नेपाळी साहित्य : नेपाळी साहित्याचा आरंभ खऱ्या अर्थाने एकोणिसाव्या शतकात झाला. नेपाळमधील तत्पूर्वीचे साहित्य संस्कृत, नेवारी आणि नेपाळी अशा भाषांत असून त्यात धार्मिक स्वरूपाची गद्यपद्यरचना (उदा., नेपाळ महामत्यपुराण, सुमतितंत्र, मूलकल्पतरु), राजघराण्यांची इतिवृत्ते, वंशावळी, सनदपत्रे, विधिसंहिता, स्तंभांवर कोरलेले लेख इत्यादींचा अंतर्भाव होतो. अठराव्या शतकात पृथूर नारायण शाह (पृथ्वीनारायण सिंह) ह्या गुरख्यांच्या राजाने लिहिलेली स्मृतिचित्रे वाङ्‌मयीन गुणवत्तेच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहेत.

नेपाळी कवींचा एक प्रभावी संप्रदाय १८३० च्या सुमारास उदयाला आला. विदग्ध संस्कृत काव्याचे आदर्श त्यांच्यासमोर होते. अभिजात संस्कृत वळणाची भाषाशैली त्यांनी वापरली. रामायणभागवत ह्यांतील कथांवर त्यांचे काव्यविषय आधारलेले होते आणि त्यांच्या काव्याचे स्वरूप आख्यानक काव्यांसारखे होते. ह्या कवींत वसंत शर्मा, विद्यारण्य केसरी, रघुनाथ, इंदिरस ह्यांसारख्या कवींचा अंतर्भाव होतो. वसंताचे कृष्णचरित, विद्यारण्यकृत द्रौपदीस्तुति, गोपिकास्तुति आणि युगलगीत, रघुनाथाचे सुंदरकांड हे काव्यग्रंथ त्या दृष्टीने लक्षणीय आहेत. इंदिरसाच्या रचना मात्र आज अनुपलब्ध आहेत. ह्या संप्रदायाने निर्माण केलेल्या काव्यप्रवाहाची परिणती भानुभक्तकृत (१८१४–६९) नेपाळी रामायणाच्या रचनेत झाली. भानुभक्ताने अध्यात्म रामायणाचा नेपाळीत अनुवाद केला. नेपाळीचा तुलसीदास म्हणून भानुभक्ताचा गौरव केला जातो. नेपाळी काव्याला आणि एकूण नेपाळी साहित्याला स्वतःचे असे पृथगात्म रूप मिळवून देण्याच्या दृष्टीने भानुभक्ताचा हा अनुवाद प्रेरक ठरला. भानुभक्ताचे रामायण जनसामान्यांपर्यंत पोहोचले. लोकभाषेचा त्यात त्याने अत्यंत मार्मिक असा उपयोग करून घेतला, हे ह्याचे एक महत्त्वाचे कारण होय. संस्कृतप्रचुरतेने केलेल्या कोंडीतून भानुभक्ताने नेपाळी काव्याची मुक्तता केली. भक्तकवीची आर्तता, धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक अस्मितेची जाणीव आदी गुण भानुभक्ताच्या रामायणात आहेत. भानुभक्त हा नेपाळी काव्यातील एक शाश्वत मानदंड ठरलेला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस लेखनाथ पौड्याल, मोतीराम भट्ट वगैरे उल्लेखनीय कवी होऊन गेले. मोतीराम भट्टाने भानुभक्ताचे चरित्रही लिहिलेले आहे. लेखनाथाच्या कवितेत लोकप्रिय नेपाळी गीतांची सुरावट आढळते. लोकभाषेतील नादसौंदर्य तीतून प्रकट झाले आहे. वसंततिलका आणि अनुष्टुभ हे छंद त्याने नेपाळी कवितेत आणले.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस काठमांडू येथे मुद्रणाची सोय झाली. परिणामतः विसाव्या शतकाच्या आरंभापासून नेपाळी साहित्यनिर्मितीला विशेष चालना मिळाली. १९१२ मध्ये हेमराजकृत चंद्रिका हे नेपाळीचे पहिले व्याकरण प्रसिद्ध झाले. त्यानंतर कोशादी रचनेला सुरुवात झाली. १९२० मध्ये स्थापन झालेली ‘गुरखा भाषा प्रकाशिनी समिती’ आधुनिक नेपाळी साहित्याची जननी ठरली. मकई को खेत ही कृष्ण बहादूर ह्यांनी १९३० मधील राणा राजवटीवरील रचिलेली उपरोधिका, बाळकृष्ण आणि पुष्कर शमशीर ह्या दोन भावांच्या साहित्यनिर्मितीने आधुनिक नेपाळी साहित्य समृद्ध झालेले आहे. बाळकृष्ण हा नाटककार, त्याला नेपाळीचा शेक्सपिअर म्हणतात. मुलुको कथा (हृदयाची कथा), ध्रुव, प्रल्हाद आदी पद्यनाटके तसेच ऊनी भरेथी, भक्त भानुभक्तह्यांसारखी गद्यनाटके त्याने लिहिली. चीसो चुलो (थंड चूल) ह्या नावाचे एक महाकाव्यही त्याने लिहिले आहे. पुष्करने कथालेखन केले इंग्रजीतील विविध प्रकारचे साहित्य अनुवादिले. कोशव्याकरणादी क्षेत्रातही पुष्करने काम केले. लक्ष्मीप्रसाद देवकोटा आणि सिद्धिचरण श्रेष्ठ ह्या दोन कवींचा उल्लेखही आवश्यक आहे. देवकोटा ह्या महाकवीने सुलोचना नावाचे महाकाव्य रचिले. मून मदन ह्या त्यांच्या अन्य एका महाकाव्याच्या आरंभीची सहा पद्ये नेपाळ नभोवाणीवर गायिली जातात. सिद्धिचरणांनी नेपाळीत प्रथमच मुक्तच्छंदातील कविता लिहिली. केदार मन व्यथिथ ह्यांचा एक दिन हा काव्यसंग्रह प्रसिद्ध असून त्यातील कविता सामाजिक आशयाच्या आहेत. वेश्याजीवन तसेच १९५० मध्ये नेपाळात झालेल्या क्रांतीनंतर जनतेला सहन कराव्या लागलेल्या हालअपेष्टा, हे त्यांच्या कवितांचे काही विषय. धर्म रे थापा हे आणखी एक उल्लेखनीय कवी. थन सिंकी कांची ह्या त्यांच्या शोकात्म खंड काव्यात त्यांनी खेड्यांतून लोकांवर होणाऱ्या अन्यायाचे चित्र रेखाटले आहे. ‘नेपाळची पर्वतराजी ओलांडून जे निघून गेले ते मायभूमीच्या स्मरणाने दुःखी झाले असतील’, अशा आशयाचे त्यांचे एक देशभक्तिपर गीत नेपाळ नभोवाणीवर गायिले जाते. नेपाळचे राजे महेंद्र हेही कवी होते. त्यांच्या काही कवितांचे इंग्रजी अनुवादही झालेले आहेत. भीमनिधी तिवारी ह्यांनी पौराणिक नाटके लिहिली.

नेपाळी लोकगीतांचे संचितही समृद्ध आहे. नेपाळचे एकूण १४ ‘अंचल’ किंवा प्रदेश मानलेले असून मेची अंचल, सेटी अंचल, कोसी अंचल, बाघमती अंचल, सागरमाथा अंचल, जनकपूर अंचल अशी विविध प्रकारची नावे त्यांना आहेत. लोकगीतांची परंपरा ह्या सर्व १४ अंचलांतून आस्थापूर्वक जोपासली गेली आहे. शेतकऱ्यांची, नावाड्यांची, विरही स्त्रियांची, उत्सवप्रसंगी गाण्याची अशी वेगवेगळ्या प्रकारची ही गीते आहेत.

नेपाळी साहित्यातील सुमति ही पहिली उल्लेखनीय कादंबरी १९३४ मधली. विष्णुचरण हे तिचे कर्ते. रुद्रराज पांडेय, रूपनारायण आणि बांगदेल हे अन्य उल्लेखनीय कादंबरीकार.

रामकृष्ण शर्मा हे नेपाळीमधील पहिले समीक्षक. त्यांच्यानंतर यदुनाथ खनाल ह्यांचा समालोचना को सिद्धांत, हृदयचंद्र सिंह प्रधानांचा साहित्यएक दृष्टिकोण तसेच के ही नेपाळी नाटक इ. समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहेत. कला-साहित्याच्या वृद्धीसाठी १९५२ मध्ये रॉयल नेपाळ अकादेमीची स्थापना करण्यात आली आहे.

श्रेष्ठ, कुसुम