हिरडा : (हिं. हरीर, हरिया; गु. हिरडो; क. हरडे, अलालेक्काई, अलोट; त. कठुक्काई; सं. हरीतकी, अभय, जीवंती; इं. चेब्युलिक मायरोबलान; लॅ. टर्मिनॅलिया चेब्युला; कुल-काँब्रेटेसी). हा एक उपयुक्त औषधी फळ असलेला पानझडी वृक्ष असून त्याची उंची ७–१० मी. व घेर १.५–३.६ मी. असतो. तो म्यानमार, श्रीलंका व भारतात सर्वत्र आढळतो. उत्तर भारतात कांग्रा व कुमाऊँ ते पश्चिम बंगाल आणि दक्षिणेस सह्याद्रीच्या डोंगरात सस.पासून ३१०–९३० मी. उंचीपर्यंत उत्तर महाराष्ट्र, बेळगाव व कारवारच्या जंगलांत, सातपुडा पर्वतावर तसेच हिमालयात सस.पासून १,५०० मी. उंचीवर आणि त्रावणकोर परिसरात सस.पासून १,८६० मी. उंचीपर्यंत तो आढळतो.
हिरडा वनस्पतीची साल गडद तपकिरी व भेगाळलेली कोवळे भाग तांबूस किंवा चंदेरी व लवदार पाने जवळजवळ, समोरासमोर, अंडाकृती, तळास गोलसर (१०–२० सेंमी.), पानगळीचा काळ फेब्रुवारी-मार्च, नवीन पाने एप्रिलमध्ये फांद्यांच्या टोकांवर येतात. फुले उभयलिंगी, धुरकट पांढरी किंवा पिवळट हिरवी असून मे-जूनमध्ये शेंड्याकडे परिमंजरीवर किंवा कणिशावर येतात. हिची इतर सामान्य लक्षणे ⇨ काँब्रेटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. फळे लहान, सु. ५ सेंमी. लांब, सुकल्यावर कठीण, एकबीजी, पिवळसर हिरवी, दोन्हीकडे टोकदार व पंचकोनी असून हिवाळ्यात येतात.
हिरड्याचे अनेक प्रकार असले तरी विक्रीस मुख्यतः पुढील दोन प्रकारचे हिरडे असतात : काळा पिवळसर किंवा उदी रंगाचा व लहान फिकट ‘रंगारी हिरडा’. वाळलेल्या हिरड्याची बाहेरील साल प्रामुख्याने वापरतात. मोठ्या प्रमाणावर फळ, पूड किंवा अर्क या स्वरूपात हिरडा परदेशात पाठवितात. फळापासून टॅनीन, रंग वगैरे उपयुक्त पदार्थ मिळतात. लोहमिश्रित पाण्यात चूर्ण टाकल्यावर काळी शाई बनते. तसेच या चूर्णात तुरटीचा द्रव मिसळल्यास पिवळा रंग बनतो. टॅनिनाचा उपयोग मुख्यतः कातडी कमाविण्यास करतात. सालीपासूनही टॅनीन मिळते. कोवळ्या फळाचे लोणचे व साधारण जून फळांचा मुरंबा तयार करतात. फळांचा औषधी उपयोग सुविदित आहे. फळ स्तंभक, सारक असून जुनाट जखमांना बाहेरून लावण्यास व तोंड आल्यास गुळण्या करण्यास वापरतात. हिरडा, ⇨ बेहडा (बेलेरिक मायरोबलान) व आवळकाठी [एंब्लिक मायरोबलान → आवळी] यांचे ‘त्रिफळा चूर्ण’ रेचक, अजीर्णनाशक, दीपक, आरोग्य प्रस्थापक असते. चूर्ण आमांश, अतिसार व रक्ती मूळव्याध यांवर देतात. तसेच ते हिरड्यांतून रक्त येणे व किडलेल्या दातांकरिता दंतमंजनात वापरतात. लहान, लांबट, काळसर (अपक्व असता वाळलेला) हिरड्यास ‘बाळहिरडा’ तसेच हिमग म्हणतात, तोही औषधी आहे. याचे चूर्ण तूप अगर एरंडेल तेलातून आमांशावर देतात. फळात ३०% स्तंभक पदार्थ, चेब्युलिनिक अम्ल व २०–४०% टॅनिक अम्ल, गॅलिक अम्ल, राळ व रेचक पदार्थ, अँथ्रॅक्विनोन इ. असतात. फळे रात्री पाण्यात ठेवून ते पाणी दुसऱ्या दिवशी डोळे धुण्यास वापरल्यास थंडपणा येतो. याचे लाकूड फिकट उदी रंगाचे असून फार कठीण, टिकण्यास मध्यम; परंतु घरबांधणी, शेतीची अवजारे व कातीव कामास चांगले असते.
हिरडा (फळ) मधुमेह प्रतिरोधी व वृक्क संरक्षक असून पोटाचाअवक्षय सुधारते. तसेच जठर-ग्रहणी आणि जठर-ग्रसिका यांची हालचाल कमी करते. याच्यात ॲलर्जी प्रतिरोधी, सूक्ष्मजंतुरोधी, कवकनाशक, प्रतिऑक्सिडीकारक, विषाणुरोधी आदी गुणधर्म असतात.
हिरड्याचे कुठलेही हानीकारक परिणाम होत नाहीत. मात्र, गर्भावस्थेत व मासिक पाळीच्या काळात त्याचा वापर करीत नाहीत. दुर्बलता, मानसिक नैराश्य व उपवासात याचा वापर टाळतात. तो युनानी वैद्यकात संधिवात, अपचन, तीव्र डोकेदुखी, नाक गळणे, सर्दी आदींसाठी वापरतात.
वाघ, नितिन भरत; कुलकर्णी, उ. के.