अरबी भाषा : सेमिटिक भाषा समूहाच्या चार शाखांपैकी अरबी ही दक्षिणेकडील शाखेची भाषाआहे. हिम्यरितिक व इथिओपिक यादेखील या शाखेच्याच भाषा आहेत. फिनिशियन व हिब्रू यांचा पश्चिम शाखेत, ॲरेमाइकचा उत्तर शाखेत आणि अकेडियन किंवा ॲसिरो–बॅबिलोनियनचा पूर्व शाखेत समावेश होतो.

आजही भाषा मुख्यतः सौदी अरेबिया, सिरिया, इराक, पॅलेस्टाइन, येमेन, एडन, ईजिप्त, लिबिया, ट्युनिशिया, अल्जीरिया, मोरोक्को, माल्टा इ. प्रदेशांतआणि त्यांच्या आसपासच्या भागांत बोलली जाते. म्हणजे तिचे प्रमुखव्याप्तिक्षेत्र पश्चिम आशिया व आफ्रिकेचा उत्तर भाग हे आहे. अरबी भाषाबोलणारांची संख्या बारा कोटींच्या आसपास आहे.

दक्षिण अरबी किंवा हिम्यरितिक किंवा साबियन ही पूर्वी येमेन व त्याच्या आसपासच्या प्रदेशाची भाषा होती. तिच्यातील साउथ अरेबिक लिपीत लिहिलेले शेकडो कोरीव लेख सापडलेले आहेत. त्यांतील सर्वांत जुने ख्रिस्तपूर्व सातव्या शतकातील आहेत. सबाची राणी साबियन होती. इस्लामचा उदयकाळ सुरू झाल्यानंतर हिम्यरितिकची व इतर अनेक भाषांची जागा अरबीने घेतली.

साहित्यिक व बोलण्यातील अरबी यांच्यातला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. इस्लामच्या आगमनापूर्वी दीडशे वर्षे साहित्यिक अरबीचा वापर सुरू झाला होता. ज्याजमातीत मुहंमद पैगंबर जन्माला आले, त्या कुरैश जमातीच्या लेखकांनी आणि इतरकाही लोकांनी ती काव्यलेखनासाठी वापरली व तिला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. पुढे⇨कुराणाची (कुर्आनाची)रचनाही तिच्यात झाल्यामुळे तिला पावित्र्य व स्थैर्य प्राप्त झाले.

एक लिपी वकुराणाचा आदर्श यांमुळे लिखित अरबीच्या रूपात सर्वत्र एकसारखेपणा दिसतो, पण तो फसवा आहे. कारण भाषेच्या मूलभूत स्वभावानुसार बोलल्या जाणाऱ्‍या अरबीत स्थल व काल यांच्या संदर्भात अनेक भेद निर्माण झाले आहेत. भिन्न प्रदेशांतील अरबांना एकमेकांशी विचारविनिमय करणे हे यामुळे कठीण झाले आहे.पण लेखनापुरत्या या बोली एकाच लिपीभोवती व एकाच आदर्श भाषेभोवती केंद्रित झालेल्या असल्यामुळे लेखनाद्वारे विचारविनिमय करणे शक्य झाले आहे. शिवाय अरबी लिपी व्यंजनप्रधान असल्यामुळे तिचे वाचन स्वतःच्या बोलीच्या सवयींना धरून करणेही शक्य होते.

इस्लामचे दूत ज्या ज्या प्रदेशांत स्वधर्मप्रसारासाठी गेले, त्या त्या प्रदेशांत त्यांचा पवित्र ग्रंथ व त्यांची भाषाही गेली. फार्सीसारख्या आर्यकुलातील भाषेचे स्वरूप तिच्या प्रभावाने न ओळखता येण्याइतके बदलले. मुसलमानी अमदानीत फार्सीच्या वर्चस्वामुळे असंख्य अरबी शब्द भारतातील भाषांत आले.मराठीतील अखेर, अव्वल, खबर, व अवलाद, हैवान, नफा, वखत, कत्तल, मालक इ. शब्द हे अशा रीतीनेच आलेले आहेत.

अरबी लिपी ही⇨ॲरेमाइक लिपीपासून आलेली आहे. तिच्यात अठ्ठावीस अक्षरे आहेत. स्वभाषेच्या व्याप्तिक्षेत्राबाहेरही ती इस्लामी संस्कृतीच्या अनेक देशांत वापरली जाते.भारतातले बहुसंख्य मुसलमान उर्दू लिहिण्यासाठी तिचा उपयोग करतात.

अरबीची ध्वनिपद्धती स्थूलमानाने पुढीलप्रमाणे आहे :

स्वर : अ, इ, उ, आ, ई, ऊ. 

व्यंजने : . 

१.जिव्हाग्रनिर्मित

दातांच्या मध्ये–थ, ध़ 

वरच्या दातांना स्पर्श–त, द 

खालच्या दातांच्या मागे–त, द 

वरच्या दातांच्या मागे–स, झ 

२.जिव्हापृष्ठनिर्मित

मृदुतालूच्या जवळ–ख़, घ़ 

३.घसा-कंठपोकळीत

घर्षक–

४. ओष्ठ्य : ब, म, व 

५. दंतोष्ठ्य : फ़ 

६. दंत्य : द़, ल 

७. दंतमूलीय : श, श, र, न 

८. तालव्य : ज, य 

९. मृदुतालव्य : क 

१०. तालुपटीय : क़ 

११. कंठ्य : ह़, ह 


व्याकरणाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे : अरबी भाषेत पुल्लिंग व स्त्रीलिंग ही दोन लिंगे एकवचन, द्विवचन व अनेकवचन ही तीन वचने आणि प्रथमा, द्वितीया व षष्ठी या विभक्ती आहेत. नैसर्गिकपणे जोडी आढळणाऱ्‍या डोळे, कान इ. गोष्टींसाठी द्विवचन वापरण्यात येते. 

स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन अंत्य अ ऐवजी आत् हा प्रत्यय लावून होते :तोरोबेझ‘टेबल’,तोरोबेझात्. 

पुल्लिंगी नामांच्या अनेकवचनात भग्न अनेकवचन असा प्रकार आहे. तो शब्दांतर्गत स्वरांच्या विकाराने साधला जातो :वलद् ‘मुलगा’, अव्ला‍द किताब ‘पुस्तक’, कुतुब इ. 

नामापूर्वी लागणारे निश्चायक विशेषण अल् (इल) आहे :अल् बिन्त् ‘मुलगी’, अल् बनात् ‘मुली’. 

विशेषण नामानंतर येते आणि त्याला नामाचे लिंगवचन लागते. 

सर्वनामात फक्त प्रथमपुरुषी लिंगभेद नाही. सर्वनामांची स्वामित्वदर्शक रूपे नामाला प्रत्यय जोडून होतात :अना ‘मी’, व्यंजनानंतर–इ,स्वरानंतर–य किताब् ‘पुस्तक’, किताबी ‘माझे पुस्तक’ अबू ‘बाप’, आबूय ‘माझ बाप’. 

अरबी क्रियापद त्रिव्यंजनात्मक असते. त्याला अंतर्गत स्वर जोडून किंवा त्याच्या मागेपुढे व्यंजने लावून क्रियापदांची रूपे, नामे इ. मिळतात. उदा., ‘ठार मारणे’ ही कल्पना क्-त्-ल् ही व्यंजने या क्रमाने ठेवून व्यक्त होते. यांपासून क़तल ‘त्याने ठार मारले’ हे रूप मिळते. क्-त्-ब् म्हणजे ‘लिहिणे’ यापासून कतब ‘त्याने लिहिले’, किताब् ‘पुस्तक’ इ. 

क्-त्-ब्चा भूतकाळ पुढीलप्रमाणे आहे : 

 

एव. 

द्विव. 

अव. 

प्र.पु.

कतब्तु

कतब्ना

कतब्ना

द्वि.पु.

कतब्त,ब्ति

कतब्तुमा

कतब्‍तुम्, ब्तुंन्‍न

तृ.पु.

कतब, ब्तं

कतबा, बता

कतबू, ब्‍नं

एकचरूप असले तर ते दोन्ही लिंगांचे आहे. दोन रूपे असतील तेथे दुसरे स्त्रीलिंग आहे.

पहा : सेमिटिक भाषासमूह.

संदर्भ : 1. Haywood, J. A. Nahmad, H. M.A New Arabic Grammar, London, 1962.

           2. Pei, M. A.The World’s Chief Languages,London, 1954.

           3. Tritton, A.S.Teach Yourself Arabic, London, 1944.

कालेलकर, ना. गो