हिंदुराष्ट्र :  भारतासंबंधीची एक विचारसरणी व सामाजिक संकल्पना. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व डॉ. हेडगेवार यांनी या संकल्पनेला उजाळा दिला असे मानतात. ही संकल्पना स्पष्ट करताना सावरकरांनी भारतवर्षाच्या प्रागैतिहासापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या (१९४७) येथील घटनांचा आढावा घेतला आहे. सावरकरांनी या सामाजिक संकल्पनेचे विश्लेषण देताना प्रथम ‘हिंदुत्व’ आणि ‘राष्ट्रीयत्व’ या संज्ञांच्या व्याख्या स्पष्ट केल्या आहेत. यांसंबंधी भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने, हिंदुत्व, हिंदु राष्ट्रदर्शन इ. त्यांच्या ग्रंथांमध्ये सविस्तर वर्णन आलेले आहे. अभ्यासकांच्या मते संपूर्ण भारताचा इतिहास पहाता हिंदुत्व अथवा हिंदू समाज ही संकल्पना पूर्वीपासूनच येथील समाजामध्ये रुजलेली आहे. तसेच राष्ट्रीयत्व अथवा देशप्रेम ही एक अनुभूती असून ती भावनाही प्राचीन काळापासून येथे रुजली असल्याविषयाचे उपरोक्त संदर्भ ग्रंथांमध्ये सविस्तर वर्णन आले आहे. हिंदुत्व व हिंदु राष्ट्रदर्शन या ग्रंथात सिंधूचे प्राकृत रूप ‘हिंदू’, सिंधुस्थानचे हिंदुस्थान आणि सिंधुराष्ट्राचे हिंदुराष्ट्र असे स्पष्टीकरण दिलेले आहे. हिंदुस्थान हा शब्द अद्यापही व्यापक अर्थाने अनेक ठिकाणी, विशेषतः हिंदी भाषिकांत, रूढ आहे. सावरकरांनी वरील ग्रंथांत हिंदू धर्म आणि हिंंदुत्व या संकल्पना अगदी वेगळ्या असल्याचे स्पष्ट केले आहे. या ग्रंथांत त्यांनी भारताच्या ज्ञात अशा किमान पाच हजार वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेतला आहे. त्यांच्या मते सांस्कृतिकदृष्ट्या एकात्म असलेला हा विशाल देश राजकीय दृष्ट्यादेखील संघटित झाला, तर ह्या देशाची एकात्मता टिकेल. हिंदुत्वाची कसोटी ठरवताना सावरकरांनी राष्ट्रनिष्ठा ही कसोटी प्रमाण मानली आहे. हिंदुत्वाच्या व्याख्येत ते म्हणतात ‘सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या ह्या भरतभूमीस जो कोणी आपली पितृभू आणि मातृभू मानतो तो हिंदू ‘. हे स्पष्ट करताना ‘जी व्यक्ती यहुदी नाही, ख्रिश्चन नाही, अथवा मुसलमान नाही ती व्यक्ती हिंदू आहे’ असा भारतीय घटनेतील उल्लेखाचा ते दाखला देतात. 

 

राष्ट्र या संकल्पनेच्या व्याख्येच्या अनुषंगाने विज्ञान, बुद्धिवाद, मानवाधिकार, समानता, सामाजिक समरसता, भविष्याविषयीच्या आकांक्षा यांतून निर्माण होणारी भावबंधने व त्यांचे परिणत स्वरूप या कसोट्या हिंदुराष्ट्राची सीमा ठरविताना सावरकरांनी स्वीकारल्या आहेत असे त्यांच्या साहित्याच्या अभ्यासकांचे मत आहे. त्यांच्या मते बाहेरच्या अनेक सत्तांनी म्हणजे शक, कुशाण, ग्रीक, मुसलमान, फ्रेंच, डच, पोर्तुगीज व अखेरीस ब्रिटिश इत्यादींनी आक्रमणे करून हा प्रदेश ताब्यात घेतला होता परंतु अखेरीस हिंदुत्व भावनेने प्रेरित असलेल्या व येथील संस्कृतीशी एकरूप असलेल्या राज्यकर्त्यांचा अथवा समाजाचाच विजय झाला. अखेरीस परकीयांना, म्हणजे जे येथील संस्कृतीशी एकरूप होऊ शकले नाहीत अशांना, हा प्रदेश सोडून जावे लागले. सावरकरांनी हिंदुत्व या ग्रंथात या प्रदेशाचा उज्ज्वल इतिहास सांगून हताश होऊ पाहणाऱ्या तत्कालीन हिंदूंना संजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी या ग्रंथात हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व याचे विवेचन केलेले असून या दोन्ही संकल्पनांनी युक्त अशा या देशाविषयी हिंदुराष्ट्राची संकल्पना मांडली आहे. ती जरी उच्च कोटीची व अंमलात येणे अत्यंत कठीण असले, तरी भारताचे हिंदुराष्ट्र होणे हा सावरकरांचा एक उदात्त आशावाद म्हणता येईल व या देशाला पितृभूमी, पुण्यभूमी मानणारा समाज कोणत्याही जाती-धर्माचा असला, तरी येथे तो निर्माण झाल्यास हिंदुराष्ट्र निर्माण होईल, असे सावरकरांना अभिप्रेत असल्याचे त्यांचे अभ्यासक मानतात. 

दाबके, गिरीश