पुश्तू साहित्य : पुश्तू भाषेतील सर्वप्राचीन उपलब्ध साहित्य आठव्या शतकापासूनचे आहे. आठवे ते पंधरावे शतक सोळावे ते सतरावे शतक अठरावे शतक ते एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध आणि एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धानंतरचा काळ, असे पुश्तू साहित्येतिहासाचे स्थूलमानाने चार कालखंड मानण्यात येतात. राजकीय दृष्ट्या पहिला कालखंड हा सुरी, घोरी आणि लोदी ह्या राजघराण्यांचा दुसरा बाबर आणि त्याचे वंशज ह्यांचा तिसरा हौतक आणि सद्दोजाई ह्या राजघराण्यांचा आणि चवथा मुहम्मद जईच्या काळापासून आजवरचा. अफगाणिस्तानाप्रमाणेच पाकिस्तानातील वायव्य सरहद्द प्रांत हेही पुश्तू साहित्यनिर्मितीचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

आठवे ते पंधरावे शतक : पुश्तू साहित्यातील सर्वप्राचीन साहित्यकृती म्हणजे जहान पेहलवान अमीर करोड ह्याने रचिलेले एक महाकाव्य (इ.स. ७५०) होय. अमीर करोडने शौर्याची शर्थ करून घोर प्रांतावर ताबा मिळवला आणि त्या प्रांताचा अमीर म्हणून स्वतःची द्वाही फिरवली. ह्या विजयानंतर त्याने रचिलेले हे महाकाव्य. ह्या

महाकाव्यात त्याने स्वतःची बरीच स्तुती केलेली आहे. शेख बैटनी किंवा बेटबाबा (८८०–९८०) ह्या धार्मिक आणि संतप्रवृत्तीच्या कवीने रचिलेली काव्ये वैदिक सूक्तांच्या शैलीचे स्मरण करून देतात. ईश्वराच्या सर्वश्रेष्ठत्वाचा उद्‌घोष त्याने आपल्या काव्यांतून केला निसर्गाची स्तुतिस्तोत्रे गायिली. शेख असद (मृ. १००५) ह्या कवीने गझनीच्या महमुदाच्या मृत्यूनंतर त्या प्रसंगाला अनुलक्षून लिहिलेले एक शोककाव्य उल्लेखनीय आहे. पुश्तूतील श्रेष्ठ काव्यांत त्याची गणना केली जाते. घियासुद्दीन घोरी ह्याच्या स्तुत्यर्थ तायमनी ह्याने केलेले एक दीर्घकाव्य उपलब्ध आहे. पुश्तूमधील ही पहिली मस्नवी मानली जाते. बाबा हौतक (१२२१–१३२०) ह्याच्या स्फूर्तिदायक काव्यांनी पख्तुनांच्या मुघलांबरोबर झालेल्या लढायांना फार मोठी प्रेरणा दिली. राबीआ (दहावे शतक) आणि जरगुना (पंधरावे शतक) ह्या दोन कवयित्रींचा उल्लेख आवश्यक आहे. रूबाईयात-ए बलखी हा राबीआचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. जरगुना ही एक व्यासंगी स्त्री होती. शेख सादी ह्या फार्सी कवीच्या बोसतान ह्या नीतिकाव्याचा पुश्तू पद्यानुवाद तिने केलेला आहे. ह्या कालखंडातील गद्यनिर्मितीचा बराचसा भाग आज अनुपलब्धच आहे. जे उपलब्ध आहे, त्यात इतिहासलेखन प्राधान्याने आहे. तझकरतउल् अवलिया हा सुलेमान माकूकृत (बारावे शतक) ग्रंथ या संदर्भात उल्लेखनीय. पुश्तू संत आणि कवी ह्यांची चरित्रे त्यात वर्णिलेली आहेत. ह्या ग्रंथाच्या निर्मितीसाठी सुलेमान माकूने पख्तूनभूमीत ठिकठिकाणी भ्रमंती करून बहुमोल माहिती गोळा केली होती. पुश्तूमधील ही पहिली उपलब्ध गद्यकृती होय. शेख कटा (चवदावे शतक) हा आणखी एक उल्लेखनीय इतिहासकार. लरगनी पुखताना ह्या त्याच्या इतिहासग्रंथातून पुश्तू कवींची, तसेच प्रसिद्ध पख्तुनी व्यक्तींची महत्त्वपूर्ण माहिती मिळते. दा शेख मिली दफतर ह्या त्याच्या अन्य एका ग्रंथात त्याने काही तत्कालीन घटनांचे वर्णन केले आहे. खान जहानखान लोदी (मृ. १४८१) ह्याच्या मातुल अफगान ह्या ग्रंथात भारतातील पख्तुनी राजांची माहिती आलेली आहे.

सोळावे ते सतरावे शतक : ह्या कालखंडातील उल्लेखनीय साहित्यिकांत मियाँ रोश्वान किंवा बायजीद (१५१२–७४), नेकबख्ता (सोळावे शतक), शेख बस्तान बंडेस (सोळावे शतक), अलायार अलकोजी (सोळावे शतक) ह्यांचा समावेश होतो. बायजीदने खैरडल ब्यान ह्या आपल्या ग्रंथात मुस्लिम धर्म आणि कायदा ह्यांची चर्चा केली आहे. नेकबख्ता ही कवयित्री. ईश्वरस्तुतिपर अशी उत्कट काव्यरचना तिने केली आहे. शेख बस्तान बंडेस ह्याने बसतार्‌उल अवलिया ह्या ग्रंथात काही संतांची जीवने आणि त्यांचे कार्य वर्णिले आहे. अलायार अलकोजीच्या तुइफाइ सालेह ह्या ग्रंथात त्याचा गुरू शेख सालेह अल्काझी आणि अन्य काही पुश्तू कवींची चरित्रे अंतर्भूत आहेत. खुशहलखान खतक (१६०२–८०) हा ह्या कालखंडातील सर्वश्रेष्ठ कवी. मोगल साम्राज्याच्या जोखडाखालून पठाणांना मुक्त करण्यासाठी त्याने आपले आयुष्य वेचले आपल्या काव्यरचनेने त्याने पख्तुनांमध्ये देशभक्तीची भावना चेतवली. तो जसा कवी तसाच थोर योद्धाही होता. औरंगजेबाविषयीचा कडवा तिरस्कार त्याच्या काव्यातून प्रत्ययास येतो. त्याच्या काही कविता सुफी तत्त्वज्ञानाच्या प्रभावातून लिहिल्या गेल्या आहेत. त्याच्या काही कवितांचा इंग्रजी अनुवाद यूनेस्कोतर्फे प्रकाशित झालेला आहे. अशरफखान (१६२४–८५) हा खुशहलखानाचा पुत्रही आपल्या पित्याप्रमाणेच कवी, योद्धा आणि देशभक्त होता. मुघलांच्या कैदेतच त्याला मरण आले. मातृभूमीच्या वियोगाचे दुःख त्याने आपल्या अनेक कवितांतून व्यक्तविले आहे. रखमानबाबा (१६२२–९८) हा एक थोर सुफी कवी. सर्व चराचराचा मूलस्त्रोत प्रेम हाच आहे, अशी श्रद्धा त्याने त्याच्या कवितेत पुन्हा पुन्हा व्यक्त केली आहे.

ह्या कालखंडात अनेक पुश्तू आणि फार्सी ग्रंथांची भाषांतरे झाली. ह्या भाषांतरांनी पुश्तू गद्याच्या विकासाला महत्त्वाचा हातभार लावला.

अठरावे शतक ते एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध : ह्या कालखंडात महंमद हौतक (१६६४ – ?) ह्याने रचिलेला पटाखजाना हा ग्रंथ पुश्तू साहित्येतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. अनेक पुश्तू कवींची माहिती तसेच त्यांच्या काही कविता ह्या ग्रंथात अंतर्भूत आहेत. नाझ आणि झैनबी ह्या दोन उल्ल्खनीय कवयित्री. नाझने रचिलेल्या कवितांची संख्या सु. दोन हजार इतकी आहे. शाह महमूद ह्या आपल्या भावाच्या निधनावर झैनबीने लिहिलेली विलापिका प्रसिद्ध आहे. अफजलखान खतक (मृ. १७६३) – हा खुशहलखान खतक ह्याचा नातू– ह्याने लिहिलेला तारीख मुरसा हा एक महत्त्वाचा इतिहासग्रंथ. रोहिलखंडाचा सत्ताधीश हाफिज रहमतखान (मृ.१७६८) हा स्वतः एक लेखक, कवी आणि विद्वान होता. त्याचा पुत्र नबाब माबतखान (मृ.१८१०) ह्याने पुश्तू व्याकरणावर लिहिलेला रियाजउल्याबत हा ग्रंथ उल्लेखनीय आहे. माबतखानाचा संस्कृत भाषेचा व्यासंगही मोठा होता. हाफीज अल्पुरी (अठरावे शतक) ह्याच्या कवितेत सुफी तत्त्वज्ञान, धर्मशील जीवन आदी विषय आले आहेत.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धानंतर : ह्या काळात नैतिक-धार्मिक विषयांवर लिहिणारे काही लेखक होऊन गेले. त्यांत अबूल मजीद ककर व रसूल साद ह्यांचा अंतर्भाव होतो. नुरुद्दीन हा पेशावरनजीक राहणारा. युद्धे, इतिहासकथा, प्रेमकथा ह्यांवर आधारित अशी कथाकाव्ये त्याने लिहिली. तवक्कल ह्याने सुंदर गझला आणि देशभक्तिपर गीते लिहिली. प्रेमाच्या वेदना त्याने प्रत्ययकारीपणे व्यक्तविल्या आहेत. मिरा ह्या गायकाची गीते जनसामान्यांच्या ओठांवर खेळत होती. सैद कमाल ककर ह्यानेही उत्कट प्रेमगीते लिहिली. गुल्शन अश्क हा त्याच्या कवितांचा संग्रह. गुलाम महमद पापलझई ह्याने विख्यात उर्दू कवी हाली ह्याच्या मद्दो-जजरे-इस्लाम (इस्लामचा उत्कर्ष व ऱ्हास) ह्या ग्रंथाचा पुश्तू अनुवाद केला ह्या ग्रंथावर अभ्यासपूर्ण भाष्यही लिहिले. अहमद गुल हा रहमानबाबाच्या संप्रदायातला. नाजूक भावनांचा विलोभनीय आविष्कार हे त्याचे लक्षणीय वैशिष्ट्य. त्याच्या काव्यसंग्रहास काबूलचा सत्ताधीश अमीर अबदुर रहमान ह्याने पारितोषिक दिले होते. अब्दुल ककर हा एक सुफी विद्वान. तहजीब उलवाजिबात हा त्याचा नैतिक-धार्मिक उद्‌बोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहे. मुन्शी अहमदजान ह्याने आपल्या उत्कृष्ट कथालेखनाने पुश्तू गद्याच्या विकासाला मोठा हातभार लावला. त्याच्या कथांत ऐतिहासिक कथा वैपुल्याने आहेत. काही इंग्रजी ग्रंथांचे त्याने पुश्तू भाषेत अनुवाद केले. ह्या अनुवादांची शैलीही साधी परंतु प्रभावी अशी आहे. मीर अहमद शाह रिझवानी (१८५९–१९३३) ह्याने पुश्तू भाषेच्या व्यासंगाला चालना देण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले. मुल्ला नियामतुला ह्यास पुश्तू साहित्यातील फिर्‌दौसी म्हणतात. त्याच्या कथांनी पुश्तू कथासाहित्य समृद्ध केले. मुन्शी अहमदजान हा श्रेष्ठ कवी. त्याने काही प्रेमकथा काव्यबद्ध केल्या आहेत. मौलवी सैद अहमद ह्याने पुश्तू म्हणी आणि वाक्‌प्रचार यांचे संकलन केले.

प्रबोधनाची प्रसादचिन्हे १९३१ नंतर उमटू लागली. काबूलमध्ये पुश्तू-अकादमी स्थापना झाली. ह्या अकादमीतर्फे पुश्तू ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. पुश्तूत लेखन करणाऱ्या आजच्या महत्त्वाच्या लेखकांपैकी काही असे : सैद रसूल रसा, काझी रहीमुल्ला, मौलाना अब्दुल कादर, अब्दुल गफारखान, मुहंमद अकबर खादिमी, साहिबजादा अली हैदर, अमीर नवास जालिया, सादिकल्लाखान रिश्तीन इत्यादी. पेशावर येथेही एक पुश्तू अकादमी स्थापन करण्यात आलेली आहे.

पुश्तू साहित्यावर ज्या पश्चिमी विद्वानांनी उत्तम प्रकारे संशोधनात्मक काम केले आहे, त्यांत मेजर रॅव्हर्टी ह्याचा विशेष उल्लेख करावयास हवा. त्याच्या पुश्तूविषयक ग्रंथात पुश्तू शब्द आणि वाक्‌प्रचार ह्यांचे संकलन, पुश्तू व्याकरणावरील एक ग्रंथ, गुलशन खा हे अनेक पुश्तू कवींच्या सुंदर कवितांचे संकलन, पुश्तू साहित्यविषयक ग्रंथ अशा ग्रंथाचा समावेश होतो.

तलवार, के एल्. (इं.) विश्वकोश कार्यालय (म.)