अरबी साहित्य: पाचव्या शतकाच्या शेवटी दक्षिण अरबस्तानात अरबी भाषेचा उदय झाला. भटक्या अरब टोळ्यांची ही मूळ भाषा होय. लेखनभाषा म्हणून सातव्या शतकाच्या उत्तरार्धातच तिचा प्रथम उपयोग केल्याचे दिसते. इ. स. ६५१ मध्ये या भाषेत कुराणाची रचना झाली. इस्लामची ती धर्मभाषा ठरली. त्यामुळे या भाषेची वाङ्‌मयीन परंपरा आजपर्यंत अखंड स्वरूपात टिकून आहे. ऐतिहासिक दृष्टीने अरबी साहित्याचे महत्त्वाचे कालखंड पुढीलप्रमाणे सांगता येतील : (१) इस्लामपूर्व कालखंड (सु.५०० ते ६१०), (२) आद्य इस्लामी व उमय्या कालखंड (६१० ते ७५०), (३) अब्बासी कालखंड (७५० ते १२५८), (४) अवनतीचा कालखंड (१२५८ ते १८५०) आणि (५) आधुनिक कालखंड (१८५० नंतर).

 

इस्लामपूर्व कालखंड: प्रारंभीचे अरबी साहित्य कवितांच्या व म्हणींच्या स्वरूपाचे असून उत्तर अरेबियातील नज्द व हेजॅझ प्रदेशांतील बोलीभाषेत होते. मूलतः ते अलिखित स्वरूपातच प्रचलित होते. आठव्या शतकानंतर त्या प्राचीन साहित्याचे संशोधन व संकलन करण्यात आले. या बाबतीत मायदानी (मृ.११२४) याचे संकलन महत्त्वाचे मानले जाते. भाषिक व समाजशास्त्रीय दृष्टींनी त्या प्राचीन साहित्याचे व विशेषतः त्यातील म्हणींचे महत्त्व मोठे आहे.

 

दक्षिण अरबस्तानात अरबी भाषा रूढ होण्यापूर्वी तेथे हिम्यरितिक नावाने ओळखली जाणारी भाषा प्रचलित होती. ग्रीक व रोमन भूगोलवेत्त्यांनी साबियन या नावाने तिचा उल्लेख केलेला आहे. या भाषेतील अनेक शिलालेख सापडले असून त्यांत कायदा व धार्मिक विधी यांसंबंधीचा मजकूर आढळतो. अल् उला येथे पहिल्या शतकानंतरचे कोरीव लेख सापडले असून ते कुरैश या घराणाच्या भाषेत लिहिलेले आहेत. मुहंमद पैगंबरांचा (५७०–६३२) जन्म याच घराण्यात झाला.

काव्य: अरबी काव्याचा उद्गम केवळ अनुमानानेच जाणावा लागतो. भटक्या अरब-टोळ्यांत प्राचीन अरबी काव्याचा जन्म झाला हे खरे पण ते काव्य मौखिक स्वरुपातच एका पिढीकडून दुसऱ्‍या पिढीकडे सु. दीड-दोनशे वर्षें संक्रमित होत राहिले. ‘हिदा’ (काफिल्यांची गीते), ‘हिजा’ (शत्रूसंबंधीची औपरोधिक गीते) व ‘रजझ’ नावाच्या वृत्तात रचिलेली स्फूर्तिगीते यांसारखी ती प्राचीन कविता होती. स्वकीयांची स्तुती व शत्रूची निंदा हे अशा स्फुट काव्याचे प्रयोजन होते. अरब लोक कवींना शायर म्हणत व शायर शब्दाचा अर्थ ‘जो जाणतो तो’ असा आहे. काव्याची दैवी शक्ती लाभलेल्या अरबी शायरांना टोळ्यांमध्ये मानाचे स्थान होते.

 

याच कालखंडात सिरियन सीमेवरील घस्सान व युफ्रेटीस नदीच्या परिसरातील हिरा या दोन अरब-राज्यांत नाट्यपूर्ण ऐतिहासिक दंतकथांची पद्यात रचना झाल्याचे आढळते.

 

इस्लामपूर्व काळातील अत्यंत संपन्न व प्रभावी काव्यप्रकार म्हणजे ‘कसीदा’ हा होय. उद्देशिकांच्या स्वरूपाच्या या काव्यप्रकारात जे प्रगल्भ व परिणत रचनाकौशल्य दिसते, त्याचा उगम अजूनही अज्ञात आहे. मनाला विस्मित करणारा अनपेक्षितपणा कसीदांच्या स्वरूपात आढळतो. निश्चित रचनातंत्राच्या या काव्यप्रकारात साठपासून शंभरपर्यंत चरणसंख्या असते. त्यात तीन खंड असतात. पहिल्या ‘नसीब’ नावाच्या खंडात, कवी आपल्या एकदोन मित्रांबरोबर प्रवासाला निघाल्याचे वर्णन येते. आपल्या किंवा मित्रांच्या टोळीने ज्या ठिकाणी पूर्वी कधीतरी तळ ठोकलेला असतो, त्या ठिकाणी मग कवी पोहोचतो. पूर्वकालीन वास्तव्याच्या काही खुणा अजूनही तेथे विखुरलेल्या असतात. कवीच्या पूर्वस्मृती जागृत होतात. आपल्या प्रियेच्या सहवासातील सोनेरी क्षण त्याला आठवतात. भटकंतीच्या जीवनामुळे प्रियजनांच्या झालेल्या कायमच्या ताटातुटी त्यास व्यथित करतात. दुसऱ्या खंडात कवीचा प्रवास पुन्हा सुरु होतो. त्यात आपला घोडा किंवा उंट याच्या गुणरुपांचे सुरेख चित्रमय वर्णन तो करतो. प्राणिसृष्टीच्या अशा रेखीव वर्णनात पुष्कळदा शिकारवर्णनेही असतात. नंतरच्या तिसऱ्‍या व अखेरच्या खंडात कवी जमातीच्या अनुभवक्षेत्राकडे वळतो. स्वकीयांची व आपल्या टोळीच्या नायकाची स्तुतिस्तोत्रे गातो.

 

अल्मुअल्लकात  या संग्रहात सात प्रसिद्ध कसीदांचे संकलन केलेले आहे. उकाजच्या निवडसमितीने ही सात काव्ये निवडली होती, असे सांगण्यात येते. ही सात काव्ये सुवर्णाक्षरांत लिहून मक्केमधील काबाच्या भिंतीवर टांगण्यात आली होती. कसीदांचे प्रमुख कवी म्हणजे इम्‍रू-उल्-कैस, अल्-हारिस-इब्‍न-हिल्लिझह, अंतर, जुहैर, लबीद, अम्र-इब्‍न-कुलसूम व तरफह हे होत [⟶ मु ‘अल्लकात , अल्].

 

वरील प्रदीर्घ काव्यांप्रमाणेच इतर प्रकारच्या तत्कालीन काव्यांचे संग्रहही केलेले आढळतात. अशा काव्यसंग्रहांना ‘दीवान’ असे म्हणतात. उपर्युक्त कवींपैकी इम्‍रु-उल्-कैस, अम्र-इब्‍न-कुलसूम, तरफह या कवींबरोबरच, जुहैर-बिन-अबी-सलमा, हसन इब्‍न साबित आणि अंतरह या इतरही कवींचे दीवान उपलब्ध झाले आहेत. हुझैल या नावाच्या अरब टोळीचाही एक दीवान सापडतो. अर्धवट स्वरुपात हाती लागणारी काही कवींची कविताही उपलब्ध झाली आहे. त्यात तअब्बत शर्रन व शनफरा हे दोन कवी, अदी इब्‍न जैद हा ख्रिस्ती कवी, समव-अल्-इब्‍न-आदिया हा ज्यू कवी व उमय्यह-इब्‍न अबिस्-सलत् हा धर्मप्रवण कवी यांचा समावेश होतो.

 

इस्लामपूर्व काळातील विविध कवींच्या कवितांचे संकीर्ण दीवानही संपादित करण्यात आले. त्यांपैकी अबू तम्माम (मृ.८४५) याने संपादित केलेला हमासह हा काव्यसंग्रह उल्लेखनीय आहे. मुफद्दलीयात या संग्रहातील काव्यवेचे इस्लामपूर्व आहेत. याशिवाय किताबुल्अगानी,किताबुश्शिअर वश्शुअरा आणि इक्दुल्फरीद या संग्रहांतही तत्कालीन उत्कृष्ट काव्यवेचे आढळतात.

 

इस्लामपूर्व काळातच अरबी छंद निर्माण झाले. अरबी छंदशास्त्राला ‘अरुद’ म्हणतात. छंदरचनेचे पहिले व्यवस्थापन आठव्या शतकात अल्-खलील इब्‍न अहमद याने केले. त्यात सोळा प्रमुख छंदप्रकारांचे विवेचन केलेले आढळते. अरबी छंदाचा प्राथमिक घटक अर्धचरणाचा असून त्यास मिस्त्रअ म्हणतात. दोन समतोल मिस्त्रअ मिळून जी अक्षरसंख्या बनते, तिच्यावर छंदप्रकार अवलंबून असतो. अक्षरांच्या लघुगुरुक्रमाला अर्थातच महत्त्व असते. काव्यरचनेत यमकांनाही महत्त्व असून यमकरचनेचे काटेकोर नियमही अरुदात आढळतात. अभिजात अरबी काव्याचे प्रमाणभूत छंद म्हणून वरील सोळा छंद प्रसिद्ध आहेत.

 

इस्लामपूर्व काळातील काव्यसृष्टीचा आणखी एक महत्त्वाचा विशेष म्हणजे काव्यगायन करणाऱ्या व्यावसायिकांचा वर्ग. त्यास ‘रावी’ असे म्हणत. इस्लामपूर्व अरबी काव्य मौखिक स्वरुपात जतन करण्याचे महत्त्वाचे कार्य या वर्गाने केले. अर्थात मौखिक संक्रमणाचे सगळे दोषही प्राचीन काव्यात शिरले व शुद्ध मूलसंहितांचा यक्षप्रश्न अरबी वाङ्मयात कायमचा निर्माण झाला. आठव्या शतकात हम्माद अर्-रावियह व खलफ अल्-अहमर या प्रसिद्ध शायरांनी प्राचीन काव्य लेखनबद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण शुद्ध संहितांच्या दृष्टीने त्यांचेही लेखन वादग्रस्त ठरले आहे.

 

आद्य इस्लामी व उमय्या कालखंड: या कालखंडाच्या सुरुवातीची अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे

कुराणाची रचना ही होय. अरबी भाषेतील या धर्मग्रंथाने त्या भाषेतील वाङ्मयाच्या विस्तार-विकासाचा पाया घातला. भाषासौंदर्य व अर्थव्यंजकता या दोन्ही बाबतींत हा धर्मग्रंथ अप्रतिम काव्यात्म-गद्याचा नमुना मानला जातो. मुहंमद पैगंबरांच्या मृत्यूनंतर सु. एकोणीस वर्षांनी म्हणजे ६५१ मध्ये कुराणाची रचना करण्यात आली. त्यात ११४ सूरा असून, त्यांची मांडणी संकीर्ण स्वरुपाची आहे. त्यातील काही भाग कथात्मक व कायदेविषयक असला, तरी बराच मोठा भाग मुहंमद पैगंबरांच्या प्रभावी, काव्यात्म व वक्तृत्वपूर्ण निरुपणाचा आहे. स्वधर्मीयांचे समर्थन व विरोधकांचा निषेध त्यात ओजस्वीपणाने केलेला आहे. सयमक गद्यात सर्व रचना केलेली असून ती अत्यंत परिणामकारक वाटते. मात्र कुराण  अननुकरणीय ठरविण्यात आले होते. शिवाय मुहंमद पैगंबरांचा काव्यविषयक दृष्टिकोन प्रतिकूल होता. इस्लामपूर्व काळातील कविविषयक दैवी कल्पना त्यांस एक थोतांड वाटे. अरब जमातींतील वैमनस्य वाढण्यास कवीच जबाबदार आहेत, असे त्याचे मत होते. इस्लामप्रणीत चारित्र्यशुद्धी व भ्रातृभाव यांच्या विरोधी असलेल्या काव्यकलेला, म्हणूनच मुहंमद पैगंबरांनी विरोध केला.

 

असे असले, तरी इस्लामच्या आरंभकाळात काही उल्लेखनीय कवी होऊन गेले. लबीद (५६०-६६१) या कवीने इस्लाम धर्म स्वीकारण्यापूर्वी सात प्रसिद्ध उद्देशिकांपैकी एक उद्देशिका रचलेली होती. हसन इब्‍न साबित या पूर्वोक्त कवीने मुहंमद पैगंबरांवर स्तुतिकाव्ये रचली. कअब या कवीनेही मुहंमद पैगंबरांना उद्देशून कसीदांची रचना केली आहे. मुहंमद पैगंबरांचा जावई अली याच्या कविता, वचने व भाषणे यांचे संपादन पुढे दहाव्या शतकात झाले. अलीची पत्‍नी फातिमा हिच्याही काही कविता उपलब्ध आहेत. या सुमाराची दुसरी एक उल्लेखनीय कवयित्री म्हणजे अल्-खन्सा (मृ. सु. ६४५) ही होय. आपल्या भावाच्या मृत्यूनंतर तिने रचलेली शोकगीते प्रसिद्ध आहेत. शोकगीतांना अरबी भाषेत ‘मर्सिया’ म्हणतात. या प्रकारचे काव्य विशेषतः तत्कालीन कवयित्रींनी लिहिलेले आहे.

 

या कालखंडातील अरबी कवींचा परिसर अनेक दृष्टींनी बदललेला होता. इस्लामी साम्राज्य वेगाने विस्तारत होते. सिरियातील इस्लाम राजाधिकारी मुआविया ६६१ मध्ये इस्लाम राजसत्तेचा सर्वाधिकारी बनला. तो उमय्या घराण्यातील होता. उमय्या घराण्याची सत्ता ७५० पर्यंत टिकून होती. मुआवियाने दमास्कस येथे राजधानी स्थापन केली. त्याच्या पदरी ख्रिस्ती व ज्यू विद्वान होते. त्यांच्या संपर्कामुळे अरबी विद्वानांना ग्रीक, रोमन, पर्शियन व भारतीय संस्कृतींचा जवळून परिचय होऊ लागला.


 राजकीय सत्ताविस्तारामुळे अरबी समाजाची अनेकांगी पुनर्घटना होऊ लागली. जमातीजमातींमधील स्पर्धा टिकून राहिली, तसेच तिच्यात राजकीय व धार्मिक संघर्षांची भर पडू लागली. कवीचे सामाजिक स्थान पूर्वीसारखेच राहिले असले, तरी पूर्वीचेच काव्यविषय व शैली नव्या संदर्भात अपुरी पडू लागली. या काळातील अरबी काव्यात फार मोठे परिवर्तन घडले नाही हे खरे, पण परिवर्तनाच्या खुणा मात्र उमटू लागल्या.

 

या काळात कसीदांचे पुनरुज्जीवन करण्यात आले पण त्यात इस्लामपूर्व काळातील गुणवत्ता नव्हती. कुराणातील शब्दकळेची व धार्मिक भावनांची या नव्या रचनेत पखरण घालण्यात आली तथापि या प्रकारचे नूतनीकरण फारसे यशस्वी झाले नाही.

 

अरबी काव्यक्षेत्रातील या काळातील खरी महत्त्वाची घटना म्हणजे ‘गझल’ या काव्यप्रकाराचा उद्गम ही होय. मक्का व मदीना येथील संपन्न व विलासी वातावरणात या प्रणयप्रधान गीतरचनेचा जन्म झाला. कुरैश सरदारांच्या पदरी पर्शियन व ग्रीक गायक होते. त्यांच्या प्रभावातूनच अरबी गझल अवतरले. कसीदांच्या तुलनेने गझल-रचना अत्यंत साध्या व संवादात्मक शैलीने व गायनानुकूल बनविलेल्या पारंपरिक छंदातून करण्यात आली. गझल-गीतरचनेचा या कालखंडातील सर्वश्रेष्ठ कवी उमर इब्‍न अबी रबीअह (मृ.७२०) हा होय. तरल संवेदनक्षमता हा त्याच्या गझलांचा विशेष गुण आहे. त्याच्या अनिर्बंध व उत्कट प्रीतिगीतांनी इस्लामप्रणीत नीतिकल्पनांचा अधिक्षेप झाल्याने त्यास हद्दपारही व्हावे लागले. गझलरचनेतील दुसरा एक प्रवाह मदीनेच्या परिसरातील कवींच्या काव्यात आढळतो. त्यात स्वप्नाळू व निराश प्रीतीची आदर्शवादी वर्णने दिसून येतात. रबीअह व मक्केच्या परिसरातील इतर प्रेमकवी नागर पार्श्वभूमीवर वास्तव प्रेमाचा आविष्कार करीत. उलट मदीनेच्या कवींचे भावविश्व प्राचीन भटक्या जीवनाच्या अद्‍भुतरम्यतेत गुंतून पडलेले होते. या दुसऱ्‍या गझल-प्रकारचा जमील (मृ.७०१) हा प्रवर्तक होता. जमील हा उझरा घराण्यातील असल्याने या गझलांना पुष्कळदा ‘उझ्राई गझल’ म्हणून संबोधण्यात येते. जमीलच्या गझलांना झपाट्याने लोकप्रियता लाभली व प्रीतीचे हुतात्मे म्हणवून घेणाऱ्‍या खऱ्‍याखोट्या कवींची एक प्रदीर्घ परंपरा, नंतरच्या हजार वर्षांत अरबी, पर्शियन व तुर्की भाषांत निर्माण झाली. इराकमध्ये या गझलांचा विशेष प्रभाव पडला. झुअररूम्मह (मृ.७३५) हा एक उल्लेखनीय गझलकार होय. उमर इब्‍न अबी रबीअहच्या गझलांचा प्रभाव सिरियात विशेषत्वाने टिकून राहिल्याचे दिसते.

 

उमय्या कालखंडातील काव्याचा आणखी एक विशेष होता. तो म्हणजे उमय्या घराण्यातील आरंभीचे राज्यकर्तेही काव्यरचना करीत. मुआवियाची राणी मैसुना राजमहालातील विलासी जिण्याचा भ्रमनिरास व्यक्त करून वाळवंटातील भटक्या जीवनाची ओढ प्रगट करते. तिची कविता म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण वाटते. मुआवियाचा मुलगा याझीद हाही कवी होता. मदिरा व मदिराक्षी हे त्याचे काव्य-विषय होते. याझीदनंतरचा इस्लाम सम्राट दुसरा वालिद याचीही काही कविता उपलब्ध आहे.

 

लैला-अल्-अख्यलीयह ही याच कालखंडातील उल्लेखनीय अरबी कवयित्री होय. तिची शोकगीते प्रसिद्ध आहेत. अखतल हा तगलिब घराण्यातील ख्रिस्ती कवी होय. प्रणय व मदिरा हे याही कवीचे काव्यविषय होते.

जरीर  (मृ.७२८) हा इराकमधील कवी त्याच्या तीक्ष्ण औपरोधिक काव्यरचनेसाठी प्रसिद्ध आहे. फरजदाक (मृ.७२८) ह्या कवीच्या आरंभीच्या रचनेत आत्यंतिक बंडखोरी असली, तरी नंतर मात्र त्याची कविता सौम्य व धर्मप्रवण बनली. अलीच्या नातवावर लिहिलेले त्याचे शोकगीत प्रसिद्ध आहे. लैला-मजनूची जगप्रसिद्ध प्रेमकथा ज्याच्या जीवनाशी निगडित आहे, तो कैस बिन उमर हा कवी याच कालखंडात होऊन गेला. लैला नावाच्या स्त्रीवर त्याचे प्रेम होते. मजनू म्हणजे वेडा. त्या नावाने पुष्कळदा उमरचा निर्देश करण्यात येतो. जमील व उमर यांनी दीर्घ प्रेमकथांची रचना केलेली आहे. ‘रजझ’ छंदात नव्याने कसीदा रचण्याचा प्रयोग करणाऱ्‍या कवींत अज्जाज व रुआबह या पितापुत्रांचा उल्लेख आवश्यक ठरतो.

 

धार्मिक गद्य: इस्लामच्या आरंभकाळात कुराणाच्या अनुषंगाने ‘हदीस’ म्हणजे मुस्लिम स्मृतींचा उदय झाला. त्यात मुहंमद पैगंबरांची वचने संगृहीत केलेली आढळतात. ही वचने शुद्धाशुद्धतेच्या दृष्टीने पारखून घेण्यासाठी एक स्वतंत्र मुस्लिम चिकित्साशास्त्रच निर्माण झाले. हदीस स्मृतिग्रंथांचे प्रत्यक्ष संपादन मात्र नंतरच्या काळात अल्-बुखारी (मृ.८७०) व मुस्लिम (मृ.८७६) यांनी केले. स्मृतिग्रंथांच्या गरजेतूनच चरित्रात्मक लेखनाची निर्मिती होऊ लागली. मुहंमद पैगंबर व त्यांची प्रभावळ यांसंबंधीचे चरित्रात्मक लेखन हळूहळू निर्माण होऊ लागले. इब्‍न इस्‌हाक याचे पैगंबरचरित्र उल्लेखनीय आहे. कुराणावरील भाष्यग्रंथ प्रथम याच कालखंडात निर्माण होऊ लागले. त्यांना ‘तफ्सीर’ असे म्हणतात. मुहंमद पैगंबरांचा चुलतभाऊ अबदुल्ला याने एक भाष्यग्रंथ लिहिला होता पण तो आज उपलब्ध नाही. धर्माखेरीज अन्य विषयांवरील गद्यलेखनही याच काळात निर्माण होऊ लागले. मूसा बिन अकबह (मृ. ७५८) याने आरंभीच्या मुस्लिम युद्धकथा लिहिल्या.

 

अब्बासी कालखंड: मुहंमद पैगंबरांच्या अब्बास नावाच्या चुलत्याच्या वंशजांना अब्बासी म्हणतात. इ.स. ७५० मध्ये इस्लाम साम्राज्यसत्ता त्यांच्या हाती आली. बगदाद ही त्यांची राजधानी होती. इस्लामी सत्ता व अरबी साहित्य या दोहोंचा हा सुवर्णकाल होय. इ.स. १२५८ मध्ये मंगोल टोळ्यांनी अब्बासी साम्राज्याचा अंत घडवून आणला. परंतु तत्पूर्वीच्या तीनचार शतकांच्या काळात अरबी ज्ञानविज्ञान व कला-साहित्य यांची भरभराट झाली.

 

काव्य: या कालखंडातील अरबी काव्यात बरेच परिवर्तन घडून आले. इराणी संस्कृतीचा संपर्क, सुसंस्कृत नागर जीवनाची परंपरा व बदललेली ऐतिहासिक परिस्थिती यांचा संकलित परिणाम होऊन अरबी काव्य नव्या आशय-अभिव्यक्तीकडे वळू लागले. नवव्या शतकातील इब्‍न कुतैबह व अकराव्या शतकातील अस्-सआलिबी हे समीक्षक नव्या काव्यकल्पनांचे समर्थक होते. जुनेनवेपण ही काव्याची कसोटी नसून खरे काव्यगुण हेच त्याचे निकष होत, असा त्यांचा दृष्टिकोन होता. आठव्या शतकातील आद्य अरबी छंदोरचनाकार अल् खलील इब्‍न अहमद हा कसीदादी प्राचीन काव्याचे आदर्श मान्य करणारा अभिजात समीक्षक होता. काव्यक्षेत्रातील हा नव्याजुन्याचा वाद नवव्या शतकापर्यंत व नंतरही चालू राहिला, तथापि अरबी काव्य मात्र हळूहळू बदलतच गेले. त्यात विषयांचे नावीन्य व वैविध्य निर्माण झाले. ते अधिकाधिक अंतर्मुख बनू लागले. शैलीत सफाईदारपणा व आलंकारिकता उमटू लागली. मात्र ते काव्य मूलतः राजाश्रयी राहिल्याने त्यात कृत्रिमताही निर्माण झाली. प्राचीन अरबी काव्यातील सहजता, साधेपणा व निसर्गाचे स्फूर्तिस्थान यांचा नव्या काव्यात अभाव होता.

 

बश्शार बिन बुर्द (मृ.७८३) हा खोरासान प्रांतातील जन्मांध कवी अरब वर्चस्वाचा विरोधक होता. अबू दुलामह (मृ.७७८) हा ॲबिसिनियन निग्रो कवी दरबारी भाट होता. राजप्रशंसेबरोबरच त्याच्या कवितांत भावनोत्कटताही आढळते. अबू नुवास (ज.७५६) हा या कालखंडातील एक श्रेष्ठ कवी होय. हारुन-अल्-रशीद या प्रसिद्ध इस्लामी सम्राटाचा तो मित्र होता. उपरोधपूर्ण रचना, शिकारीची गाणी, शोकगीते, प्रणयाच्या व भ्रमंतीच्या कविता त्याने रचलेल्या आहेत. आयुष्याच्या शेवटी त्याने धार्मिक व नीतिपर काव्यरचना केली. स्फुट काव्यरचनेचा कलात्मक उत्कर्ष त्याच्या रचनेत आढळतो. वृत्तरचनेतही त्याने विविधता आणली. अबुल अताहियह हा या काळातील दुसरा एक श्रेष्ठ कवी होय. हा देखील हारुन-अल्-रशीदच्या दरबारी होता. उतबह नावाच्या आपल्या प्रेयसीवर त्याने सुंदर कविता रचलेल्या आहेत. प्रेमनिराशेमुळे अखेर त्याची कविता गूढवादी, तात्त्विक व नीतिप्रवण बनली. या प्रकारच्या रचनेचा फार मोठा परिणाम तत्कालीन कवींवर झाल्याचे दिसते. फजल (मृ.८७३) ही या काळातील एक उल्लेखनीय कवयित्री होय. स्वतःच्या स्वैर जीवनाची उत्कट पार्श्वभूमी तिच्या प्रेमकाव्याला आहे. महबूबह नावाची संगीतकुशल गीतकर्त्री जाफरच्या दरबारी होती. अबू तम्माम याने सांकेतिक स्वरुपाच्या स्तुतिगीतांच्या रचनेबरोबरच हमासह नावाचे इस्लामपूर्व काव्याचे संकलन प्रसिद्ध केले. अल् बुह्‌तुरी हा तम्मामचा समकालीन कवी इस्लामपूर्व काव्याचा संग्राहक म्हणून उल्लेखनीय आहे. अबू नुवासच्या शैलीचे अनुकरण करुन प्रासंगिक कविता रचणारा इब्‍नुल्-मुअतज्ज हा कवी साहित्येतिहासकार असून अलंकारशास्त्रावरील त्याचा ग्रंथ उपलब्ध आहे.


 याच काळात उत्तर सिरियातील अलेप्पो येथील हमदानी राजवटीत काही उल्लेखनीय अरबी कवी होऊन गेले. अबू फिरास हा राजपुत्र उत्तम लढवय्या व उत्तम कवी होता. त्याने कारागृहात लिहिलेली कविता प्रभावी आहे. हमदानी राजवटीतील सर्वश्रेष्ठ कवी ⇨ अल्मुतनब्बी (९१५-६५) हा होय. त्याची शैली म्हणजे एक चमत्कार असे मानले जाई. अरबी भाषेवर त्याचे असामान्य प्रभुत्व होते. अर्थघनता, अर्थपूर्ण कल्पनाचित्रे, सफाईदार घाट व विशुद्ध भाषा हे त्याचे काव्यगुण त्याच्या उपलब्ध ‘दीवाना’ तील कवितांत आढळतात. आदर्श काव्याचा मानदंड म्हणून त्याच्या काव्याकडे पाहिले जाते. ⇨ अबुअल्अलाअल्अर्री (९७३–१०५७) हा विद्वान तत्त्वज्ञ कवी याच काळात होऊन गेला. वयाच्या चौथ्या वर्षी देवी आल्याने त्याची दृष्टी गेली होती. सकतुल्‌जनद व लुजूमीयात हे त्याचे काव्यग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्याची तत्त्वप्रणाली संशयवादी होती.

 

या कालखंडातील अबुलफतह अल् बस्ती (९७१–१०१०) या अफगाणिस्तानातील कवीचा ‘दीवान’ अरबी काव्याचे भूषण मानला जातो. त्याची कविता नीतिप्रवण व उपदेशप्रधान आहे. अली अल्-बखार्जी (मृ. १०७५) या कवीचा एक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. अबुल मुजफ्फर मुहंमद अल्-अबीवादी (मृ. १११३) हा इस्लामी परंपरेचा व्यासंगी कवी उल्लेखनीय होय. त्याचे इराकियात, ज्‌दियात व वज्दियात हे तीन काव्यसंग्रह उपलब्ध असून त्यांत अनुक्रमे स्तुतिपर रचना, मध्य अरबस्तानासंबंधीची कविता व शृंगारिक गीते आहेत.

 

अँडलूझीया म्हणजे स्पेनमधील इस्लामी सत्तेचा प्रदेश, अरबी वाङ्‌मयनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. इ.स. ७५६ पासून १४९२ पर्यंत स्पेनमध्ये इस्लामी सत्ता होती. कॉर्डोव्हा ही तेथील सुरुवातीची राजधानी होय. अँडलूझीयातील अरबी साहित्यावर नागरी जीवनाचा व पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम झालेला आढळतो. निसर्गसौंदर्य व प्रणय हे अँडलूझीयामधील काव्याचे मुख्य विषय होते. ‘मुवश्शह’ व ‘झजल्’ हे दोन वैशिष्ट्यपूर्ण रचनाप्रकार अँडलूझीयामधील कवींनीच प्रथम रुढ केले. मुवश्शह या रचनाप्रकारात चार, पाच किंवा सहा चरणांची कडवी असून विविध प्रकारची यमकयोजना आढळते. शेवटच्या दोन चरणांत उद्दिष्ट व्यक्तीचा निर्देश असतो. झजल्‌ची रचनाही या प्रकारची असली, तरी बोलीभाषेचा उपयोग हे त्याचे वैशिष्ट्य होय. या दोन्ही रचनाप्रकारांचा मुख्य विषय शृंगार हाच होता. इब्न जैदून (१००३–७१) हा इस्लामी स्पेनमधील एक श्रेष्ठ कवी होय. त्याने अभिजात शैलीने उद्देशिका लिहिल्या. प्रेमविषयक व प्रासंगिक भावगीतेही त्याने रचली. त्याची प्रेयसी वल्लादह हीदेखील कवयित्री होती. इब्न अम्मार या शूर वजिराची प्रेमकविताही उपलब्ध आहे. झजल् या रचनाप्रकाराला लोकप्रियता मिळवून देण्याचे कार्य इब्न कुजमान (१०९५–११५९) याने केले. इब्न साह्‌ल् या मूळ ज्यू कवीची ‘मुवश्शह’ रचना उल्लेखनीय आहे. ⇨इब्हानी, इब्न रशीक, अँडलूझीयाचा राजा मुअतमिद, सिसिलीचा प्रसिद्ध कवी इब्न हमदीस्, इब्न खफाजह व अत्-तुरतूशी हेही पाश्चात्य मुस्लिम प्रदेशातील काही उल्लेखनीय अरबी कवी होत. याच काळातील दोन कसीदा विशेष महत्त्वाच्या आहेत. पहिली तुगराई याचीलामियातुलअजम (११११) ही व दुसरी ईजिप्तमधील कवी अल्-बूसीरी याची अल् बुर्दह ही होय. यांपैकी दुसरी कसीदा मुहंमद पैगंबरांसंबंधी असून तिला मुस्लिम समाजात धर्मग्रंथाचे माहात्म्य प्राप्त झाले आहे.

 

सूफी कवींचे काव्य : सूफी पंथ आठव्या शतकात उदयास आला. स्वपीडित साधेपणा व संन्यस्तवृत्ती यांस इस्लाम धर्माचा विरोध होता. उमय्या राज्यकर्त्यांची सर्वंकष सत्ताभिलाषा व भोगवादी प्रवृत्ती यांची प्रतिक्रिया म्हणून, कुराणाचा विरोध असूनही, अरबी समाजात संत उदयास येऊ लागले. बसरा येथील हसन हा आरंभीच्या काळातील एक प्रमुख सूफी संत होय. नवव्या शतकापासून ‘सूफी’ ही संज्ञा प्रचारात आली. ‘सूफ’ म्हणजे लोकर. सूफी संत घोंगडीसारखे लोकरीचे प्रावरण अंगावर घेत त्यावरुन सूफी ही संज्ञा रुढ झाली असावी, असे एक मत आहे. खोरासानमधील बाल्खचा राजपुत्र इब्राहिम बिन अद्हम (८ वे शतक), शकीक, फुदैल बिन इयाद व हसनच्या प्रभावळीतील संत कवयित्री रबिअह हे आरंभीच्या काळातील सूफी संत होत. बसरा व कूफा ही दोन शहरे ‘तसव्वुफ’ म्हणजे सूफी पंथाची पहिली केंद्रे होती.कुराणातील साक्षात्काराच्या पदांत व नंतरच्या मुस्लिम स्मृतिग्रंथांत या पंथाचे बीज असावे. नवव्या शतकात बगदाद हे या संप्रदायाचे केंद्र बनले व या ठिकाणी ग्रीक तत्त्वज्ञान, ख्रिस्ती आश्रमजीवन व हिंदू साक्षात्कारवाद यांचा प्रभाव सूफी विचारप्रणालीवर पडला. खोरासान व इराण येथील सूफीपंथीय संतांवर तो प्रभाव अधिक पडल्याने अरबी भाषेच्या तुलनेने फार्सी भाषेत साक्षात्कारवादी वाङ्‌मय व विशेषतः काव्य अधिक प्रमाणात निर्माण झाले. नंतरच्या काळात विविध स्वरुपांत सूफी विचारसरणीचा विकास व विस्तार होत राहिला.

 

सूफीपंथीय अरबी वाङ्‌मयात ईश्वरी प्रेम, भक्तिभाव व साक्षात्काराच्या अनुभूती यांची प्रतीकरूप अभिव्यक्ती आढळते. मद्य, साकी व प्रेयसी यांची प्रतीके वारंवार योजिलेली आहेत. अबू-अब्दुल्लह अल् मुहासिबी (मृ. ८५७), झुन्नुन व बायजीद (मृ. ८७५) हे काही उल्लेखनीय सूफी संतकवी होत. कुशैरी (मृ.१०७२) या खोरासानच्या सूफी संताने आपल्या दोन प्रबंधांत-‘रिसाल’- सूफी विचारसरणी मांडलेली आहे. ⇨ अब्दुल कादिर जीलानी (१०७८–११६६) याचे तीन गद्यग्रंथ व एक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. उमर इब्नुल्फरीद (११८१–१२३५) याचा ‘दीवान’ विख्यात असून, त्यातील मद्यविषयक कविता उल्लेखनीय आहे. मुहमुद्दीन मुहम्मद इब्नुल्-अरबी (११६५–१२४०) हा अरबी जगातील सर्वश्रेष्ठ सूफी संत मानला जातो. त्याच्या नावावर सु. तीनशे ग्रंथ असून त्यांपैकी ‘मक्केचे साक्षात्कार’ या ५६० प्रकरणांच्या विस्तृत ग्रंथात सूफी संप्रदायाचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे. त्याचे काव्यही प्रसिद्ध आहे [⟶ सूफी पंथ].

 

ललित गद्य: राजकीय सत्तेच्या व लौकिक संपन्नतेच्या विस्तारकालात अरबी वाङ्मयाच्या विकासाला नवनवीन दिशा लाभणे स्वाभाविक होते. इराणमधून भारतीय संस्कृतीशी व स्पेन, सिरिया व इराकमधून ग्रीक व रोमन संस्कृतींशी मुस्लिमधर्मीयांचा संबंध आला. अशा वातावरणात अरबी ललित गद्य निर्माण होऊ लागले. त्यास ‘अदब’ असे म्हणतात. त्याची सुरुवात संस्कृत ⇨पंचतंत्राच्या पेहलवी भाषेतून केलेल्या अरबी अनुवादाने झाली. हा अनुवाद आठव्या शतकाच्या उत्तरार्धात फार्सी लेखक इब्‍नुल्-मुकफ्फअ याने केला. कलीला वा दिमना हे त्या अनुवादाचे अरबी शीर्षक आहे. इब्‍नुलमुकफ्फअचे अद्दुर्रतुल्यतीमह  हे राजनिष्ठेवरील व सियरु मुलूकुलअजम  हे इराणच्या शहांवरील अनुवादित पुस्तक प्रसिद्ध आहे. इब्न -कुतैबह (मृ. ८८९) हा श्रेष्ठ अरबी गद्यलेखक असून कवी आणि काव्य, लेखनशुद्धी व लेखनशैली तसेच इतर विविध विषय यांसंबंधीचे त्याचे ग्रंथलेखन महत्त्वाचे आहे. स्मृतिग्रंथाचे (हदीस) आधार विशद करणाऱ्‍या त्याच्या पुस्तकांत राज्यशासन, युद्धशास्त्र व सामाजिक संबंध यांसारख्या विषयांवरील विवेचन आढळते. अल्-जहिज (मृ.८६९) या बहुश्रत लेखकाने भाषासौंदर्य, प्राणिजीवन, शिष्टाचारपद्धती व मानवी स्वभाव यांसंबंधी विपुल लेखन केले. इब्‍नु अब्दी-रब्विही (मृ.९४०) याने आपल्या पुस्तकात ऐतिहासिक कथा, चरित्रे, काव्यवेचे व थोरांची भाषणे यांचा एक खजिनाच संकलित केला आहे. अबुल-फराज अल्-इस्फहानी (८९७–९६७) याने अरबी गीतांचा संग्रह संपादित करून त्यात कवी, गीतगायक, संगीतकार यांबरोबरच खलीफांचे इतिहास, समाजस्थिती यांसंबंधी विपुल माहिती दिलेली आहे. खोरासान येथील अस्-सआलिबी (मृ.१०३७) हा काव्यसमीक्षक उल्लेखनीय असून त्याची काव्यसमीक्षा त्याने संग्रहित केलेल्या अरबी काव्यग्रंथांत आढळते. इब्‍न नदीम (मृ.९९६) या बगदादच्या ग्रंथपालाने तयार केलेली ग्रंथसूची प्रसिद्ध आहे.


 दहाव्या शतकात अरबी गद्यात ‘मकामात’ हा वैशिष्ट्यपूर्ण रचनाप्रकार निर्माण झाला. मकामात म्हणजे संवादात्मक शैलीने व यमकप्रचुर भाषेत एका काल्पनिक निवेदकाने सांगितलेल्या चित्ताकर्षक कथा होत. मकामातचा प्रवर्तक बदीउज्जमान हमदानी हा होय. त्याच्या मकामातरचनेत अनेक कविताही उद्‌धृत केलेल्या आढळतात. हरिरी हादेखील एक श्रेष्ठ मकामात-रचनाकार होय.

 

शौर्यकथा, प्रेमकथा व साहसकथा यांची परंपरा जुनी असली, तरी त्यांचे लेखन मात्र दहाव्या शतकापासून होऊ लागले. एक हजार आणि एक रात्री किंवा ⇨ अरेबियन नाइट्स या जगप्रसिद्ध कथांचे पहिले संकलन बसरा येथे दहाव्या शतकात झाले असावे. त्यांचे अरबी शीर्षक अल्फ लय्लह व-लय्लह  असे आहे. या कथांचे मूळ भारतीय असून इराणमधील पेहलवी भाषेतून त्यांचा अरबी वाङ्‌मयात अनुवादरूपाने प्रवेश झाला असावा. अर्थात या कथांचे प्रचलित स्वरुप शतकानुशतके संस्कारित होऊन अठराव्या शतकात स्थिर झाले. त्यात इराक, सिरीया व ईजिप्त देशांतील ऐतिहासिक कथांचाही अंतर्भाव करण्यात आला. मु्स्लिम विद्वान मात्र अभिजात अरबी साहित्यात या कथांची गणना करीत नाहीत. ‘अरबांचे इलिअड’ म्हणून काही जणांनी गौरविलेल्या अंतरहसंबंधीच्या साहसकथा याच काळात निर्माण झाल्या. इस्लामपूर्व-काळातील उद्देशिकांचा एक श्रेष्ठ कवी अंतरह याच्या जीवनावर प्रस्तुत कथा आधारलेल्या आहेत. बानूहिलाल  या लोकप्रिय कथामालेत उत्तर आफ्रिकेतील त्या नावाच्याच टोऴीतील साहसी स्त्रीपुरुषांच्या अद्‌भुतरम्य कथा आहेत. सइफ जुल-यजोन या नावाच्या नायकावर रचलेल्या साहसकथाही उल्लेखनीय आहेत. लुकमानच्या नीतिकथांचे मूळ इसापच्या ग्रीक नीतिकथांत असून सिरियॅक अनुवादाच्या आधारे त्यांचा अरबी अवतार सिद्ध झाला असावा. लुकमान या साधुपुरुषाचा उल्लेख कुराणात दोनदा आलेला आहे. उद्बोधक अशा छोट्या छोट्या कथांची तीन संकलने तनूखी (९४०–९९४) या लेखकाच्या नावावर आढळतात. निश्वरुलमुहादरह, मुस्तजाद  अल्फरज बादश्शिद्दह अशी त्यांची नावे आहेत. त्या काळी प्रचलित असलेल्या लोककथा व अन्य प्रकारच्या दीर्घकथा जहश्‌यारी (मृ.९४२) याने संकलित केल्या. या कालखंडात ऐतिहासिक कथासाहित्यही निर्माण झाल्याचे दिसते. इब्‍न अब्दिल्-हकम (मृ.८७१) याच्या ऐतिहासिक कथांत ईजिप्त व उत्तर आफ्रिकेतील मुस्लिम स्वाऱ्‍यांचे वर्णन आढळते. नंतरच्या काळात वाकिदी याने ‘हुसेनच्या मृत्यूची कथा’, ‘सिरियातील विजयाची कथा’ यांसारखे लेखन केले.

 

समीक्षा: अरबी साहित्यातील विविधतेचा, विपुलतेचा व विशेषतः भाषाशास्त्रीय लेखनाचा प्रभाव अरबी साहित्यसमीक्षेवर होणे स्वाभाविक होते. प्रारंभीच्या भाषाशास्त्रीय लेखनात अधूनमधून अभिप्राय-स्वरूपाची समीक्षा आढळते. पध्दतशीर काव्यसमीक्षेचे पहिले प्रयत्न अल् जहिज व इब्‍न अल्-मुअतज्ज यांनी केले. कुदामह बिन जाफर (मृ.९२२) याने काव्यसौंदर्य व काव्यदोष यांचे वर्गीकरण केले. दहाव्या शतकाच्या अखेरीस रचनातंत्र, अलंकरणप्रक्रिया व भाषासौंदर्य या घटकांच्या आधारे साकल्यात्मक काव्यसमीक्षा रूढ करण्याचे कार्य अबू हिलाल अल्-अस्करी (मृ.१००५) याने केले. तत्कालीन समीक्षेचा भर आशयापेक्षा आभिव्यक्तीवर अधिक होता. नंतरच्या काळात अब्द-अल्-कहीर अल्-जुर्जानी (मृ.१०७८) याने आपल्या तर्कशास्त्रीय व मानसशास्त्रीय काव्य-विवेचनाने आशयाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला. आकृतिवादी समीक्षेच्या प्रभावातून अरबी गद्यरचनेतही काही नवे विशेष रूढ झाले. ‘फुसूल’ म्हणजे परिच्छेदरचना, ‘रसाइल’ म्हणजे प्रासंगिक पत्ररचना, ‘इन्शा’ म्हणजे शासकीय लेखनपद्धती, ‘सजअ’ म्हणजे यमकप्रचुर नादमधुर गद्यरचना आणि पूर्वोत्त्क ‘मकामात’ हे त्यांपैकी काही महत्त्वाचे शैलीप्रकार होत.

 

भाषाशास्त्र–व्याकरण–कोश : कुराणामुळेच अरबी भाषाशास्त्रीय लेखनास प्रेरणा मिळाली. भाषाविषयक अभ्यासाचा आरंभ इराकमध्ये झाला. इस्लामपूर्व अरबी काव्याचे लेखन आठव्या शतकात होऊ लागले. भाषाध्ययनास त्याचा व कुराणरचनेचाही फार मोठा उपयोग झाला. अल् खलिल (मृ.७९१) याने केवळ अरबी छंदशास्त्रच रचले असे नव्हे, तर ध्वनितत्त्वांना अनुसरून अरबी शब्दकोशही तयार केला. त्यावर भारतीय भाषाशास्त्राचा प्रभाव असावा, असे दिसते. सीबवैह (मृ.७९३) या त्याच्या इराणी शिष्याने पहिले अरबी व्याकरण रचले. त्या काळी बसरा व कूफा या ठिकाणी अरबी वैयाकरणांचे दोन विरोधी गट कार्य करीत होते. शब्दकोशरचनेचे काम नंतरच्या काळात इब्‍न दुरैद जौहरी व इब्‍न फारिस यांनी केले. इब्‍न मंजूर (मृ.१३११) याचा लिसानुल् अरब  हा शब्दकोश आजही प्रचलित आहे. १९५५-५६ मध्ये अहमद फारिस याने पंधरा खंडात त्याची नवी आवृत्ती प्रकाशित केली. अल्-फीरोझाबादी (मृ.१४१४) याचा अल्-कामूस हा छोटा शब्दकोश १८ व्या शतकात, मुर्तुदाअल्-जाबिदी याने प्रसिद्ध केला. तो आजही वापरात आहे.

 

विविध विषयांवरील कोशरचनाही या कालखंडात झालेली दिसते. भाषाशास्त्रज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, कुराणाचे भाष्यकार, सूफी विचारवंत व वैद्यकशास्त्रज्ञ यांवरील चरित्रात्मक कोशांना ‘तबकात’ असे म्हणतात. अशा कोशलेखनात लोकजीवनाचेही दर्शन घडते. त्यातील शैली कथात्मक असून त्यातून विनोदही आढळतो. चौदाव्या व पंधराव्या शतकांत अधिकारीवर्गाच्या उपयोगासाठी विविध विषयांवरील लहान लहान माहितीपर ग्रंथ निर्माण झाले. अन्-नुवारी (मृ.१३३२) व इब्‍न फजलुल्लाह (मृ.१३४८) यांची नावे या संदर्भात उल्लेखनीय आहेत.सुब‌्हुअअ्शा  हा अल्-कुलकशंदी (मृ. १४१८) याचा लघु-ज्ञानकोश वैशिष्ट्यपूर्ण आहे.

 

चरित्रे व इतिहास: आरंभीच्या अरबी इतिहासलेखनाची काही वैशिष्ट्ये होती. इस्लामपूर्व-काळातील जमातींचा लिखित व अलिखित इतिहास दंतकथांनी भरलेला असे. ‘हदीस’ म्हणजे इस्लामी स्मृतीशास्त्रांच्या नियमांनुसार इतिहासलेखनात ‘इस्नाद’ म्हणजे पुराव्यांची गर्दी झालेली दिसे. ‘तवारीख’ म्हणजे इतिहास, या अरबी कल्पनेमुळे केवळ कालानुक्रमालाच महत्त्व देऊन इतिहासाचे लेखन करण्यात आले. त्यामुळे ऐतिहासिक तत्त्वदृष्टीने इतिहास लिहिण्याकडे दुर्लक्ष झाले. याशिवाय सुरूवातीचे इतिहासलेखन मुहंमद पैगंबर व खलीफा यांच्या चरित्रांभोवती घोटाळताना दिसते.

 

मुहंमद पैगंबरांच्या चरित्रकारांत इब्‍न अकबह (मृ.७५८), अबू मिखनफ (मृ.७४८), माकिदी (मृ.८२३), अबू उबैदह (मृ.८२५), अल्-मदायिनी (मृ.८४०) व इब्‍न-सअ्द (मृ.८४५) यांचा समावेश होतो. सर्वोत्कृष्ट व लोकप्रिय चरित्रग्रंथ इब्‍न इस्‌हाक (मृ. ७६७) याचा असून त्यात इस्लामपूर्व अरबस्तानचे वर्णन आढळते. बाराव्या शतकानंतर चरित्रात्मक संकलने आणि चरित्रकोश यांची निर्मिती होऊ लागली. त्यांपैकी इब्‍न खल्लिकान याचा चरित्रकोश व याकूत याचामुअजमुल्उदबा  हा विद्वान व्यक्तींचा चरित्रकोश हे उल्लेखनीय आहेत.


 इतिहासग्रंथांचे लेखन नवव्या शतकापासून होऊ लागले. अल्-याकूबी (मृ.८९१), अल्-बलाझुरी (मृ.८९२), अल्-तबरी (मृ.९२३) व मसूदी हे महत्त्वाचे इतिहासकार होत. यांपैकी अल्-तबरीचा इतिहास विस्तृत असून त्यात ९१४ पर्यंतचा मुस्लिम इतिहास अंतर्भूत होतो. हा इतिहासग्रंथ नंतरच्या काळातील इतिहासकारांचा प्रमुख आधारग्रंथ ठरला. बाराव्या शतकानंतर जे इतिहासकार होऊन गेले, त्यांपैकी ⇨अल्बीरूनी, अबुल फरज, ⇨इब्‍न खल्दून, अस्-सुयूती व हाजी खलीफह हे विशेष महत्त्वाचे आहेत. यांतील इब्‍न-खल्दून (१३३२–१४०६) याने आपल्या ग्रंथात प्रथमच इतिहासाचे तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला. ज्ञानकोशाप्रमाणे असणाऱ्‍या त्याच्या इतिहासग्रंथात इतिहास हा तत्त्वज्ञानाचाच एक अंगभूत घटक झालेला दिसतो. अरबी समाजशास्त्राचाही नकळत पाया घालण्याचे कार्य खल्दूनने केले, असे मानण्यात येते.

 

गझनीच्या महंमदाचा इतिहास लिहिणारा अल्-उत्‌बी सलादुद्दीनचा इतिहास रचणारा इमादुद्दीन अल्-इस्फहानी अल्-तबरीच्या परंपरेतील मिस्‌कवैह व इब्‍न अल्-असीर ईजिप्तचा इतिहासकार अल्-मकरीजी (मृ.१४४२) व तैमूरचे चरित्र लिहिणारा इब्‍न अरबशाह (१३९२–१४५०) हे याच काळातील उल्लेखनीय इतिहासकार आहेत.

 

स्थानिक राजघराण्यांची कुलवृत्तेही या काळात लिहिण्यात आली. ऐतिहासिक घटनांची केवळ नोंद व राजप्रशस्ती ही त्यांत आढळून येतात. अब्द-अल्-लतीफ याचा ईजिप्तमधील राजकुलवृत्तांत मात्र त्यास अपवाद आहे. अल्-खतीब अल्-बगदादी (मृ. १०७१) याचा बगदादचा इतिहास व इब्‍न असाकिर (मृ.११७६) याचा दमास्कसचा इतिहास विस्तृत व विद्वत्तापूर्ण आहेत. या काळातील इतिहासलेखनाचा अखेरचा उल्लेखनीय प्रयत्न म्हणजे अल्-मक्करी (मृ.१६३२) याचा मुस्लिम स्पेनचा इतिहास. त्यानंतरच्या काळातील तुर्की सत्तेच्या अमदानीत अरबी इतिहासलेखनाची परंपरा नष्ट झाली.

 

भूगोल : मुस्लिम राज्यकर्ते, सरकारी अधिकारी, यात्रिक व प्रवासी यांच्या गरजेतून अरबी भाषेत भूगोलविषयक लेखन निर्माण झाले. आरंभीच्या या प्रकारच्या लेखनावर ग्रीक लेखक टॉलेमी याच्या लेखनाचा प्रभाव आढळतो. इ.स. ७४० मध्ये नदहर या बसरा येथील विद्वानाने भूगोलविषयक पहिला अरबी प्रबंध लिहिला. सुरुवातीचे भौगोलिक लेखन मुख्यतः वर्णनात्मक होते. त्यात मुस्लिम व्यापाऱ्यांनी लिहून ठेवलेल्या अहवालांचा अंतर्भाव होतो. इब्‍न खुरदाझबिह ह्या टपालखात्यातील अधिकाऱ्याने दळणवळणाचे मार्ग दाखविणारे एक पुस्तक लिहिले. मसूदी यानेही भौगोलिक लेखन केले होते. जेरुसलेमचा अल्-मक्‌दिसी याने ९८५ मध्ये स्पेनखेरीज बाकी सर्व मुस्लिम देशांचा प्राकृतिक भूगोल लिहिला. शास्त्रीय व गणिती भूगोललेखनाचा प्रवर्तक अल्-बीरुनी हा होय. बाराव्या शतकात मोरोक्कोच्या अल्-इद्रीसीने (मृ.११६५) भूगोलविषयक उल्लेखनीय लेखन केल्याचे दिसते. इब्‍न जुबैर (मृ.१२१७) या स्पॅनिश यात्रेकरुने आपल्या प्रवासवर्णनातून ईजिप्त, सिरिया व मक्का यांसंबंधी उपयुक्त भौगोलिक माहिती दिलेली आहे. कजवीनी (मृ.१२८३) या इराणी लेखकाने आपल्या पुस्तकात पृथ्वीबरोबरच आकाशस्थ ग्रहताऱ्‍यांचेही वर्णन केलेले आढळते. विश्वरचनेसंबंधी लिहिणारा आणखी एक लेखक दिमिशकी (मृ.१३२७) हा होय. याकूत (मृ.१२२९) या सिरियन गुलामाने भौगोलिक कोशरचना केली. सर्वोत्कृष्ट व सर्वांत विस्तृत वर्णनात्मक भूगोल इब्‍न बतूता (मृ.१३७७) या तँजिअरच्या प्रवाशाने आपल्या प्रवासवर्णनातून दिलेला आहे. इब्‍न बतूताला अरबांचा प्रातिनिधिक प्रवासी मानले जाते. बोजोग इब्‍न शाहरयार याने तत्कालीन भारतात केलेल्या प्रवासाचे वर्णन किताबु अजाइबिल हिंद या पुस्तकात केले आहे.

 

शास्त्रीय लेखन व तत्त्वज्ञान : सातव्या शतकांपासून पुढील सहाशे वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात इस्लाम धर्म व राजसत्ता स्पेन ते इराण अशा विस्तृत प्रदेशावर प्रस्थापित होत गेली. या विस्तारकाळात ग्रीक, रोमन व भारतीय ज्ञानविज्ञाने अरबी विद्वानांना परिचित झाली. विद्याव्यासंगाला सर्वतोपरी अनुकूल परिस्थिती होतीच शिवाय कुराणातही ज्ञान-संपादनाचा आदेश होता. यांमुळे अरबी शास्त्रीय ग्रंथलेखनाला मोठी चालना मिळाली.

 

उमय्या कालखंडात मुख्यतः ग्रीक वैद्यकग्रंथांचे अरबी अनुवाद केलेले आढळतात. त्यात ॲरॉनच्या ग्रीक ग्रंथाचा अनुवाद उल्लेखनीय आहे. ग्रीक ग्रंथांच्या अनुवादाचे कार्य नंतरच्या अरबी वाङ्‌मयाच्या सुवर्णकालातही चालू राहिले. प्लेटोचे तत्त्वज्ञान, ॲरिस्टॉटलचे तर्कशास्त्र, गेलेन व हिपॉक्राटीझ यांचे वैद्यकग्रंथ व यूक्लिड, आर्किमिडीज आणि टॉलेमी यांचे गणितशास्त्र व खगोलशास्त्र या सर्वांचे भाषांतर करण्यात आले. संस्कृत भाषेतील ग्रंथांच्या आधारे गणित, वैद्यक, खगोलशास्त्र इ. विषयांच्या लेखनाने शास्त्रीय लेखन समृद्ध करण्यात आले. सिरियॅक ग्रंथांधारे कृषिविषयक लेखन व लॅटिन आणि हिब्रू ग्रंथांच्या साहाय्याने कला, शास्त्र व तंत्र-विषयक लेखन अरबी पंडितांनी केले.

 

अरबी खगोलशास्त्रीय लेखन पुढे गॅलिलिओसारख्या यूरोपीय संशोधकांना उपयुक्त ठरले. यह्या बिन मन्सूर (८ वे शतक), अल्-बीरुनी (११ वे शतक) व उमर खय्याम (मृ.११२३) हे खगोलशास्त्रज्ञ उल्लेखनीय आहेत. संख्यापद्धती, शून्याची गणिती कल्पना, बीजगणित ह्या बाबतींत अरबी गणितशास्त्रज्ञांचे कार्य महत्त्वाचे ठरले. पदार्थविज्ञान शाखेतील अल्-हाजेन व अब्दुल हसन अली यांचे संशोधन मौलिक मानले जाते. यंत्रकलेतही अरबी तंत्रविशारदांनी बरीच प्रगती केल्याचे दमास्कसच्या मशिदीतील घड्याळावरून दिसते. अबू मुसा जाफर अल्-कूफी (८ वे शतक) व राझी (९ वे शतक) यांचे रसायनशास्त्रावरील प्रबंध उपलब्ध आहेत. अल्कोहॉल, ॲलेंबिक, अल्कली व एलिक्झिर हे.शब्दही अरबीच आहेत. वैद्यकशास्त्रात अर्-राझी, इब्‍न सीना किंवा ॲव्हिसेना, अबूल कासिम, अली अब्बास, इब्‍न जोहर आणि इब्‍न रुश्द किंवा आव्हेरोईझ यांचे ग्रंथ केवळ मुस्लिम देशांतच नव्हे, तर यूरोपीय देशांतही अधिकृतपणे वापरले जात. त्यांतही इब्‍न सीनाचा वैद्यकीय ज्ञानकोश विशेष महत्त्वाचा मानला जातो. इब्‍नुल्-बैंतार याने वनस्पतिशास्त्रावर दोन व औषधी वनस्पतींवर दोन ग्रंथ लिहिले. इब्‍न वहशियह याने ९०४ मध्ये शेतीसंबंधी एक पुस्तक लिहिले. मौल्यवान खड्यांसंबंधीचे एक पुस्तक अबुल अब्बास अत्-तिफाशी (मृ.१२५३) याने संपादित केले.

 

अरबी तत्त्वज्ञानाचा उगम सातव्या शतकातील ईश्वरविषयक आध्यात्मिक चिंतनातून झाला. धार्मिक तत्त्वज्ञानाला अथवा धर्मशास्त्राला ‘कलाम’ अशी व्यापक अरबी संज्ञा आहे. तिचा अर्थ ‘ईश्वरी वाणी’ असा होतो. अरबी तत्त्वज्ञानाचा विकास धर्ममतांच्या संघर्षातून होत गेला. या प्रकारचा पहिला संघर्ष खारिजी व मूर्जी या दोन पंथीयांत निर्माण झाला. आठव्या शतकात वासिल बिन अता (६९९–७४८) याने ‘मुताझिला’ या बुद्धिप्रामाण्यवादी संप्रदायाची स्थापना केली. एक प्रकारच्या भौतिक निर्णयवादाचे व मानवी बुद्धीच्या श्रेष्ठत्वाचे या संप्रदायाने समर्थन केले. अल्-अशअरी (८७६–?) याने सनातन श्रद्धावादी व नवे बुद्धिवादी यांच्या विचारांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला. ⇨अल्किंदी (मृ.८५०), ⇨अल्फाराबी (मृ.९५०), ⇨इब्‍न सीना (९८०–१०३७), ⇨अल्गझाली (१०५८–११११), ⇨इब्‍न रुश्द (११२६–९८) या लेखकांचे तत्त्वज्ञानपर लेखन महत्त्वाचे आहे. इब्‍न तुफैल (मृ.११८५) याची हैय्य बिन यकजान ही तात्त्विक कादंबरी प्रसिद्ध आहे [⟶ अरबी तत्त्वज्ञान].


 या कालखंडात ‘हदीस’ म्हणजे मुस्लिम स्मृतिशास्त्र, कायदा व न्यायदान यांसंबंधीचे लेखन आणि ‘तफसीर‘ म्हणजे कुराणावरील भाष्यग्रंथ यांचीही निर्मिती झालेली दिसते.

 

अवनतीचा कालखंड: चंगीझखानाचा नातू हुलागू याने १२५८ मध्ये बगदाद जिंकून अब्बासी साम्राज्याचा अंत घडवून आणला. त्यामुळे इस्लामधर्मीय समाजांवरील अरबांचे प्रभुत्व नष्ट झाले. अरबी वाङ्‌मयातील पूर्वीचे चैतन्य लोप पावले. अनुकरण, संकलन व बाह्य अलंकरण यांच्या आवर्तात ते गुंतून पडले. पण सहा शतकांच्या या प्रदीर्घ अवतनकालातही काही वैशिष्ट्यपूर्ण अरबी साहित्य निर्माण झाल्याचे दिसते. सफीयुद्दीन अल्-हिल्ली (१२७८–१३५१) हा या कालखंडातील एक श्रेष्ठ कवी असून त्याचे २९ कसीदे प्रसिद्ध आहेत. इब्‍नुत्-तिकतकह (ज.१२६२–?) याने राज्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरणारा राजकारणविषयक ग्रंथ लिहिला. पौर्वात्य इतिहासलेखनाची त्यावर छाप दिसते. नुवैरी (मृ.१३२२) याच्या ज्ञानकोशात इतिहास, भूगोल, समाजजीवन, वनस्पती व प्राणी यांसंबंधीची उपलब्ध माहिती संकलित केलेली आहे. या कालखंडातील प्रसिद्ध बंडखोर विचारवंत इब्‍न-तैमीयह (१२६३–१३२८) हा होय. धर्म व कायदा या विषयांवरील त्याचे ४५ ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. धार्मिक कर्मकांडाचे स्तोम नष्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला. फीरोझाबादी (१३२९–१४१४) याने रचलेला शब्दकोश महत्त्वाचा आहे. इस्लाम स्मृतिग्रंथावरील अधिकारी भाष्यकार म्हणून गौरविलेला असकलानी (१३७२–१४४०) याच कालखंडात होऊन गेला. त्याचे ३९ ग्रंथ उपलब्ध असून कवी म्हणूनही त्याची योग्यता मोठी आहे. जलालुद्दीन-सुयूती (१४४५–१५०५) ह्या प्रसिद्ध लेखकाने पाचशेहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यांपैकी कुराणावरील भाष्यग्रंथ व खलिफांचा इतिहास उल्लेखनीय आहेत. आयशह अल्-बाअनिटिआ ही या काळातील प्रसिद्ध कवयित्री होय. सूफी संतचरित्रे व विचारसरणी यांविषयी अश्-शारानी (मृ.१५६५) याचा ग्रंथ महत्त्वाचा आहे. इस्लामी धर्मशास्त्रावरही त्याने लेखन केले आहे. हाजी खलीफह (मृ.१६५८) याने अरबी, फार्सी व तुर्की वाङ्‌मयाचा सूचिग्रंथ तयार केला. ‘झजल’ व ‘मुवश्शह’ या प्रकारांप्रमाणेच लोकप्रिय अरबी काव्यात काही नव्या रचनाप्रकारांची भर पडली. ‘दुबायत’, ‘मवालिय्या’, ‘कनवकान’ व ‘हिमाक’ हे त्यांपैकी काही नवे रचनाप्रकार होत. शिरबिनी या कवीने आपल्या हज उल कुहाफ या नावाच्या ईजिप्शियन बोलीभाषेतील कवितेत अडाणी शेतकरी व विद्वान पंडित या दोहोंचा उपहास केला आहे. अब्दुल वह्‌हाब (मृ.१७९२) हा धर्मशुद्धीच्या विचारांचा व चळवळीचा प्रभावी प्रवर्तक होता. त्याच्या विचारसरणीला ‘वहाबवाद’ म्हणतात. सौदी अरेबियात आजही वहाबी पंथाची तत्त्वे अधिकृतपणे पाळण्यात येतात.

 

आधुनिक कालखंड: अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सिरियातील ख्रिस्ती समाजात इटालियन व फ्रेंच प्रभावामुळे सांस्कृतिक जागृतीची मर्यादित चळवळ सुरु झाली. परंतु अरब देशांवर पाश्चात्य विचारांचा मोठा परिणाम नेपोलियनच्या स्वाऱ्‍यांमुळे झाला. १७९८ च्या सुमारास ईजिप्तमध्ये मुद्रणकलेचा प्रवेश झाला. हसन अल्-अर्रार (मृ. १८३४) या ईजिप्तमधील विद्वानाने यूरोपीय अभ्यासाचे एक केंद्र स्थापन केले. ईजिप्तमधील शेवटच्या राजघराण्याचा संस्थापक मुहंमद अली याने वैद्यकीय व तांत्रिक शाळा उघडल्या व यूरोपीय ग्रंथांच्या भाषांतरांना चालना दिली. सिरियान बितरस अल्-बुस्तानी (१८१९–८३) याने पहिली राष्ट्रीय शाळा सुरु केली. लवकरच बेरुत व कैरो येथे विद्यापीठेही स्थापन करण्यात आली. ईजिप्तमधील रिफाअह अत्-तहतवी (१८००–७३) हा यूरोपीय ग्रंथांचा पहिला उल्लेखनीय भाषांतरकार होय. १८२८ नंतर ईजिप्तमधील नियतकालिकांनी साध्या व सुबोध गद्यलेखनास फार मोठी चालना दिली. नव्या दृष्टिने प्राचीन अरबी वाङ्‌मय प्रकाशित होऊ लागले. १८५० नंतर ग्रंथालयांची स्थापना करण्यात आली. राजकीय व आर्थिक कारणांनी १८७० नंतर सिरियन लेखक व विद्वान अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांनी अरबी वाङ्मयात मोठे परिवर्तन घडवून आणले. पॅरिस विद्यापीठात ईजिप्तचा विद्वान अल्-तंतावी (मृ. १८१६) हा अरबी वाङ्‌मयाचा प्राध्यापक होता. सब्बाग व बकतूर यांनी फ्रेंच ग्रंथांचे अनुवाद प्रसिद्ध केले.

 

अरबी वाङ्‌मयाच्या या प्रबोधनकाळात नव्याजुन्याचा संघर्ष अटळ होता. या संघर्षातूनच आधुनिक अरबी वाङ्मयाला वाट काढावी लागली. अरब राष्ट्रवादाचा उद्गमही नव्या वाङ्‌मयनिर्मितीला प्रेरक ठरला. १८८० नंतर आधुनिक अरबी वाङ्‌मय निर्माण होऊ लागले. तत्पूर्वीच्या प्रबोधनकाळात बुस्तानीबरोबरच अत्-तहतवी, अली मुबारक व अबदुल्लाह फिक्री यांचे कार्यही उल्लेखनीय आहे. सय्यद जमालुद्दीन अल्-अफगानी याची धर्मसुधारणेची व राजकीय स्वातंत्र्याची चळवळ राजकीय स्वरुपाच्या अरबी लेखनाला व वक्तृत्वशैलीला अत्यंत उपकारक ठरली.

 

सुएझ कालव्याची १८६९ मधील निर्मिती, अरबी पाशाचे बंड व ब्रिटिश सैन्याचा ईजिप्तमधील प्रवेश (१८८२) या सर्व घटनांचा परिणाम अरबी साहित्यावर झाला. धर्मसुधारणेची चळवळ चालू ठेवणारा मुहंमद अबदुहू (मृ.१९०५), ऐतिहासिक कादंबरीचा जनक जुर्जी जैदान (१८९१–१९२४) व आधुनिक अरबी गद्याचा एक श्रेष्ठ प्रवर्तक अल्-मनफलूती (१८७६– १९२४) हे या काळातील महत्त्वाचे लेखक होत.

 

पहिल्या महायुद्धानंतर ईजिप्त देश अरबी वाङ्‌मयनिर्मितीचे केंद्र बनला. अहमद लुतफीअस्-सय्यद व एम्. एच्. हयकल हे विचारवंत व वृत्तपत्रकार याच वेळी पुढे आले. पाश्चात्य समीक्षातत्त्वांचा पुरस्कार, प्राचीन अरबी साहित्याचे संपादन, वाङ्‌मयीन इतिहासाचे लेखन व अरबी राष्ट्रवादाला पोषक ठरणारे वाङ्‌मय ही नव्या वाङ्‌मयीन चळवळीची ध्येयधोरणे होती.

 

काव्य: आधुनिक अरबी काव्यातील एक प्रवाह प्राचीन काव्यशैलीचे अनुकरण व संस्करण करणाऱ्‍या कवींच्या कवितांत दिसतो. सिरियातील नसीफ अल्-याझिजी (१८००–७१) इराकमधील अल्-फारुकी (१७८९–१८६१), अल्-अखरस (१८०५–७३), इब्राहिम अत्-ताबाता-बाई (१८३२–१९०१) व नजाफ ईजिप्तमधील महमूद समी अल्-बरूदी (१८३९–१९०४), इस्माईल साबिरी (१८८४–१९२३), हाफिज इब्राहिम (१८७१–१९३२) व अब्दुल मुहसिन काझिमी (१८७०–१९३५) वगैरे कवींची कविता या प्रवाहातील आहे. सर्वस्वी नव्या वळणाची कविता सिरियातील फ्रैंसिस मर्राश (१८३६–७३) ईजिप्तमधील अहमद शौकी (१८६८–१९३२) व खलील मतरान (१८७२–१९४९) इराकमधील जमील सिदकी अल्-जहावी (१८६३–१९३६) व मअरुफ अल्-रुसफी (१८७३–१९४५) अमेरिकेतील अमीन अर्-रैहानी (१८७६–१९४०),

खलील जिब्रा (१८८३–१९३१), मिखाइल नू-आइमा (१८८९–  ) व इलिया अबू मादी (१८८९–  ) या कवींनी लिहिली. यापुढील काही प्रसिद्ध कवी म्हणजे ईजिप्तमधील अल्-अक्काद (ज. १८८९), अल्-मजेनी (ज. १८९०) व रामी (ज. १८९२) हे होत. सिरियातील खलील मर्दम (ज. १८९५), दामुस व बिजम ट्युनिशियातील खजनादेर व मोरोक्कोमधील हल्लाल अल्-फसी हे होत.

 

कादंबरी: अरबी कादंबरी पाश्चात्य कादंबऱ्यांच्या प्रभावानेच निर्माण झाली. बहुसंख्य अरबी कादंबऱ्‍या ऐतिहासिक स्वरुपाच्या आहेत. सलीम अल्-बुस्तानी (१८४८–८४), जमील अल्-मुदव्वर (१८६२–१९०२) व विशेषतः जुर्जी जैदान हे प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार होत. सामाजिक कादंबऱ्‍या प्रथम सईद अल्-बुस्तानी व याकूब सर्राफ (१८५२–१९२७) यांनी लिहिल्या. फरह अंतून (१८७४–१९२२) याने ऐतिहासिक व सामाजिक कादंबऱ्‍यांबरोबरच मनोविश्लेषणात्मक कादंब‍ऱ्यांही लिहिल्या. सद्यकालीन कादंबरीकारांत हुसेन हयकल, तहा हुसेन व तौफीक अल्-हकीम हे विशेष उल्लेखनीय आहेत.


 कथा: कादंबरीपेक्षा अरबी कथा अधिक विकसित व अधिक गुणसंपन्न आहे. पहिला सामाजिक कथालेखक मुवैलही (मृ. १९३०) हा होय. मुहंमद तिमूर (१८९२–१९२१) याच्या कथांत समकालीन समाजाचे प्रभावी चित्रण आढळते. त्याचा भाऊ महमूद तिमूर हाही एक प्रसिद्ध कथाकार होता. खलील जिब्रान याच्या काव्यात्म कथांत तात्त्विक प्रतीकात्मता आढळते. मिखाइल नू-आइमा याच्या कथांतून मनोविश्लेषण दिसून येते. याशिवाय आयिशह तिमूर या कवियित्रीनेही कथालेखन केले आहे. लतीफ अल्-मनफलूती (१८७६–१९२४) याच्या कथांत तांत्रिक परिपूर्णता आढळते. शैलीच्या दृष्टीने हाफिझ इब्राहिम या कवीच्या कथा आकर्षक आहेत.

 

नाटक: अरबी रंगभूमीची प्राथमिक अवस्था पाश्चात्त्य वळणाच्या शैक्षणिक संस्थांतील रंगमंचापुरती सीमित होती. विसाव्या शतकात स्वतंत्र अरबी रंगभूमी निर्माण झाली. अरबी कादंबरीप्रमाणे अरबी नाटकेही आरंभी ऐतिहासिक विषयांवरच रचलेली आढळतात. १९२० पर्यंतची नाटके जुन्या वळणाची असून, ग्रीक, इंग्‍लिश व फ्रेंच नाटकांच्या अनुकरणातून निर्माण झालेली आहेत. शोकात्मिका व सुखात्मिका असे दोन्ही प्रकार त्यांत आहेत. इब्राहिम अल्-अहदाब (१८२६–९१) या पहिल्या ऐतिहासिक नाटककाराची वीस नाटके उपलब्ध आहेत. मोल्येरचे अनुकरण करुन मारुन नक्काश (१८१७–५५) याने तीन सुखात्मिका रचल्या. शोकात्मिकांचे लेखन करणारांत खलील अल्-याझिजी (मृ. १८८९) व नजीब हद्दाद (मृ. १८९९) हे नाटककार उल्लेखनीय आहेत. उस्मान जलाल (मृ. १८९८) याची प्रहसनात्मक नाटके १९१२ पर्यंत लोकप्रिय होती. १९२० नंतर मुहंमद तिमूरच्या नाट्यसमीक्षेमुळे व नाट्येतिहासामुळे अरबी नाट्यसृष्टीत परिवर्तन घडले. तिमूर स्वतःही नाटककार होता. व्यावहारिक भाषेचा उपयोग अनेक नाटकांतून करण्यात आला. मिखाइल नू-आइमा व अंतुम यजबक यांची सामाजिक नाटके प्रसिद्ध आहेत. शौकी याच्या काव्यात्म शोकात्मिका लोकप्रिय ठरल्या. तौफीक अल्-हकीम हा वर्तमानकालातील सर्वश्रेष्ठ अरबी नाटककार होय.

 

समीक्षा: आधुनिक अरबी समीक्षेतील मोठा घटक वाङ्‌मयीन इतिहासाचा आहे. जुन्या साहित्याचे संशोधन व संपादन हाही तिचा एक महत्त्वाचा भाग आहे. बुतरुस अल्-बुस्तानी (१८१९–८३) याचा वाङ्‌मयीन ज्ञानकोश अत्यंत प्रसिद्ध आहे. लोईस शेखो (१८५९–१९२८), कसतकी अल्-हमसी (१८५८–१९४१), अहमद अमीन (१८७५–१९३८) व मुहंमद कुर्द अली (१८७६–१९५३) ह्या सर्वांचे वाङ्मयीन इतिहासविषयक व समीक्षात्मक लेखन महत्त्वाचे आहे. जकी मुबारक (मृ. १९५२) हा टीकाकार व सद्यकालीन समीक्षा-क्षेत्रातील डॉ. तहा हुसेन यांचा उल्लेख आवश्यक आहे. अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातील प्राध्यापक फिलिप कुरी हिटी अरबी वाङ्मयावरील एक अधिकारी लेखक मानले जातात.

 

संदर्भ : 1. Arberry. A. J. Modern Arabic Poetry, London, 1950.  

           2. Gibb, H. A. R. Arabic Literature: An Introduction, Oxford, 1963.

           3. Lyall, C. J. Some Aspects of Ancient Arabic Poetry, London, 1918.

           4. Najb Ullah, Islamic Literature, New York, 1963.

           5. Nicholson, R. A. Literary History of the Arabs, London, 1956.

 

जाधव, रा. ग.