सिंहली भाषा : सिंहली ही इंडो-यूरोपीय भाषाकुलातील इंडो-आर्यन वा इंडिक ह्या उपकुलातील भाषा असून ती श्रीलंकेतील सिंहली वंशाच्या लोकांची भाषा आहे. श्रीलंकेतील सु. दीड कोटी लोकांची ही मातृभाषा आहे, तर आणखी २० ते ३० लाख सिंहलीतर लोकही तिचा वापर करतात. श्रीलंकेची ती अधिकृत राष्ट्रीय व शासकीय भाषा आहे. मालदीव आणि मिनिकॉय (लक्षद्वीप) ह्या बेटांवर बोलल्या जाणाऱ्या ‘धिवेही’ वा ‘दिवेही’ ह्या भाषेशी सिंहली भाषेचे असणारे साम्य लक्षणीय आहे. या भाषेचे मुळातील नाव ‘हेल’ वा ‘हेलभासा’ होते, असे मानले जाते. ‘सिंहल’ हा शब्द संस्कृत ‘सिंह’ या शब्दापासून आलेला आहे आणि त्याविषयी काही पारंपरिक दंतकथाही आहेत.

सिंहली भाषेची सिंहली लिपी ही ब्राह्मी या प्राचीन लिपीपासून निर्माण झालेली आहे मात्र पुढे या लिपीमध्ये अनेक नव्या अक्षरांची भर पडून ती विकसित झाली. संस्कृत आणि पाली या भाषांतून उसनवार झालेल्या शब्दांच्या लेखनासाठी काही नवी अक्षरेही तयार झाली. या लिपीमध्ये आज एकूण ५४ अक्षरचिन्हे आहेत. त्यांतील १८ स्वरचिन्हे तर ३६ व्यंजनचिन्हे आहेत मात्र सर्वसामान्य बोली वापरातील भाषेसाठी १२ स्वर आणि २४ व्यंजने अशी ३६ चिन्हेच पुरेशी आहेत. इतर चिन्हांनी दर्शविलेले ध्वनी विकासप्रकियेमध्ये नाहीसे झालेले आहेत. सिंहली लिपी ही मूलत: ‘आबुगिडा’ पद्घतीची आहे. म्हणजे या लिपीत स्वर आणि व्यंजनांसाठी स्वतंत्र अक्षरे असली, तरी व्यंजनांबरोबर येताना स्वर हे व्यंजनांवरच काना, मात्रा, इ-कार, उ-कार इत्यादींच्या खुणा करुन दर्शविले जातात. श्रीलंकेमध्ये संस्कृत आणि पाली या भाषांच्या लेखनासाठी सिंहली लिपीच वापरली जाते.

ऐतिहासिकदृष्ट्या श्रीलंकेचे मूळ रहिवासी प्रोटो-ऑस्ट्रोलॉइड वंशसमूहातील आदिवासी टोळ्या होत्या. इ. स. पू. पाचव्या शतकामध्ये पूर्व भारतामधून – विशेषतः बंगालमधून (म्हणजे त्यावेळच्या कलिंग आणि मगध देशांतून) – आलेल्या लोकांनी श्रीलंकेच्या भूप्रदेशात वसाहती केल्या आणि तेथील जमातींशी त्यांचा संकर होऊन त्यातून एक नवा देश निर्माण झाला. त्यामुळे सिंहली भाषेमध्ये प्राकृत भाषेचे (विशेषतः पूर्व प्रांतातील) काही घटक आढळतात मात्र एक उल्लेखनीय बाब म्हणजे पूर्व प्रांतातील प्राकृतमध्ये ‘व’ या ध्वनीचे परिवर्तन ‘ब’ मध्ये होते. सिंहलीमध्ये ते झालेले आढळत नाही. बहुधा पूर्व व पश्चिम प्राकृत या भाषा वेगळ्या होण्याआधीच सिंहली भाषा आकाराला आली असावी. त्याचप्रमाणे मूळ रहिवाशांच्या वेद्दा भाषेमधील काही शब्द आजही या भाषेत आढळून येतात. तेव्हा सिंहली भाषा संस्कृतोद्‌भव मानली आणि तिच्यावर पूर्व प्रांतामधील प्राकृतचा बराच प्रभाव असला, तरी तिच्यात संकरित घटक आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.

सिंहली भाषेच्या ऐतिहासिक विकासाचे चार टप्पे मानले जातात. पहिला इ. स. पू. पाचवे शतक ते इ. स. तिसरे शतक हा ‘सिंहली -प्राकृत’ टप्पा. दुसरा इ. स. तिसरे ते सातवे शतक हा ‘आदि-सिंहली’ टप्पा. तिसरा इ. स. सातवे ते बारावे शतक हा ‘मध्ययुगीन सिंहली’ चा टप्पा तर बाराव्या शतकापासून पुढे चौथा ‘आधुनिक सिंहली’ भाषेचा टप्पा.

श्रीलंका या देशामध्ये प्रामुख्याने सिंहली आणि तमिळ वंशांच्या लोकांचे वास्तव्य आहे. १८०२–१९४८ या काळात या देशावर ब्रिटिश अंमल होता व १९७२ पर्यंत हा देश सिलोन या नावाने ओळखला जात असे. सिंहली भाषेच्या आणि श्रीलंका या देशाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे इंग्रजांचा अंमल १९४८ मध्ये संपल्यानंतर श्रीलंकेत १९५८ मध्ये इंग्रजी भाषेऐवजी सिंहली भाषेला शासकीय भाषेचा दर्जा देण्यात आला. यातून तमिळ अल्पसंख्याकांच्या धुमसणाऱ्या असंतोषाचा भडका उडाला. सिंहली बहुसंख्याक आपली भाषा, संस्कृती आणि बौद्घ धर्म आपल्यावर जबरदस्तीने लादत आहेत अशी भावना निर्माण होऊन त्यातून हिंसक चळवळी निर्माण झाल्या. १९८३ पासून २००९ पर्यंत हा देश या हिंसक चळवळींनी ढवळून निघालेला होता.

सिंहलीची वाक्यरचना शब्दक्रमाधिष्ठित असून कर्ता-कर्म-क्रियापद या क्रमाने घटक येतात. औपचारिक लेखी सिंहली आणि सर्वसामान्य अनौपचारिक व्यवहारामधील बोली सिंहली हा भेद आधुनिक सिंहलीमध्ये स्पष्टपणे जाणवतो. अनौपचारिक बोलीमध्ये क्रियापदाला पुरुष, वचन आणि लिंगाचे विकार होत नाहीत, तर औपचारिक लेखी भाषेमध्ये ते होतात.

सिंहलीचे मूळ इंडो-आर्यनमध्ये असले, तरी आधुनिक सिंहलीवर द्राविडी भाषांचा – आणि विशेषतः तमिळ भाषेचा – परिणाम अनेक पातळ्यांवर आढळतो. श्वास (ॲस्पिरिटेड) ध्वनींचे नाहीसे होणे, डाव्या बाजूला विस्तारित होणारे वाक्यघटक (लेफ्ट ब्रांचिंग) यांसारख्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करता येईल. डच, पोर्तुगीज आणि इंग्लिश या भाषांमधूनही काही शब्दांची उसनवारी सिंहलीमध्ये झालेली आढळते.

मालशे, मिलिंद