हिब्रू भाषा – साहित्य : हीसेमिटिक भाषासमूहा तील एक भाषा. सेमिटिक भाषाकुलामध्ये प्राचीन आणि आधुनिक हिब्रू या भाषांबरोबरच अकेडियन, फिनिशियन, ॲरेमाइक तसेच अरेबिक या भाषांचाही समावेश होतो. आजच्या इझ्राएल या राष्ट्राची राष्ट्रभाषा असलेल्या हिब्रूचा उल्लेख ‘आधुनिक हिब्रू’ असा केला जातो. बायबल मधीलहिब्रू ही प्राचीन हिब्रू होय. इझ्राएल हा देश १९४८ मध्ये अस्तित्वात आला, तेव्हा हिब्रूशिवाय अरबी आणि इंग्रजी या भाषांना राजभाषांचा दर्जादेण्यात आला. येशू ख्रिस्ताची निजभाषा हिब्रू नव्हती, तर ती ॲरेमाइक होती आणि अखेरीस इ. स.च्या दुसऱ्या शतकात प्राचीन हिब्रू बोलीम्हणून ती नामशेष झाली होती. रोमन लोकांविरुद्ध पुकारलेले ज्यूंचे बारखोबाचे बंड हे ज्यूडामध्ये इ. स. १३२–१३५ मध्ये घडले आणि त्यामुळे हिब्रू बोली नामशेष झाली परंतु ज्यू लोकांची आणि धार्मिक विधींची भाषा म्हणून ती मध्ययुगापर्यंत वापरात होती. प्राचीन पॅलेस्टाइन-मध्ये ती बोलली जात असे. पुढे इ. स. पू. तिसऱ्या शतकात तिची जागा पश्चिमी ॲरेमाइक बोलीभाषेने घेतली. ती धर्मकारणासाठी व साहित्यासाठी अनेक वर्षे वापरात होती. भाषाशास्त्रज्ञ हिब्रूचे ऐतिहासिक दृष्ट्या पुढीलप्रमाणे चार कालखंड कल्पितात : बिब्लिकल बा क्लासिकल ( जीमध्ये ओल्ड टेस्टामेन्टचा बराच भाग लिहिला आहे) मिश्‍नाईक किंवा रॅब्बिनिक (ज्यूंची परंपरा निदर्शक) मध्ययुगीन इ. स. ६ ते १३ वे शतक (यात ग्रीक, स्पॅनिश, ॲरेबिक व अन्य भाषांतील शब्दांची उसनवारी आढळते) आणि आधुनिक विद्यमान हिब्रू भाषा. आधुनिक हिब्रू असे ज्या भाषेला म्हणतात, ती विसाव्या शतकातील तिच्या साहित्यिक आणि बोलीरूपातील पुनरुद्धारानंतर प्रचारात आली. आता जवळजवळ ६८ लाखांपेक्षा जास्त लोकांची ती भाषा आहे आणि ५० लाख लोकांची तर ती प्रथम भाषा म्हणजे मातृभाषा म्हणून नोंदवली गेली आहे. अजबटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड आणि अमेरिका या देशांतही आधुनिक हिब्रूचे निजभाषक आहेत. जवळजवळ १,७०० वर्षे ही भाषा मृत होती किंवा सुप्त होती. अचानक तिचा पुनरुद्धार इझ्राएल या देशाच्या अस्तित्वात येण्याने होतो, ही जगाच्या भाषेतिहासातील एक अद्भुत घटना होय. हिब्रू भाषा अकादेमी ही इझ्राएल शासनाची अधिकृत संस्था हिब्रूचे प्रमाणीकरण करते. 

 

हिब्रू हे नाव इब्रि, एब्रि या ज्यू लोकांच्या एका टोळीवरून आलेआहे, असा समज आहे. ⇨ अब्राहमच्या पूर्वजांपैकी एकाचे नाव एबर होते, असा उल्लेख बायबलमध्ये (‘ जेनसिस’ १०:२१) आढळतो. एबर या हिब्रू शब्दाचा अर्थ पार करणे असा होतो आणि त्या अर्थी युफ्रेटीसनदी पार केली असे लोक, असा त्याचा अर्थ घेतला जातो. बायबल मध्ये हिब्रू भाषेला ‘यहुदित’ असे म्हटले आहे कारण ती इ. स. पूर्व आठव्या शतकात यहुदा (ज्यूडा) साम्राज्याची भाषा होती. 

 

अब्जद अर्थात अरबी, उर्दू यांच्या लिपीसारखी परंतु वेगळी आकारचिन्हे असणारी हिब्रू लिपीदेखील जुन्या हिब्रूचेच एक प्रमाणी-करण आहे. ही उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. तिच्यात बावीस वर्णाक्षरे आहेत. जुनी पॅलिओ-हिब्रू लिपी ही काननाइट आणि फिनिशियनसारखी आहे. आधुनिक ‘हिब्रू’ स्केअर (चौरसाकृती चिन्हांची लिपी) अक्षरांचे चौकोनी आकार आहेत. त्यांना आशुरित असे म्हणतात. ते ॲरेमाइक लिपीपासून विकसित झाले आहेत. हातांनी लिहिली जाते तेव्हा ती धावत्या वळणाची लिपी बऱ्यापैकी वेगळी दिसते. तित आवश्यकते-नुसार इकार, उकार दीर्घ किंवा र्‍हस्व दाखवले जातात सामान्यपणे स्वरचिन्हे दाखविण्याची रीत नाही. काही व्यंजनाक्षरांचा वापर हा स्वरनिर्देशासाठी केला जातो. 

 

पाच स्वर : इ, ए, आ, ओ, उ. र्‍हस्व-दीर्घ असा भेद या स्वरांमध्ये सापडत नाही. अर्थात आघात आणि स्वरांची लांबी यांच्यात संबंधअसला आणि तो पदांमध्ये व्यक्त होत असला, तरी आधुनिक हिब्रूमध्ये मुळातच स्वरांच्या लांबीला अर्थभेदकता नसल्याने तो संबंध लक्षात येत नाही. पदातील आघात हा सामान्यपणे अन्त्य स्वरावर असतो. तो क्वचित उपान्त्यस्वरावरही जातो. हिब्रूच्या व्यंजनव्यवस्थेमध्ये २७ व्यंजन-स्वनीम आहेत : प, ब, म (ओष्ठ्य) , व (दंतोष्ठ्य) , ट, ड, च, ज़( चटईमधल्या ‘च’ चा मृदूकृत ज) , ज (सचे मृदूभूत रूप) ( हे दंतमूलीय) , ज, श, ज (हे तालव्य-दंतमूलीय) ज (हा एकच पूर्ण तालव्य) , ग, व (कंठ्य) , र (हे अलिजिव्हामूलीय कठोर व मृदू) , अ (हे ग्रसनीज म्हणजे गलभित्तिकेच्या आकुंचनातूननिर्माण होणारे व्यंजन. ‘अ’ हे चिन्ह देवनागरीत जरी स्वराचे असले, तरी ग्रसनीज उच्चाराचे सूचन करण्यासाठी हे जवळचे आहे) , ह (हे कंठद्वारीय. अर्थात कंठद्वाराच्या आकुंचनातून उत्पन्न होतात) अशी आधुनिक इझ्राएली व्यंजनव्यवस्था आहे. अर्थात प्राचीन हिब्रूत यातील बरेच ध्वनी नव्हते. आजच्या अरबीचा आणि यिद्दिशचा प्रभाव या व्यवस्थेवर दिसतो. 

 

इतर सेमिटिक भाषांप्रमाणे हिब्रूतही तीन (किंवा क्वचित चार) अक्षरी (म्हणजे व्यंजनरूप) धातुरूपे सापडतात. त्यांपासून विविध प्रत्यय, उपसर्ग, विकरणे वा मध्यप्रत्यय लागून नामे, विशेषणे, क्रियापदे साधली जातात.हे प्रत्यय स्वररूप किंवा स्वरव्यंजनसमूहदेखील असतात. अरबीप्रमाणेच हिब्रू कोशात सर्व धातुसाधित रूपे त्या त्या धातूच्या नोंदीखाली दिली जातात. शब्दक्रम फार ठरीव असा नाही परंतु प्रथम क्रियापद, मग कर्ता आणि मग कर्म असा इतर सेमिटिक भाषांप्रमाणेच क्रम असतो. सर्व शब्दांवर विभक्तिप्रत्ययांची खूण असल्याने शब्द इकडेतिकडे करता येतात. 

 

धारूरकर, चिन्मय मालशे, मिलिंद

 

 हिब्रू साहित्य : हिब्रू साहित्य इ. स. पू. बाराव्या शतकापासून अखंडपणे निर्माण होत आहे आणि उत्खननातून उपलब्ध झालेल्या काही इष्टिका ग्रंथांचा विचार केला, तर हिब्रू साहित्यनिर्मितीचा हा काळ आणखी मागे नेता येईल. ह्या भाषेला इ. स. पू. दुसऱ्या शतकात फॅरिसींनी (एक प्राचीन ज्यू पंथ) आपल्या धार्मिक शिकवणुकीसाठी वापर करावयास आरंभ केल्यानंतर तिला एक वाङ्मयीन स्थान प्राप्त झाले. 

 

हिब्रू साहित्य म्हणजे ज्यूंचे साहित्य, असे समीकरण मांडता येणार नाही. ज्यूंनी ग्रीक, ॲरेमाइक, अरबी, यिद्दिश अशा अन्य भाषांतूनही लेखन केले आहे. ज्यूंनी ग्रीक भाषेत केलेले लेखन ख्रिस्ती परंपरेचा भाग झालेले आहे. 

 

प्राचीन हिब्रू साहित्याचा काळ सु. १२०० ते ५८६ इ. स. पू. असा स्थूलमानाने धरला जातो. ज्यूंच्या परागंदा अवस्थेपूर्वीचा हा काळ होय. इ. स. पू. २००० वर्षांपासून ज्यूंचे वास्तव्य पॅलेस्टाइन व आसपासच्या प्रदेशांत होते. ज्यूंचा प्राचीन इतिहास पॅलेस्टाइनच्या भूमीवर घडला. ज्यूंच्या धर्माचा इतिहास पाहिला, तर ज्यू हे एके काळी मूर्तिपूजक असावेत, असे ज्यूंचा एक प्रेषित ईझीक्येल (इ. स. पू. सहावे शतक) याच्या लेखनावरून दिसते. ज्यूंचे प्रार्थनामंदिर होते. खाल्डियन वंशाचा संस्थापक दुसरा राजा ⇨ नेबुकॅड्नेझर (इ. स. पू. का. ६०५–५६२) याने जेरूसलेमवरील स्वारीत हे मंदिर पाडून पकडलेल्या सर्व ज्यूंना बॅबिलनमध्ये नेले. त्यांपैकी अनेक ज्यू बॅबिलनमध्येच स्थायिक झाले. त्या काळात ज्यूंचे हिब्रू भाषेतील जे साहित्य उपलब्ध आहे, त्यांत बायबलच्या ‘जुन्या करारा ‘तील ३९ पैकी २० पुस्तके आहेत. गद्याआधी पद्यनिर्मिती झाली असण्याचा संभव आहे. बायबलमधील कविता समांतरवादाच्या तत्त्वावर आधारलेली होती. म्हणजे कवितेच्या एकेका कडव्याच्या दोन भागांत एकच कल्पना पुनरुक्तीने किंवा तिच्या वेगवेगळ्या पैलूंवर भर देऊन मांडायची. उदा., ‘त्याने त्यांच्या तोंडाने त्याची स्तुती केली आणि ते त्यांच्या जिभांनी त्याच्याशी खोटे बोलले’, ‘त्याने त्यांच्या नद्यांच्या पाण्याचे रक्तात रूपांतर केले त्यामुळे ते कोणालाही पिता आले नाही’ (स्तोत्रसंहिता अनुक्रमे ७८:३६ ७८:४४). तसेच लोकगीतेही होती. त्यांत सॉलोमनचे गीत, अंत्य-संस्कारगीते, सामे (पवित्र गीते पवित्र स्तोत्रे) ह्यांचा समावेश होता.


 

संरचना आणि भाषा ह्यांच्या दृष्टीने आरंभीचे गद्य पद्याच्या जवळच होते. खऱ्या अर्थाने ज्याला गद्य म्हणता येईल ते पेंटाट्यूक (‘ जुन्या करारा ‘तली पहिली पाच पुस्तके) मधले काही कायदे असावेत. यिर्मया (जर्मियाह- -जेरीमाइआ ही पर्यायी नावे) ह्या प्रेषिताने ‘जुन्या करारा ‘त केलेले लेखन आणि ड्यूटेरोनॉमी (पेंटाट्यूकमधले पाचवे पुस्तक) यांतील गद्य उच्च दर्जाचे आहे. ‘जुन्या करारा’तल्या या ऐतिहासिक पुस्तकांत काही संभाषणे आलेली आहेत. त्यांतून सर्वसामान्यांच्या संभाषणांचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न दिसतो. 

 

हिब्रू साहित्यातील त्यानंतरचा कालखंड (इ. स. पू. ५३८ ते इ. स. ७०) दुसऱ्या प्रार्थनामंदिराचा कालखंड म्हणून ओळखला जातो. थोर पर्शियन राजासायरस द ग्रेट (इ. स. पू. ५९०/५८०? – ५३०) याने बॅबिलन हे शहर जिंकले. त्याने ज्यू लोकांना त्यांच्या मायभूमीत परत जाण्याची परवानगी दिली. इराणी सम्राटांनी ज्यूंच्या येहोवा मंदिराच्या पुनर्बांधणीस साहाय्य केले. हेच दुसरे प्रार्थनामंदिर होय. बारा ज्यूटोळ्या एकत्र येऊन ज्यू राष्ट्राची निर्मिती झाली तथापि इ. स. ७० मध्ये रोमनांनी ज्यूडा व इझ्राएल ही राज्ये नष्ट करून त्यांचा अंतर्भाव रोमन साम्राज्यात केला. 

 

ह्या काळातील वाङ्मयनिर्मितीचा फक्त काही भागच बायबल च्या मूलस्रोतातला – कॅननमधला – आहे (देवाच्या विशेष प्रेरणेने लिहिलेली आणि मूळ धर्मतत्त्वे सांगणारी पुस्तके बायबलच्या मूलस्रोतात समाविष्ट केलेली आहेत) . ह्या लेखनातील बायबली हिब्रू भाषा कृत्रिम वाटावी अशी होती कारण लोकांची ती बोलभाषा राहिलेली नव्हती. तिची जागा ॲरेमाइक भाषेने आणि मिश्‍नाहिक हिब्रूने घेतलेली होती. ⇨ मृत समुद्र लेखां तली पुस्तके तसेच त्या काळातील इतर काही पुस्तके नव्या प्रकारच्या लेखनाचा प्रत्यय देतात. आध्यात्मिक प्रवचने, मिद्राश हे बायबल वरील भाष्य ह्यांचा ह्या लेखनात समावेश होतो. मृत समुद्र लेखां मध्ये आभारप्रदर्शनार्थ रचिलेल्या स्तोत्रांचा समावेश असून ही स्तोत्रे म्हणजे उत्कट आत्मनिष्ठ कविताच आहेत. बायबलच्या ‘जुन्या करारा ‘तील एझ्रा व डॅनिएल ही दोन पुस्तके आणि मृत समुद्र लेखां तील काही ग्रंथांची भाषा ॲरेमाइक भाषेच्या पूर्वरूपातली आहे. ह्या काळात हिब्रू भाषेतील बायबलच्या बऱ्याच भागांचे भाषांतर थोड्याशा उत्तरकालीन ॲरेमाइक भाषेत करण्यात आले. 

 

प्राचीन हिब्रू साहित्यात ज्यूंचे धर्मशास्त्र आणि त्यांचा नागरी कायदा ह्यांच्यासंबधीचे लेखनही महत्त्वाचे आहे. ह्या विषयांवरील बायबलच्या जुन्या कराराला पूरक असलेला धार्मिक ग्रंथ म्हणजेटॅलमुड (हिब्रू तलमूद) . त्यात अंतर्भूत असलेले लेखन इ. स. पू. २०० ते इ. स. सु. ५०० ह्या ७०० वर्षांच्या काळात झालेले आहे. 

 

बायबल चा ‘जुना करार’, टॅलमुड व तोरा हे तीन ग्रंथ ज्यू धर्माचे मुख्य आधारस्तंभ आहेत. सिनाई पर्वताभोवतालच्या एका सीमारेषेपली-कडे ⇨ मोझेस ने लोकांना त्यांनी करावयाचे ईश्वरी कार्य सांगितले होते. तेथेच त्यांना देवाच्या दहा आज्ञा प्राप्त झाल्या होत्या. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्या दशाज्ञांचा साक्षात आविष्कार करण्याचा करार त्यांनी केला. ह्या मूलभूत तत्त्वांवरच तोरा किंवा ज्यूंचा कायदा आधारलेला आहे. 

 

टॅलमुड ची पॅलेस्टाइन प्रत आणि बॅबिलोनियन प्रत ह्या दोन प्रतींपैकी बॅबिलोनियन प्रत ज्यू समाजात विशेष मान्यता पावलेली आहे. टॅलमुडच्या दोन्ही प्रतींत ‘मिश्‍नाह’ नावाचा एक भाग आहे. ‘मिश्‍नाह’ चा अर्थ ‘शिकवण’. हा ज्यूंचा मौखिक कायदा. राब्बी ज्यूडा (हा-नॅसी) ह्याने ह्या मौखिक कायद्याची व्यवस्थित मांडणी (कोडिफिकेशन) केली (इ. स. पू. सु. २००) . मिश्‍नाहमध्ये विषयवार सहा विभाग आहेत. ह्या सहा विभागांचे ६३ उपविभाग आहेत आणि हे उपविभागही ५२४ प्रकरणांत विभागलेले आहेत. मिश्‍नाहतली हिब्रू भाषा ‘मिश्‍नाइक हिब्रू’ म्हणून ओळखली जाते. ‘गेमारा’ हे मिश्‍नाहवरील विस्तृत भाष्य. मिश्‍नाह आणि गेमारा मिळून टॅलमुड होते. मिश्‍नाहची भाषा हिब्रू आणि गेमाराची भाषा हिब्रूमिश्रित ॲरेमाइक आहे. ‘गेमारा’ मध्ये अधूनमधून आढळणारे अवांतर लेखन ‘हग्गादा’ ह्या नावाने ओळखले जाते. 

 

वाङ्मयीन पुनरुज्जीवन : इ. स.च्या सहाव्या शतकात ज्यूंमधल्या काही गटांनीसिनॅगॉग मध्ये (ज्यू धर्मीयांचे प्रार्थनामंदिर) केवळ हिब्रू भाषेचा वापर केला जावा असा आग्रह धरला. हिब्रूचे पुनरुज्जीवन आधी पॅलेस्टाइनमध्ये सुरू झाले आणि नंतर ते पश्चिमेकडे पसरले. बॅबिलोनिया-मध्ये मात्र त्याचा प्रारंभ दहाव्या शतकापर्यंत झालेला नव्हता.

 

ह्या पुनरुज्जीवनाच्या काळात सिनॅगॉगमधून ⇨ शब्बाथ तसेच अन्य काही सण वा धर्मोत्सवांसाठी पूजेअर्चेच्या प्रसंगी काव्यरचना करायला काही खास व्यक्ती अधिकृतपणे नेमल्या जाऊ लागल्या. त्यांच्या काव्यरचनांना ‘पियूट्टिम’ असे म्हणत. बायबल, मिश्‍नाह आणि ॲरेमाइक भाषा ह्यांतील शब्द त्यांनी आपल्या रचनांसाठी वापरलेच तथापि हजारो नवे शब्दही घडविले. अनेक धार्मिक विधी आणि कायदे ह्यांच्या विस्तृत याद्याही त्यांत अंतर्भूत आहेत. आपल्या कविता रचताना अत्यंत सुविद्य असा श्रोतृवर्ग ह्या कवींनी गृहीत धरला. ह्या रचना करणाऱ्या विशेष उल्लेखनीय कवींची नावे सात आहेत. उदा., फिनिअस द प्रिस्ट, योसे बेन योसे, यान्नाई, एलिझार हा-कालीर. तथापि पॅलेस्टाइनमध्ये ते केव्हा आणि कुठे होऊन गेले, हे ज्ञात नाही. 

 

बायबली हिब्रूची पुनर्स्थापना वाङ्मयीन वापरासाठी ⇨ सादिआ बेन जोझफ ह्याने ९०० च्या सुमारास केली. तो व्याकरणकार आणि धार्मिक वादपटू होता. हिब्रूसाठी विशिष्ट अरबी वृत्तव्यवस्था बहुधा दुनाश बेन लाब्रात ह्याने ९००–१००० ह्या काळात केव्हा तरी योजिली. ‘पियूट्टिम’ काव्यरचनांचा घाट आरंभी धार्मिक कवितेसाठी ठेवला गेला आणि नवी वृत्ते केवळ लौकिक काव्यरचनांसाठी वापरली गेली. अरबी आदर्शांचे त्यांत बरेच अनुकरण होते. 


 

मध्ययुग : यूरोपमधील पॅलेस्टिनी परंपरा ८००–१३०० : हिब्रू साहित्याच्या पुनरुज्जीवनाचे परिणाम बायझंटिन साम्राज्यात दिसू लागले. सिसिली आणि द. इटलीमध्ये दहाव्या शतकापूर्वीच लौकिक साहित्याची निर्मिती होऊ लागली. दहाव्या शतकाच्या मध्याला कोलोनिमॉस ह्या उत्तर इटलीतल्या कुटुंबाने टॅलमुडच्या अभ्यासाला आणि पियूट्टिमना मेंझ (जर्मनी) येथे चालना दिली. गेरशोम बेन जूडा ह्याने यूरोपीय पियूट्टिमची एक वैशिष्ट्यपूर्ण शैली निर्माण केली. मेंझ अकादमीचा राशी हा सर्वश्रेष्ठ विद्यार्थी. त्याने बायबलवर तसेच बॅबिलोनियन टॅलमुड वर संपूर्ण भाष्य लिहिले. तो स्वतः एक चांगला कवी होता. 

 

⇨ धर्मयुद्धां च्या काळात ज्यूंचे लोंढे पूर्व यूरोपकडे वळले. जर्मन ज्यूंनी त्यांच्या सोबत यिद्दिश भाषा आणली. ज्यूंवर ओढवलेल्या आपत्तींची वर्णने नव्या काव्यमय गद्यशैलीत जर्मनीमध्ये लिहिली गेली. धार्मिक कविता आता ज्यूंच्या छळांचे इतिवृत्त बनले. ह्या छळकथांचे संग्रह सोळाव्या आणि सतराव्या शतकांत प्रसृत झाले Safer Hasidim (१५३८, इं. शी. ‘द बुक ऑफ द जस्ट’) आणि Ayn Shoym Mayse Bukh – (१६०२, इं. भा. मॅसाह बुक), ‘द बुक ऑफ द जस्ट’ हा संग्रह जूडा बेन सॅम्युएल (मृ.१२१७), ह्याच्या नावावर मोडतो. 

 

स्पॅनिश ज्यू मात्र मुस्लिम स्पेनमध्ये कॉर्दोव्हा येथील खिलाफतीच्या आधिपत्याखाली उत्कर्ष पावले. तिथे हसदाई इब्न शाप्रूत हा वझीर हिब्रू साहित्याचा पहिला थोर आश्रयदाता होता. त्याचा सचिव मेनाहेम बेन सारूक (मृ. सु. ९७०) ह्याने बायबल मधील शब्दांचा कोश तयार केला होता. पूर्वेकडून भाषाशास्त्रीय कल्पना घेऊन आलेल्या दुनाश बेन लाब्रात ह्याने ह्या शब्दकोशावर टीका केली होती. सॅम्युएल हा-नागीद हा ग्रॅनादाचा वझीर (९९०–१०५५) स्वतः कवी होता आणि त्याने स्वतःभोवती कवींचे एक वर्तुळ निर्माण केले होते.सॉलोमन बेन जुडाह (सु. १०२१– सु. १०५८) हा ह्या कविवर्तुळातील सर्वांतमहत्त्वाचा कवी. त्याचे पूर्ण नाव सॉलोमन बेन जुडाह इब्न गाबीरॉल.त्याच्या भक्तिपर कवितांतून प्रज्ञेबद्दलचे प्रेम आविष्कृत झालेले आहे.त्याने लौकिक कविताही लिहिली. मोझेस इब्न एझ्राचे (मृ. सु. ११३९) आयुष्य दुःखमय होते. आपल्या जीवनातील वेदना त्याने आपल्या कविते-तून मांडली.जूडाह हालेवी (सु. १०७५–सु.११४१) ह्या प्रतिभावान कवीने आपल्या कवितेतून अनेक विषय हाताळले तथापि त्याच्या समुद्रविषयक आणि ज्यू मातृभूमीबद्दलचे प्रेम व्यक्त करणाऱ्या कविता विशेष संस्मरणीय ठरल्या.अब्राहम बेन मेअर इब्न एझ्रा ह्याने लौकिक आणि धार्मिक अशी दोन्ही प्रकारची कविता लिहिली. देवावरची प्रगाढ श्रद्धा त्याच्या कवितेतून दिसते. विनोदाचा स्पर्श असलेला उपरोध तसेच त्याचे दुःख ही त्याच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. 

 

ह्याच काळात हिब्रू भाषेचे सौंदर्य प्रकट करण्याच्या दृष्टीने गद्याचा विकास झाला. जुडाह अल्-हारिझी, जोसेफ झाबारा ही नावे ह्या संदर्भात उल्लेखनीय आहेत. झाबाराचे ‘बुक ऑफ डिलाइट’ (इं. शी.) हे पुस्तक उल्लेखनीय आहे. स्पेनमधून ज्यूंची हकालपट्टी होईपर्यंत (१४९२) तेथे हिब्रूची वाङ्मयनिर्मिती होत होती. सादिआ बेन जोझफ ह्याने व्याकरण आणि कोशरचनातंत्रावर लिहिले. सॅम्युएल हा-नागीद हा व्याकरणकार होता आणि टॅलमुडचा व्यासंगी म्हणून त्याचा लौकिक होता. 

 

स्पेनमधून हिब्रूचा प्रभाव दक्षिण फ्रान्स आणि इटलीमध्ये आला. फ्रान्समध्ये बेझिअर्सचा अब्राहम (१२३०–१३००) आणि आयझॅक गोर्नी हे महत्त्वाचे कवी उदयाला आले. जोझफ कास्पी (१२८०?–१३४०) आणि लेव्ही बेन गेरशॉन ह्यांनी बायबल मधील पुस्तकांवर भाष्ये लिहिली. ज्यूंनी अरबी भाषेत लिहिलेल्या अनेक ग्रंथांची तिब्बॉन कुटुंबातील व्यक्तींनी हिब्रूत भाषांतरे केली. इटलीमधला इमॅन्युएल बेन सॉलोमन हा प्रसिद्ध कवी होता. सुनीत हा काव्यप्रकार त्याने हिब्रूत आणला. धार्मिक साहित्यात ज्यू लेखकांनी अनेक भक्तिपर रचना केल्या. 

 

जूडा इब्न कुरैश (सु. ९००) व आयझॅक इब्न बारून (सु. ११००) ह्यांनी तौलनिक भाषाशास्त्राची निर्मिती केली. जूडा हाय्यूज ह्याने हिब्रू व्याकरणाची पुनर्रचना केली. नॉर्बान डेव्हिड किम्ही (मृ. सु. १२३५) ह्याने व्याकरणाला दिलेली नवी व्याकरणीय व्यवस्था ख्रिस्ती मानवता-वाद्यांनी स्वीकारली आणि त्यांच्याकडून ती आधुनिक विद्वानांनी घेतली. पहिले परिपूर्ण हिब्रू व्याकरण-‘द बुक ऑफ द व्हेअरिगेटेड फ्लॉवर बेड्स’-(१८८६ इं. शी.) -इब्न यानाख (मृ. १०५०) याने लिहिले. उत्तर आफ्रिकेतील आयझाक इझ्राएली (दहावे शतक, उत्तरार्ध) ह्याचा अपवाद सोडला, तर मध्ययुगीन ज्यूंनी विज्ञानाला मौलिक स्वरूपाचे योगदान दिलेले दिसत नाही तथापि स्पॅनिश ज्यूंना विज्ञानाचे उत्तम शिक्षणमिळाले होते. बार्सेलोनाचा अब्राहम बार हिय्या (मृ. सु. ११३६) हा उत्तम गणिती होता. हिब्रू भाषेत त्याने गणित, खगोलशास्त्र आणि तत्त्वज्ञान ह्या विषयांवर ग्रंथलेखन केले. ११४८ मध्ये ज्यूंना मुस्लिम स्पेनमधून हाकलण्यात आले, तेव्हा ते लँगडॉक आणि प्रॉव्हॉन्स येथे गेले आणि तेथे त्यांनी विज्ञान व तत्त्वज्ञान ह्या विषयांवरील ग्रंथांची भाषांतरे केली. 

 

मोझेस मायमोनायडीझ (११३५–१२०४) ह्याच्या मूळ अरबी ग्रंथाचे हिब्रू भाषांतर १२०० मध्ये प्रसिद्ध झाले (इं. भा. द गाइड ऑफ द पर्प्लेक्स्ड १८५१–८५), ह्या ग्रंथात नव-प्लेटो मत आणि ॲरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान ह्यांतील तत्त्वे बायबली व राब्बीप्रणीत ईश्वर-शास्त्राला लावून दाखवली होती. त्यामुळे सनातन्यांच्या वर्तुळात मोठा प्रक्षोभ उसळला तथापि मायमोनायडीझच्या ग्रंथामुळे नव-प्लेटो मतवादी गूढवादाचा प्रभाव निर्माण झाला. त्याने काबालाचे रूप धारण केले. ईश्वर, मनुष्य आणि विश्वरचना ह्यांचे स्पष्टीकरण देणारा काबाला हा सिद्धान्त ठरला. त्यातूनच मोझेस दे लेऑन ह्याचा नेहरी- इं. शी. द बुक ऑफ स्प्लेंडर, हा ग्रंथ निर्माण झाला. मोशे हाय्यिम ल्यूझात्तो ह्या गूढवादी तत्त्वज्ञाने काव्यशास्त्रावर एक ग्रंथ लिहिला व तीन नाटकेही लिहिली. 


 

जर्मनीत होणाऱ्या छळाला कंटाळून अनेक निर्वासित पोलंडमध्ये आले. त्यांनी पूर्वी आलेल्या बायझंटिन उत्प्रवाशांसह स्वायत्तता असलेला ज्यू समाज निर्माण केला. ही संस्कृती म्हणजे एक नवनिर्मिती होती. पेंटाट्यूकचा (बायबल च्या ‘जुन्या करारा ‘ची पहिली पाच पुस्तके) अपवाद वगळता बायबल दुर्लक्षित केले गेले. उलट, आतापर्यंत केवळ विशेषज्ञांच्याच अभ्यासात असलेले बॅबिलोनियन टॅलमुड हाच बौद्धिक जीवनाचा पाया बनला. साहित्याच्या संदर्भात म्हणावयाचे, तर टॅलमुड वरील चर्चा (हिद्दूशिम) . मात्र ही चर्चा हिब्रू आणि ॲरेमाइक भाषांच्या व्याकरण-दृष्ट्या सदोष लेखनातून होत होती. कल्पनाप्रधान साहित्य फक्त यिद्दिशमध्ये निर्माण होत होते आणि तेही स्त्रिया आणि फार न शिकलेल्यांसाठी. ज्यूंची स्पेनमधून हकालपट्टी झाल्यानंतर सफाद हे स्पॅनिश यूरोपीय आणि पौर्वात्य ज्यूंचे नवे केंद्र बनले. तेथे हे सर्व ज्यू एकमेकांना भेटत. गूढवादी संप्रदाय कब्बाला येथे समृद्ध झाला. 

 

कॉसॅक बंडाचा (१६४८) पहिला फटका पोलंडमध्ये शांत आणि समृद्ध जीवन जगणाऱ्या ज्यूंना बसला. त्यांच्या कत्तली झाल्या. ह्या प्रसंगावर यॉम टॉव्ह लिपमान हेलर, ह्या राब्बीने एक दीर्घकाव्य लिहिले. इझ्राएल बेन एलीएझर (बेल शेम टॉव्ह ह्या नावाने प्रसिद्ध) ह्याने हेसिडिझमची शिकवण दिली. त्याच्याभोवती शिष्य जमा झाले. एलिएझरने त्यांना तन्मय होऊन ईश्वराशी संवाद साधण्याची शिकवण दिली ईश्वराच्या सर्वसाक्षित्वावरमन केंद्रित करावयास सांगितले. त्याने ज्यूंच्या धर्मतत्त्वांचा अव्हेर केला नाही तथापि जी भक्ती करायची, ती आध्यात्मिक उत्कटतेने करा, असे त्याचे म्हणणे होते. त्याची शिकवण मौखिक आणि यिद्दिशमध्ये होती परंतु त्याच्या शिष्यांनी ती साध्या आणि बोलभाषेचा ढंग असलेल्या हिब्रूत लिहून घेतली होती. ही शिकवण ते बोधकथांतून देत असल्यामुळे हिब्रू कथासाहित्याचा आरंभ तिथून झाला असावा. 

 

अठरावे आणि एकोणिसावे शतक : अठराव्या शतकात हेसिडिझम पूर्व यूरोपात वेगाने पसरला. अपवाद फक्त लिथ्युएनियाचा. तेथेएलायजा बेन सॉलोमन ह्याने हेसिडिझमला विशेष विरोध करण्याची भूमिका घेतली. राब्बींच्या वर्तुळातही हेसिडिझमला विरोध होता तथापि ज्यूंच्या जगातून हेसिडिझमचे उच्चाटन होऊ शकले नाही. हेसिडिझमने ज्यूंच्या पवित्र भूमीबद्दल उत्कट प्रेम निर्माण केले. 

 

बर्लिनमध्ये फ्रीड्रिख द ग्रेटच्या काळात काही बुद्धिमंत तरुणपोलंड आणि अन्य ठिकाणांहून आले. तेथे ते यूरोपीय ज्ञानोदयाच्या(एन्लायटन्मेंट) प्रतिनिधींना भेटले. त्यांतला नेप्थाली हर्ट्झ वेस्ली हा डॅनिश होता. त्याने हिब्रू भाषेवर ग्रंथ लिहिले. सॅम्युएल आरॉन रोमानेल्ली हा इटालियन होता. त्याने काही नाटके लिहिली. काही अन्य भाषेतील नाटकांची हिब्रू भाषांतरेही केली. अशा वातावरणातूनच हस्कालाचा उदय झाला. हस्काला ही एक प्रवृत्ती होती. हिब्रू भाषेबद्दल, तसेच मध्ययुगीन पश्चिमी ज्यू साहित्याबद्दल आदर बाळगणे, ही ह्या प्रवृत्तीची लक्षणीय वैशिष्ट्ये होती. ही प्रवृत्ती गॅलिशियामध्ये (ऑस्ट्रियन पोलंड) प्रविष्ट झाली. १७८२ मध्ये जर्मन सम्राट दुसरा जोसेफ ह्याच्या सहिष्णू धोरणामुळे ऑस्ट्रियन ज्यूंना दिलासा मिळाला होता. ⇨ मोझेस मेंडेल्सझोन ह्याने बर्लिनमध्ये ज्यूंच्या शैक्षणिक सुधारणांचा उपक्रम सुरू केला आणि बायबल च्या ‘जुन्या करारा ‘चा अनुवाद हिब्रू लिपीत जर्मन भाषेत केला. तसेच ‘द ग्लिनर’ (इं. शी.) हे हिब्रू भाषिक नियतकालिक काढले. ज्यू आणि जर्मन ह्यांच्यात सांस्कृतिक समावेशनाची प्रक्रिया सुरू व्हावी, ह्यासाठी आस्थेने प्रयत्न केले. नेप्थाली हर्ट्झ वेस्ली हाही मेंडेल्सझोनच्या प्रभावाखाली होता. त्याच्या ‘वर्ड्स ऑफ पीस अँड ट्रूथ’ (१७८२, इं.शी.) मध्ये ज्यूंनी जर्मन भाषेचा अभ्यास करावा, तसेच निसर्गविज्ञान, भूगोल, इतिहास ह्यांचाही उत्तम अभ्यास करावा असे मत मांडले. अर्थात बायबल आणि टॅलमुड ह्यांचाही पारंपरिक अभ्यास ज्यूंनी केला पाहिजे, अशीही त्याची धारणा होती तथापि अशा विचारांना सनातनी राब्बींकडून तीव्र विरोध झाला, तरीही त्याच्या विचारांचा यूरोपात प्रभाव पडलाच. 

 

एकोणिसाव्या शतकात हस्कालाचा परिणाम इटालो-हिब्रू परंपरेवर झाला. ‘शेदाल’ ह्या नावाने ओळखला जाणारा सॅम्युएल डेव्हिड ल्यूझात्तो (१८००–६५) ह्या हिब्रू साहित्यिकाने इटालियन भाषेतही लेखन केले. हा निबंधकार, भाषाशास्त्रज्ञ आणि कवी होता. ज्यू धर्म आणि इतिहास ह्यांकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोण भावनात्मक पण वैज्ञानिक होता. रशियन साम्राज्यात ज्ञानोदय खऱ्या अर्थाने सुरू झाला, तो युक्रेनमध्ये आयझॅक बाअर लेव्हिनसॉन ह्याच्यामुळे आणि लिथ्युएनियात मोर्डेकाइ आरॉन गिन्झबर्ग ह्याच्यामुळे. लेव्हिनसॉनने आपल्या ग्रंथांतून असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, की ज्यू धर्म हा ज्ञानविरोधी नाही त्याचा लौकिक संस्कृतीला विरोध नाही. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धाच्या आसपास अनेक हिब्रू साहित्यिक उदयाला आले. त्यांची स्वच्छंदतावादी प्रवृत्ती होती. ए. डी. लोबेनसॉन ह्याने उत्कट प्रेमगीते लिहिली. मिका जोसेफ ह्याने बायबलवर आधारित रोमान्स आणि चराचरेश्वरवादी कविता लिहिल्या. अब्राहम मापू (१८०८–६७) ह्याने ‘लव्ह ऑफ झीऑन’ (इं. शी.) ही कादंबरी लिहिली. बायबल मधील विषय व शब्दकळा त्याने वापरली. ‘द हिपोक्रिट’ (१८५७–६९ इं. शी.) ह्या त्याच्या कादंबरीत त्याने सामाजिक अपप्रवृत्तींवर हल्ला चढवला. गॅव्हरिलोव्ह्यिच चेर्निशेव्हस्की आणि दमित्री पिसारेव्ह ह्यांसारख्या लेखकांचा प्रभाव त्याच्यावर पडला आणि हस्कालाचा एक नवाच प्रकार त्याने सादर केला. रूढीप्रियतेचा आणि ज्ञानविरोधी वृत्तीचा तो विरोधक होता. हा नवा आक्रमक हस्काला लवकरच डाव्या विचारसरणीच्या रशियन लेखकांच्या प्रभावाखाली आला. उदा., ज्यूडा लेब गॉर्डन (१८३०–९२) हा लिथ्युएनियाचा. मापूप्रमाणेच ह्याने आरंभी बायबल मधील विषयांवर स्वच्छंदतावादी वळणाने लिहिले पण त्यानंतर १८७१ पासून पारंपरिक ज्यू जीवनाच्या अन्यायावर प्रकाश टाकणारे बॅलडही लिहिले. हस्कालाचा प्रमुख कवी म्हणून त्याचा लौकिक होता. त्याने कादंबऱ्या आणि निबंधही लिहिले. आपल्या लेखनातून त्याने बायबली हिब्रूची शैली वापरली. हिब्रू कवितेतही त्याने नवी शैली आणली. मोझेस लेब लीलीअनब्लूम हा आरंभी एक नेमस्त धर्मसुधारक होता पण पुढे सामाजिक प्रश्नांत तो व्यग्र झाला. ‘द ओपिनिअन्स ऑफ एलिशा बेन अबूया’ (१८७८, इं. शी.) ह्या ग्रंथात त्याने ज्यू समाजवादाचे प्रतिपादन केले. पेरेट्झ स्मोलेन्स्किन (१८४२–८५) ह्याला आरंभी हस्काला चळवळीचे आकर्षण होते पण पुढे त्याला असा अनुभव आला, की हस्कालामुळे ज्यूंमध्ये ज्यू धर्म फारसा राहिलेला नाही. त्याने ‘द डॉन( इं. शी.) हे मासिक काढले (१८६९). आपल्या निबंधांतून आणि ग्रंथांतून त्याने ज्यूंच्या भवितव्याबद्दलच्या आपल्या कल्पना मांडल्या. कर-ढे’शह लश-ऊरीज्ञहशळ हर-करूळा (३ खंड, १८६८–८५) ही त्याची उत्कृष्ट कादंबरी ‘द डॉन’ ही त्याच्या हिब्रू मासिकात क्रमशः प्रसिद्ध झाली. कादंबरीद्वारे लिहिलेले हे त्याचे आत्मचरित्रच आहे. ‘द इटर्नल पीपल’ (१८७२, इं.शी.) आणि ‘टाइम टू प्लँट’ (१८७३, इं. शी) हे त्याचे दोन ग्रंथ १८६८ नंतर प्रसिद्ध झाले. १८८१ मध्ये तो जेरूसलेममध्ये स्थायिक झाल्यानंतर जेथे हिब्रू भाषाच चालते, असे त्याचे घर पहिलेच ठरले. त्याच्या अविश्रांत परिश्रमांतून जगाच्या विविध भागांतून आलेल्या ज्यूंचा जो नवसमाज निर्माण झाला, त्याची भाषा म्हणून हिब्रू यथावकाश प्रस्थापित झाली. त्याने लिहिलेल्या कादंबऱ्यांतून ज्यूंचे विविधांगी दर्शन त्याने घडविले. ह्या कादंबऱ्यांतून पश्चिमीकरण झालेल्या ज्यूंबद्दल त्याने अव्हेराची भावना प्रकट केली. हिब्रू भाषेच्या संदर्भात त्याने केलेल्या कामामुळे ज्यूंची राष्ट्रीय भावना बळावली.


 

आधुनिक हिब्रू साहित्य : विसाव्या शतकातील आधुनिक हिब्रू साहित्याची जडणघडण करणारे प्रभावस्रोत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच कार्यरत झाले होते. हिब्रू पुस्तके वाचणारे पूर्व यूरोपातले ज्यू राष्ट्रवादाकडे वळले. ज्यू राष्ट्रीय भावनेबरोबरच हिब्रू बोलण्याच्या चळवळीमुळे हिब्रू वाचणारांचे वर्तुळ विस्तृत झाले. १८८६ मध्ये हिब्रू दैनिके निघू लागली. हिब्रू साहित्यिकांनी यूरोपीय भाषा आणि मध्ययुगीन भाषांतरे ह्यांच्यापासून बरेच काही घेतले. त्यामुळे हिब्रूला एक नवे रूप प्राप्त झाले. आधुनिक हिब्रूकडे झालेल्या संक्रमणाच्या प्रक्रियेत शालोम जेकब अब्रामोविट्श ह्याचे स्थान फार महत्त्वाचे आहे. मेंडेले मोखर सेफारिम ह्या टोपणनावाने त्याने लेखन केले. आपली पहिली कादंबरी लिहिल्यानंतर त्याची खात्री झाली, की बायबली हिब्रू आधुनिक विषयांसाठी सोयीस्कर नाही. त्यामुळे तो यिद्दिश भाषेकडे वळला होता तथापि १८८६ नंतर तो मुख्यतः हिब्रूमध्ये लेखन करू लागला. त्याची शैली आणि पारंपरिक मूल्यांना त्याने दिलेला पाठिंबा त्यामुळे वाचकांचा मोठा वर्ग त्याच्या लेखनाकडे आकर्षित झाला. ज्यूंचे घेट्टोमधले जीवन चित्रित करणाऱ्या त्याच्या कथांमुळे त्याला मिळालेली लोकप्रियता विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत टिकून राहिली. लेखकांचा एक गट पितामहतुल्य अशा मेंडेलेकडे लेखनाचा आदर्श म्हणून पाहू लागला. अशा लेखकांपैकी एक अशर गिन्झबर्ग (१८५६–१९२७) हा होय. १८८९ पासून ज्यू राष्ट्रवादाचे लौकिक तत्त्वज्ञान सांगणारे लेख आहाद हा’आम ह्या टोपणनावाने लिहू लागला. हर-डहळश्रेरह ह्या त्याच्या नियतकालिकाचा दर्जा फार वरचा होता. १९२१ पासून त्याने आपले उर्वरित आयुष्य आपल्या पत्रव्यवहाराचे संपादन करण्यात वेचले. ह्या पत्रव्यवहाराच्या रूपाने त्याच्या काळाचा एक मौल्यवान माहितीपटच उलगडलेला आहे. 

 

हाय्यिम नाहमान बियालिक (१८७३–१९३४) हा श्रेष्ठ हिब्रू कवी त्याचप्रमाणे निबंधकार, संपादक आणि मध्ययुगीन साहित्याचा संग्राहक. काही काळ हर-डहळश्रेरह ह्या नियतकालिकाचा तो वाङ्मयीन संपादक होता. आहाद हा’आम याचा त्याच्यावर प्रभाव होता. त्याच्या काव्य--लेखनाच्या पहिल्या दहा वर्षांत त्याने आपल्या कवितेतून प्राचीन ज्यू धर्माविषयीचे आपले उत्कट प्रेम व्यक्त केले. बायबल चा ‘जुना करार’ आणि टॅलमुड ह्यांच्याबद्दल त्याला ओढ होती तथापि हे सर्व यथावकाश नष्ट होणार असून आपल्या स्मृतिकातरतेचा एक भाग होईल, अशी जाणीव त्याला झाली. ह्यातून आलेल्या वेदनेबरोबरच ठिकठिकाणी विखुरलेले आपले ज्यू बांधव पाहता ज्यू राष्ट्र कसे उभे राहील, ह्याची चिंताही त्याला होती. त्या अस्वस्थ अवस्थेतच त्याने चळव लरी ही उत्कृष्ट कविता लिहिली. रशियाचा दुसरा झार निकोलस (कार. १८९४१९१७) ह्याच्या कारकीर्दीत ज्यूंच्या द्वेषापोटी किशिनेव्ह येथे ज्यूंची नियोजनपूर्वक कत्तल झाली.टॉलस्टॉय सारख्या थोर बुद्धिमंतांनाही ह्या कत्तलीने अस्वस्थ केले. त्यानंतर लिहिलेल्या त्याच्या दोन कवितांतून त्याचा तीव्र संताप त्याने व्यक्त केला. ‘इन द सिटी ऑफ स्लॉटर’ (१९०३, इं. शी.) ही त्यांतलीच एक कविता. बियालिकने कथा आणि निबंधही लिहिले आणि अन्य भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींची हिब्रूत भाषांतरे केली. उदा., ⇨ सरव्हँटीझ चे दॉन किखोते

 

सॉल चेर्निचोव्ह्स्कीने ज्यू परंपरांचा फारसा विचार केला नाही. त्याच्या कवितेत प्रेम, सौंदर्य असे विषय आले. आयझॅक लेब पेरेट्झ (१८५१–१९१५) ह्याने हिब्रू आणि यिद्दिश अशा दोन्ही भाषांत लिहिले. यूरोपीय – विशेषतः जर्मन आणि रशियन साहित्यातील – मुख्य साहित्यप्रवाहांचा त्याच्यावर प्रभाव पडला होता. त्याच्या कथांतून आणि नाटकांतून राष्ट्रीय आशयाबरोबरच सामाजिक दृष्टिकोनही आढळतो. डेव्हिड फ्रिशमान (१८६२–१९२२) ह्याने हिब्रू साहित्यात ज्यू आणि यूरोपीय अशा दोन परंपरांचे संश्लेषण केले. त्यामुळे यूरोपीय साहित्यातील प्रवृत्ती हिब्रू साहित्यात समाविष्ट झाल्या. १८८१ मध्ये रशियात ज्यूंची झालेली कत्तल, १९०५ आणि १९१७ मध्ये झालेल्या रशियन क्रांत्या अशा घटनांमुळे ज्यू हे पश्चिम यूरोपात आणि अमेरिकेत गेले होते. त्यामुळे पूर्व यूरोपातील हिब्रू साहित्यनिर्मितीवर विपरीत परिणाम झाला. सोव्हिएट संघराज्याने यथावकाश हिब्रू संस्कृतीवरच घाव घातला आणि इतर पूर्व यूरोपीय देशांतही ती संस्कृती र्‍हास पावू लागली. 

 

पहिले महायुद्ध संपल्यानंतर पॅलेस्टाइनमध्ये राष्ट्रगृहाची (नॅशनल होम) पुनर्बांधणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याला बाल्फोर जाहीरनाम्याची पार्श्वभूमी होती. लॉर्ड आर्थर जेम्स बाल्फोर (१८४०–१९३०) ह्या तत्कालीन ब्रिटिश परराष्ट्र मंत्र्याने पॅलेस्टाइनमध्ये ‘ज्यू राष्ट्रगृह’ निर्माण करण्यास संमती दर्शविली होती. शिवाय यूरोपात ज्यूंची आर्थिक स्थितीही बिकट झालेली होती. त्यामुळे अनेक ज्यू पॅलेस्टाइनकडे वळले. काही त्याआधीही आले होते. त्यांत अनेक हिब्रू साहित्यिकही होते. जोसेफ हाय्यिम ब्रेनर (१८८१–१९२१) हा १९०८ मध्ये पॅलेस्टाइनमध्ये स्थायिक झाला. घेट्टोमध्ये तो राहिला होता. तेथील जीवन त्याने पाहिले होते. रशियन सैन्यात त्याने नोकरी केली होती पण १९०५ मध्ये तो लंडनला पळाला. तेथे ‘द अवेकनर’ (इं. शी.) ह्या नियतकालिकाचे संपादन त्याने केले. पुढे तो ज्यू समाजवादी चळवळीचा अनुयायी झाला तथापि त्या चळवळीचा जहालपणा त्याला मानवला नाही. मनात खोल रुजलेली ज्यू धर्मभावना आणि हिब्रू भाषेचे प्रेम ह्यांमुळे तो ज्यू राष्ट्रवादी बनला. १९२१ मध्ये अरबांच्या हल्ल्यात त्याला मृत्यू आला. त्याच्या कादंबऱ्यांतून त्याच्या वादळी जीवनाचे पडसाद उमट-लेले आहेत. अशर बाराश (१८८९–१९५२) हा कथाकार आणि कादंबरीकार. त्याने पॅलेस्टाइनमधल्या ज्यूंच्या आरंभीच्या संघर्षांचे वर्णन आपल्या साहित्यातून सुरुवातीस केले. त्याच्या पुढील काळातल्या कथा-कादंबऱ्यांतून त्याने इझ्राएलमधील जीवनाचे चित्रण साध्या, वास्तववादी शैलीत केले. १८८८ मध्ये जन्मलेल्या श्मुएल योसेफ आग्नोन ह्या कथा-कादंबरीकाराला १९६६ सालचा साहित्याचा नोबेल पुरस्कार ⇨ नेली झाक्स सोबत देण्यात आला. हा सन्मान मिळविणारा तो पहिला इझ्राएली होय. १९१० मध्ये तो पॅलेस्टाइनमध्ये आला. ठिकठिकाणी विखुरलेल्या पूर्व यूरोपीय ज्यूंचे जीवन त्याने आपल्या साहित्यातून चित्रित केले. लोककथांचाही त्याने उपयोग करून घेतला. पारंपरिक हिब्रू साहित्य आणि आधुनिक यूरोपीय साहित्य ह्यांच्यातील अंतर साधणारा सेतू म्हणून त्याचा गौरव केला जातो. द ब्रायडल कॅनॉपी (१९२२, इं. भा. १९३७) आणि ए गेस्ट फॉर द नाइट (१९४५, इं. भा. १९६८) ह्या त्याच्या कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय आहेत. 

 

पॅलेस्टाइनमध्ये आलेल्या साहित्यिकांत आयझॅक लॅमडन, यूरी झ्वी ग्रीनबर्ग, अब्राहम श्‍लॉन्स्की आणि सायमन हाल्किन ह्यांचा समावेश होतो. लॅमडनने चरीरवर हे राष्ट्रीय महाकाव्य लिहिले. प्राचीन ज्यू वीर आणि पॅलेस्टाइनमध्ये आपले ज्यू राष्ट्र उभारण्यात गुंतलेले आपले बांधव ह्यांच्यातला दुवा ह्या महाकाव्याने सांधला. यूरी झ्वी ग्रीनबर्ग ह्याने राजकीय स्वरूपाची कविता लिहिली. मुक्तछंदाचा तो पुरस्कर्ता होता. अब्राहम श्‍लॉन्स्की हा प्रतीकवादी प्रणालीचा प्रणेता असून अनेक पाश्चात्य लेखकांचे वाङ्मय त्याने हिब्रूत आणले. राचेलने (राचेल ब्लूस्टाइन) अत्यंत उत्कट, आत्मपर कविता लिहिली.


 

इझ्राएली साहित्य : विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इझ्राएल-मध्ये हिब्रू भाषेला राष्ट्रभाषेचे अधिकृत स्थान लाभले. तेथील साहित्य मात्र मुख्यतः तत्कालीन पश्चिम यूरोपीय आणि अमेरिकन धर्तीवर होते. जगभरातून ज्यू तेथे आले होते. त्यामुळे तेथील लोकसंस्कृतीच्या भागात सांस्कृतिक विविधता अपिरहार्यपणे आलेली होती. कथा-कादंबऱ्यांतून अशा बाहेरून इझ्राएलमध्ये आलेल्या लोकांचे जीवन हे ललित साहित्याचे मुख्य विषय झाले. कविता विकसली परंतु नाट्यसाहित्याची वाढ आरंभी काहीशी उशिराच सुरू झाली. ग्रीनबर्गच्या ‘स्ट्रीट्स ऑफ द रिव्हर’ (१९५१, इं. शी.) मध्ये ज्यूंची विटंबना, त्यांच्या झालेल्या कत्तली ह्यांचे रूपांतर हौतात्म्याच्या अभिमानात कसे झाले, त्याची प्रक्रिया मांडलेली आहे. बिट्विन द फायर अँड सॅल्व्हेशन (१९५७, इं. भा.) ह्या आपल्या दीर्घ नाट्यात्म कवितेत आरॉन झेटलिनने यूरोपातील ज्यूंच्या हत्याकांडाचे दर्शन घडविले आणि आपत्ती व मुक्तता ह्यांच्यातील नातेसंबंध शोधण्याचा प्रयत्न केला. इझ्राएलमध्ये जे बाहेरून आलेले नव्हते, त्या साहित्यिकांनी किबूट्झ, भूमिगत जीवन आणि १९४८-४९ चे युद्ध ह्या काळातील त्यांच्या स्थितीबद्दल लिहिले. मोशे शमीर हा ह्या पिढीचा प्रमुख प्रतिनिधी. समूहकेंद्रित समाजात राहणाऱ्या व्यक्तींच्या संवेदनशीलतेचा शोध घेण्याचा प्रयत्न त्याने केला. इझ्राएल ह्या राष्ट्राची स्थापना झाली, तरी व्यक्तींच्या मनातील चिंतेची भावना कमी झालेली नव्हती. सामूहिक ध्येयांपाशी जे पोचू शकत नव्हते, अशा लेखकांच्या साहित्यात वैफल्य, संभ्रम, दूरत्व असे विषय मुख्यत्वेकरून येत होते. ह्या आणि ह्यानंतरच्या काही दशकांतील कवितेेचे प्रतिनिधित्व ज्यांनी केले, त्या येहुदा आमिचा आणि हाइम गाउरी ह्यांचा भरही सामाजिक एकत्वाचा भंग होण्यावर दिसतो. इतिहासाची आणि आध्यात्मिक ध्येयसिद्धीची हरवलेली जाणीव ते प्रकट करतात. आहारॉन मेग्गेडची द लिव्हिंग ऑन द डेड (१९६५, इं. भा.) ही कादंबरीही ह्या संदर्भात उल्लेखनीय ठरते. जर्मनीत झालेल्या ज्यूंच्या भयानक हत्याकांडाच्या स्मृतींनी आहारॉन ॲपलफेल्ड ह्याची भावकाव्यात्म निर्मिती झपाटलेली आहे. जसे जमेल तसे पळून जाणे किंवा लपून राहणे हे ज्यूंच्या वाट्याला आले होते. ॲपलफेल्डच्या आरंभीच्या कथांमध्ये असे प्रसंग अनेकदा दाखवलेले आहेत. बाडेनहाइम (१९३९ प्रकाशित १९७५) ह्या साहित्य-कृतीत ज्यूंच्या भयानक हत्याकांडाच्या भयसूचक भविष्याचे वातावरण एका ऑस्ट्रियन विश्रामस्थानातील ज्यूंच्या एका गटाला कसे जाणवले, त्याचे वेधक चित्रण केलेले आहे. माणसांची सामाजिकता आणि त्यांची चैतन्यशीलता ह्यांचे झालेले विघटन त्याच्या द एज ऑफ वंडर्स (१९७८, इं. भा.) ह्या कादंबरीत त्याने दाखविलेले आहे. अब्राहम बी. येहोशुआ ह्याच्या कथांतील निवेदकाचा सूर दूरस्थ, कोरडा आहे. त्याच्या कथांतील माणसांच्या भावना वाहून जाऊन त्यांची मने शुष्क झालेली आहेत. कधीकधी त्यांच्यापैकी कुणाच्या तरी भावना थोड्याफार प्रकट होतात आणि त्या निमित्ताने एखाद्या व्यक्तिरेखेतील जिवंत माणूसपण प्रकटते. द लव्हर (१९७६, इं. भा.) आणि ए लेट डिव्होर्स (१९८२, इं. भा.) मध्ये येहोशुआ त्यावेळच्या चालू पिढीचे तत्त्वज्ञान आणि ज्यू राष्ट्रवादाच्या आधारस्तंभांची विचारप्रणाली ह्यांच्यातील संघर्षाच्या स्वरूपाचा शोधघेतो. व्यक्तिगत वैफल्य आणि धार्मिक दर्शन (व्हिजन) हे कादंबरीकार पिनहास सादेह ह्याच्या कादंबऱ्यांचे विषय. यिट्झहाक ओर्पाझच्या कादंबऱ्यांत मानसशास्त्रीय दृष्टिकोण प्रकट होतो. उदा., ‘वन मॅन्स हाउस’ (१९७५, इं. शी.). योराम कानियुक ह्याने नाझी अत्याचारांना इझ्राएलींचा प्रतिसाद द लास्ट ज्यू (१९८१, इं. भा.) मध्ये सादर केला आहे. 

 

यिट्झहाक बेन नेर ह्याच्या कथांतून ग्रामीण आणि नागरी समाजाचे वास्तववादी चित्रण आहे. उदा., ‘ए रस्टिक सनसेट’ (१९७६, इं. शी.) आणि ‘ए डिस्टंट लँड’ (१९८१, इं. शी.). अन्य काही उल्लेखनीय इझ्राएली लेखक असे : कादंबरीकार याकोेव्ह शाबताई ह्याची पास्ट कंटिन्यूअस (१९७७, इं. भा.) ही कादंबरी कुटुंबसंस्था आणि समाज ह्यांच्या संदर्भात आवाहक आहे. ॲमॉस ओझ ह्याच्या लेखनात एका सामर्थ्यवान आणि आदिम शक्तीने वेढलेल्या किबूट्झचे चित्रण येते. आमालिया काहाना-कारमॉन ह्याने आपल्या लेखनात संज्ञाप्रवाहाचा उपयोग केला आहे. 

 

संदर्भ : 1. Abramson, Glenda, Modern Hebrew Drama, 1979.

           2. Halkin, Abraham, Ed. Zion in Jewish Literature, 1988.

           3. Halkin, Simon, Modern Hebrew Literature from the Enlightenment to the Birth of the State of Israel : Trends and Values, New Ed. 1970.

           4. Klausner, Joseph, A History of Modern Hebrew Literature 17881930, 1932, reprinted 1972.

           5. Millgram, Abraham E. An Anthology of Medieval Hebrew Literature, 1982.

           6. Waxman, Meyer, A History of Jewish Literature, 5 Vols. 2nd Ed. 1938–60. 

कुलकर्णी, अ. र.