हिल्डब्रांडस् लीड : एक जर्मन काव्य. हिल्डब्रांडस्लीड ( इं. शी. ‘साँग ऑफ हिल्डब्रांड ‘) ह्याचा कर्ता अज्ञात असून ते त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहे. आठव्या शतकाच्या उत्तरार्धात ते लिहिले गेले असावे. प्राचीन हाय जर्मन कालखंडातील जर्मन वीरकाव्याचा हे काव्य म्हणजे एकमेव अवशेष होय. त्या दृष्टीने त्याला ऐतिहासिक महत्त्वही आहे. हिल्डब्रांड हा सैनिक थिओडोरिक द गॉथ ह्याच्या लवा-जम्यासह इटलीतील आपल्या घरातून पळालेला असतो. आपल्या स्वामीचे इटालियन राज्य त्याला परत मिळवून देण्यात साहाय्य करण्यासाठी तो इटलीत परततो तथापि एक शूर योद्धा म्हणून लौकिक प्राप्त झालेला प्रत्यक्ष त्याचा मुलगाही आता त्याला ओळखत नाही कारण हिल्डब्रांड इटलीतून पळून जाऊन बराच काळ लोटलेला असतो. त्याचा मुलगा वडिलांना न ओळखल्यामुळे दूषणे देतो. हिलब्रांडलाही आपला मुलगा ओळखता येत नाही व तो त्यास दूषणे देतो. त्यानंतर त्या दोघांत झालेल्या युद्धात हिल्डब्रांडकडून त्याचा मुलगा मारला जातो. बापाकडून मुलगा मारला जातो हा कथेचा शेवट आपल्याला ह्या कथेच्या जर्मानिक रूपांतून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. न्याय आणि कर्तव्य ह्यांच्या जर्मानिक संकल्पनेत माणसाच्या व्यक्तिगत दुःखाची दखल घेतली जात नाही. तसेच न्याय ईश्वरेच्छेनुसार होत असल्यामुळे पिता आणिपुत्र ह्यांच्यातील द्वंद्वयुद्धास धार्मिक महत्त्वही प्राप्त होते. जर्मानिकांचेशौर्य, त्यांचे मानबिंदू आणि त्यांचा नियतिवाद ह्यांचा प्रत्यय याकाव्यातून येतो. 

कुलकर्णी, अ. र.