नाझिम हिकमत रन : (१९०२ —२जून १९६३). आधुनिक तुर्की कवी आणि नाटककार, सलॉनिक येथे जन्मला. आरंभीचे काही शिक्षण सलॉनिक येथील ‘देनीझ हायस्कूल’मध्ये घेतल्यानंतर काही काळ तो इस्तंबूल येथील नाविक महाविद्यालयात होता परंतु एका संपात सहभागी झाल्यामुळे त्याला तेथून काढून टाकण्यात आले. त्यानंतर तो अंकारा येथे गेला. साम्यवादाकडे त्याचा कल झालेला होता. अंकारा येथे आल्यानंतर तो बळावला. १९२१मध्ये तो मॉस्कोला गेला आणि आपले उर्वरित शिक्षण त्याने तेथे पूर्ण केले. तेथे असतानाच अंकारा येथील येनीहयात ह्या नियतकालिकात तो टोपणनावाने कविता लिहीत होता. एक किंवा दोन शब्दांत वाक्यांचे संक्षिप्तीकरण ह्या कवितांतून केलेले असे. त्यामुळे ह्या कवितांचा आकृतिबंधही नावीन्यपूर्ण ठरला. मॉस्कोतील वास्तव्यातच विख्यात रशियन कवी माय्‌कोव्हस्की (मयकॉव्हस्कई) ह्याच्याशी त्याचा स्नेह जुळून आला. माय्‌कोव्हस्कीच्या काव्याचा प्रभाव नाझिमवर पडला.

तो १९२४मध्ये तुर्कस्तानात परत आला आणि पुरोगामी वृत्तपत्रांसाठी लेखन करू लागला. त्याचे काव्यलेखनही चालूच होते. त्याच्या कवितांतील बंडखोर, साम्यवादी विचारांमुळे १९२५मध्ये त्याला कारावासाची सजाही ठोठावण्यात आली होती. १९२८मध्ये रशियात जाऊन तेथून त्याने आपल्या कवितांचा पहिला संग्रह प्रकाशित केला. १९३२मध्ये तो पुन्हा तुर्कस्तानात आला. तेथे येताच त्याला २८वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सांगण्यात आली परंतु १९५१मध्ये त्याची मुक्तता करण्यात आली. त्यानंतर रशिया, चेकोस्लोव्हाकिया आदी काही समाजवादी देशांना त्याने भेटी दिल्या. मॉस्को येथे तो निधन पावला.

संपूर्ण मानवजातीबद्दल, विशेषतः श्रमजीवी वर्गाबद्दल, नाझिमला वाटणारे प्रेम त्याच्या कवितेतून प्रभावीपणे व्यक्त झालेले आहे. स्वदेश आणि संस्कृती ह्यांबद्दलचा त्याचा अभिमानही तीतून प्रत्ययास येतो. ‘इकी हेमशीर’ (इं. शी. टू सिस्टर्स किंवा टू नर्सेस) आणि ‘किर्क हरामीलरेन असीरी’ (इं. शी. द प्रिझनर ऑफ फॉर्टी रॉबर्स) ह्या तसेच मौलाना रूमी ह्यांच्यावरील त्याच्या कविता ह्या संदर्भात लक्षणी ठरतात. तुर्की भाषेत मुक्तच्छंदातील कविता (फ्री व्हर्स) नाझिमने आणली. साधी, सहजसुंदर अशी त्याची काव्यशैली आहे. त्याच्या निवडक कवितांचा अनुवाद तानेर वेबर ह्यांनी केलेला असून तो पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेला आहे (सिलेक्टेड पोएम्स : नाझिम हिकमत, १९६७). दुसऱ्या महायुद्धावर एक दीर्घ काव्य लिहिण्याचा त्याचा संकल्प होता. त्याचा काही भाग १९५२मध्ये प्रसिद्धही झाला होता तथापि हे काव्य त्याच्या हातून पूर्ण होऊ शकले नाही.

कफातासी (१९३२, इं. शी. क्रेनिअम), उनूतूलन आदाम (१९३५, इं. शी. द फर्‌गॉट्‌न मॅन) व फरहाद इले शिरीन (१९५४, इं. शी. फरहाद अँड शिरीन) ह्या त्याच्या तीन नाट्यकृती. मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा त्यांवर प्रभाव आढळून येतो.

नईमुद्दीन, सैय्यद