पेहलवी भाषा : झरथुष्ट्र (जरथुश्त्र) व मनी (प्राचीन इराणमधील मनीपंथाचा प्रवर्तक २१५/१६ २७४ ? ) यांच्या प्रभावामुळे इराणात स्थिर लिखित भाषा तयार होऊ शकल्या. कारण धर्मप्रसार व धर्मशिक्षण यांसाठी त्यांची आवश्यकता होती. शिकंदराच्या आक्रमणामुळे (इ. स. पू. ३३१) इराणचे प्राचीन साम्राज्य नष्ट झाले. पण त्यानंतर सासेनियन साम्राज्याच्या (२२६ ६४१) प्रभुत्वाखाली राष्ट्रीय पुनरुत्थान झाले. चार शतकांतून अधिक काळ टिकलेल्या या राजवटीत राष्ट्रीय अस्मितेच्या दृष्टीने काही गोष्टी करण्यात आल्या. त्यांत इराणी संस्कृतीचे वैशिष्ट्य स्पष्ट करणारी जी भाषा तयार झाली, तिचे नाव पेहलवी.

अवेस्ताची प्राचीन भाषा कळेनाशी झाली होती. डरायसची (दारियवह) भाषाही दुर्बोध बनली होती. अशा वेळी सासेनियन राज्यकर्त्यानी झरथुष्ट्राचा धर्म स्वीकारला आणि इराणी जनतेत त्याला बौद्ध किंवा ख्रिस्ती धर्मासारखी राजकीय प्रतिष्ठा प्राप्त झाली. परिणामी अवेस्ताचे त्या काळी इराणमध्ये प्रचलित असणाऱ्या बोलभाषेत भाषांतर होऊन या नव्या पेहलवी भाषेला स्थैर्य व मानाचे स्थान मिळाले.

पेहलवी ही सासेनियन साम्राज्याची भाषा होती. आर्तख्शिर-इ पापकान या साम्राज्याच्या संस्थापकाचे व त्याच्या वंशजांचे शिलालेख ही या भाषेची सर्वांत प्राचीन अधिकृत अभ्याससामग्री आहे. शिवाय याच काळात अवेस्ताचे भाषांतर, त्यावरील विवरणात्मक लेखन आणि त्याच्या पाठोपाठ समृद्ध असे धार्मिक व लौकिक साहित्य या भाषेत निर्माण झाले. इ. स. सातव्या शतकात आलेल्या इस्लामी आक्रमणाला तेथील संस्कृती तोंड देऊ शकली नाही. पण अगदी मूठभर झरथुष्ट्रानुयायी शिल्लक राहिले आणि भारतात येऊन आपला धर्म व संस्कृती टिकवणाऱ्या पारशी लोकांनी काही अवशेष येथे आणले.

मात्र या साहित्याची परंपरा नंतरच्या इराणी लेखकांनी चालू ठेवली. प्रसिद्ध इराणी कवी फिर्दौंसीच्या (९३२ १०२०) लेखनावरून ही गोष्ट स्पष्ट होते.

इस्लामच्या आक्रमणामुळे इराणी भाषेवर अरबीचा फार प्रभाव पडला, तरीही इराणी भाषाच इराणने चालू ठेवली. आजही इराणी म्हणजे फार्सी भाषा, आणि प्राचीन इराणी भाषा यांतला पेहलवी हा दुवा आहे. या अर्वाचीन इराणीचे स्वरूप बाह्यत: कसेही दिसले, तरी ती निश्चितपणे इंडो-यूरोपियन कुटुंबातील एक महत्त्वाची भाषा आहे, ही गोष्ट भाषाशास्राने सिद्ध केली आहे.

संदर्भ : Meillet Antoine, Les langues dans G Europe nouvelle, Paris, 1928.

कालेलकर, ना.गो.