हीरोशीमा : जपानच्या होन्शू बेटावरील याच नावाच्या परगण्याची (प्रीफेक्चरची) राजधानी व दुसऱ्या महायुद्धात अणुबाँबमुळे उद्ध्वस्त झालेले जगातील पहिले शहर. लोकसंख्या १,५४,३९१ (२०११). होन्शू व शिकोकू बेटांदरम्यान असलेल्या इनलँड सी या समुद्रातील हीरोशीमा उपसागर किनाऱ्यावर, ओटा नदीच्या त्रिभुज प्रदेशात हे शहर वसले आहे. ओटा नदीच्या त्रिभुज प्रदेशातील फाट्यांनी लहान लहान सहा बेटे तयार झाली असून त्यांवर हीरोशीमा हे विस्तीर्ण बेट विस्तारले आहे. शहराचे निरनिराळे भाग अनेक पुलांनी जोडले आहेत. टेरूमोटो मोरी नावाच्या सरदाराने या मच्छीमारी खेड्यात किल्ला बांधला (१५९३) आणि त्याभोवती शहराच्या विकासास सुरुवात झाली. टोकुगावा काळात (१६०३–१८६७) आसानो घराण्याचे हीरोशीमावर वर्चस्व होते. त्याने शहराच्या व्यापार-उद्योगास उत्तेजन दिले. मेजी घराण्याच्या पुनःस्थापनेनंतर (१८६८–१९१२) येथे लष्करी छावणी होती. त्यानंतर त्याचा विकास होऊन ते आधुनिक वाहतूक व उद्योगधंद्यांचे केंद्र बनले. तेथे मुख्य बंदराच्या सुविधा पूर्ण होऊन (१८८९) कोबे व शिमोनोसेकी यांच्याशी हीरोशीमा रेल्वेने जोडले गेले (१८९४) . उत्तर क्यूशूमधील कोळसा व परदेशांतून आयात केलेल्या कोळशामुळे येथे लोह व पोलाद उद्योग वाढले. त्यांतील उत्पादने अभियांत्रिकी उद्योगात वापरात येऊ लागली. 

 

दुसऱ्या महायुद्धकाळात (१९३९–४५) हीरोशीमा हे एक प्रादेशिक लष्करी मुख्यालय असून शस्त्रास्त्रांच्या निर्मितीचे केंद्र होते. तसेच रेल्वेचे प्रमुख स्थानक होते. जपानच्या बाँबफेक्या विमानांनी पर्ल हर्बरवर केलेल्या हल्ल्यात अमेरिकेच्या १९ युद्धनौका निकामी होऊन १५०विमाने पडली व २,८०० सैनिक ठार झाले होते (१९४१) . त्या वेळी अमेरिकेने जपानबरोबर युद्ध पुकारले. त्याच्या बदला-प्रत्युत्तरात अमेरिकेने ६ ऑगस्ट १९४५ रोजी हीरोशीमावर अणुबाँब टाकून शहराचा सु. १३ चौ. किमी. भाग उद्ध्वस्त केला. त्यात सुमारे एक लाख लोक मृत्युमुखी पडले. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आणि आणवीय विकिरणांच्या परिणामांमुळे आणखी बरेच दगावले. जे काही वाचले त्यांना असाध्य रोगांनी पछाडले. युद्ध समाप्त होताच हीरोशीमाच्या पुनर्बांधणीसाठी जपानने अथक प्रयत्न करून नवे अद्ययावत शहर उभे केले मात्र शहराचा काही भाग अण्वस्त्रांच्या विध्वंसक शक्तीचे केंद्र म्हणून तसाच ठेवण्यात आला असून त्याजवळ शांतता स्मारक उद्यान उभारले आहे. या उद्यानात वस्तुसंग्रहालय तसेच अणुबाँब हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिंच्या स्मरणार्थ उभारलेली स्मारके आहेत. यातील ‘ॲटोमिक बाँब डोम’ चा समावेश जागतिक वारसा स्थळांत करण्यात आला आहे (१९९६). अण्वस्त्रांवर निर्बंध घालावेत यासाठी सुरू केलेल्या शांतता चळवळीचे हीरोशीमा हे एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र बनले आहे. 

 

दरवर्षी ६ ऑगस्टला या घटनेच्या स्मरणार्थ येथे प्रार्थनादी कार्यक्रमहोतात. त्या रात्री नदीत दिवे सोडतात. शिवाय शोभेची दारू उडवितात. शांतता उद्यानाच्या पूर्वेस हिजियामा टेकडीवर ॲटोमिक बाँब कॅजुआल्टी आयोगाची मोठी प्रयोगशाळा स्थापन केली असून (१९४७) त्यामध्ये आणवीय विकिरणांचे होणाऱ्या वैद्यकीय व जैविक परिणामांविषयी संशोधन केले जाते. १९७५ पासून हे केंद्र रेडिएशन इफेक्टस् रिसर्च फाउन्डेशन या नावाने ओळखले जाते. आणवीय विकिरणांनी उद्भवलेल्या व्याधींवर मोफत उपचार करणारी ५ सार्वजनिक व ४० खाजगी चिकित्सालये येथे आहेत. हीरोशीमा हे महत्त्वाचे औद्यागिक शहर झाले असून जहाज बांधणी उद्योगाबरोबर स्वयंचलित यंत्रे, यंत्रसामग्री, पोलाद, रबर, रसायने, कापड व साकी (या नावाचे मद्य) ह्यांचे उत्पादन येथील कारखान्यात होते. शहरात विविध प्रशासकीय कार्यालये व लोकोपयोगी सेवा केंद्रे, महाविद्यालये व विद्यापीठे आहेत. शिवाय शहरात बंदरा-जवळच इटाजिमा बेटावर आरमारी संरक्षक दलाचे प्रसिद्ध महाविद्यालय आहे. त्याजवळच जळलेल्या अवशेषांचे संग्रहालय आहे. महाविद्यालयाला जोडलेल्या पदार्थ संग्रहालयात जपानच्या सागरी इतिहासातील अनेक प्रसंगांची स्मृतिचिन्हे पहावयास मिळतात. १९५६ मध्ये हीरोशीमा किल्ल्याची पुनर्बांधणी केली असून त्यात शहराच्या इतिहासासंबंधीचे संग्रहालय आहे. हीरोशीमाच्या परिसरातील मियाजिमा ह्या सृष्टिसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बेटावर हीके नावाच्या सरदार घराण्याची सुंदर देवस्थाने आहेत. 

गाडे, ना. स.