हुजूर पथके : राजेशाहीच्या काळात राजाच्या दिमतीकरिता व संरक्षणाकरिता खास पथके असत, त्यांना हुजूर पथके म्हणत. राजा किंवा राष्ट्राध्यक्ष यांच्या मिरवणुकीत वा इतरत्र जाणाऱ्या पथकास ‘हाउसहोल्ड ट्रूप्स’ किंवा ‘बॉडीगार्ड’ पथके म्हणतात. सामान्यतः ती सार्वजनिक समा-रंभाच्या वेळी राष्ट्र प्रमुखाच्या सोबत असतात. एकविसाव्या शतकात राजेशाही जवळजवळ नष्ट झाली असली, तरी मर्यादित स्वरूपात ती काही अरब राष्ट्रांत व यूरोपीय देशांत अद्यापि अस्तित्वात आहे मात्र तिचे स्वरूप बदललेले आढळते. त्यामुळे हुजूर पथके ही संकल्पना पूर्णतः नष्ट झालेली नाही. शिवाय जिथे लोकशाही वा हुकूमशाही आहे, तिथे दिमतीकरिता आणि संरक्षणासाठी खास सैनिकी पथके असतात. 

 

इंग्लंडमध्ये राजा/राणी यांचे खास शाही पथक असे. त्यात खास ‘गार्ड्स’ पथके असत (उदा., कोल्डस्ट्रीम गार्ड्स, आयरिश गार्ड्स इत्यादी) . त्यांतील प्रत्येक सैनिकाची निवड कसोशीने केली जाई आणि त्याची शारीरिक ठेवण, विशेषतः उंची, पाहिली जाई. इंग्लंडमध्ये अद्यापि ‘बकिंगहॅम पॅलेस ‘( राजनिवास) वर पहारा करण्याचे काम या शाहीगार्ड पथकाकडेच आहे. पूर्वी जर्मनीत ‘प्रशियन गार्ड्स’ प्रसिद्ध होती. ⇨ पहिला नेपोलियन याचे ‘इंपिरिअल गार्ड्स’ हे पथक तत्कालीनफ्रान्समध्ये सर्वत्र प्रसिद्ध होते. मराठा अमलात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या रक्षणासाठी खास विश्वासातील अशा पाच हजार जिलीबीच्या लोकांपैकी लागतील तेवढे लोक (पथक) सतत स्वारीबरोबर राहण्यासाठी ठेवले होते. याशिवाय खाशांसाठी आणखी दोनशे घोड्यांचे निराळे पथक होते. पुढे हीच पद्धत पहिल्या बाजीरावाने अवलंबिली होती मात्र त्याच्या जिलीबीच्या पथकात दहा हजार सैनिक असत. स्वातंत्र्य- प्राप्तीनंतर ⇨ कोदेंदेरा मडप्पा करिअप्पा यांनी भारतीय फौजेत ‘ब्रिगेड ऑफ गार्ड्स’ हे पथक सुरू केले. भारताच्या राष्ट्रपतिभवनावर पहारा करण्याचे काम ‘बॉडीगार्ड’ पथकाकडे असते. बहुधा या पथकातील लोकांचे गणवेश वैशिष्ट्यपूर्ण व अन्य सैनिकांपेक्षा वेगळे असतात. 

चाफेकर, शं. ग.