सुमेरियन भाषा -साहित्य : सुमेरियन हे या भाषेचे मूळ नाव नसून अकेडियन भाषेतील ‘शुमेरु’ या शब्दाचे ते आंग्ल रूप आहे. हे नाव एकोणिसाव्या शतकात या भाषेला दिले गेले. ही भाषा वापरणारे सुमेरियन लोक तिला एमे गिर असे संबोधत. एमे गिर म्हणजे निज भाषा, आपली बोली.

सुमेरियन संस्कृती ही दक्षिण मेसोपोटेमियामध्ये ( आजचा इराक ) इ. स. पू. सु. ३५०० च्या आसपास भरभराटीस आलेली होती. या भाषेसंबंधीचा जुन्यात जुना लिखित पुरावा हा इ. स. पू. चौथ्या शतकातील आहे आणि सगळ्यांत अलीकडचा हा इ. स. च्या पहिल्या शतकातील आहे. इराक या देशात प्रामुख्याने हे पुरावे सापडतात व एकूण सर्व मध्य आशियात हे पुरावे विखुरलेले आहेत. बोली भाषा म्हणून ती कधी अंतर्धान पावली हे नेमके ठाऊक नसले, तरी हे इ. स. पू. दुसऱ्या शतकात घडले असावे, असा काही इतिहासकारांचा कयास आहे. पुढे अकेडियन या सेमिटिक भाषेने तिची जागा घेतली व रोजच्या व्यवहारासाठी या भाषेचा वापर होईनासा झाला परंतु धार्मिक विधींची एक पवित्र भाषा म्हणून, तसेच साहित्यिक आणि शास्त्रीय लेखनाची भाषा म्हणून, तिचा उपयोग आणखी काही शतके चालू राहिला. चहूबाजूंनी – प्रामुख्याने सेमिटिक भाषाकुलातील भाषांनी –घेरलेली ही भाषा मात्र सेमेटिक नसून ‘एकांडी’ (language isolate) म्हणजेच कोणत्याही ज्ञात भाषाकुलाशी नाते सांगणारी नाही, असे मानले जाते.

सुमेरियन भाषेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे मानवी इतिहासात निर्माण झालेली पहिली लिपी या भाषकांनी इ. स. पू. ३००० पूर्वी केव्हा तरी निर्माण केली. मातीच्या चपट्या वड्यांवर टोकदार साधनाच्या साहाय्याने चित्रमय लिपिचिन्हे – प्रामुख्याने बाणाच्या आकृतीची (cuneiform) –विकसित झाली. रोजच्या जीवनातील घटना, व्यापार-उदिम, अवकाशात घडणाऱ्या घटना आणि साहित्य यांची लेखी नोंद करण्यासाठी ही लिपी वापरली गेली. त्यानंतर हळुहळू स्वनात्मक तत्त्व किंवा रीबस प्रिन्सिपल वापरुन केवळ चित्रलिपी न राहता ध्वनींना चिन्हित करणारी व्यवस्था या लिपीमध्ये निर्माण झाली. अशा प्रकारे सुमेरियन लेखनव्यवस्था ही पुढील तीन प्रकारच्या चिन्हांची मिळून होणारी अशी एक व्यामिश्र व्यवस्था बनली : (१) संपूर्ण शब्दाला चिन्हित करणारे शब्दचिन्ह किंवा लोगोग्राम, (२) स्वनावयव, व्याकरणिक घटक किंवा शब्दावयव यांना चिन्हित करणारी स्वनात्मक चिन्हे आणि (३) संदिग्धता दूर करण्यासाठी शब्दजातींचे चिन्ह दर्शवणारी निश्चितीकरणचिन्हे. अशा तीन प्रकारच्या चिन्हांची सरमिसळ या लिपीमध्ये झाली मात्र सुमेरियन लिपीमधील स्वनात्मक चिन्हे संपूर्ण स्वनावयवमालांशी तुलना करता खूपच तोकडी होती. काही सुमेरियन स्वनावयवांना चिन्हेच नव्हती, तर काही चिन्हांचे उच्चारण सारखेच होते आणि एकच चिन्ह काही वेळा शब्द म्हणून, काही वेळा स्वनावयव म्हणून, तर काही वेळा स्वतंत्र स्वनिम म्हणून वापरले जाई.

सुमेरियन भाषेच्या ध्वनिव्यवस्थेत पंधरा व्यंजने आणि आठ स्वर असावेत. ब, ड, ग, ङ, ह, क, ल, म, न, प, र, स, श, त आणि दन्तमूलीय ज (‘जसा’ मधील) ही व्यंजने, तर अ, इ, ए आणि उ यांचे ऱ्हस्व आणि दीर्घ असे प्रत्येकी दोन भेद धरुन आठ स्वर य आणि कंठय स्पर्श असे दोन अर्धस्वर अशी ही व्यवस्था असावी.

सुमेरियन भाषेच्या बाणाकृती लिपीमध्ये आशयवाचक शब्द (प्रामुख्याने नामे व क्रियापदे) ही चित्ररुपी, तर कार्यात्मक रुपिमे (अंग, प्रत्यय इ.) ही स्वनवाचक चिन्हांनी दर्शविली जात. पदिमव्यवस्थेच्या दृष्टीने सुमेरियन भाषा ही संयोगप्रवण (agglutinative) मानली जाते. क्रियापदांनाच प्रत्यय लागून विकार होतात. लिंगव्यवस्था ही केवळ मानव व मानेवतर यांतील भेद दाखविण्यासाठी वापरली जाते, तर वचने ही केवळ मानवदर्शक नामांचीच होऊ शकतात. नामपदसमूहाच्या दृष्टीने या भाषेत प्रमुख नाम हे प्रथम येते, तर लिंग, वचन, विभक्ती इ. प्रत्यय हे त्याच्यानंतर लागतात. या भाषेत वाक्यातील मूलभूत पदक्रम हा मराठी-प्रमाणेच कर्ता-कर्म-क्रियापद असा आहे.

इ. स. दुसऱ्या शतकानंतर सुमेरियन भाषा जवळजवळ अदृश्य झाली. त्यानंतर थेट एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी ॲसिरियन भाषेचे संशोधन करताना संशोधक सुमेरियन भाषेपर्यंत पोचले. गेल्या सुमारे दोनशे वर्षांत सुमेरियन भाषा आणि लिपी यांच्याविषयी बरीच माहिती उपलब्ध झालेली आहे. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाचा पेनसिल्व्हेनिया सुमेरियन शब्दकोश प्रकल्प १९७४ मध्ये सुरु झाला आणि आता या संशोधनाचे फलित महाजालकावरही उपलब्ध आहे.

मालशे, मिलिंद धारुरकर, चिन्मय

साहित्य : सुमेरियन भाषेतील साहित्य हे मिथ्यकथा, महाकाव्ये, स्तोत्रे, विलापिका ह्यांनी संपन्न आहे. त्या साहित्यात समाजाचे व्यावहारिक शहाणपण सूत्ररुपाने सांगणाऱ्या म्हणी, तसेच तरुणांना मार्गदर्शन करणारे लेखन ह्यांचाही समावेश आहे. हे सर्व साहित्य पद्यमय असून ते मातीच्या इष्टिकांवर कोरलेले आहे. सुमेरियनांचे धार्मिक शहर निप्पुर येथे इ. स. पू. २००० नंतर ह्या साहित्याच्या प्रती तयार करण्यात आल्या आणि त्यांच्या आधारे ह्या साहित्याचा परिचय झाला पण मुळात हे साहित्य बरेच प्राचीन असले पाहिजे. सुमेरियन भाषा समजून घेण्यातल्या अडचणींमुळे ह्या साहित्यापैकी फारच थोडे अनुवादित झाले आहे तथापि अलीकडच्या काळात ह्या अतिप्राचीन साहित्याची काही मर्यादेपर्यंत ओळख होऊ शकली आहे. सुमेरियन मिथ्यकथा ह्या सुमेरियन देवदेवतांशी संबंधित आहेत. विशेषतः एन्लिल, निन्लिल, एन्की आणि निन्‌हर्सग ह्यांच्याशी. इनान्ना ह्या देवतेवरही मिथ्यकथा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. काही मिथ्यकथा विश्वनिर्मितीशी निगडित आहेत. निर्व्यवस्थेतून अथवा गोंधळाच्या अवस्थेतून सुसंघटित विश्वाची निर्मिती झाली, असे सांगणाऱ्या काही मिथ्यकथांत सर्पराक्षस (ड्रॅगन) हा ह्या निर्व्यवस्थेचे प्रतीक म्हणून येतो. त्याचा नाश करणे आवश्यक असते. सुमेरियन साहित्यातील काही मिथ्यकथा ह्या सर्पराक्षसाच्या वधाची कहाणी सांगतात. सुमेरियन महाकाव्यांतून गिल्गामेश, लुगालबांडा, एनमर्कव ह्यांसारख्या पराक्रमी वीरांच्या कर्तृत्वाचा गौरव आढळतो. गिल्गामेश ह्याच्या जीवनावर तर अकेडियन भाषेत एक महाकाव्य रचण्यात आले आहे. सुमेरियन राजांची जी माहिती मिळते, तीनुसार गिल्गामेश हा इराकचा राजा परंतु ह्याखेरीज त्याची काहीच माहिती मिळत नाही. सुमेरियन लेखनशैलीत पुनरुक्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर केलेला दिसतो. ही शैली कथाकाव्यापेक्षा विलापिका आणि स्तोत्रे अशा रचनांना अधिक अनुकूल आहे.

कुलकर्णी, अ. र.