ब्राह्मीभाषा: ब्रह्मी ही सिनो तिबेटी कुटुंबाच्या तिबेटो ब्राह्मी शाखेची भाषा असून ती ब्रह्मदेशाची प्रमुख भाषा आहे. तिचा लिखित पुरावा अकराव्या शतकापासून उपलब्ध आहे.

लेखन : लेखनासाठी ब्रह्मी ज्या लिपीचा उपयोग करते ती भारतातील शिलालेखीय ब्राह्मीवरून आलेली आहे आणि तिच्यात पुढील मुळाक्षरे आहेत :

स्वर: अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ

व्यंजने : क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ व भ म य र ल व स ह ळ, आणि शीर्षबिंदू.

व्यंजनांना स्वर जोडण्याची पद्धत बऱ्याच अंशी भारतीय लिपींसारखीच आहे.

व्याकरण: नाम: नामांचे तीन प्रकार आहेत. केवल नाम हा वस्तुवाचक एकावयवी शब्द असतो धातूला अह हा उपसर्ग जोडून कृतिवाचक नाम मिळते, तर सामासिक नाम क्रियापदे किंवा नामे वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांना जोडून मिळते.

नामांना लिंग नसते. पण जिथे (उदा., प्राणिवाचक शब्दांच्या बाबतीत) ते दाखवणे आवश्यक असते, तिथे ते मूळ नामाला लिंगदर्शक प्रत्यय लावून दाखवले जाते. स्त्रीलिंगदर्शक प्रत्यय मह् हा असून पुरुषलिंगदर्शक प्रत्यय – दे, फाह्, इ. आहेत.

वचने दोन आहेत. एकवचन व अनेकवचन. मूळ नामशब्द एकवचनी असतो. त्याला – माह्, दोह् इ. प्रत्यय लागून अनेकवचन मिळते.

नामाचे मूळ रूप किंवा त्याला थि हा प्रत्यय लागून मिळालेले रूप ही प्रथमा. इतर विभक्ति मूळ नामाला मराठी शब्दयोगी अव्ययाप्रमाणे असणारे वेगवेगळे प्रत्यय लावून तयार होतात.

सर्वनाम: मूळ सर्वनामे तीन आहेत. ङाह्‍ ‘मी’ थिन्, मिन्, निन् ‘तू’ थृ ‘तो, ती’. – अ. व. ङाह्-दोह् किंवा दोह् ‘आम्ही’ थिन् दोह्, मिन् दोह्, निन् दोह् ‘तुम्ही’ थू दोह् ‘ते, त्या’.

पण यांतली काही रूपे शिष्ट, तर काही अशिष्ट समजली जातात. उदा., स्वतःबद्दल बोलताना ङाह् ‘मी’ हा शब्द न वापरता क्यून् ओख् ‘नम्र सेवक’ हे वापरण्याचा प्रघात आहे.

याशिवाय संबंधी, आत्मदर्शक (‘स्वतः’या अर्थी), प्रश्नार्थक सर्वनामेही आहेत.

विशेषण: मूळ भाषेतील क्रियादर्शक धातू विशेषण म्हणून वापरला जातो आणि तो नामापूर्वी किंवा नंतर येतो. पालीमधून घेतलेली काही रूपे मात्र याला अपवाद आहेत.

तुलनात्मक रूप ‘वरचढ असणे’ या अर्थाचा क्रियाधातू विशेषणाला जोडून मिळतो, तर श्रेष्ठत्वदर्शक रूप धातूपूर्वी अह् आणि नंतर सोन् ही रूपे लावून मिळते.

क्रियापद : धातू हा एकावयवी असून त्याला कोणताही विकार होत नाही. तो सकर्मक किंवा अकर्मक असतो. धातूचे आद्य  व्यंजन महाप्राणयुक्त करून अकर्मकाचे सकर्मक रूप मिळू शकते. प्रश्नवाचक विधानासाठी सूर बदलला जात नाही तर प्रश्नसूचक रूप क्रियापदाला जोडण्यात येते. क्रियापदापूर्वी मह् हे रूप ठेवून नकार मिळतो.

काही शब्द आणि वाक्ये : म्यित् ‘नदी’, पिन् लेह ‘समुद्र’, यैजोह ‘पाणी’, तौ ‘अरण्य’, कौक ‘भात’, युआह् ‘खेडे’, शिनबहयिन ‘राजा’, बहयिनमह् ‘राणी’. क्युनोख् कोह् पैवाह् ‘मला द्या’, क्युनोख कोह्‍ प्यौबाह् ‘मला सांगा’, दीगोह् लाह् गेह् ‘इकडे या’, प्यन् लाह् गेह् ‘परत या’, यै तह् ख्येत् पैबाह् ‘मला एक पेला पाणी द्या’, मह् बाहू इ ‘मी बरा आहे’, लाह् फेत् यि तह ख्वेत् पैबाह् ‘मला एक कप चहा द्या’.

संदर्भ : 1. Cohen, M. Meillet, A. Les langues du monde, Paris, 1952.

             2. St. John, St. A. Burmese,Marlborougis Self Taught, London,

 

 कालेलकर, ना. गो.