हुरियन भाषा : एक प्राचीन नामशेष वा लुप्त भाषा. इ. स. पू. तिसऱ्या सहस्रकाच्या अखेरच्या शतकांपासून हिटाइट साम्राज्याच्या शेवटच्या शतकापर्यंत ती बोलली जात होती. हुरियन लोक हे मुळात आर्मेनियन पर्वतांमधून आले असावेत, असे मानले जाते. ते इ. स. पू. तिसऱ्या सहस्त्रकाच्या प्रारंभी (इ. स. पू. २३००) आग्नेय ॲनातोलिया व उत्तर मेसोपोटेमियाच्या प्रदेशात राहत असावेत. हा प्रदेश त्यावेळी मितानी साम्राज्याच्या आधिपत्याखाली होता. इ. स. पू. १००० च्या सुमारास हे लोक नामशेष झाले असावेत. उत्तर मेसोपोटेमियातील मितानी (मिटानी) साम्राज्याची भाषा हुरियन होती आणि त्याआधी ती सिरिया-मधील हुरियन वसाहतींमध्ये निदान अगदी सुरुवातीला बोलली जात होती, अशी शक्यता वर्तविली जाते. 

 

हुरियन आणि उरार्तियन अशा दोन नामशेष परंतु ज्ञात भाषांची व्यवस्था लावण्यासाठी हुरो-उरार्तियन असे भाषाकुल कल्पिले जाते. ॲनातोलियामध्ये या दोन्ही भाषा बोलल्या जात. अशी स्वतंत्र कुलव्यवस्था लावण्याचे कारण म्हणजे या भाषा त्यांना निकटवर्ती सेमिटिक (अरबी, हिब्रू या भाषाकुलात येतात) आणि इंडो-यूरोपियन अगर तुर्की कुलांतील भाषांशी साधर्म्य दाखवत नाहीत. हुरियन ही इंडो-यूरोपियन किंवा सेमिटिक भाषा नाही. 

 

हुरियन भाषेतील सगळ्यात जुना लिखित पुरावा हा तिसऱ्या सहस्रकाच्या शेवटी सापडतो. तो जागांच्या आणि नावांच्या यादीच्या स्वरूपातील आहे. पहिला अखंड संहितारूप पुरावा हा उर्किशचा राजा टिश आटल याच्या कालखंडात सापडतो. तो दगडी पाटीच्या स्वरूपात आहे आणि त्याला ‘उर्किश लायन्झ’ असे संबोधले जाते. बोगाझकई (हॅटुसस) येथील उत्खननात हिटाइट साम्राज्य काळातील (इ. स. पू. २२००–१२००) क्यूनिफॉर्म लिपितील इश्टिका ग्रंथ सापडले असून त्यांत हुरियन भाषेतील वृत्तांकित उतारे आढळतात. या भाषेचा आरंभीचा अभ्यास हा पूर्णपणे मितानी पत्रावर आधारलेला होता. ते पत्र टेल-एल्.-अमार्ना (ईजिप्त) येथे सापडले होते. ते पत्र हुरियन राजा तुश्रत याने तिसरा आमेनहोतेप ( इ. स. पू. १४४५–१३७२) यास लिहिले होते. हुरियन आणि उरार्तियन यांतील संबंध प्रस्थापित झाला असून उरार्तियन (खाल्डिन किंवाव्हॅनिक) ही प्राचीन हुरियन भाषेतून उद्भवलेली असून ती उरार्तू राज्याची अधिकृत भाषा होती. ती निओ-ॲसिरियन नामक क्यूनिफॉर्म लिपित लिहिली जाई. क्यूनिफॉर्म अर्थात पाचरीच्या आकाराच्या अक्षरांच्या या लिपीत आणि सुमेरियन लिपीत साम्य आहे. 

 

लिखित पुराव्याच्या आधारे आ, इ, उ, ए आणि ओ असे पाच स्वर असावेत, असा अंदाज निश्चितपणे बांधता येतो. याचे प्रत्येकी र्‍हस्व आणि दीर्घ असे प्रकार केल्यास १० स्वर होतात. लिपीमध्ये दीर्घस्वर दाखविण्यासाठी तेच स्वरचिन्ह दोनदा लिहिले जाते आणि र्‍हस्व स्वर एकदाच लिहिला जातो. तो व्यंजनाला लागून लिहिला जातो व स्वरव्यंजन अशी जोडी एकत्र लिहिलेली आढळते. भाषेत १० व्यंजनस्वनिम आहेत. ते म्हणजे म, न, प, ट, क, च (चटईमधला), फ (दन्त्यौष्ठ्य), स, ख (उर्दू-अरबी-फार्सी खराब मधील) व (ओष्ठ्य दन्त्यौष्ठ्य नव्हे !) . 

 

जुन्या भाषांमध्ये दिसून येणारी प्रवृत्ती हुरियनमध्येही दिसून येते ती म्हणजे नवनव्या प्रातिपदिकांऐवजी मूळ शब्दालाच अनेक प्रत्यय लावून त्यातून नवे शब्द घडविणे. आत्ताइ (वडील) यापासून आत्तार्दी (पूर्वज), फुट (जन्माला घालणे) पासून फुटकी (मुलगा) . त्याचप्रमाणे हुरियनमध्ये क्रियापदांना अनेक प्रत्यय लागतात व त्यामुळे क्रियापदांची कर्ता-कर्म घेण्याची क्षमता वाढते. उदा., अकर्मकाचे सकर्मक होणे इत्यादी. हुरियन ही प्रत्ययप्रवण भाषा आहे. नामरूपे ही विभक्ती आणि वचनानुसार बदलतात. तेरा विभक्ती आहेत आणि विभक्ति प्रत्ययांमधून विविध कारकार्थांच्या छटा व्यक्त होतात. क्रियापदांची रूपे पुरुष आणि वचनाप्रमाणे बदलतात. सकर्मकता आणि अकर्मकता ही प्रत्यय व इतर अन्याश्रयी घटकांमार्फत दर्शविली जाते. काळ आणि अर्थ (आज्ञार्थ, विध्यर्थ इ.) हेदेखील क्रिया-पदाच्या रूपावरून दिसतात. वाक्यगत शब्दक्रम हा (मराठीसारखाच) कर्ता-कर्म-क्रियापद असा आहे. 

धारूरकर, चिन्मय मालशे, मिलिंद