हिंदी साहित्य : हिंदी भाषा ही ⇨ इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील भाषा मानली जाते. हिंदीची उत्पत्ती संस्कृत भाषेतून झाली. इ. स. पू. १५००–५०० या कालखंडात संस्कृत ही लोकव्यवहाराची भाषा झाली. पुढे तिची वैदिक व लौकिक अशी दोन रूपे विकसित झाली. त्यांपैकी लौकिक रूपातून पश्चिमोत्तर, मध्यदेशी व पूर्वी बोलींचा विकास झाला. या बोलींतून प्राकृत भाषा बनली. प्राकृत भाषेतून ज्या अनेक भाषा जन्माला आल्या, त्यांपैकी हिंदी ही एक होय.

 

इ. स. १०००–१२०० या कालखंडात आढळून येणाऱ्या साहित्यिक भाषेस ⇨ अपभ्रंश भाषा म्हणून ओळखले जाते. या भाषेत इ. स. च्या सहाव्या शतकापासून वाङ्मयनिर्मिती झाल्याचे दिसून येते. आठव्या शतका-तील प्रचलित अपभ्रंश भाषेस इतिहासकार उत्तर-अपभ्रंश भाषा मानतात. चंद्रधर शर्मा गुलेरी यांनी उत्तर-अपभ्रंश भाषा म्हणजेच प्राचीन हिंदी भाषा, असे मत व्यक्त केले आहे. त्या आधारे भारतीय महापंडित ⇨ राहुल सांकृत्यायन (१८९३–१९६३) हे सरहपाद (इ. स. ७६९) यांना प्राचीन हिंदीचे पहिले कवी मानतात. हिंदी काव्यधारा हा त्यांचा ग्रंथ हिंदीचा आद्यग्रंथ गणला जातो. तेथून हिंदी साहित्याचा प्रारंभ मानला जातो.

 

अपभ्रंश, सिद्ध, नाथ, जैन, रासो, गद्य असे विविधांगी साहित्य हिंदीच्या प्रारंभिक काळात लिहिले गेले. तेव्हापासून म्हणजे आठव्या शतकापासून ते आजतागायत सु. १३०० वर्षांचा हिंदी साहित्याचा इतिहास वेळोवेळी अनेक साहित्येतिहासकारांनी लिहिला आहे. फ्रेंच लेखक गॉर्सा द तासी हे हिंदी साहित्येतिहासलेखनाचे आद्य जनक मानले जातात. त्यांनी इस्तवार द ल लितरेत्यूर ऐंदुई ऐ ऐंदुस्तानी (१८३९) हा फ्रेंच भाषेत लिहिलेला हिंदीचा पहिला साहित्येतिहास ग्रंथ. हिंदी साहित्येतिहास -लेखनपरंपरेत शिवसिंह सरोज (शिवसिंह सेंगर, १८७७), मॉडर्न वर्नाक्यूलर लिटरेचर ऑफ हिंदुस्तान (जॉर्ज ग्रीअर्सन, १८८९), हिंदी साहित्य का इतिहास (आचार्य रामचंद्र शुक्ल, १९२९), हिंदी साहित्य का आलोचनात्मक इतिहास (रामकुमार वर्मा, १९३९), हिंदी साहित्य : उद्भव और विकास (हजारीप्रसाद द्विवेदी, १९५२), हिंदी साहित्य (खंड १ ते ३ धीरेंद्र वर्मा, १९६२), हिंदी साहित्य का बृहत् इतिहास (खंड १ ते १७ काशी नागरीप्रचारिणी सभा, १९५३), हिंदी साहित्य का इतिहास (नगेंद्र हरदयाल, १९७३-सुधा. आवृ., २०१०) हे ग्रंथ प्रमाणभूत मानण्यात येतात.

 

कालविभाजनानुसार हिंदी साहित्येतिहास : साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असते. समाज नित्य परिवर्तनशील असतो. समाजबदलाच्या पाऊलखुणा साहित्यात नित्य उमटत असतात. त्यातून साहित्याची वृत्ती, वैशिष्ट्ये कालौघात ठरत असतात. प्रत्येक काळाचे आपले असे वैशिष्ट्य असते. त्यावरून साहित्येतिहासकार साहित्येतिहासाची मांडणी ठरवीत असतात. हिंदी साहित्येतिहासकारांनी हिंदी साहित्यविकासाचे काल- विभाजन व नामकरण वेगवेगळ्या पद्धतींनी केले असले, तरी त्यांत काहीशी समानताही आढळते. हिंदी साहित्यविकासाचे कालखंड पुढीलप्रमाणे मानण्यात आले आहेत :

 

(१) आदिकाल : सातव्या शतकाचा मध्य ते चौदाव्या शतकाचा मध्य

 

(२) भक्तिकाल : चौदाव्या शतकाचा मध्य ते सतराव्या शतकाचा मध्य

 

(३) रीतिकाल : सतराव्या शतकाचा मध्य ते एकोणिसाव्या शतकाचा मध्य

 

(४) आधुनिककाल : एकोणिसाव्या शतकाचा मध्य ते आजपर्यंत (२०१५).

 

त्याचप्रमाणे हिंदी साहित्याच्या इतिहासात, कालौघात, वाङ्मयीन विकासाची नवी वळणे, नव्या दिशा सूचित करणारी व लक्षणीय परिवर्तने घडविणारी जी युगे वा नवप्रवर्तन घडून आले, त्यांनुसार पुढीलप्रमाणे टप्पे ठरविण्यात आले आहेत : (अ) भारतेंदु युग (१८५०–१९००) ( आ) द्विवेदी युग (१९००–१९१८) (इ) छायावादी युग (१९१८–१९३८) (ई) छायावादोत्तर युग : (१) प्रगति-प्रयोग युग (१९३८–१९५३), (२) नवलेखन युग (१९५३–१९६०), (३) साठोत्तरी युग (१९६०–१९७५), (४) आपात्कालोत्तर युग (१९७५–१९९०), (५) उत्तर-आधुनिकता काळ (१९९०–२०००) आणि (६) एकविसावे शतक (२०००–२०१५).

 

(१) आदिकाल : (सातव्या शतकाचा मध्य ते चौदाव्या शतकाचा मध्य) . या कालखंडास साहित्येतिहासकारांनी वेगवेगळी नावे दिली आहेत. त्यानुसार हा काळ वीरगाथा काल (आचार्य रामचंद्र शुक्ल), चारण काल (जॉर्ज ग्रीअर्सन), प्रारंभिक काल (मिश्रबंधू), आदिकाल ( हजारीप्रसाद द्विवेदी), संधिकाल (रामकुमार वर्मा), सिद्ध-सामंत काल (राहुल सांकृत्यायन), वीर काल (विश्वनाथप्रसाद मिश्र) अशा विविध नावांनी ओळखला जातो. तत्कालीन राजकीय, धार्मिक, सामाजिक परिस्थितीचा प्रभाव या काळातील साहित्यावर दिसून येतो. या काळातील अधिकांश साहित्य पद्यमय असले, तरी अपवादात्मक गद्य रचनाही आढळते. साहित्यप्रकाराच्या दृष्टीने पाहिले, तर हा काळ संदिग्ध म्हणावा लागेल. साहित्यरचना मिश्र शैलीत असल्याने त्यांचे स्वरूप ठरविणे बऱ्याचदा कठीण होते. त्यामुळे या काळातील साहित्यकृती इतिहाससाधने म्हणून स्वीकारणे अशक्य होते. कल्पना व काळाची बेमालूम सरमिसळ साहित्यात ठायीठायी दिसते. वीर व शृंगार रसप्रधान अशा या साहित्यात वीरतेला प्राधान्य आहे. युद्धकथांनी गजबजलेल्या या काळातील साहित्यात बऱ्याचदा युद्धाचे कारण स्त्री असल्याचे दिसते. म्हणूनही काव्यात शृंगार येतो. काव्यात युद्धकला, नायकाची धीरोदात्तता, स्त्री-सौंदर्याचा आविष्कार इत्यादींचा परिपोष, राजकवी असलेल्या प्रतिभासंपन्न व काव्यकलानिपुण काव्यरचनाकारांमुळे होतो. दीर्घ व स्फुट असे दोन्ही प्रकारचे काव्य या काळात आढळते. दोहा, तोमर, गाथा, रास, आर्या असे वृत्त व छंद, शैलींचे प्राबल्य या काव्यात आहे. ही काव्ये डिंगल (ब्रज), पिंगल (राजस्थानी) या भाषांत लिहिली आहेत. राजाची मर्जी संपादन करण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या या साहित्या-मागे भाटगिरीची वृत्ती, दास वा शरणभाव आढळतो. म्हणून हे साहित्य ‘स्वान्तःसुखाय’ न होता ‘स्वामिन्सुखाय’ होते. या काव्यातील अतिशयोक्तीचे ते एक कारण होय. समकालीन लोकजीवनाचे प्रतिबिंब हरवलेले हे साहित्य त्या काळातील समग्र जीवन चित्रित करत नाही. या काळात खालील प्रकारचे वैविध्यपूर्ण साहित्य लिहिले गेले :

 

अपभ्रंश साहित्य : स्वयंभू, पुष्पदंत, धनपाल, धाहिल, कनकामर, अब्दुल रहमान, जिनदत्तसूरी, जोइंदू, रामसिंह, लक्ष्मीदत्त (देवसेन), लुई ( भुसुक), किलपाद, दीपंकर, श्रीज्ञान, कृष्णाचार्य, धर्मपाद, टेंट्या, महीधर (कंबलावरपाद) अशा अनेक कवींनी अपभ्रंश भाषेत काव्यरचना केली. कवी ⇨ स्वयंभू (आठवे शतक) याचे पउमचरिउ, रिट्ठणेमिचरिउस्वयंभुछंद हे तीन ग्रंथ. त्यांपैकी पउमचरिउमध्ये रामकथावर्णन आहे. ⇨ पुष्पदंत (दहावे शतक) याच्या महापुराण, ⇨ णायकुमारचरिउ व ⇨ जसहरचरिउ या ग्रंथांमध्ये जीनभक्ती आढळते. ⇨ धनपाल याच्या ⇨ भविसयत्तकहामध्ये एका धनिक व्यापाऱ्याची कथा आहे. अब्दुल रहमानचे ⇨ संदेशरासक हे खंडकाव्य आहे, तर जिनदत्तसूरीचे उपदेशरसायनसार हे रासकाव्याचे उदाहरण होय. ⇨ जोइंदूचेपरमप्पपयासु (परमात्मप्रकाश) व ⇨ योगसार हे ग्रंथ विख्यात आहेत. रामसिंह याचा पाहुड-दोहा हा आध्यात्मिक ग्रंथ. त्यात त्याने इंद्रियसुखावर विजय मिळवूनच आत्मशोध शक्य असल्याचे महत्त्व सांगितले आहे. संस्कृत कवी ⇨ राजशेखर आणि मैथिली कवी ⇨ विद्यापती यांनीही अपभ्रंश भाषेत काव्यरचना केली आहे. [→ अपभ्रंश साहित्य].

 

सिद्ध साहित्य : बौद्ध धर्मात महायान, हीनयान, सहजयान व वज्रयान हे चार पंथ उदयास आले. त्यांपैकी वज्रयान पंथीय साधक स्वतःस सिद्धी प्राप्त झाल्याचे प्रदर्शन तंत्रमार्गाने चमत्कार करून दाखवीत असत. जनमानसावर या सिद्धीचा फार मोठा पगडा होता. असे लोक तंत्रमंत्र सिद्ध म्हणून ओळखले जात. बिहारपासून ते आसामपर्यंतच्या आसमंतात त्यांचा संचार होता. तत्कालीन नालंदा, विक्रमशिला विद्यापीठांत त्यांचे मोठे प्रस्थ होते. त्यांनी तत्कालीन लोकभाषेत पंथाच्या प्रसारासाठी जे वाङ्मय निर्माण केले, ते सिद्ध साहित्य म्हणजेच हिंदीचे प्राचीन साहित्य होय. राहुल सांकृत्यायन यांनी चौऱ्याऐंशी सिद्धांची नावे आपल्या संशोधनातून स्पष्ट केली आहेत. त्यांपैकी सरहपा, शबरपा, लुइपा, डोंभिपा, कण्हपा आणि कुक्कुरिपा हे प्रसिद्ध सिद्ध कवी म्हणून गणले जातात. सरहपा हे सरहपाद, सरोजवज्र, राहुलभद्र या नावांनीही ओळखले जात. त्यांनी ३२ ग्रंथ रचले. त्यांपैकी त्यांचा दोहाकोश हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध होता. शबरपा ( इ. स. ७८०) यांनी चर्यापद लिहिले. लुइपा यांचे चौऱ्याऐंशी सिद्धांत सर्वश्रेष्ठ मानले जात. डोंभिपा (इ. स. ८४०) यांनी लिहिलेल्या एकवीस ग्रंथांपैकी डोंभीगीतिका, अक्षरद्विकोपकोश हे ग्रंथ प्रसिद्ध होते. सिद्ध साधकांचा वज्रयान पंथ वाममार्गी असल्याने त्यात मद्य व स्त्रीस उपासनेचे साधन मानले जाई. सिद्ध कवी आपल्या काव्यात कोड्यात टाकणाऱ्या शब्दांचा वापर करीत. संस्कृतपेक्षा प्राकृत भाषेकडे, तसेच लोकप्रचलित भाषेकडे सिद्ध कवींचा कल होता. त्यामुळे हे साहित्य उत्कंठावर्धक वाटत असे. पंडित कवींच्या साहित्याचा सिद्ध उपहास करीत. कौल कापालिकसारखे गूढ ग्रंथ याच काळात रचले गेले. [→ सिद्ध].


नाथ साहित्य : सिद्ध संप्रदायातील अनिष्ट प्रथा व परंपरांची प्रतिक्रिया म्हणून ⇨ नाथ संप्रदायाचा उगम झाला. या पंथातील प्रसिद्ध नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, कानिफनाथ, जालंधरनाथ, गहिनीनाथ हे प्रसिद्ध होते. नाथांच्या या परंपरेचा काळ म्हणजे दहावे शतक. पश्चिम भारता- तील पंजाब, राजस्थान प्रांत ही त्यांची प्रभावक्षेत्रे. पतंजलीप्रणीत योगमार्ग त्यांनी अनुसरला. शिव व शक्तीचे ते उपासक होते. पूजा, तीर्थस्थान, व्रतवैकल्ये यांऐवजी योगसाधनेद्वारे ईश्वरप्राप्ती व स्वविकास यांना ते प्राधान्य देत. ज्ञानेश्वरीवर नाथ संप्रदायाचा प्रभाव आढळतो. नाथांनी योगात आणि साधनेत स्त्री-वर्जता व निषेध सांगितला आहे. हिंदी निर्गुण भक्तिधारेवर नाथ संप्रदायाचा प्रभाव आढळतो. नाथ पंथाचे प्रवर्तक ⇨ गोरखनाथ (सु. नववे-दहावे शतक) यांनी हिंदीत चाळीस ग्रंथ लिहिल्याचे म्हटले जाते. त्यांचे हे सर्व ग्रंथ पीतांबरदत्त बड़थ्वाल यांनी गोरखबानी या नावाने संपादित केले आहेत. गोरखनाथ यांचा जीवनकाल विवादास्पद आहे. इतिहासकार नवव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत त्यांचा काळ मानतात. नाथ साधकांना हठयोगी म्हणूनही ओळखले जाते. मच्छिंद्रनाथ यांची काही हिंदी पदे उपलब्ध आहेत. तसेच जालंधरनाथांचा शिष्य कृष्णपाद याचे दोहे व पदे उपलब्ध असून गहिनीनाथ, चर्पटनाथ, चौरंगीनाथ, ज्वालेंद्रनाथ, गोपीचंद, भर्तृहरी, प्राणनाथ यांनी आपल्या काव्यातून पंथाचे विचार व आचार मांडले आहेत.

 

जैन साहित्य : राजस्थान हे जैन साहित्याचे उगमस्थान मानले जाते. जैनमताच्या प्रसारार्थ आदिकालीन हिंदी कवींनी काव्यरचना केल्या. या रचना आचार, रास, फागु, चरित (चरिउ) अशा शैलींत आहेत. आचार शैलीतील काव्य उपदेशात्मक, तर रास शैलीतील काव्यात क्रीडावृत्ती आढळते. आदिकालात या रास काव्यातूनच रासो काव्यपरंपरा विकसित झाली. जैन कवी देवसेन यांनी ९३३ मध्ये श्रावकाचार हा ग्रंथ लिहिला. त्यात २५० दोहे असून श्रावकांसाठी आचारधर्म विशद केला आहे. देवसेन हे जैन आचार्य होते. त्यांनी अपभ्रंश भाषेत दब्ब-सहाव-पयास, तर हिंदीत लघुनयचक्र, दर्शनसार ही काव्ये रचली. भरतेश्वर-बाहुबली रासची रचना शालिभद्र सूरी या कवीने ११८५ मध्ये केली. यात भगवान बाहुबलीचे चरित्रवर्णन आहे. चंदनबालारास हे काव्य आसगु नावाच्या कवीने रचल्याचे उल्लेख आढळतात. जिनधर्म सूरीने १२०९ मध्ये रचलेल्या स्थूलिभद्र रास या काव्यात स्थूलिभद्र व कोशानामक वेश्येची प्रेमकथा असून विषयवासनामुक्तीच्या उद्देशाने रचलेले हे बोधकाव्य होय. भोगलिप्त नायक स्थूलिभद्र हा कोशा हिच्या आहारी गेलेला असतो. तो जैन धर्माची दीक्षा घेऊन मोक्षप्राप्तीपर्यंत पोहोचल्याची कथा या काव्यात आहे. अशी अनेक जैन काव्ये या काळात लिहिली गेली आणि त्यांतून हिंदीमध्ये रास काव्यपरंपरा उदयास आली. [→ जैन साहित्य].

 

रासो साहित्य : हिंदीतील रासो ग्रंथपरंपरा जैन रासो काव्यातून उदयाला आली, तरी दोन्हींचा उद्देश व रचना पद्धतींत अंतर आहे. जैन रासो काव्ये चरित्रवर्णनार्थ लिहिली गेली असली, तरी त्यांचा उद्देश धार्मिक होता. याउलट, हिंदी रासो काव्य वीरगाथावर्णनाच्या उद्देशाने लिहिले गेले पण त्याचा उद्देश आश्रयदात्या राजाची स्तुती करणे हा होता. ही काव्ये युद्धकेंद्री असल्याने चरित्रनायक आश्रयदात्या राजाच्या वीरश्रीपूर्ण जीवनाचे अतिशयोक्त वर्णन ही या काव्याची मूळ प्रेरणा होती. आदिकालातील हिंदी काव्यग्रंथांमध्ये ‘रासो’ हे नाव काव्य या अर्थाने वापरलेले आढळते. रासो काव्यात ऐतिहासिकतेचा अभाव आहे. या काव्यात वीर व शृंगार हे रस प्रमुख असतात. यातील वीरश्रीपूर्ण प्रसंग कवी शाहिरी जोशाने निर्माण करतात. रासो काव्यातील युद्ध रोमांचकारी असते. नरपती नाल्ह या कवीने बीसलदेव रासो हे गेयकाव्य ११५५ मध्ये रचले. त्यावर लोकगीतांचा प्रभाव दिसतो. पिंगल भाषेतील या काव्यात अजमेरचा राजा बीसलदेव व भोज परमारकन्या राजमतीच्या विवाह, वियोग व पुनर्मीलनाची कथा आहे. हे काव्य केदार रागातील असून ते मात्रिक छंदात रचले आहे. शृंगार, वीररसपूर्ण असे काव्य असून त्यातील ऋतुवर्णन लालित्यपूर्ण शैलीत झाले आहे. स्त्रीच्या पतिपरायण असण्याचा आग्रह धरणारे हे काव्य म्हणजे एक नीतिकाव्य होय. या काळातील शारंगधरकृत हम्मीर रासो, ⇨ जगनिककृत आल्हखंड (परमार रासो) व ⇨ चंदरबदरदाईकृतपृथ्वीराज रासो ही काव्ये प्रसिद्ध आहेत. पृथ्वीराज रासो या काव्याच्या अनेक समकालीन आवृत्त्या आढळतात. या काव्यात पृथ्वीराज व संयोगिताचे प्रेम, परिणय, रासक्रीडा, विलास इत्यादींचे वर्णन असून, त्यात पृथ्वीराजाच्या शौर्याची कथा चित्रित झाली आहे. ⇨ अमीर खुसरौ (१२५३–१३२५) यांचे खालिक बारी ही या काळातील प्रसिद्ध काव्यरचना मानली जाते. यांशिवाय मुंज रासो, संदेश रासो इ. रासो रचनांव्यतिरिक्त इतरही वीरकाव्ये या काळात रचली गेली.

 

गद्य साहित्य : आदिकालात काव्याबरोबरच गद्यसाहित्यही लिहिले गेले. रोडा यांची राउलवेल ही एका शिलालेखावरील उत्कृष्ट रचना असून हा शिलालेख (दहावे शतक) मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स वस्तुसंग्रहालयात आहे. गद्य आणि पद्य अशा मिश्रशैलीत राउलनामक नायिकेच्या सौंदर्याचे नखशिखान्त वर्णन त्यात आहे. हिंदीच्या सात बोलींची सरमिसळ या वर्णनात झाली असली, तरी त्याची प्रमुख भाषा ही राजस्थानीच आहे. यात उपमा, उत्प्रेक्षा इ. अलंकारांचा उपयोग आहे. उक्ति-व्यक्ति-प्रकरण (११५४) हा गोविंदचंद्र राजाचा दरबारी पंडित दामोदर शर्मा याचा ग्रंथ. त्यात तत्कालीन बनारसच्या परिसराचे वर्णन आहे. ज्योतिरीश्वर ठाकूर यांचे वर्णरत्नाकर मैथिली शैलीत असून ते सुनीतिकुमार चतर्जी यांनी संपादित केले आहे. अव्वल हिंदी गद्यसाहित्य म्हणून या ग्रंथाचे हिंदी साहित्येतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदी भाषा, साहित्य, व्याकरण यांचे आदिरूप म्हणून या आदिकालीन गद्य साहित्याकडे पाहिले जाते.

 

सारांश, आदिकालीन हिंदी साहित्य अपभ्रंश व हिंदी या दोन्ही भाषांत लिहिले गेले. पुढे मात्र अपभ्रंश भाषा मागे पडून जनभाषा हिंदी हीच प्रबळ झाली. या काळातील विविध बोलींतून तिचे रूप आकारास आले. या काळातील साहित्यातून तत्कालीन जीवनाचे सर्वांगीण चित्र विशेषतः प्रत्ययास येते. हिंदी काव्याचे रचनाशिल्प व शैली विकसित करण्यात या काळातील साहित्याचे योगदान महत्त्वाचे आहे.

 

(२) भक्तिकाल : आदिकालीन हिंदी साहित्य राजकीय, सामाजिक दृष्ट्या पाहिले, तर संकुचित उद्देशाने लिहिले गेले, असे दिसते. याउलट, भक्तिकालीन हिंदी साहित्य व्यापक सामाजिक बदलाच्या हेतूने लिहिले गेले. ते परसुखाय आहे. तसेच स्वान्तःसुखायही आहे. या काळातील साहित्याचा केंद्रबिंदू राजाकडून देवाकडे सरकलेला दिसतो. चौदाव्या शतकाच्या मध्यापासून ते सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत भक्तीचे वेगवेगळे मार्ग, विचार अस्तित्वात आले. ईश्वराचे रूपवैविध्य, भक्तिमार्गांची विविधता हिंदू व मुस्लीम या दोन्ही धर्मांत दिसते. सगुण, निर्गुण ईश्वराचे द्वंद्व या काळातील संत, कवी, भक्त यांच्यात आढळते. परकीय आक्रमणे धर्मांतरा-साठी होत, ही भावना जनमानसात रूढ नि दृढ झाल्याने साहजिकच स्वधर्मरक्षण, प्रचार, प्रसार या भावनेने भक्तिकाळात कविता उदयास आली. धर्मांतर्गत आचारशुद्धी व कर्मकांडांस फाटा देऊनही ईश्वरप्राप्ती होऊ शकते, असा विश्वास आपल्या काव्यातून संत कवींनी निर्माण केला व आचार, विचार व धारणाशुद्धीचे हे आंदोलन त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. राजकीय, धार्मिक, सामाजिक अशा सर्व दृष्टींनी हा काळ शुद्धीकरणाचा होता. तसेच अशांतता व अस्थैर्याचाही होता. परकीय आक्रमणांचा मुकाबला व स्वकीयांचा विविध प्रकारचा अंतःसंघर्ष अशा दुहेरी द्वंद्वातून भक्तिकालीन साहित्य उदयास आले.

 

भक्तिकाळातील काव्य ईश्वरकेंद्रित होते. ईश्वराची दोन रूपे या काळातील काव्यात आढळतात : (१) सगुण अथवा मूर्तिरूप परमेश्वर व (२) निर्गुण, निराकार परमेश्वर. या दोन्ही रूपांची भक्तिपूर्ण साधना ज्ञान, प्रेम इत्यादींद्वारे करण्याची स्पर्धा या काळातील कवींत आढळते. भक्तिकालीन हिंदी काव्याचे चार प्रमुख प्रवाह या काळात दिसतात : (१) निर्गुण ज्ञानाश्रयी भक्तिकाव्य (संतमत), (२) निर्गुण प्रेमाश्रयी भक्ति-काव्य (सूफीमत), (३) सगुण कृष्णभक्तिकाव्य आणि (४) सगुण रामभक्तिकाव्य. अनुक्रमे कबीर, जायसी मलिक मुहंमद, ⇨ सूरदास आणि ⇨ तुलसीदास हे या भक्तिपर काव्यधारांचे आघाडीचे कवी होते.

 

(१) निर्गुण ज्ञानाश्रयी भक्तिकाव्य : भक्तिकाव्यात परमेश्वराचे वर्णन दोन प्रकारचे आढळते : एक, मूर्तिरूप, अवतारवादी, तर दुसरे निर्गुण, निराकार. निर्गुण भक्तिकाव्याचा आधार ज्ञानमार्गी भक्तिपद्धती आहे. यास ‘संतमत’ असेही म्हणतात. या मतानुसार ईश्वर निराकार, निर्गुण असून तो साऱ्या सृष्टीत सामावलेला आहे. ही विचारधारा ईश्वराची अनेक रूपे, अवतार इत्यादींना विरोध करते. या विचारावर ⇨ आद्य शंकराचार्यांच्या अद्वैतवादाचा व मुस्लिम एकेश्वरवादाचा प्रभाव आहे. या विचारधारेमुळे हिंदु-मुस्लिम एकतेस त्या काळात मोठे बळ मिळाले. संतमत गुरुमहिमा मानते. ते जात, धर्म, पंथ इत्यादींच्या आधारे माणसामाणसांत मानले जाणारे भेदाभेद, अस्पृश्यता इत्यादींचा विरोध करते. दुष्ट चालीरीती, रूढी, परंपरा, मूर्तिपूजा, धर्माच्या नावावर दिले जाणारे बळी, हिंसा, शोषण, छळ यांना निर्गुण भक्तिधारेत विरोध दिसून येतो. ही विचारधारा पूजापाठ, अनुष्ठान, व्रत-वैकल्ये, उपवास, रोजे, बांग, तीर्थयात्रा, मालाजप, नामस्मरणादी कर्मकांडांचा निक्षून विरोध करते. आत्मिक शुद्धता व सदाचारास निर्गुण विचारधारेत महत्त्व आहे. स्त्रीस माया मानणाऱ्या या पंथाने भक्तीत स्त्री-पासून दूर राहण्याचे पथ्य वर्णिले आहे. हा स्त्रीविरोध नसून विषयवासना मुक्तीचा तो उपाय आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ज्ञानसाधनेसाठी गृहस्थी, संसार यांपासून दूर राहण्याचा तो भाग होय.

 

संत नामदेव, कबीर, गुरू नानकदेव इ. कवींनी हिंदीत भक्तिकाव्याद्वारे निर्गुण भक्तिधारेचा प्रचार, प्रसार व समर्थन केले. संत कवी ⇨ नामदेव (१२७०–१३५०) हे महाराष्ट्रीय असले, तरी भक्तिप्रसारार्थ गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाबादी उत्तर भारतात त्यांचे भ्रमण होते. त्यांची पदे मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांत असली, तरी शीख धर्मात त्यांना विशेष स्थान आहे. ‘नामदेवजीकी मुखबानी’ म्हणून प्रसिद्ध असलेली त्यांची हिंदी भाषेतील ६१ पदे शिखांच्या ⇨ ग्रंथसाहिबमध्ये समाविष्ट आहेत. नामदेव यांच्या हिंदीवर मराठीचा प्रभाव आहे. संत ⇨ कबीर (सु. १३९८– सु. १५१८) हे निर्गुणाश्रयी भक्तिशाखेचे प्रमुख कवी. त्यांची पदे, दोहे, साखी, सबद नंतरच्या काळात त्यांचे शिष्य, अनुयायी यांनी संकलित केले. कबीर ग्रंथावली, कबीर-बीजक वा बीजक हे त्यांच्या रचनेचे अधिकृत संग्रह मानले जातात. ग्रंथसाहिबमध्येही त्यांची काही पदे समाविष्ट आहेत. कबीर यांच्या काव्यावर हिंदू, मुसलमान, सूफी, योगमार्ग व नाथ संप्रदाय यांचा प्रभाव दिसतो. ते निरक्षर असले, तरी ज्ञानी होते. त्यांचे काव्य पूर्वी हिंदीत लिहिले गेले असून, त्यात ब्रज, अवधी, खडी बोली, भोजपुरी, फार्सी, अरबी इ. बोलींतील व भाषांतील शब्दही आढळतात. त्यांची भाषाशैली संमिश्र होती. तिला ‘सधुक्कडी’ असे म्हटले जाते. त्यांच्या उल्टवाँसी (विरोधी भासणारी शब्दरचना) प्रकारातील रचनाही प्रसिद्ध आहेत. कबीर यांचे विचार कर्मकांड, जातिभेद, धर्माचार, शोषण यांवर प्रहार करणारे असल्याने ते सुधारणावादी संतकवी म्हणून ओळखले जातात. त्यांचे विचार व काव्य यांतून पुढे ⇨ कबीर पंथ उदयास आला. गुरू ⇨ नानकदेव (१४६९–१५३९) हे शीख धर्माचे प्रवर्तक व आद्यगुरू. ग्रंथसाहिब या शीख धर्मग्रंथात त्यांनी पंजाबीबरोबरच हिंदी पदे रचली. आपल्या पदांतून त्यांनी ईश्वर एक, अनंत, निराकार मानला आहे. यांशिवाय हिंदी ज्ञानाश्रयी भक्तिकाव्यात ⇨ रैदास, जम्भनाथ, हरिदास निरंजनी, लालदास, ⇨ दादूदयाल, ⇨ मलूकदास, बाबा लाल, ⇨ सुंदरदास, रज्जब, गुरू ⇨ अर्जुनदेव, शेख फरीद इ. अनेक कवींनी दोहे, पदे, साखी, सबद इ. पद्यरचना करून संतमताचे समर्थन केलेले आढळते.


(२) निर्गुण प्रेमाश्रयी भक्तिकाव्य : ही काव्यधारा ‘सूफीमत’ या नावानेही ओळखली जाते. या विचारधारेचा उगम इस्लामी ⇨ शरीयतवरील प्रतिक्रिया म्हणून झाला. सूफीमतावर गूढविद्या, अद्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद, नाथपंथ इत्यादींचा प्रभाव दिसतो. गुरुमहिमा, सर्वेश्वरवाद, ईश्वर व भक्त यांत प्रेमसंबंध ही सूफीमताची लक्षणीय वैशिष्ट्ये. त्यात सृष्टिनिर्मिती, मानव विकास, ईश्वरसिद्धीचा मार्ग, लौकिक-अलौकिक प्रेम आणि भेद इत्यादींविषयी विवेचन आढळते. इश्क मजाजी (लौकिक प्रेम), नासूत (कर्मकांड), मलकूत (उपासना), जबरूत (ज्ञानप्राप्ती), लाहूत (ईश्वरप्राप्ती) हे सूफीमतधारणेनुसार सूफी साधनेचे सोपान होत. या मताधारे हिंदी भक्तिकाळात प्रेमाश्रयी भक्तिधारेचे काव्य निर्माण झाले. जायसी मलिक मुहंमद, कुतबन, मंझन, उस्मान, शेख नबी यांनी ही काव्यधारा समृद्ध केली. सूफी काव्य मस्नवी शैलीत लिहिले गेले आहे. ईश्वरस्तुती, पैगंबरस्मरण, समकालीन राजाची प्रशंसा इ. विषय या काव्यात असतात. काव्यरचना दोहा, चौपाई इ. छंदांत केली जाते. त्याची काव्य-भाषा अवधी असते. भारतीय कथांवर आधारित सूफी हिंदी काव्य नायिकाप्रधान आहे. ईश्वराचे प्रतीक म्हणून स्त्रीला काव्यात स्थान असते.

 

जायसी मलिक मुहंमद (सु. १४९२– सु. १५४२) यांचे पद्मावत (सु. १५४०) हे खंडकाव्य प्रेमाश्रयी भक्तिकाव्याचे तसेच सूफी काव्याचे व्यवच्छेदक उदाहरण होय. याशिवाय अखरावट, आखिरी कलाम, महरी बाईसी, चित्रावत (चित्ररेखा), मोस्तीनामा (मसालनामा) हे जायसी यांचे अन्य उल्लेखनीय काव्यग्रंथ. पद्मावत हे चितोडचा राजा रतनसेन, सिंहलद्वीपची राजकन्या पद्मिनी यांच्या प्रणयकथेवर आधारलेले प्रेमकाव्य असून ते प्रतीकात्मक आहे. हे काव्य ५७ सर्गांत लिहिले असून त्याची भाषा अवधी आहे. प्रेमकथेच्या माध्यमातून जायसी यांनी भक्तीचे सुलभीकरण साधले आहे. सूफी काव्यपरंपरेतील सर्वश्रेष्ठ महाकाव्य म्हणून पद्मावत ह्या ग्रंथाला काव्येतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. कुतबन याचे मृगावती (१५०३) हे काव्य याच परंपरेतले. मंझन याने मधुमालती (१५४५) ह्या आपल्या काव्यसंग्रहामध्ये गुरुकृपेमुळे त्यास अध्यात्मप्राप्ती झाल्याचे वर्णन केले आहे. शेख नबी याचे ज्ञानदीप (१६१९) व उस्मान याचे चंद्रावली या रचनाही प्रसिद्ध आहेत. याशिवाय हुसेन अली, कासीम शाह, ख्वाजा अहमद इ. उल्लेखनीय सूफी कवी हाते. त्यांच्या काव्यरचनांत सूफी काव्याची समान लक्षणे आढळून येतात. [→ सूफी].

 

सगुण भक्तिधारा ही कृष्ण व राम यांची उपासना मूर्तिमय ईश्वराचे उदाहरण, दृष्टांत देत विकसित होते. या विचारधारेनुसार परमेश्वर सगुण, मूर्तिमय, अवतारी असून तो विविध पूजाअर्चना इत्यादींद्वारे प्राप्त होतो. ही भक्ति- धारा दक्षिण भारतात उदयास आली आणि नंतर तिचा प्रसार उत्तर भारतात झाला. भगवद्गीता विष्णुपुराण यांवर आधारित काव्य सगुण काव्य म्हणून ओळखले जाते. ही भक्तिधाराही जातिभेद मानत नाही. गुरूचे महत्त्व सगुण भक्तीतही मानले गेले आहे. स्मरण, कीर्तन, जपजाप्य, तीर्थाटनादी उपचारविधी इत्यादींनी ईश्वरप्राप्ती होते, अशी सगुणोपासकांची श्रद्धा असते. जगास ईश्वराचा अंश मानणारा हा विचार गृहस्थ धर्माचे समर्थन करतो. या विचारधारेच्या दोन शाखा आहेत. सगुण कृष्णभक्तिकाव्य आणि सगुण रामभक्तिकाव्य.

 

(३) सगुण कृष्णभक्तिकाव्य : सगुण भक्तीची पहिली शाखा म्हणजे कृष्णभक्तिपर काव्यधारा. या कृष्णभक्तीतून अनेक साधनामार्ग उगम पावले तथापि त्यांचे बाह्यस्वरूप वेगळे आहे. कृष्ण व राधा हेच त्यांचे उपास्य दैवत असून कृष्णोपासना, त्याच्या लीला हाच त्यांच्या काव्याचा मुख्य विषय आहे. कृष्णकाव्यात सख्यभक्तीला प्राधान्य आहे व ते मुख्यतः ब्रज भाषेत आहे.

 

हिंदी कृष्णभक्तिपर काव्य महाभारत, भागवतपुराण इ. प्राचीन ग्रंथांवर आधारित आहे. या काव्यामध्ये कृष्णाच्या बालरूपाचे जसे वर्णन आहे, तसे शृंगारवर्णनही आहे. उत्कट माधुर्यभाव, वत्सलभाव ही या काव्याची लक्षणीय वैशिष्ट्ये. भावना, भक्ती व सगुण ईश्वराचे महत्त्व या काव्यात अधिक आहे. संगीत, छंद व अलंकार यांचा समन्वय या काव्यात साधला असून ते भावगेयही आहे. ⇨ निंबार्क संप्रदाय, तसेच ⇨ वल्लभाचार्यांनी प्रवर्तित केलेल्या ⇨ पुष्टिमार्ग संप्रदायाच्या अनेक कवींनी ही काव्यधारा समृद्ध केली. सूरदास, कुंभनदास, परमानंददास, ⇨ नंददास, ⇨ रसखान, मीराबाई इ. कवि-कवयित्रींनी आपल्या काव्यरचनांनी कृष्णभक्तिपर काव्य विकसित केले आहे.

 

विद्यापती (सु. १३८०– सु. १४६०) हे कृष्णभक्तिकाव्याचे आद्य जनक. मैथिली भाषेतील विद्यापतिकी पदावली हा त्यांचा कृष्णभक्तिकाव्याचा आद्यग्रंथ. संस्कृत व अपभ्रंश या भाषांतही त्यांनी काव्यरचना केल्या. कीर्तिलता व कीर्तिपताका ही त्यांची दोन वीरकाव्ये अपभ्रंश भाषेत आहेत. विद्यापती हे काव्यशास्त्रनिपुण कवी होते. त्यांना ‘मैथिली कोकिल’, ‘कवी कंठहार’ इ. अनेक पदव्या बहाल करण्यात आल्या होत्या. विद्यापतिकी पदावलीत त्यांनी केलेले राधा-कृष्णाचे नायक- नायिकेच्या रूपातील सुंदर चित्रण भावोत्कट प्रेमवर्णन अनन्यसाधारण आहे. प्रेमाच्या संयोग, वियोग या दोन्ही अवस्थांचे मार्मिक चित्रण त्यांनी केले आहे. ‘शृंगारिक कवी’ म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. कृष्णभक्ति-काव्याचे नेतृत्व जाते, ते कवी सूरदास (सु. १४७८– सु. १५६३) यांच्याकडे. सूर सारावली, साहित्य लहरी आणि सूरसागर हे त्यांचे काव्यग्रंथ. यांपैकी सूरसागर हा कृष्णकाव्यावरील श्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. स्फुटपदे व पदसमूह अशा स्वरूपात त्यांचे हे काव्य असून त्यात भगवान कृष्णाच्या बाललीला, यौवनक्रीडा, यमुना विहार, माखन-चोरी, जलक्रीडा, फाग, होली असे अनेक प्रसंग चित्रित केले आहेत. याची काव्यभाषा ब्रज असून त्यात अलंकार, रस यांचे वैविध्य आहे. सूरसागर हे मुक्तक काव्य आहे. संत ⇨ मीराबाई (सु. १४९८– सु. १५४७) या कृष्णभक्ति काव्यातील श्रेष्ठ कवयित्री. त्यांचे काव्य एकनिष्ठ भक्तीचे उदाहरण म्हणून उल्लेखिले जाते. पदावली ही त्यांची एकमेव महत्त्वपूर्ण व प्रमाणभूत काव्यकृती. कृष्णभक्ती आणि माधुर्यभाव यांमुळे ब्रज भाषेतील त्यांची ही पदे लोकप्रिय झाली आहेत. उत्कट अभिव्यक्ती हे मीराबाईंच्या काव्याचे लक्षणीय वैशिष्ट्य होय.

 

(४) सगुण रामभक्तिकाव्य : सगुण भक्तीची दुसरी शाखा म्हणजे रामभक्तिपर काव्यधारा. प्रभु रामचंद्रांना आराध्य दैवत मानून या काव्य धारेचे कवी काव्यरचना करतात. रामभक्तिकाव्य आदर्श काव्य म्हणून ओळखले जाते, ते रामाच्या आदर्श चरित्रामुळे. रामानंदी संप्रदायाचे प्रवर्तक स्वामी ⇨ रामानंद हे या विचारधारेचे जनक. उत्तर भारतात त्यांनी राम-भक्तीचा प्रचार केला. वाल्मिकिरामायण हा या काव्याचा आधारग्रंथ असला, तरी हिंदीत संत तुलसीदासांच्या ⇨ रामचरितमानस या महाकाव्यामुळे हा भक्तिप्रवाह घरोघरी पोहोचला. रामभक्तिकाव्य दास्यभक्तीचे समर्थन करते. राम हा परब्रह्म असून तो मर्यादापुरुषोत्तम व आदर्श मानव मानला जातो. तसेच तो शील, शक्ती व सौंदर्य यांचा संगम असलेला सर्वगुणसंपन्न नायक असून, सगुण ईश्वर होय, अशी या काव्यधारेची धारणा आहे. अवधी ही या रामकाव्याची भाषा असून, ते दोहा, चौपाई या छंदांत रचलेले आढळते. स्वामी रामानंद, तुलसीदास, नाभादास, केशवदास, सेनापती हे या शाखेचे प्रसिद्ध कवी होत.

 

स्वामी रामानंद यांनी अनेक ग्रंथ रचले. त्यांपैकी श्रीरामार्चनपद्धती, गीताभाष्य, रामरक्षास्तोत्र, वेदान्तविचार, रामानंदादेश हे प्रमुख ग्रंथ होत. आपल्या ग्रंथांतून त्यांनी भक्तिपद्धतीची वैचारिक चिकित्सा व मांडणी केली. स्त्रियांना व शूद्रांना भक्तीचा अधिकार त्यांनी बहाल केल्यामुळे ते क्रांतिकारी कवी व आचार्य ठरले. हिंदु-मुस्लिम ऐक्याचे ऐतिहासिक कार्यही रामानंदांनी केले. रामभक्त कवी संत तुलसीदास यांनी रामचरितमानस या महाकाव्याशिवाय रामलला नहछू, रामाज्ञाप्रश्न, विनयपत्रिका, दोहावली, कवितावली असे सु. २१ ग्रंथ लिहिले. रामचरितमानस हे रामकथेवर आधारित महाकाव्य असून त्यात शृंगार, शांत, वीर व करुण या रसांची उत्कट अभिव्यक्ती झाली आहे. तुलसीदासांनी हे महाकाव्य सात कांडांत रचले आहे. रामायणावर आधारित या काव्यात त्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर मूळ कथेत व चरित्रात अनेक बदल केले. त्यातील अनेक काव्यगुणांमुळे ते अतिशय लोकप्रिय झाले. ⇨ केशवदास (सु. १५५५– सु. १६१७) यांचे रामचंद्रिका (१६०१) हे प्रबंधकाव्य विशेष प्रसिद्ध आहे. यांशिवाय रसिकप्रिया (१५९१), कविप्रिया (१६०१), जहाँगीरजसचंद्रिका (१६१२) हे त्यांचे काव्यग्रंथही उल्लेखनीय आहेत. केशवदास आचार्य कवी म्हणून ओळखले जातात. रामाचे कीर्तिवर्णन हा रामचंद्रिका या काव्याचा मुख्य विषय. हे संवादशैलीत असून संस्कृतनिष्ठ ब्रज भाषेत लिहिले आहे.

 

भक्तिकाळात वरील चार प्रमुख काव्यधारांशिवाय वीरकाव्य, प्रबंधात्मक चरित्रकाव्य, नीतिकाव्य, दरबारी काव्य लिहिले गेले पण ते संक्रमणकालीन काव्य असल्याने त्यांचा विशेष प्रभाव या काळात पडला नाही.

 

(३) रीतिकाल : हिंदी रीतिकाव्याची मुळे संस्कृत साहित्यात आढळतात. आचार्य ⇨ वामनपंडितांच्या नेतृत्वातून व संप्रदायातून विकसित झालेल्या काव्यशास्त्रीय ग्रंथनिर्मितिपरंपरेचे हिंदी रूप म्हणजे हिंदी रीतिकाव्य होय. छंद, रस, अलंकार ही या काव्याची मुख्य अंगे. त्यांची व्याख्या, लक्षणे, प्रकार इ. विशद करणारे ग्रंथ म्हणजे रीतिग्रंथ. सतराव्या शतकाच्या मध्यापासून ते एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अशा ग्रंथांचे लेखन झालेले आढळते. त्यांना लक्षण ग्रंथ, लक्ष्य ग्रंथ आणि लक्षण व लक्ष्यमिश्रित ग्रंथ म्हटले जाते. या ग्रंथांचा काळ हिंदी साहित्येतिहासात ‘कलाकाल’, ‘शृंगारकाल’ म्हणूनही ओळखला जातो.

 

मोगल बादशहा ⇨ शाहजहानपासून ते अव्वल इंग्रजी कालखंडा-पर्यंतची राजकीय परिस्थिती या रीतिकाव्यनिर्मितीस कारणीभूत व पोषक ठरली. या काळात अनेक कलांचा विकास झाला. दरबारी कवी कलात्मक रचना विशेषत्वाने करीत. त्यांच्या काव्यात कलाकौशल्याचे प्रदर्शन करण्याची वृत्ती दिसते. विशेषतः स्वामिनसुखाय काव्यरचना करण्याकडे कवींचा कल होता. कृष्ण व राधा यांना नायक-नायिका मानून त्यांच्या रूपाचे, प्रेम-भावनेचे वर्णन हे तत्कालीन काव्याचे मुख्य अंग ठरले. भक्ती, वीर या श्रृंगार रसाला प्राधान्य मिळाले. त्यामुळे रीतिकाव्य बहरले.

 

रीतिकालीन कालखंडात हिंदी काव्यात संस्कृत लक्षण ग्रंथांचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती दिसून येते. वीरगाथांत कवित्व, शृंगारकाव्यात दोहा, सवैया, तर लक्षण ग्रंथात अलंकार असे वैविध्य काव्यात दिसते. अवधीप्रचुर ब्रज भाषेत लिहिलेले रीतिकालीन काव्य संस्कृत, प्राकृत, अरबी, फार्सी शब्दसंपदेने वैविध्ययुक्त दिसते. रीतियुक्त काव्याबरोबरच रीतिमुक्त काव्याची समांतर परंपराही या काळात आढळते. भावविभोर, कलासक्त व सौंदर्यसिद्ध काव्यरचना हे या काळातील काव्याचे लक्षणीय वैशिष्ट्य. आचार्य केशवदास हे रीतिकाव्याचे प्रवर्तक-कविप्रिया, रसिकप्रिया, रामचंद्रिका, वीरसिंह देव रचित या त्यांच्या प्रमुख काव्यरचना. ⇨ भिखारीदास हे श्रेष्ठ आचार्य–कवी. त्यांनी रससारांश (१७३४), छंदोर्णव पिंगल (१७४२), श्रृंगारनिर्णय (१७५०) इ. रचना केल्या. ⇨ मतिराम (सु. १६०३– सु. १६९९) व चिंतामणी त्रिपाठी या बंधूंपासून रीतिग्रंथपरंपरा सुरू झाली. कवी ⇨ भूषण (सु. १६१३– १७१५) यांनी वीरकाव्यरचना केल्या तर ⇨ बिहारी ( सु. १५९५–१६६३) यांनी सतसई-परंपरा निर्माण केली. याशिवाय या काळात ⇨ देव (सु. १६७३– सु. १७६७), पद्माकर, ⇨ घनानंद, सेनापति, वृंद यांसारखे श्रेष्ठ कवी होऊन गेले. कवींनी रीतिनिरूपण, शृंगारिकता, राजप्रशंसा, भक्ती, नीती असे वैविध्यपूर्ण प्रवृत्तींचे काव्य या काळात लिहिले. तसेच काव्यशास्त्रातील नियमांना अनुसरून काव्यरचना केली व रस, अलंकार इ. काव्यगुणांकडे विशेष लक्ष दिले गेले.


आचार्य कवी पद्माकर (१७५३–१८३३) यांनी हिम्मतबहादुर-बिरुदावली, पद्माभरण, जगद्विनोद, प्रबोधपचासा, गंगालहरी, प्रतापसिंह बिरूदावली, कल्लिपच्चीसी असे सात ग्रंथ रचले. यांपैकी पद्माभरण आणि जगद्विनोद हे रीतिग्रंथ होत. शृंगार, राजप्रशस्ती, भक्ती अशा त्रिविध विषयांवर त्यांनी काव्य लिहिले. शृंगार कविशिरोमणी म्हणून मतिराम यांची या काळात कीर्ती होती. त्यांनी अलंकार पंचाशिका, साहित्यसार, लक्षण-शृंगार, छंदसार वा वृत्तकौमुदी हे काव्यग्रंथ लिहिले. हे लक्षणग्रंथ म्हणून मान्य पावले मात्र हे ग्रंथ अद्याप अप्रकाशित आहेत. रसराज, ललित-ललाम् या ग्रंथांमुळे मतिराम यांना प्रसिद्धी मिळाली. वीररसात्मक काव्य करणारे प्रख्यात रीतिकालीन कवी भूषण यांनी शिवराजभूषण हा काव्यग्रंथ रचला. याशिवाय शिवबावनी, छत्रसालदशक, भूषणहजारा, भूषणउल्लास हे त्यांचे प्रसिद्ध काव्यग्रंथ होत. कवी मतिराम व त्यांचे भाऊ भूषण यांनी छ. शाहू महाराज, बाजीराव, सोळंकी, राजा जयसिंह, औरंगजेब, दारा शिकोह इत्यादींची प्रशंसा करणारी काव्यरचना केली. रीतिकालीन मुक्तक कवी बिहारी यांची बिहारी-सतसई प्रसिद्ध आहे. सुमारे ७१३ दोह्यांचा हा छंदबद्धसंग्रह. या शृंगाररसपूर्ण काव्यात नायक-नायिका भेद, मीलन, विरह, हास्यविनोद इ. वर्णन आढळते. हिंदी गद्यसाहित्याचा खरा आरंभ रीतिकाळातच झाला. हिंदी भाषेतील ब्रज, खडी बोली, दक्खनी, राजस्थानी, भोजपुरी, अवधी यांची आद्य गद्यरूपे याच काळातील साहित्यात आढळतात. वैविध्यपूर्ण विषय, शैली, रूप, वृत्ती यांचे वैभव हे या काळाचे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते.

 

(४) आधुनिक काळ : हिंदी साहित्येतिहासाचा चौथा कालखंड हा कालावधीच्या दृष्टीने वरील तीन कालखंडांपेक्षा छोटा असला, तरी साहित्याच्या संख्यात्मक व गुणात्मक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचा व विकसित कालखंड आहे. आधुनिक हिंदी साहित्याचे जनक म्हणून ⇨ भारतेंदु हरिश्चंद्र (१८५०–८५) यांचे स्थान हिंदी साहित्यात अनन्य-साधारण आहे. त्यांच्या जन्मवर्षापासून ते आजवरचा सारा काळ हिंदी साहित्येतिहासाचा आधुनिक काळ मानला जातो. सुमारे १५० वर्षांचा हा काळ यापूर्वीच्या मध्यकाळापेक्षा सर्वार्थाने विकसित आहे. आधुनिक या शब्दाला भौतिक, वैज्ञानिक असे वलय आहे. पूर्वकालीन साहित्य हे इतिहास, राजा, ईश्वर अशा सर्वांगांनी व सर्वार्थाने पारंपरिक तसेच पारलौकिक होते. त्याला छेद देत इहलौकिक, भौतिक जीवनाची चिकित्सा, वर्णन, विश्लेषण हे वर्तमानकालीन साहित्याचे व्यवच्छेदक लक्षण बनले. त्या अर्थानेदेखील या काळाचे नामकरण ‘आधुनिक’ असणे सयुक्तिक म्हणावे लागेल. शैलीच्या अंगाने पूर्वकालीन हिंदी साहित्य काव्यमय होते. त्या परंपरेच्या विकासाबरोबर हिंदी साहित्याची भाषाही खडी बोली झाली. गद्यशैली विकसित होऊन कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, निबंध, व्यक्तिचित्र, आत्मकथा, चरित्र, आठवणी, वृत्तांत, मुलाखती, व्यंग्य-विनोद, भाषांतर अशा वैविध्यपूर्ण प्रकारांत लेखन झाले.

 

गेल्या दीडशे वर्षांत भारतात राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांत मोठी व गतिशील स्थित्यंतरे झाली. भारतीय जनमानसात स्वातंत्र्याचे स्वप्न १८५७ मध्ये सैनिकांच्या बंडाने उदयास आले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी इ. राष्ट्रीय नेत्यांनी उभारलेल्या स्वातंत्र्यलढ्याची परिणती म्हणून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि भारतीयांच्या आकांक्षा उंचावल्या. शिक्षणाचे पाश्चात्त्यीकरण, अर्थकारणाचे जागतिक रूप, मुक्त अर्थव्यवस्था, नागरीकरण, औद्योगिकीकरण, संगणक, तंत्रज्ञान, संपर्कक्रांती, उदारीकरण, वैश्वीकरण अशा सर्व घडामोडींतून ढवळून निघालेल्या भारताचे समाजमन साहित्यात सतत नवे चेहरे स्वीकारत अग्रगामी राहिले. वाहतूक-साधनांचा विकास झाला. माध्यम क्रांतीने वेळेचे अंतर संपुष्टात आणले. यूरोप खंडातील प्रबोधनपर्व धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, समानता, शोषणविरोध, स्त्री-पुरुष समानता इ. आधुनिक जीवनमूल्ये भारतीय समाजास जात, धर्म, वंश, उच्चनीचता इ. संकुचित परिघातून व्यापक बनवत गेली. परिणामी हिंदी साहित्य हे आधुनिकतेकडून उत्तर-आधुनिकते- कडे सतत परिवर्तनशील व अग्रेसर होत गेले. एकूणच आधुनिक हिंदी साहित्याचा इतिहास साहित्यप्रकारांच्या विकासक्रमाच्या द्वारे समजून घेणे कालसंगत ठरेल :

 

काव्य – भारतेंदु युग : आधुनिक हिंदी काव्याचा सु.१८५०–१९०० पर्यंतचा काळ हा हिंदी साहित्याच्या इतिहासात स्थूलपणे ‘भारतेंदु युग’ या नावाने ओळखला जातो. या काळात हिंदी काव्य ब्रज भाषेऐवजी खडी बोलीत लिहिले जाऊ लागले. नायक-नायिका भेद, रस, अलंकार, छंद आदी वर्णनांची परंपरा क्षीण होऊन कवितेत राष्ट्रीय वृत्ती, स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम अशा आशयविषयांचे प्रतिध्वनी उमटू लागले. रूढी व परंपराविरोध ही हिंदी काव्याची मुख्य प्रवृत्ती म्हणून उदयास आली. पारतंत्र्यविरोध व स्वदेशभावना काव्याने प्रखर केली. भारतेंदु हरिश्चंद्र यांनी विपुल काव्य-रचना केली. यांशिवाय लाला भगवानदीन, कामताप्रसाद गुरू, रूपनारायण पांडेय, राधा कृष्णदास, मुकुटधर पांडेय, ⇨ श्रीधर पाठक, ⇨ रत्नाकर-जगन्नाथदास यांसारख्या कवींनी आपल्या काव्यांद्वारे काव्याची युगप्रवृत्ती बलवत्तर केली. भारतेंदु ग्रंथावली, प्रेमघन सर्वस्व ह्या या युगातील श्रेष्ठ काव्यकृतींतून ह्याचा प्रत्यय येतो. देशप्रेम, भक्ती, सौंदर्य, प्रेमभाव, हास्य–व्यंग्य, सामाजिक जागृती, निसर्गवर्णन ही भारतेंदुकालीन हिंदी काव्याची प्रमुख वैशिष्ट्ये होत.

 

द्विवेदी युग : हिंदी साहित्यात विसाव्या शतकाच्या प्रारंभीचा दोन दशकांचा काळ हा ‘द्विवेदी युग’ म्हणून ओळखला जातो. आचार्य ⇨ महावीरप्रसाद द्विवेदी (१८६४–१९३८) हे कवी, पत्रकार, संपादक होते. ते भाषासुधारक म्हणून ओळखले जात. सरस्वती मासिकाचे ते संपादन करीत. त्याद्वारे हिंदी भाषेचे प्रमाणरूप त्यांनी विकसित केले. त्यांनी इंग्रजी साहित्याचा परिचय हिंदी जगतास करून देण्याचे मोठे कार्य केले. त्यामुळे द्विवेदी युगास जागृतीचा काळ, सुधारणेचा काळ म्हणूनही हिंदी साहित्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.

 

हिंदी कवितेस पारंपरिकतेतून मुक्त करण्याचे प्रयत्न सुरू झाले, ते द्विवेदी काळातच. पुढे हिंदीत स्वच्छंदतावादी कविता उदयास आली. त्याची सुरुवात याच युगात इंग्रजी काव्याच्या हिंदी अनुवादाने झाली. त्यांत पं. श्रीधर पाठक यांनी मोलाची भूमिका बजावली. पाठक यांनी इंग्रज कवी गोल्डस्मिथ याच्या डेझर्टेड व्हिलेजचा ऊजड ग्राम (१८८९), ट्रॅव्हलरचा श्रांत पथिकहरमिटचा एकान्तवासी योगी (१८८६) हे केलेले अनुवाद उल्लेखनीय आहेत. द्विवेदी युगात ‘हरिऔध’–अयोध्यासिंह उपाध्याय, ‘पूर्ण’– राय देवीप्रसाद, ‘सनेही’ – गयाप्रसाद शुक्ल, ⇨ मैथिलीशरण गुप्त इ. कवींनी जे काव्यलेखन केले, त्यांतून हिंदीत राष्ट्रीय काव्यधारा विकसित झाली. मानवतेस कवितेत स्थान मिळाले. नीती आणि आदर्श यांस महत्त्व आले. हिंदी कविता विषयवैविध्यांनी बहरली. हास्य-व्यंगात्मक रचना होऊ लागल्या. प्रबंध, मुक्तक, प्रगीत इ. विविध काव्यप्रकारांत काव्यलेखन झाले. खडी बोली हिंदीचे स्थायीरूप रूढ झाले, ते द्विवेदीकालीन कविते-तूनच. संस्कृत, उर्दू इ. भाषांतील छंदांबरोबरच हिंदीतील रोला, छप्पय, कुंडलिया, सार, सरसी, गीतिका, हरिगीतिका, ताटंक, लावनी अशा अनेक छंदांत या युगातील काव्यरचना दिसून येतात. हिंदी कवितेच्या पारं- परिकतेचे आधुनिक रूप, विवेचन म्हणूनही द्विवेदी युगातील काव्याकडे पाहिले जाते.

 

गंगालहरी (१८९१, पंडित जगन्नाथकृत गंगालहरीचा सवैयामध्ये अनुवाद), ऋतुतरंगिणी (१८९१, कवी कालिदासकृत ऋतुसंहारचा छाया-नुवाद), कुमारसम्भवसार (१९०२, कालिदासकृत कुमारसम्भव च्या पहिल्या पाच सर्गांचा सारांश), काव्यमंजूषा (१९०३), कान्यकुब्ज-अबला-विलाप (१९०७), सुमन (१९२३) इ. महावीरप्रसाद द्विवेदी यांचे या काळातील उल्लेखनीय काव्यग्रंथ. उपदेशपर कविता हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य.’ हरिऔध’ यांनी प्रियप्रवास (१९१४) हे काव्य लिहून हिंदी महाकाव्यपरंपरेचा प्रारंभ केला. पद्यप्रसून (१९२५), चुभते चौपदे (१९३२), वैदेही वनवास (१९४०) ही त्यांची काव्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी ब्रज आणि खडी बोली या दोन्ही भाषांत काव्य लिहिले. या युगातले आणखी एक श्रेष्ठ कवी म्हणजे मैथिलीशरण गुप्त (१८८६–१९६४). त्यांना रामभक्त, राष्ट्रवादी कवी म्हणून ओळखले जाते. जयद्रथ वध (१९१०), भारत भारती (१९१२), पंचवटी (१९२५), साकेत (१९३१), यशोधरा (१९३३), द्वापर (१९३६) हे त्यांचे प्रसिद्ध काव्यग्रंथ. भारतीय संस्कृतीचे व्यापक विश्व त्यांनी आपल्या काव्यातून चित्रित केले. त्यामुळे समग्रतः द्विवेदी युगाची हिंदी कविता राष्ट्रीय आणि सांस्कृतिक काव्य बनून आपल्यासमोर प्रकटते.

 

या राष्ट्रीय, सांस्कृतिक काव्यधारेत मैथिलीशरण गुप्त यांच्याशिवाय माखनलाल चतुर्वेदी, रामनरेश त्रिपाठी, सियारामशरण गुप्त, हरिप्रसाद द्विवेदी तथा वियोगी हरी यांसारख्या कवींनी मोलाची कामगिरी केली. त्यांपैकी ⇨ माखनलाल चतुर्वेदी (१८८९–१९६८) हे कवी व संपादक. हिमकिरीटिनी (१९४२), हिमतरंगिनी (१९५२), माता (१९५२), युगचरण (१९५६), वेणु लो (१९६०), गूँजे धरा (१९६४), मरणज्वार, बीजुरी काजल आँज रही हे त्यांचे काही प्रमुख काव्यग्रंथ. त्यांच्या काव्यातून संघर्ष व साधना या मार्गांनी लक्ष्यप्राप्तीचे बळ मिळते. ⇨ रामनरेश त्रिपाठी (१८८९–१९६२) यांची मिलन (१९१७), पथिक (१९२०), स्वप्न (१९२९) ही खंडकाव्ये विशेष गाजली. ⇨ सियारामशरण गुप्त (१८९५–१९६३) यांनी स्फुट कवितांबरोबरच उन्मुक्त (१९४१) सारखे गीतिनाट्य रचले. हरिप्रसाद द्विवेदी तथा वियोगी हरी यांनी विपुल काव्य लिहिले. प्रेमशतक, प्रेमांजलि, प्रेमपथिक या काव्यत्रयीशिवाय वीर वाणी, वीर सतसई या त्यांच्या काव्यरचनाही उल्लेखनीय आहेत.

 

यांशिवाय रामचरित उपाध्याय, गिरिधर शर्मा, लोचन प्रसाद पांडेय, रूपनारायण पांडेय, मुकुटधर पांडेय, बाळकृष्ण शर्मा हे या युगातील अन्य कवी होत.


छायावादी युग : द्विवेदी युगानंतरच्या दोन महायुद्धांमधील १९१८–३८ दरम्यानच्या सु. दोन दशकांच्या कालखंडातील हिंदी काव्याचे युग ‘छायावादी युग’ म्हणून ओळखले जाते. भांडवलधारी अर्थव्यवस्थेचा विकास, व्यक्तिवादाचा उदय, इंग्रजी स्वच्छंदतावादी काव्याचा प्रभाव, गांधीयुगाचा प्रारंभ, विभिन्न सुधारणावादी चळवळी (आर्य समाज, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज) या सर्वांची प्रतिक्रिया, प्रतिसाद म्हणून हे काव्य उदयास आले. छायावादी काव्याची अभिव्यंजनापद्धती पूर्ववर्ती काव्यापेक्षा निराळी आहे. तिचे भाषेचे रूपही भिन्न आहे. व्यक्तिनिष्ठता हे या काव्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. छायावादी काव्यात विद्रोह आढळतो. हे काव्य कल्पना-प्रचुर असून त्यात सौंदर्याचे अप्रतिम वर्णन आढळते. गूढवृत्ती, रहस्यवाद तसेच आदर्शवाद, राष्ट्रवाद, सांस्कृतिक प्रेरणा, प्रतीकात्मकता या काव्यात आढळते. भाषेची कलात्मक अभिव्यक्ती हे छायावादी काव्याचे व्यवच्छेदक लक्षण मानावे लागेल. ⇨ प्रसाद’–जयशंकर, ⇨ सुमित्रानंदन पंत, ⇨ निराला’–सूर्यकांत त्रिपाठी,महादेवी वर्मा हे या काव्यपरंपरेचे सूत्रधार कवि-कवयित्री. त्यांना हिंदी साहित्येतिहासात छायावादी काव्याच्या संदर्भात ‘कवी चतुष्टय’ म्हणून ओळखले जाते. ⇨ भगवतीचरण वर्मा, ⇨ रामकुमार वर्मा, ‘वियोगी’ – मोहनलाल महतो, ⇨ उदयशंकर भट्ट, ⇨ लक्ष्मीनारायण मिश्र, ‘द्विज’– जनार्दनप्रसाद झा ह्या कवींनीदेखील आपल्या काव्यरचनांनी छायावादी काव्यपरंपरा समृद्ध केली.

 

‘प्रसाद’ जयशंकर (१८८९–१९३७) हे प्रमुख छायावादी कवी. त्यांच्या काव्याचा एक विशिष्ट कालखंड हिंदी कवितेत आढळतो. कामायनी (१९३५) हे त्यांचे छायावादी युगाच्या वैशिष्ट्यांचे सर्वांगीण प्रतिनिधित्व करणारे विख्यात महाकाव्य. याशिवाय प्रारंभी ब्रज भाषेत व नंतर खडी बोलीत त्यांनी काव्यलेखन केले. उर्वशी (१९०९), वनमिलन (१९०९), प्रेमराज्य (१९०९), अयोध्या का उद्धार (१९१०), शोकोच्छ्‌वास (१९१०), बभू्रवाहन (१९११), कानन कुसुम (१९१३), करुणालय (१९१३), महाराजाका महत्त्व (१९१४), झरना (१९१८), आँसू (१९२५), लहर (१९३३) हे त्यांचे अन्य काव्यसंग्रह. वास्तव जीवनानुभव, प्रतिमाप्रचुर भाषा, प्रतीकात्मक शैली अशा विविध अंगांनी प्रसाद यांची कविता समृद्ध झाली आहे.

 

सुमित्रानंदन पंत (१९००–७७) हे छायावादी प्रवाहाचे मुख्य प्रवर्तक. निसर्गकवी म्हणूनही ते ओळखले जातात. उच्छ्‌वास (१९२०), ग्रंथि (१९२०), वीणा (१९२७), पल्लव (१९२८), गुंजन (१९३२) या काव्यसंग्रहांत निसर्ग ते अध्यात्म असा विशाल विचारसौंदर्याचा पट त्यांनी मांडला. विलक्षण भाषासामर्थ्य तसेच नवी छंदोरचना हेही त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होते. छायावादी, प्रगतिवादी, अरविंद-विचारदर्शी असे त्रिविध विचारविकासाचे चित्र त्यांच्या काव्यातून प्रत्ययास येते. प्रसाद, पंत यांच्या-प्रमाणेच ‘निराला’ – सूर्यकांत त्रिपाठी (१८९९–१९६१) यांनीही छायावादी काव्यपरंपरा पुढे नेण्याचे कार्य केले. अनामिका (१९२३), परिमल (१९३०), गीतिका (१९३६), तुलसीदास (१९३८) हे त्यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह. त्यांनी आपल्या काव्यातून जुन्या रूढींवर प्रहार करीत नवी मूल्ये, नवे विचार मांडले व आपले ‘निराला ‘पण सिद्ध केले. त्यांनी मुक्त-छंदात काव्यरचना करण्याची प्रथा सुरू केली. महादेवी वर्मा (१९०७–८७) ह्या सुविख्यात छायावादी कवयित्री. त्यांनी छायावादी वैशिष्ट्यांनी युक्त परंतु स्त्रीदुःखकेंद्री कविता लिहिली. त्यांच्या काव्यात रहस्यवादी वृत्ती आढळते, ती आत्मा-परमात्म्याच्या संघर्षरूपात पण त्यात आत्म-शोधाची अनिवार ओढही आहे. नीहार (१९३०), रश्मि (१९३२), नीरजा (१९३४), सांध्यगीत (१९३६), यामा (१९३९) हे त्यांचे अन्य काव्यग्रंथ. यामा ह्या काव्यसंग्रहासाठी त्यांना भारतीय ज्ञानपीठाचा पुरस्कार मिळाला (१९८२). तो हिंदी भावकाव्याचा मानदंड मानला जातो. भावप्रवणता हे त्यांच्या काव्याचे बलस्थान आहे.

 

छायावादोत्तर काव्ययुग : आधुनिक संप्रदायनिष्ठ काव्यपरंपरा छायावादी काव्याने आधुनिक हिंदीत सुरू केली. नंतरच्या काळात हालावाद, प्रयोगवाद, प्रगतिवाद अशा विविध विचार-वैशिष्ट्यांची कविता हिंदीत लिहिली गेली. त्यांचे कालखंड छोटे असले, तरी हिंदी कविता जागतिक व अत्याधुनिक बनविण्यात या काव्यधारांचे योगदान हिंदी कवितेच्या इतिहासात अविस्मरणीय आहे.

 

हालावादी काव्य : जीवनातील अपयश व स्वप्नभंग यांमुळे आलेल्या वैफल्यातून निर्माण झालेले तरुण काव्य म्हणून हिंदी हालावादी कवितेकडे पाहिले जाते. हालावादी कविता सूफी तत्त्वज्ञानातून निर्माण झाली असली, तरी तिची स्वतःची अशी काव्यवैशिष्ट्ये व परंपरा आहे. हिंदीत ⇨ बच्चन’– हरिवंशराय (१९०७–२००३) हे या काव्यधारेचे जनक. कवी ⇨ नवीन’–बालकृष्ण शर्मा (१८९७–१९६०), हृदयेश, ⇨ भगवतीचरण वर्मा (१९०३–८१), पद्मकांत मालवीय, ⇨ अंचल’ –रामेश्वर शुक्ल (१९१५–९५) इ. कवींनी हालावादी काव्य रचले. या कवितेत हाला (दारू), बाला (बारबाला), मधुशाला (शराबखाना), प्याला (चषक) इ. प्रतीके ही जीवन, जीवनरस, जीवनसाथी, जग यांची अभिव्यक्ती करतात. जीवनाच्या क्षणभंगुरतेचे वर्णन, जीवननैराश्याची चिकित्सा करीत अंतिम सुखाचा शोध घेतात. या कवितेवर दुःख, प्रेम, प्रणय, विरह यांची दाट सावली असली, तरी जीवनावरची श्रद्धा हेच तिचे अंतिम लक्ष्य आहे. बच्चन यांच्या मधुशाला (१९३५), मधुबाला (१९३६), मधुकलश (१९३७) या मधुकाव्यत्रयीने हिंदीत हालावाद रूढ केला. मधुकाळ (१९३३–३७) हाच हिंदी हालावादी कवितेचा कालखंड मानला जातो.

 

प्रगतिवादी काव्य : छायावादी, हालावादी, प्रयोगवादी हिंदी काव्य- धारा या व्यक्तिवादी होत. त्यांना छेद देत १९३६–४३ या काळात साम्यवाद, समाजवाद यांसारख्या समाजकेंद्री विचारांची कविता म्हणून हिंदी प्रगतिवादी कवितेकडे पाहिले जाते. हिंदी गद्य साहित्यात ⇨ प्रेमचंद (१८८०–१९३६) हे या वादाचे खंदे समर्थक होत. सुमित्रानंदन पंत, ‘निराला’– सूर्यकांत त्रिपाठी ⇨ दिनकर – रामधारी सिंह (१९०८–७४), भगवतीचरण वर्मा, ‘अंचल’– रामेश्वर शुक्ल, ‘नवीन’– बालकृष्ण शर्मा, ⇨ ‘सुमन’–शिवमंगल सिंह (१९१५–२००२), रामविलास शर्मा इ. कवींनी प्रगतिवादी काव्य लिहिले. मार्क्सवाद हा हिंदी प्रगतिवादी काव्याचा मूलाधार असल्याने द्वंद्वात्मक भौतिकवाद, साम्यवाद, समाजवादी विचार-सरणीतील शोषणविरोध, मानवतावाद, श्रमप्रतिष्ठा, उपयोगितावाद, वास्तववाद, स्त्रीस्वातंत्र्य, वंचित विकास, सुधारवाद, अंधश्रद्धा निर्मूलन इ. मूल्ये व वृत्ती या काव्यधारेत आविष्कृत झाल्या आहेत. सहज-सुबोध भाषेतील हे काव्य त्यातील जनकल्याणकारी भावनेमुळे अधिक लोकप्रिय झाले. क्रांती, परिवर्तन हे या काव्याचे लक्ष्य होते.

 

प्रयोगवादी काव्य : हिंदी प्रयोगवादी कविता ही छायावाद आणि प्रगतिवाद यांविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून उदयास आली. छायावादी कवितेत शब्दावडंबर माजले होते तर प्रगतिवादी कवितेत सामाजिकतेच्या नावावर भाव आणि शब्द यांना अभिधात्मक रूप आले होते. या सर्वांना छेद देणारी रचनाशिल्पे, शैली, शब्द असे सर्वांगीण प्रयोग करणारी कविता कालौघात जन्मास आली. १९४३–५९ या काळात प्रख्यात हिंदी कवी ⇨ ‘अज्ञेय’ –सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन (१९११–८७) यांनी तार सप्तक (१९४३), दूसरा सप्तक (१९५१) आणि तीसरा सप्तक (१९५९) असे प्रयोगवादी कवींचे प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित केले. त्यांतील पहिल्या तार सप्तकात ⇨ गजानन माधव मुक्तिबोध (१९१७–६४), ने चंद्र जैन, भारत भूषण, ⇨ प्रभाकर माचवे (१९१७–९१), ⇨ गिरिजाकुमार माथुर (१९१९–९४), रामविलास शर्मा या सहा कवींच्या आणि स्वतःच्या काव्याचे संकलन केले आहे. दूसरा सप्तकमध्ये भवानी प्रसाद मिश्र, शकुंतला माथुर, हरिनारायण व्यास, शमशेर बहादुर सिंह, नरेश मेहता (१९२२–२०००), रघुवीर सहाय, ⇨ धर्मवीर भारती (१९२६–९७) यांच्या, तर तीसरा सप्तकमध्ये प्रताप नारायण, कीर्ति चौधरी, मदन वात्स्यायन, केदारनाथ सिंह, कुंवर नारायण, विजयदेव नारायण साही, सर्वेश्वर दयाल सक्सेना यांच्या वेचक कविता संपादिल्या आहेत. वरील सप्तकांच्या पहिल्या प्रस्तावनेत अज्ञेय यांनी ‘प्रयोग’ या शब्दाचा वापर करून हे कवी प्रयोगवादी असल्याचे घोषित केले आहे. १९६० पूर्वीच्या या कवितेची स्वतःची अशी गुणवैशिष्ट्ये होती. प्रयोगवादानुसार सौंदर्यप्रेरणा व्यापक असल्याने ती गतिमय आणि विकसनशील असते. शब्द कोमलकांत असतात, तसे अप्रचलित व परंपरामुक्तही असतात. या कवितेत वस्तुपूरक आणि व्यक्तिपूरक दृष्टिकोनांचा संबंध साधक-साध्य स्वरूपाचा असतो. प्रयोगवादी कवी आपल्या काव्यात व्यक्तिनिष्ठ प्रतीकांचा उपयोग करतात. शैलीवैविध्य, बौद्धिकता, अंतर्मुखता, कलात्मक प्रयोगवृत्ती, युगचित्रण, दुर्बोधता अशी अनेक वैशिष्ट्ये व वृत्ती प्रयोगवादी हिंदी काव्यात दिसून येते. पुढे व्यक्तिगत अतिरेकामुळे ही कविता कठीण बनत गेली व तिचे युग अस्तंगत झाले.


नवकाव्य : दूसरा सप्तकनंतरची हिंदी कविता स्थूल मानाने ‘नयी कविता’ म्हणून ओळखली जाते पण या कवितेची खरी ओळख करून दिली, ती नये पत्ते (१९५३) आणि नयी कविता (१९५४) या काव्य-संकलनांनी. हे काव्य सामान्य माणसांच्या संकुचित जगाचे चित्रण करणारे म्हणून नवे मानले गेले. या काव्याची चार वैशिष्ट्ये समोर येतात. ही कविता आधुनिकतेचे समर्थन व प्रतिनिधित्व करते. या कवितेत न्यूनगंडा-पेक्षा मुक्त वास्तवाचे समर्थन असते. हे समर्थन नवकाव्य स्वविवेकांच्या आधारे करणे श्रेयस्कर मानते. नवकाव्य हे आधुनिकता म्हणजे विकृती न मानता ती वैज्ञानिक संदर्भात स्वीकारताना आढळते. धर्मवीर भारतींच्या कनुप्रिया (१९५८) आणि कुंवरनारायणच्या आत्मजयी (१९६५) या काव्यग्रंथांकडे नवकाव्याची उदाहरणे म्हणून पाहिले जाते तथापि दूसरा सप्तक व तीसरा सप्तकमधील कवींच्या १९५४–५९ पर्यंतच्या कविता या नवकाव्य म्हणून ओळखल्या जातात. अस्सल अनुभव व बुद्धिमूलक वास्तव दृष्टी ही या नवकाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये होत.

 

साठोत्तरी काव्य : १९६० नंतरचा सु. पंधरा वर्षांचा आणीबाणीपूर्व काळ हा हिंदी कवितेच्या दृष्टीने बहुमुखी काव्यप्रकारांचा दिसून येतो. ‘दिनकर’ – रामधारी सिंह यांची उर्वशी (१९६१), नरेश मेहतांचे संशय की एक रात (१९६२), सुमित्रानंदन पंत यांचे लोकायतन (१९६४) ही या काळातील सरस प्रबंधकाव्ये. नवगीतांची एक समृद्ध काव्यपरंपरा या काळात प्रवाहित होत राहिली. शंभुनाथ सिंह यांचे समय की शिला पर, जगदीश गुप्तांचे नाव के पांव, ठाकुरप्रसाद सिंहांचे वंशी और मादल, रामदरश मिश्रांचे बैरंग बेनाम चिठ्ठियाँ ही याच कालखंडातील उत्कृष्ट काव्यरचना. अकविता, अतिकविता, अस्वीकृत कविता, विद्रोही कविता असे अनेक छोटेछोटे प्रवाह हिंदी काव्यात या काळात उदयास आले. हा नवकाव्याचाच विस्तार होता पण या कवितेत निषेधभाव होता. गजानन माधव मुक्तिबोधांच्या काही कविता याचे उदाहरण होत. धूमिल, ऋतुराज, चंद्रकांत देवताले, लीलाधर जग्डी, विष्णुचंद्र शर्मा, प्रणवकुमार बंदोपाध्याय, विजेंद्र, विनय हे या काळातील श्रेष्ठ कवी. ‘धूमिल’ – सुदामा पांडेय (१९३६–७५) यांचा संसद से सडक तक (१९७०) हा काव्यसंग्रह या दृष्टीने महत्त्वाचा होय. स्वातंत्र्यानंतरच्या तरुण पिढीच्या मोहभंगाची कविता म्हणूनही या कालखंडातील कवितेकडे पाहिले जाते.

 

आपात्कालोत्तर काव्य : आणीबाणीची परिस्थिती (१९७५–७७) ही केवळ राजकीय नव्हती. एका राजकीय उलथापालथीने हिंदी समाजाचे रूपच पालटून टाकले होते. हिंदी कवितेत अकवितेच्या रूपात आलेली मरगळ, संपूर्ण क्रांती, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, विद्यार्थिआंदोलन, राजकीय दडपशाहीविरोध अशा अनेक कारणांनी हिंदी कविता संघर्ष, संघटन, जागृती, स्वातंत्र्य, क्रांती अशा मूल्यांचा जयघोष करणारी तर झालीच पण परिस्थिती-नुसार कवींनीही राजकीय भूमिका घेतल्याने हिंदी कविता नवोन्मेषी बनली. सुदामा पांडे का प्रजातंत्र (धूमिल), छोटे बूतों का बयान (अब्दुल बिस्मिल्लाह), खुली आँखों का आकाश (दिविक रमेश), यह एक दिन है (प्रयाग शुक्ल), जख्म पर धूल (मलयज), पहाड पर लालटेन (मंगलेश डबराल), हो जाने दो मुक्त (सुनीता जैन) अशा अनेक काव्य-संग्रहांतून तत्कालीन वर्तमानाची प्रतिक्रिया हिंदी कवितेत उमटली आणि ती एक आश्वासक कविता म्हणून उदयास आली. या काळात अनेक कवींनी विपुल काव्यरचना केल्या. तसेच कार्यकर्ता, समीक्षक, निरीक्षक, संघर्षकारी अशा अनेक भूमिका त्यांनी आपल्या कवितेतून साकारल्या. आठवे दशक की कविता (‘बच्चन’– हरिवंशराय), चौथा सप्तक (अज्ञेय,१९७९), प्रगतिशील कविता के मील के पत्थर (रणजित) हे या काळातील काही प्रातिनिधिक काव्यसंग्रह. गीतिकाव्य, नवगीत, प्रबंधात्मक काव्य असे पूर्वकालीन युगपरंपरा जपणारे काव्य या काळात प्रकाशित झाले तथापि अधिक प्रभावी ठरले, ते समीक्षा करणारे काव्यच. कवयित्रींचा अभाव हे या काळाचे अंतर्मुख करणारे वैशिष्ट्य ठरले. जनवादी कविता असे या काळातील कवितेचे रूप बनले. गझलसारखा काव्य-प्रकारही समाजाभिमुख बनला. दुष्यंत कुमार (१९३३–७५) यांचा साये में धूप हा गझलसंग्रह याचे उत्तम उदाहरण होय. १९७५–९० या काळात मोठ्या संख्येने झालेले काव्यलेखन हे जागृतीचे लक्षण होते. तसेच या काळात काव्यसंग्रहांचे झालेले विक्रमी प्रकाशन यावरूनही तत्कालीन कवितेचे ऐतिहासिक महत्त्व सिद्ध होते.

 

जागतिकीकरण आणि काव्य : रशियाचे विभाजन, ग्लासनोस्त, पेरेस्त्रोइका, डंकेल करार, मुक्त अर्थव्यवस्था, जागतिक बँकेचे वर्चस्व, खासगीकरण, उदारीकरण, निर्गुंतवणुकीचे धोरण, बहुराष्ट्रीय व्यापार कंपन्या, बँका, विमा कंपन्यांचे पेव, संगणकीकरण, संपर्कक्रांती या सर्वांमुळे भारतीय समाजमन बदलून गेले. अमेरिका हा समाजादर्श ठरू लागला. पूर्वव्यवस्था, सुरक्षा, सेवाशाश्वती इ. जागी करारपद्धती, मॉल्स संस्कृती, पिझ्झा, बर्गर, कॉफी, अत्याधुनिक फॅशन्स अशा साऱ्या बदलांनी माणसास एक वस्तू, ग्राहक बनवून टाकले. त्याचा फार मोठा परिणाम जीवनमूल्ये, जीवनशैली, जीवन-तत्त्वज्ञान इत्यादींवर होऊन व्यक्तीमध्ये आत्मरतता, स्वार्थ, चंगळवाद, उपभोगवृत्ती बळावल्याने स्थानिक माणूस वैश्विक संस्कृतीचे अंग बनला.

 

जागतिकीकरणाची प्रतिक्रिया व प्रतिबिंब व्यक्त करणारी कविता म्हणून वीरेन डंगवाल यांचा इसी दुनिया में (१९९१), बद्रीनारायण यांचा सच सुने कई दिन हुए (१९९३), अरुण कमल यांचा नये इलाके में (१९९६), ज्ञानेंद्रपति यांचा गंगातह, कुमार अंबुज यांचा अनंतिमा (१९९८), मदन कश्यप यांचा नीम रोशनी (२०००), सीतेश आलोक यांचा यथासंभव हे काव्यसंग्रह लक्षणीय होत. या काळात अनामिका, प्रभा खेतान, कात्यायनी, अजंता देव यांसारख्या कवयित्रींनी विपुल काव्यलेखन करून जागतिकीकरणासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. या संदर्भात इंदू जैन (बुनती आवाजें, १९९०), कमल कुमार (गवाह, १९९०), अमृता भारती (सन्नाटे में दूर तक ,१९९२), सुनीता जैन (हथेली पर चाँद, १९९८) यांचे काव्यसंग्रह महत्त्वाचे ठरले. या काळातील कवितेचे मूल्यांकन करताना कवितेतील पूर्वीची विचारबद्धता संपून तिची जागा समकालीन प्रभावांनी घेतली असल्याने विशेषत्वाने लक्षात येते. या काळात मनुष्यसंबंधांपेक्षा आर्थिक संबंध महत्त्वाचे ठरले. समूहचेतनेजागी व्यक्तिस्वार्थ महत्त्वाचा ठरला. परिणामी ही कविता वर्तमान प्रश्नांना पाठ दाखविताना दिसते. सर्वसाधारण माणसांचे दुःख, समस्या कवितेत मध्यमवर्गीय जाणिवांतूनच येतात. ही कविता जागतिकीकरणाची समर्थक, आत्मकेंद्री आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने अधिक वर्णनात्मक बनली.

 

एकविसाव्या शतकातील काव्य : जागतिकीकरणाचे परिणाम चित्रित करणारी कविता म्हणून एकविसाव्या शतकातील हिंदी कवितेकडे पाहिले जाते. वीरेंद्र सक्सेना –ठोस प्रीति की प्रतीति (२००१), रमानाथ अवस्थी–हंस अकेला (२००२), अजंता देव या कवयित्रीचा राख का किला (२००२), वीरेन डंगवाल – दुष्चक्र में स्रष्टा (२००२), मनोज सोनकर – चित्राधार (२००३), अश्वघोष – सपाट धरती की फसलें (२००४), रमेश कौशिक – मैं यहाँ हूँ (२००४) आणि कहाँ हैं वे शब्द (२००६), स्वप्नील श्रीवास्तव –मुझे दूसरी पृथ्वी चाहिए (२००५), नरेंद्र मोहन – एक खिडकी खुली है अभी (२००५) यांच्या कविता भूतकाळास छेद देत नवी भाषा, शैली, आशय यांचा शोध घेणारी अस्वस्थ कविता म्हणून प्रत्ययास येतात.

 

गद्य साहित्य : आधुनिक काळ हा प्राचीन हिंदी साहित्यापेक्षा वेगळा ठरतो, तो गद्यलेखनामुळे. काव्याची पूर्वपरंपरा विकसित होत असताना रीतिकालाच्या उत्तरार्धात ज्या गद्यलेखनाचा, शैलीचा प्रारंभ झाला होता, त्याचा आधुनिक काळात विकास होत होता. प्राचीन पद्याच्या सटीक आवृत्त्या, त्यांची गद्य रूपांतरे वा विवेचने इंग्रजी व संस्कृत नाटक, काव्य, कादंबऱ्या यांची भाषांतरे असे आधुनिक काळातील प्रारंभिक गद्य साहित्याचे स्वरूप होते पण स्वातंत्र्य-आंदोलनाने चेतविलेल्या अस्मितेमुळे स्वदेश, स्वभाषा, स्वसाहित्याच्या ऊर्मी कालौघात प्रबळ झाल्या. अनुवाद, अनुकरण यांपेक्षा हिंदी गद्यकारांनी विविध साहित्यप्रकारांत मौलिक लेखनाचे योगदान दिले आणि हिंदीचे स्ववैशिष्ट्य प्रतिबिंबित करणारे गद्य साहित्य विकसित केले. ते आधुनिक हिंदी गद्य साहित्य म्हणून ओळखले जाते. १८५७–२०१५ या कालखंडात कथा, कादंबरी, नाटक, निबंध या मुख्य गद्य प्रकारांबरोबरच एकांकिका, व्यक्तिचित्रे, चरित्रे, आत्मचरित्रे, आठवणी, दैनंदिनी, मुलाखती, श्रुतिका, पटकथा, धारावाहिक, वृत्तांत, भाषांतरे, विधांतरित लेखन (रूपांतरण) असे वैविध्यपूर्ण विपुल लेखन झाले. अनेक गुणांनी वैशिष्ट्यपूर्ण असे हे हिंदी गद्य साहित्य भारताचे प्रातिनिधिक गद्य साहित्य म्हणून ओळखले गेले. त्याचा साहित्यप्रकारांनुसार थोडक्यात आढावा असा :

 

कथा : हिंदी कथेचा उगम : विसाव्या शतकाच्या प्रारंभिक दोन दशकांत हिंदी कथा उदयास आली व प्रतिष्ठितही झाली. त्यामुळे भारतेंदु युगात कथात्मक शैलीचे निबंध आढळतात पण कथा दिसत नाही. महावीरप्रसाद द्विवेदी संपादित सरस्वती (१९००) या मासिकाद्वारे हिंदी कथालेखनास व प्रकाशनास चालना मिळाली. काशीहून प्रसिद्ध होणाऱ्या गल्पमाला (१९१८) या मासिकातून कथालेखन मोठ्या प्रमाणात होत असे. हिंदीची पहिली मौलिक कथा कोणती, याबाबत साहित्येतिहासकारांत मतभेद आहेत परंतु काही आद्य मौलिक हिंदी कथां-मध्ये ⇨ किशोरीलाल गोस्वामी (१८६५–१९३३)– ‘इंदुमती’ (१९००), भगवानदीन – ‘प्लेग की चुडैल’ (१९०२), रामचंद्र शुक्ल – ‘ग्यारह वर्ष का समय’ (१९०३), बंग महिला –‘दुलाईवाली’ (१९०७), ⇨ वृंदावनलाल वर्मा –‘राखी बंद भाई’ (१९०९) यांच्या कथांचा समावेश होतो. असे असले तरी, हिंदी कथेच्या प्रारंभीच्या काळात ब्रज, उर्दू, संस्कृतप्रचुर हिंदीत लिहिलेल्या कथा आढळतात. आधुनिक हिंदी कथेच्या निर्मितीत या कथांचा महत्त्वाचा वाटा आहे. अशा कथांत इंशा अल्ला खाँ –‘रानी केतकी की कहानी’ (१८००–१०), लल्लूलाल – ‘प्रेमसागर’ (१८०३–०९), सदल मिश्रा –‘नासितोपाख्यान’ (१८०३) इत्यादींचा समावेश होतो. पुढे भारतेंदु युगात ⇨ बालकृष्ण भट्ट (१८४४–१९१४), प्रतापनारायण मिश्र, भारतेंदु हरिश्चंद्र, बालमुकुंद गुप्त प्रभृतींनी कथासदृश लेखन केल्याचे आढळते.


प्रसाद युग : ‘प्रसाद’ – जयशंकर हे या युगाचे श्रेष्ठ प्रतिनिधी. इंदु (१९०९) या मासिकात त्यांची ‘ग्राम’ (१९११) ही कथा प्रकाशित झाली. त्यानंतर प्रसाद यांनी प्रतिध्वनी (१९२६), आकाशदीप (१९२९), आँधी (१९३१), इंद्रजाल (१९३६) असे एकापेक्षा एक सरस कथा-संग्रह प्रकाशित करून प्रेम, करुणा, त्याग, बलिदान अशा मूल्यांवर आधारित काव्यात्मक, विचारप्रधान, भावनाप्रधान, चित्रात्मक कथांचे युग निर्माण केले. त्यांच्या प्रभावाने ⇨ सुदर्शन, ‘कौशिक’ – विश्वंभरनाथ शर्मा, ⇨ चतुरसेन शास्त्री, रायकृष्ण दास, विनोदशंकर व्यास इ. कथाकारांनी कथालेखन केले.

 

प्रेमचंद युग : प्रेमचंद हे हिंदी साहित्यातील एक श्रेष्ठ कथाकार व या युगाचे श्रेष्ठ प्रतिनिधी. त्यांची कथाकार म्हणून उमेदवारी सुरू झाली ती उर्दूमध्ये. हिंदीमधील त्यांची पहिली प्रकाशित कथा ‘पंच परमेश्वर’ (१९१६). प्रसाद व प्रेमचंद यांच्या प्रारंभिक कथालेखनाच्या काळात राजा राधिकारमण प्रसाद सिंह –‘कानों मे कंगना’, कौशिक –‘रक्षा- बंधन’ आणि ‘गुलेरी’ – चंद्रधरशर्मा – ‘उसने कहा था’ इ. लेखकांच्या कथा हिंदीत आल्या. यातूनच हिंदी कथेत वास्तववादी कथांचे युग सुरू झाले. प्रेमचंद यांनी महात्मा गांधींच्या प्रभावाने ग्रामीण भारत केंद्रस्थानी मानून कृषक् व समस्याप्रधान कथांचा एक नवा प्रवाह हिंदीत विकसित केला. प्रेमचंद यांनी सु. ३०० कथा लिहिल्याचे सांगितले जाते परंतु प्रेमचंद : कलम के सिपाही या चरित्रात त्यांचे पुत्र अमृतराय यांनी त्यांच्या २२४ कथांचा उल्लेख केला आहे. त्यांच्या समग्र कथा मानसरोवर (१९६० भाग १–८) मध्ये संकलित आहेत. पैकी ‘शतरंजके खिलाडी’ (१९२५), ‘पूस की रात’ (१९३०), ‘ठाकूर का कुआँ’ (१९३२), ‘ईदगाह’ (१९३३), ‘बडे भाई साहब’ (१९३४), ‘कफन’ (१९३६) ह्या अभिजात कथा म्हणून ओळखल्या जातात. या युगात ज्वालादत्त शर्मा, पदुमलाल पुन्नालाल बख्शी, ⇨ उग्र –बेचन शर्मा पांडेय, वृंदावनलाल वर्मा, ⇨ गोपाल राम गहमरी (१८६६–१९४६) प्रभृती कथाकारांनी वातावरणप्रधान कथा, हेरकथा तसेच प्रकृतिवादी (वास्तववादी), ऐतिहासिक, वर्णनात्मक, शोकात्म, आत्म-चरित्रात्मक तसेच पत्रलेखनात्मक असे वैविध्यपूर्ण कथालेखन करून हिंदी कथा रचनाशिल्प, शैली, आशय या दृष्टीने समृद्ध व विकसित केली.

 

जैनेंद्र युग : काव्यात्मक वा काल्पनिक कथा तसेच ग्रामीण वा वास्तववादी कथाप्रवाहांबरोबरच हिंदी कथेच्या प्रारंभीच्या काळात व्यक्तिवादी अथवा मनोवैज्ञानिक कथांचा एक प्रवाह निर्माण झाला. या कथा चरित्रात्मक व विचारप्रधान असत. त्याचे नेतृत्व गांधीवादी तत्त्वचिंतक ⇨ जैनेंद्रकुमार (१९०५–८८) करत होते. एक श्रेष्ठ कथाकार व युगप्रतिनिधी म्हणून हिंदी साहित्यात त्यांना मानाचे स्थान आहे. फाँसी (१९२९), वातायन (१९३०), नीलमदेश की राजकन्या (१९३३), एक रात (१९३४), दो चिडियाँ (१९३९), पाजेब (१९४२), जयसंधि (१९४९) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह. त्यांच्या विविध कथासंग्रहांतील कथा पुढे जैनेंद्रकी कहानियाँ (भाग १–७) मध्ये विषयवार संकलित रूपात प्रकाशित झाल्या. या कथांतून जैनेंद्र यांनी स्त्रीच्या पातिव्रत्यकल्पना तसेच तिचा चार भिंतींतील कोंडमारा शब्दबद्ध केला आहे. मानसिक व्यथा, प्रश्न, समस्या यांची उकल त्यांनी मानसशास्त्रीय मनोविश्लेषण पद्धतीने केली आहे. अज्ञेय, ⇨ इलाचंद्र जोशी इ. कथाकारांनी पुढे या पद्धतीचे कथालेखन केले. राधिका रमण प्रसाद सिंह, भगवतीप्रसाद वाजपेयी, भगवतीचरण वर्मा, निराला, राहुल सांकृत्यायन, ⇨ सुभद्राकुमारी चौहान (१९०५–४८), उषादेवी मित्रा, चंद्रगुप्त विद्यालंकार, ⇨ विष्णु प्रभाकर हे या काळातील अन्य कथालेखक. मात्र त्यांच्या कथा स्वरूप, शैली, विषय अशा अंगांनी सर्वस्वी भिन्न आहेत.

 

मार्क्सवादी कथा : साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता ⇨ कार्ल मार्क्स याच्या विचारधारेवर विश्वास ठेवून त्याचे समर्थन करणाऱ्या कथा ⇨ यशपाल (१९०३–७६) यांनी लिहायला सुरुवात केली. वो दुनिया (१९४२), ज्ञानदान (१९४३), अभिशप्त (१९४४), तर्क का तूफान (१९४४), भस्मावृत चिनगारी (१९४६), फूलों का कूर्ता (१९४९), धर्मयुद्ध (१९५०), उत्तराधिकारी (१९५१) आणि लैंपशेड (१९७९) हे त्यांचे काही प्रसिद्ध कथासंग्रह. यातील कथांतून त्यांनी शोषक-शोषित संघर्ष चित्रित करून हिंदी कथा वैचारिक निकषावर प्रगल्भ केली. त्यांच्या कथा अत्यंत मार्मिक व प्रभावी आहेत. पुढे या परंपरेत रांगेय राघव, राहुल सांकृत्यायन प्रभृती कथाकारांनी कथा लिहिल्या. ⇨ ‘अश्क’ -उपेंद्रनाथ अश्क (१९१०–९६), अमृतलाल नागर, धर्मवीर भारती, चंद्रकिरण सौनरिक्सा, भैरवप्रसाद गुप्त हे याच काळात वेगळ्या शैलीत कथालेखन करणारे अन्य कथालेखक.

 

वरील सर्व कालखंडांतून हिंदी स्वातंत्र्यपूर्व कथा विकसित होत गेली. ह्या कथेने भारतीय कथासाहित्यात मोलाची भर घातली. जीवनाच्या सर्व स्तरांचे चित्रण करणारी विचारभाषा, रचनाशिल्प व शैलींचे वैशिष्ट्य निर्माण करणारी हिंदी कथा म्हणून तिचे योगदान कथाविकासात असाधारण राहिले आहे.

 

स्वातंत्र्योत्तर हिंदी कथा : १९४७–६० हा कालखंड हिंदी कथा-विकासाच्या दृष्टीने प्रेमचंदोत्तर व नवकथापूर्व कालखंड म्हणून महत्त्वाचा मानण्यात येतो. या काळातील हिंदी कथेत त्रिविध संघर्षाचे प्रतिबिंब दिसते : (१) अभिव्यक्तिसंघर्ष, (२) आत्मसंघर्ष, (३) जीवनसंघर्ष. या कथेत माणसाचे समग्र जीवन जसे चित्रित केले आहे, तसेच दैनंदिन जगणेही व्यक्त झाले आहे. कथाकार कथेतून संकेतार्थाने व्यापक आशय व्यक्त करताना जाणवतात. त्यामुळे ही कथा कलात्मक झाल्याचा प्रत्यय वाचकांस येत राहतो. या काळात प्रेमचंदप्रभावी ग्रामीण चित्रण- प्रधान कथालेखकांचा एक वर्ग दिसतो. त्यात शिवप्रसाद सिंह, मार्कण्डेय, फणीश्वरनाथ रेणु यांचा समावेश आहे. या परंपरेपेक्षा सर्वथा वेगळ्या कथा ⇨ भीष्म साहनी (१९१५–२००३), शेखर जोशी, अमरकांत, विजया चौहान, ओंकारनाथ श्रीवास्तव, शैलेश मटियानी, मधुकर गंगाधर, गुलशेर खान शानी यांनी लिहिल्या. आधुनिकताबोध हे यांच्या कथांचे मुख्य सूत्र.

 

हिंदी नवकथा : हिंदी कवितेच्या इतिहासात ज्याप्रमाणे नवकाव्य (नयी कविता) निर्माण झाले, तसेच कथेच्या इतिहासातही नवकथा (नयी कहानी) उदयास आली. कहानी नववर्षांक या मासिकाच्या जानेवारी १९५६ च्या अंकात प्रख्यात समीक्षक नामवर सिंह यांचा ‘आज की हिंदी कहानी’ या शीर्षकाचा समीक्षात्मक लेख प्रकाशित झाला होता. त्यात नामवर सिंह यांनी कमलेश्वर (१९३२–२००७), ⇨ मोहन राकेश (१९२५–७३), राजेंद्र यादव (१९२९–२०१३), शिवप्रसाद सिंह, मार्कण्डेय इ. कथाकारांच्या कथाप्रयोगांचा उल्लेख ‘नयी कहानी’ असा केला होता. त्यावरून हिंदी कथेत नवकथा रूढ झाली. ही कथा माणसाच्या रोजच्या जीवनातील ताणतणाव, नव्या मूल्यांचा शोध, प्रयोग-वैविध्य अशा अंगांनी पूर्वकालीन कथांपेक्षा भिन्न म्हणून ‘नवकथा’ मानली गेली. मोहन राकेश यांची ‘मलबे का मालिक’ ही व्यवच्छेदक नवकथा म्हणून सांगता येईल. पुढे त्यांनी नये बादल (१९५७), जानवर और जानवर (१९५८), एक और जिंदगी (१९६१) इ. कथासंग्रहांतून अशाच कथा लिहिल्या. देशाची फाळणी, रक्तपात, जातीय व धार्मिक दंगे आणि त्या अनुषंगाने दुरावा, संशय, भय, घृणा यांचे जिवंत वर्णन या कथांत आहे. राजेंद्र यादव यांनी आपल्या कथांतून व्यापक आधुनिकता शब्दबद्ध केली आहे. जहाँ लक्ष्मी कैद है (१९५७), अभिमन्यु की आत्महत्या (१९५९), अपनें पार या कथासंग्रहांमधील कथांतून त्याची प्रचिती येते. कमलेश्वर यांनी आपल्या कथांतून महानगरीय संस्कृती व सभ्यतेचे चित्रण करीत माणसांच्या विसंगत व्यवहारांवर बोट ठेवले. ‘खोई हुई दिशाएँ’, ‘मांस का दरिया’ या त्यांच्या कथा याचे उत्तम उदाहरण होय.

 

साठोत्तरी कथा : हिंदी नवकथा आणि आणीबाणी यांमधील काळाची हिंदी कथा (१९६०–७५) म्हणजे साठोत्तरी हिंदी कथा. या काळात नरेश मेहता, रघुवीर सहाय, सर्वेश्वरदयाल सक्सेना, धर्मवीर भारती, कुंवर नारायण, रामदरश मिश्र यांसारख्या कविप्रवृत्तीच्या साहित्यकारांनी मोठ्या प्रमाणात कथालेखन केले. तसेच याच काळात महिला कथाकारांचा उदयही मोठ्या संख्येने झाला. मन्नू भंडारी, ⇨ कृष्णा सोबती, शिवानी, उषा प्रियंवदा, रजनी पन्निकर, मेहरून्निसा परवेज, विजया चौहान यांच्या कथांना बहर आला तो याच काळात. निर्मल वर्मा, ⇨ श्रीकांत वर्मा (१९३१–८६), रामकुमार यांनी आधुनिक जाणिवांच्या कथांची भर घातली, तोही कालखंड हाच. मोहभंगाची कथा असेही या कालखंडातील कथेचे वर्णन केले जाते. नव्या जीवनवास्तवाचे चित्रण हे या कथांचे वैशिष्ट्य. मूल्य आणि व्यक्तिमत्त्व यांच्या विघटनाचे चित्रण या कथांत प्रत्ययकारीपणे चित्रित झाले आहे. जीवनातील एकटेपण, निराशा, विघटन यांचे चित्रण करणारे ज्ञानरंजन, काशीनाथ सिंह, दूधनाथ सिंह, गंगाप्रसाद विमल, गिरिराज किशोर, रवींद्र कालिया, महेंद्र भल्ला, ज्ञानप्रकाश हे या काळातील विख्यात कथाकार. ‘गुलकी बन्नो’ व ‘बंद गली का आखरी मकान’ (धर्मवीर भारती), ‘पुष्पहार’ (शिवानी), ‘वापसी’, ‘एक और विदाई’ व ‘जिंदगी और गुलाब के फूल’ (उषा प्रियंवदा), ‘परिंदे’ (निर्मल वर्मा), ‘पिता’ ( ज्ञानरंजन), ‘रक्तपात’ (दूधनाथ सिंह), ‘पेपरवेट’ (गिरिराज किशोर), ‘एक पति के नोटस्’ (महेंद्र भल्ला) अशा काही श्रेष्ठ कथांनी हा काळ कथेचा सुवर्णकाळ म्हणून सिद्ध केला.


आधुनिक कथा : १९७० नंतरची परंतु जागतिकीकरणापूर्वीची (१९९०) कथा हा आधुनिक कथेचा कालखंड. या कथेस हिंदीतील विख्यात समीक्षक ⇨ नगेंद्र (१९१५–९९) हे ‘अद्यतन कथा’ म्हणूनही संबोधतात. ही स्थूलपणे विसाव्या शतकाच्या सातव्या व आठव्या दशकांतली हिंदी कथा होय. नवकथेची पठडी सोडून कथाकारांनी या काळात नव्या कथालेखनाचा प्रयत्न केला. जीवनाची गुंतागुंत, क्रूरता, व्यथा, वेदना, प्रसंग, घटना यांसह येणारे व्यापक वास्तव या कथेत विशेषतः चित्रित झाले. या काळात हिंदी कथेचे ‘समांतर कहानी’, ‘जन कहानी’, ‘जनवादी कहानी’ असे परस्परविरोधी कथाप्रवाह आणि प्रकार उदयास आले. कमलेश्वर, मुद्राराक्षस इ. कथाकारांनी या प्रवाहाचे नेतृत्व केले. आठव्या दशकातील कथाकारांनी पूर्वपरंपरेनुसार कथा लिहिणे टाळले. आपल्या कथेतून त्यांनी शब्दनावीन्य, प्रतिमा, प्रतीके, मिथके यांचा प्राधान्याने वापर केला. व्यंग्य व वक्रोक्तिप्रधान शैलीच्या कथा त्यांनी रचल्या. कथेतून अहंकेंद्रितता गायब होऊन ती समाजोन्मुख झाली. शेखर जोशी, ज्ञानरंजन, ‘चंद्र’– यादवेंद्र शर्मा, राकेश वत्स, उदय प्रकाश, प्रयाग शुक्ल, राजी सेठ, मंजुल भगत, दिनेश पालीवाल, मिथिलेश्वर हे या काळातील श्रेष्ठ कथाकार. त्यांच्या उत्कृष्ट कथांमुळे हा काळ आधुनिकच नाही, तर अत्याधुनिक कथेचा काळ बनला. ‘शोक’, ‘लुटेरे’, ‘संवाद’, ‘जूतों का आत्मसमर्पण’, ‘थप्पड’, ‘सफेद कौआ’ इ. कथा ह्या काळातील प्रातिनिधिक कथा मानल्या जातात.

 

उत्तर-आधुनिक कथा : १९९० नंतर जगभर जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. खासगीकरण, उदारीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, माहिती व जनसंपर्कक्रांती, संगणक, महाजाल (इंटरनेट) या सर्वांमुळे भारतीय समाजजीवन अल्पकाळात झपाट्याने बदलले. जगात कोणताच विचार अंतिम नसतो विचार आणि विकास परस्परपूरक असतात, त्यामुळे विधि-निषेधापलीकडे जाऊन जग जसे आहे तसे स्वीकारावे, अशी धारणा असलेल्या उत्तर-आधुनिकतावादी विचारसरणीचे समर्थन करणाऱ्या कथा १९९०–२००० या कालखंडात मोठ्या प्रमाणात लिहिल्या गेल्या. शिवमूर्ति–केसर कस्तुरी (१९९१) प्रियंवदा–खरगोश सृंजय–कामरेड का कोट (१९९३) उदय प्रकाश–तिरिछ (१९९०), पॉल गोमरा का स्कूटर (१९९७) अखिलेश–शापग्रस्त (१९९७) संजीव–दुनिया की सबसे हसीन औरत (१९९३), ब्लैक होल (१९९७), खोज (१९९९) हे यांचे उत्तर-आधुनिक कालखंडातील दर्जेदार कथासंग्रह होत. देशीवादाच्या विरुद्ध असणाऱ्या या कथा एका अर्थाने जागतिकीकरणाची प्रतिक्रिया म्हणून लिहिल्या असल्या, तरी त्यांत जागतिकीकरणाची भीषणता आढळत नाही कारण तो काळ कथाकारांच्या दृष्टीने विलक्षण घालमेलीचा होता. नमिता सिंहचा जंगल कथा (१९९२), अलका सरावगींचा कहानी की तलाश में (१९९५), नासिरा शर्मांचा खुदा की वापसी (१९९८), लवलीनचा चक्रवात (१९९९) या कथासंग्रहांतील कथांतून लेखन झाले, ते मुख्यतः स्त्रीवादी दृष्टिकोनातून. ग्रामीण भागातून शहरात स्थापित झालेल्या मध्यमवर्गीय कथाकारांच्या कथा, असे या काळातील कथेचे प्रातिनिधिक स्वरूप आहे. तीत कालभान असले, तरी तीव्रतेची कमतरता दिसते.

 

एकविसाव्या शतकातील कथा : जागतिकीकरणाच्या परिणामांचे चित्रण करणाऱ्या या काळातील कथांतून बाजारवाद, चंगळवाद, माध्यमांचे आक्रमण, संस्कृतीचे वैश्विकीकरण अशा परिणामकारी घटकांचे प्रभावी चित्रण आढळते. अशा कथा ममता कालिया–काके की हट्टी, वंदना राग–यूटोपिया, गीत चतुर्वेदी–सावंत आंटी की लडकियाँ, मीरा कांता–गली दुल्हनवाली, असगर वजाहत–मुश्किल काम, कृष्ण बलदेव वैद–खाली किताब का जादू यांच्या या कथासंग्रहांत आढळतात. मनोज सोनकर, ओमप्रकाश वाल्मिकी, क्षितिज शर्मा, द्रोणवीर कोहली, रूपसिंह चंदेल हे या काळातील इतर उल्लेखनीय कथाकार होत.

 

कादंबरी : हिंदी कादंबरीचा प्रारंभ बंगाली व इंग्रजी कादंबऱ्यांच्या प्रेरणेने झाला. लाला श्रीनिवासदास यांनी लिहिलेली इंग्रजी धाटणीची परीक्षागुरू (१८८२) ही हिंदीची पहिली कादंबरी मानली जाते. कादंबरीचा प्रारंभिक कालखंड भारतेंदु युगापासून मानला जातो.

 

भारतेंदु युग : हिंदी साहित्यात या काळात सामाजिक, ऐतिहासिक, चमत्कृतिपूर्ण, अवतारवादी, हेरकथा, साहसी इ. प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. किशोरीलाल गोस्वामी, ⇨ बालकृष्ण भट्ट (१८४४–१९१४), ठाकूर जगमोहन सिंह, राधाकृष्ण दास, लज्जाराम शर्मा, ⇨ देवकीनंदन खत्री (१८६१–१९१३), गोपाल राम गहमरी हे हिंदीचे प्रारंभकालीन कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. या काळात बालकृष्ण भट्ट –रहस्यकथा (१८७९), राधाकृष्ण दास–निस्सहाय हिंदू (१८९०) या सामाजिक तर देवकीनंदन खत्री यांचर चंद्रकांता (१८८८) ही चमत्कृतिपूर्ण कादंबरी प्रकाशित झाली. गुप्तहेर प्रकारच्या कादंबरीत गोपाल राम गहमरींची अद्‌भूत लाश (१८९६) आणि प्रेम व प्रणयप्रधान कादंबरीत ठाकूर जगमोहन यांची श्यामास्वप्न (१८८८) या कादंबऱ्या विशेष लोकप्रिय ठरल्या तथापि या कालखंडात वर्चस्व राहिले, ते सामाजिक कादंबऱ्यांचेच.

 

द्विवेदी युग : सामाजिक कादंबऱ्यांचा पूर ओसरून या काळात मनोरंजक कादंबऱ्यांचे साम्राज्य उदयास आले. पूर्व युगातील कादंबरीकारच या काळात सक्रिय राहिले. चमत्कारपूर्ण, अवतारकथांवर आधारित कादंबऱ्या लिहिण्यात सिद्धहस्त ठरलेल्या देवकीनंदन खत्री यांच्या काजरकी कोठरी (१९०२), अनूठी बेगम (१९०५), गुप्त गोदना (१९०६), भूतनाथ (नऊ भाग, १९०६) या कादंबऱ्यांची मोहिनी वाचकांवर राहिली. रहस्यप्रधान कादंबऱ्यांचे प्रवर्तक गोपाल राम गहमरी यांनी लिहिलेल्या सर कटी लाश (१९००), चक्करदार चोरी (१९०१), जासूस की भूल (१९०१), इंद्रजालिक जासूस (१९१०), जासूस की ऐय्यारी (१९१४) या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. किशोरीलाल गोस्वामी यांनी ऐतिहासिक कादंबरी लेखनाशिवाय तारा या क्षात्रकुलकमलिनी (१९०२), रजिया बेगम या रंगमहलमें हलाहल (१९०४), मल्लिका देवी या बंग सरोजिनी (१९०५) आणि लखनऊ की कब्र या शाही महलसरा या कादंबऱ्या लिहिल्या. अयोध्यासिंह उपाध्याय, मन्नन द्विवेदी, ब्रजनंदन सहाय, राधाकांत इ. नव्या कादंबरीकारांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. या काळात कादंबऱ्यांचे अनुवादही विपुल प्रमाणात झाले. विशेषतः इंग्रजी व बंगाली कादंबऱ्यांचे अनुवाद गंगाप्रसाद गुप्त, जनार्दन प्रसाद झा, दुर्गाप्रसाद खत्री, महावीर प्रसाद पोद्दार प्रभृतींनी केले.

 

प्रेमचंद युग : आर्य समाजप्रसार, गांधीवाद, स्वतंत्रता आंदोलनास आलेली गती इत्यादींमुळे राष्ट्रवाद आणि ध्येयवाद यांचे गारूड तत्कालीन साहित्यकारांवर होते. प्रेमचंदांनी याच प्रभाव व संस्कारांनी लेखन करत सेवासदन (१९१८), प्रेमाश्रम (१९२२), रंगभूमि (१९२४), निर्मला (१९२७), कायाकल्प (१९२८), गबन (१९३०), कर्मभूमि (१९३२), गोदान (१९३६) अशा सरस कादंबऱ्यांद्वारे त्यांनी आपली युगमुद्रा हिंदी कादंबरीच्या इतिहासावर उठवली. या काळात ‘कौशिक’– विश्वंभरनाथ शर्मा, आचार्य चतुरसेन शास्त्री, प्रतापनारायण श्रीवास्तव, शिवपूजन सहाय, ‘उग्र’– बेचन शर्मा, जयशंकर प्रसाद, भगवतीचरण वर्मा, वृंदावनलाल वर्मा, राहुल सांकृत्यायन प्रभृती कादंबरीकारांनी सामाजिक, ऐतिहासिक, समस्याप्रधान कादंबरीलेखन केले.

 

प्रेमचंदोत्तर युग : प्रेमचंद यांच्यानंतर १९६० पर्यंत हिंदी कादंबरीत अनेक स्थित्यंतरे झाली. या सु. तीन दशकांतील पहिल्या दशकात एकीकडे फ्रॉइडप्रभावित व्यक्तिवादी मनोवैज्ञानिक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या तर दुसरीकडे मार्क्सवादी कादंबऱ्या उदयास आल्या. दुसरे दशक प्रयोग-वादी कादंबऱ्यांचे होते तर तिसऱ्या दशकात आधुनिक मूल्यबोधपर कादंबऱ्यांची निर्मिती झाली. जैनेंद्रकुमार यांनी कल्याणी (१९३९), सुखदा (१९५३), विवर्त, (१९५३), व्यतीत (१९५३), जयवर्धन (१९५६) इ. कादंबऱ्या लिहून व्यक्तिवादी मनौवैज्ञानिक कादंबऱ्यांचा प्रारंभ केला. ती परंपरा अज्ञेय, इलाचंद्र जोशी यांसारख्या कादंबरीकारांनी समृद्ध केली. अज्ञेय यांची शेखर – एक जीवनी (दोन भाग १९४१, १९४४) व इलाचंद्र जोशी यांची संन्यासी (१९४०) या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. मार्क्सवादी कादंबऱ्यांचे जनक यशपाल यांनी दादा कॉमरेड (१९४१), देशद्रोही (१९४३), मनुष्य के रूप (१९४९), झूठ-सच (दोन भाग १९५८, १९६०), इ. कादंबऱ्यांद्वारे समाजवादी विचार रुजवला तथापि ऐतिहासिक कादंबऱ्यांचे नेतृत्व जाते, ते वृंदावनलाल वर्मा यांच्याकडे. या प्रवाहात यशपाल, रांगेय राघव, भगवतीचरण वर्मा, अमृतलाल नागर, चतुरसेन शास्त्री, हजारीप्रसाद द्विवेदी प्रभृतींनी मोलाची भर घातली. फणीश्वरनाथ रेणु, ⇨ नागार्जुन (१९११–९८), रामदरश मिश्र, शिवप्रसाद सिंह यांनी प्रादेशिक कादंबऱ्या लिहिल्या. आधुनिक बोधपर कादंबऱ्या लिहिणारे मोहन राकेश, निर्मल वर्मा, राजकमल चौधरी, नरेश मेहता, श्रीलाल शुक्ल, मन्नू भंडारी यांनी आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीच्या कादंबऱ्या लिहून हिंदी कादंबरी प्रगल्भ व कलात्मक बनवली.


साठोत्तरी (आधुनिक) युग : सन १९६०–९० असा आणखी तीस वर्षांचा कालखंड हिंदी कादंबरी विकासातला व्यवच्छेदक टप्पा म्हणून पुढे येतो. आणीबाणी-उत्तरकाळ (आपात्कालोत्तर काळ) असेही याचे वर्णन केले जाते. विसाव्या शतकाच्या सातव्या, आठव्या, नवव्या दशकांतील हिंदी कादंबरी संवेदनशील, कलात्मक कादंबरी म्हणून ओळखली जाते. उषा प्रियंवदा – पचपन खंबे लाल दीवारें (१९६१), राही मासूम राजा – आधा गाँव (१९६६), कृष्णा सोबती – मित्रो-मरजानी (१९६६), मणि मधुकर – सफेद मेमने (१९७१), मन्नू भंडारी – महाभोज (१९७१), मृदुला गर्ग – चितकोबरा (१९७९), मनोहर श्याम जोशी – कुरू कुरू स्वाहा (१९८०), गोविंद मिश्र – हुजूर दरबार (१९८१), श्रवण कुमार गोस्वामी – भारत बनाम इंडिया (१९८३), अब्दुल बिस्मिल्लाह –झीनी-झीनी बीनी चदरिया (१९८६), प्रभा खेतान – आओ पेपे घर चले (१९९०) यांच्या या आणि इतर अनेक कादंबऱ्यांचा या काळातील प्रातिनिधिक रचना म्हणून उल्लेख केला जातो. प्रादेशिक, स्त्रीवादी, महानगरीय चित्रण करणाऱ्या वैविध्यपूर्ण कादंबऱ्या या काळात लिहिल्या गेल्या. शिल्प आणि शैली यांचे अनेक प्रयोग कादंबरीकारांनी आपल्या साहित्यकृतींतून केले व हिंदी कादंबरी प्रगल्भ, कलात्मक व वैविध्यपूर्ण बनली. समूहाकडून व्यक्तीकडे असा मूल्यप्रवासही ह्या कादंबरीविकासात दिसतो. भाषेतील बदल हेही या काळतील कादंबरीचे खास वैशिष्ट्य.

 

उत्तर-आधुनिक काळ : भांडवलशाही, जागतिकीकरण, बाजारवाद, चंगळसंस्कृती, आक्रमक माध्यमे व संपर्कसाधने यांतून व्यक्ती स्वायत्त झाली. जग जवळ आले. विषमतेची दरी रुंदावली. सेवाशाश्वती जाऊन करार, बांधीव वेतन (पॅकेज) यांचा काळ आला. मध्यमवर्ग नवश्रीमंत, विदेशी भारतीय बनला. या साऱ्या गोष्टींचे चित्रण विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात प्रकर्षाने झाले. नरेंद्र कोहली – महासमर (१९८८–२०००), सुरेंद्र वर्मा – मुझे चाँद चाहिए (१९९३), स्वयंप्रकाश – बीच का समय (१९९४), मंजूर एहतेशाम – दास्तान-ए-लापता (१९९५), दिनेशनंदिनी डालमिया – मरजीवा (१९९६), जगदंबा प्रसाद दीक्षित – अकाल (१९९७), कामतानाथ – कालकथा (१९९८), मैत्रेयी पुष्प – अल्मा कबूतरी (२०००), मिथिलेश्वर – यह अंत नहीं (२०००) या कादंबरीकारांनी वैश्विकीकरणाचे बदल आपल्या कादंबऱ्यांत टिपले आहेत.

 

एकविसावे शतक : जागतिकीकरण-प्रभावित लोकजीवन व संपर्क क्रांतीची गती यांमुळे माणूस आत्मकेंद्रित झाला. समाज, समूहभावना लोपली. काळ, काम, वेग यांत माणूसपण हरवलेल्या स्पर्धेचे चित्रण करणारे कादंबरीकार आपल्या कादंबऱ्यांतून एकविसाव्या शतकाचे प्रतिबिंब दाखवितात. उदा., सुदर्शन नारंग – खेल खेल में (२००१), चंद्रकांता – कथासतीसर (२००१), सिम्मी हर्षिता – रंगशाला (२००३), संजीव – सूत्रधार (२००३), क्षितिज शर्मा – पगडंडिया (२००३), महीप सिंह – अभी शेष है (२००४), हृदयेश – किस्सा हवेली (२००५) या कादंबऱ्यांतून नवे जग चित्रित झाले आहे.

 

अनुवादापासून सुरू झालेल्या हिंदी कादंबरीचे आज जगातील सर्व भाषांत अनुवाद होत आहेत. आशिया खंडाचे प्रातिनिधिक चित्रण करणारी कादंबरी म्हणून तिच्याकडे पाहिले जाते, हेच या कादंबरीचे श्रेष्ठपण होय. आशय आणि अभिव्यक्ती अशा दोन्ही अंगांनी हिंदी कादंबरी प्रत्येक काळात विकसित होत राहिली.

 

नाटक : संस्कृत नाटकांची हिंदी भाषांतरे, रूपांतरे यांनी हिंदी नाटकांचा प्रारंभ झाला. रामायण, महाभारत व त्यांतील विविध कथांवर आधारित नाटके ब्रज भाषेत आढळतात. भारतेंदु हरिश्चंद्रांचे वडील गोपालचंद उर्फ गिरिधरदासलिखित नहुष हे हिंदीतले पहिले नाटक मानले जाते.

 

भारतेंदु युग : भारतेंदु हरिश्चंद्रांनी संस्कृत नाटकांवर आधारित विद्यासुंदर, रत्नावली, पाखंड विडंबन (१८७२) या नाटकांबरोबरच विख्यात इंग्रजी नाटककार शेक्सपिअर याच्या नाटकांवर आधारित दुर्लभ बंधु हे नाटक रचले. वैदिकी हिंसा हिंसा न भवति (१८७३), सत्य हरिश्चंद्र (१८७५), श्रीचंद्रावली (१८७६), विषस्यविषमौषधम् (१८७६), भारतदुर्दशा (१८८०), अंधेर नगरी (१८८१ – प्रहसन) ही त्यांची मौलिक नाट्य-रचना. भारतेंदु युगात पौराणिक, ऐतिहासिक, प्रेम-प्रणयविषयक, विनोदी, प्रतीकात्मक अशी अनेक प्रकारची नाटके लिहिली गेली. पौराणिक नाटके प्रामुख्याने राम, कृष्ण यांच्यावर तसेच अन्य पौराणिक कथांवर बेतलेली असत. अंबिकादत्त व्यास, हरिहरदत्त दुबे, सूर्यनारायण सिंह, कार्तिकप्रसाद खत्री इ. नाटककारांनी अशी नाटके लिहिली. ऐतिहासिक नाटककारांमध्ये श्रीनिवास दास, राधाचरण गोस्वामी यांचा उल्लेख केला जातो. खड्गबहाद्दूर मल्ल, शालिग्राम शुक्ल, गोकुलनाथ शर्मा यांनी प्रेमप्रधान नाटके रचली. या काळातली नाटके पद्यप्रधान तसेच मनोरंजनपर असत. सत्य, न्याय, त्याग इ. मानवी मूल्ये रुजवणे हा त्यांचा उद्देश असे. या नाटकांची भाषा ब्रज, संस्कृतप्रधान हिंदी होती. पारशी थिएटरने काही नाटके रंगमंचावर आणली. इंग्रजी, संस्कृत, बंगाली नाटकांचे अनुवादही या काळात मोठ्या प्रमाणात झाले. नाट्यनिर्मिती व लेखनाच्या दृष्टीने हा काळ जसा संमिश्र होता, तसाच तो संक्रमणाचाही होता.

 

द्विवेदी युग : या काळात पौराणिक, ऐतिहासिक तसेच समकालीन विषयांवर आधारित नाटके लिहिली गेली. शिवाय काही नाटकांचे अनु-वादही झाले. बद्रीनाथ भट्ट या नाटककाराचा अपवाद सोडला, तर या युगाने फार मोठी भर हिंदी नाट्यविकासात घातली, असे दिसत नाही. भारतेंदु व प्रसाद या दोन नाट्ययुगांना जोडणारा काळ म्हणून याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. कृष्ण, राम हेच या काळातील नाटकांचे नायक होते. या काळातील उल्लेखनीय पौराणिक नाटकांमध्ये महावीर सिंह – नल-दमयंती (१९०५), शिवानंद सहाय – सुदामा (१९०७), लक्ष्मी प्रसाद – उर्वशी (१९१०), हरिदास माणिक – पांडव प्रताप (१९१७) इ. नाटककारांच्या नाटकांचा समावेश होतो. गंगाप्रसाद गुप्त – वीर जयमल, वृंदावनलाल वर्मा – सेनापति उदल (१९०९), जयशंकर प्रसाद – राजश्री (१९१५) ही या काळातील महत्त्वाची ऐतिहासिक नाटके. अन्य उल्लेखनीय नाटकांत भगवती-प्रसाद – वृद्ध विवाह (१९०५), कृष्णानंद जोशी – उन्नति कहाँ से होगी (१९१५) इ. नाटककारांच्या नाटकांचा समावेश होतो. पुढील प्रसाद युगास अनुकूल वातावरण उपलब्ध करून दिले, ते याच द्विवेदी युगाने.

 

प्रसाद युग : ‘प्रसाद’ जयशंकर – यांनी सज्जन (१९१०) हे नाटक लिहून हिंदी नाट्यक्षेत्रात प्रवेश केला. नंतर त्यांनी कल्याणी परिणय (१९१२), प्रायश्चित (१९१४), राजश्री (१९१५), स्कंदगुप्त (१९१८), विशाखा (१९२१), जनमेजय का नागयज्ञ (१९२६), कामना (१९२७), एक घूँट (१९३०), चंद्रगुप्त (१९३१), ध्रुवस्वामिनी (१९३३) अशी नाटके लिहून आपली प्रभावमुद्रा या काळावर उठवली व ते युगकर्ते झाले. प्रसाद यांनी मुख्यतः ऐतिहासिक नाटके लिहिली. हिंदी नाटकांचे स्वतःचे रचनाशिल्प, शैली, भाषागत वैशिष्ट्ये ही प्रसाद यांच्या नाटकांनी निर्माण केली. या युगात ⇨ प्रेमी – हरिकृष्ण, लक्ष्मीनारायण मिश्र, रामनरेश त्रिपाठी, वियोगी हरी, उदय शंकर भट्ट, सुदर्शन, जी. पी. श्रीवास्तव प्रभृती नाटक-कारांनी पौराणिक, ऐतिहासिक नाटकांशिवाय रूपकनाट्य, गीतिनाट्य, भाव-नाट्य, हास्यनाट्य अशा विविधांगी नाट्यप्रकारांत लेखन करून हिंदी नाटकास बहुमुखी बनवले. व्यावसायिक रंगमंच नसतानाही या काळातील नाटक-कार लिहीत राहिले. त्यामुळे हिंदी नाटकाची लेखनपरंपरा अखंड राहिली.

 

प्रसादोत्तर युग : १९३० नंतरचा काळ हा प्रसादोत्तर युग म्हणून ओळखला जातो. या काळात ‘प्रेमी’ – हरिकृष्ण, रामकुमार वर्मा, सेठ गोविंददास, ⇨ गोविंदवल्लभ पंत, वृंदावनलाल वर्मा, उदयशंकर भट्ट यांच्या- शिवाय उपेंद्रनाथ अश्क, ⇨ जगदीशचंद्र माथुर (१९१७–७८), धर्मवीर भारती, मोहन राकेश असे अनेक नाटककार उदयास आले. उपेंद्रनाथ अश्क यांनी जय-पराजय (१९३७), कैद (१९४५), उडान (१९४६), अलगअलग रास्ते (१९५४), अंजोदीदी (१९५४) अशी नाटके लिहून प्रेमप्रधान नाटकांच्या जागी आधुनिक बोधपर तसेच सामाजिक प्रश्न चित्रित करणारी नाटके लिहिली. जगदीशचंद्र माथुर – कोणार्क (१९५१), धर्मवीर भारती – अंधायुग (१९५५), विष्णु प्रभाकर – डॉक्टर (१९५८), लक्ष्मी नारायण लाल – मादा कॅक्टस (१९५९), मोहन राकेश – आषाढ का एक दिन (१९५८) इ. नाटककारांच्या नाट्यकृतींमुळे हिंदी नाटक रंगमंचीय झाले. नाटक ही पाठ्यवस्तू न राहता ती दृश्यकला, मंचीय अभिव्यक्ती झाली, ती याच काळात.


आधुनिक युग : नाटकांचा साठोत्तरी काळ हा आधुनिक नाटकांचा काळ मानला जातो. भ्रष्टाचार, दोन पिढ्यांतील संघर्ष, राजनीतिपर व्यंग्य, आधुनिक सभ्यता, महानगरीय जीवन इ. अनुभूती चित्रित करणाऱ्या नाटकांनी हिंदी प्रेक्षक निर्माण केला व त्याची नाट्याभिरुची विकसित केली. मोहन राकेश, लक्ष्मीनारायण लाल, शंकर शेष, ज्ञानदेव अग्निहोत्री, सर्वेश्वरदयाल सक्सेना प्रभृती नाटककारांनी प्रयोगशील नाटके हिंदीत लिहून नवनवे प्रयोग केले, ते प्रामुख्याने सादरीकरणाच्या अंगांनी. त्यामुळे नाटक पूर्णतः रंगमंचीय झाले. मोहन राकेश–लहरों के राजहंस (१९६३), आधे अधुरे (१९६९) लक्ष्मीनारायण लाल – रक्तकमल (१९६२), रातरानी (१९६२), दर्पन (१९६३), सूर्यमुख (१९६८), कलंकी (१९७१), मिस्टर अभिमन्यु (१९७१), कर्फ्यू (१९७२) शंकर शेष – खजुराहो का शिल्पी (१९७०), फंदी (१९७१), एक और द्रोणाचार्य (१९७१), अरे मायावी सरोवर (१९७४) यांनी अशी प्रयोगशील नाटके लिहून अभिनेय नाटकांची परंपरा समृद्ध केली. आणीबाणीवर बेतलेले सर्वेश्वरदयाल सक्सेना यांचे बकरी (१९७४) हे नाटकही याच पठडीतले. ज्ञानदेव अग्निहोत्रींच्या शुतुरमुर्ग (१९६८) या नाटकाला वैचारिक नाटक म्हणून स्वतःचे असे खास स्थान लाभले आहे. या काळात हिंदीत अनेक देशी-विदेशी नाटकांचे अनुवाद झाले. विख्यात जर्मन नाटककार ⇨ बेर्टोल्ट ब्रेक्ट व मराठी नाटककार ⇨ विजय तेंडुलकर यांची अनेक महत्त्वाची नाटके हिंदीत अनुवादित झाली आहेत.

 

उत्तर-आधुनिक युग : आणीबाणी व जागतिकीकरण या दोन्ही घडामोडींदरम्यान १९८६ मध्ये दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा- स्पर्धांच्या अनुषंगाने तेथे नाट्यगृहांच्या झालेल्या निर्मितीमुळे सादरीकृत नाटकांना गती आली. नाटककारांना नवे विषय, नवे प्रश्न मिळाले. मुद्राराक्षस – मरजीवा (१९६६), मणि मधुकर – रसगंधर्व (१९७८), हमीदुल्ला – एक और युद्ध, मृदुला गर्ग – एक और अजनबी (१९७८), भीष्म साहनींचे – कबिरा खडा बाझारमें (१९८१), गिरिराज किशोर – जुर्म आयद (१९८७), कृष्ण बलदेव वैद – भूख आग है (१९८८) इ. नाटककारांच्या नाटकांतून वर्तमान प्रश्न, देशी-विदेशी मिथके, इतिहासाची नवी व्याख्या, अन्वयार्थ अशी आशयविषय दृष्ट्या विविधता आली. हिंदी नाटक व्यंग्यात्मक, व्याख्यात्मक झाले. लोकशैलीचा अभिनव वापर नाटकांतून झाला. व्यक्तीची व समाजाची संवेदनहीनता नाटकांतून प्रकर्षाने मांडली जाऊन प्रेक्षकांना समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न झाला.

 

एकविसावे शतक : आधुनिक जीवनशैलीतून आलेले विखंडन, विरूपीकरण, विडंबना, अमूर्तता यांचे चित्रण हा या काळातील नाटकांचा प्रमुख उद्देश. प्रामुख्याने जागतिकीकरणानंतरचे प्रश्न या काळातील नाटकातून मांडलेले दिसतात. उदा., कृष्ण बलदेव वैद – मोनालिजा की मुसकान (२००३), कुसुम कुमार – नेपथ्य राग (२००४), नरेंद्र मोहन – मिस्टर जिन्ना (२००५) इ. नाटककारांनी आपल्या नाटकांतून नव्या शतकाचे प्रश्न आणि जीवनाच्या बदलत्या शैलींचे व मूल्यांचे चित्रण केले आहे.

 

काव्यात्मक नाटकाच्या माध्यमातून अठराव्या शतकात सुरू झालेला हिंदी नाटकाचा प्रवास विसाव्या शतकात गद्यरूप बनून कालौघात नवनव्या प्रयोगांनी रंगमंचीय तर झालाच पण नाटकांनी नित्य काळाची आव्हाने पेलत सध्याच्या सिनेमा, दूरदर्शन वाहिन्यांशी टक्कर देत आपले अस्तित्व टिकवले. माणूस व कला यांचे सांस्कृतिक अद्वैत जपणारा साहित्यप्रकार म्हणून नाटकाचे मूल्य चिरंतन आहे, हे हिंदी नाटकांचा इतिहास पाहताना प्रकर्षाने लक्षात येते.

 

एकांकिका : हिंदी एकांकिकेचा विकास जरी प्रसाद युगात झाला असला, तरी विसाव्या शतकाच्या प्रारंभी हा नाट्यप्रकार हिंदीत उदयास आला. नाटकांप्रमाणेच एकांकिकेचे प्रारंभिक रूप काव्यमय होते. उदा., महेशचंद्र प्रसाद यांची भारतेश्वर का संदेश (१९१८) ही एकांकिका. ब्रिजलाल शास्त्री – वीरांगना (१९२३), बदरीनाथ भट्ट – लबड् धो धो (१९२६), हनुमान शर्मा – मान विजय (१९२६), ‘उग्र’ – बेचन शर्मा –चार बेचारे (१९२९) हे प्रसादयुगीन एकांकिकासंग्रह होत. या एकांकि-कांवर संस्कृत प्रहसन, अंक, व्यायोम, भाण, वीथी या नाट्यरूपांचा प्रभाव दिसून येतो.

 

प्रसादोत्तर हिंदी एकांकिका या इंग्रजी ‘वन ॲक्ट प्ले’ या नाट्य-प्रकाराच्या प्रभावाने विकसित झाल्या. रामकुमार वर्मा – बादल की मृत्यु (१९३०), उदयशंकर भट्ट – दुर्गा (१९३४), भुवनेश्वरप्रसाद – कारवां (१९३५), ⇨ सेठ गोविंददास (१८९६–१९७४), – स्पर्धा, जगदीशचंद्र माथुर – मेरी बांसुरी (१९३६) यांचे हे या काळातील प्रातिनिधिक एकांकिकासंग्रह. उपेंद्रनाथ अश्क, भगवतीचरण वर्मा, सुदर्शन, जैनेंद्रकुमार, विष्णु प्रभाकर प्रभृती साहित्यकारांनीही छोट्या-मोठ्या संख्येने एकांकिका- लेखन करून या साहित्यप्रकाराच्या विकासास हातभार लावला. एकांकिकाविकासावस्थेप्रत हा बाल्यकाल असला, तरी विषयवैविध्यांनी तो वैशिष्ट्यपूर्ण झाला आहे.

 

आकाशवाणी केंद्रे दिल्ली (१९३६) व लखनौ (१९३८) येथेे सुरू झाली. त्यांना प्रसारणार्थ हिंदी श्रुतिकांची गरज भासू लागली. त्यामुळे एकांकिकालेखनास गती मिळाली. याच दरम्यान हंस या मासिकाने एकांकिका विशेषांक प्रकाशित केला (मे, १९३८).

 

आधुनिक काळात लक्ष्मीनारायण लाल, प्रभाकर माचवे, हरिकृष्ण प्रेमी, चंद्रगुप्त विद्यालंकार, मोहन राकेश, धर्मवीर भारती, विमला लूथरा, शचीरानी गुर्टू प्रभृती एकांकिकाकारांनी हा नाट्यप्रकार समृद्ध केला. या काळात एकांकिका श्रव्यकाव्य (रेडिओ रूपक, श्रुतिका) आणि दृश्यकाव्य (मंचीय एकांकिका) अशा दोन्ही रूपांत लिहिल्या गेल्या. या एकांकिकांत विविध विषय, लेखन सादरीकरणाचे प्रयोग, भाषाशैली, अभिनय, नेपथ्य, संगीताचे विविध प्रयोग इत्यादींद्वारे एकांकिकाविकासाचे प्रयत्न झालेले दिसून येतात.

 

आशियाई क्रीडास्पर्धांनंतर (१९८४) उपलब्ध झालेल्या महानगरीय नाट्यगृहविकास-शृंखलेमुळे (श्रीराम थिएटर, भारतीय विद्याभवन इ.) विविध महानगरांत नाटके व एकांकिकांची सादरीकरणे मोठ्या संख्येने झाली. अनेक हौशी नाट्यमंडळे उदयास आली. नाट्यस्पर्धांचे प्रमाण वाढले व एकांकिका-प्रकाशनाने जोर पकडला. या काळात प्रसिद्ध झालेले काही उल्लेखनीय एकांकिकासंग्रह : वीरेंद्र मिश्र – आवाज आ रही है (१९८४), कमलेश्वर – लहर लौट गयी (१९८५), विष्णु प्रभाकर – मै तुम्हें क्षमा नहीं करूँगा (१९८६), शंकर पुणतांबेकर – भूख हडताल (१९८६), राधाकृष्ण सहाय – हे मातृभूमि (१९८८), सिद्धनाथ कुमार – रोशनी शेष है (१९९८), वसंतकुमार परिहार – इंडिया गेट का मुकदमा (२००१).

 

उत्तर-आधुनिक काळानंतरही एकविसाव्या शतकात संकेतस्थळांवरही एकांकिका-प्रकाशनाचा, लेखनाचा उपक्रम, सातत्याने सुरू आहे. नाट्य-गृहात सादर होणाऱ्या एकांकिका आता दूरदर्शनवरील विविध वाहिन्यांद्वारे सादर होतात. नवनवे नाटककार पथनाट्य, ‘नुक्कड’ (कोपरानाट्य) अशी विविध लोकनाट्यांची रूपे एकांकिकांना देत ही कला व साहित्यप्रकार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. विख्यात नाटककार व दिग्दर्शक सफदर हश्मी (१९५४–८९) यांचे यासंदर्भातील योगदान महत्त्वपूर्ण आहे.

 

निबंध : हिंदी निबंधांच्या उगम व विकासास पाश्चात्त्य साहित्याची प्रेरणा कारणीभूत आहे. हिंदीतील मासिक-पत्रिकांच्या प्रकाशनामुळे हिंदी निबंधलेखनास प्रारंभ झाला. १८७३ मध्ये सुरू झालेल्या हरिश्चंद्र मॅगेजिन-मध्ये हिंदीतील प्रारंभिक निबंध लिहिले गेले. पुढे हे मासिक हरिश्चंद्र चंद्रिका या नावाने प्रकाशित होत राहिले.

 

भारतेंदु युग : एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध हा हिंदी मासिक- पत्रिकांचा उदयकाळ मानला जातो. या काळात (१८७३–१९००) हरिश्चंद्र मॅगेजिन, कवि वचनसुधा, बाला बोधिनी (१८७४), सदादर्श (१८७४), हिंदी प्रदीप (१८७७), आनंद कादंबिनी (१८८१), ब्राह्मण (१८८३) अशा मासिक-पत्रिकांचे प्रकाशन होत असे. त्यांचे संपादन निबंधकार करीत. समाजजागृती, राष्ट्रोन्नती, स्वभाषा-अभिमान इ. विषयक निबंध या मासिक-पत्रिकांतून प्रकाशित होत असत. भारतेंदु हरिश्चंद्र यांनी या काळात ‘वैष्णवता और भारतधर्म’, ‘ईश खृष्ट और ईश कृष्ण’, ‘अकबर’, ‘औरंगजेब’, ‘मणिकर्णिका’, ‘लखनऊ’, ‘हिंदी भाषा’, ‘जाति विवेकिनी सभा’, ‘स्वर्ग में विचार सभा’ इ. निबंध लिहिले. बालकृष्ण भट्ट यांचे निबंध त्यांच्या साहित्य सुमन (१८८६), भट्ट निबंधावली (२ भाग–१९४१,४२), भट्ट निबंधमाला (२ भाग–१९४७) या संग्रहांत संकलित आहेत. या काळातले आणखी एक श्रेष्ठ निबंधकार प्रतापनारायण मिश्र यांनी ‘भौं’, ‘दाँत’, ‘पेट’, ‘पुच्छ’, ‘नाक’, ‘वृद्ध’, ‘प्रतापचरित’, ‘दान’, ‘जुआ’, ‘अपव्यय’, ‘नास्तिक’ इ. निबंध लिहिले. ‘प्रेमघन’ बदरीनारायण चौधरी, बालमुकुंद गुप्त, राधाचरण गोस्वामी, अंबिकादत्त व्यास हे या काळातील आणखी काही उल्लेखनीय निबंधकार होत. विचारात्मक, भावात्मक, वर्णनात्मक, कथात्मक अशा विविध शैलींचे निबंधलेखन या युगात झाले.


द्विवेदी युग : आचार्य महावीरप्रसाद द्विवेदी यांनी १९०० मध्ये सरस्वती या मासिकातून अनेक हिंदी साहित्यिकांचे निबंध प्रकाशित केले. त्यातूनच पुढे विसाव्या शतकातील निबंधवाङ्मयाचा उदय झाला. बालमुकुंद गुप्त हे या काळातील श्रेष्ठ निबंधकार. त्यांचे निबंध शिवशंभु का चिठ्ठा या संग्रहात अंतर्भूत आहेत. काल्पनिक निबंधांचा उत्कृष्ट नमुना म्हणून या निबंधांकडे पाहिले जाते. हे निबंध भारतमित्र या मासिकातून प्रकाशित झाले होते (१९०४–०५). गोविंद नारायण मिश्रा यांचे निबंध सारसुधानिधी या मासिकातून प्रकाशित होत असत. महावीरप्रसाद द्विवेदी यांनी म्युनिसिपैलीटी के कारनामे हे व्यंग्यनिबंध याच काळात लिहिले. सरदार पूर्णसिंह यांनी ‘आचरण की सभ्यता’, ‘सच्ची वीरता’, ‘मजदूरी और प्रेम’, ‘पवित्रता’, ‘कन्यादान’ इ. निबंध लिहून निबंधवाङ्मयात विषयवैविध्य आणले. ‘गुलेरी ‘–पंडित चंद्रधर शर्मा, जगन्नाथ प्रसाद चतुर्वेदी, पद्मसिंह शर्मा, आचार्य रामचंद्र शुक्ल हे या काळातील बहु- चर्चित निबंधकार होत. सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांवर या काळात निबंधलेखन झाले. खडी बोली हिंदीच्या प्रमाणीकरणात या काळातील निबंधांचा मोठा वाटा आहे. १९२० पर्यंत हे युग मानले जाते.

 

शुक्ल युग : आचार्य रामचंद्र शुक्ल युगाचा काळ म्हणजे १९२०–१९४०. चिंतामणी (दोन भाग–१९३९,१९४५), विचारविथी हे आचार्य शुक्ल यांचे प्रसिद्ध निबंधसंग्रह. वैचारिक निबंधांची परंपरा त्यांनी समृद्ध केली. ⇨ गुलाबराय (१८८८–१९६२) यांनी ललित निबंध लिहिले. फिर निराशा क्यों ⇨ (१९१६), ठलुमा क्लब (१९२८), मेरी असफलताएँ (१९४०) हे त्यांचे बहुचर्चित निबंधसंग्रह. पदुमलाल पुन्नालाल बक्षी, शांतिप्रिय द्विवेदी, शिवपूजन सहाय, ‘उग्र’– बेचन शर्मा, माखनलाल चतुर्वेदी हे या काळातील अन्य काही उल्लेखनीय निबंधकार. या काळात वैचारिक व ललित निबंधलेखनाबरोबरच हास्य-व्यंग्यात्मक निबंधलेखनही झाले.

 

आधुनिक युग : सर्वसाधारणपणे स्वातंत्र्योत्तर काळातील निबंध हे आधुनिक निबंध म्हणून ओळखले जातात. आचार्य रामचंद्र शुक्ल यांची समीक्षात्मक निबंधांची परंपरा या काळात आचार्य ⇨ नंददुलारे वाजपेयी (१९०६–६७) यांनी चालू ठेवली. ती पुढे हजारीप्रसाद द्विवेदी यांनी समृद्ध केली. त्यांचे निबंध अशोक के फूल (१९४८), कल्पलता (१९४८), विचार और वितर्क (१९४९), विचारप्रवाह (१९५९), कुटज (१९६४), आलोक पर्व (१९७२) या निबंधसंग्रहांत अंतर्भूत आहेत. ललित, वैचारिक, संशोधनपर, समीक्षात्मक असे वैविध्यपूर्ण निबंध त्यांनी लिहिले. प्रस्तुत प्रश्न (१९३६), जड् की बात (१९४५), पूर्वोदय (१९५१), साहित्य का श्रेय और प्रेय (१९५३), मंथन (१९५३), सोच विचार (१९५३), काम, प्रेम और परिवार (१९५३) आणि ये और वे (१९५४) हे जैनेंद्रकुमार यांचे काही प्रसिद्ध निबंधसंग्रह. त्यांचे निबंध वैचारिक, साहित्यिक, राजनीतिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि तत्त्वज्ञानविषयक होते. शांतिप्रिय द्विवेदी, ‘दिनकर’– रामधारी सिंह, अज्ञेय, भदंत आनंद कौसल्यायन, विद्यानिवास मिश्र, हरिशंकर परसाई हे या युगातील अन्य काही श्रेष्ठ निबंधकार. हरिशंकर परसाई यांनी व्यंग्यनिबंधांची परंपरा निर्माण करून हिंदी वाचकांना अंतर्मुख केले. उत्कृष्ट रचनाशिल्प, वैविध्य शैली व भाषिक परिष्करण यांमुळे या काळातले निबंध उच्च दर्जाचे ठरले.

 

उत्तर-आधुनिक युग : १९७५–२००० हा काळ ‘उत्तरशती’ म्हणून ओळखला जातो. या काळात अज्ञेय, विद्यानिवास मिश्र, कुबेरनाथ राय, निर्मल वर्मा, शरद जोशी, नेमिचंद्र जैन, अंचल, देवराज, नामवर सिंह, विवेकीराय इ. नामवंत समीक्षक हिंदीस लाभले. वैचारिक निबंधांपेक्षा या काळात साहित्यिक, समीक्षात्मक, व्यंग्यात्मक, असे निबंधलेखन झाले. आलोचना, दिनमान, जनसत्ता, रविवार, नवभारत टाइम्स, भाषा, साक्षात्कार, पूर्वग्रह, दस्तावेज इ. वृत्तपत्रे-नियतकालिकांनी गद्यविकासासाठी अनुकूलता व उदार धोरण स्वीकारल्याने निबंध प्रकाशनास गती मिळाली. अनेक श्रेष्ठ, प्रातिनिधिक, निवडक निबंधसंग्रह या काळात प्रकाशित झाले. समीक्षात्मक निबंधांबरोबरच व्यक्तित्वप्रधान, आत्मव्यंजक, ललित निबंध या काळात मोठ्या प्रमाणात लिहिले गेले. विद्यानिवास मिश्र, कुबेरनाथ राय हे या काळातील आघाडीचे निबंधकार म्हणून ओळखले जातात.

 

एकविसावे शतक : विद्यानिवास मिश्र यांचे गिर रहा है आज पानी (२००१), स्वरूप विमर्श (२००१), गांधी का करुण रस (२००२), वनतुलसी की गंध (२००२), चली फगुनाहट बौरे आम (२००४) हे काही उत्कृष्ट निबंधसंग्रह. त्यांतील साहित्यिक व ग्रामीण संस्कृतिचित्रण वेधक आहे. रामदरश मिश्र यांच्या घरपरिवार (२००३) आणि निर्मल वर्मा यांच्या आदि, अंत और आरंभ (२००१), साहित्य का आत्मकथ्य (२००५), सर्जनापथ के सहयात्री (२००६) या निबंधसंग्रहांतील निबंधांतून भारतीय आणि पाश्चात्त्य संस्कृतींचे दर्शन त्यांनी उत्कृष्टपणे घडविले आहे. विष्णुकांत शास्त्री, रमेशचंद्र शहा, कुबेरनाथ राय, नरेंद्र कोहली, हरि जोशी हे या काळातील आणखी काही उल्लेखनीय निबंधकार. जागतिकीकरण व मानवी जीवनातील गतिमानता यांचाही सखोल परिणाम या काळातील निबंधलेखनावर विशेषत्वाने जाणवतो.

 

अन्य गद्य साहित्य : हिंदी साहित्येतिहासातील रीतिकाळात गद्यलेखनाचा प्रारंभ झाला असला, तरी गद्यशैलीतील विविध साहित्यप्रकार विकसित झाले, ते मात्र आधुनिक काळात. आधुनिक युगात कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, निबंध मोठ्या प्रमाणात लिहिले गेले आणि साहित्याचे ते प्रमुख गद्यप्रकार बनले. गद्यविकासाबरोबर अन्य साहित्य-प्रकारांत आधुनिक काळाच्या प्रारंभापासून लेखन झाले असले, तरी साहित्येतिहासात त्यांची म्हणावी तशी नोंद झाली नाही. परंतु कालपरत्वे त्यांच्या लेखन, प्रकाशन, वाचनाच्या वाढत्या प्रमाणांमुळे त्यांना विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुख्य साहित्यप्रकारांमध्ये स्थान लाभले. उदा., चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिचित्रे, आठवणी, प्रवासवर्णन, वृत्तांत, व्यंग्यलेखन, पत्र- वाङ्मय, दैनंदिनी, मुलाखती इत्यादी. काही साहित्यप्रकारांची तर उत्तर-काळात शास्त्रे बनली. उदा., शैलीविज्ञान, अनुवादविज्ञान इत्यादी. याशिवाय कालौघात पथनाट्ये, संवाद, पटकथा, विषयलेख (फीचर), धारावाहिक लेखन, पत्रकारिता (नियतकालिक), संपादन, पोस्टर, कोलाज (कात्रण) यांनाही साहित्यरूप प्राप्त झाले. संगणक, महाजाल, संकेतस्थळे, ई-बुक्स, ई-जर्नल्स, समाज-संवाद (सोशल नेटवर्किंग) यांच्या अत्याधुनिक काळात ब्लॉग्ज, ट्विटर, चिठ्ठे, लघुसंदेश (एस्एम्एस्) असे नवे वेब, इलेक्ट्रॉनिक साहित्यप्रकार केवळ रूढच झाले नाहीत, तर संशोधक-समीक्षकांनी त्यांची नोंद घेऊन त्यावर बृहद् ग्रंथ, कोशही निर्मिले आहेत. वरीलपैकी काही साहित्यप्रकारांचा थोडक्यात आढावा :

 

चरित्र : हिंदी साहित्यात चरित्रलेखनाची परंपरा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाली. संत, राजे, महाराजे, प्रशासक इत्यादींची चरित्रे प्रारंभी लिहिली गेली. भारतेंदु काळ हा चरित्रलेखनाच्या दृष्टीने बीजांकुरणाचा काळ. अहिल्याबाई का जीवन चरित्र हे हिंदीतले पहिले चरित्र. कार्तिकप्रसाद खत्री यांनी १८८७ मध्ये लिहिले. त्यांनी छ. शिवाजी महाराज व संत मीराबाई यांचीही चरित्रे लिहिली. या काळात काशीनाथ खत्री, रमाप्रसाद व्यास, देवीप्रसाद मुंसिफ, राधाकृष्णदास, गोपाल शर्मा शास्त्री, प्रतापनारायण मिश्र, बालमुकुंद गुप्त, गोकुलनाथ शर्मा, बलभद्र मिश्र, अंबिकादत्त व्यास प्रभृतींनी चरित्रलेखन केले. पुढे द्विवेदी युग हे राष्ट्रीय जागृतीचे युग असल्याने देशी राजे, विदेशी प्रशासक यांवर परंपरेने चरित्रलेखन झालेच पण स्त्री-चरित्रांचे लेखनही मोठ्या प्रमाणात झाले. स्वतंत्रता सेनानीही या काळाचे चरित्रनायक बनले. संपूर्णानंद, बद्रीप्रसाद गुप्त, ज्वालादत्त शर्मा, आनंद किशोर मेहता, कृष्णप्रसाद अखौरी, गौरीशंकर ओझा, यशोदादेवी हे या काळातील अन्य काही चरित्रकार होत. त्यांनी स्वामी दयानंद, महात्मा गांधी, पृथ्वीराज चौहान, नेपोलियन, नूरजहाँ यांची चरित्रे लिहिली.

 

गांधीयुग सुरू झाल्यावर राजकीय स्वातंत्र्यसंग्रामातील नेते चरित्रनायक बनले. उद्बोधन, आदर्श मूल्यधारणा इ. उद्देशांनी छायावादी युगात चरित्रे लिहिली गेली. मन्मथनाथ गुप्त, रामनरेश त्रिपाठी, प्रेमचंद, मनोरमाबाई प्रभृतींनी जवाहरलाल नेहरू, चंद्रगुप्त, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक यांची चरित्रे लिहून परंपरा कायम ठेवली. छायावादोत्तर युगात लोकप्रिय नेते, संत, महात्मे, साहित्यकार, विदेशी महापुरुष, वैज्ञानिक, खेळाडू, उद्योगपती अशी वैविध्यपूर्ण मंडळी चरित्रनायक म्हणून लाभल्याने हिंदी चरित्रांचे क्षितिज रुंदावले. घनश्यामदास बिर्ला, ⇨ काका कालेलकर, सुमंगल प्रकाश, सुशीला नायर, ⇨ डॉ. राजेंद्र प्रसाद, जैनेंद्रकुमार इत्यादींनी राष्ट्रीय पुरुषांची वस्तुनिष्ठ चरित्रे लिहिली. ती राष्ट्रीय पुरुषांचीच होती. त्यामुळे हे युग चरित्रलेखनाच्या दृष्टीने राष्ट्रीय चरित्रनायकांचेच असल्याचे सिद्ध झाले. इंग्रजी भाषेत गाजलेल्या चरित्रांची हिंदी भाषांतरे हे या युगाचे वेगळे वैशिष्ट्य होय. राहुल सांकृत्यायन, रामवृक्ष बेनीपुरी, रामविलास शर्मा, विष्णु प्रभाकर, अमृतराय, लाल बहादुर शास्त्री इ. ख्यातकीर्त चरित्रलेखक या काळास लाभले. हिंदी सेवी संसार (१९४४), हिंदी साहित्यकार कोश, भारतवर्ष की विभूतियाँ (१९५४) हे या काळातील उल्लेखनीय चरित्रकोश होत.


उत्तर-आधुनिक युग व एकविसाव्या शतकाचा प्रारंभिक काळ हा चरित्रस्वरूपविकासाचा होता. या काळात व्यक्तित्व, विचार, कार्य अशा अंगांनी चरित्रलेखन झाले. त्यामुळे केवळ जन्म ते मृत्यू अशी त्यांची कथा न राहता कर्तृत्व व विचारगाथा असे त्यांचे स्वरूप बनले. मानव पुत्र ईसा : जीवन और दर्शन (१९८५), आचार्य नरेंद्र देव : युग और नेतृत्व (१९८७) इ. चरित्रशीर्षकांतूनही हे स्पष्ट होते. रघुवंश, रामविलास शर्मा, ओमप्रकाश दीपक, तेजबहादुर चौधरी, राजमल बोरा, यांशिवाय ⇨ कमला सांकृत्यायन, सुलोचना रांगेय, महिमा मेहता, गायत्री कमलेश्वर, बिंदु अग्रवाल, कुमुद नागर प्रभृती लेखकपत्नींनी क्रमशः राहुल सांकृत्यायन, रांगेय राघव, नरेश मेहता, कमलेश्वर, भारतभूषण अग्रवाल, अमृतलाल नागर या साहित्यकारांची स्मृतिचित्रात्मक चरित्रे लिहिली. ही एकविसाव्या शतकातील उत्कृष्ट चरित्रे होत.

 

आत्मकथा : आत्मकथेत लेखक स्वतःचे जीवनचरित्र स्वतः रेखाटत असतो. हे हिंदीत आत्मकथा लेखनाची परंपरा इ. स. च्या सतराव्या शतकापासून आढळते. बनारसीदास जैन यांची अर्धकथानक (१६४१) ही हिंदीतील पहिली आत्मकथा मानली जाते. ती पद्यात्मक असली, तरी हिंदी आत्मकथेचा पहिला प्रयत्न म्हणून तिचे ऐतिहासिक महत्त्व लक्षणीय आहे.

 

भारतेंदु युगात भारतेंदु हरिश्चंद्र यांनी ‘कुछ आप बीती, कुछ जग बीती’ या शीर्षकाने आत्मकथनपर लेखन केले आहे. सत्यानंद अग्निहोत्री यांचे मुझमें देवजीवन का विकास (१९१०) आणि स्वामी दयानंद यांचे जीवन-चरित्र (१९१७) या गद्यशैलीत लिहिलेल्या प्रारंभिक आत्मकथा. आधुनिक काळातील गद्य आत्मकथा म्हणून त्यांचे महत्त्व असाधारण आहे. भाई परमानंद यांची आपबीती (१९२१), सुभाषचंद्र बोस यांच्या आत्मकथा (१९२३) आणि तरुण स्वप्न (१९३५) या द्विवेदी युगातील महत्त्वप्राप्त आत्मकथनात्मक रचना. महात्मा गांधींच्या मूळ गुजराती आत्मकथेचा हरिभाऊ उपाध्याय यांनी केलेला हिंदी अनुवादही प्रसिद्ध आहे.

 

छायावादोत्तर काळातील काही उल्लेखनीय आत्मकथांमध्ये श्यामसुंदर दास–मेरी आत्मकहानी (१९४१), हरिभाऊ उपाध्याय–साधना के पथ पर (१९४६), वियोगी हरी–मेरा जीवनप्रवाह (१९४८) यांचा समावेश होतो. स्वातंत्र्योत्तर काळात शांतिप्रिय द्विवेदी यांनी परिव्राजक की प्रजा (१९५२), देवेंद्र सत्यार्थीं यांनी सूरज के किरन (१९५२) आणि नीलयक्षिणी (१९८५) या आत्मकथा लिहिल्या. साठोत्तरी कालखंडातील काही विख्यात आत्मकथा पुढीलप्रमाणे : पृथ्वीसिंह आजाद–क्रांतिपथ का पथिक (१९६४), अबिद अली–मजदूर से मिनिस्टर (१९६८), सुखदेव राज–जब ज्योति जगी (१९७१), मोरारजी देसाई–मेरा जीवन वृत्तांत (भाग १, २–१९७२, १९७४).

 

‘उग्र ‘– बेचन शर्मा – अपनी खबर (१९६०), यशपाल जैन –मेरी जीवनधारा (१९८७), नगेंद्र –अर्धकथा (१९८८), फणीश्वरनाथ रेणु – आत्मपरिचय (१९८८), रामदरश मिश्र –समय सहचर है (१९९०), कमलेश्वर–जो मैनें जिया (१९९७), राजेंद्र यादव –मुड-मुड के देखता हूँ (२००१), विष्णु प्रभाकर –पंखहीन, मुक्त गगनमें आणि पंछी उड गया (२००४) मन्नू भंडारी –एक कहानी यह भी (२००८), इ. साहित्यि-कांच्या आत्मकथाही लक्षवेधी आहेत. सर्वाधिक दीर्घ आत्मकथांमध्ये ‘बच्चन’– हरिवंशराय यांच्या क्या भूलूँ ⇨ क्या याद करूँ (१९६९), नीड का निर्माण फिर (१९७०), बसेरे से दूर (१९७७) आणि दशद्वार से सोपान तक (१९८५) यांचा उल्लेख केला जातो. दलित आत्मकथांमध्ये ओम प्रकाश वाल्मिकीलिखित जूठन (१९९७), सूरजपाल चौहानलिखित तिरस्कृत (२००२) या आत्मकथा महत्त्वाच्या होत. महिला लेखिकांनीही मोठ्या प्रमाणात आत्मकथा लिहिल्या. त्यांतील कुसुम अंसल–जो कहा नहीं गया (१९९६), कृष्णा अग्निहोत्री–लगता नहीं है दिल मेरा (१९९७), पद्मा सचदेव–बूंद बावडी (१९९९), मैत्रेयी पुष्पा–कस्तूरी कुंडल बसै (२००२), सुनीता जैन–शब्द काया (२००५) आणि रमणिका गुप्ता–हादसें (२००५) यांच्या आत्मकथा उल्लेखनीय होत. लेखिकांच्या आत्मकथांच्या निवडक भागांचे संकलन-संपादन देहरि भई विदेश (२००५) या शीर्षकाने राजेंद्र यादव यांनी केले आहे.

 

व्यक्तिचित्रे : इंग्रजी ‘स्केच’ या शब्दावरून रेखाचित्र हा हिंदीत प्रचलित झालेला एक साहित्यप्रकार. मराठीत तो व्यक्तिचित्र, शब्दचित्र म्हणून ओळखला जातो. हिंदीत व्यक्तिचित्रलेखनाची परंपरा विसाव्या शतकाच्या प्रारंभी सुरू झाली. १९१२ मध्ये पंडित बनारसीदास चतुर्वेदी यांनी रेखाटलेले औरंगजेब हे हिंदीतील पहिले व्यक्तिचित्र मानले जाते. त्यांची अनेक व्यक्तिचित्रे हमारे आराध्य (१९५२), रेखाचित्र (१९५३) आणि सेतुबंध (१९६२) या व्यक्तिचित्रसंग्रहांत संकलित आहेत. त्यांनी देशी, विदेशी ज्येष्ठ व्यक्तींबरोबरच सामान्य माणसांची व्यक्तिचित्रेही रेखाटून हा साहित्यप्रकार रूढ केला. स्वातंत्र्यपूर्व काळात हंस या मासिकाने मार्च १९३९ मध्ये तर मधुकर या मासिकाने १९४६ मध्ये व्यक्तिचित्र-विशेषांक प्रकाशित करून या साहित्यप्रकाराच्या प्रचार-प्रसारास बळ दिले.

 

श्रीराम शर्मा यांनी बोलती प्रतिमाएँ (१९३७), रामवृक्ष बेनीपुरी यांनी माटी की मूरतें (१९४६), महादेवी वर्मा यांनी अतीतके चलचित्र (१९४१), स्मृतिकी रेखाएँ (१९४३), पथ के साथी (१९५६), स्मारिका (१९७१), मेरा परिवार (१९७४) इ. व्यक्तिचित्रसंग्रह प्रकाशित केले. प्रकाशचंद्र गुप्ता यांनी रेखाचित्र (१९४०) तसेच ‘अश्क’ – उपेंद्रनाथ यांनी रेखाएँ और चित्र (१९५५), मंटो मेरा दुश्मन (१९५६) इ. व्यक्तिचित्रे लिहिली. अमृतलाल नागर–जिनके साथ जिया (१९७३), कृष्णा सोबती–हम हशमत (१९७७) आणि विवेकी राय–मेरे सुहृद श्रद्धेय (२००५) ही उत्कृष्ट व्यक्तिचित्रे होत.

 

‘प्रभाकर’ –कन्हैयालाल मिश्र, सत्यवती मल्लिक, वृंदावनलाल वर्मा, विष्णु प्रभाकर, प्रभाकर माचवे, हंसराज रहबर, हिमांशु जोशी, विद्यानिवास मिश्र, शिवानी हे हिंदीतील आणखी काही उल्लेखनीय व्यक्तिचित्रकार होत. आठवणी : स्मरणरंजन हा माणसाचा स्थायीभाव आहे. माणसाच्या मनात स्वजीवनविषयक आठवणी जशा असतात, तशाच त्या समाज, परिवेश, पर्यावरण, घटना, प्रसंग यांच्याही असतात. त्यांचे स्वरूप राजकीय, सामाजिक, व्यक्तिगत, सांस्कृतिक, साहित्यिक असे वैविध्यपूर्ण असते. प्रवासवर्णन हा आठवणींचाच एक प्रकार होय.

 

हिंदीत भारतेंदु काळात ब्राह्मणमध्ये प्रकाशित प्रताप चरित्रमध्ये तसेच अंबिकादत्त व्यास यांच्या निज वृत्तांतमध्ये या साहित्यप्रकाराच्या पाऊलखुणा दिसून येतात. विसाव्या शतकात सरस्वती या मासिकाच्या माध्यमातून महावीरप्रसाद द्विवेदी, रामकुमार खेमका, जगद्बिहारी सेठ, पांडुरंग खानखोजे, प्यारेलाल मिश्र प्रभृतींनी अनेक आठवणी लिहिल्याचे दिसून येते.

 

आठवणींची पुस्तके प्रकाशित झाली, ती छायावादी युगानंतरच. प्रकाशचंद्र गुप्त – पुरानी स्मृतियाँ (१९४७), श्रीराम शर्मा – सन बयालीस के संस्मरण (१९४८), ‘प्रभाकर’ – कन्हैयालाल मिश्र – दीप जले शंख बजे (१९५९), जैनेंद्रकुमार गांधी – कुछ स्मृतियाँ, सेठ गोविंददास – स्मृति-कण (१९५९), माखनलाल चतुर्वेदी – समय के पांव (१९६२), ‘दिनकर’ – रामधारी सिंह – संस्मरण और श्रद्धांजलियाँ (१९६९), ‘बच्चन’ – हरिवंशराय – नये पुराने झरोखे (१९६२) ही काही उल्लेखनीय स्मृति-संकलने होत.

 

१९७० नंतरचे आठवणींपर साहित्यिकांचे ग्रंथ हे त्यांतील कथात्मक सौंदर्य, शैलीसौष्ठव, विवादास्पद जीवन-प्रसंगांचे रहस्योद्घाटन इत्यादींमुळे ते वाचनीय ठरले. उदा., अनिता राकेश–चंद संतरे और (१९७५), कमलेश्वर–मेरा हमदम, मेरा दोस्त (१९७५), भगवतीचरण वर्मा–अतीत के गर्त से (१९७९), विष्णु प्रभाकर–यादों की तीर्थयात्रा (१९८१), राजेंद्र यादव–औरों के बहाने (१९८१), प्रतिभा अग्रवाल– सृजन का सुख-दुख (१९८१), कृष्णदत्त पालिवाल–स्मृतिबिंब (१९८८), धर्मवीर भारती–कुछ चेहरे, कुछ चिंतन (१९९७), रामदरश मिश्र–स्मृतियोंके छंद इत्यादी.

 

एकविसाव्या शतकातील विद्यानिवास मिश्र–चिडिया रैन-बसेरा (२००२), रामकमल राय–स्मृतियों का शुक्लपक्ष (२००२), विश्वनाथ त्रिपाठी–नंगातलाई का गाँव (२००४), रवींद्रनाथ त्यागी–वसंत से पतझर तक (२००५) हे ग्रंथ वाचनीय होत. या काळात उगम ते विकास असा आठवणींचा आलेख सतत चढता व कलात्मक होत राहिला.


प्रवासवर्णन : हिंदीत प्रवासवर्णन लिहिण्याची परंपरा भारतेंदुपूर्व काळापासून दिसून येते. वनयात्रा हे गुसाई महाराजांचे हस्तलिखित किंवा ब्रज चौरासी कोस वनयात्रा हे हस्तलिखित पुरावे म्हणून सांगता येतात. भारतेंदु युगात बालकृष्ण भट्ट यांचे कतिकी का नहान (गया यात्रा), प्रतापनारायण मिश्र यांचे विलायत यात्रा, दामोदर शास्त्री यांचे मेरी पूर्वदिग् यात्रा ही प्रवासवर्णनांची प्रारंभिक रूपे होत.

 

द्विवेदी युगात सरस्वती या मासिकातून अनेक प्रवासवर्णने प्रकाशित होत असत. बाबू देवीप्रसाद खत्री–बद्रिकाश्रम यात्रा (१९०२), साधुचरण प्रसाद–भारत भ्रमण (पाच भाग १९०३), रमाशंकर व्यास–पंजाब यात्रा (१९०७), सत्यदेव परिव्राजक–अमेरिका दिग्दर्शन (१९११) आणि मेरी कैलाश यात्रा (१९१५) यांची ही ग्रंथरूपातील काही प्रसिद्ध प्रवासवर्णने.

 

छायावाद आणि तद्नंतरच्या स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रवासवर्णनपर लेखन झाले. उदा., कन्हैयालाल मिश्र–हमारी जापान यात्रा (१९३१) राहुल सांकृत्यायन–मेरी यूरोप यात्रा (१९३२), मेरी तिब्बत यात्रा (१९३७) आणि तिब्बत में सवा वर्ष (१९३९) देवदत्त शास्त्री–दुनिया की सैर (१९४१) धीरेंद्र वर्मां–यूरोप के पत्र (१९४२) इत्यादी.

 

राहुल सांकृत्यायन हे स्वातंत्र्योत्तर काळातील प्रसिद्ध प्रवासवर्णनकार. त्यांनी अनेक प्रवासवर्णने तर लिहिलीच पण घुमक्कड़शास्त्र हे प्रवास-शास्त्रावरील पुस्तकही लिहिले. लोहेकी दीवार के दोनों ओर (१९५२), राहबीती (१९५३), स्वर्गोद्यान बिना साँप (१९७३) ही यशपाल यांची प्रवासवर्णने. आपल्या प्रवासवर्णनांतून त्यांनी मुख्यतः रशिया, इंग्लंड, स्वित्झर्लंड, चीन, कोरिया, रूमानिया, हंगेरी, यूगोस्लाव्हिया, मॉरिशस या देशांचे प्रवासवर्णन केले आहे.

 

उत्तर-आधुनिक काळात प्रवास गतिमान झाला आणि प्रवासवर्णनांचा हिंदीत अक्षरशः पूर आल्यासारखी स्थिती झाली. विद्यानिवास मिश्र –यात्राओं की यात्रा (१९९६), निर्मल वर्मा – धुंध से उठती धुन (१९९७), स्वयंप्रकाश – हमसफर नामा (२०००), कीर्ति केसर –प्रवास का प्रसंग (२००६) ही प्रवासवर्णने या काळात उल्लेखनीय ठरली. त्यांनी जग व माणूस गतिमान करत जग जवळ आणले हे मात्र खरे. जागतिकीकरण तसेच दळणवळणसाधने गतिमान होणे यांतूनही प्रवासवर्णनांना गती आली. ती रोचक, उद्बोधक झाली व प्रेरकही ठरली.

 

उपरनिर्दिष्ट साहित्यप्रकारांशिवाय हिंदीत मुद्रितरूपात अन्य साहित्य-प्रकारांचेही (मुलाखत, पत्र, दैनंदिनी, वृत्तांत इ.) लेखन झाले.

 

ज्ञानपीठ विजेते हिंदी साहित्यिक : ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार दहा हिंदी साहित्यिकांना आतापर्यंत (२०१५) प्राप्त झाला आहे. त्यांपैकी सुमित्रानंदन पंत (चिदंबर-१९६८) ‘दिनकर’ – रामधारी सिंह (उर्वशी –१९७२) ‘अज्ञेय’– सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन (कितनी नावोंमें कितनी बार –१९७८) महादेवी वर्मा (यामा –१९८२) हे सुरुवातीचे ज्ञानपीठविजेते हिंदी साहित्यिक होत.

 

१९८२ नंतर हा पुरस्कार साहित्यिकाच्या केवळ साहित्यकृतीस न देता त्याचे समग्र वाङ्मय व त्या भाषेतील त्याचे मौलिक योगदान यांना अनुसरून देण्यास सुरुवात झाली. त्यानुसार हिंदीस हा पहिला पुरस्कार विख्यात साहित्यिक व दुसरा तारसप्तकमधील कवी नरेश मेहता यांना लाभला (१९९२). त्यांनी कथा, काव्य, कादंबरी, प्रवासवर्णन, वैचारिक असे बहुविध लेखन केले. त्यांनी सु. ५० ग्रंथ लिहिले आहेत. त्यांचे महाप्रस्थान हे काव्य विशेष गाजले. कादंबरीकार, कथाकार, भाषांतरकार, निबंधकार, नाटककार म्हणून ख्याती असलेले निर्मल वर्मा हे १९९९ मध्ये हिंदी ज्ञानपीठ संपादन करणारे पहिले गद्यलेखक. हिंदी नवकथेचे ते जनक मानले जातात. तीसरा सप्तकमधील कवी कुंवर नारायण यांनी काव्य, कथा, चित्रपट व रंगमंचविषयक लेखन केले. प्रयोगशील लेखक म्हणून त्यांची ख्याती होती. आत्मजयी हे त्यांचे उल्लेखनीय काव्य. त्यांना २००५ चे ज्ञानपीठ पारितोषिक लाभले. अमरकान्त आणि श्रीलाल शुक्ल हे दोघेही कथाकार, कादंबरीकार. त्यांनी आपल्या लेखनातून वर्तमान समर्थपणे चित्रित केला. त्यांना २००९ चा ज्ञानपीठ पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला. असा संयुक्त पुरस्कार हिंदीस प्रथमच लाभला. केदारनाथ सिंह हे मुख्यतः कवी तथापि त्यांनी समीक्षा-संपादनेही केली. जागतिकीकरणा-नंतरच्या त्यांच्या कविता माणसांचे हरविलेपण व हरणं चित्रित करतात. हिंदीतील त्यांच्या वाङ्मयीन कार्याबद्दल २०१३चा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. [→ भारतीय ज्ञानपीठ].

 

हिंदी बालसाहित्य : सुमारे एक हजार वर्षांपूर्वी हिंदीत लिहिलेल्या पशुदंत या काव्याने हिंदी बालसाहित्याची सुरुवात झाली, असे मानले जाते. ते मुलांसाठी लिहिले नव्हते तथापि बालमनावर विलक्षण मोहिनी घालण्याचे सामर्थ्य त्या काव्यात होते. बालकांसाठी साहित्य लिहिण्याचा प्रारंभिक प्रयत्न हिंदीत अमीर खुसरौ यांच्या ‘पहेलिया’ने (कूटकाव्य) झाला. रूपक, रूखवत, हुमान अशा स्वरूपाचे हे काव्य असून त्यातील शब्दकळा, रहस्य, गुपित यांमुळे जिज्ञासू बालमने आजही ती कोडी सोडविण्यात दंग होऊन जातात. पुढे सोळाव्या शतकात संत कवी कबीरांनी लिहिलेल्या काही ‘साखी’ ही याचीच पुनरुक्ती होय. ते काव्य मुलांसाठी लिहिले नसले, तरी ते मुलांचे आकर्षण ठरले.

 

खास मुलांसाठी म्हणून लल्लू लाल यांनी हितोपदेशमधील कथांची हिंदीत भाषांतरे केली (१८१२). राजनीति या नावाने त्यांनी तो कथा- संग्रह प्रकाशित केला. राजनीति हे पद्याचं गद्य रूपांतर होय. हिंदी भाषांतराचा खरा प्रयत्न पंडित बदरीलाल यांनी १८५१ मध्ये केला. त्यांनी रॉबिन्सन क्रूसोचा अनुवाद व लिप्यंतर केले. पंडित बदरीलाल यांनी नंतर सहस्र रात्रि संक्षेप चे बंगालीतून हिंदीत भाषांतर केले (१८६१). कोलकात्याच्या सेंट फोर्ट कॉलेजात उर्दूबरोबरीने हिंदी भाषेस स्थान देण्यात आल्याने हिंदी पाठ्यपुस्तकांची निकड निर्माण झाली. ‘सितारे हिंद ‘– राजा शिवप्रसाद यांनी स्वतः मुलांसाठी हिंदी गद्यात पुस्तके लिहिली. त्यांतील बच्चों की कहानी (१८६७), लडकों की कहानी (१८७६) या पुस्तकांना मुलांची विशेष पसंती लाभली. भारतेंदु हरिश्‍चंद्र यांनी याच काळात लिहिलेले अंधेर नगरी (१८८१) हे पुस्तकही मुलांना फार आवडले.


फ्रेड्रिक पिनकांट यांनी बालक दीपक (चार भाग) आणि विक्रोरिया चरित्र मुलांसाठी लिहिले. पुढे बालक दीपक पाठ्यपुस्तक म्हणून बिहारमध्ये स्वीकारले गेले. वंशीधर यांनी १८५५ मध्ये ‘सैडफोर्ट अँड मार्टिन ‘च्या कथा देवनागरीत लिप्यंतर करून वाचनसुलभ बनविल्या. याच सुमारास गिरिधर कविराय यांनी कुडलियाची रचना केली. त्याचा अर्थ मुलांना कळणे दुरापास्त होते तथापि त्यातील लय, ताल यांमुळे तत्कालीन मुलांच्या पिढीत त्या मुखोद्गत असत.

 

स्वामी दयानंदलिखित व्यवहार भानु (१८७९), अंबिका दत्त व्यास यांचे कथा कुसुम कलिका (१८८५), मुन्शी देवीप्रसाद मुंसिफांचे विद्यार्थी विनोद (१८९६) आणि लक्ष्मी नाथ शर्मा यांचे श्री मनरंजन (१८९६) ही काही पुस्तके मुलांची आवडती आहेत.

 

हिंदी बालसाहित्याच्या विकासात शिशु आणि बाल सखा या बालमासिकांचे मोठे योगदान आहे. त्यांत सोहनलाल द्विवेदी, श्रीनाथ सिंह, जहूर बख्श, स्वर्ण सहोदर, रमापती शुक्ल, रामदास गौड, प्रभुदत्त ब्रह्मचारी यांनी लेखन केले. हिंदी बाल साहित्यात रामचंद्र शुक्ल, लाला भगवान दीन, ‘हरिऔध’– अयोध्यासिंह उपाध्याय, गोविंद दास, रामनारायण मिश्र, परशुराम चतुर्वेदी, कामता प्रसाद गुरू, बंग महिला, श्रीधर पाठक यांनी मोलाची भर घातली.

 

प्रेमचंद यांनी आपल्या लेखनाने बालसाहित्य समृद्ध केले. राम नरेश त्रिपाठी यांचे बाल कथा-कहानी व वैद्यनाथ केडिया यांचे नानी की कहानी ही पुस्तके उल्लेखनीय आहेत. प्रेमचंद युगात शिशु व बाल सखा या पत्रिका सुरू राहिल्याच. शिवाय वानर, बालक खिलौना, बाल विनोद यांची त्यात नव्याने भर पडली.

 

सोव्हिएट संघाच्या विदेशी भाषा प्रकाशन संस्थेमार्फत ३ ते ५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी स्वस्त व मस्त पुस्तके बाजारात आली. ही पुस्तके ठळक टाइपात, सचित्र असत. पुढे ती रंगीत झाली. चित्रों में लोरियाँ, चित्रों में १, २, ३, ४ ही अशी काही पुस्तके होत. प्रेमचंदलिखित जंगल की कहानियाँ, शारदा मिश्रांची नीलम, निरंकार देव सेवकांची मसहरी की देवी यांना उत्तर प्रदेश सरकारचे पुरस्कार मिळाले.

 

पाच ते आठ वयोगटातील बालकांसाठी ‘गुणाकर ‘– सुखराम चौबे, विद्याभूषण विभु, रामनरेश त्रिपाठी, सुभद्राकुमारी चौहान, सुमित्रा कुमारी सिन्हा, रुद्रदत्त मिश्र यांनी लेखन केले. आठ ते पंधरा वयोगटासाठी सुमित्रा कुमारी सिन्हा यांनी दादी का मटका, ‘सुमन ‘– शिवमंगल सिंह यांनी प्रभावती, भारतभूषण अग्रवाल यांनी अन्त्याक्षरी ही पुस्तके लिहिली. १० वर्षांपुढील कुमारांसाठी कुसुमावती देशपांडे यांचे वर्षा की बूँद ( मराठीतून भाषांतरित), धर्मपाल शास्त्री यांचे मेरी गुडिया कुछ तो बोल, प्रकाश पंडित यांचे हमारे पक्षी अशी कितीतरी चांगली पुस्तके लिहिली गेली. ज्येष्ठ हिंदी कवींनी केवळ मुलांसाठी बालकविता रचल्या. कवी दिनकरांची ‘मिर्च का मजा’, हरिऔध यांची ‘तमाशा’, हरिकृष्ण देवसरे यांची ‘चाँद-सितारे’ आणि ‘पानी के गीत’ या त्यांपैकी काही उल्लेखनीय रचना.

 

मुलांसाठी नाटकेही लिहिली गेली. कमलेश्‍वरांचे पैसों का पेड, अनिल कुमारांचे आओ बच्चो नाटक खेले, ‘दद्दां’– दयाशंकर मिश्र यांचे नटखट नंदू, डॉ. शंकर शेष यांचे चल मेरे कद्दू ठुमक ठूम (चल रे भोपळ्या टुणूक टुणूकचे भाषांतर) ही काही उल्लेखनीय नाटके होत. त्यांपैकी काही बाल रंगमंचावरही आली होती. हरिकृष्ण दास यांचा ‘इंद्रधनुष्य’, स्नेह अग्रवाल यांचा ‘हंसिए-हंसाइए’ हे विनोदी बालनिबंध होत. बाल कथासाहित्यात शरच्चंद्र चटर्जींच्या बचपन की कहानियाँ हिंदीत आल्या. ‘चंद्र’– यादवेंद्र शर्मा यांच्या मूळ राजस्थानी कादंबरीचे हिंदी भाषांतर जेतसी और बाघीन या नावाने प्रकाशित झाले. पाश्चात्त्य देशातील दर्जेदार साहित्याची हिंदी भाषांतरे व मार्को पोलो, कोलंबस, सिंदबाद अशा साहसी कथा- -कादंबऱ्यांची, चरित्र-प्रवासवर्णनांची हिंदीत रेलचेल आढळते. हिंदी बालचरित्रात मुकुंद देव शर्मालिखित वाल्मीकी, अमरनाथ शुक्ललिखित तुलसीदास, राजेंद्र सिंह भंडारीलिखित तेनसिंग नोर्के, विष्णु प्रभाकर- लिखित खलिफा हारून-अल्-रशिद ही चरित्रे उल्लेखनीय होत. कथा चरित्र-साहित्यात हरिकृष्ण देवसरेंची चितौड का गौरव, अकबर के नवरत्न, नया पंचतंत्र ही पुस्तके पिढ्यान्पिढ्या वाचली जातात. ‘बच्चन – हरिवंशराय’ यांचे जन्मदिन की भेट, शांति भट्टाचार्याचे दमयंती, रत्नप्रकाश शील यांचे तेनाली राम ही पुस्तके मुलांना खूप आवडतात. प्रेमचंद, सुदर्शन, द्रोणवीर कोहली प्रभृती साहित्यकारांच्या पुराणाधारित कथांनाही मुलांचा मोठा वाचकवर्ग लाभला आहे.

 

किशोरांसाठी हिंदीत अनेक विषयांवरील विपुल साहित्य उपलब्ध आहे. तसेच चरित्रलेखनही झाले आहे. केंद्र सरकारच्या अर्थसाहाय्यातून जगप्रसिद्ध गोल्डन बुक एन्सायक्लोपीडिया हिंदीत उपलब्ध आहे. तसेच अनेक शब्दकोशही प्रकाशित आहेत. नॅशनल बुक ट्रस्टचे या संदर्भातील कार्य कौतुकास्पद आहे. युनेस्को, सोव्हिएट संघ यांनी वेळोवेळी मुलांसाठी मासिके, पुस्तके, भाषांतरे प्रकाशित केली आहेत. तसेच नेहरू बाल पुस्तकालयाने मुलांसाठी अनेक पुस्तके उपलब्ध केली. चिल्ड्रन बुक ट्रस्टमार्फत चित्रकार, चित्रे, चित्रकला यांची मोठी मालिका हिंदीत उपलब्ध आहे. बालचित्रवाणीमार्फत हिंदीत अनेक बालचित्रपट प्रदर्शित होत असतात. दूरदर्शनवरून हिंदीमध्ये चोवीस तास प्रक्षेपण सुरू असल्याने व्यंग्यचित्रे (कार्टून्स), प्राणी, पक्षी, निसर्गसाक्षरता मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. दृक्-श्राव्य खेळ (व्हिडिओ-ऑडिओ गेम्स), आभासी खेळ (व्हर्च्युअल गेम्स) इत्यादी मोठे भांडार मुलांसाठी उपलब्ध आहे.

 

हिंदी वृत्तपत्रे : स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील हिंदी पत्रकारितेचे ध्येय जनजागृती, सामाजिक सुधारणा, स्वातंत्र्य आंदोलन व निःपक्ष वृत्तप्रसिद्धी हे होते तर स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय एकात्मता, भारतीय संस्कृती, विचार, तत्त्वज्ञान, साहित्य, राजकारण, समाजकारण यांना महत्त्व आले. हिंदी वृत्तपत्रसृष्टीचा उद्गम, विकास स्वातंत्र्यापर्यंतचा आढावा मराठी विश्‍वकोश : खंड १७ मधील ‘वृत्तपत्रे’ (पृ. ७८, ७९) या नोंदीत आला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात अन्य भारतीय भाषांतील वृत्तपत्रांप्रमाणे हिंदी वृत्तपत्रे ध्येयवादाकडून व्यावसायिकतेकडे अग्रेसर होताना दिसतात. वैचारिकतेपेक्षा अर्थकारणास महत्त्व प्राप्त झाले असून हा बदल थोड्याफार प्रमाणात सर्व भारतीय वर्तमानपत्रांमध्ये पहावयास मिळतो. जागतिकीकरण, संगणकीकरण यांमुळे वृत्तपत्रे मुद्रित न राहता अंकीय (डिजिटल) व आंतरजालीय (इंटरनेट) आवृत्त्या प्रकाशित करू लागली आहेत. वृत्ते व वृत्तपत्रे अँड्रॉइड भ्रमणध्वनींवर वाचणारा मोठा वर्ग २००१ नंतर निर्माण झाल्याने वृत्तपत्रांचे स्वरूपच बदलून गेले. स्वातंत्र्यानंतर हिंदीस राजभाषेचा दर्जा मिळाल्यानेही हिंदी वृत्तपत्रसंख्येत मोठी वाढ झाली.


टाइम्स ऑफ इंडियामार्फत नवी दिल्लीतून नवभारत टाइम्स (१९५०) हे वृत्तपत्र सुरू झाले. अलाहाबादमधून अमृत पत्रिका (१९६४) आणि पंजाबमधून पंजाब केसरी (१९६५) ही वृत्तपत्रे सुरू झाली. यांशिवाय नवी दिल्लीतून अनेक हिंदी वृत्तपत्रे प्रकाशित होऊ लागली तशीच ती उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, प. बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांतून प्रकाशित होत राहिली. नवी दिल्लीतून जनयुग हे डाव्या विचार-सरणीचे दैनिक सुरू झाले (१९७२). व्यापार, उद्योगाची माहिती व वृत्ते प्रकाशित करणारे व्यापार भारती दैनिकही याच सुमारास प्रकाशित झाले. टाइम्स ऑफ इंडियामार्फत संध्या टाइम्स (१९७७) या सायंदैनिकाचे प्रकाशन हा हिंदी वृत्तपत्रसृष्टीच्या दृष्टीने नवा प्रयोग होता.

 

उत्तर प्रदेशातील डेहराडूनहून दूत दर्पण (१९६१), बिजनोरहून बिजनौर टाइम्स (१९६३), उरई आणि बांद्यातून कर्मयुग प्रकाश (१९७१), लखनौहून जागरण (१९७५) ही वृत्तपत्रे सुरू झाली. पुढे त्यांची स्वतंत्र आवृत्ती प्रकाशित होऊ लागली (१९७६). बरेलीतून १९८१ पासून दिव्य प्रकाश आणि कोलकात्याच्या अमृत बझार पत्रिका समूहामार्फत अमृत प्रभातचे प्रकाशन १९७७ पासून अलाहाबाद आणि लखनौमधून सुरू झाले. मध्य प्रदेशातून स्वदेश (१९६६) ग्वाल्हेर, इंदूर आणि भोपाळ येथून प्रकाशित होऊ लागले. उज्जैनमधून अवंतिका (१९६८), रीवातून वांछनीय समाचार (१९७१) आणि शहडोलमधून जनबोध (१९७१) ही वृत्तपत्रे सुरू झाली. कोलकात्यातून प्रेक्षित (१९६०) सिलिगुडीतून जनपथ समाचार (१९८२) पाटण्यातून विश्वबंधु (१९६७), जनशक्ती (१९७५) रांचीतून रांची एक्सप्रेस (१९६८) तर धनबादहून जनमत (१९८३) ही वृत्तपत्रे सुरू झाली.

 

पंजाबमध्ये चंडीगढमधून इंग्रजी दैनिक ट्रिब्यून ची हिंदी आवृत्ती १९७८ मध्ये प्रकाशित होऊ लागली. जोधपूरहून तरुण राजस्थान (१९६९), उदयपूरहून उदयपूर एक्सप्रेस (१९७३), बिकानेरहून युग प्रकाश (१९७५) यांचे प्रकाशन होते. आज अनेक हिंदी दैनिकांच्या राज्यनिहाय आवृत्त्या प्रकाशित होत आहेत. राष्ट्रीय वृत्तपत्र निबंधक नोंदणीनुसार हिंदी भाषेत एकूण ३,४१८ दैनिके प्रकाशित होत होती (२००७-०८). २०११ च्या वाचक सर्वेक्षणानुसार हिंदीत सर्वाधिक खपाची पहिली दहा राष्ट्रीय दैनिके पुढीलप्रमाणे नोंदण्यात आली होती : दैनिक जागरण, दैनिक भास्कर, हिंदुस्तान, अमर उजाला, राजस्थान पत्रिका, पंजाब केसरी, नवभारत टाइम्स, प्रभात खबर, पत्रिका, नई दुनिया. यांतून साहित्य, संस्कृती, क्रीडा, संगीत, पर्यटन, चित्रपट, फॅशन, खानपान, जीवनशैली, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण इत्यादींचीवैविध्यपूर्ण व समीक्षात्मक माहिती असल्याने वृत्तपत्रे वाडी-वस्तीपर्यंत पोहोचली. जागतिकीकरणामुळे वृत्तपत्रे बहुआवृत्तीची झाली असून काही वृत्तपत्रांचे स्वामित्व बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे गेले आहे. राजस्थान पत्रिका या दैनिकाने १९९९ मध्ये इलेक्ट्रॉनिक आवृत्ती प्रकाशित करून मुद्रित आवृत्तीबरोबर ई-आवृत्तीचे नवे युग एकविसाव्या शतकाच्या स्पर्शकाळात सुरू केले.

 

एकविसाव्या शतकात आकाशवाणीची जागा दूरदर्शनने घेतली असून दृक्-श्राव्य वृत्तप्रसारणाच्या सुमारे १०० हिंदी वृत्तवाहिन्या अस्तित्वात आहेत (२०११). त्यांत आज तक, आयबीएन्-७, इंडिया टी. व्ही., एन्डीटीव्ही इंडिया, स्टार न्यूज, न्यूज-२४, झी-न्यूज इत्यादी वाहिन्यांचे प्रसारण देश-परदेशांत होऊन हिंदी भाषेच्या व्यापक प्रचार-प्रसारास हातभार लागला आहे. आज या सर्व वाहिन्यांचे प्रक्षेपण-प्रसारण संगणक, महाजाल, भ्रमणध्वनी, उपग्रह इत्यादींद्वारे होत आहे. [→ वृत्तपत्रे].

 

हिंदी नियतकालिके : हिंदी नियतकालिकांच्या उद्गम आणि विकासाचा स्वातंत्र्यपूर्वकालीन आढावा मराठी विश्वकोश : खंड ८ मध्ये ‘नियतकालिके’ ह्या नोंदीमध्ये पृ. ६५४-६५५ वर घेण्यात आला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षण्मासिक, वार्षिक अशा स्वरूपाची अनेक हिंदी नियतकालिके सुरू झाली. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक नियतकालिके स्वातंत्र्योत्तर काळातही सुरू राहिली. प्रेमचंद यांनी स्थापन केलेले हंस मासिक आजही (२०१५) सुरू आहे. काही अनियतकालिकेही हिंदीत प्रकाशित होत असतात. भाषा, साहित्य, काव्य, समीक्षा, पुस्तकपरिचय, परीक्षण, नाटक, चित्रपट, क्रीडा, संगीत, संस्कृती, विविध ज्ञान-विज्ञाने, धर्म, शिक्षण, घडामोडी, संशोधन, महिला, बाल, कृषी, व्यापार, उद्योग, अर्थ इत्यादी विषयांना वाहिलेली अनेक नियतकालिके नियत कालावधीसाठी प्रसिद्ध होत असतात. त्यांचा मोठा वाचकवर्ग असून तो विविधस्तरीय दिसून येतो. वरील स्वरूपाची सुमारे १००० नियतकालिके हिंदीत प्रकाशित होत असतात.

 

साप्ताहिके : सन १९६० च्या सुमारास टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्र समूहामार्फत साहित्य-संस्कृतीच्या संवर्धनासाठी धर्मयुग हे सचित्र व रंगीत साप्ताहिक सुरू झाले. धर्मवीर भारती हे त्याचे संपादक होते. विषयवैविध्य, विशेषांक, विविध स्तंभ, समकालीन वृत्तांत, कथा, कविता, कादंबरी अंश, वैचारिक लेख, विनोद, कला, क्रीडा, विज्ञान, महिला जगत, व्यंगचित्रे, साप्ताहिक भविष्य, किशोर कक्ष, युवा संवाद इत्यादींमुळे या साप्ताहिकाने राष्ट्रीय साप्ताहिकाचा दर्जा प्राप्त केला. इंग्रजी इलस्ट्रेटेड विकली या साप्ताहिकाच्या धर्तीचे हे साप्ताहिक खपाच्या दृष्टीने विक्रमी ठरले. याच समूहामार्फत वृत्तविश्लेषणासाठी समर्पित साप्ताहिक दिनमान १९६५ च्या दरम्यान सुरू झाले. ‘अज्ञेय’– सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन, रघुवीर सहाय, कन्हैयालाल नंदन यांच्यासारखे मातब्बर संपादक या साप्ताहिकास लाभले. राजकीय, प्रादेशिक वृत्ते राजकीय घडामोडींची नोंद व विश्लेषण यांशिवाय क्रीडाविषयक लेखन यातून होत असे. १९६० पासून सुरू झालेले सिनेसाप्ताहिक स्क्रिन यास मोठा वाचक लाभला, तो रंगीत सचित्रतेमुळे. शिवाय चटपटीत सिनेवृत्ते, बित्तंबातमी इत्यादींमुळे स्क्रिन सारखेच सिनेसाप्ताहिक मायापुरी (१९६४) सुरू झाले व लवकरच त्याचा वाचकवर्ग भारतभर पसरला.साप्ताहिक हिंदुस्तान चे स्वरूप धर्मयुग- प्रमाणे होते. १९६२ मध्ये सुरू झालेले ब्लिट्झ हे साप्ताहिक इंग्रजी ब्लिट्झची हिंदी आवृत्ती असली, तरी तिचे स्वतःचे असे लक्षणीय वैशिष्ट्य होते. राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालेल्या इंद्रजाल कॉमिक्स (१९६४) या हिंदी साप्ताहिकाने बालकांची पिढी वाचती केली. १९७७ मध्ये दिनमानच्या धर्तीवर सन डे या इंग्रजी साप्ताहिकाची हिंदी आवृत्ती रविवार या नावाने सुरू झाली. हास्य, व्यंग्य, विनोद इत्यादींसाठी वाहिलेल्या लोटपोट (१९७२) या साप्ताहिकास विशिष्ट वाचकवर्ग लाभला.

 

पाक्षिके : स्वातंत्र्योत्तर काळात साहित्य, महिला, क्रीडा, कृषी, चित्रपट, बालरंजन इ. विषयांना वाहिलेली पाक्षिके प्रकाशित झाली. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्र समूहाद्वारे कथेस समर्पित सारिका हे पाक्षिक १९६१ मध्ये सुरू झाले. हिंदी कथा, जागतिक व भारतीय भाषांतील श्रेष्ठ कथांची हिंदी भाषांतरे, साहित्यिक व कलाकारांच्या मुलाखती, कथास्पर्धा, कथाचर्चा करणारे हे पाक्षिक साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरले. रतनलाल जोशींच्या संपादकत्वाखाली हे पाक्षिक सुरू झाले. त्याला पुढे कमलेश्वर, कन्हैयालाल नंदन, अवधनारायण मुद्गल यांच्यासारखे दिग्गज संपादक लाभले. सारिका या पाक्षिकाचे विशेषांक संदर्भ व संग्रह या दोन्ही अंगांनी ऐतिहासिक ठरले. सारिका बरोबर टाइम्स समूहाने मुक्ता हे महिलांसाठी स्वतंत्र पाक्षिक सुरू केले. स्त्रीशिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे नवशिक्षित महिलांचा मोठा वाचकवर्ग या पाक्षिकास लाभला पण त्याची मदार शहरी शिक्षित, नोकरदार महिलांवरच प्रामुख्याने राहिली. सन १९७५ पासून सुरू झालेल्या स्पोर्टस् वर्ल्ड या पाक्षिकाने क्रीडाप्रेमी वाचक आकर्षित केला. १९७६ मध्ये दिल्ली प्रेसने सुरू केलेल्या भू भारती या पाक्षिकाने प्रगतिशील शेतीचा प्रचार व प्रयोग यांना प्राधान्य दिले. कानपूरहून १९७८ मध्ये प्रकाशित झालेल्या यू. पी. रोजगार डायजेस्टने नवशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात मार्गदर्शकाची भूमिका वठवली. १९६४ ला टाइम्स समूहाने माधुरी हे चित्रपट पाक्षिक सुरू केले. शिक्षित, उच्चवर्गीय वाचकवर्ग या पाक्षिकास लाभला, तो त्यातील शिष्टसम्मत भाषा, वृत्त यांच्या दर्जामुळे. १९७१ पासून अमर चित्रकथा या पाक्षिकाचे प्रकाशन सुरू झाले. या सचित्र, रंगीत पाक्षिकाने बालरंजनाबरोबरच वाचनसंस्कृती रुजवली.

 

मासिके : साहित्य, भाषा, संस्कृती, भाषांतर, विज्ञान, कृषी, क्रीडा, महिला, युवक, बाल तसेच व्यापार, उद्योग, मंत्रालये, सरकारे यांची मुखपत्रे, प्रकाशकांच्या गृहपत्रिका अशी अनेक प्रकारची मासिके स्वातंत्र्योत्तर काळात हिंदीत विक्रमी संख्येने प्रकाशित झाली. कथेस वाहिलेली नीहारिका (१९६१), नूतन कहानियाँ (१९६७), सजीव कहानियाँ (१९८०), कथायात्रा (१९८०), कथादेश (१९८२) इ. मासिके आग्रा, अलाहाबाद, चंडीगढ इ. शहरांतून प्रकाशित झाली पण त्यांना भारतभर वाचक लाभले. महिलांसाठी प्रकाशित झालेल्या कादंबिनी (१९६१), सहेली (१९६१), गृहशोभा (१९६१), वामा (१९८४) इ. मासिकांनी शिक्षित महिलांशी मैत्री करत आधुनिक विचारधारेचा विकास केला. वामा या मासिकाच्या संपादिका मृणाल पांडे यांनी महिलांना प्रबुद्ध करण्यासाठी विविध प्रकारे लेखनप्रयोग केले. बालवाचकांसाठी सुरू झालेली चंदामामा, नंदन, पराग, चंपक, बालभारती, सुमन सौरभ या मासिकांनी परीकथा, चित्रकथा इत्यादी माध्यमांतून मनोरंजक वाचनरुची विकसित केली. क्रीडाक्षेत्रातील क्रिकेट स्टार (१९८१), खेलभारती (१९८२) या नियतकालिकांनी खेळास प्रतिष्ठा व लोकाश्रय मिळवून दिला.

 

याशिवाय हिंदीत समीक्षा, पुस्तकपरिचय, अनुवाद, विचारधारा यांना वाहिलेली अनेक मासिके नित्य प्रकाशित होत असतात. त्यांत राष्ट्रीय व प्रादेशिक मासिकांचा अंतर्भाव होतो. विशिष्ट विषयक्षेत्रास वाहिलेली मासिकेही हिंदीत विपुल आहेत. आजकल, उत्तरप्रदेश, सोवियत भूमि, राजभाषा भारती, भाषा, समकालीन भारतीय साहित्य, संस्कृति, युनेस्कोदूत, आकाशवाणी, युवकदर्पण इ. मासिके विशिष्ट विषयाभिरुची विकसित करतात.

 

२०१२ च्या वाचक सर्वेक्षणानुसार सर्वाधिक खपाची ठरलेली पहिली १० मासिके पुढीलप्रमाणे होत (कंसातील आकडे वाचकसंख्या दर्शवितात. आकडे लाखात आहेत) : (१) प्रतियोगिता दर्पण (१९.०२), (२) सामान्य ज्ञान दर्पण (१६.४४), (३) सरस सलिल ( पाक्षिक १६.०१) (४) मेरी सहेली (१६.०१), (५) क्रिकेट सम्राट (११.३५), (६) इंडिया टुडे (१०.०१), (७) गृहशोभा (८.४३), (८) गृहलक्ष्मी (९.५८), (९) चंपक (७.६२), (१०) वनिता (७.०२). वरील आकडेवारीवरून हे लक्षात येते, की शिक्षणप्रसारामुळे व ज्ञानलालसेमुळे हिंदी वाचकसंख्येत निरंतर वाढ होत आहे.


साहित्यिक नियतकालिके : मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक रूपांत प्रकाशित होणारी हिंदी नियतकालिके भाषा, साहित्य, समीक्षा, विचारधारा, विज्ञान, संशोधन, इतिहास, संस्कृती इत्यादी विषयांना वाहिलेली असतात. त्यांचा वाचकवर्ग साहित्यप्रेमी, साहित्यिक, कवी, पत्रकार, संशोधक, भाषांतरकार, प्रशासक अशा वर्गांतील असतो. गंभीर, अभ्यासपूर्ण, विचार-प्रवर्तक, चिकित्सक, विश्लेषणात्मक लेखन या नियतकालिकांतून प्रकाशित होत असते. यांपैकी उल्लेखनीय नियतकालिके म्हणून हंस, नया ज्ञानोदय, वसुधा, तद्भव, पहल, प्रकर, अक्षरा, भाषा, संस्कृति, गवेषणा, आलोचना, वाक्, गगनांचल, दलित साहित्य, दस्तावेज, बहुवचन, विपाशा, विश्वहिंदी, इंडिया टुडे (साहित्य वार्षिकी), समीक्षा यांचा निर्देश करावा लागेल. आता या पत्रिकांपैकी काहींच्या ई आवृत्त्या महाजाल, भ्रमणध्वनी इत्यादींवर वाचकांना उपलब्ध आहेत. यांना राजेंद्र यादव, गोपाल राय, नामवर सिंह, जगदीश गुप्त, परमानंद श्रीवास्तव, प्रभाकर श्रोत्रीय यांसारखे संपादक लाभले. शिवाय केवळ महाजालावर प्रकाशित होणारी हिंदी नियतकालिके असून त्यांना जगभर वाचक लाभले आहेत हे विशेष. अशा नियतकालिकांत अनुभूति, अभिव्यक्ति, गर्भनाल, सृजनगाथा, रचनाकार, लेखनी, कविता कोश, साहित्यशिल्पी इत्यादी नियतकालिके उल्लेखनीय होत. यावर प्रकाशित साहित्याची समीक्षा, संशोधन झालेले दिसते.

 

विदेशांत अनेक ठिकाणी हिंदी बोलली जाते. तिचे अध्ययन, अध्यापन, संशोधनही जगातील अनेक विद्यापीठांतून होत असते. तेथील वाचक अभ्यासकांसाठी हिंदीप्रेमी अनेक नियतकालिके प्रकाशित करतात. यांपैकी विश्व हिंदी (मॉरिशस), जय फिजी (फिजी), भारतोदय (सुरिनाम), हिंदी ओपिनियन (दक्षिण आफ्रिका), नवजीवन (ब्रह्मदेश), साहित्य लोक ( नेपाळ), हिंदोस्तान (इंग्लंड), जीवन ज्योति (कॅनडा), सोवियत नारी, सोवियत संघ, सोवियत भूमि (रशिया), चीन सचित्र (चीन), ज्वालामुखी (जपान) उल्लेखनीय होत.

 

हिंदी प्रचारक संस्था : हिंदीच्या प्रचार आणि प्रसारकार्यात स्वयंसेवी संस्थांचे योगदान मोठे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदीस राष्ट्रभाषा करण्याचे स्वप्न पाहिले परंतु भारतीय राज्यघटनेत तिची नोंद व मान्यता संघराज्याची संपर्कभाषा व राजभाषा म्हणून झाली. अनेक मान्यवरांच्या प्रेरणेने हिंदीस राष्ट्रभाषा करण्याच्या ध्येयाने भारताच्या जवळजवळ सर्व प्रांतांत हिंदी प्रचारक संस्था स्थापन झाल्या.

 

‘नागरी प्रचारिणी सभा’, वाराणसी (१८९३) या संस्थेने भारतातील स्वयंसेवी हिंदी प्रचारक संस्था स्थापनेचे युग सुरू केले. अखिल भारतीय हिंदी संमेलन, प्रयाग (१९१०) या संस्थेची स्थापना झाली. या दोन्ही संस्थांनी राष्ट्रीय आंदोलनात राष्ट्रीयत्वाचे स्फुल्लिंग चेतविण्याचे कार्य केले. त्यातून दक्षिण भारतात हिंदी प्रचार सभेचा पाया घातला गेला आणि आसाम, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, ओडिशा ( ओरिसा), तमिळनाडू इ. राज्यांत त्यांचा विस्तार झाला. आजमितीस अशा १७ संस्था कार्यरत आहेत :

 

(१) आसाम राष्ट्रभाषा प्रचार समिती, गौहत्ती (१९३८). या समितीने अनेक पुस्तके प्रकाशित केली असून ही संस्था राष्ट्रसेवक या मासिकाचे १९५१ पासून प्रकाशन करते.

 

(२) ओरिसा राष्ट्रभाषा परिषद, जगन्नाथपुरी (१९३७) : हिच्याद्वारे ओडिशात राष्ट्रभाषा प्रचार कार्याचा प्रारंभ झाला. पं. अनुसयाप्रसाद पाठक व रामानंद शर्मा हे प्रारंभीचे प्रचारक. त्यांच्या कार्यातून ‘पुरी राष्ट्रभाषा समिती’ अस्तित्वात आली. पुढे १९५४ मध्ये या संस्थेस राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले. प्रारंभी ती राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा हिच्याशी संलग्न होती. नंतर ती स्वतंत्रपणे कार्य करू लागली.

 

(३) कर्नाटक महिला हिंदी सेवा समिती, बंगलोर (१९५२) : केवळ महिलांद्वारा चालविली जाणारी ही बहुधा भारतातील एकमेव हिंदी प्रचारक संस्था असावी. तिच्यामार्फत हिंदी प्रचार, हिंदी साहित्य-निर्मिती व प्रकाशन, पुस्तक प्रचार व विक्री, हिंदी अध्यापन इत्यादी उपक्रम राबविले जातात.

 

(४) केरळ हिंदी प्रचार सभा, तिरुअनंतपुरम (१९३४) : के. वासुदेवन् यांनी या संस्थेची स्थापना केली. सभेमार्फत केरल ज्योति हे मासिक चालविले जाते. सभेने आतापर्यंत ४० हिंदी ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

 

(५) गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद (१९२०) : हे राष्ट्रीय हिंदी प्रचारक संस्थेच्या रूपात या विद्यापीठाची स्थापना झाली. या संस्थेमार्फत विविध परीक्षांचे संचालन केले जाते. संस्थेच्या संपर्क पत्रिके मार्फत हिंदी प्रचार, प्रसार, संपर्क इ. कार्य केले जाते.

 

(६) बंबई हिंदी विद्यापीठ, मुंबई (१९३८) : या विद्यापीठांमार्फत विविध परीक्षा घेतल्या जातात. त्यास केंद्रसरकारसह अनेक राज्यांनी समकक्षतेची मान्यता दिली आहे. विद्यापीठामार्फत भारती ही गृहपत्रिका चालविली जाते.

 

(७) कर्नाटक हिंदी प्रचार समिती, बंगलोर (१९३९) : ती दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेच्या परीक्षा १९६१ पर्यंत आयोजित करीत असे. नंतर तिने स्वतःच्या परीक्षा सुरू केल्या. समितीची राज्यात १२५ परीक्षाकेंद्रे आहेत. आजवर समितीने सु. दहा लाख विद्यार्थ्यांना परीक्षांद्वारे राष्ट्रभाषाप्रेम रुजविले.

 

(८) म्हैसूर हिंदी प्रचार परिषद, बंगलोर (१९४३) : हिंदीतर भाषिक प्रदेशात हिंदी प्रचार, प्रसार हे या परिषदेचे प्रमुख ध्येय व कार्य आहे. ही परिषद संपर्क-प्रचारार्थ मैसूर हिंदी प्रचार परिषद पत्रिका प्रकाशित करत असते.

 

(९) मणिपूर हिंदी परिषद, इंफाळ (१९५३) : ईशान्य भारतात समितीचे कार्य चालते. परिषदेमार्फत विविध परीक्षा घेतल्या जातात. परिषदेचे स्वतंत्र ग्रंथालय आहे.


(१०) महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे (१९३७) : सुरुवातीची आठ वर्षे ही सभा राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा हिच्याशी संलग्न राहून कार्य करत होती. नंतर सभेने स्वतंत्रपणे कार्य सुरू केले. सभेमार्फत विविध परीक्षा योजल्या जातात. सभा एक पुस्तक विक्री केंद्र तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळाही चालविते. सभेची राज्यात अनेक ठिकाणी अभ्यासकेंद्रे व ग्रंथालये आहेत.

 

(११) दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, मद्रास (चेन्नई) (१९१८) : दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, मद्रास या नावाने एके काळी प्रसिद्ध असलेल्या या सभेची स्थापना राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सन १९१८ च्या हिंदी प्रचार आंदोलनातून झाली. तिचा शुभारंभ ॲनी बेझंट यांच्या हस्ते झाला. सभेची अनेक विभागीय कार्यालये आहेत. हिंदी प्रचार पत्रिकेचे प्रकाशन सभेतर्फे होते. हिंदीचे उच्चस्तरीय संशोधन करण्याच्या उद्देशाने विद्यापीठ स्तरावर शिक्षण, संशोधन, अध्यापन, अध्ययन केंद्र हैदराबादमध्ये सुरू करण्यात आले (१९६४).

 

(१२) राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा (१९३६) : डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन, आचार्य नरेंद्र देव, आचार्य काका कालेलकर, पंडित माखनलाल चतुर्वेदी, जमनालाल बजाज हे या समितीचे विश्‍वस्त होते. समितीच्या पुढाकारातून विश्‍व हिंदी संमेलने भरली. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ सुरू झाले. समितीची भारतभर १७ प्रादेशिक केंद्रे आहेत. समितीमार्फत दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, म्यानमार, मॉरिशस, चेकोस्लोव्हाकिया, सुरिनाम इ. देशांत हिंदी प्रचार, प्रसारकार्य होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी प्रचारकार्य करणारी ही एकमेव प्रचारसंस्था आहे.

 

(१३) सौराष्ट्र हिंदी प्रचार समिती, राजकोट (१९३७) : भावनगरमध्ये समितीचे कार्य प्रथम सुरू झाले. गुजरात हिंदी विद्यापीठाशी संलग्न राहून समिती कार्य करते. हिंदी बोलता यावे म्हणून ‘हिंदी बातचीत’ अशी अभिनव परीक्षा समिती घेते.

 

(१४) हिंदुस्तानी प्रचार सभा, मुंबई (१९३८) : उर्दू लिपी शिकविण्याचे वर्ग ही सभा चालवते. ‘महात्मा गांधी मेमोरियल रिसर्च सेंटर और लायब्ररी ‘चे संचालन सभेतर्फे केले जाते. सभेच्या ग्रंथालयात उर्दू, अरबी, फार्सी इ. ग्रंथ आहेत. विशेष म्हणजे या भाषांतील २००० पत्रपत्रिकांचे जुने अंक व ग्रंथ या सभेने जपले आहेत. हिंदुस्तानी जबान हे द्वैभाषिक नियतकालिक ही संस्था चालवते.

 

(१५) हिंदी विद्यापीठ, देवधर (झारखंड) (१९२९) : देवनागरी लिपी व राष्ट्रभाषा हिंदी प्रचार, प्रसार हे संस्थेचे ध्येय आहे. विद्यापीठात समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, गणित, भाषा इत्यादी विषयांचे हिंदीतून अध्ययन, अध्यापन व संशोधन होते. विद्यापीठात बंगाली, तेलुगू भाषाही शिकविल्या जातात. अनेक राज्यांत तिचे कार्य चालते.

 

(१६) हिंदी साहित्य संमेलन, प्रयाग (१९१०) : पंडित मदन मोहन मालवीय, पुरुषोत्तमदास टंडन या संमेलनाचे पूर्वाध्यक्ष होते. या संस्थेमार्फत हिंदी प्रचार-प्रसारार्थ अधिवेशन, सन्मान, व्याख्याने, चर्चासत्रे इत्यादींद्वारे कार्य चालते. राष्ट्रभाषा संदेश ही संमेलनाची गृहपत्रिका सर्वाधिक खपाची असून तिचे विशेषांकही निघाले आहेत.

 

(१७) हिंदी प्रचार सभा, हैदराबाद (१९३२) : या संस्थेमार्फत २०० केंद्रे चालविली जातात. ही संस्था पदवी, पदव्युत्तर परीक्षे- बरोबरच वाचस्पती पदवीही प्रदान करते. विविध भाषी ग्रंथांची भाषांतरे व प्रकाशने या संस्थेमार्फत केली जातात. केंद्र सरकारच्या साहाय्याने या सभेने तेलुगू, उर्दू, कन्नड, मराठी आदी भाषांच्या साहित्यिक इतिहासलेखन व प्रकाशनाचे मोठे कार्य केले आहे.

 

‘अखिल भारतीय हिंदी संस्था संघ’ ही वरील सर्व संस्थांची मध्यवर्ती संगठनकार्य करणारी संस्था. ती सर्व संस्थांच्या समन्वयाचे व सार्वजनिक प्रश्‍न सोडविण्याचे कार्य राष्ट्रीय स्तरावर करते. या संस्थेमार्फत राष्ट्रभाषा प्रचारकार्याचा इतिहास प्रकाशित करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या विविध मंत्रालय, राजभाषा समिती समन्वयनार्थ ही संस्था प्रतिनिधी म्हणून सक्रिय असते. वरील संस्थांमार्फत जे कार्य चालते, ते मानसेवी कार्यकर्ते करतात. शिवाय मोठ्या प्रमाणात राष्ट्रभाषा प्रचारक शिक्षक, प्राध्यापक स्वयंसेवक म्हणून समर्पित वृत्तीने कार्य करतात. केंद्रीय हिंदी निदेशालय, केंद्रीय हिंदी संस्थान, आंतरराष्ट्रीय हिंदी सचिवालय (मॉरिशस), महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यालय तसेच विविध विद्यापीठांचे हिंदी विभाग यांचे त्यांना साहाय्य व मार्गदर्शन होत असते. स्वातंत्र्योत्तर काळात या संस्थांनी हिंदीच्या प्रचार, प्रसाराचे कार्य सक्षमरीत्या करून हिंदीला राष्ट्रीय एकात्मतेचे समर्थ साधन बनविले. ह्या प्रचारक संस्था आजही स्वातंत्र्य- पूर्व प्रेरणांच्या आधारे हिंदीच्या प्रचार, प्रसाराचे कार्य राष्ट्रीय कर्तव्य म्हणून करत आहेत.


वेबसाहित्य : १९९० नंतर भारतात संगणक, इंटरनेटच्या वाढत्या प्रचार-प्रसाराने संगणकसाक्षर पिढीचा उदय झाला. ती मुद्रित साहित्या-कडून वेब साहित्याकडे वळली व हिंदीत पोर्टल्स, वेबसाइट्स, ई-जर्नल्स, ई-बुक्स यांचा समावेश झाला. १९९९ मध्ये वेब दुनिया सक्रिय होऊन वेब साहित्याचे हिंदी पर्व सुरू झाले. गेल्या पंधरा वर्षांत हिंदी भाषा व साहित्याच्या शेकडो वेबसाइट्स सुरू झाल्या. भाषांतर, संपादन, दृक्-श्राव्य स्वरूपांची संसाधने (सॉफ्टवेअर्स) विकसित झाली. ती ऑनलाइन / ऑफलाइन (स्थायी/सक्रिय) स्वरूपात कार्यरत झाल्याने त्यांचा वापर वाढला. हिंदी साहित्य प्रकाशित करणाऱ्या वेबसाइट्सद्वारे नित्य साहित्य-प्रकाशनाचे क्षितिज विस्तारले. मुद्रित साहित्याइतकेच वेब साहित्य जगभरचे लोक हिंदीत लिहितात तितकेच वाचतात. मुद्रित साहित्याच्या ई-आवृत्त्या प्रकाशित होणे नित्याचे झाले आहे. हिंदी वेबसाहित्याचा हा नवा अध्याय आजचे विद्यार्थी, संशोधक, साहित्यिक, पत्रकार आपल्या रोजच्या अध्ययन-अध्यापनात वापरतात. त्यावर आज अनेक ग्रंथ प्रकाशित होत असून नवी पिढी लिहिणारी न राहता टंकन करणारी झाली, यावरून या साहित्यक्षेत्राचे महत्त्व लक्षात येते.

 

संदर्भ : 1. Chatterjee, Mrunal, History of Hindu Journalism, Odisha, 2013.

         २. केंद्रीय हिंदी निदेशालय, भाषा (त्रैमासिक), ‘बाल विशेषांक’, नवी दिल्ली, १९७९ ‘रजत जयंती विशेषांक’, नवी दिल्ली, मार्च–जून १९८५.

         ३. गुप्त, गणपतिचंद्र, हिंदी साहित्य का वैज्ञानिक इतिहास, अलाहाबाद, २००५.

         ४. त्रिपाठी, विश्वनाथ, हिंदी साहित्य का सरल इतिहास, हैदराबाद, २००७.

         ५. नगेंद्र हरदयाल, संपा., हिंदी साहित्य का इतिहास, नोएडा, २०१२.

         ६. पाण्डेय, सुधाकर, हिंदी साहित्य चिंतन, दिल्ली, २००२.

         ७. लवटे, सुनीलकुमार, हिंदी वेब साहित्य, नवी दिल्ली, २०१३.

         ८. वर्मा, धीरेंद्र व अन्य, हिंदी साहित्य कोश (भाग १,२), वाराणसी, १९६३.

         ९. श्रीवास्तव, परमानंद, हिंदी भाषा और साहित्य : एक समग्र अध्ययन, नवी दिल्ली, २००६.

 

लवटे, सुनीलकुमार देशपांडे, वर्षा