हिस्टिडीन : मानवाच्या आरोग्याकरिता आवश्यक असलेलेॲमिनो अम्ल. ते शरीरात तयार होत नसल्यामुळे आहारातूनमिळविले जाते. रेणवीय सूत्र C6H9N3O2. ⇨ पीएच मूल्य ७.४७. याला आल्फा-ॲमिनो-बीटा-इमिडॅझोलिलप्रोपिऑनिक अम्ल किंवा२-ॲमिनो-३-(१ H- इमिडॅझोल – ४-इल) प्रोपिऑनिक अम्ल असेही म्हणतात. ॲरोमॅटिक कार्बनी संयुगांची वलयांकित संरचना असलेल्या इमिडॅझोल गट (C3H4N2) हा हिस्टिडिनाचा कार्यकारी गट असून तो त्याच्या कोणत्याही स्वरूपात अबाधित राहतो. या गटात पाय् (π) प्रकारचे सहा इलेक्ट्रॉन असून त्यांपैकी चार हे दोन दुहेरी बंधातील व दोन हे नायट्रोजनाच्या एकमात्र जोडीत असतात. 

 

जर्मन वैद्य आल्ब्रेख्ट कोसेल यांनी १८९६ मध्ये हिस्टिडिनाचे प्रथमतः अस्तित्व ओळखले. त्याच वर्षी एस्. जी. हेडीन यांनी स्वतंत्रपणे जलविच्छेदनाने प्रथिनापासून ते अलग केले. हिस्टिडिनाला अल्कधर्मी विद्रावात डायॲझोटाइज्ड सल्फॅनिलिक अम्लाबरोबरच्या संयोगाने तांबडा रंग येतो, असे एच्. झेड्. पॉली यांनी दाखवून दिले. तसेच त्यांनी हिस्टिडिनातील इमिडॅझोल गटाचे अस्तित्व सिद्ध केले. एम्. फ्रँकेल यांनी १९०३ मध्ये, एच्. झेड्. पॉली यांनी १९०४ मध्ये आणि फ्रान्झ नूप व आडोल्फ व्हिन्डाउस यांनी १९०६ मध्ये हिस्टिडिनाची स्वतंत्र रीत्या संरचना स्पष्ट केली. 

 

हिस्टिडीन
 

हिस्टिडीन हे मूलतः रासायनिक दृष्ट्या अल्कधर्मी असते तरीही अनेक जीवरासायनिक विक्रियांत अम्लधर्मी व अल्कधर्मी अशा दोन्ही रूपांत ते आढळते. प्रोटॉनयुक्त (धन विद्युत् भारित) इमिडॅझोल गट हा अणुकेंद्रस्नेही असून सामान्य अल्कलीचे, तर प्रोटॉनरहित इमिडॅझोल गट सामान्य अम्लाचे गुणधर्म दर्शवितो. यावरून प्रोटॉनाची देवाण-घेवाण करण्यात हिस्टिडिनाचा मोलाचा वाटा असतो, असे दिसून येते. 

 

एल्-हिस्टिडिनाच्या भौतिक स्थिरांकांची २५० से.ला असणारी मूल्ये पुढीलप्रमाणे आहेत

रेणुभार : १५५.१६ 

pK1(COOH) : १.८२ pK2 (इमिडॅझोल) : ६.०० 

pK3(NH3+) : ९.१७ 

समविद्युत् भार बिंदू : ७.५९ 

प्रकाशीय वलन : [αD] (पाण्यात) : -३८.५ 

[αD] (५ सममूल्यी हायड्रोक्लोरिक अम्लात) : +११.८ 

विद्राव्यता (ग्रॅ./१०० मिलि. पाणी) : ४.२९ 

द्रवांक : २७७°से. 

रंग व चव : रंगहीन व कडू चवीचे संयुग स्फटिकरूपात. 

 

वरील भौतिकीय स्थिरांकांच्या स्पष्टीकरणार्थ मराठी विश्वकोशातील ‘ॲमिनो अम्ले’ या नोंदीतील ‘भौतिक गुणधर्म’ हा परिच्छेद पहावा. हिस्टिडीन हीमोग्लोबिनामध्ये सापेक्षतः मोठ्या प्रमाणात असते. कार्नोसीन व ॲनसेरीन ही डायपेप्टाइडे हिस्टिडिनाचे अनुजात आहेत आणि ती स्नायूंमध्ये विपुल प्रमाणात असतात. तसेच अर्गोथिओनीन (थिओलहिस्टिडिनाचे ट्रायमिथिल-बिटाइन) रक्तकोशिका आणि वीर्य यांमध्ये विपुल असते. तथापि या संयुगांचे कार्य माहीत झालेले नाही. 

 

दररोजच्या जेवणातील अनेक पदार्थांपासून हिस्टिडीन शरीरास प्राप्त होते. मांस, मासे, अंडी (पांढरा बलक) इ. मांसाहारी पदार्थ तर कच्च्या फळभाज्या व कडधान्ये इ. शाकाहारी पदार्थ हिस्टिडिनाचा स्रोत आहेत. 

 

मानवाच्या शरीरात हिस्टिडिनाच्या कार्बॉक्सिलनिरासाने हिस्टामीन तयार होेत असून हे संयुग ॲलर्जी विक्रियांशी संबंधित शरीरक्रियात्मक प्रक्रियांत भाग घेते. [→ हिस्टामीन]. 

 

हिस्टिडिनाच्या कमतरतेमुळे हिस्टिडीनिमिया व यूरोकॅनिक ॲसिड्यूरिया असे प्रमुख विकार उद्भवू शकतात. आनुवंशिक पार्श्वभूमी असलेले हे विकार सहसा त्वचेच्या विशिष्ट स्तरावर मुख्यतः परिणाम करतात. रक्त, मूत्र व मस्तिष्क मेरुद्रव यांत हिस्टिडीन व यूरोकॅनिक अम्लाचे प्रमाण वाढते. सदर विकार फारसे गंभीर स्वरूपात परिणाम करत नसले, तरीही क्वचित तंत्रिका तंत्रावर (मज्जासंस्थेवर) याचे विपरीत परिणाम आढळून आले आहेत. प्रौढांपेक्षा लहान मुलांमध्ये याची वारंवारता अधिक असल्याचे सिद्ध झाले आहे. दोन्ही विकार एकाच वेळी एका व्यक्तीत दिसून येऊ शकतात. हिस्टिडिनाचा पूरक अन्न म्हणून उपयोग केल्यास, त्याच्या अभावाने होणारे विकार टाळता येऊ शकतात. 

 

पहा : ॲमिनो अम्ले हिस्टामीन. 

कर्णिक, प्रसाद मिठारी, भू. चिं.