‘शांतिगट’ (१९७०) पुढे इंग्रज गिटारवादक जॉन मॅक्लॉफ्लिन व व्हायोलिनवादक एल्. शंकर यांसोबत ‘शक्तिगट’ (१९७५) स्थापन केला. शिवाय ते स्वतंत्र (सोलो) तबलावादनाच्या रंगतदार मैफली करत. त्यांनी तबला या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. परंपरा आणि नावीन्य यांचे सुंदर मिश्रण त्यांच्या वादनशैलीत आढळते. भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताचे ते भोक्ते आहेत. तबलावादनातील त्यांचा जोश, बोटांची किमया आणि बेभानपणा ठळकपणे जागवतो. सुरांचा अनुनय करताना त्यांनी लाखो रसिकांना आपल्या तालावर नाचविले. अटलांटा (अमेरिका) येथील उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा-सामन्यांच्या उद्घाटनाची संगीतरचना त्यांनी केली (१९९६). तबलावादनास त्यांनी दिलेले मोहक रूप मैफलीचे आकर्षण ठरते. गुरु-शिष्य परंपरेला ते महत्त्व देतात. तबलावादनातील मेरुमणी ठरलेल्या झाकिर हुसेन यांनी अली अकबरखाँ, बिरजू महाराज, रवि शंकर, शिवकुमार शर्मा आदी अनेक श्रेष्ठ गायक, वादक, नर्तक यांना तबलावादनाची साथ दिली आहे. शिवाय त्यांचा स्वतःचा मोठा शिष्यपरिवार आहे. त्यांच्या असंख्य ध्वनिमुद्रिका व ध्वनिफिती आहेत. त्यांनी अनेक हिंदी-इंग्रजी चित्रपटांतून तबलावादनाची साथ दिली आहे. ते स्टॅन्फर्ड विद्यापीठात भारतीय शास्त्रीय संगीताचे प्राध्यापक (२००५-०६) आणि अभ्यागत प्राध्यापक (२००७) होते. भारताच्या स्वातंत्र्याला साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्याकडे केंद्र शासनाने राष्ट्रगीताची संगीतरचना सुपूर्द केली (२००७).
झाकिर हुसेन यांच्या सांगीतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारचा पद्मश्री (१९८८), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९१), इंडो-अमेरिकन ॲवॉर्ड (१९९०), नॅशनल हेरिटेज फेलोशिप, अमेरिका (१९९९), पद्मभूषण (२००२), मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान(२००६), ग्रॅमी ॲवॉर्ड (२००९), कोनारक नाट्यमंडप (ओडिशा) यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्कार (२०१२) आदी मानसन्मान त्यांना लाभले आहेत. तसेच विविध संगीत महोत्सवांतून जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
प्रसिद्ध इटालियन-अमेरिकन कथ्थक नृत्यांगना आंतोनिआ मिनेकोला हिच्याशी त्यांनी विवाह केला (१९७८). त्यांना दोन सुविद्य मुली आहेत.
मिठारी, सरोजकुमार